☆ ✹ ३१ डिसेंबर ✹ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे स्मृतिदिन — संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
जन्म – १२ जुलै १८६३ (वरसई,रायगड)
स्मृती – ३१ डिसेंबर १९२६ (धुळे)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. ते मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बीए पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. १८९८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे, “ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.”।महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते. राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहास संशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्य न् वाक्य ब्रह्मवाक्य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधन सामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता. राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकां बद्दल म्हणता येईल. राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभा शक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयास सुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.
संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : विकिपीडिया
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
☆ समाधी संजीवन… लेखिका : सुश्री विद्या हर्डीकर सप्रे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
बराच वेळ नकाशातून वाट काढत काढत मी आणि माझा नवरा एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती झाली, “Are you here for Dr Joshi?” मी चकितच झाले. “How do you know?” मी विचारले..
तिन सांगितलं की ,” तू भारतीय दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर या दफन भूमीत सर्वात जास्त भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “
आणि आमच्या वॉकिंग टू र मध्ये आम्ही या समाधीचाही समावेश केलाआहे.”
हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं !
त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie लॉट’ कुठे आहे त्याची खूण नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला. आमचे मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! (Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या माहेरचे नाव.)
मी त्यांच्या नोंदणीपत्रकात मोठ्या अभिमानाने आमची नाव नोंदवली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
कार्पेन्टर लॉट तसा मोठा आहे. आता इतक्या सगळ्या थडग्यातून आनंदीबाईंची समाधी कशी शोधायची असा विचार करत आम्ही चालत होतो. तेवढ्यात मला’ ती’ दिसली. मी समाधीचा फोटो पाहिला होता. त्यामुळे चटकन दिसली. “ भेटलीस ग बाय ..” असं म्हणत मी उंचवटा चढून लहानशा टेकाडावर गेले, ..काहीशा अधीरपणे!
समाधीच्या दगडाच्या एका बाजूला अक्षर अस्पष्ट होती. पण दुसऱ्या बाजूला सुस्पष्ट अक्षरात
“द फर्स्ट ब्राह्मण वुमन टू लीव्ह इंडिया टू ऑबटेन ऍन एज्युकेशन “ असे आनंदीबाईंबद्दल कोरून ठेवले आहे.
माझ्या डोळ्यांसमोरून दीडशे वर्षांपूर्वीचा आनंदीबाईंच्या जीवनाचा सगळा पट उलगडला होता…. कादंबऱ्या आणि चरित्रातून वाचलेला.. पण मनावर त्याचा सुस्पष्ट अक्षरातला खोल ठसा उमटवून गेलेला.
समोरून उतरत्या सूर्याची किरणे समाधीवर पडली होती. बाजूला काही हिरवळ, काही पाचोळा होता. आम्ही ते सर्व बाजूला करून आमच्या बरोबर आणलेली फुले समाधीसमोर ठेवली. काही फुले समाधीवर छान रचून ठेवली. कातर मनाने , भरल्या डोळ्यांनी मी तिला वाकून नमस्कार केला… आणि मग तिच्या जवळ थोडा वेळ निशब्द पणे बसून राहिले. मध्ये उलटलेल्या काळाचा वारा मनात सळसळत होता.
किती वर्षे या भेटीची आस लागून राहिली होती !
मन काही वर्षे मागे गेले. .. १९९१ पर्यंत..मी फिलाडेल्फयाला एका स्नेह्यांकडे गेले होते, तो दिवस आठवला. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी मलाही मुद्दाम बोलावले होते. जवळच्याच एका लहान गावात रहाणारे अशोक आणि मनीषा गोरे आणि त्यांच्याबरोवर आलेल्या त्यांच्या नातेवाईक ‘अंजली कीर्तने !’ हे नाव मी ऐकलं होत. मला वाटत चेरी ब्लॉसम की अशा काही नावाचं त्यांचं पुस्तक वाचलं होत. अंजलीताई मुद्दाम आल्या होत्या त्या आनंदीबाई जोशींवर संशोधन करायला. फिलाडेल्फियातल्या कॉलेज मध्ये आनंदीबाईंची डॉक्टर ची डिग्री झाली होती. तिथे अंजलीताईना घेऊन जाऊन श्री. गोरे यांनी तिथल्या पुरातत्व विभागात कागदपत्रे शोधायला सुरवात केली होती. आजवर कधीच माहिती नव्हता तो माहितीचा खजिना तिथे मिळाला होता. त्यात एक पुस्तक हाती आलं. कॅरल डॉल ने लिहिलेलं आनंदीबाईंचं चरित्र ! त्यात एका वाक्याचा उल्लेख होता : आनंदीबाईंची अमेरिकेत कार्पेन्टर मावशींकडे पाठवलेली रक्षा कुठे जतन केली जाणार आहे त्याचा.
तेवढ्या धाग्यावरून ती समाधी शोधून काढण्याचा खटाटोप चालू होता. गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाईंचा रक्षाकलश बोटीने अमेरिकेत पाठवल्याचे उल्लेख आहेत. पण त्याच पुढे काय झालं ते कोणाला माहिती नव्हतं.
मी अमेरिकेत आल्यावर त्यांची समाधी शोधून काढण्याचा विचारही मी कधी केला नव्हता ! पण आपल्याला देवतेसारख्या वाटणाऱ्या आनंदीबाईंच्यासाठी चाललेल्या या प्रकल्पाबद्दल आता मात्र मलाही उत्सुकता वाटायला लागली.
गोरे पतिपत्नी आणि अंजलीताई यांची ओळख नुकतीच झाली होती, पण पहिल्याच भेटीत त्यांच्याशी कुठेतरी सूर जुळले .त्यामुळे न्यूयॉर्क राज्या मध्ये एका लहानशा गावात कुठेतरी असणारा तो कार्पेन्टर लॉट शोधण्यात त्यांना कशी मदत करता येईल याचा विचार मी करु लागले. गुगल , विकिपीडिया आणि इंटरनेट यांच्या आधीचे ते दिवस. म्हणजे “आपल्या ओळखीचं कोण कोण आहे न्यूयॉर्क राज्यात” अशी आठवणींची साखळी बांधून माझी विचारांची साखळी सुरु झाली. योगायोग असा की कार्पेन्टर लॉटबद्दल चा उल्लेख आहे त्या गावाच्या आसपास माझे एक मित्र विराज आणि लीना सरदेसाई रहात होते, हे मला एकदम आठवलं.
मी लगेच विराज ला फोन केला.तोपर्यंत विराजचा संदर्भ आणखी कोणीतरी सुद्धा अंजलीताईना दिला. होता. गावातल्या दफन भूमी विंचरून हा कार्पेन्टर लॉट शोधण्याची आणि तिथेच रक्षाकलश असण्याचे पुरावे शोधण्याची जबाबदारी विराजने घेतली. पुष्कळ परिश्रम करून त्याने हे इतिहास संशोधन केलं. आणि अंजलीताईना तिथे पोहोचता आलं. मला त्यावेळी जण शक्य नव्हतं. पण अंजलीताईनी समाधीचा फोटो आठवणीने मात्र पाठवला.( मी तो अजूनही जपून ठेवला आहे. )….
