मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हृदयस्पर्शी भाग-१ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ हृदयस्पर्शी भाग-१ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

एका शहरात लहानाची मोठी झालेली, सुसंस्कृत, सुशिक्षित, सधन घरातील एक मुलगी होती. सुयोग्य शिक्षण झाले आणि सरकारी नोकरीत छान स्थिरावली, बढती घेत मोठी झाली, सर्वार्थाने. पक्षी निरीक्षण, गिर्यारोहण, सामाजिक काही उपक्रम आवडीने जोपासत होती. सख्यांसह त्याचा आनंद उपभोगत होती. पारमार्थिक बैठक निश्चित असावी आतून, ती तोवर दृगोचर झाली नव्हती. एकदा दोन जिवाभावाच्या मैत्रिणींसह नर्मदा परिक्रमेला जायचे ठरवते. संपूर्ण चालत प्रदक्षिणा. नेत्रचक्षू आणि अंतर्चक्षू दोन्ही सजग ठेवून परिक्रमा करताना, मैयाचा भक्तिभाव मनात असताना तिच्या लक्षात येते आजूबाजूची वास्तविकता. परिक्रमा करणाऱ्या लोकांची सेवा करणारे सामान्य जन, त्यांचा सेवाभाव, प्रचंड गरिबी, अभावातील त्यांचे जगणे पाहताना या मुलीच्या मनाला चटका लावून गेले ते तेथील मुलांचे भविष्याचे विचार. एकतर शाळेत जातच नसणारी आणि जात असली तरी अक्षर ओळखही नसणारी ही मुले. यांचे भविष्य काय असेल? कशी जगतील ही? प्रश्न तर मोठेच पडले. साधारणपणे परिक्रमा, यात्रा वगैरे करताना असे विचार बरेच जण करत असतील. परंतु स्मशान वैराग्य जसे अल्पकालीन असते तसे हे विचारही आपल्या आपल्या पूर्वायुष्यात आल्यावर सहज उडून जातात. हा स्वानुभव ही आहे.

ही मुलगी याला अपवाद ठरली. उचललेली परिक्रमा पूर्ण करून आपल्या शहरात परत येईपर्यंत एक निश्चित विचार हिच्या मनात तयार झाला होता. आल्यावर आधी नोकरीचा राजीनामा दिला. त्याची सर्व नियमानुसार पूर्तता केली. बाकी घरची व्यवस्था लावली आणि दोन कपडे आणि अगदीच आवश्यक गोष्टी बॅगेत टाकून ही मुलगी मध्यप्रदेश मधील लेपा मध्ये येऊन पोहोचली. कोणतीही पूर्व यथायोग्य व्यवस्था नव्हती, कोणी खंबीर आधार नव्हता केवळ आणि केवळ अंतर्मनाच्या हाकेला ओ देऊन ती इथे आली.

अतिशय लहानसे खेडे, तिथे राहून काय काय या मुलीने केले, स्थानिक लोकांच्या मनात स्वतः बद्दल कसा विश्वास निर्माण केला, किती काय कसे प्रयत्न केले हे सगळे प्रत्येकाने निदान जाणून घ्यावे, वाचावे एव्हढे नक्की. तर या अथक प्रयत्नातून उभे राहिले “नर्मदालय”.

आज दीडशे मुले तिथे राहत आहेत. त्यांचे संगोपन ही मुलगी करते आहे. या जगावेगळ्या मुलीचे नाव आहे पूर्वाश्रमीची भारती ठाकूर आणि संन्यास स्वीकारल्यानंतर “परिव्राजिका विशुध्दानंदा”.

या नर्मदालयात फेब्रुवारी महिन्यात नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदा महोत्सव असतो. भारती ताईची पुस्तके वाचल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष जावे अशी इच्छा मनात जागी झाली होती. या कारणाने तिकडे जायचे ठरवले. प्रख्यात विदुषी धनश्री ताई लेले यांच्याशी एक स्निग्ध नाते जुळले आणि त्यांच्या निमित्ताने छान सुहृद मंडळी आयुष्यात आली. माझे आजवरचे जगणे एका वेगळ्याच टप्प्यावर गेले असे मी आनंदाने म्हणेन. अशा पंधरा सोळा जणांच्या गोतावळ्यासोबत प्रस्थान ठेवले.

जरी पुस्तक वाचले होते तरी येणाऱ्या दोनतीनशे पाहुण्यांची व्यवस्था कशी काय होईल याबाबत मन साशंक होतेच. नर्मदालयात रोज राहणारे दीडशे आणि हे पाहुणे. पाहू आता जे जसे होईल तसे चालवू, असाच विचार करून आले मी. रात्री नऊच्या नंतर आम्ही बसने पोहोचलो. व्यवस्थित रजिस्ट्रेशन काउंटर होता. तिथे नोंदणी करून सुरुवात होणार होती, पण चला आता आधी गरम जेवा, मग करा हे काम असा प्रेमळ आग्रह झाला. भव्य मंडपात ओळीने भोजनाची सुरेख व्यवस्था होती. टेबल खुर्च्या, स्वच्छ मांडणी आणि साधे स्वादिष्ट जेवण. सलामीच अशी दणदणीत झाली. आजूबाजूला आपोआप बघत होतो. मंडपा समोर सुरेख इमारत. त्याच्या अंगणात खुर्चीवर भारतीताई खुद्द जातीने व्यवस्थेवर लक्ष ठेवून होत्या. आलेले सर्वच त्यांना भेटायला जात होते. आपुलकीने चौकशी होत होती. प्रत्येकजण भारावून जाताना पुढील चार दिवस मी रोज पाहिला. चारही दिवस तिन्ही त्रिकाळ खानपान व्यवस्था उत्तम होती.

रजिस्ट्रेशन करताना प्रत्येक अभ्यागताला बिल्डिंग आणि खोली नंबर दिला गेला. ओळखपत्र मिळाले. आमच्या खोलीत पोहोचल्यावर पंधरा जणांची छान सोय दिसली. प्रत्येकी कॉट, गादी, उशी आणि मध्यप्रदेशच्या थंडीत निभाव लागेल अशी ब्लँकेटस, चार्जिंग पॉइंट्स, पंखे अगदी विचारपूर्वक केलेली व्यवस्था. इतकी खरंच अपेक्षाच केली नव्हती. शेजारी स्वच्छ बाथरूमस्.

दुसऱ्या दिवशी पासून असणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक रूम बाहेर दर्शनी होते. कुठेही गोंधळ नाही. नाश्ता करून सत्र सुरू होत. तीनही दिवस धनश्री ताई लेले, शरद पोंक्षे, उदय निरगुडकर, ऐवज भांडारे अशा मातब्बर व्यक्तींची भाषणे/ कीर्तन होते. आपापल्या विषयातील उत्तम अनुभव त्यांनी आम्हाला घडवला. घडवला असेच म्हणेन कारण उदाहरणार्थ सांगायचे झाले तर नामदेव यांच्याविषयी धनश्री ताई अशा समरसून बोलल्या की खरंच मुक्ताबाई सूनावते आहे त्यांना आणि नामदेव विठ्ठलाच्या पायाशी जाऊन बसलेत, दिसूच लागले जणू. चांगदेव महाराजांना, ” अजून गेलाच नाही का रे भेद तुझ्या मनातला?” विचारणारी धिटुकली, ज्ञानी मुक्ती भिडलीच आम्हाला. हे सगळे होतेच तिथे. त्याचा सर्वोत्तम आनंद घेतलाच पण त्याशिवाय जे मिळाले ते शब्दात पकडण्याचा प्रयत्न करते आहे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : वर्षा कुवळेकर 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।

धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ।।११।।

*

काम आसक्ती विरहित बल बलवंतांचे मी

भरतश्रेष्ठा जीवसृष्टीचा धर्मानुकुल काम मी ॥११॥

*

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।

मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ।।१२।।

*

सात्विक राजस तामस भाव उद्भव माझ्यापासून 

त्यांच्यामध्ये नाही मी ना वसती माझ्यात ते जाण ॥१२॥

*

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।

मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ।।१३।।

*

त्रिगुणांनी  मोहविले आहे सर्वस्वी या  जगताला 

तयापार ना जाणत कोणी मजला या अव्ययाला॥१३॥

*

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।

मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ।।१४।।

*

मम माया ही त्रिगुणांची दुस्तर तथा महाकठिण  

भक्त मम उल्लंघुन माया जाती भवसागरा तरून ॥१४॥

*

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।

माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ।।१५।।

*

मायाग्रस्त अज्ञानी नराधम करिती दुष्कर्म 

ना भजती मजला मूढ त्यांसि ठाउक ना धर्म ॥१५॥

*

चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।

आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।।१६।।

*

चतुर्विध पुण्यशील अर्जुना मज भजणार

आर्त पीडित अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानातूर ॥१६॥

*

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।

प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय: ।।१७।।

*

तयातील ज्ञानी मज ठायी एकरूप नित्य 

अनन्य माझ्या भक्तीत  तोच श्रेष्ठ भक्त 

प्रज्ञेने माझिया तत्वा जाणे तयास मी बहु प्रिय 

ऐसा ज्ञानी भक्त मज असे हृदयी अत्यंत प्रिय ॥१७॥

*

उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।

आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ।।१८।।

*

निःसंशय जे मजला भजती थोर सकल भक्त

ज्ञानी भक्त जो माझा जाणतो ममस्वरूप साक्षात

मनबुद्धीचा मत्परायण ज्ञानी उत्तम गतिस्वरूप

मम ठायी तो सदैव असतो आत्मरूप सुस्थित ॥१८॥

*

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।

वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ।।१९।।

*

बहुजन्मांनंतर ज्या झाले प्राप्त ज्ञान पूर्णतत्व

दुर्लभ ऐसा महात्मा जया वासुदेव विश्व समस्त ॥१९॥

*

कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना: प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।

तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ।।२०।।

*

भोगकामात हरपता ज्ञान स्वस्वभावे होवोनी प्रेरित 

धारण करुनी नियम तदनुसार भिन्न देवतांना पूजित ॥२०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्या भावाला माझी माया कळू दे ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ माझ्या भावाला माझी माया कळू दे ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एक गाणारं तळं होतं आणि त्यात राजहंसांची पाच सुरेख पिलं होती. पण दुर्दैवानं यातलं एक पिलू काहीसं अधू होतं शरीरानं. तळ्यातल्या पाण्यात विहार करायचा तर पाय तर पाहिजेत ना भक्कम? पण नेमके हेच तर शल्य होतं त्या राजहंसाच्या तनमनाचं! या पिलांचे आई-बाबा स्वत:च प्रपंचाच्या लाटांचे तडाखे साहीत कसेबसे तरंगत होते जीवनाच्या या पाण्याच्या पृष्ठभागावर….त्यांच्या पायांतील आणि पंखांतील शक्ती क्षीणक्षीण होत जाणारी! यातला वडील राजहंस तर अकालीच उडून गेला! आई पक्षिणीसह सारेच राजहंस केविलवाणे झाले. कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबाचा वंश पुढे चालवणारा राजहंस पायांनी चालू शकत नव्हता आणि आई पक्षिणी करून करून करणार तरी किती?….त्यावेळी ती स्वत:हून पुढे झाली आणि त्या पिलाची जणू आईच झाली. 

जागृती,स्वप्नी सुषुप्ति या तिन्ही अवस्थांमध्ये भगवदभक्त जसा देवाच्या सान्निध्यात असतो तशी ती त्याला आपल्या अंगाखांद्यावर वागवू लागली….पाऊलं थकली तरी तिला तिच्या कडेवरचं हे पिलू कधी ओझं नाही वाटलं. गाय जसं आपलं वशिंड सहज वागवते तशी ती या बाळाला मिरवत होती. 

बाकी सारं घर स्वरांच्या साधनेत मग्न असताना ती मात्र प्रपंच्याच्या व्यवहारात आपलं गाणं शोधत असे. अस्सल गवय्याची लेक…गळा असा सुनासुना राहीलच कसा? पण एकाजागी बसून गाणं शिकावं,ऐकावं आणि सादर करावं असं तिचं काही नसायचं. घर,अंगण झाडून काढताना,भांडी घासताना आणि अगदी कपडे धुवत असतानाही बाळ तिच्या अंगाशीच असायचा. बघणाराला यांच्याकडे पाहून चित्रातल्या गाय-वासराची आठवण व्हावी! बाळाच्या दुधासाठी भराभरा चरणारी गाय आणि तिच्या पायांत घुटमळत चालणारं वासरू….पण हे वासरू मात्र स्वत: चालू शकत नसायचं त्यावेळी. 

दोन-चार मैलांवरच्या नदीपात्रात कपडे धुवुन येताना तिच्या एका हातात ओल्या कपड्यांचं ओझं असायचं आणि कडेवर बाळ. पायांखाली फुफाटा…तापलेला. रस्त्यावर सावली नावाची पुसटशी रेघही नाही. वाटेच्या सोबतील दुसरं कुणीही नाही. पडक्या आसमंताची साथ आणि ही दोन पावलं दूरवरच्या घराकडे निघालीत…आपल्याच धुंदीत. कडेवरच्या बाळाच्या पायांपासून तापल्या धुळीची धग एक हात दूर. चालणारी जेमतेम दहा वर्षांची तर कडेवरचं बालक पाचेक वर्षांचं. त्याची पावलं तिच्या गुडघ्यापर्यंत पोहोचणारी आणि त्यामुळे चालणं तसं मंदगतीनं. पोटात भूकेचं काहूर माजलेलं आणि  तिची पावलं थकलेली…तरी कडेवरचं ओझं हे ओझं नव्हतं वाटत तिला….तिचा जीवलग होता तो. 

ती अजूनही तशी अल्लड वयातच होती. त्यात सावली धरणारा राजहंस परलोकी निघून गेल्यानं या आयुष्याकडे कटाक्षानं पाहणारंही कुणी नव्हतं तसं…थोरल्या बहिणीशिवाय. ती सुद्धा बालपणातच कपाळावर पोक्तपणाचा गंध लेवून सगळ्यांची आई झालेली पोर. फाटलेलं आभाळ सांधता सांधता तिच्याही हातून एखादा धागा चुकून निसटून गेला असावा. दिवस मागे पडले आणि या पिलांची आभाळं बदलत गेली. बाळ आता थोडा स्वतंत्र उभा राहू शकत होता,चालू शकत होता. त्याच्या पायांत तिनेच बळ भरले होते बहुदा. 

तो अजूनही तिच्यासोबतच चालत होता…पण एका वळणावरून ती अचानक दिसेनाशी झाली. तिच्या भावविश्वातल्या एका लुभावणा-या पायवाटेनं तिला जणू मंत्र टाकून आत खोल वनात ओढून नेलं होतं. आता बाळ तसा आधाराविना राहिला होता आणि मग त्यालाही मोठेपणाचा अंगरखा चढवावा लागलाच. आयत्यावेळी कुणी आधी ठरलेला नट आलाच नाही तर घरातल्याच कुणीतरी ती भूमिका वठवायची असं कित्येकवेळा झालेलं होतं त्यांच्या नाट्यप्रयोगांमध्ये. हा तर प्रत्यक्ष आयुष्याचा मंच…इथं घरचाच पुरूष असायला पाहिजे! 

तिचं असं अचानक निघून जाणं कुणालाच झेपलं नाही. पण कुणीही तिच्या आठवणींशिवाय झोपलं नाही कधी बिनघोर. ठेच लागलेलं पायाचं बोट जसं चालताना एकदा तरी ठेचकाळतंच…आंधळं बोट म्हणतात त्याला ते काही उगाच? दूर वनातून तिने हाक दिली आणि बाळ तिच्यासाठी धावत गेला…त्याच्या पायांत आता जबाबदारीची ताकद आली होतीच. ती संसाराच्या चटक्यांनी हैराण झालेली होती आणि त्या वणव्यातून निसटू पहात होती. फक्त तिला कुणीतरी हात देणारं पाहिजे होतं. फसलेल्या पायवाटेवरून ती पुन्हा हमरस्त्यावर आली आणि तिला सावली गवसली. 

माहेरी गाणं कानांमागे टाकणारी ती आता गाण्यानेच जगाचे कान तृप्त करीत होती. गीतकार जणू तिचेच शब्द तिलाच गायला लावत होते…आणि ती भान विसरून गातही होती….गाण्यांमधून ती जशी जगली तशी दिसू लागली होती….अल्लड,खोडकर,नीडर….तर कधी दुखावलेली,दुरावलेली आणि काही तरी गमावलेली! ती नेमकी कशी हे ताडणं कुणालाही कधीही न जमलेलं.

अब के बरस भेज भैय्या को बाबूल…सावन में लीजो बुलाय रे! बाबा…या श्रावणात तरी दादाला पाठवा ना मला माहेरी घेऊन यायला! माझ्या मैत्रिणी येतील मला भेटायला…आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातील…श्रावणसरी बरसतील…..आपल्या घरच्या आठवणींनी मी व्याकुळ झाले आहे….यौवनानं बालपण चोरलं माझं….माझी बाहुली हरवून टाकली….तुमची किती लाडकी होते ना मी…मग? किती दिवस झाले…नव्हे जणू युगं उलटलीत….दादाला पाठवा! 

माई,दादा आणि सर्व भावंडं या सासुरवाशीनीच्या मागे उभी राहिली. ती बाळच्या आयुष्यात परतली आणि त्याचेही सूर त्याला गवसले. बाळला आता कडेवर बसण्याची गरज नव्हती….पण तिने त्याचे सूर तिच्या कडेवर अंगा खांद्यावर घेतले.  त्याने सुरांना तिचा आवाज मागितला आणि इतरांना दुर्बोध वाटणारे शब्द तिच्या कंठातून सुगम होऊ लागले. 

