एक साठीच्या आसपासचे गृहस्थ आपल्या ३४ वर्षाच्या ‘क’ नावाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. कसबसं याला घरातल्या चौघांनी धरून आणले बघा मॅडम अस ते म्हणाले. घरी सर्वांच्या अंगावर ‘क’ धावून जातो. घरातून पळून रस्त्यावर जातो. अजिबात झोपत नाही. सारख्या येरझाऱ्या घालतो. सारखी बडबड करतो. आठवडा झाला अस करतोय. कामावर जात नाही.
‘क’ बोलण्याच्या किंवा ऐकून घेण्याच्या अवस्थेत नव्हतेच. त्यांना त्यांच्या आजाराचीही कल्पना नव्हती. मी ‘क’ ची केस हिस्टरी घेण्यासाठी अनेक प्रश्न रुग्णाच्या वडिलांना विचारले. त्यांच्यासोबत त्याचे भाऊ,मित्र ही आले होते. त्यांकडूनही क च्या केस बद्दल उपयुक अशी माहिती मिळत गेली.
वडील सांगत होते, क आणि त्याच्या पत्नीमध्ये सारखे किरकोळ कारणास्तव वाद होत होते. एके दिवशी पत्नी घर सोडून माहेरी गेली. परत आलीच नाही. त्यानंतर हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. आता हा अस वागतोय. पण याआधी काही दिवस, वेगळंच वागण होत त्याच. मी खूप थकलोय, माझ्यात शक्ती नाही म्हणत होता. जेवत नव्हता. एकटक कुठंतरी बघत बसायचा. अधून मधून रडायचा. सारख दिवसभर झोपायचा. आत्महत्येबद्दल विचार येत होते. आम्हाला काही कळत नाहीए. काय झालंय याला ? दोन तीन महिने झाले ,मधूनच कधी गप्पच होतो तर कधी तरी एकदम अंगात काही संचारल्या सारखा वागतो. सगळे देवधर्म केले,काही उपयोग नाही झाला. गावातल्या डॉक्टरांनी औषध दिली पण त्याचाही काही उपयोग नाही झाला.
‘क’ यांचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास आणि इतर सर्व गोष्टी मानसशास्त्रीय दृष्टीने जाणून घेतल्या. त्यांची आजाराची लक्षण, कालावधी निकषाद्वारे पडताळून पाहता, ‘क’ हे सध्या अत्योन्माद(Mania) अवस्थेत होते. आणि यापूर्वीची त्यांची अवस्था विषादावस्था (Depression) होती. आलटून पालटून येणाऱ्या या भावावस्था म्हणजेच द्विध्रुवीय भावविकृती-1 (Bipolar Disorder-1) अशी त्यांची विकृती होती.
पण एकंदरीत त्यांची सध्याची भावावस्था, लक्षणांची तीव्रता ही नुसत्या चिकित्सेने कमी होणारी नव्हती. त्यामुळे मी क च्या आजाराबद्दल त्याच्या वडिलांना कल्पना दिली. आणि त्यांना मनोविकारतज्ञांकडे नेण्याचा सल्ला दिला.
मनोविकारतज्ञांचे उपचार सुरू झाले. काही दिवसानंतर त्यांच्या उपचारांसोबतच ‘क’ व्यक्तीवर, मी थेरेपी सत्र सुरू केली. उपचार आणि थेरेपीने काही महिन्यातच ‘क’ मध्ये लक्षणीय फरक दिसून आला. तो कामाला जाऊ लागला. त्याचे आत्महत्येचे विचार बंद झाल्याने, त्याला काहीतरी नवीन करण्याची इच्छा वाटू लागली. व्यायाम,योगा करत आपली मानसिक अवस्था सुधारण्यासाठी तो स्वतःही प्रयत्न करू लागला.
भावस्थिती विकृती (Mood Disorder) – एमिल क्रेपलिन यांनी १८९९ मध्ये अतिउत्साहविषाद विकृतीचे (Manic Depressive Insanity) वर्णन केले आहे. हिच विकृती उभयावस्था भावविकृती म्हणून ओळखली जाते. या विकृतीस उन्माद अवसादविकृती असेही म्हटले जाते. भावस्थिती विकृतीमध्ये दोन भावस्थिती प्रामुख्याने आढळतात…
द्विध्रुवीय भावविकृती – । मध्ये अत्योन्माद (Mania) आणि विषाद (Depression)अश्या दोन्ही अवस्था व्यक्ती अनुभवते.
द्विध्रुवीय भावविकृती – ॥ मध्ये अल्पोन्माद (hypomania) आणि विषाद/अवसाद (Depression) या दोन्हीचे झटके आलटून पालटून दिसून येतात. 5 ते 10 टक्के केसेस मध्ये द्विध्रुवीय ॥ विकृती ही द्विधृवीय – 1 मध्ये विकसित झाल्याचे दिसते.
चक्रीय विकृती (सायक्लोथायमिक डिसॉर्डर)-
अल्पोन्माद आणि विषाद आलटून पालटून येणारी स्थिती.
या विकृती उद्भवण्यास अनेक जैविक तसेच मानसशास्त्रीय घटक कारणीभूत असल्याचे विविध संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
कित्येक कुटुंबात, नात्यात, परिसरात अशा अनेक व्यक्ती असतात की, परिस्थितीनुसार, घटनेनुसार,आघातानुसार आणि इतर अनेक कारणांनी व्यक्तीची मानसिक अवस्था बिघडलेली असते. त्यांना नक्की काय होत आहे हे कुटुंबातील इतर व्यक्तींच्या लक्षातच येत नाही. कुणी मानसोपचाराचा सल्ला दिला तर ते उधळून लावतात. मानसोपचार घेतोय अस समजलं तर समाज काय म्हणेल? वेडा म्हणून लेबल लागेल का? आपण घरापासून, नात्यांपासून,समाजापासून दूर जाऊ का? ह्या अस्वीकाराच्या विचारांनी आणि भीतीपोटी रुग्ण आणि रुग्णाचे कुटुंबीय रुग्णासाठी इतर विविध उपचारांचा अवलंब करतात. तोपर्यंत त्रास वाढलेला असतो. रुग्णाचे वर्तन क्षतीग्रस्त झालेले असते.
विकृतीची लक्षणे हळूहळू सुरू झाली की, काही वेळेस कुटुंबियांना वाटू शकते ही व्यक्ती असे वर्तन मुद्दाम करते आहे का? परंतु लवकरात लवकर मानसोपचार तज्ञाद्वारे उपचार घेणे गरजेचे आहे. अर्थात या आजारापासून बरं होण्यासाठी औषधे घेणं खूप गरजेचं आहे. पण त्यासोबतच रुग्णाला मानसिक उपचार, थेरपी, स्वतःला मदत करणाऱ्या स्ट्रॅटेजी वापरून बरे होता येते. मात्र यासाठी रुग्ण व्यक्तीस पुरेशी झोप, योग्य आहार, कुटुंबाची साथ नक्कीच मिळायला हवी.
आज World Bipolar day म्हणजेच द्विध्रुवीय भावविकृती जनजागृती दिवस.