शंभर वर्षे उलटून गेल्यावरही आनंदीबाईंची समाधी तिथे होती .. वादळ वारे , हिमवर्षाव सहन करत होती. खोदलेली अक्षरे पुसट झाली होती. त्यात खडू भरून त्या अक्षरांना उठाव देत कोरलेली वाक्ये वाचावी लागली.
दफनभूमीवरील यादीत आनंदीबाईंचं नाव होत. पण बाकी माहिती कुणालाच नव्हती. ती अंजलीताईनी दिली आणि कागद प्रत्रातले रिकामे रकाने भरले गेले. इतिहासाच्या अक्षरांना पुन्हा उठाव मिळाला.
आनंदीबाई आली अमेरिकेत तेव्हा इथे कोणी नव्हतं. पण आनंदीबाईनी इथे जात, धर्म, भाषा यांचे तट ओलांडत कॅरल डॉलशी मैत्रीचे बंध जुळवले. कार्पेन्टर मावशीनं तर तिला कुटुंबातच सामावून घेतलं आणि माहेरच्या दफनभूमीत तिच्यासाठी खास जागा निर्माण केली. तिची समाधीशिळा उभारली.
त्याकाळच्या मराठी बाईची चाकोरी माजघर, स्वयंपाकघर ते मागील आंगण एवढीच होती. ती ओलांडून आनंदीबाई वेगळ्या वाटेने चालल्या. .. ती वाट शिक्षणाची होती. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे .. म्हणजे केवळ चाकोरीबाहेरची वाट चोखाळणे नव्हते, तर व पायवाट सुद्धा नव्हती तिथे राजमार्ग उभारणे होते.. पहिली भारतीय डॉकटर स्त्री होण्याचा सन्मान घेताना आनंदीबाईंच्या या अलौकिक कार्याचं सार्थक झालं खरं; पण त्या राजमार्गावरून पुढे जाण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने कलाटणी दिली आणि त्यांच्या रक्षा या न्यूयार्क मधल्या आडगावात एका दफनभूमीत एकाकी होऊन पडून राहिल्या होत्या. नंतर इतके मराठी लोक आले, त्यांनाही याचा पत्ता नव्हता. ..
बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या झाशीच्या राणीच्या समाधीस्थळी
‘रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी …..” अशी भा रा तांबे यांनी घातलेली साद …
तशी बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या आनंदीबाईच्या समाधीस्थळी अंजली कीर्तने , विराज , लीना सरदेसाई, अशोक, मनीषा गोरे यांनी घातलेली ही साद …
मराठी, भारतीय लोकांपर्यंत हळू हळू पोहोचली. आणि आता इथे लोक दर्शनाला येऊ लागले.
हे सगळं आठवत मी समाधीपाशी स्तब्ध झाले होते…
माझी ही तीर्थ यात्रा पूर्ण झाली ती विराज आणि लीना यांच्या घरी जाऊनच.. लीना आणि विराज आता त्या गावात रहात नाहीत. ते आता दूरच्या एका गावात असतात. मधल्या काळात आमच्या भेटी झाल्या होत्या, काही प्रकल्पसुद्धा आम्ही एकत्रित पणे केले होते.
पण तरीही समाधीदर्शनानंतर लगेच त्यांना भेटल्याशिवाय तीर्थयात्रा पूर्ण होणार नव्हती. म्हणून आम्ही पुढे निघालो. त्या दोघांनाही आमच्या या विशेष भेटीचा खूप आनंद झाला. .पुष्कळ जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हाच्या आठवणी विराजने सांगितल्या. संशोधनाचं आव्हान, समाधी सापडल्याचा आनंद, कितीतरी गोष्टी.! आम्ही ऐकताना भारावून गेलो होतो…
समाधीच्या शिळेवरची अक्षर पुसट झाली, ती महत्प्रयासाने परवानग्या काढून विराजने पुन्हा खोल करून घेतली. त्यामुळे एका बाजूला आता सुस्पष्ट खोदकाम दिसते. हा ऐतिहासिक दुवा मला कळला.
आनंदीबाईंवर अंजलीने पुस्तक लिहिले. लहान माहितीपट केला. लेख लिहिले. (अलीकडेच आनंदीबाई गोपाळरावांवर एक चित्रपटही निघाला)
या समाधी संशोधनानंतर अनेक लोकांनी समाधीला भेट द्यावी अशी तिची इच्छा होती आणि आहे. तिच्या संशोधनाचे आणि धडपडीचे सार्थक झाले. आज खरोखरच जास्तीत जास्त लोक येऊन या समाधीला भेट देतात….. अमेरिकेत आलेल्या प्रत्येक भारतीय डॉकटर ने विशेषतः: महिला डॉक्तरने समाधीला भेट द्यावी असे मला मनोमन वाटते. त्यासाठी मी काही लेख लिहून समाधीचा पत्ता प्रसिद्ध केला. आमच्या दुसऱ्या पिढीच्या मुलींनी ही समाधी पहावी आणि काही प्रेरणा त्यांना मिळावी! कारण आनंदीबाईनी चाकोरीचे आणि परंपरांचे अवघड घाट ओलांडून, आमचे मार्ग सोपे केले. आम्ही आज इथे आहोत, ते त्यांच्यामुळे आणि आमच्या मुली आज मोठ्या मोठ्या भराऱ्या घेत आहेत , त्या त्यांच्याचमुळे ! आम्ही आनंदीबाई जोशींच्या लेकी आहोत !
तेव्हा आनंदीबाईनी विराज, लीना, अशोक, मनीषा , अंजली आणि मी यांचे बंध अनुबंध जुळवले, ते आज तीस वर्षांनंतरही जुळलेले आहेत. आनंदीबाईंच्या संजीवन नामाने नामांकित झालेले आहेत !
या दफनभूमीच्या वॉकिंग टूर मध्ये आनंदीबाईंच्या समाधीला असते.
Her ashes were sent to Theodicia Carpenter, who placed them in her family cemetery at the Poughkeepsie Rural Cemetery in Poughkeepsie, New York. The inscription states that Anandi Joshi was a Hindu Brahmin girl, the first Indian woman to receive education abroad and to obtain a medical degree).
☆ “पुण्यातल्या काही ऐतिहासिक आठवणी…” – संग्राहक : सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
पुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी ……
महात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला.
त्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर मानलं जातं होतं. जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. काही वेळा हे हल्ले शारीरिक होते तर काही वेळा मानसिक अत्याचार केला गेला.
याच पुण्यात काहीजण असे होते जे फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला, इतकंच नाही तर त्यांचा वारसा पुढे नेला.
यातच प्रमुख नाव येते डॉ. विश्राम रामजी घोले यांचे.
गुहागर येथील अंजनवेलच्या किल्लेदार गोपाळराव घोले यांच्या नातवाचा हा मुलगा. घराण्याची ऐतिहासिक परंपरा जपत वडील ब्रिटिश पलटणीमध्ये भरती झाले, सुभेदार झाले.
