मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “लिफ्ट…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “लिफ्ट…” ☆ श्री मंगेश मधुकर

मस्तपैकी थंडीचे दिवस,सकाळी सातची वेळ,खरंतर डबल पांघरून घेऊन झोपायची अतीतीव्र इच्छा तरीही मोह आवरून फिरायला जाण्यासाठी उठलो.नेहमीच्या रस्त्यावरून जाताना आजही ‘तो’ दिसला.गोल चेहरा,मोठाले डोळे त्यावर काडीचा चष्मा,फ्रेंच कट दाढी,तुळतुळीत टक्कल,अंगात निळा टी शर्ट,ग्रे ट्रॅक पॅन्ट अशा अवतारात चौकात स्कूटरवरून चकरा मारणारा ‘तो’ लक्षात रहायचं कारण म्हणजे त्याचं वेगवेगळ्या लोकांना स्कूटरवरून घेऊन जाणं आणि पुन्हा चौकात येऊन थांबणं.त्याचं वागणं पाहून आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही जागं झालं.नेहमीप्रमाणं ‘तो’ चौकात उभा असताना जवळ जाऊन विचारलं. 

“सर,एक मिनिट!!”  

“येस”

“तुमच्या सोबत चहा घ्यायचाय”

“का?”

“चहाला कारण लागतं नाही.”मी 

“अनोळखी व्यक्तीकडून आमंत्रण असेल तर लागतं”

“ओके”मी नाव सांगितल्यावर त्यानेही नाव सांगितलं.”

“आता ओळख झाली.चला चहा घेऊ,तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.”

“नक्की,पण पाच मिनिटानंतर,इथंच थांबा.आलोच” उत्तराची वाट न पाहता ‘तो’ स्कूटर घेऊन गेला.मी फक्त पाहत राहिलो.रस्त्यावरून घाईत चाललेल्या माणसाजवळ स्कूटर थांबवून ‘तो’ काहीतरी बोलला लगेच पायी चालणारा मागच्या सीटवर बसला अन दोघं निघून गेले.अवघ्या काही मिनिटांनी ‘तो’ परत आला.(संडे डिश™) 

“सॉरी,सॉरी,तुम्हांला थांबाव लागलं”

“नो प्रॉब्लेम.चला हॉटेलमध्ये जाऊ”मी 

“नको.त्यापेक्षा टपरीवरचा चहा भारी असतो”

“एक विचारायचं होतं”

“बिनधास्त”

“अनेक वर्षे सकाळी फिरायला जातो.वेगवेगळी माणसं बघायला मिळाली पण त्यात तुम्ही फार हटके वाटला.”

“काही विचित्र वागलो का”

“आठ दिवस तुम्हांला पाहतोय.सकाळी चौकामध्ये स्कूटर घेऊन उभे असता.लोकांना स्कूटरवरून सोडून आल्यावर परत इथे थांबता याविषयीच बोलायचं होतं.” (संडे डिश™)

“नक्की काय समजून घ्यायचयं”

“मला वाटतं तुम्ही लोकांना स्वतःहून लिफ्ट देता?”

“हो”

“का? कशासाठी?”

“आवड म्हणून”

“वेगळीच खर्चिक आवड आहे.हरकत नसेल तर जरा सविस्तर सांगता”

“ आवड खर्चिक असली तरी परवडतं म्हूणन करतो.आता पर्यंत टिपिकल आयुष्य जगलो.जबाबदाऱ्या आणि टेंशन्स घेऊन नोकरी केली. पन्नाशीनंतर मात्र एकेक व्याप कमी केले.व्हीआरएस घेतल्यावर छोटासा बिझनेस सुरू केला.गरजेपुरतं आणि भविष्यासाठी कमावलंयं.इतके दिवस फक्त स्वतःपुरतं आणि फॅमिलीचा विचार करून जगलो.आता इतरांसाठी काहीतरी करावं असं खूप वाटतं होतं.दिवासतला थोडा वेळ चांगल्या कामासाठी द्यावा असं ठरवलं.माझ्या निर्णयाला घरच्यांनी पाठिंबा दिला.”

“उत्तम विचार.”

“त्यानुसार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना भेट दिली.सर्वांचं काम चांगलं होतं पण माझं मन रमलं नाही.काहीतरी वेगळं काम करायचं होत पण नक्की सुरवात कशी करायची हेच समजत नव्हतं”

“या कामाची सुरवात कशी झाली”

“एकदा मुलीला कॉलेजला जाण्यासाठी निघायला उशीर झाला म्हणून स्कूटरवरून तिला बसस्टॉपला सोडलं.परत येताना एकजण रस्त्याच्या बाजूने पाठीवर सॅग,हातात सुटकेस घेऊन अत्यंत गडबडीत चालत होता.घामाघूम झालेल्या त्याला एकही रिक्षा मिळत नव्हती.जाम वैतागलेला होता.त्याला पाहून मला कसंतरीच वाटलं. (संडे डिश™)

“मग!!”

“त्याच्या जवळ गेलो आणि स्कूटरवर बसायला सांगितल्यावर त्याचा चेहरा भूत पाहिल्यासारखा झाला पण ताबडतोब स्कूटरवर बसला.बस स्टॉपला वेळेत पोचल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला खूप समाधान मिळालं.बसमध्ये शिरताना तो सारखा “थॅंकयू,थॅंकयू” म्हणत होता.त्याच्या आनंद पाहून मला दुप्पट आनंद झाला.”