30 मार्च हा दिवस विन्सेन्ट वॅन गॉग या जागतिक कीर्तीच्या फ्रेंच चित्रकाराचा जन्मदिन आहे. वॅन गॉगला हा रोग असल्याचे त्याच्या निधनानंतर लक्षात आले. त्यामुळे त्याच्या जन्मदिनीच हा दिवस याबाबत जनजागृती व्हावी म्हणून साजरा केला जातो. वॅन गॉगशिवाय यो यो हनी सिंग, शामा सिकंदर, विन्स्टन चर्चिल यांनी या रोगावर यशस्वी मात केली. जगातले अंदाजे २.८ टक्के नागरिक याने ग्रस्त आहेत. भारतात हे प्रमाण अंदाजे ६.७ टक्के इतके आहे.
मानसिक आजार असलेल्या सर्व व्यक्तींना इतर नागरिकांप्रमाणेच समाजात राहण्याचा, काम करण्याचा आणि उपचार घेण्याचा अधिकार कायद्यात आहे. हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे अत्यावश्यक आहे, तसेच अशा व्यक्तींना, समाजातील व्यक्ती या नात्याने स्वीकारून, त्यांची मनं समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे!
☆ जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆
जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च
‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला.
जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास
१९६१ साली युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ साली साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी कुणीही एकजण दरवर्षी संदेश देतो. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. पहिल्या वर्षी १९६२ साली पहिला संदेश देणारी व्यक्ती म्हणजे ज्यो कॉक्चू होते.
वृत्तपत्रांतून मराठी नाटकांच्या येणाऱ्या जाहिराती पाहिल्या तर सगळी नाटके जोरदार व्यवसाय करत असतील असे वाटते. काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना चांगले बुकिंग मिळत नाही. एके काळी काही मातब्बर नाटय़गृहातून दिवसातून मराठी नाटकांचे तीन-तीन प्रयोग होत असत. नाटय़गृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकत असे. आता रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशीही अपवाद वगळता नाटक ‘हाऊसफुल्ल’ जात नाही, हे वास्तव आहे. नाटय़गृहाची भरमसाठ भाडी, जाहिरातींचे वाढलेले दर, कलाकारांची ‘नाईट’, एकमेकांशी असलेली स्पर्धा, नाटकाचा निर्मिती खर्च आणि तुलनेत मिळणारे उत्पन्न, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तरुण पिढीचे पाठ फिरविणे या चक्रव्यूहात आजचे मराठी नाटक सुरू आहे.
पूर्वी नाटक कंपनी बस घेऊन त्यामध्ये सर्व नेपथ्य व कलाकारांना समवेत दौऱ्यावर निघायची व १५ / २० दिवसांचा दौरा आटपून परत जायची गावोगावच्या स्थानिक वर्तमानपत्रात नाटकांच्या जाहिराती यायच्या. दोन दिवस आधी तिकीट विक्री सुरु व्हायची आणि रसिक प्रेक्षक रांग लावून तिकिटे खरेदी करायचे.
हल्ली नाटकांचे दर ५०० /३००/२०० असे असतात.या मुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित बिघडते म्हणून प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे.
लंडन मध्ये दि माउस ट्रॅप नावाचे नाटक सुरु आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ६ ऑक्टोबर ,१९५२ रोजी सादर केला गेला. तेंव्हापासून हे नाटक रोज अव्याहतपणे सादर केले जाते. रूढी आणि परंपरा प्रिय ब्रिटिश जनता या अगाथा ख्रिती च्या या रहस्यमय नाटकाचा शेवट माहीत असला तरी येणाऱ्या पाहुण्याला हे नाटक दाखवायला नेतात. कधी कधी एका दिवसात जास्त प्रयोग देखील केले जातात. १८ नोव्हेंबर,२०१२ साली या नाटकाचा २५००० वा प्रयोग सादर झाला.कलाकार बदलत गेले मात्र नाटक सुरूच आहे.१६ मार्च २०२० पर्यंत सतत चालू राहिला. कोविड-१९ साथीच्या आजारा दरम्यान हे नाटक तात्पुरते बंद करावे लागले. त्यानंतर १७ मे २०२१ रोजी या नाटकाचे पुन्हा प्रयोग सुरु झाले.
तसे एखादे गाजलेले नाटक मुंबई / पुण्यासारख्या शहरात दररोज सादर व्हायला हवे. महाराष्ट्र शासन कोट्यवधी रुपये कितीतरी टाळता येणाऱ्या गोष्टीवर खर्च करत असते. सरकारने मराठीचा मानबिंदू म्हणून असे एखादे नाटक निवडावे व गावोगावीच्या कलाकारांना ते सादर करायला सांगावे आणि त्यांना त्या बद्दल मानधन द्यावे. तिकीट विक्री अल्प दरात करावी म्हणजे प्रेक्षक येतील आणि कमी पडणारे पैसे शासनाने घालावेत, या मुळे रंगभूमी जिवंत राहील आणि त्या साठी फार मोठा खर्च येईल असे वाटत नाही.मात्र परंपरा जपल्याचे श्रेय सरकारला जाईल.नाटक कोणते ठरवावे ते त्यातल्या जाणकार लोकांना विचारून किंवा प्रेक्षकांचे बहुमत घेऊन ठरवावे असे वाटते. पुणे आणि मुंबई ही दोन्ही महानगरे आहेत आणि येथे दररोज ये जा करणाऱ्या लोकांची संख्या खूप असल्यामुळे प्रेक्षकांची उणीव भासणार नाही.
जीव तोडून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या,मन लाऊन काम करणाऱ्या,पडद्यावरील तसेच पडद्यामागील सर्व कलाकारांना आणि त्यांना टाळ्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन, दाद आणि प्रेरणा देणाऱ्या रसिक प्रेक्षक वर्ग यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माहिती संकलन : श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ त्रिवेणी संगम !! भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
दोन जानेवारी. स्मरण दिन !
शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम ! … लेफ्ट्नंट त्रिवेणी सिंग ठाकूर !
(जम्मू रेल्वे स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटर्स दूर असलेल्या आपल्या छावणीत लेफ्टनंट त्रिवेणी सिंग साहेब आपल्या कामात मश्गूल होते. तेवढ्यात जम्मू रेल्वे स्टेशनवर आत्मघातकी हल्ला झाल्याची खबर मिळाली !) – इथून पुढे
वरीष्ठांनी अॅडज्युटंट त्रिवेणीसिंग यांना सूचना दिली गेली की त्यांनी ड्यूटीवर तैनात असलेल्या जवानांना, अधिकाऱ्यांना सावध करून त्वरीत जम्मू रेल्वे स्टेशनकडे कूच करण्यास सांगावे…. त्रिवेणीसिंग यांनी तिकडे जाणे अपेक्षित नव्हते! पण इथे त्रिवेणीसिंग यांच्या मनातील बहादूर सैनिक जागा झाला. “साहेब,सर्वांना तयार होण्यास थोडा वेळ लागेल. मी क्विक रिअॅक्शन टीमच्या घातक कमांडोंना घेऊन पुढे जाऊ का? कारण स्टेशनवर यावेळी खूप गर्दी असेल… अतिरेक्यांना जास्त वेळ अजिबात मिळता कामा नये!” त्रिवेणीसिंग साहेबांनी आपल्या वरिष्ठांना विनंतीवजा आग्रहच केला आणि त्यांना परवानगी मिळाली!