वडील सैन्यात नोकरीला असल्यामुळे विश्वास घोले यांना शिक्षणाची संधी मिळाली. ते शिकून सर्जन बनले. १८५७ सालच्या बंडात देशभर फिरून जखमी सैनिकांची त्यांनी सेवा केली. ब्रिटिश आमदानीत एक नामवंत शल्यविशारद म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात रावबहादूर ही पदवी देण्यात आली होती.
पुण्यात असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून ते लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या पर्यंत तत्कालीन पुढाऱ्यांशी त्यांची चांगली मैत्री होती पण त्यांना भारावून टाकले महात्मा फुले यांच्या सुधारकी विचारांनी.
सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875 ला साजरा करण्यात आला. त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉ. विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले.
महात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहचवेत म्हणून डॉ. घोले प्रयत्नशील होते. उक्ती व कृती मध्ये त्यांनी कधीच अंतर येऊ दिलं नाही. साक्षरतेचा प्रसार केला मात्र सुरवात स्वतःच्या घरापासून केली. आपल्या मुलींना इंग्रजी शिक्षण दिले.
त्यांच्या थोरल्या मुलीचं नाव होतं काशीबाई. सर्वजण तिला लाडाने बाहुली म्हणायचे. या काशीबाईला त्यांनी मुलींच्या शाळेत घातले. जुन्या विचारांच्या अनेकांनी त्यांना विरोध केला, प्रसंगी धमकी दिली.मात्र डॉ. घोले मागे हटले नाहीत.
ही बाहुली शाळेत हुशार व चुणचुणीत होती. दिसायला देखील ती गोड बाहुली सारखी दिसायची. तिचे शाळेत जाणे पहावले नाही. डॉ. घोले यांच्या नातेवाईकांपैकीच कोणी तरी तिला काचा कुटुन घातलेला लाडू खायला दिला. यातच त्या आश्रप मुलीचा मृत्यू झाला.मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले. तिचे पती डॉक्टर होते.
आपल्या लाडक्या बाहुलीचा स्मरणार्थ डॉ. घोल्यानी १८८० साली पुण्यात बुधवार पेठेमध्ये आपल्या घरासमोरच हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. कोतवाल चावडी समोर असलेल्या या हौदाचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आला.
याच हौदाला बाहुलीचा हौद म्हणून ओळखले जाऊ लागले. हौदावरील उल्लेखानुसार काशीबाईचा जन्म १३ सप्टेंबर १८६९ रोजी व मृत्यू २७ सप्टेंबर १८७७ रोजी झाला होता. तिची एक मूर्ती या हौदावर उभी केली होती. कात्रजवरून येणारे पाणी या हौदात पाडण्यात येत असे. या अष्टकोनी हौदावर कारंजा देखील होता.
पुढे रस्ता रुंदीकरणामध्ये हा हौद हलवण्यात आला. इथली बाहुलीचा मूर्ती देखील गायब झाली. आता हा हौद फरासखाना पोलिस चौकीच्या हद्दीत सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याला “बाहुलीचा हौद गणपती” असेच पूर्वी ओळखले जायचे.
घोलेंनी बांधलेला हौद, तिच्या वरची ती बाहुलीची मूर्ती या जुन्या पुणेकरांच्या आठवणीतच उरला आहे. या ठिकाणी वापरलेला फोटो देखील प्रातिनिधिक नागपूरच्या बाहुली विहिरीचा आहे. स्त्री शिक्षणाचे स्मारक म्हणून काशीबाई घोले यांचे स्मारक जुन्या वैभवात उभे केले.
संग्राहक : श्री सुनील इनामदार
मो. ९८२३०३४४३४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डोळस – लेखक : श्री सुनील गोबुरे – संकलन : श्री मिलिंद पंडित☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
तो अंध तरुण रोज कॉर्पोरेशनच्या त्या बसस्टॉपवर उभा असतो. मी ज्या वारजेमाळवाडी बस मधे चढतो, तोही त्याच बस मधे चढतो. मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या ऑफिसशी उतरतो अन तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॅक सदृश्य बॅग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरे दिसतात ‘जीवन प्रकाश अंध शाळा, माळवाडी’.
गर्दीमुळे बऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही तेव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात, तेव्हा तो विनम्रपणे नकार देतो.
कोथरुड स्टँडच्या आसपास गाडी बऱ्या पैकी रिकामी होते, तेव्हा आम्हाला बसायला जागा मिळते. माझा स्टॉप त्यानंतर लगेच असल्याने मी पुढे जाउन बसतो व उतरुन जातो. बस बरोबर त्या तरुणाची आठवण दुसऱ्या दिवसापर्यंत पुढे निघून जाते.
त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळस्टॉपला एका सिटवर बसतो. बऱ्याच दिवसांचे कुतुहल असल्याने मी त्याला विचारतो, “तुम्ही रोज बस ला दिसता. पुढे माळवाडीला जाता. स्टुडंट आहात का?”
अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकतो. मग उत्तर देतो, “सर, मी विद्यार्थी नाही, मी शिकवतो.”
“ओ अच्छा. ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना?” मी विचारतो.
तो हसतो. मग उत्तरतो. “नाही सर. मी ज्या मुलांना शिकवतो, ती ब्रेल मधले मास्टर आहेत. मी त्यांना कम्प्यूटर ब्रेल कोड शिकवतो. आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो. ही मुले पुढे ब्रेल प्रोग्रामर होतील.”
माझ्यासाठी हे नवीनच होतं. मी उत्सुकतेने त्याला विचारतो, “अरे वा, म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता?”
पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो, “नाही मी दुपारी परत येतो. डेक्कनला आमच्या कंपनीत तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टस वर काम करतो.”
मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारतो, “म्हणजे ब्रेल प्रोग्रामिंग वगैरे?”
पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत तो म्हणातो, “आम्ही जे करतो त्याला एथिकल हॅकिंग म्हणतात. तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल.”
आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर वर आली.
“माय गाॕड. पण एथिकल हॅकिंग साठी लागणारे सिस्टीम्स. सर्व सुविधा?”
“आमच्याकडे आहेत” तो पटकन म्हणतो, “आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॅकिंग होत राहते. ते काम देश विरोधी ग्रुप्स करत राहतात. आम्ही अशा हॅकर्स ना कसा प्रतिबंध करता येइल यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटीक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो. आम्ही चार अंध मित्र आहोत. आम्ही या लोकांना लोकेट करतो. आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो, कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते. या सर्व अज्ञात शक्तींना प्रातिबंध करण्यासाठी आम्हाला आम्हा अंध लोकांमधे जन्मजात असलेले Intuition कामाला येते.” तो हसत म्हणतो.
तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच होतो. हा तरुणसवदा मुलगा जे एवढ्या सहजतेने सांगत आहे ते करणे सोपे नसते. मी स्वतः माझी छोटीशी आयटी कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाउक असते. तरीही न राहवून मी त्याला शेवटचं विचारतो,
“फक्त या कामावर तुम्ही व तुमची कंपनी चालते?”