लहानपणी तिने त्याला कधी दटावलेले असेल की नाही माहित नाही पण आता हा मोठा झालेला बाळ शिकवताना कठोरपणाची छडी हाती घेऊन तिच्या मागे उभा. तिनंही ते सारं निभावून नेलं. तिच्या जीवलगा….राहिले रे दूर घर माझे…. म्हणण्यात प्रत्येकाला आपला जीवलग भेटू लागला. तिच्या स्वरांच्या आवर्तनांमध्ये रात्री उलटून गेल्याचं अगदी पहाटेपर्यंत लक्षातही आलं नाही. चालींच्या मधाळपणात कुणी स्वत:ला हरवून बसले तर काहीचं आभाळ अगदी अंगणात उतरू आलं. प्राणाची तळमळ सागराच्याही काळजात उतरली…पिकलेल्या जांभळांचा सडा कुणाच्या ओट्यांमध्ये पडला तर कुठे समईच्या शुभ्र कळ्या…..देवघरात उमलल्या!

लतादीदी जर गोड आरोह असतील तर आशाताई मुलायम अवरोह म्हणूयात. गायनी कळा धन्य करणा-या या भावंडांनी संगीत विश्वाला मोहिनी घातली ते अविनाशी आहे. यात आशाताईंचं आयुष्य म्हणजे एक दीर्घ काव्य…जी वाचणं सोपं पण भोगणं कठीण. हृदयनाथांबरोबरचं आशताईंचं नातं म्हणजे भावा-बहिणीतल्या नात्याचं एक विलोभनीय चित्र. बालपणी स्वत:च्या पायांनी ‘चाल’ अशक्य असणारे हृदयनाथ पुढे गाण्यांच्या ‘चालीं’नी रसिकांच्या श्रवणाचा मार्ग प्रशस्त आणि श्रीमंत करीत गेले. आणि ते स्वत:च्य हिंमतीवर ते केवळ चाललेच नाहीत तर दीनानाथांच्या संगीत परंपरेच्या वारशाचे भक्कम आधारही झाले.

माझ्या भावाला माझी माया कळू दे असं आशाताई एका गाण्यात म्हणाल्यात…. आई बाबांची सावली सरं…छाया भावाची डोईवर उरं! आशाताईंनी त्यांच्या ‘बाळा’च्या डोईवर धरलेल्या छायेबद्द्ल ह्र्दयनाथ यांनी लिहिलेलं वाचताना असं वाटतं की….त्यांना बहिणीची माया खरंच कळली आहे. 

(आजच्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील सप्तरंग पुरवणीत ह्र्दयनाथ मंगेशकरांनी आशाताईंविषयी जे काही लिहिलं आहे ते अगदी हृदयाच्या तळापासूनचं आहे..त्यामुळेच ते अस्सल आहे. ते वाचून हे मी माझ्या शब्दांत मांडलं आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका शूरवीराचे शब्द !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एका शूरवीराचे शब्द ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एका शूरवीराचे शब्द ! 

अर्थात… शूर नायक…कर्नल वसंथा वेणुगोपाल ! 

आसमंतात धुकं नुसतं भरून राहिलंय. माझ्या जवानांनी मस्तपैकी शेकोटी पेटवून ठेवलीये माझ्या खोलीतल्या शेकोटीच्या जागेत….छान ऊब मिळतीये काश्मिरातल्या त्या नाजूक लाकडांतून उठणा-या सडपातळ ज्वाळांची. मी अंगावर रजई पांघरूण पडलो आहे निवांत भिंतीला गुडघे टेकवून. सारं कसं धुंद आहे….आपण प्रेमात असतो ना तेंव्हा वाटतं तसं…सगळं मधाळ. केनेथ ब्रुस गोरलिक ज्याला सर्वजण केनी जी म्हणतात…त्याचं स्मूद जॅझ सॅक्सोफोन कानांवर हलकेच पडतं आहे….द मोमेंट वाजवतो आहे केनी. 

पण खोलीच्या बाहेर रात्रीच्या अंधारात इकडून तिकडे सतत येरझारा घालणारा प्रकाशझोत आहे आणि त्याचा उजेड थोड्याथोड्या वेळाने खोलीत येऊन जातोय…..हा प्रकाश डोंगरावर काहीतरी शोधतो आहे डोळ्यांत तेल घालून. माझी एके-४७ माझ्या हाताशीच आहे….या शस्त्राचा तो थंड स्पर्श! यातून सुटणारा आगीचा लोळ क्षणार्धात समोरचा देह कायमचा थंड करणारा…..आणि म्हणूनच या सुंदर वातावरणात वास्तवाचं भान सुटता सुटत नाही. आणि ते सोडून चालणार नाही. मी इथं जीवनाचा आनंद घेण्यासाठी, सुट्टीवर आलेलो नाहीये. आपल्या सीमेत कुणीतरी घुसण्याच्या प्रयत्नांत आहे….शत्रू! आणि त्याला थोपवण्यासाठी,संपवण्यासाठी या जीवघेण्या थंडीतही अंगात ऊब टिकवून ठेवायला पाहिजे…..मी जागाच आहे. 

आज पहाटे दोन वाजताच आम्ही शत्रूच्या मागावर निघालो होतो….सात वाजेपर्यंत चालू होता आजचा खेळ. आम्ही दबा धरून बसलो होतो….प्रचंड साचलेल्या बर्फात….अंगातील हाड न हाड गोठून चाललेलं….सर्वांच्या हातातील एके-४७ रायफल्स….एखाद्या बाळाला जसं हातांवर अलगद झुलवत रहावं तसं या रायफल्स खेळवत,सांभाळत सर्व सज्ज होतो! आम्ही त्यांची वाट पहात होतो….शिकार रायफल्सच्या टप्प्यात येण्याची वाट पहात बर्फात निजलेलो होतो….कसलाही आवाज न करता…आमच्या श्वासांचाही आवाज बहुदा होत नसावा…श्वासांना वेळकाळ समजते! 

पण आज त्यांची शंभरी भरलेली नसावी बहुदा….आम्ही आयोजित केलेल्या या स्वागतसमारंभाकडे मंडळी फिरकलीच नाहीत….त्यांना बहुदा आमचा अंदाज आलेला असावा. किंवा मिळालेली गुप्त माहिती अपुरी असावी! असं होतं कित्येकदा. पण बेसावध राहून चालत नाही! आम्ही परत आलो आहोत! पण लवकरच त्या आगंतुक पाहुण्यांची गाठ पडणार हे निश्चित! 

हे शब्द आहेत एका नीडर आणि तरीही मनाने अत्यंत कोवळ्या असलेल्या एका सैन्याधिका-याचे….आपल्या प्रिय पत्नीला सुभाषिणीला लिहिलेल्या एका पत्रातील. अशी चारशेपेक्षा अधिक पत्रं संग्रही आहेत वीरनारी सुभाषिणी वेणुगोपाल यांच्याकडे. आणि या पत्रांचे लेखक आहेत कर्नल वसंथा वेणुगोपाल. 

वेणुगोपाल साहेब १९८९ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘घातक नववी’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या नवव्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. त्यांची सैन्य कारकीर्द तब्बल १८ वर्षे बहरत राहिली. २००६ मध्ये वेणुगोपाल साहेबांना याच नवव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली….कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात यावेळी ही बटालियन जम्मू-काश्मिरातील उरी येथे कर्तव्यावर होती. आणि बटालियनच्या प्रत्येक अतिरेकी विरोधी अभियानात कर्नल साहेब जातीने पुढे असत. एकदा त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना विचारले होते….कर्नल दर्जाच्या अधिका-यास असं प्रत्येक वेळी प्रत्येक कामात पुढं असावंच लागतं का? त्यावर साहेबांनी मातोश्रींना हसत हसत सांगितलं होतं…अम्मा….माझी माणसं जिथं तिथं मी! जवानाचं नेतृत्व असं अग्रभागी राहूनच करावं असं मला वाटतं! 

आजही असंच केलं साहेबांनी. ३०  जुलै २००७…पाकिस्तानातून अतिरेक्यांचा एक मोठा गट उरीमध्ये घुसण्याच्या तयारीने सीमा पार करून आपल्याकडे घुसलेला आहे….ही खबर पक्की होती. साहेबांनी आपले कमांडो सज्ज केले आणि स्वत: पुढे निघाले. अतिरेक्यांसाठी भरभक्कम सापळा रचला. अतिरेकी रात्रभर बर्फाच्या कड्यांच्या आडोशाने लपत छ्पत पुढे येत होते….गुहांमध्ये लपत होते. पण आपल्या जवानांनी त्यांना नजरेने टिपलेच… 

कर्नल साहेबांनी आता मात्र त्यांना चारी बाजूंनी घेरलं…त्यांना आपल्याकडे घुसू तर द्यायचेच नाही पण परत पाकिस्तानी सीमेत जिवंतही पळून जाऊ द्यायचे नाही….हा प्रत्येकाचाच निर्धार होता. प्रचंड बर्फ होतं…..वीस-तीस फुटांच्या घळी होत्या वाटेत. त्यांच्या निमुळत्या जागांमध्ये आडवे झोपून अतिरेक्यांच्यावर लक्ष ठेवून रहावे लागत होतं. वेणुगोपाल साहेबांना आपला वेढा करकचून आवळत आणला. साहेबांसोबत रेडिओ ऑपरेटर लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव नावाचा मर्दमराठा शूर गडी सावलीसारखा होता. 