लेफ्टनंट त्रिवेणी सिंग यांच्या नेतृत्वात शस्त्रसज्ज होऊन दहा घातक कमांडोज एका मिलिटरी जीप मधून वेगाने निघाले… चार किलोमीटर्सचे अंतर त्यांनी अवघ्या आठ-दहा मिनिटांत पार केले. अतिरेक्यांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्यासाठी त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या अधून-मधून जागा मिळेल तसे नागमोडी पद्धतीने वाहन दामटले.
तोपर्यंत कर्तव्यावर असलेले एक पोलिस, बी.एस.एफ.चे दोन जवान, दोन रेल्वे कर्मचारी आणि दोन नागरीक असे एकूण सात लोक हे सैन्याच्या वेशभूषेत रेल्वे स्टेशनमध्ये घुसलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या आधुनिक शस्त्रांतून झाडल्या गेलेल्या गोळ्यांना बळी गेले होते.
त्रिवेणीसिंग यांच्या पथकाने रेल्वेस्टेशनमध्ये धावतच प्रवेश केला. स्वत: त्रिवेणीसिंग अग्रभागी होते. प्लॅटफॉर्मवरच्या आडव्या पुलावरील आडोश्यामागे लपून एक अतिरेकी खाली तुफान गोळीबार करीत होता. जम्मू कश्मिर पोलिसांमधील एक पोलिस जवान त्याला प्रतियुत्तर देत होता.
अशा भयावह स्थितीत त्रिवेणीसिंग साहेब वायूवेगाने पायऱ्या चढले आणि थेट त्या गोळीबार करीत असणाऱ्या अतिरेक्याच्यापुढे यमदूत बनून उभे ठाकले व त्याला सावरण्याची संधीही न देता त्याच्यावर धाडधाड गोळ्या झाडून त्याला त्याच्या ‘आखरी अंजाम’तक पोहोचवले.
इकडे पठाणकोट मध्ये जन्मेज सिंग यांच्या घराच्या हॉलमध्ये हलवाई येऊन बसला होता. लग्नात मेजवानीचा काय बेत करावा याची चर्चा सुरू होती. लगीनघरात आणखी कसले वातावरण असणार? लाडक्या लेकाच्या लग्नात सर्वकाही व्यवस्थित होईल याची तयारी सुरू होती! हॉलमधला टी.व्ही. सुरूच होता, त्यावरील बातम्याही!
जन्मेजसिंग यांना त्यांच्या घराच्या बाहेर काही लोकांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला. जम्मू रेल्वे स्टेशनवर हल्ला झाल्याची ती चर्चा होती. तेवढ्यात त्रिवेणीसिंग यांच्या होणाऱ्या सासुरवाडीमधील कुणाचा तरी फोन आला! “टी.वी. देखिये! कुछ तो बडा हो गया है!…..
इकडे रेल्वेस्टेशनवरील पुलावर त्या अतिरेक्याचा समाचार घेतल्यावर त्रिवेणीसिंग दुसऱ्या अतिरेक्याच्या मागावर निघाले. तो अतिरेकी अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज होता.. ऑटोमॅटिक रायफल, हॅन्डग्रेनेड… शेकडो लोकांचा जीव सहज घेऊ शकणारा दारूगोळा!
तो गोळीबार करीत दुसऱ्या जिन्याने खाली येऊन प्लॅटफॉर्मवर पोहोचलाही होता.. प्लॅटफॉर्मवरील पार्सलरूमच्या दिशेने तो गोळीबार करण्याच्या प्रयत्नात होता… तिथे तीनएकशे लोक जीवाच्या भीतीने लपून, गोठून बसलेले होते. आत शिरून फक्त रायफलचा ट्रिगर दाबला जाण्याचा अवकाश…. मृतदेहांचा ढीग लागला असता!
पण… त्रिवेणी ‘टायगर’ भक्ष्यावर झेपावला! ‘हॅन्ड-टू-हॅन्ड’ अर्थात हातघाईची लढाई झाली.. त्रिवेणीसिंग यांनी अतिरेक्याला खाली लोळवला.. त्याच्या छाताडात गोळ्या घातल्या.. इतक्यात त्या भस्मासूरानं त्रिवेणीसिंग साहेबांवर हातबॉम्ब टाकला…. भयावह आवाजाने परिसराच्या कानठळ्या बसल्या…. त्रिवेणीसिंग जबर जखमी झाले…. त्यातच त्या अतिरेक्याच्या रायफलमधील एक गोळी त्रिवेणीसिंग यांच्या जबड्यात समोरच्या दातांच्या मधून घुसून मानेतून आरपार झाली……! तोवर पाकिस्तानने भारताविरुद्ध डोकं भडकावून, भारतातल्या निष्पाप नागरीकांना ठार मारायाला पाठवलेला ‘फिदायीन’ कामगिरीवर अतिरेकी नरकातील त्याच्या साथीदारांना भेटायला वर पोहोचलाही होता. ..त्याच्यासमोर त्याच्याकडे पाय करून त्रिवेणीसिंग ही कोसळले…. तेवढ्यात इतर अधिकारी, सैनिक तिथे पोहोचले…. त्यात त्रिवेणीसिंग यांचे वरीष्ठ मेजर जनरल राजेंद्रसिंग ही होते…
त्रिवेणीसिंग तशाही अवस्थेत उभे राहिले….साहेबांना सॅल्यूट ठोकला…. आणि म्हणाले… ”मिशन अकंम्प्लीश्ड,सर!…. कामगिरी फत्ते झाली,साहेब!”…
हे सर्व केवळ काही सेकंदांमध्ये घडले होते…. एवढ्या कमी वेळ चाललेल्या कारवाईत शूर त्रिवेणीसिंग यांनी अलौकिक कामगिरी करून आपले नाव अमर करून ठेवले…!
पठाणकोट मधल्या आपल्या घरात जन्मेज सिंग यांनी टी.वी. वरच्या बातम्या धडकत्या काळजाने पहायला सुरूवात केली… टी.वी.च्या स्क्रीनच्या खालच्या पट्टीवर अक्षरे उमटली… लेफ्टनंट त्रिवेणीसिंग शहीद हो गये!
डोळ्यांवर विश्वास बसेना… त्यानंतर ही पट्टी पुन्हा दिसेना…! हाच का आपला त्रिवेणी? हे नाव तसे कॉमन नाही! त्यांनी जम्मूला फोन लावले… काहीही निश्चित माहिती मिळेना… त्वरीत जम्मू गाठावी… निघाले…. दोन तासाच्या प्रवासाला धुकं, जागोजागी होणारी सुरक्षा तपासणी यांमुळे आठ तास लागले. युनीटबाहेर सर्व सैनिक, अधिकारी स्तब्ध उभे होते… जन्मेज सिंग यांनी ओळखले… त्रिवेणी आता नाहीत… “मेरी तो दुनिया ही उजड गयी!”
पुष्पलतांच्या दोन मुली आणि तिसरा त्रिवेणी… या संगमातील एक प्रवाह आता आटला होता. “भगवान त्रिवेणी जैसा बेटा हर माँ को दे!” त्या म्हणाल्या. “आज इतकी वर्षे झाली तरी त्रिवेणी आम्हांला सोडून नाही गेला…सतत आमच्या आसपासच असतो. उसके जाने की तकलीफ भी है, दुख भी है और अभिमान भी… उसने सैंकडो जिंदगीयाँ बचाई! युँही नहीं कई लोगों के घर में अब भी त्रिवेणी की फोटो लगी हुई है…. खास करके वैष्णोदेवी के भक्तों के, जो उस दिन जम्मू स्टेशनपर मौजुद थे!”