“नाही सर” तो उत्तरतो, “आम्ही ब्रेल कम्प्युटींग व एथिकल हॅकिंग साठी काही अल्गोरिधम वर ही बरंच काम करतोय की जेणे करुन हे काम आमच्या इतर अंध बांधवापर्यंत आम्हाला पोचवता येइल. आमचं काम प्रत्यक्ष NIC चे हेड ऑफिस हँडल करतं. काम खूप सिक्रेटीव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही.”
तो हसतो व म्हणतो, “बाय द वे तुमचा स्टॉप आलाय.”
मी पाहतो तर खरोखरच माझा स्टॉप आलेला असतो.
“अरेच्चा” मी विचारतो, “तुम्हाला कसे कळाले माझा स्टॉप आलाय?”
“सर तुम्ही तिकीट घेतला तेव्हा मी तुमचा स्टॉप ऐकला. माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने अपलोड केलाय. Travelled Distance Analysis चा. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन. गुड डे सर” तो मला हसत म्हणतो.
मी बस मधून उतरतो व स्तंभित होउन ती नाहीशी होइ पर्यंत मी फक्त पहात राहतो. खरे सांगू? आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशः दिपून जातो.
लेखक : सुनील गोबुरे, सांगली
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-2 – लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
नमुना
मी, …… जर कोणत्याही आजारामुळे अथवा अपघातामुळे माझ्या उपचारासंबंधी निर्णय घेण्यास असमर्थ झालो, तर निम्निलिखित सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी माझी इच्छा आहे.
सूचना –
ज्यामुळे पुन्हा अर्थपूर्ण वा सर्वसामान्य ((Normal) जीवन अशक्य होईल, किंवा उपचार करूनही सहा महिन्यांच्या आत मृत्यू संभवेल, अथवा कायमची बेशुद्धावस्था (unconsciousness and/or brain death) अशी माझी स्थिती झाल्यास.
‘मला रुग्णालयात ठेवू नये, तसेच भरपाई होऊ शकणाऱ्या आरोग्यविमा रकमेपेक्षा जास्त खर्च करू नये.
‘मेंदू मृत म्हणून डॉक्टरांनी घोषित केल्यास माझे जीवन लांबविणारा कोणताही उपचार करू नये. उदा. शस्त्रक्रिया, कृत्रिम श्वसन (ventilator , life support), तसेच डायलिसिस, औषधे, रक्त/रक्तजन्य पदार्थ तसेच कृत्रिमरित्या अन्नपाणी देऊ नये.
‘मला वेदना होत असल्यास वेदनाशामके द्यावीत. तसेच मी आक्रमक/हिंसक झाल्यास शांत करण्यासाठी आवश्यक ते उपचार जरूर करावेत.
माझी काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती तसेच संबंधित डॉक्टर यांच्यावर अवघड निर्णय घेण्यासाठी जबाबदारी देऊ नये व त्यांची अप्रतिष्ठा होऊ नये या हेतूने हे इच्छापत्र मी उत्तम मानसिक स्थिती असताना व परिणामांचा काळजीपूर्वक विचार करून लिहीत आहे.
या इच्छापत्रासंबंधी निर्णय घेण्याचे व त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मी खालील व्यक्तींना देत आहे.
१)………………….
२)……………..
स्वाक्षरी
……………..
हा वैद्यकीय इच्छापत्राचा फक्त नमुना आहे. त्यातील कोणतेही मुद्दे तुम्ही कमी जास्त करू शकता. मृत्युपश्चात अवयवदानापासून ते अंत्यविधीसाठीच्या खर्चापर्यंत अनेक मुद्दय़ांचा यात समावेश करता येतो.
इच्छापत्र करताना
आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचे हे इच्छापत्र आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते.
त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे, असे लिहून त्यावर डॉक्टर सही करतात.
या वेळी पती अथवा पत्नी तसेच मुले व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सह्य़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावे लागते.
त्यानंतर त्याच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या.
हा लेखी दस्तऐवज असल्याने कायद्याच्या दृष्टिकोनातूनही तो ग्राह्य़ धरला जातो.
आपल्या परिचयात किंवा आजूबाजूला वृद्धांसाठी विशेष, वेगळं कार्य करणाऱ्या विशेषत: मुंबई, पुणे परिसराबाहेरच्या संस्था असल्यास आपण आम्हाला कळवू शकता.
आमचा पत्ता – लोकसत्ता, चतुरंग, प्लॉट नं. ई.एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई ४०० ७१०.
☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-1 – लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
मृत्युपत्र हे संपत्तीची वाटणी करणारं असतं, मात्र वैद्यकीय इच्छापत्राद्वारा माझ्या शरीराचं काय करायचं, मला व्हेन्टिलेटरवर ठेवावं का? किती दिवस ठेवायचं? माझ्या आजारपणावर ०किती खर्च करायचा, शरीर वा अवयव दान करायचे का यांसारख्या इच्छा लिहून ठेवता येतात.
अठरा वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध लेखक प्रभाकर पाध्ये यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी ‘बंध-अनुबंध’ या गाजलेल्या आत्मचरित्राच्या लेखिका कमल पाध्ये एकटय़ाच राहत होत्या. डॉ. रोहिणी पटवर्धन आणि प्रमोदिनी वडके-कवळे त्यांची काळजी घेत असत. एक दिवस त्यांनी आपले डॉक्टर सुभाष काळे व या दोघींना घरी बोलावलं व सांगितले, ‘हे बघा डॉ. काळे माझ्यावर उपचार करतात. तुम्ही दोघी माझी काळजी घेता. इथून पुढे जर मी आजारी पडले आणि त्या वेळी मी निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत, परिस्थितीत नसेन आणि माणूस म्हणून जगण्याच्याही स्थितीत नसेन तर तेव्हा माझ्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू नका. कृत्रिम यंत्रणांवर मला जिवंत ठेवू नका. मी तुम्हा सर्वासमक्ष स्वेच्छेने माझा निर्णय जाहीर करीत आहे!’
‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या संकल्पनेची मुळं वृद्ध कल्याण शास्त्रज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांच्या मनांत इथेच रुजली आणि पुढे त्यांनी त्यांच्या प्रसाराचं कार्य सुरू केलं. ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांत प्रचलित असली तरी भारतात मात्र अजून म्हणावा तेवढा प्रचार व प्रसार झालेला नाही. पण बदलत्या काळानुसार आज ‘वैद्यकीय इच्छापत्रा’ची निकड भासू लागली आहे हे निश्चित! वस्तुत: ही संकल्पना अद्याप कायद्याच्या चौकटीत नसली तरी ती एक विचारांची दिशा आहे. ‘माझे वा माझ्या शरीराचे हाल होऊ नयेत, माझ्या कुटुंबियांना निर्णय घेण्यासाठी मानसिक त्रास होऊ नये. त्यांच्यावर महागडय़ा उपचारांचा ताण पडू नये,’ या भूमिकेतून वृद्ध आपली इच्छा या ‘लिव्हिंग विल’ द्वारे व्यक्त करू शकतात.