“नंतर हे लिफ्ट देण्याचं काम सुरू केलं”

“हो,हटके काम करण्याचा मार्ग अचानक सापडला”

“खरंच वेगळं काम आहे”

“तसं पाहिलं तर खूप साधी गोष्ट आहे.खूप महत्वाचं काम असेल किवा परगावी जायचं असेल तर घरातून बाहेर पडायला उशीर होतो खूप धांदल उडते.सर्वांनीच या परिस्थितीचा कधी ना कधी अनुभव घेतलेला आहे.अशावेळी रिक्षा मिळत नाही.ऑनलाइन राईड बुक होत नाही.सोडायला येणारं कोणी नसतं आणि वेळ गाठायची असते नेमकं अशातच जर न मागता मदत मिळाली तर होणारा आनंद हा फार फार मोठा असतो.मला लोकांना आनंदी करण्याचा मार्ग सापडला.म्हणून मी रोज सकाळी स्कूटर घेऊन उभा असतो.” (संडे डिश™) 

“फार भारी कल्पनायं.लिफ्टची गरज आहे अशांना कसे शोधता कारण सकाळी व्यायामासाठी भराभर चालणारे अनेकजण असतात.”

“फार सोप्पयं, टेन्शनग्रस्त चेहऱ्यानं वेळ गाठण्यासाठी लगबगीनं चालणारे पटकन ओळखू येतात.”

“लिफ्ट सेवेला लोकांचा प्रतिसाद मिळतो?”

“खूप छान!!घरातून निघताना उशीर झालेला असताना जर  लिफ्ट मिळाली तर कोणीही आनंदानं तयार होणारच ना”

“ही सेवा सुरू केरून किती दिवस झाले”

“दोन महीने”

“पैसे घेता”

“गरजूंना लिफ्ट देतो त्यामुळे पैशाचा प्रश्नच येत नाही आणि अपेक्षाही नाही.”

“ग्रेट ”

“कोणी घाईघाईत चालताना दिसलं की मी जवळ जाऊन फक्त ‘बसा’ एवढंच म्हणतो.अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे लोक प्रचंड खुष होतात.तणावाखाली असणाऱ्या चेहऱ्यावर छान हसू फुटतं ते माझ्यासाठी लाखमोलाचं आहे”

“रागावणार नसाल तर एक विचारू” (संडे डिश™)

“अवश्य”

“हे सगळं कशासाठी करता”

“छान वाटतं म्हणून…” 

“एक से भले दो.माझ्याकडे सुद्धा स्कूटर आहे.उद्यापासून येतो” म्हटल्यावर ‘तो’ मोठ्यानं हसला आणि अचानक स्कूटर सुरू करत म्हणाला “आलोच”.मागे वळून पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं पाठीवर बॅग, हेडफोन लावलेला तिशीतला आयटी वाला कंपनीची बस गाठण्यासाठी ताडताड चालत होता.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोती साबणाचा जन्म… – माहिती संकलक : आशिष फाटक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मोती साबणाचा जन्म… – माहिती संकलक : आशिष फाटक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासून म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या. अंगणात विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते. साबण म्हणून असे काही असते हे माहिती नव्हते. वास्तविक १८७९च्या काळात उत्तरेत मीरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण तो प्रसिध्द झाला नाही.

अंघोळीची अशी तऱ्हा होती तर कपड्यांच्या साबणाचाही काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, ‘सनलाईट सोप’ नावाचा. त्यावर लिहिलं होतं,  

‘मेड इन इंग्लंड बाय लीव्हर ब्रदर्स ‘. हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही. लीव्हर ब्रदर्स म्हणजे आताची हिन्दुस्थान लीव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन !

या लीव्हर कंपनीने नंतर डालडा आणला – वनस्पती तूप आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेंव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लीव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशीलतेनं नवनवी आव्हानं पेलत होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालू होते. पहिले पंचतारांकित हाॅटेल ताजच्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस मिल होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.

आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता. टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हेही ठाऊक होते. टाटांना आव्हान द्यायचे असेल तर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही याची कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लीव्हरच्या किंमतीत.. १० रुपयांना १०० वड्या ! 

नावही ठरलं.. ‘५०१ बार’ ! या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लीव्हरची. लीव्हर ही कंपनी मूळची नेदरलँडसची. ती झाली ब्रिटिश. टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं. लीव्हरची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची. आणि त्या फ्रेंच साबणाचं नाव होतं ‘५००’. ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले… मग आपल्या साबणाचे नाव ५०१ ! कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होतं, त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी…! 

बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला. त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली ! त्यात त्यांचा तेलाचा खर्चही निघत नव्हता. टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती. टाटा बधले नाहीत, किंमत कमी केली नाही, तीन महिन्यांनी लीव्हरने परत सनलाईटची किंमत पहिल्यासारखी केली. टाटा या स्पर्धेत तरले. या कंपनीने पुढे अंघोळीसाठी ‘हमाम’ … तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो… त्या ‘मोती’ साबणाची निर्मिती केली.. ! 

इतिहास विषय नावडीचा असला तरी देशाभिमान महत्वाचा , म्हणून दिवाळी निमित्त करून ही पोस्ट महत्त्वाची.. !!

माहिती संकलक :श्री  आशिष फाटक 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चांगल्या कर्मातच देव आहे…” – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “चांगल्या कर्मातच देव आहे…” – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

॥ चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो, चांगल्या कर्मातच देव आहे ॥ 

“देव बीव सगळं झूठ आहे. थोतांड आहे. ‘मेडिकल सायन्स’ हाच खरा परमेश्वर आहे. गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्समुळे जेवढे प्राण वाचले असतील, तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत. मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे ‘ऑपरेशन थिएटरच्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.” — डॉक्टर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकच हशा उठला. डॉक्टर कामेरकर एका ‘मेडिकल कॉन्फरन्स’ मध्ये बोलत होते…  डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर. त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत.

कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले. वाटेतच त्यांच्या ‘मिसेस’ चा मेसेज होता की ” मी आज पार्टीला जातेय. मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत. जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय. घरी गेलात की 

जेवा “. डॉक्टर घरी आले. हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर लक्षात आलं, की बरचस जेवण उरलय. आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं. म्हणून उरलं सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधल आणि कुणातरी भुकेलेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले.

लिफ्टमध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं. ” देव बीव सगळं झूठ आहे ” हे वाक्य त्यांच्या भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं. डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक, देव अशी कुठलीही गोष्ट, व्यक्ती, शक्ती जगात नाही ह्यावर ठाम. ‘ जगात एकच सत्य. ‘मेडिकल सायन्स’… बाकी सब झूठ है ‘

डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले. जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं. ते त्या दिशेने चालू लागले. जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मध्यम वयाची बाई, आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे. ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं. ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती. डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई तिच्या मुलाला म्हणाली “बघ बाळा. तुला सांगितलं होतं ना. आज आपल्याला जेवायला  मिळेल. देवावर विश्वास ठेव. हे बघ. देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलय”. हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते त्या बाईवर कडाडले, “ओह शट-अप. देव वगैरे सगळं खोट आहे. हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय. देव नाही. हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो. पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय. काय देव देव लावलयस. नॉन – सेन्स. “

“साहेब. ! हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे. पण साहेब. देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो. माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस, हा देवच आहे. आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधायला जातो एवढंच. माझ्यासाठी तुम्ही ‘देव’ च आहात साहेब. आज माझ्या लेकराच तुम्ही पोट भरलंत. तुमचं सगळं चांगलं होईल. हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला. “

डॉक्टर कामेरकर त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले. एक रोगट भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती आणि ते ह्याच विचारात दंग झाले की ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो. चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे. चांगल्या माणसात देव आहे. प्रत्येक ‘सतकृत्यात’ देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण ‘देवावर विश्वास’ ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ?  तर आपल्याला चांगली माणसं भेटतील, चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो. डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं. आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. एक कणखर, डॉक्टर त्या दोन अश्रूत त्याचा इगो  विरघळला होता. डोळे मिटून, ओघळत्या अश्रूंनी, डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा – ( श्लोक ४१ ते ५० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा – ( श्लोक ४१ ते ५० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । 

बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्‌ ॥ ४१ ॥ 

निश्चयात्मक एकच प्रज्ञा स्थिर कर्मयोग्याची

अस्थिर अनिश्चयी बुद्धी मोही अविचारी त्याची ॥४१॥

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । 

वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥ 

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्‌ । 

क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥ 

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्‌ । 

व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥ 

दुर्लक्षून वेदार्था गहन  कर्म करीत मूर्ख

उपभोगे विषयात मानिती जे सर्वस्वी सुख

स्वर्गप्राप्ती हे ध्येय भोगात कर्मफलात रमले 

स्वर्गप्राप्ती ही केवळ श्रेष्ठ मोहातच गुंगले 

भोग आणि ऐश्वैर्य यातच राहतात गुंतून

बुद्धी स्थिर ना कर्तव्याप्रती चंचल अंतःकरण ॥४२, ४३, ४४॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । 

निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌ ॥ ४५ ॥ 

त्रिगुण विचेचन करती वेद भोग आणि साधन

नकोस राखू त्यांच्या ठायी आसक्ती अर्जुन 

सुखदुःखातीत शाश्वत परमात्म्याला तू जाण

निर्विकारी निरासक्त हो होऊनी स्थितप्रज्ञ ॥४५॥

यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके । 

तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥ 

प्राप्ति होता जलाशयाची कूपा नाही स्थान 

ब्रह्मज्ञाला तसेच नसते वेदशास्त्र प्रयोजन ॥४६॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । 

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥ 

फलप्राप्ती ना अधिकार तुझा आचरणे निज कर्म

फलाठायी तुज नको वासना त्यागी ना तव कर्म  ॥४७॥

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । 

सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८ ॥ 

स्थित होउनिया योगमध्ये पार्था त्यागि वासना

सिद्धी असिद्धी समान बुद्धी जाणुन स्थितप्रज्ञा

समत्वासि रे योग जाणुनी होई कर्मबद्ध  

जाणुनी निज कर्तव्या पार्था होई कर्मसिद्ध ॥४८॥

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय । 

बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥ 

समत्व बुद्धीयोग श्रेष्ठ नीच कर्म सकाम

जाणी फलहेतूसि कनिष्ठ कर्म करी निष्काम ॥४९॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । 

तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ ५० ॥ 

सत्कर्म दुष्कर्म त्यागितो सांप्रत जन्मी प्रज्ञावान

समत्वरूप योग कुशल ध्वंसाया कर्माचे बंधन ॥५०॥

– क्रमशः भाग दूसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असाही एक तुरुंग अधिकारी…” – लेखक : संपत गायकवाड ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “असाही एक तुरुंग अधिकारी…” – लेखक : संपत गायकवाड ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

असाही एक तुरुंग अधिकारी—  

मानवतेचा पुजारी असणारा, रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृहाचा तुरूंग अधिकारी अमेय मिलिंद पोतदार…  

अमेयची बदली झाली तर आम्हीही त्यांच्यासोबत त्यांच्याच जेलमध्ये जाणार अशी मागणी कैदी करतात. असा हा महाराष्ट्रातील सर्वात Youngest जेलर.

लहानपणी दहावीत असताना आजीला मुंबईला  जाण्यासाठी रात्री सोडण्यास गेला असता कोंडाळ्यात वयोवृद्ध स्त्री अन्न शोधून खात होती हे विदारक दृष्य पाहून अस्वस्थ होतो. आईकडून पैसे घेतो व धावत पळत बिस्किटचे पुडे आणून त्या स्त्रीला देतो. ती ते पुडे अघाशासारखे खात असताना त्याला आजीने दिलेला मसाले भाताचा डबाही तो त्या वृद्ध स्त्रिला खायला देतो. लहान वयातील हा माणुसकीचा गहिवर तुरूंगाधिकारी झाल्यावरही ज्याच्याकडे कायम राहिला तो म्हणजे  अमेय होय.