शांतता काळात दिला जाणारा सर्वोच्च ‘अशोक चक्र’ पुरस्कार लेफ्टनंट त्रिवेणी सिंग यांना मरणोत्तर दिला गेला…. २६ जानेवारी २००४ रोजी दिल्लीत मा. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते लेफ्टनंट त्रिवेणी सिंग ठाकूर यांच्या वतीने ‘अशोक चक्र’ स्विकारताना कॅप्टन जन्मेज सिंग (सेवानिवृत्त) यांच्या एका डोळ्यात पुत्र गमावल्याची वेदना आणि दुसऱ्या डोळ्यात पुत्राच्या अजोड कामगिरीचा अभिमान स्पष्ट दिसत होता.
☆ त्रिवेणी संगम !! भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
दोन जानेवारी. स्मरण दिन !
शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम ! … लेफ्ट्नंट त्रिवेणी सिंग ठाकूर !
बाळाने या जगात पाऊल ठेवताच एक जोरदार आरोळी ठोकली! त्या एवढ्याशा गोळ्याचा तो दमदार आवाज ऐकून डॉक्टर म्हणाले, ”लगता है कोई आर्मी अफसर जन्मा है… क्या दमदार आवाज पाई है लडकेने!” तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुत्रमुख पाहिलेल्या पुष्पलता म्हणाल्या, ”आर्मी अफसरही है… कॅप्टन जन्मेज सिंग साहब का बेटा जो है!” झारखंड मधील रांची जवळच्या नामकुम इथल्या एका प्रसुतिगृहातील १ फेब्रुवारी १९७८ची ही गोष्ट.
बाळाचे नामकरण त्रिवेणी सिंग झाले. वडिलांना सेनेच्या गणवेशात लहानपणापासून पाहिलेल्या त्रिवेणी सिंग च्या मनात आपणही असाच रूबाबदार गणवेश परिधान करून देशसेवा करावी अशी इच्छा निर्माण होणं साहजिकच होतं. उत्तम व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले त्रिवेणी अभ्यासात सुरूवातीपासून अव्वल होते परंतू स्वभावाने एकदम लाजरे-बुजरे. कधी कुणाशी आवाज चढवून बोलणे नाही की कधी कुणावर हात उगारणे नाही. सणासुदीसाठी अंगावर चढवलेले नवेकोरे कपडे नात्यातल्या एका मुलाला आवडले म्हणून लगेच काढून त्याला देणारे आणि त्याची अपरी पॅन्ट घालून घरी येणारे त्रिवेणी!
त्रिवेणी मोठे झाले तसे वडिलांनी त्यांना मार्शल आर्ट शिकायला धाडले. यात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकून दाखवले. उंचेपुरे असलेले त्रिवेणी बॉडी-बिल्डींग करीत. ते पोहण्यात आणि धावण्यात ही तरबेज होते. एक लाजरेबुजरे लहान मूल आता जवान झाले होते.
कॅप्टन जन्मेज सिंग हे मूळचे पंजाबमधल्या पठाणकोटचे रहिवासी. घरी चाळीस एक एकर शेतजमीन होती. शेती करूनही देशसेवाच होते, अशी त्यांची धारणा. आपल्या एकुलत्या एक मुलाने शेतीत लक्ष घालावे, घरदार सांभाळावे अशी त्यांची इच्छा होती.
शिक्षणाच्या एक टप्प्यावर त्यांनी नौसेनेची परीक्षा दिली आणि अर्थातच निवडलेही गेले. प्रशिक्षणास जाण्याचा दिवस ठरला, गणवेश शिवून तयार होता, प्रवासाची सर्व तयारी झालेली होती.
जाण्याच्या आदल्या दिवशी त्रिवेणी यांच्या आई,पुष्पलता यांच्या मातोश्री घरी आल्या आणि त्यांनी त्रिवेणी यांना नौसेनेत जाण्यापासून परावृत्त केले. त्यावेळी अनुनभवी, लहान असलेल्या त्रिवेणींनी घरच्यांच्या इच्छेचा मान राखला आणि पंजाब कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला… आता घरात जय जवान ऐवजी जय किसानचा नारा गुंजत होता!
एकेदिवशी त्रिवेणींनी वडिलांना फोन करून सांगितले की “पिताजी, मेरा डेहराडून के लिए रेल तिकट बुक कराईये! मैं आय.एम.ए. में सिलेक्ट हो गया हूँ!” खरं तर त्रिवेणी यांनी ते सैन्य अधिकारी भरतीची परीक्षा देत आहेत याची कल्पना दिली होती आणि हे ही सांगितले होते की इथे जागा खूप कमी असतात आणि अर्ज हजारो येतात, निवड होण्याची तशी शक्यता नाही! त्यामुळे जन्मेज सिंग साहेबांनी ही बाब फार गांभिर्याने घेतलेली नव्हती. या परीक्षेत त्रिवेणी टॉपर होते, कमावलेली देहयष्टी, मैदानावरचे कौशल्य यामुळे शारीरिक चाचणीत मागे पडण्याचा काही प्रश्नच नव्हता. वळणाचे पाणी वळणावर गेले होते… त्रिवेणी आता जन्मदात्या जन्मेज सिंग साहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकून सैन्याधिकारी बनणार होते आणि याचा जन्मेजसिंग साहेबांना अभिमानही वाटला! जन्माच्या प्रथम क्षणी डॉक्टरांनी केलेली भविष्यवाणी त्रिवेणीसिंगांनी प्रत्यक्षात उतरवलेली होती!
त्रिवेणी सिंग यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून येथील प्रशिक्षणात अत्यंत लक्षणीय कामगिरी बजावली, अनेक पदके मिळवली आणि बेस्ट कॅडेट हा सन्मानसुद्धा! जेवढे आव्हान मोठे तेवढी ते पार करण्याची जिद्द मोठी… ते बहिणीला म्हणाले होते…. ”मैं मुश्किलसे मुश्किल हालातों में अपने आप को परखना चाहता हूँ… मन, शरीर की सहनशक्ति के अंतिम छोर तक जाके देखना मुझे अच्छा लगता है.. दीदी!” आणि त्यांनी तसे करूनही दाखवले.
८ डिसेंबर,२००१ रोजी ५,जम्मू कश्मिर लाईट इन्फंट्री (जॅकलाय) मध्ये त्रिवेणी सिंग लेफ्टनंट म्हणून रूजू झाले आणि त्यांनी त्यावेळी झालेल्या अतिरेकीविरोधी धाडसी कारवायांमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावली. शेतात लपून गोळीबार करणाऱ्या अतिरेक्याच्या समोर धावत जाऊन, त्याचा पाठलाग करून त्याला यमसदनी धाडण्याचा पराक्रमही त्यांनी करून दाखवला होता. युनीटमधील सहकारी त्रिवेणीसिंग यांना ‘टायगर’ म्हणून संबोधू लागले होते!
त्यांची हुशारी, सर्वांचे सहकार्य मिळवून काम करून घेण्याचे कसब पाहून त्यांना युनीटचे अॅड्ज्युटंट म्हणून कार्यभार मिळाला.