आपलं शरीर व तब्येत हीसुद्धा एक प्रकारे आपली मालमत्ताच नसते का? मग त्यासंबंधी निर्णय निदान भविष्यकाळातील वैद्यकीय उपचारांबाबतचे आपले आपणच घ्यायला नको का? एखाद्याला बिछान्याला खिळून जगायचं नसेल किंवा कृत्रिम वैद्यकीय उपचार करून घेऊन जिवंत राहायचं नसेल, पण असे निर्णय घेण्यास तो समर्थ नसेल तर आपल्या प्रकृतीसंदर्भात कोणते उपचार केले जावेत वा जाऊ नयेत याचे स्पष्ट निर्देश करणारा दस्तऐवज म्हणजे ‘लिव्हिंग विल’ अर्थात ‘वैद्यकीय इच्छापत्र’! या ‘लिव्हिंग विल’मध्ये आयुर्मर्यादा वाढवणारे कोणतेही उपचार उदा. नळीने अन्न देणं, व्हेन्टिलेटरवर ठेवणं वगैरे करू नयेत असे स्पष्ट निर्देश करता येतात. तसेच देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान यांसारख्या इच्छांचाही उल्लेख करता येतो. मात्र आपले फॅमेली डॉक्टर आणि कुटुंबियांशी नीट चर्चा करूनच हे इच्छापत्र बनवायला हवे. इतकं सगळं करूनही रुग्णालयातील आपल्या आई वडिलांच्या बाबतीत काय करायचं, हा निर्णय शेवटी मुलांकडे रहातोच. वृद्धांसाठी आपली इच्छा व्यक्त करण्याचा फक्त हा एक मार्ग आहे.
आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचं ते ‘लिव्हिंग विल’ आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते. त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे असं लिहून त्यावर डॉक्टर सही करतात. त्याचबरोबर पती अथवा पत्नी तसंच मुलं व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सहय़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावं लागतं. हे नोटराईज केल्यामुळे ज्येष्ठांची तशी इच्छा होती हे स्पष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर या इच्छापत्राच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या लागतात. फक्त हे इच्छापत्र करण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाची चर्चा पती-पत्नी, मुलं, डॉक्टर व सुहृद यांच्याबरोबर अवश्य करावी. तरच या इच्छापत्रातील इच्छांची पूर्तता होण्याची खूप शक्यता असते.
”अर्थात तरीसुद्धा अनेक वेळा समोर मृत्यू दिसू लागताच तोंडाने कितीही निरवानिरवीची भाषा केली तरी रुग्ण उपचार सुरू ठेवायला सांगतात. व जोपर्यंत रुग्ण आपली इच्छा व्यक्त करण्याच्या परिस्थितीत असतो तोपर्यंत त्याच्या इच्छेनुसारच उपचार केले जातात. अनेक वेळा रुग्ण बेशुद्धावस्थेत असेल तरी भावनेच्या भरात नातलगच रुग्णास उपचार सुरू ठेवण्याचा आग्रह धरतात व ‘लिव्हिंग विल’ला विरोध करतात. एक डॉक्टर म्हणून नातलगांच्या मताचा आदर केला जातो त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाही.’
अनेक रुग्णांचे फॅमिली डॉक्टर असणारे व ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव कार्य करणारे डॉ. दिलीप देवधर ‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या अंमलबजावणीतील वस्तुस्थिती सांगतात. ‘लिव्हिंग विल’ अमलात आणताना एक डॉक्टर म्हणून आमचे काही निकष असतात. सर्वसाधारणपणे रुग्णाचं वय ७५ च्या वर असेल तरच हा निर्णय घेतला जातो. त्यातही आम्ही डॉक्टर रुग्णावरील उपचार एकदम बंद करत नाही. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असेल तर साधारणपणे ७२ तासांत व जास्तीत जास्त ४ ते ५ दिवसांत शरीर उपचारांना प्रतिसाद देऊ लागतं. जर तसं झालं नाही तर रुग्णाचे जवळचे नातलग, फॅमिली डॉक्टर, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर असे सर्व जण एकत्र बसून चर्चा करतात व त्यानंतरच रुग्णाने शांतपणे मृत्यूला सामोरं जावं, असा निर्णय घेतला जातो. अर्थात अशा वेळी रुग्णाने स्वत: जर असं वैद्यकीय इच्छापत्र केलं असेल तर सर्वानाच हा कठीण निर्णय घेणं सोपं जातं व जवळच्या नातलगांना अपराधीभाव येत नाहीत.
सर्वसाधारणपणे डॉक्टरांचा अनुभव असा आहे की मध्यमवर्गीय माणसं भावनेच्या आहारी जाऊन रुग्णाच्या उपचारांसाठी भरमसाट खर्च करतात. वेळेला जमीनजुमला, दागदागिनेसुद्धा विकतात. भारी व्याजाने कर्ज उचलतात. त्यांची पुढची दहा-पंधरा र्वष कर्जफेडीतच जातात व ज्या रुग्णासाठी ते आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढतात तो रुग्णही हाताला लागत नाही व निराशा पदरी पडते. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर ते कुटुंब मोठय़ा संकटातून वाचू शकतं.
आज माणसाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे आर्थिक गणितं साफ बदलली आहेत. वैद्यकीय खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाल्याने जबाबदारी घेऊन रुग्णाला त्याच्या परिस्थितीनुसार सल्ला देणारे डॉक्टर आता राहिले नाहीत. हल्लीची तरुण पिढी व्यवसायानिमित्त परगावी किंवा परदेशी असते. त्यामुळे परावलंबी रुग्णाला सांभाळणं खूप कठीण होत चाललं आहे. बरेच वेळा अशा मृत्युशय्येवरील रुग्णाला ठरावीक मुदतीपुढे हॉस्पिटलही ठेवून घेत नाहीत. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर केवळ कृत्रिम यंत्रणांवर जिवंत असणाऱ्या रुग्णाच्या नातलगांना कटू निर्णय घेण्यासाठी ‘लिव्हिंग विल’ हा फार मोठा दिलासा ठरू शकतो.
परदेशस्थ मुलं तिथल्या नियमांप्रमाणे इथेही उपचारांची दिशा ठरवण्याचा आग्रह धरतात. त्यांना इथल्या अडचणी व मर्यादा लक्षात येत नाहीत व त्याचा इथे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स व जवळचे नातलग यांना खूप त्रास होतो. आई-वडील तब्येतीने धडधाकट असतानाच परदेशस्थ मुलं, इथे ज्येष्ठांची काळजी घेणारे दोन नातलग आणि डॉक्टर यांनी एकत्र बैठक घेऊन पुढील काळात ज्येष्ठ आजारी पडल्यास त्यांच्या उपचारांची दिशा, व्याप्ती व मर्यादा यांचा साकल्याने विचार करून असं ‘वैद्यकीय इच्छापत्र’ केलं तर ते सर्वानाच खूप सोयीचं होईल. अर्थात त्यासाठी निरोगी वृद्धांनी एखाद्या तरी डॉक्टरशी सतत संपर्कात राहून नियमित वैद्यकीय चाचण्या कराव्यात.