३१ जुलै,२००७ची सकाळ उजाडली होती…काही तासांपूर्वी तुफान गोळीबार करीत राहणारे अतिरेकी आता एकाएकी शांत झाल्याचे वाटले. म्हणून शशिकांत यांनी अर्धवट उभे राहून गुहेच्या दिशेने पाहिले तर तिकडून एके-४७ ची मोठी फैर शशिकांत साहेबांच्या छातीत घुसली….पण कोसळता कोसळता या पठ्ठ्याने समोरच्या अतिरेक्याला अचूक टिपून वरती पाठवले. आता मात्र वेणुगोपाल साहेब चवताळून पुढे सरसावले. अतिरेक्यांसमोर त्यांचा साक्षात मृत्यूच उभा ठाकला होता..

साहेबांनी एकाला तर अगदी समोरासमोर उडवला….पण इतर अतिरेक्यांनीही नेम साधले आणि साहेब गंभीर जखमी झाले आणि वीस फूट खाली कोसळले…जवानांनी त्यांना पुन्हा वर आणले व सुरक्षित जागी निजवले…पण तशाही स्थितीत साहेबांनी सूचना,नेतृत्व आणि स्वत: गोळीबार जारी ठेवला…रक्तस्राव सुरू असतानाही. वैद्यकीय मदत मिळायला अवकाश होता….! साहेबांनी अशाही स्थितीत आणखी दोन शत्रू टिपले….घातक नववी मराठा बटालियन आता अतिरेक्यांवर आवेशाने तुटून पडली….एकूण आठ अतिरेकी होते….कर्नल साहेब, शशिकांत साहेब आणि उर्वरीत कमांडोज यांनी मिळून हे आठ राक्षस निर्दाळले होते. 

पण लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव जागीच वीरगतीस प्राप्त झाले होते तर कर्नल वसंथा वेणुगोपाल साहेब रूग्णालयात उपचार मिळेपर्यंत स्वत:चे प्राण राखू शकले नाही….प्रचंड जखमी झाल्याने त्यांच्या श्वासांचाही नाईलाज होता! 

कर्नल साहेबांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान दिला गेला. लान्स नायक शशिकांत बच्छाव यांना मरणोत्तर वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. २५ मार्च ही कर्नल साहेबांची जन्मतिथी. आज ते ५५ वर्षांचे असते आणि त्यांच्या आंतरीक इच्छेनुसार निवांत जीवन जगत असलेले असते…पण…असो. भावपूर्ण श्रद्धांजली…साहेब. 

शहीद कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या पत्नी श्रीमती सुभाषिणी वेणुगोपाल पती गमावल्यानंतरच्या अवघ्या तीनच महिन्यांत निश्चयाने उभ्या राहिल्या…त्यांनी सैनिकांसाठी काम सुरू केले आणि हे काम अतिशय उत्तम सुरू आहे. 

कर्नल साहेबांच्या दोन्ही मुलींनी मिळून फॉरएव्हर फोर्टी नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात कर्नल साहेबांनी कुटुंबियांना लिहिलेल्या चारशेच्या वर पत्रांचा उल्लेख,संदर्भ आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची माझी इच्छा आहे. पुस्तक मागवले आहे. लवकरच त्याबाबतीत कार्यवाही सुरू करीन. कारण ही शूर आयुष्यं आणि त्यांच्या धीरोदात्त कुटुंबियांचा संघर्ष सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजेत…असं वाटत राहतं. 

(वरील छायाचित्रात डाव्या बाजूला कर्नल साहेब आणि उभे असलेले लान्स नायक शशिकांत साहेब दिसत आहेत.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कैकयी. तिच्यामुळेच रामायण घडले. वनवासात जाण्यापूर्वी राम  हा इतर राजांप्रमाणे फक्त रामराजा होता. पण रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा तो अयोध्येस परत आला तेव्हा तो” प्रभू रामचंद्र” झाला. शुद्ध परात्पर राजाराम वगैरे  सर्व विशेषणे त्याला त्यावेळेला लागली. आणि यासाठी कैकयीच  कारणीभूत आहे.

ती केकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. दशरथा पासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. आपल्या मुलाला अयोध्येचे राज्य मिळावे म्हणून तिने सावत्र मुलगा राम याला वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. परंतु पुत्र विरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे  तिला खलनायिका ठरवतात.”माता न तू, वैरिणी “या प्रसिद्ध

गाण्यामुळे तर ती जास्तच दुष्ट वाटू लागते. पण प्रत्यक्षात तसे नाही.

कैकयी अत्यंत सुंदर, धाडसी ,युद्धकलानिपुण, ज्योतिषतज्ञ होती .त्यामुळे दशरथाची सर्वात लाडकी राणी होती. एकदा देवराज इंद्र संब्रासुर नावाच्या राक्षसाशी लढत होता. पण तो राक्षस खूप शक्तिशाली होता म्हणून इंद्राने दशरथाकडे मदत मागितली. दशरथ युद्धाला सज्ज झाला. कैकयीदेखील त्याच्याबरोबर गेली. युद्धामध्ये दशरथाच्या सारथ्याला बाण लागला.  दशरथ हादरला. पण कैकयीने स्वतः उत्तम सारथ्य केले. दुर्दैवाने रथाचे एक चाक खड्डयात अडकले. कैकयी पटकन रथातून खाली उतरली. रथाचे चाक खड्डयातून बाहेर काढले. ते पाहून राक्षस घाबरला आणि पळून गेला. दशरथाचे प्राण वाचले. त्याने तिला दोन वर दिले.

रामाचा राज्याभिषेक ठरला. कैकयीने वराप्रमाणे दशरथाला रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक असे दोन वर मागितले. त्याची खरी कारणे खालील प्रमाणे आहेत.

१)कैकयी ज्योतिष जाणत होती. तिने रामाच्या राज्याभिषेकावेळी कुंडली मांडली. त्यावेळी तिच्या लक्षात आले की सध्या चौदा वर्ष जो कोणी सिंहासनावर बसेल तो स्वतःचा आणि रघुवंशाचा नाश करेल. ते टाळण्यासाठी तिने रामाला वनवासाला पाठवले.

२) ती युद्ध कला निपुण होती. त्यावेळी वाली नावाचा एक राजा होता. त्याला वरदान मिळाले होते की जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची निम्मी शक्ती त्याला मिळत असे. त्याच्याशी युद्ध करायला दशरथ आणि कैकयी गेले. पण दशरथ हरला. तेव्हा वालीने त्याला दोन अटी घातल्या. तुला सोडतो पण मला कैकयी  देऊन टाक किंवा तुझा राजमुकुट दे. अर्थात् दशरथाने आपला राजमुकुट त्याला दिला. ही गोष्ट फक्त या दोघांनाच माहीत होती. राजमुकुटाशिवाय राज्याभिषेक करता येत नाही . म्हणून तिने राज्याभिषेकाच्या आदल्या  रात्री रामाला बोलावले. विश्वासात घेऊन हे सांगितले .” तू वनवासाच्या निमित्ताने वालीचा वध कर आणि तो  राजमुकुट घेऊन ये.”  राम तयार झाला. आणि म्हणूनच राम जेव्हा रावणाचा, वालीचा ,वध करून अयोध्येस परत आला तेव्हा त्याने सर्वात प्रथम कैकयीला नमस्कार केला नंतर कौसल्येला.

३) श्रावणबाळाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिला होता की तू देखील आमच्यासारखाच पुत्रशोकाने प्राण सोडशील. राज्याभिषेकाच्या वेळी दशरथ तसा वृद्धच झाला होता. रामाच्या मृत्यूपेक्षा विरहाच्या पुत्रशोकाने दशरथाचा मृत्यू झालेला बरा. असा सूज्ञ विचार करून , रामाचा मृत्यू योग टाळण्यासाठी तिने रामाला वनवासात पाठवले.

४) रामाचा जन्मच मुळी रावण किंवा सर्व राक्षसांचा वध करणे यासाठी होता.  राज्याभिषेकाच्या वेळी सर्व देवांना चिंता पडली की हा जर इतर राजांप्रमाणे राज्यकारभार करू लागला तर राक्षसांचा वध कोण करणार? ते सगळे सरस्वतीला शरण गेले. सरस्वती मंथरा दासीच्या जिभेवर आरूढ झाली. तिने कैकयीला गोड बोलून भुलवले आणि रामाला वनवासात पाठवण्यास भाग पाडले.

५) खरे तर तिचे भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम होते. ती भरताबरोबर रामाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेली. व म्हणाली, मी कुमाता आहे. तू मला क्षमा कर. तेव्हा रामाने तिची समजूत घातली.” तू सुमाता आहेस. ज्या मातेने भरतासारखा भाऊ मला दिला ती सुमाताच आहे .”

… मग आपणही तिला कुमाता न म्हणता सुमाताच म्हणूया ना?