वर्ष २००३ संपण्यास काही दिवस शिल्लक होते. त्रिवेणीसिंग यांचे मूळ गाव पठाणकोट, जम्मू पासून फार तर शंभर किलोमीटर्सवर असेल. त्यात त्रिवेणीसिंग लग्नबंधनात अडकणार होते…. एंगेजमेंटही झाली होती. फेब्रुवारी २००४ मध्ये बार उडवायचे ठरले होते.
सतत कामामध्ये व्यग्र असलेल्या त्रिवेणीसिंग साहेबांना त्यांच्या वरिष्ठांनी नववर्ष घरी साजरे करण्यासाठी विशेष सुटी दिली आणि साहेब ३१ डिसेंबर २००३ ला घरी आले.. आपले कुटुंबिय, मित्र आणि वाग्दत्त वधू यांच्यासोबत छान पार्टी केली. पहाटे दोन वाजता आपल्या वाग्दत्त वधूला तिच्या एका नातेवाईकाकडे सोडून आले. “सुबह मुझे जल्दी जगाना, माँ! ड्यूटी जाना है!” असे आपल्या आईला बजावून ते झोपी गेले…. नव्या संसाराची साखरझोप ती!
२ जानेवारी,२००४. नववर्षाच्या स्वागतसमारंभांच्या धुंदीतून देश अजून जागा व्हायचा होता. सायंकाळचे पावणे-सात, सात वाजलेले असावेत. थंडी, धुकंही होतं नेहमीप्रमणे. आज जम्मू रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. वैष्णोदेवीला जाणाऱ्या-येणाऱ्या सुमारे हजारभर यात्रेकरूंचा, देशभरातून कर्तव्यावर येणाऱ्या -जाणाऱ्या शेकडो सैनिकांचा आणि तिथल्या सर्वसामान्य जनतेचा या गर्दीत समावेश होता.
जम्मू रेल्वे स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटर्स दूर असलेल्या आपल्या छावणीत लेफ्टनंट त्रिवेणी सिंग साहेब आपल्या कामात मश्गूल होते. तेवढ्यात जम्मू रेल्वे स्टेशनवर आत्मघातकी हल्ला झाल्याची खबर मिळाली!
☆ असा बॉस होणे नाही… माहिती संकलक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
असा बॉस होणे नाही…
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर तेव्हा जोरात काम चालू होतं. शास्त्रज्ञांची एक मोठी टीम या प्रोजेक्टवर काम करत होती. एके दिवशी त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की, “सर मला आज संध्याकाळी थोडं लवकर घरी जायचं आहे, चालेल का?”
कलाम सर हसत म्हणाले, “शुअर, एनी प्रॉब्लेम?”
“नाही सर, म्हणजे काय आहे की गावात सर्कस येऊन महिना झाला. मुलं रोज सर्कस पहायला जाऊ या म्हणतात. पण मला ऑफिसमधून घरी जायलाच उशीर होतोय, त्यामुळे ते जमलंच नाही. आता, उद्या सर्कस दुसऱ्या गावी जाणार आहे. आणि, पुन्हा वर्षभर तरी गावात सर्कस येणार नाही. तेव्हा आज लवकर घरी जाऊन मुलांना सर्कस दाखवून आणावी म्हणतोय.”
“अरे मग जा ना तुम्ही, जरुर जा. मी तर तुम्हाला आत्ताच घरी जाण्याची परवानगी देतोय. अल्वेज पुट युअर फॅमिली फर्स्ट.”
“नाही सर, मी हातातलं काम आटोपून दुपारी 4 वाजता जाईन.” एवढं बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि कामाला लागले.
साडेचार वाजता कलाम साहेबांनी सहज त्या ज्यु. सायंटिस्टच्या केबिनमध्ये पाहिलं तर ते खाली मान घालून त्यांच्या कामात व्यग्र होते. कलाम साहेब लागलीच ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ते तडक त्या सायंटिस्टच्या घरी गेले. मुलांना घेतलं. स्वतः सोबत बसून मुलांना सर्कस दाखवली आणि येताना छान हॉटेलमध्ये नेऊन मुलांना जे हवं ते खाऊ दिलं आणि नऊ वाजता मुलांना पुन्हा गाडीतून घरी सोडलं.
इकडे साडे सात वाजता ज्यु. सायंटिस्टला आठवलं की आपल्याला साडे चारला जायचं होतं. घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते. कामाच्या व्यापात आपण याही वर्षी मुलांना सर्कस दाखवू शकलो नाही याचं त्यांना प्रचंड वाईट वाटायला लागलं. हिरमुसल्या चेहऱ्याने त्या दिवशीचं काम आटोपून ते घरी पोहोचले तर घर एकदम शांत. पत्नी निवांतपणे टीव्ही पहात बसलेली. त्यांनी घाबरतच तिला विचारलं, “मुलं कुठे गेलीत?”
“अहो, असं काय करता? तुम्हाला वेळ लागणार होता म्हणून तुम्हीच नाही का तुमच्या बॉसना पाठवून दिलं आपल्या घरी? ते येऊन मुलांना घेऊन, केव्हाच गेले सर्कस पहायला. आणि काय हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपली घरगुती कामं तुम्ही कशी काय सांगू शकता?”
ज्यु. सायंटिस्ट काय समजायचे ते समजले. कलाम साहेबांना मनोमन धन्यवाद देत सोफ्यावर बसले. इतक्यात मुलांचा दंगा त्यांच्या कानावर आला. मागोमाग हसत, बागडत मुलं आणि कलाम साहेब घरात आले. कलाम साहेबांना पाहून ते खजिल होऊन उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवत खाली बसण्याची खूण करत कलाम म्हणाले, “अहो, साडे चार वाजून गेले तरी तुमचं काम चालूच होतं. तुमची एकाग्रता पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सर्कसचा विषय पूर्णपणे विसरुन गेला आहात. मुलांची सर्कस बुडू नये म्हणून मी त्यांना घेऊन सर्कसला जाऊन आलो.”
कलाम साहेबांचे आभार मानावेत की त्यांना आपण कामाला लावलं याबद्दल सॉरी म्हणावं हे त्या सायंटिस्टना कळेना. पण स्वतःला पट्कन सावरत, हात जोडत ते म्हणाले, “थॅंक्यु व्हेरी मच सर!”
“नो, नो. ऑन द कॉन्ट्ररी आय शुड से थॅंक्यु टू यू.” असं म्हणत कलाम साहेबांनी त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते पुढे म्हणाले, “कित्येक वर्षांनी आज मीही तुमच्या मुलांसोबत सर्कसचा आनंद लुटला. खूप मजा आली आम्हाला. कितीतरी दिवसांनी मीही आज मुलांसोबत बागडलो.”
मुलांच्या चेहऱ्यावरुन तर आनंद ओसंडून वहात होता. कलाम सरांच्या हातातील आपले हात त्या सायंटिस्टने हळूच सोडवून घेतले आणि आपले डोळे रुमालाने पुसले. बॉस आणि ज्युनिअर मधील प्रेम पाहून बाजूला उभ्या असलेल्या मातेचे मात्र ओलावलेले डोळे आपल्या साडीच्या पदराने पुसणे कितीतरी वेळ चालूच होते.
(ही कथा डॉ. कलाम यांच्यासोबत इस्रोमध्ये काम केलेल्या एका शास्त्रज्ञाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली आहे.)