‘सनवर्ल्ड’वरील याच सदरातील लेखानंतर रोहिणी पटवर्धन त्यांना अनेक फोन आले. त्यांतील एका ज्येष्ठाची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. ते सांगत होते, ”मी युद्धनीतितज्ज्ञ म्हणून नोकरीनिमित्त सतत फिरतीवर होतो. सतत बाहेरगावी राहिल्यामुळे नातलगांशी माझा संबंध नाही. मला मुलं नाहीत. पत्नी हयात नाही. मी एकटाच आहे. मी तुमच्याकडे रोख रक्कम जमा करेन. त्यांतून खर्च भागेल एवढेच वैद्यकीय उपचार तुम्ही माझ्यावर करा. मी हे लेखी स्वरूपात दिलं तर तुम्ही मला प्रवेश देणार की नाही?”
‘वैद्यकीय इच्छापत्र’ अशा एकटय़ा अविवाहित, विनापत्य, मुलं असूनही जवळ नाहीत वा ज्यांना सांभाळणारं कोणीही नाही त्यांच्यासाठी वरदान आहे. तसंच असाध्य व्याधींनी पीडित ज्यावर औषध व उपचार उपलब्ध नाहीत अशांसाठीही ते उपयुक्त आहे.
आयुष्यभर ज्या मुलांवर आपण जिवापाड प्रेम करतो, त्यांच्यासाठी कष्ट उपसतो, त्यांच्यावर अनावश्यक उपचाराचं ओझं लादणं वा त्यांना अप्रिय निर्णय घ्यायला लावणं यापेक्षा व्यावहारिक विचार करून ‘लिव्हिंग विल’ चा पर्याय स्वीकारणं अधिक योग्य आहे नाही का?
वैद्यकीय इच्छापत्रासंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क साधा –
लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन
मो –९०२८६६४३३३
प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अवयवदान – जनजागृती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
अवयव आणि देहदान महासंघ म्हणजेच Federation of Organ and Body Donationही संस्था ऊतीदान, देहदान व अवयवदानासाठी आपल्या अनेक जिल्हा शाखांमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काम करते. जसं नेत्रदान आणि त्वचा दान करता येतं, तसंच हृदय, यकृत, किडनी, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, फुफ्फुसे , गर्भाशय वगैरे अवयवांचेही दान करता येतं.
अर्थात वरील पैकी देहदान आणि त्वचा व नेत्रदान सोडता बाकीच्या गोष्टींचं दान फक्त ब्रेनडेड या मृतावस्थे पर्यंत पोहोचू शकणारे पुण्यवानच करु शकतात.
एक किडनी, यकृताचा काही भाग, गर्भाशय वगैरे काही जीवित व्यक्ती देखील दान करु शकते पण त्यासाठीचे कांही वेगळे नियम आहेत.
आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचे असे काय असेल?
अवयवदान केल्यानंतर देखील पार्थिवाचे, संबंधितांच्या धार्मिक प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही, हा विचार मनात येत असेल तर त्याचं उत्तर निश्चीतच तुमच्या तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यविधी करता येतील असंच आहे.
मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरले तरी काही ठरावीक केसेस मधे ती इच्छा पुर्णत्वास नेणे अशक्य होते. (जसं कॅन्सर, एडस्, हेपाटायटिस वगैरे) तरी देखील आपली इच्छा नोंदवून तसे आपल्या जवळच्या कुटूंबियांस सांगणे व या संबंधी कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक यांचेशी वारंवार चर्चा करीत रहाणे केव्हाही उत्तमच.*
आपल्यापैकी कोणाला जर ह्या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, मनात असलेल्या शंकांचे समाधान करून घ्यायचे असेल,
आणि
आपणाकडे माईकची सोय असेल अथवा नसेल……
बंदिस्त सभागृह असेल अथवा नसेल……
मानधन देण्याची तयारी असेल अथवा नसेल……
कार्यकर्त्यांची फौज असेल अथवा नसेल……
पॉवर पॉइंट सादरीकरणाची सोय असेल अथवा नसेल……
अशा कोणत्याही अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत अवयवदानाच्या जागृती / प्रबोधन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात कोठेही आपण कमितकमी १०० व जास्तीतजास्त ५००० श्रोते जमा करू शकत असाल
महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे काम केले आहे.
युवकांनी देशसेवेसाठी दोन वर्ष पुर्ण वेळ द्यावे, या बाळासाहेब देवरसांच्या आवाहनानुसार पहिले चार महिने आसाम ला व नंतर मध्यप्रदेशात अभाविप चे काम केले.
कामासाठी होशंगाबाद जिल्हा मिळाला असता एका आक्रमणकाऱ्याचे नाव आपण आपल्या सुंदर शहराला का देतो, असे म्हणत, “होशंगाबाद नहीं नर्मदापुर कहो!” हे अभियान सुरू केले. त्याला ३१ वर्षांनी यश आले व होशंगाबाद चे नामांतरण नर्मदापुरम् झाले. या नामांतरणादरम्यान भव्य मंचावर अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते.
आजकाल नर्मदा परिक्रमा करून आलेल्यांना संगठित करत, माझी गावनदी हीच माझी नर्मदा हे अभियान चालवतो. यासाठी गुगलमिटवरून नर्मदाष्टक उपासना मंडळ चालवतो. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील गावांमध्ये गावनदी अभियान सुरू झालेले आहे.
व्यवसाय – मुद्रण
छंद – स्वदेशी चळवळी अंतर्गत हेअर आॅईल शिकाकाई शाम्पू, दंत मंजन व आंघोळीचे नदीपुरक साबण बनवत असतो.
इंद्रधनुष्य
☆ बहुता सुकृतांची जोडी ☆ श्री किशोर पौनीकर ☆
वय केवळ ११७ वर्ष
केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. नितीनजी गडकरींनी नर्मदा परिक्रमा मार्गात रस्ते बांधतो म्हटल्यावर, परिक्रमा मार्ग हा पारंपरिक पद्धतीचाच असावा, असा आग्रह करणारा लेख मी लिहिला होता. तो अनेकांना आवडला व भरपूर शेअर, फाॅरवर्ड झाला. लगोलग तिसऱ्याच दिवशी नर्मदा परिक्रमा क्षेत्रातील काही परिक्रमींच्या गैरवर्तणुकीवरही लेख लिहावा लागला. हा लेख सपाटून शेअर व काॅपी पेस्ट झाला. साम टिव्ही मराठी वर माझी मुलाखतही झाली. गेल्या चार दिवसांपासून सकाळी ८.०० ते रात्री ९.३० फोन सतत वाजतोय. व्हाॅटस् ॲपवरही कितीतरी मेसेजेस येत आहेत.
असाच एक मेसेज आला…..
डाॅक्टर स्वामी केशवदास.
करनाली, तालुका डभोई, जिला बड़ौदा, गुजरात.
इतक्या फोन व मेसेजमध्ये या मेसेजकडे विशेष लक्ष जाणे शक्यच नव्हते. त्यांना विचारले, “आपल्याला मराठी येते का?” तर ते म्हणाले की, “गुजराती/हिंदी/इंग्लिश/तमिल/तेलगु/कन्नड़ भाषा अच्छी तरह जानते है। मराठी समझता हूं, पर बोल नहीं सकता!”