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बुवा.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ बुवा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ट्रकने मुंबईत प्रवेश केला तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. एका साध्या टपरीवजा हॉटेलपाशी ट्रक थांबला. बुवा ड्रायव्हर शेजारीच बसले होते. ड्रायव्हरनं खाली उडी मारली. बुवांनाही जाग आली. रात्रभर म्हणावी तशी झोप लागलीच नव्हती. आणि रात्रभरच्या ट्रक प्रवासात ते शक्यही नसतं. पहाटे कुठं डोळा लागला तर मुंबई आलीच.

बुवांचं वय झालं होतं. त्यांना ट्रकच्या केबिन मधुन खाली उडी मारणं शक्य नव्हतं. ड्रायव्हर सोबतच्या माणसानं कशीतरी कसरत करुन बुवांना खाली उतरवलं. टपरीपुढे एक लाकडी टेबल होता.. आणि चार लोखंडी खुर्च्या. बुवा तेथे टेकले. प्लास्टीकच्या जगमधुन पेल्यात पाणी ओतले. खळखळुन चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं. खांद्यावरच्या पंच्याला तोंड पुसलं.

टवके उडालेल्या कपात एका पोरानं चहा आणुन दिला. त्या गरम चहाचा पहिला घोट घेतल्यावर बुवांना जरा बरं वाटलं. थोडी तरतरी आली.

ट्रक ड्रायव्हर नंतर चहाचे पैसे दिले.. ते ठरलेलंच असायचं. बुवांची परिस्थिती ड्रायव्हरला माहीत होती. म्हणुन तर तो नेहमी बुवांना कोल्हापूर पासुन मुंबई पर्यंत घेऊन यायचा.. काहीही पैसे न घेता. जातानाही तसंच.. त्याच ट्रकमधून बुवा पुन्हा कोल्हापुरला जायला निघायचे.

चालत चालत बुवा निघाले.. आणि पंधरा मिनिटांत आकाशवाणी केंद्रावर आले. त्यांचा अवतार बघून खरंतर गेटवर त्यांना अडवायला पाहिजे होतं.. पण बुवांना आता तिथे सगळे जण ओळखत होते. चुरगळलेला सदरा.. गाठी मारलेलं धोतर.. झिजलेल्या वहाणा.. पण दाढी मात्र एकदम गुळगुळीत. काल रात्री निघण्यापूर्वीच बुवांनी दाढी केली होती.

आकाशवाणी केंद्राच्या प्रतिक्षा गृहात बुवा आले. नेहमीच्या सोफ्यावर बुवांची नजर गेली. तो रिकामाच होता. बुवांना जरा बरं वाटलं. तिथे कुणी बसायच्या आत बुवा घाईघाईने गेले.. आणि सोफ्यावर चक्क आडवे झाले. दोनच मिनिटांत बुवा छानपैकी घोरु लागले.

एवढा आटापिटा करून कोल्हापुराहुन मुंबईला येण्याचं काय कारण? तर केवळ पैसा..

बुवांची परिस्थिती खुपच हलाखीची होती. साक्षात सवाई गंधर्वांचा आशिर्वाद मिळालेल्या कागलकर बुवांची सध्या ही अशी परिस्थिती होती. एकेकाळी सवाई गंधर्वांचे शिष्य म्हणून त्यांना कोण मान होता. पण आर्थिक नियोजनचा अभाव. कुणीतरी सांगितलं.. मुंबई आकाशवाणीवर गाण्याचा कार्यक्रम केला की साठ रुपये बिदागी मिळते. त्यांनी आकाशवाणी केंद्रावर चकरा मारायला सुरुवात केली.

तिथं त्यांना सांगण्यात आलं.. ’ तुम्ही कोल्हापूरचे.. त्यामुळे पुणे केंद्रावर जा. ’

पण झालं होतं काय.. पुणे केंद्रावर कलाकारांची गर्दी.. तिथं नंबर लागणं कठीण.. शिवाय बिदागी पण कमी.. म्हणून मग मुंबई केंद्रावर चकरा.

अखेर कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुंबईचा असाच एक डमी पत्ता दिला.. आणि आपण मुंबईकर आहोत असं सिद्ध केलं. मुंबई केंद्रावर त्या वेळी रविंद्र पिंगे अधिकारी होते. त्यांनीही समजुन घेतलं. वर्षाकाठी पाच सहा कार्यक्रम देण्याची व्यवस्था केली.

आकाशवाणी केंद्रावरच्या माणसांनी बुवांना जागं केलं. बुवांच्या रेकॉर्डिंगची वेळ झाली होती. बुवा उठले चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं.. ताजेतवाने झाले.. आणि रेकॉर्डींग रुममध्ये आले.

गळ्यात दैवी सुर घेऊन जन्मलेले कागलकर बुवा गायला बसले.. आणि..

.. त्यांच्या अलौकीक गायनानं सगळा रेकॉर्डींग रुम भारुन गेला.

अर्ध्या तासाचं रेकॉर्डींग झालं.. बुवा बाहेर आले. केंद्रावर असलेल्या कॅन्टीन मध्ये एक रुपयात राईस प्लेट मिळत होती. तिथे जेवण केलं. साठ रुपयांचा चेक खिशात टाकला.. आणि डुलत डुलत पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले.

उमेदीच्या काळात मिळालेला पैश्यात भविष्य काळाची तरतूद करणं सगळ्यांना तरच जमतं असं नाही. मग म्हातारपणी त्यांची ही अशी अवस्था होते. कागलकर बुवांचं नशीब थोडंफार चांगलं.. त्यांना आकाशवाणीनं मदतीचा हात दिला.

कागलकर बुवा ज्याला त्याला अभिमानाने सांगत.. पु. ल. देशपांडे यांनी माझा गंडा बांधला होता. आता पु. ल. तर बालगंधर्वांच्या गायकीचे चहाते.. मग सवाई गंधर्वांचे शिष्य असलेल्या कागलकर बुवांचा गंडा ते कसे बांधणार?

हाच प्रश्न एकदा रविंद्र पिंगे यांनी पु. लं. ना विचारला.

पु. ल. देशपांडे म्हणाले..

मी तेव्हा बेळगावात रहात होतो. कागलकर बुवा पण तेव्हा बेळगावातच रहात होते. मी बुवांची परिस्थिती पाहिली. दोन पैसे मिळावेत म्हणून त्यांनी गाण्याचा क्लास काढला होता. पण त्यांना विद्यार्थी मिळेनात.

मी विचार केला.. मी जर बुवांचा गंडा बांधला, तर बुवांचा जरा गाजावाजा होईल‌.. त्यांना विद्यार्थी मिळतील. केवळ म्हणून मी बुवांचा गंडा बांधला.. त्यामुळे मला अपेक्षित असलेला बोलबाला झाला.. त्यांच्याकडे बरेच विद्यार्थीही आले हे खरं.. पण माणूस मात्र खुपच गुणी.. त्यांच्यासारख्या थोर गायकाला अश्या परिस्थितीतला सामोरं जावं लागलं हे दुर्दैव..

आणि हे आम्हाला पाहायला लागतं आहे.. हे आमचं दुर्दैव!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पडद्यामागच्या महिला… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पडद्यामागच्या महिला…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

महिला दिनानिमित्त पदवी भूषण महिलांचा सत्कार होतो.आणि त्या उजेडात येतात. पण समाजातला हा कष्टाळू महिला वर्ग अंधारातच राहतो.त्यांच्या मनात प्रसिद्धीची हाव नसते. असतें ती निर्मळ, निरामय,कर्तव्य भावना आणि निरपेक्ष प्रेम. आपलं लक्ष त्यांच्याकडे गेलं की त्यांचा आत्मविश्वास दुणावतो आणि,..आणि त्यांची उमेद वाढते.अश्याच एका लक्ष्मीला आपण भेटूया का ?… 

नऊ हा आकडा जणू काही तिच्या आयुष्याला चिकटला होता.घरांत जावा,सासू , मुले, पुतणें अशी खाणारी नऊ माणसे होती, नवऱ्याच्या पगार फक्त 9000.मुलं नववीपर्यंत शिकलेली.आणि त्यात आता नवरात्राचे नऊ दिवस उपास करून थकलेली ती. मंदिराच्या पायरीवर बसलेली मला दिसली. मी म्हणाले, ” लक्ष्मी इतके उपास का करतेस ? अगं कित्ती गळून गेली आहेस तू,!सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस का ? घाम पुसत ती म्हणाली, “किती काळजी करतासा ताईसाहेब ! आता घरी गेल्यावर भगर खाईनच की,”  “अगं पण घरी जाणार कधी ? त्याच्यापुढे करणार कधी?आणि खाणार कधी? ते काही नाही ऐक माझं, हे राजगिऱ्याच्या लाह्यांचे पुडे घेऊन जा,दुधात   भिजवून साखर घालून खा.आणि हॊ इतके उपास करतेस,अनवाणी फिरतेस,तूप लावत जा पायाला.” 