विनोबा भावे, सानेगुरूजी, बाबा आमटे आणि मदर तेरेसा यांच्याकडे समाजाप्रती असणारी करुणा अमेयकडे बालपणापासून चरित्र वाचनातून व शिक्षिका असणाऱ्या आईकडून अंगी बाणली. कोल्हापुरात जि.प.व म.न.पा.शाळेत मराठी माध्यमात शिकलेला अमेय MPSC मधून तुरूंग अधिकारी म्हणून रत्नागिरी येथे रूजू झाला.

जन्मजात कोणी गुन्हेगार नसतो. सर्वांत मोठा अधिकार सेवेने व प्रेमाने प्राप्त होतो याची जाणीव अमेयला होती. गुन्हेगारामध्येसुद्धा माया, ममता, आपुलकी,आत्मियता, आपलेपणा असतो यावर विश्वास असणारा अमेय…. रत्नागिरी कारागृहात खतरनाक बंदीजनांसोबत राहून त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूसपण जपले की कैदी मनाने मोकळे होतात. जमिनीवर पाय ठेवून काम केले की लोकांना आपलेपणा वाटतो. हे लक्षात घेऊन काम केल्याने बंदीजनांना अमेय आपला सखा, मित्र,  सोबती वाटू लागला आहे. मन समजून घेता आले तर मनास जिंकता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेय. आकाशसारखे अनेक खतरनाक कैदी अमेयच्या इतके प्रेमात पडले आहेत की तुमच्या बदलीनंतर आम्ही काय वाटेल ते करून तुमच्याच जेलमध्ये येऊन उर्वरीत शिक्षा पूर्ण करणार असा आग्रह धरतात. याला काय म्हणावे? यापूर्वी हे शिक्षकांच्या वाट्याला यायचे पण तुरूंगाधिकारी यांच्यासाठी असे होते तेव्हा देशाचे भविष्य उज्ज्वल आहे असे दिसते. (पूर्वी ‘ दो आँखे बारह हाथ ’ या सिनेमासारखा जेलर व कैदी असतील तर किती बरे होईल असे वाटायचे. आता ते सत्यात येत आहे. महामहीम किरण बेदी यांनी तिहार जेल बदलवला होता.  अमेय तसाच प्रयत्न करत आहे.)

आपल्या वाट्याला आलेले काम समाजासाठी, राष्ट्रासाठी उपयुक्त  करून आवडीने, प्रामाणिकपणे व मनोभावे करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती हे अमेयला ठाऊक आहे. तारूण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचनाकाळ असतो. म्हणून अमेयने नवनवीन चॅलेंज स्वीकारली. अमेयला त्याचे दैवत असणाऱ्या वीर सावरकर यांचे वास्तव्य असणारी कोठडी व त्यांच्या वापरातील साहित्य व अभिलेख केवळ ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करून ठेवल्याचे दिसून आले . अमेयने उपलब्ध साधनसामुग्रीतून नूतनीकरण करून ही वास्तू ‘स्मृतिभवन‘ म्हणून विकसित केली. वीर सावरकर  यांचा जीवनपट सदर कक्षात पोस्टरच्या स्वरूपात, तसेच छानशा लघुपटाद्वारे भेटीस येणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला. ऐतिहासिक वारसा अभिनव पद्धतीने जतन करण्यासाठी वरिष्ठांनी अमेयच्या अथक प्रयत्नांचे खूप कौतुक केले. केवळ वास्तू न  बघता अमेय जेव्हा प्रचंड वाचन, अमोघ वक्तृत्व , ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास या जोरावर पर्यटकांना वा महनीय व्यक्तींना वीर सावरकरांचा इतिहास सांगतो, तेव्हा लोक भारावून जातात. त्यांच्या अश्रूंचा अभिषेक कोठडीस होतो.

अमेयकडे समाजभान  असल्यामुळे त्याने स्वत:च्या लग्नातील २५ किलो अक्षता पक्षीमित्रांसाठी दिल्या . लग्नात अंगावर टाकून त्या वाया घालविल्या नाहीत.  रत्नागिरी कारागृहाकडे १५ एकरपैकी १२ एकर पडून असणाऱ्या  जागेवर विविध फळझाडे (आंबा व नारळाची खूपच झाडे) लावली आहेत. बागायत शेती विकसित केली आहे. बंदीजनांना विश्वासात घेतले तर नरकाचे नंदनवन होते हे सिद्ध केले आहे. राज्यात काही कारागृहात घेतलेला मधमाशी पालन  प्रकल्प रत्नागिरी येथे सुरू केला आहेे. मधाचे ” मका” नावाने ब्रॅडिंग होणार आहे. मधमाशी पालन प्रकल्पामुळे मधाबरोबर परागीकरणाचा फायदा शेती उत्पादन वाढीसाठी होईल हा अमेयला विश्वास आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या वतीने त्याने ‘ पक्षी वाचवा मोहिम ‘  कारागृहात सुरू केली. पक्ष्यांसाठी कारागृह परिसरात घरटी व पाण्याची भांडी ठेवण्यात आली. स्वत:च्या लग्नातील अक्षता व दुकानात  पडलेले धान्य यांचा वापर केला. आज विविध पक्षांचे आनंदाचे व सुरक्षित आश्रयस्थान म्हणजे कारागृहाची शेती झाली आहे. जागतिक दृष्टी दिनानिमित्य अंध मुलांना सन्मानाने बोलावून त्यांच्या हस्ते कारागृह परिसरात  वृक्षरोपण केले. मुलांसाठी हा अनोखा कार्यक्रम ही पर्वणीच होती.                       