मी त्यांना माझे नर्मदा मैय्यावरील काही हिन्दी लेख पाठवलेत. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
(सततचे फोन व मेसेजेस मध्ये गुंतून पडल्याने दुर्देवाने मी कोणाशी चॅटिंग करत आहे, हे मला माहितच नव्हते.) मी त्यांना म्हणालो की, केंव्हाही फोन करा.
आज त्यांचा मेसेज आला की, ते रात्री ८.३० नंतर मला फोन करतील. फोन तेच करणार होते, त्यामुळे मला चिंता नव्हती. नर्मदाप्रेमी अलग अलग बंधु भगिनींचे फोन व मेसेज सुरूच होते.
रात्री ९.३० ला फोन वाजला. हा नंबर व्हाॅटस ॲप चॅटिंग मुळे माझ्या जवळ सेव्ह होता. स्क्रिनवर नाव आले. #स्वामी_केशवदास, बडोदा, गुजरात.
मी फोन सुरू केला. अंदाजे ६५ वर्षे वय असलेला तो आवाज वाटला. मी बोलणे सुरू केले. स्वामीजींचेही बोलणे सुरू झाले. त्यांना माझा ‘गडकरींवरील लेख’ व ‘परिक्रमा की बेधुंद तमाशे’ हे दोन्हीही लेख फार आवडले होते. त्यांनी माझी साम टिव्ही मराठी वरील लाईव्ह मुलाखतही बघितली होती. मुलाखत संपल्यावर लगोलगच त्यांनी मला फोन लावला होता. पण तेंव्हा माझा फोन सतत बिझी असल्याने आमचे बोलणे झाले नव्हते. म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता.
स्वामीजींना बोलतं करावं म्हणून मी काही प्रश्न विचारले व त्या दरम्यान ते बोलत असतांना दर वाक्यागणिक थक्क होण्याची वेळ माझ्यावर आली होती.
म्हैसूरला जन्म झालेले स्वामीजी प्रख्यात डेहराडून स्कूल मध्ये शिकले व नंतर ब्रिटनमध्ये ते वयाच्या ६७ वर्षापर्यंत प्रख्यात हार्ट सर्जन म्हणून कार्यरत होते. अमाप पैसा कमावला. त्यांनी लाहिरी महाशयांकडून क्रिया योगाची दिक्षा घेतली आहे.
मी सहजच त्यांना विचारले, “स्वामीजी, आपने नर्मदा परिक्रमा कब की?”
“१९५६ में ” ते म्हणाले व मी एकदम उडालोच….
“स्वामीजी आपकी उम्र कितनी है? ” मी आतुरतेने नव्हे अधिरतेने विचारले…
“११७ वर्ष “
“ क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या????”
मी जवळपास किंचाळलोच. चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीत उभा राहून बोलणारा मी, मला कोणीतरी १०० व्या मजल्यावर पॅराफिट वाॅल नसलेल्या गॅलरीत उभे केलेय, अशा चक्रावलेल्या अवस्थेत होतो.
मला, मी काहीतरी चुकीचेच ऐकत आहे, असे वाटत होते. मी पुन्हा त्यांना विचारले, “आपका जन्म वर्ष कौनसा है?”
“सन १९०५” ते उत्तरले.
माझे वय वर्ष ५७ होत असल्याने, आता बरीच कामं कमी करावीत, अशा सर्वसामान्य मराठी विचारांचा मी, मनातल्या मनात तुटक गणित मांडू लागलो….. १९०५ ते २००५ म्हणजे १०० वर्ष. २००५ ते २०२२ म्हणजे १७ वर्ष….. म्हणजे ११७ वर्ष बरोब्बर होते.
गॅलरीत वाहत असलेल्या हिवाळी थंड हवेतही मला घाम आला…
तिथूनच मी नर्मदा मैय्याला व मला घडवणाऱ्या वैनगंगेला नमस्कार केला…. एक साधा यःकश्चित व्यक्ती मी, ४५ वर्ष विदेशात विख्यात हार्ट सर्जन म्हणून काम केलेल्या, ११७ वर्षांच्या विभुतीने मला स्वतःहून फोन करून तुमचे व माझे विचार एकसारखे आहेत, हे म्हणावे…. मी पुन्हा चक्रावलो होतो.
पण….
माझे हे चक्रावणे येवढेच असावे, असे जे वाटत होते, ते त्यांच्या दर वाक्यागणिक वाढतच होते.
मी त्यांना त्यांच्या आश्रमा बद्दल विचारू लागलो. मला वाटले की एक हाॅल व कुटी, असे काहीसे ते सांगतील….
ते म्हणालेत, “नर्मदाजी के दोनो तट मिलाकर हमारे सात आश्रम है, पर हर आश्रम में मंदिर बनाने की जगह मैने २००, २५० काॅट के अस्पताल बनवाये है। पर इसकारण आप मुझे नास्तिक मत समझना। “
त्यांच्या आश्रमाचे सेवाकार्य ते सांगू लागले. “हमारे तीन आश्रम में ही नर्मदा परिक्रमावासी आते है, बाकी में अस्पताल, क्रियायोग साधना व स्वावलंबन के कार्य चलते है। हमारे किसी भी आश्रम में दानपेटी नहीं है, न ही हमने कोई रसिदबुक छपवाये है। हमारे ट्रस्ट में जो पैसा है, उसके ब्याज पर हमारे सब कार्य चलते है।”
मी जे ऐकत होतो, ते सर्व भव्य-दिव्य व व्यापक होते… स्वतःच्या आकलनशक्तीची संकुचितता मला कळली होती. मी हतबल होतो की, दिःग्मुढ, हेच मला कळत नव्हते.
काहीतरी बोलायचे म्हणून मी बोललो,” आपकी हिन्दी तो बहुत अच्छी है, आप दक्षिण भारतीय नहीं लगते। “
ते म्हणालेत, “हां ठिक पहचाना, वैसे हम उत्तर भारतीय है। मेरे पिताजी मैसूर के महाराजा के कुलपुरोहित थे।”
अजून एक मोठा धक्का मला बसायचा बाकी आहे, हे मला माहीत नव्हते…
मी विचारले, “आपके दादाजी कौन थे? “
“पंडित मदन मोहन मालवीय!”
” क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या?” आपण कितव्यांदा आश्चर्यचकित होत आहोत, हे मोजणे मी बंद केले होते.
“महामना पंडित मदन मोहन मालवीय?” न राहवून मी त्यांना पुन्हा विचारले.
“हां! मेरे दादाजी बॅरिस्टर थे…. ” ते महामना पंडित मदन मोहन मालवीयांबद्दल सांगू लागलेत.
थोड्या वेळाने त्यांनी आपली गाडी पुन्हा नर्मदा परिक्रमेकडे वळवली. म्हणालेत, “आप परिक्रमा के बारे में जो आग्रह कर रहे है, वह बहुतही सटिक है। गुरू आज्ञा के बिना नर्मदा परिक्रमा करना मात्र चहलकदमी ही है! “
मग ते मराठी परिक्रमावासी व त्यांचे वागणे, परिक्रमेत शूलपाणी झाडीतून जाण्याचा अवास्तव आग्रह, शूलपाणीतील सेवाकेंद्रांची काही गडबड, असे बोलू लागले.