लाह्याचा पुडा घेतांना तिचे डोळे भरून आले.”ताई या मायेचे ऋण  कवा आणि कसे फेडू मी? “असं म्हणून ती पाठमोरी झाली. तापलेल्या डांबरी रस्त्यावर तिच्या अनवाणी पायातली जोडवी खणखण वाजत होती.तिसऱ्या दिवशी टवटवीत चेहऱ्यांनी सुस्नात, हिरव्यागार लुगड्यातली ठसठशीत, हळदी कुंकू लावलेली ती माझ्यासमोर आली, तेव्हां मी बघतच राहयले. उपासाचे,भक्ती,श्रद्धा भावनेचं आणि सात्विकतेचं तेज तिच्या चेहऱ्यावर  झळकत होतं. माझ्या विस्फारलेल्या नजरेला हंसून दाद देत ती म्हणाली,” वहिनी बाय हा डबा घ्या. अंबाबाईचा  प्रसाद. पहाटला देवपूजा करून तुम्ही दिलेल्या राजगिऱ्याच्या वड्या करून निविद  दाखवला. हा घ्या प्रसाद . टाका तोंडात.हाँ अक्षी !आता कसं! असं म्हणत ती दिलखुलास हसली. छान कुरकुरीत खुसखुशीत वडी जिभेवर विरघळली. मी आश्चर्याने विचारलं, “लक्ष्मी अगं उपासाच्या लाह्या मी तुला खायला दिल्या होत्या. दिवसभर उपाशी होतीस ना तू?” ऐका नं ताई तुमची मायेची कळकळ कळली मला , तुमच्या शब्दाचा मान राखून मुठभर लाह्या  दुधात भिजवल्या. फुलावानी फुलंल्या बघा त्या. खाऊन पोट तवाच गच्च भरलं.त्यातनं थोड्या राखून या चार वड्या केल्या. ईचार केला अंबाबाईला निविद बी व्हईल आणि ताईंना प्रसाद बी देणं व्हईल.” मी अवाक झाले. एका हाताने घेतलं तर दुसऱ्या हाताने परतफेड करणारी कुठल्या मातीची बनली आहेत ही माणसं .  

मनात आलं आज सगळीकडे भ्रष्टाचार झालाय. माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच. अशा प्रवृत्तीच्या सुशिक्षित समाजात राहूनही,वयाने मोठं होतांना कुठल्या विद्यालयातून डिग्री घेऊन बाहेर पडल्या आहेत ह्या महिला ? खरंच देव चरां चरांत आहे .पक्षी कसे उडतात ? मातीत बीज कसं अंकुरतं ? बाळ पावलं टाकून पुढे पुढे धावायला कसं बघतं ? ही दैवी शक्तीच   म्हणायची, आणि अशी निर्मळ  माणसं देवच घडवतो. ही माणसं सकारात्मक विचारांची कासं धरून, अनुभवाच्या शाळेत शिकून, एकमेकांवर प्रेम करायला शिकत असावीत. असंच असावं हे गणित. शेवटी हेच खरं की ह्या साध्या माणसांकडूनही खूप  गोष्टी घेण्यासारख्या असतात. हो ना? धनाचा नाही पण सुविचारांचा सांठा  असलेल्या लक्ष्मीला मी मानलं.  आजूबाजूला नजर टाकली की  कळतं,घासातला घास     काढून देणाऱ्या झळाळत्या  लक्ष्मी नक्कीच जगात असतील. ही,साधीमाणसं रोज काहीतरी चांगले धडे  कुठल्याही विद्यापीठात न जाता शिकत असतात. आणि,मग,सरावाने त्यांचे विचारही चांगले होऊन प्रेमाचं ‘वाण ‘ वाटता वाटता ही माणसं आयुष्याच् गणित सोप्प करून जीवनाचा आनंद गरिबीतही लुटतात. खरंच अशा साध्या सरळ व्यक्तींना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. मी म्हणाले, “अगं काय हे ! स्वतः पोटभर न खाता दुसऱ्यासाठी राखून ठेवणाऱ्या तुझ्या स्वभावाला काय म्हणावं,गं,बाई!   भाबडे पणाने ती म्हणाली,” ताईबाई मायेची ओंजळ तुम्ही माझ्या पदरात टाकता.मन भरून जातं माझं.घरातले समदे, अगदी मुलं सुद्धा मला धूत्कारत्यात, म्हणत्यात ” तू अडाणी आहेस.डोकंच नाही तुला. साधा  हिशोबही येत नाही.” ती रडवेली झाली होती. मी म्हणाले” कोण म्हणतं तू अडाणी आहेस?  नाही  लक्ष्मी तुझे विचार तुझं वागणं,माणसं जोडणं डिग्री वाल्यांना पण जमणार नाही. स्वभावाने लोकसंग्रह वाढवून जीवनाचं गणित सोप्प करण्याची कला आहे तुझ्या अंगात. स्वतःला अशी कमी लेखू नकोस.आणि जमेल तसं लिहायला शिक. माझी मुलं शिकवतील तुला.कष्टाबरोबर चांगल्या मनाची चांगल्या स्वभावाची आणि प्रत्येकाला मदत करून आपलसं करण्याची कला तुझ्या अंगात असल्याने तुझी एक वेगळी ओळख निर्माण कर.. 

आणि अहो काय सांगू तुम्हाला! अगदी निरक्षर लक्ष्मी जिद्दीला पेटली आणि साक्षर झाली. हा योगायोगच म्हणायचा. माझी एक मैत्रिण बालवाडी,अंगणवाडी चालवते,.तिला मदतीची जरूर होती. मी लक्ष्मीला आमची सगळी काम सोडून,त्या मैत्रिणीकडे पाठवलं.एका नव्या दालनात, अंगणवाडीच्या प्रांगणात,तिचा प्रवेश झाला.आणि ह्या सुरवंटाचं फुलपांखरू झालं.छोट्या मुलांचे क ख ग घ चे बोबडे बोल ऐकताना लक्ष्मीनेही  अ, आ  ई चा धडा गिरवला. कष्टाळू मनमिळाऊ आणि मदतीला पुढे होणाऱ्या लक्ष्मीचा लोकसंग्रह वाढला आहे. आणि आता,'”बावळट काहीच येत नाही तुला!”असं म्हणून हिणवणाऱ्या नातलगांकडे आत्मविश्वासाने तिची पावले पडतात. कारण तिने ‘ तिच्यातली ती’  ‘सिद्ध करून दाखवली आहे.ती आता अंगणवाडी शिक्षिका झाली आहे. साध्या विषयातून तिने मोठा आशय मिळवला आहे. मित्र-मैत्रिणींनो कथा साधी आहे पण, कसलेल्या जमिनीत रुजलेल्या बिजाची, रूपांतरित झालेल्या कल्पवृक्षाची आहे. पडद्यामागून पुढे आलेल्या लक्ष्मीची आहे. आज लक्ष्मीने भरपूर शुभेच्छा, मानपत्र, समाजसेविकेचे, प्रशस्ती पत्रक मिळवली आहेत . इतकं करूनही ती थांबली नाही, तर आपल्या वस्तितल्या कितीतरी महिलांना तिने रमाबाई रानडे प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करून साक्षर केल.अशा ह्या स्वयंसिद्धेने आपल्याबरोबर मैत्रिणींनाही यशाचं दालन खुलं करून दिल आहे….धन्यवाद लक्ष्मी… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चाय गरम , ‘चिनी’ कम ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

चाय गरम , ‘चिनी’ कम ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९८८-९० या काळात मी तेझपूर येथे पोस्टिंगवर होतो. तेझपूरपासून चीन सीमेपर्यंत टेलिफोन व संदेश सेवा पुरवण्याचे आमचे काम होते. अत्यंत दुर्गम अश्या पर्वतराजीतून, टेंगा, बोमडी-ला, शांग्री-ला, से-ला, नूरानांग, अशी ठिकाणे जोडत तवांगपर्यंत जाणारा भक्कम रस्ता, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अभियंत्यांनी व कामगारांनी अक्षरशः खपून बनवलेला होता. वाटेत ठराविक अंतरावर एकेका उंच टेकाडावर माझ्या ५-६ जवानांची एकेक तुकडी पत्र्याच्या शेडमधून राहायची. हमरस्त्यापासून वरपर्यंत चढण्यासाठी मात्र रस्ते नव्हते, आणि पायवाटाही अत्यंत अरुंद व धोकादायक होत्या. अशा दुर्गम ठिकाणी दोन-दोन उन्हाळे, पावसाळे, हिवाळे काढणे आणि बारा महिने, २४ तास तेथील रेडिओ सेट चालू ठेवणे  म्हणजे चेष्टा नव्हती!