बंदीजनांच्या कुटुंबांची सार्वत्रिक गळाभेट घडवून आणणे , एकत्रित भोजन करणे, एकमेकांना डोळ्यांत साठविणे आणि मुलांना ‘ खूप शिका, आईचे ऐका, खूप मोठे व्हा.आईची काळजी घ्या. माझी काळजी करू नका ‘ हे संवाद ऐकताना कारागृहात अश्रूंचे सिंचन होते हा अनोखा..  भावनेने ओथंबलेला, कारागृह गहिवरून टाकणारा अनुभव अमेयने घेतला.                     .        

 २००५ पासूनच्या बंदीजनांची माहिती PRISMS या प्रणालीमध्ये विहीत कालावधीत उत्कृष्टरित्या पूर्ण करण्याचे कठीण काम अमेयने करून दाखवून वरिष्ठांची वाहवा मिळविली . संगणकीकृत प्रणालीमध्ये, असणाऱ्या २४ मोड्यूलपैकी २१ मोड्यूल चालू करण्यात खूप मोठे योगदान अमेयचे होते.                        .      

बाबा आमटे नेहमी म्हणत, ” मी माणसांना माणसात आणण्याचे काम करतो “. अमेय हेच काम पुढे चालवत आहे. विनाशकारी शक्तीचे रूपांतर कल्याणकारी शक्तीत करण्याचे काम संस्काराद्वारे,आचरणाद्वारे अमेय करतो आहे.  बंदीजन जेव्हा शिक्षा संपून जातात तेव्हा अमेयची भेट सासरी जाणाऱ्या मुलींसारखी असते. आपला तुरूंगाधिकारी आपण जाताना गहिवरतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात…  हे पाहिल्यावर बंदीजन बाहेर माणुसकीने, चांगुलपणाने वागण्याची हमी देऊन जातात, तेव्हा या बापाचा जीव भांड्यात पडतो. कसलं नातं??? 

आई- बाप हेच त्याचे दैवत. तुरूंगाधिकारी झाल्यावरही ‘हॉटेलमधील प्लेटमध्ये राहिलेली भाताची शिते पुसून घे’ म्हणणारा बाप अमेयला भेटला. ‘मोठ्या माणसांच्या पायाला युनिफॉर्मवरही असताना हात लाव’ असे शिकविणारी आई. ‘भ्रष्टाचाराच्या वाऱ्यालासुद्धा उभा राहू नकोस. हरामाचा पैसा विषासारखा असतो.’ हे तत्वज्ञान रुजविणारे आई- बाप असतील तर अमेयसारखा मुलगा घडू शकतो. चांगुलपणावर विश्वास ठेवून चाकोरीबाहेर जाऊन काम करणारे अमेयसारखे अधिकारी प्रत्येक क्षेत्रात थोडे का असेना आहेत. म्हणून तर देशाचा भविष्यकाळ उज्वल आहे.                      .         

“अमेय, तू हाताखालील कॉन्स्टेबल, हवालदार, लिपीक व परिचर यांच्यावरही जीव लावला आहेस. माझ्यासारखा केवळ वयाने खूप मोठा माणूस असूनही तुला वंदन करून सलाम करतो.    

…  बाळ, खूप खूप शुभेच्छा व अनेक शुभाशिर्वाद.” 

लेखक : श्री संपत गायकवाड.

माजी सहाय्यक शिक्षण संचालक

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ – लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ – लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

हळदीघाटमध्ये १८ जून १५७६ साली मेवारचे राजे महाराणा प्रतापसिंग प्रथम व दिल्लीचे सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये जी लढाई झाली होती, ती लढाई हळदीघाटची लढाई या नावाने प्रसिध्द आहे. या घाटाचा भौगोलिक गुणधर्म म्हणजे त्याठिकाणी असलेली नरम पिवळी माती. या पिवळया मातीमुळेच या भागाला हळदीघाट असे नामाभिधान झाले आहे. जशी सोळाव्या शतकात हळदीघाटची लढाई दोन तुल्यबळ राजांनी आपसात केली होती, तशीच हळदीच्या पेटंटसाठी लढाई विसाव्या शतकात झाली होती. आणि ही लढाई आपल्या भारत देशातील एका शास्त्रज्ञाने अमेरिकेतील US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस विरुध्द केली होती.

डॉक्टर रघुनाथराव अनंत माशेलकर (आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ)

त्याचे असे झाले. भारतीय वंशाचे दोन अमेरिकन संशोधक, मिसिसिपी युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटरचे सुमन के. दास आणि हरी हर पी. कोहली या दोघांनी हळदीचे बरे करण्याचे गुणधर्म शोधून काढल्याचा दावा US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसकडे केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना मार्च १९९५ मध्ये तुम्हाला आणि आमच्या आयुर्वेदाला शतकानुशतके माहीत असलेल्या गोष्टीसाठी पेटंट देण्यात आले. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे आपल्या जगप्रसिद्ध भारतीय डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. नुसते बेचैन न होता आता त्यांची चांगलीच सटकली. आपल्या भारतीयांकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर माशेलकर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा रितसर अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या पेटंट नसलेल्या पारंपरिक ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्रा विरुध्द हळदी साठी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या शस्त्रासह एकाकी लढाई देणारे आपले डॉक्टर माशेलकर यांचे सपुर्ण नाव डॉक्टर रघुनाथराव अनंत माशेलकर. जन्म १ जानेवारी १९४३. मुळचे गोव्यातील माशेल येथील. माशेल सारख्या टुमदार गावात निसर्गरम्य खेडेगावात त्यांचे बालपण गेले. परंतु त्यांच्या वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले.आईने मोठ्या धीराने त्यांचे संगोपन व आणि पालनपोषण केले. त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी त्यांच्या त्या माऊलीने माशेल सारख्या लहान खेडेगावातून सरळ मुबंईसारख्या मोठ्या शहरात येण्याचा निर्णय घेतला. आईने घेतलेला हा निर्णय रघुनाथरावांनी सार्थ ठरविला. मुबंईत ती दोघं खेतवाडीत डाँक्टर देशमुख गल्लीसमोरच्या चाळी मध्ये राहु लागली. त्यावेळेस त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. सातवी इयत्ते पर्यंत त्यांचे शिक्षण मुबंईत पालिकेतील शाळेतच झाले. या शाळेतल्या शिक्षकांनी सुरुवातीस भरपुर सहकार्य केल्याने माशेलकरांचे आयुष्य घडले गेले.