माहिती संकलक : श्री प्रभाकर जमखंडीकर
संचालक, स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूर
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
संत तुकाराम बीज —. फाल्गुन कृ. २, शके १९४५ – (या वर्षी दि. २७. ०३. २०२४)
सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा काळ ! भारतातील एक गांव !! गावात बारा बलुतेदार !!! पैकी एक सावकार ! आता सावकार म्हटलं की आपल्या समोर नमुनेदार सावकाराचे चित्र उभे राहिले असेल. स्वाभाविक आहे कारण सावकार म्हटलं की तो लालची असलाच पाहिजे, तो लांडीलबाडी करणारा असलाच पाहिजे अशी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. पण हे सावकारी करणारे कुटुंब याहून वेगळे होते. सगळ्याच दगडांच्या मूर्ती घडवता येत नाहीत, कारण मूर्तिकार कितीही माहीर असला तरी दगड ही त्या प्रतीचा लागतो. हे अख्खे कुटुंब वेगळेच होते. आपले कर्तव्य म्हणून, पांडुरंगाने सोपवलेलेले पांडुरंगाचे काम म्हणून हे कुटुंब पिढीजात सावकारी करीत होते. घरात पंढरीची वारी होती, पैपाहुण्याचे स्वागत होत होते, गावातील प्रत्येकाला या कुटुंबाचा, घराचा आधार होता.
चारशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे मोगलाई !!! आता मोगलाई म्हणजे काय हे आमच्या पिढीला, आजच्या पिढीला कळणे तसे अवघड आहे, कारण ना आम्ही पारतंत्र्य अनुभवले ना मोगलाई !! पण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर इतकेच सांगता येईल, ‘मोगलाई’ म्हणजे ‘मोगलाई’!!!
‘मोगलाई’चा अधिक चांगला अर्थ ज्याला समजून घ्यायचा असेल त्याने आपल्याच देशात स्वतःच्या राज्यातून परागंदा होण्याची पाळी ज्या ‘काश्मीरी पंडितां’वर आली त्यांची भेट जरूर घ्यावी. ‘ सर्वधर्मसमभावा ‘बद्दल असलेले सर्व समज (खरे तर गैरसमज ! ) आपसूक स्पष्ट होतील आणि विशेष म्हणजे आजची ती गरज देखील आहे. हे सर्व थोडे विषय सोडून आहे असे वाचकांना वाटू शकेल परंतु ज्यांच्याबद्दल हा लेखन प्रपंच करीत आहे त्यांची शिकवण डोळेझाक करणे मला जमण्यासारखे नाही. ते स्वच्छ शब्दात सांगतात,
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु. ॥
“मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥”
(अभंग क्रमांक ६२१, सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
त्याकाळातील मोगलाईचा सुद्धा ‘सात्विकतेचे बीज’ जीवावर उदार होऊन टिकवून ठेवणारी काही मंडळी होतीच. त्यापैकीच हे कुटुंब!! मूळ आडनाव आंबिले!! पंचक्रोशीत मान होता, वकुब होता. ही तीन भावंडे!! तिघेही भाऊच!! त्याकाळातील प्रचलित पद्धतीनुसार मुलांनी बापाचा व्यवसाय पुढे चालवायचा असा दंडक त्याकाळी होता. त्यामुळे या तिघांनी सुद्धा हेच करावे असे त्यांच्या बाबांना वाटणे हे त्याकाळातील रितीला धरूनच होते. पण मोठा भाऊ ‘संसारात’ पडला पण तसा तो विरक्तच होता. म्हणून सावकारी दुसरा मुलगा, ‘तुक्या’वर आली. त्याने ती जबाबदारी सचोटीने पार पाडण्याचा प्रयत्न देखील केला.
आपण मनात एक चिंतीतो, पण नियतीच्या मनात काही वेगळं असतं. इथेही तसेच झाले. आईवडिलांचे छत्र हरपले, मोठा भाऊ संसार सोडून तीर्थयात्रेला निघून गेला आणि धाकट्या भावाने वाटणी मागितली, त्यात अस्मानी संकट आले. “न भूतो… !” असा दुष्काळ आला. महाभयंकर दुष्काळ होता तो. त्याकाळात लाखो माणसे देशोधडीला लागली, लाखों जीव प्राणास मुकले, याची झळ तूक्याच्या कुटुंबाला बसणे हे ही स्वाभाविक होते. तसा तो बसलाही आहे. कुटुंबातील अनेक माणसे अन्न अन्न करीत प्राणास मुकली. एक काळी सावकार असलेल्या कुटुंबास घासभर अन्नास मोताद व्हावे लागले. कल्पना करा, सावकार असलेल्या कुटुंबावर अन्न-अन्न करण्याची पाळी आली तर त्यांची काय मनःस्थिती असेल. जे कुटुंब अनेकांचा पोशिंदा होते त्यावर भिकेची पाळी यावी!! यापेक्षा ‘दैवदुर्विलास’ काय असू शकतो. त्याकाळातील शेतकरी दुष्काळ आला म्हणून आत्महत्या करून कर्तव्यच्युत होत नव्हते, त्यामुळे या तुक्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोडून देऊ, कधी विचारही केला नाही. त्याने यातून धीराने मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि ‘प्रयत्नांनी परमेश्वर’ या उक्तीनुसार ते यशस्वीही झाले.
या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ‘हरिनामाचा’ उपयोग करून घेतला. आपल्याकडे एखादा संत झाला की त्याची पूजा करायची, त्याला देवत्व प्रदान करायचे आणि आपण निवांत रहायचे अशी पद्धत पडून गेली आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते, आपलेही हेच मत असेल असा विश्वास आहे. पण आज मात्र नुसती पूजा करून भागेल अशी परिस्थिती नाही, आज या संतांच्या चरित्राचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. ऐकणे म्हणजे कृती करणे आणि अभ्यासणे म्हणजे आत्मसात करणे, आत्मानुभूती घेणे, हे समजून घ्यायला हवे.
‘श्रीमान तुका आंबिले’ हे ‘संत तुकाराम’ होऊ शकले कारण त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि कृतीत आणली. नुसती कृतीत न आणता ती आत्मसात केली. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या पंक्तीनुसार ते जीवन जगले. हे सर्व लिहायला जितके सोपे तितकेच करायला अवघड.
*अखंड नामस्मरण, त्याला ‘सम्यक’ चिंतनाची जोड आणि ‘अरण्यवास’ यामुळे श्रीमान तुकाराम आंबिले संवेदनशील होऊ लागले, निसर्गाशी समरस होऊ लागले. एक दिवस सोनपावलांनी आला, तुक्याची वाचा अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली.
….. आणि मग ‘जीवा-शिवाची भेट झाली
तुक्याची ब्रह्मानंदी टाळी लागली. ‘अवघा’ रंग एक झाला नि तुक्या विठ्ठल रंगात न्हाऊन गेला!! तुक्या अंतर्बाह्य बदलून गेला. सर्व ठिकाणी एकच हरी भरून राहिला आहे याची त्यास अनुभूती आली, एक चैतन्य सर्व सृष्टीत भरून राहिले आहे याची चिरजाणीव त्यास झाली. सर्व ठिकाणी त्यास एक विठ्ठल दिसू लागला, देह विठ्ठल झाला, चित्त विठ्ठल झाले, भाव विठ्ठल झाला, क्षेत्र विठ्ठल झाले, आकाश विठ्ठल झाले, चराचर सृष्टि विठ्ठल झाली, आणि असे होता होता तुका तुकाराम झाला नव्हे तुका आकाशा एवढा झाला!!!* सामान्य मनुष्य अथक परिश्रमानें, साधनेने ‘आकाशा एवढा’ होऊ शकतो, हे त्यांनी स्वानुभवाने सिद्ध करुन दाखवले आणि सामान्य जनांना भगवंत प्राप्तीचा सोपान सुगम करून दिला.