पुढे ते म्हणालेत,”मै अब तक खुद होकर केवल “राहूल बजाज” से फोनपर बात करता था। आपके परिक्रमापर के लेख व परिक्रमा फिरसे अध्यात्मिक ही हो, यह आपका प्रयास मुझे बहुत भाया। इसलिये आज मै आपसे खुद होकर फोन से बात कर रहा हूं।”
नर्मदा मैय्या अनाकलनीय चमत्कार करत असते, हे मला माहीत होते. यातले काही माझ्या वाहन परिक्रमेत मी अनुभवले होते. पण ती सामाजिक जीवनातही चमत्कार करते, हे मला यावर्षीच्या ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान कळले होते. होशंगाबादचे नामांतरण नर्मदापुरम् होण्याचे पूर्ण श्रेय तिने मला त्या भव्य मंचावर मुख्यमंत्री, खासदार व आमदारांच्या सोबत बसवून दिले होते.
आता राहूल बजाज यांचे शिवाय स्वतःहून कोणालाच फोन न करणारे स्वामी केशवदास, माझ्याशी स्वतःहून फोनवर बोलत होते.
मी पण नर्मदेच्या या चमत्काराचा फायदा घेतला. त्यांना म्हणालो की, “परिक्रमेतील वाढत्या गर्दीमुळे वमलेश्वर (विमलेश्वर) ला परिक्रमावासींना तीन चार दिवस अडकून पडावे लागते. त्यांच्यासाठी विमलेश्वर गावाअगोदर अंदाजे १५०० परिक्रमावासी राहू शकतील असा आश्रम बनवायला हवा, जेणेकरून नावाडी व ट्रॅव्हल कंपन्यांच्या साटेलोट्यांचा त्रास पायी व छोट्या वाहनाने परिक्रमा करणाऱ्यांना होऊ नये. तसेच आज केवळ १२ नावा चालतात, त्या वाढवून किमान २५ तरी व्हाव्यात.”
स्वामीजी म्हणालेत,”अभी गुजरात मे चुनाव का मौसम चल रहा है। चुनाव होने के पंद्रह बीस दिन बाद अपने उस समय के मुख्यमंत्री से ही सिधी बात करेंगे। विमलेश्वर में बडा आश्रम तो हम खुद ही बना देंगे। “
गेल्या दोन दिवसांपासून वमलेश्वर/विमलेश्वरच्या गर्दीमुळे मी फारच चिंतीत होतो. यावर काय तोडगा निघू शकतो? म्हणून मी भरपूर जणांना फोन केले होते. आपण यावर काय करू शकतो? हे चाचपडणे सुरू होते.
अशा वेळी नर्मदेने त्या क्षेत्रातला सुप्रिम बाॅसच माझ्याकडे पाठवून दिला. ११७ वर्षांचा हा तरुण आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान, नाव किशोर, पण स्वतःला प्रौढ समजायला लागलेल्या मला, नर्मदा प्रेरित सामाजिक कार्यासाठी नवचैतन्य भरत होता.
नर्मदा मैय्या के मन में क्या चल रहा है, यह तो बस वहीं जानती है!
☆ @ २५ डिसेंबर @ नाताळ सण… लेखक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा आणि आनंदोल्हासाचा सण असणाऱ्या नाताळाचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे ख्राईस्ट मास. याचा अर्थ, येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहीक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. येशूच्या जन्माची कथा न्यू टेस्टामेट मध्ये दिली आहे.
त्यानुसार, देवाने आपला दूत गॅब्रियलला पृथ्वीवर मेरी नावाच्या एका तरूणीकडे पाठविले. गॅब्रियलने मेरीला सांगितले की, तुझ्या पोटी इश्वराचा पुत्र जन्म घेणार आहे. त्याचे नाव जीझस असेल. तो महान राजा असेल आणि त्याच्या राज्याला कोणतीही सीमा नसेल. मेरी कुमारीका व अविवाहित होती. त्यामुळे आपल्याला पुत्र कसा होईल, असा प्रश्न तिला पडला. तिने गॅब्रियलला तसे विचारलेही. त्यावेळी गॅब्रियल म्हणाला, इश्वरी आत्मा येऊन तिला शक्ती देईल. ज्या योगे तिला मूल होईल. लवकरच मेरीचे जोसेफ नावाच्या युवकाशी लग्न झाले. देवदूताने जोसेफच्या स्वप्नात जाऊन सांगितले, की मेरी गर्भवती असून तिला लवकरच मुलगा होईल. त्यामुळे तिची योग्य काळजी घ्यावी. तिला सोडून देऊ नये. त्यावेळी जोसेफ व मेरी नाजरथ मध्ये रहात होते. नाजरथ आता इस्त्रायलमध्ये आहे. त्या काळी ते रोमन साम्राज्याचा भाग होते आणि ऑगस्टस हा रोमचा सम्राट होता. ऑगस्टस याने एकदा आपल्या राज्याची जनगणना करण्याचे ठरविले. त्यासाठी बेथेलहेमला जाऊन प्रत्येकाला आपले नाव लिहावे लागत असे.
त्यामुळे बेथेलहॅमला मोठी गर्दी झाली होती. सर्व धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाणे भरून गेली होती. गर्भवती मेरीला घेऊन जोसेफही तेथे आला होता. पण खूप हिंडूनही त्यांना कुठे जागा मिळत नव्हती. शेवटी एका घोड्याच्या पागेत त्यांना जागा मिळाली. तेथेच मध्यरात्री भगवान येशूचा जन्म झाला. त्यांना गुंडाळून ठेवण्यात आले होते. तेथे जवळच काही धनगर गायींना चारत होते. त्यावेळी तेथे एक देवदूत आला, त्याने या धनगरांना सांगितले, की जवळच एका बाळाचा जन्म झाला आहे. हे बाळ म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून दस्तुरखुद्द परमेश्वरच आहे. धनगरांनी तेथे जाऊन पाहिले तर खरोखरच त्यांना बाळ दिसले. त्यांनी गुडघे टेकून त्याला नमस्कार केला. हे धनगर खूप गरीब असल्याने त्यांच्याकडे भेट म्हणून द्यायला काहीही नव्हते. म्हणून त्यांनी येशूला भगवान म्हणून स्वीकारले. ख्रिश्चनांसाठी या घटनेचे मोठे मह्त्त्व आहे. कारण त्यांच्या मते येशू हा इश्वरपुत्र होता. म्हणूनच ख्रिसमस हा आनंदोत्सव आहे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ या द्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. जगभरातील चर्च मध्ये या दिवशी यात्रा काढल्या जातात. भक्तीगीतांचे गायन होते. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांचा गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. खरे तर सध्या साजरा केला जातो तशा पदधतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमस मध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. १८७० पर्यंत त्याचा प्रसार सर्वत्र झाला. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर दोन गोष्टीं शिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. बेकरी मध्ये ख्रिसमसची तयारी एक महिन्यापूर्वी सुरू होते. ड्रायफ्रूट्स रम मध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच.
लेखक : संजीव वेलणकर
पुणे
९३२२४०१७३३
संकलन : मिलिंद पंडित
कल्याण
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