७ वी इयत्ता यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, आता मुंबईच्या युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेणार होते. मात्र, डाँक्टर माशेलकर यांच्या आईला प्रवेशासाठी २१ रुपयांची व्यवस्था करणे कठीण झाले होते. पण आईच्या ओळखीत असलेल्या एका मोलकरणी कडून कर्ज घेऊन अडथळे दूर केले गेले, त्या मोलकरणीने आपली संपूर्ण बचत उधार दिली जेणेकरून रघुनाथ शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होऊ शकेल! युनियन हायस्कूलमध्ये, तरुण रघुनाथचे शिक्षक श्री. भावे यांनी त्यांची प्रतिभा केव्हाच ओळखली होती. आणि सूर्याची किरणे एकाग्र करू शकणार्‍या बहिर्गोल भिंगाचे उदाहरण वापरून त्यांना जीवनात लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केले. याच उल्लेखनीय उदाहरणाने रघुनाथला शास्त्रज्ञ बनण्याची प्रेरणा दिली. त्या काळात घरात वीज नसल्यामुळेच रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात अभ्यास करूनही त्यांनी बोर्डाच्या म्हणजेच शालान्त परीक्षेत उत्तीर्ण होताना महाराष्ट्रात ११ वा क्रमांक मिळवला!

तरुण रघुनाथच्या मनात जिज्ञासा इतकी अतृप्त होती की तो अनेकदा गिरगावच्या मॅजेस्टिक बुकस्टॉलबाहेर बसून नवीन पुस्तके वाचत असे आणि पटकन परत करत असे कारण त्याच्याकडे विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. डाँक्टर माशेलकर यांनी पुण्यातील पिंपरी येथील केलेल्या भाषणात म्हणाले.

‘‘बालवयापासूनच मला वाचनाची गोडी लागली. शालेय जीवनातही मी प्रचंड वाचन केले. त्याचा मला पुढील आयुष्यात मोठा फायदा झाला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी वाचत राहीन. तुलनेने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. मात्र, सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी आयुष्याच्या शेवटापर्यंत साधना केली पाहिजे,’’

बोर्डाच्या परीक्षेनंतर त्यांनी आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षण सोडण्याचा विचार केला पण माशेलकर यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून त्यांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्या साठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही याचे कारण त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला – आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले.

तथापि, त्यांच्या आईचे प्रोत्साहन आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या आर्थिक पाठिंब्यामुळे त्यांना मुबंईतील प्रतिष्ठित जय हिंद महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास मदत झाली. नेहमीप्रमाणे, त्याने कठोर परिश्रम केले आणि आंतरराज्य परीक्षेत २ रे आले. म्हणूनच नंतर , २००३ साली जय हिंद कॉलेजने त्यांना सर्वात प्रतिष्ठित माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित केले.

भारतातील रासायनिक उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यामुळे प्रेरित होऊन, त्यांनी केमिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करण्यासाठी मुंबईतील पूर्वीची UDCT व आताची रासायनिक तंत्रज्ञान संस्था ( ICT Institute of Chemical Technology) या संस्थेत प्रवेश घेतला. पदवी प्राप्त केल्यानंतर, त्याच्याकडे शिष्यवृत्तीसह पुढील पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी परदेशात जाण्याचा पर्याय होता. त्याऐवजी, त्यांनी रासायनिक अभिक्रियांमध्ये ( Chemical engineering) मास ट्रान्सफरच्या क्षेत्रामध्ये प्रो. एम.एम. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर म्हणून UDCT मध्ये त्यांचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रो. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली आणि अवघ्या तीन वर्षांत त्यांचा प्रबंध पूर्ण केला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले.

डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळाली. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. जेव्हा रघुनाथ माशेलकर हे सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले होते त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले.

२३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, ते १९९८ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलोशिप २००५ मध्ये नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स (यूएसए) चे फॉरेन असोसिएट, २००३ मध्ये यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फॉरेन फेलोशीप, रॉयल अकादमीचे फेलोशीप म्हणून निवडले गेले. १९९६ मध्ये ईजिंनिअरींग आणि २००० मध्ये वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्स (यूएसए) चे फेलोशीप. १९९८ मध्ये जेआरडी टाटा कॉर्पोरेट लीडरशिप अवॉर्ड जिंकणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते आणि २००५ मध्ये बिझनेस वीक (यूएसए) स्टार ऑफ एशिया अवॉर्ड जिंकणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ होते, त्यांना हा पुरस्कार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश Snr यांच्याकडून मिळाला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांच्या सदस्यत्वाद्वारे त्यांचे ज्ञान आणि कौशल्य देखील मोठ्या प्रमाणात सामायिक केले गेले आहे.

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्या आयझॅक न्यूटनने ज्या पुस्तकात सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत याचा आपणास नेहमीच गौरव वाटत राहील.

लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाळीव प्राण्यांना मिळते साप्ताहिक सुट्टी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

पाळीव प्राण्यांना मिळते साप्ताहिक सुट्टी ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आजही अशी अनेक क्षेत्रं आहेत, जिथे कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळत नाही. घरातले मदतनीस, सहाय्यक यांनाही आठवड्यातून एक दिवस सुट्टीची आवश्यकता असते, हे मान्य करणारे तर खूपच कमी आहेत.

या पार्श्वभूमीवर भारतातल्या झारखंड राज्यातल्या लाहेतर या गावातला एक प्रघात स्तुत्य आणि विचारप्रवृत्त करणारा आहे. हे गाव म्हणजे खरं तर छोटं खेडं. या गावात बहुतांश शेतकरी. त्यामुळे शेती आणि पाळीव प्राणी, हेच नागरिकांचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत समजले जातात. म्हणूनच या स्त्रोतांवर आपण मदतीसाठी अवलंबून आहोत, त्यांचा विचार माणुसकीच्या दृष्टिकोणातून करणं गरजेचं आहे, असे संस्कार गावकर्‍यांवर पिढीजात झालेले आहेत.

शंभर वर्षापूर्वी या गावात एका बैलाचा अति कष्टाने थकून मृत्यू झाला. त्याची बोच पिढ्यान् पिढ्या टिकून आहे. म्हणूनच प्राण्यांना विश्रांती मिळावी, त्यांचं आरोग्य उत्तम  राहावं, यासाठी आठवड्यातून एक दिवस पाळीव प्राण्यांना संपूर्ण आराम करू द्यायचा, असा नियम गावकर्‍यांनी केला. तेव्हापासून आजपर्यंत या नियमाचं पालन केलं जातय.

आठवडाभर काम केल्यानंतर एक दिवस सुट्टी मिळाली, तर माणूस जसा ताजातवाना होऊन नव्या ऊर्जेने कामाला लागतो, तसंच प्राण्यांच्या बाबतीतही घडत असल्याचं गावकरी सांगतात. या गावाच्या आजूबाजूच्या लोकांनाही ही संकल्पना आवडली आणि त्यांनी ती उचलून धरली. त्यामुळे या जिल्ह्यातील अनेक गावांमधल्या पाळीव प्राण्यांना आठवड्यातून एकदा हक्काची सुट्टी मिळते. कृषिप्रधान असणार्‍या आणि भूतदयेचा अंगीकार करणार्‍या आपल्या देशात, पुढील काळात आशा गावांची संख्या वाढणं आवश्यक आहे.

माहेर – सप्टेंबर २०२३ वरून (www.menakabooks.com)

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “क्रौंचवध” – लेखिका – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “क्रौंचवध” – लेखिका – लेखिका : सुश्री  शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

काल देगलूरकर सरांच्या घरी एक अप्रतिम पेंटिंग पाहीले, त्यांना प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत ह्यांच्याकडून भेट म्हणून मिळालेले. कालपासून हे पेंटिंग डोक्यातून जात नाहीये. ज्या घटनेतून संस्कृतमधल्या पहिल्या छंदोबद्ध कवितेचा आणि पर्यायाने रामायणासारख्या महाकाव्याचा जन्म झाला, त्या क्रौंचवधाच्या घटनेचे हे चित्र, वासुदेव कामतांसारख्या सिद्धहस्त चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेले.

मूळ कथा अशी आहे की गंगेची उपनदी असलेल्या तमसा नदीच्या तीरावर ऋषी वाल्मिकींचा आश्रम होता. एकदा भल्या पहाटे नित्याची आन्हिके उरकायला ऋषी वाल्मिकी भारद्वाज ह्या आपल्या शिष्यासह तमसातीरी आलेले असताना त्यांना प्रियाराधनात गुंग असलेली क्रौंच म्हणजे सारस पक्ष्यांची जोडी दिसली. हे पक्षी आयुष्यात एकदाच जोडीदार निवडतात आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहतात. त्यांचे प्रियाराधनाचे नृत्यही बघण्यासारखे असते. कितीतरी वेळ नर आणि मादी क्रौंच पक्षी स्वतःभोवती आणि एकमेकांभोवती गिरकी घेत नृत्य करत असतात. असेच नृत्य पहाटेच्या त्या धूसर, निळसर प्रकाशात ऋषी वाल्मिकींनी पाहिले असावे आणि त्या डौलदार, देखण्या नृत्याने ते क्षणभर हरवून गेले असावेत.

पण त्याच क्षणी कुणा व्याधाचा बाण वेगाने आला आणि एका क्रौंच पक्ष्याचा वेध घेऊन गेला. आपल्या जोडीदाराला पाय वर करून तडफडताना बघून मादी क्रौंच पक्षी करूण विलाप करू लागली. ते बघून ऋषी वाल्मिकींचे कवी हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून अवचित शब्द उमटले,

‘मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शास्वती समा।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी: काममोहितम्।।’

म्हणजे, “हे निषाद, तुला कधीच प्रतिष्ठा लाभणार नाही, कारण तू ह्या काममोहित अश्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीची अकारण ताटातूट केली आहेस. ” 

अतीव करुणेतून जन्मलेले हे संस्कृतमधले पहिले काव्य. स्वतःच्याच तोंडून निघालेला तो श्लोक ऐकून ऋषी वाल्मिकी भारद्वाजांना म्हणाले,

‘पादबद्धोक्षरसम: तन्त्रीलयसमन्वित:।

शोकार्तस्य प्रवृत्ते मे श्लोको भवतु नान्यथा।।’

म्हणजे शोकातून जन्मलेला हा श्लोक आहे, ज्याचे चार चरण आहेत, प्रत्येकात समान अक्षरे आहेत आणि एक नैसर्गिक छंदोबद्ध लय आहे.