‘आकाशा’ एवढ्या झालेल्या तुकारामांना वैकुंठाला नेण्यासाठी भगवंताने विमान पाठवले. तोच आजचा दिवस!! आजचा दिवस आपण तुकाराम बीज म्हणून साजरा करतो. आजच्या पावनदिनी अल्पमतीने वाहिलेली ही शब्द सुमनांजली श्री संतश्रेष्ठ तुकारामांच्या चरणी अर्पण करीत आहे.
या लेखाचा समारोप त्यांच्याच एका अभंगाने करतो…
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथे मज बोध काय कळे ॥धृ. ॥
संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे । काय म्या गव्हारे जाणावे हे ॥१॥
करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥
काय माझी याति नेणा हा विचार । काय मी ते फार बोलो नेणे ॥३॥
तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥”*
(अभंग क्रमांक ५५३, सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
वऱ्हाड प्रांतामध्ये प्रखर देशभक्तीसाठी प्रसिद्ध वीर वामनदादा ह्यांचा जन्म अमरावती येथे झाला. अमरावतीत त्यांचे बालपण गेले. वडील गोपाळराव व आई अन्नपूर्णा होते. आईच्या सेवाभाव, निस्पृहता, सत्यप्रियता ह्या गुणांच्या संस्कारात दादा वाढले असल्याने लहानपणापासूनच त्यांचा देशसेवेकडे ओढा होता. स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला त्यांच्या हृदयात धगधगत होती. देशभक्ती ही त्यांची जीवननिष्ठा होती.
भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी युवकांना प्रेरित केले व त्यांचे संघटन करून त्यांना देशभक्ती शिकवली. लष्करी वाङमय ग्रंथ त्यांनी वाचनालयात ठेवले. व्यायामाकरिता आखाडे काढले. शस्त्रं जमविली, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले व बॉम्ब प्रयोग शाळा काढली.
१९०२, १९०८ आणि १९०८ ते १९१४ च्या सशस्त्र क्रांती उठावाचे नेतृत्व वामनरावांनी केले होते. त्यांना वाटत होते भारतमातेला मुक्त करण्याकरिता इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात भारतीय जनतेला उघडपणे बंड पुकारावेच लागेल. त्यावेळी संघटित, शिस्तबद्ध, धैर्यवान, स्वसंरक्षणक्षम असे तरुण सरसावले पाहिजे म्हणून विविध संघटना या दादांनी उभारल्या. त्यात अकोट येथे ३०० युवा संघटित झाले होते. युद्ध विषयक डावपेच समजावे याकरिता दादांनी या संदर्भातील १००० पुस्तकांचा संग्रह केला होता. त्या पुस्तकांचे वाचन करण्यात येत असे. तसेच त्यात वर्णन केलेल्या डावपेचावर चर्चा सुद्धा केली जात असे. यातील डावपेचांचा उपयोग कित्येकदा वामनराव निवडणुकीच्या लढतीत करीत.
या काळात सरकार कडून क्रांतिकारकांचा कसून शोध घेणे सुरू झाले. गुप्त पोलीसही दादांच्या व सहकाऱ्यांच्या शोधात होते. म्हणून दादांनी सर्व शस्त्रास्त्रे, युद्ध विषयक पुस्तके, बॉम्ब तयार करण्याची साधने सर्व जमिनीत पुरून ठेवण्याचा सल्ला सहकाऱ्यांना दिला.
दादांचे हस्तलेखन सुंदर व सुवाच्च होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘गीतारहस्या’ची हस्तलिखीत प्रत तयार करण्यासाठी बोलाविले. ‘गीतारहस्या’च्या प्रस्तावनेत त्यांचा उल्लेख आहे. ‘गीतारहस्य’ ची हस्तलिखीत प्रत तयार करताना गीतेचे तत्त्वज्ञान दादांनी आत्मसात केले. त्यांनी जीवनभर कर्मयोगाचा सिध्दांत आचरणात आणला.
राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वामनदादा हे उत्तम वक्ते, लेखक, नाटककार होते. त्यांचे लिखाण राष्ट्रजागृतीसाठी जहाल व ओजस्वी असे होते. रणदुंदुभी, राक्षसी महत्वाकांक्षा, धर्मसिंहासन ही दादांची तीन नाटके रंगभूमीवर चांगलीच गाजली. त्यामुळे ते श्रेष्ठ नाटककार ठरले. ही नाटके राष्ट्र चळवळीस प्रेरक ठरली.
१९२१ साली भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे दादा अध्यक्ष होते.
१९४३ते १९५३ या काळात वामनराव दादांनी अमरावतीच्या नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
रणदुंदुभि नाटकांमधील त्यांची पदे विशेष गाजली होती आणि आजही ऐकली जातात.
☆ “अमेरिकेतील चिमण्यांचे पुण्यातल्या मैत्रिणीशी हृदयस्पर्शी नाते.…” – लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
(२० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त खास हा लेख)
तो दिवस मला आजही आठवतोय. मला रात्री अचानक एक वाजता फोन आला. मी भर झोपेतून खडबडून जागा झालो होतो. मोबाईल हातात घेतला व नंबर पाहीला तर तो परदेशी कॉल असल्याचे समजले. मी मोबाईल रिसिव्ह केला व हॅलो बोललो. समोरून एक महिला बोलत होती व डिस्टर्ब केले म्हणून क्षमा मागत होती. आपण कोठून बोलताय विचारले तर अमेरिकेतून बोलत आहे असे सांगितले. काय विशेष विचारले तर त्या सांगू लागल्या की आपला चिमण्यांविषयी संभाषणाचा इको फ्रेंडली क्लब वरील फेसबुक पेज वर अपलोड केलेला व्हिडिओ पाहीला व तो खुपचं भावला व रहावलेच नाही म्हणून आपणास फोन केला. पुढे त्या बोलू लागल्या व त्यांची त्यातील काही वाक्य मात्र काळजाला भिडणारी होती व त्या वाक्यांनी माझ्या शरीरावरील रोम खडे झाले होते. त्या सांगत होत्या पुण्यामध्ये माझे लहानपण गेले अगदी लग्न होईपर्यंत मी तेथे खुप खेळले बागडले. वडीलांनी घराच्या आवारात पक्षांसाठी खुप झाडे लावली होती. ते पक्षी पाहुन त्यांच्या विषयी खुप कुतुहल वाटायचे. त्यांच्या प्रेमात मी कधी पडले समजलंच नाही. या प्रेमाचे रूपांतर आमचे मैत्रीत झाले. त्यांना मी रोज खाण्यासाठी धान्य टाकायची. त्या सुरूवातीला धान्य टाकताच क्षणी उडून जायच्या व मी तेथून निघून गेले की मग टाकलेले धान्य टिपुन खायच्या. या खेळात मी व त्या अगदी फार जवळ जवळ येत गेलो. आता त्या माझ्या हातात धान्य पाहीले की कधी कधी हातावरच येऊन बसायच्या. धान्य टाकायला उशीर झाला की जोर जोराने चिवचिवाट करायच्या. अगदी मुलाने हट्ट करावा तशा त्या हट्टी होत चालल्या होत्या. मी कुमारीका अवस्थेत आता या चिमण्यांची आई झाले होते. त्यांच्या जेवण पाण्याची काळजी मी रोज घेत असे व त्यांच्याशी संवाद साधत असे. मला माहीत नाही पण कोणत्या जीवनाची हि पुण्याई कामी आली होती माहीत व यांची सेवा करण्याचे मला भाग्य लाभले होते.