रेडिओ सेट, बॅटरी, जनरेटर वगैरेची देखभाल तर त्या जवानांना अहोरात्र करावी लागेच. पण, संपूर्ण तुकडीसाठी स्वयंपाक करणे, टेकडीवरून उतरून पाणी भरणे, सप्लाय ट्रकमधून भाजीपाला उतरवून टेकडीवर नेणे, अशी कामे त्या ५-६ जणांमध्येच वाटून घेतलेली असत. तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, दूध भुकटी, मसाले, असे रेशन आणि शेगडीसाठी केरोसीन त्या जवानांना महिन्यातून एकदा पोहोचवले जात असे. भाजीपाला आठवड्यातून एकदाच मिळू शकायचा पण, अत्यधिक बर्फ आणि खराब हवामान असल्यास कित्येकदा महिना-महिना डबेबंद वस्तूंवर गुजराण करावी लागे.

तेथील संचारव्यवस्थेची देखरेख करण्यासाठी आणि त्या निमित्ताने माझ्या जवानांची विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्या मार्गावर माझे वरचेवर जाणे-येणे होते. त्यांच्या घरून आलेली पत्रे, त्यांच्यासाठी युनिटतर्फे थोडी मिठाई, अश्या गोष्टीही मी आवर्जून सोबत नेत असे. इतक्या कठीण परिस्थितीतही चोख सेवा बजावणाऱ्या त्या जवानांपैकी एकाच्याही चेहऱ्यावर मला एकदाही त्रासिक किंवा दुःखी भाव दिसला नाही हे विशेष! त्याउलट, मी गेल्यावर “सर, गरम-गरम चहा घ्या. भुकटीचा असला तरी त्यात सुंठ घालून फक्कड बनवलाय” हे वर असायचे !  

१९९०च्या मे महिन्यात, मी व स्वाती, आमची दीड वर्षांची मुलगी असिलता, माझे व स्वातीचे आई-वडील, आणि तिचे दोन भाऊ, असे त्या मार्गाने तवांगपर्यंत गेलो होतो. माझ्यासाठी ती नेहमीसारखी ड्यूटीच होती, माझ्या कुटुंबियांसाठी मात्र पर्यटन! तो डोंगराळ, बर्फाळ प्रदेश पाहून, आणि आमच्या रेडिओ तुकड्यांमधील जवानांच्या दैनंदिन जीवनाचे मी केलेले धावते वर्णन ऐकून सर्व कुटुंबीय अचंबित झाले होते.

समुद्रसपाटीपासून १३७०० फुटांवर असलेल्या से-ला खिंडीत आमची गाडी थांबली. त्या क्षणी माझा एक मेहुणा, (ऍडव्होकेट वैभव जोगळेकर), जवळ-जवळ ओरडलाच, “अरे, त्या टेकडीवरून कोणीतरी बर्फातून पळत-पळत येतोय.” आम्ही आधी पार केलेल्या चौकीकडून आमच्या येण्याची खबर रेडिओवर मिळाल्यामुळे, मला भेटायला आमचा एखादा जवान येत असेल हे मी ताडले. 

काही क्षणातच एक जवान सॅल्यूट ठोकून धापा टाकत माझ्यासमोर उभा राहिला. आपल्या कोटाच्या खालून त्याने ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेली किटली काढली. कुणाला काही कळायच्या आत, कागदी कपांमध्ये गरम-गरम चहा ओतून त्यांने प्रत्येकासमोर धरला.

डोळ्यात पाणी तरारलेल्या अवस्थेत माझ्या मेहुण्याने त्याला “हे काय?” असे विचारताच तो कसनुसं हसून म्हणाला, “हमारे साहब तो हमेशा उपर चढके आते हैं लेकिन परिवार को पोस्टपर आना मना है, इसलिये आप सबको चाय सडकपर ही पिलाना पडा सर। सॉरी सर।”

माझ्या मेहुण्याने प्रयत्नपूर्वक रोखलेले अश्रू त्याला फार काळ थोपवता आले नाहीत!

मुंबईला परत गेल्यानंतर त्याने पत्रात मला लिहिले होते, “…आर्मीच्या  जवानांच्या डोळ्यात, साहेब आल्याचा आनंद व आत्मीयता ठळकपणे दिसत असे. बरेचदा चुकून आम्हालाही सलाम झडले. तेंव्हा खरोखरच अगदी लाज वाटत असे. एकतर, आमची सॅल्यूट स्वीकारण्याची लायकी नाही, आणि दुसरे म्हणजे, जवान करत असलेले कष्ट व त्याग इतके उत्तुंग आहेत की त्यांना आम्हीच त्रिवार सलाम करावा.

मिलिटरीतल्या लोकांचे कष्ट व त्याग यांची कल्पना मला होती. पण, प्रत्यक्षात वास्तव हे कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने ठसठशीत आहे हे या प्रवासात उमगले. दुर्दैवाने, कितीतरी लोकांना तुमची नीटशी माहिती नसते. त्यामुळे तुम्हा लोकांबद्दल रास्त अभिमान असणे वगैरे गोष्टी तर दूरच्याच असतात…”

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ती‘…. सुश्री उषा चौमार – लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ती‘…. सुश्री उषा चौमार – लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

सुश्री उषा चौमार

२०२० चे साल. राष्ट्रपती भवनाच्या मोठ्या हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविद हे मंचावर पद्मश्री, पद्मविभूषण इत्यादी पुरस्कार प्रदान करत होते.एकेक व्यक्ती भरल्या मनाने, सन्मानाने ते पुरस्कार ग्रहण करत होती. एकानंतर एक नावांची घोषणा होत होती आणि पुरस्कार प्रदान केले जात होते. प्रकाश झोतात, फोटोग्राफी चालू होती. 

… त्यातच एका नावाची घोषणा झाली..उषा चौमार.

घोषणा होताच ती  जागेवरून उठून मंचाकडे चालू लागली आणि आठवणींच्या वाटेवर थबकली.

राजस्थानच्या अलवर इथे जन्मास आलेली सात वर्षांची चिमुकली उषा एक दिवस  आई बरोबर संडासाची घाण (मल/ मैला) कशी स्वच्छ करावी हे बघायला गेली आणि ट्रेनिंग घेऊन  एक परात आणि गोलाकार मोठ्या पळीसारखं भांडं हातात घेऊन घरोघरी संडासाची घाण स्वच्छ करण्याचं काम करू लागली. तिची आई तिला काम नीट करता यावं म्हणून  हे  शिकवत होती. ज्या वयात पोरं खेळण्यात रमतात त्या काळात ऊषा घाण स्वच्छ करण्याचं काम करत असायची. त्यातून  दहा पंधरा रुपयांची प्राप्ती होत असे. कुणाकडे पाहुणे आले की अर्थातच संडासाची घाण जास्त व्हायची आणि त्याचे थोडे ज्यादा पैसे मिळायचे.कामावरून एक दिवस ही सुट्टी मिळत नसे. आजारपण आलंच तर दुसऱ्याला पाठवावं लागायचं आपल्यातले  पैसे ही तिला द्यावे लागायचे.

वयाच्या दहाव्या वर्षी उषाचे लग्न झाले पण तिच्या सासरी ही हेच काम पूर्वापार चालत आल्याने तिथे ही हेच काम ती करत असायची‌. अनेकदा घरी आल्यावर किती ही स्वतः ला स्वच्छ केले तरी जेवण जायचे नाही. लोक  दूरूनच नाक मुरडायचे. हे काम करण्यासाठी त्यांचा रस्ता/वाट दुसरी असायची ज्यावरून इतर कोणी कधीच जात नसायचं.

रात्रीचं शिळं अन्न प्लास्टिकच्या पिशवीत बांधून दूर फेकायचे आणि ते ती उचलून घरी आणायची.देवळाच्या पायरीवर ही तिला कोणी बसू देत नव्हतं.

एकदा असंच डोक्यावर ती घाण घेऊन चार पाच बायका चालल्या होत्या ठराविक ठिकाणी त्यांनी ती घाण टाकली आणि परत येताना त्यांच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक व्यक्ती बाहेर येऊन त्यांच्याशी बोलू लागली,

“ मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.काही सांगायचं  आहे,काही विचारायचं आहे‌. ते घूंघट आधी वर करा.”

सगळ्यांच्या मनात विचार आला,

“ हा माणूस मार खाणार. आम्ही आपल्या दिरा समोर ही घूंघट उघडत नाही तिथे हा कोण लागून गेला.”

पण त्याने त्यांची वाट अडवत विचारलं,

“ तुम्ही हे काम सोडून दुसरं काम करायला तयार आहात का? पूर्वापार चालत आलंय म्हणून हे काम करताय हे खरं असलं तरी तुम्हाला दुसरं चांगलं काम करण्याची संधी मिळू शकते.”

ती व्यक्ती होती‌ बिंदेश्वरी पाठक,सुलभ इंटरनेशनलचे  कर्तेधर्ते.

त्यांनी सगळ्यांना दिल्लीला घेऊन जायचे ठरवले. दिल्ली म्हणजे त्या बायकांसाठी अमेरिकाच होती.सासूबाई म्हणाल्या,

“ अंशी नव्वद वर्षं झाली ह्या कामातून सुटका नाही आता मिळणार आहे होय?”