पुढे माझे शिक्षण पूर्ण झाले. आई वडीलांनी माझे लग्न करून दिले. लग्नानंतर मी पतीसोबत अमेरीकेला रहायला गेले. चिमण्याचा सहवास मिळत नसल्याने मी पहिले खूप उदास व्हायची. कधी कधी तर हातात धान्य घेऊन व्हरांड्यात यायची व नाराज होऊन माघारी फिरायची कारण अंगणात चिमण्याच नसतं.
अमेरिकेत वर्षातील ४ महिने तर सुर्य दर्शन घडने कठिणच होते. बर्फ बारी सुरू झाली होती त्यामुळे पक्षी पहायला मिळायचे परंतु आपल्या सभोवताली नेहमीच चिवचिव करणा-या चिमण्या मात्र पहायला मिळणे दुर्मिळच होत. लग्नाचे दोन वर्ष चिमणी सारखे भुर्कुन कधी उडुन गेले कळलेच नाही.
एके दिवशी बाल्कनीत फिरत असताना अचानक माझी नजर एका जागेवर खिळुन राहीली. अमेरिकेतील तो क्षण तर माझा आयुष्यात अतिशय आनंद देणारा ठरला. चक्क मी समोर अंगणात चिमणी पाहत होते. मला तर या दृष्यावर विश्वासच बसत नव्हता. आता ती चिमणी रोजच दिसू लागली होती.
मी त्या दिवसापासून अंगणात ती चिमणी रोज धान्य वेचुन खायला यावी व मला पहायला मिळावी म्हणून तीला धान्य टाकु लागले. ती एकच चिमणी रोज दिसायची. मी पण.. एक त एक म्हणून धान्य टाकण्याचा नित्यक्रम चालूच ठेवला. कालांतराने दोन, तीन, चार अशा चिमण्या वाढत गेल्या व मी धान्य टाकतच गेले. आता त्यांची व माझी चांगली ओळख निर्माण झाली होती व त्यांना पण माझा लळा लागला होता. ८ महिन्यांत त्यांची संख्या जवळपास १५ / २० झाली होती. आता त्या माझ्या व मी त्यांच्या चांगलीच परीचयाची झाली होती. गॅलरीत बसुन हाताच्या अंतरावर त्या धान्य टाकताना बसु लागल्या होत्या. आता मी अंगणात धान्य टाकण्याऐवजी त्यांना गॅलरीत धान्य टाकत होते व त्या तेथे येऊन खाऊ लागल्या होत्या. माझी धान्य टाकायची वेळ अगदी त्यांच्या परीचयाची झाली होती. मी दरवाज्याची कडी काढायला खोटी की त्या आवाजाने ते तेथे हजर होत असत. आता त्यांनी माझ्या घराच्या शेडच्या आवारातच त्यांनी घरटी केली होती. बर्फ पडायला सुरुवात झाली होती. भयंकर पडणा-या बर्फात या कशा राहतील समजत नव्हते. थंडीचा जोर वाढला होता. त्या दिवशी धान्य टाकायला मला थोडा उशीर झाला होता. दरवाजावर सारखा टक टक आवाज येऊ लागला. दरवाजा का वाजतोय समजायला मार्ग नव्हता. दरवाजा उघडला तर समजले की चिमण्या दरजावर चोची आपटत होत्या व धान्य मागत असल्याचा संकेत देत होत्या कारण बर्फाने सगळा परिसर पांढराशुभ्र होऊन गेला होता व त्यांच्या पोटापाण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मी त्यांचा धान्य घालण्याचा नियम कधीच मोडला नाही व कधी कधी दरजावर मुद्दाम त्यांचा चोचीचा आवाज ऐकण्यासाठी मी उशीर करायची . दोन वर्षांत त्यांची संख्या जवळपास ६०/७० वर पोहचली. खूप आनंद झाला मला हे सर्व पाहून व अनुभवून. आता मी एकटी नव्हते तर आमचं कुटुंब जवळपास ७२ सदस्यांच झाले होते. गेल्या महिन्यात मी अचानक आजारी पडले. मला उठणे बसणे कठीण झाले. पती या कठीण काळात माझी सेवा करायचे. त्यांना खायला घालायचे माझ्या लक्षातच आले नव्हते व ना कधी दरवाजावर टकटक झाली. आजारपणात मला माहित नाही पण कसा काय विसर पडला कळलेच नाही. जवळपास ४ दिवस मी बेडवरून उठू शकले नव्हते. आज ५ व्या दिवशी मी स्वतः उठून बसले व बाथरूममध्ये जाऊन आले. तर लगेच दरवाजावर टकटक सुरू झाली. मला तर हे ऐकून आश्चर्याचाच धक्काच बसला. गेली ४ दिवस यांनी कधीच दरवाजावर टकटक केली नव्हती. कसं बरं समजलं असेल त्यांना की मी आजारी आहे? व आपण दरवाजा वाजवून या आजारी आईला सतावने उचित नाही म्हणून. आज फक्त घरात उठून बसले तर लगेच दरवाजा ठोठावला. असे कसे घडले असेल? कोणत शास्र यांना आवगत असेल बरं? याच विचारात गेली कित्येक दिवस मी होते. याच उत्तर मला अनेक दिवसांनी मिळाले. आज आपला व्हिडिओ पाहण्यात आला आणि पक्षांना खरोखरच व्हायब्रेशन समजतात याची खात्रीच पटली. मी मला रोखुच शकले नाही तुमच्या त्या व्हिडिओ मधील विधान ऐकुन व लागलीच आपणास फोन केला.
पंधरा ते वीस मिनिटे दिपालीजी बोलत होत्या. त्यांचे कानावर पडणारे शब्द अंगावर काटे उभे करत होते. आनंद याच गोष्टीचा वाटत होता की एक चिमणी पासुन ६० ते ७० चिमण्यांचा गोतावळा दिपाली ताईंनी अन्नदाता म्हणून उभा केला होता तो पण परदेशात. ताई तुमचे पक्षांच्या पाठीशी सदैव असेच प्रेम राहो व आपला हा गोतावळा अतिशय मोठा होत राहो व आपल्या हातुन त्यांना सदैव अन्नदान मिळत राहो हीच सदिच्छा.
आज आपण मला चिमणी पक्षांचं आगळवेगळ रुप दर्शन घडवलत़ त्याबद्दल निश्चितच ऋण व्यक्त करतो. आज जागतिक चिमणी दिन या आपल्या सर्व चिमण्या ताईंना जागतिक चिमणी दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे नक्कीच द्याल ही सदिच्छा व्यक्त करतो.
मित्रांनो पक्षांचे जतन आणि संवर्धन हाच पिकांवर परिणाम करणा-या किडींवर नियंत्रण उपाय आहे. त्यामुळे त्यांचे जतन करा व त्यांना उन्हाळ्यात पाणी व अन्न ठेवत चला.
लेखक : रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो ८३९०००८३७०
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