पण उषाच्या नवऱ्याने साथ दिली आणि ती दिल्लीला आली.पहिल्यांदा कारमध्ये बसली.  दिल्लीला सुलभ कार्यालयात तिथल्या शिक्षिकांनी आणि मुलींनी फुलांचा हार घालून स्वागत केले आणि तिने जन्मात पहिल्यांदा फुलांचा हार घातला. लग्नात ही तिच्या नवऱ्याने तिला फुलांचा‌ हार घातला नव्हता. त्यावेळेस उषाचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले होते.

मोठ्या हॉटेलमध्ये आवडीचं जेवायचा पहिला प्रसंग फक्त पाठकजीं मुळे तिला अनुभवायला मिळाला. मिठाई आणि दोनशे रुपये बिदागी घेऊन ती तीन दिवसाने अलवरला परतली आणि ज्यांच्याकडे काम करायला जायची त्यांनी बोलायला सुरुवात केली,

“आता काय म्हणे हे काम करणार नाही मग काय महाराणी बनून रहाणार? बघू घर कसं चालतंय ते.”

नंतर अलवरला “ नई दिशा” म्हणून वर्ग सुरु झाला. तिथे टी.व्ही लावला गेला.साफसफाई शिकवताना जन्मात पहिल्यांदा सकाळी आंघोळ केल्यावर तिला वेगळाच अनुभव मिळाला कारण घाण स्वच्छ करताना सकाळी आंघोळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रोज आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून घरातून बाहेर पडताना वेगळाच अवर्णनीय आनंद मिळायला लागला.त्या घाण वासा ऐवजी उद् बत्तीचा सुगंध दरवळायला लागला.वर्गात, लोणची,पापड करणे, कापडी पिशव्या बनवणं वगैरे बरंच काही शिकवलं जाऊ लागलं.

“आमच्या हाताचा हा माल कोण विकत घेणार?” हे विचारल्यावर उत्तर मिळालं,

“सुलभ इंटरनेशनल”

बिंदेश्वरी पाठक ह्यांनी सुलभ इंटरनेशनलची सुरुवात “आरा” पासून केली. संडासाची घाण उचलणाऱ्यांना काय वाटत असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांनी दोन दिवस हे काम केलं आणि त्यांची मनोव्यथा जाणली. किती वेदना,किती पीडा आणि किती लाचारी ह्या कामात आहे हे त्यांनी प्रत्यक्ष जाणले.

आणि ह्या “नई दिशाने” ऊषाचे जीवन आमूलाग्र बदलून टाकलं.आता तिच्या पंखात बळ आलं होतं. एक सुंदर आकाश हात पसरून तिला कवेत घेण्यासाठी आतुर झालं होतं. आता उषाने जनजागृतीचे काम सुलभ इंटरनेशनलच्या सोबत सुरू केलं होतं. इतर शिक्षणा बरोबर तिने इंग्लिश भाषा शिकून आत्मसात केली. हा तिचा प्रवास २००३ पासून सुरू झाला आणि २००७ मध्ये ऊषा सुलभ इंटरनेशनलची प्रेसिडेंट झाली.

उषाने  अमेरिका,साऊथ आफ्रिका, इंग्लंड,फ्रांस ह्या देशाचे दौरे केले तिथे अनेक भाषणं दिली. गंमत म्हणजे तिने अमेरिकेत एका फैशन शोमध्ये  साडी घालून कॅटवॉक ही केला.

जिच्या डोक्यावर घाणीची टोपली/ परात असायची तिच्या डोक्यावर मानाची पगडी विराजमान होऊ लागली होती. तिच्या पासून लांब पळणारी लोक तिला सन्मानाने घरी बोलवून लागले. तिच्या कामाची दखल श्री. राजनाथ सिंह ह्यांनी घेतली. नंतर पंतप्रधान मोदींची ही भेट झाली. हे सगळं घडत होतं पण ऊषाकडे कधीच साधं वरण म्हणजे पिवळं वरण बनलं नाही. कारण म्हणजे,

“ते वरण मला वेगळीच आठवण करून देतं त्यामुळे मी हे वरण शिजवत ही नाही आणि खात ही नाही.”

तिच्या मनावर खोलवर झालेल्या यातनांची ही परिसीमा आहे. 

टाळ्यांचा गडगडाट झाला आणि ऊषा चौमार वर्तमानात परतली. आज हा सन्मान तिचा नव्हे तर सबंध त्या स्त्री जातीचा सन्मान होता ज्या परिस्थितीला हार न जाता आलेल्या प्रत्येक संधीचा सोनं करतात.सुलभ शौचालय आणि सुलभ इंटरनेशनलमुळे घाण उचलण्याचा प्रकार जवळपास संपुष्टात आला होता म्हणून अनेक लोकांचे आशीर्वादाचे हात ही डोक्यावर होते.

लेखिका : सुश्री राधा गर्दे

कोल्हापूर

संग्राहक : श्री आशिष  बिवलकर

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जातांनाचे शब्द — लेखक : जीवन आनंदगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ जातांनाचे शब्द — लेखक : जीवन आनंदगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

“मी असा काय गुन्हा केला ?” 

हे शब्द प्रमोद महाजन यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, अंतसमयी उच्चारले होते. आपल्या सख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. “अरे, हे काय करताय ?” 

असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, “हे राम” तर चाफेकर बंधू ,भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी “वंदे मातरम” म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते. 

आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केले. 

एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची आपल्याला अतिशय उत्सुकता असते. एखादे वयोवृद्ध गेल्यावर जेव्हा नातेवाईक भेटायला येतात तेव्हा “काय म्हणाले हो ते जाताना ?” असे हमखास विचारले जाते. 

अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, मीपणाचा लवलेश सुद्धा नसतो. ब-याचवेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. 

शेवटच्या आजारपणात माझ्या पत्नीला ॲटॅक आला तेव्हा कार पळवित मी हॅास्पिटलला गेलो. 

तिला उचलून स्ट्रेचरवर ठेवताना ती एवढेच म्हणाली की,”उशीर झाला”. तेचं तिचे शेवटचे शब्द ठरले.

जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक खंदक असतो. तो पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या खंदकापर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच, तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? 

सगळी कल्पना असते आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्यात. 

पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही. वेगवेगळ्या फ़ॅशनचे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना नागवे आलोय आणि मरतांनाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलोय आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, ते माझे, माझेही माझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. मृत्यू समोर दिसायला लागतो तेंव्हा ही भावना बोथट होते. 

प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते. आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. रागलोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात. खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेंव्हा जगायचे असते तेंव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेंव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो. 

भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे …. 

दोस्तहो, दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला ।

जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।

हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।

सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।

आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्मविनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे. 

पण काहीकाही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे ख-या अर्थाने जीवन जगतात आणि हस-या चेह-याने मृत्यूला सामोरे जातात. 

सामाजिक कार्यकर्ते ग प्र प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळभात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधान मास्तरांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. 

पु लं नी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ? 

सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक ! त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि अजीवन समाधीचाही ! जीवनमृत्यूची व्याख्या त्यापलीकडे ती काय करायची ? 

सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी यांना स्ट्रेचरवरुन ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना त्यांनी नर्सकडून एक कागद मागून घेतला आणि त्यावर लिहिले,”आयुष्यात सगळं मिळालं, कोणतीही इच्छा शिल्लक नाही”. तोच त्यांचा शेवटचा संदेश होता.

“आनंद” चित्रपटात राजेश खन्नाला कॅन्सर दाखवला आहे. प्रत्यक्ष जीवनात तो कॅन्सरनेच गेला. त्याचे मरतानाचे शब्द होते,”पॅक अप”.

शेवटच्या आजारपणात मी वडिलांना भेटायला गावी गेलो. मी परत निघताना फक्त एवढंच म्हणाले, “लवकरच माझ्यासाठी तुला दीर्घ रजा घ्यावी लागेल”. पुढे  पंधरा दिवसांनी ते गेले.मी त्यांचे ऐकलेले तेच दोन शब्द!

माझा मुलगा अभिजित अलिकडेच पणजी येथे विषारी जेली फिशचा दंश होऊन गेला. मेडिकल हॅास्पिटलमध्ये त्याला ऑपरेशनसाठी नेताना मी त्याच्यासोबत होतो. तो मला म्हणाला,”सगळं संपलय”! तेचं त्यांचे शेवटचे शब्द ठरले. तो पुन्हा शुद्धीवर आला नाही.

अर्थात काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात. मुंबईत राहणा-या वसंत त्र्यंबक निकुंभ यांनी पंधरा वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदा-या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे ? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच ! 

व्यवस्थित नियोजन करून एप्रिल महिन्यापासून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले. या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि तुम्ही आम्हाला हवे अहात असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे तत्वज्ञानाने भरलेली होती. ती आजही वाचायला मिळतात. 

ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते. 

माझ्या आवडत्या शिक्षकांना व त्यांच्या पत्नीला दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून  दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षितसर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच औषधोपचारावर तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला. 

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहेच ! जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचेसुद्धा स्वागत करायला हवे. आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये.

लेखक : जीवन आनंदगावकर, सेवानिवृत्त न्यायाधीश

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print