करुणेतून जन्मलेले हे काव्य ऐकूनच साक्षात ब्रह्मदेवांनी वाल्मिकी मुनींना आदिकवी अशी पदवी दिली आणि त्यांना सांगितले की त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची कथा छंदोबद्ध काव्यातून जगाला सांगावी, जी जोपर्यंत या पृथ्वीतलावर नद्या वाहतील आणि पर्वत उभे असतील तोवर लोकांच्या मनातून नष्ट होणार नाही! 

यावत् स्थास्यन्ति गिरय: लरितश्च महीतले।

तावद्रामायणकथा सोकेषु प्रचरिष्यति॥’

ह्या सुंदर आणि करुण कथेच्या त्या निर्णायक क्षणाचे हे चित्र आहे. पहाटेचा निळसर, धूसर, अस्फुट प्रकाश पसरलेला आहे, पण आभाळ अजून काळवंडलेलेच आहे. तमसेचा प्रवाहही निळसर, तलम, स्वप्नवत आहे. बाण वर्मी लागलेला क्रौंच पक्षी पाय वर करून पाण्यात पडलेला आहे, त्याच्या छातीवर रक्ताचा लालभडक डाग आहे, शेजारी मादी पक्षी चोच उघडून आक्रोश करते आहे. बाण लागल्यामुळे तडफडणाऱ्या पक्ष्याची पिसे वाऱ्यावर उडून गिरकी घेत खाली येत आहेत आणि ह्या विलक्षण करुण पार्श्वभूमीवर शुभ्र वस्त्रधारी तपस्वी ऋषी वाल्मिकी अर्घ्य देता देता थबकले आहेत. त्यांचा चेहरा वेदनेने विदीर्ण झालेला आहे. त्या वेदनेमागे सात्विक संतापही आहे आणि त्या भावनेतून जन्मलेला जगातला पहिला काव्यमय शोक श्लोकरूपात उमटत आहे असे हे चित्र! 

ऋषी वाल्मीकींच्या चेहऱ्यावरची रेषा न रेषा बोलतेय. त्यांचे दुःख त्या पहाटेच्या निळसर आभाळाइतकेच विशाल आणि सर्वसमावेशक आहे. चित्रकार वासुदेव कामत हे त्यांच्या पोर्ट्रेट्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पोर्ट्रेट किंवा व्यक्तिचित्र काढताना केवळ ’हुबेहूब व्यक्तीसारखेच चित्र काढणे’ हा इतकाच निकष कधीच नसतो.

व्यक्तिचित्र काढताना ते तांत्रिकदृष्ट्या निर्दोष तर असावेच लागते, पण ज्या व्यक्तीचे चित्र ज्या क्षणी काढले गेले, त्या क्षणाची भावस्थिती अचूक टिपणे हे सोपे नसते आणि त्याहीपेक्षा महत्वाचा असतो तो त्या चित्राचा पाहणाऱ्या रसिकाच्या हृदयाला थेट भिडणारा अनुभवही, जो चित्र चांगले की अत्युत्तम हे ठरवतो. क्रौंचवधाच्या ह्या चित्रात हे तिन्ही घटक सुरेख जुळून आलेले आहेत. हे चित्र आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतो आणि चित्र पाहणा-या माणसाचे मनही ह्या चित्रातल्या अपार करुणेने ओलावल्याशिवाय राहवत नाही.

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत…” ☆ श्री सतीश खाडे ☆

श्री सतीश खाडे

 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत…” ☆ श्री सतीश खाडे

अमेरिकेतील येलो स्टोन नॅशनल पार्कमधली ही नदी गेल्या शंभर वर्षांत हळूहळू आटत गेली आणि आता ती फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडी पडू लागली. भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती. शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत होती.

बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याची कारणे आणि तिला पुन्हा वाहते करण्यासाठीच्या उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या. त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसांशी असल्याचे लक्षात आले.

येलो स्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्‍चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यात विस्तारलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे अमेरिकाच नव्हे, तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मानले जाते. तेथील वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते. गेल्या शतकाअखेर म्हणजे सन १९०० पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते.

लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क नदी आटली होती. पण तुम्ही म्हणाल ‘हे कसं शक्य आहे?’ तर हे रहस्य पुढे उलगडत जाईल…. 

…अन् नदी जीवंत झाली. 

ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार १९९५ मध्ये येलो स्टोन पार्कच्या जंगलात फक्त १४ लांडगे आणून सोडण्यात आले. आणि पुढच्या पंचवीस वर्षांत परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलत गेली. २०१९ मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले. तिथे एक समृद्ध जैवविविधतेचा मोठा खजिनाच तयार झाला.

…. तर त्याचं झालं असं, की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली. अनेक वर्षे जंगलात हरणांचेच राज्य होते. हरणांना कुणीही भक्षक नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची संख्या बेसुमार वाढत होती. याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे, गवत फस्त करण्याचेच काम केले होते.

गवताबरोबरच जंगली झाडे, त्यांना आलेली कोवळी पाने खाण्याचा सपाटाच लावला होता. थोडे थोडे करून पाणलोटातील सगळं जंगल त्यांनी बोडखं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं कारण होतं. कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण जवळपास शून्यच झाले होते.

पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हरणांची संख्या फार कमी झाली नाही. परंतु या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या काही मर्यादित भागात राहू लागली. हळूहळू लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची पैदासही कमी होऊ लागली.

जंगलातील ठराविक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत्र भागातील गवत आणि झाडं खाणं थांबलं. त्यामुळे हरणे राहत असलेला जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थित सुरू झाली. अगदी सहा-सात वर्षांतच जंगल उत्तम फोफावलं. जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. मातीची धूपही थांबली. धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचे प्रमाण कमी झाले.

मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचे खडक पाण्याने भरू लागले. पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले. हळूहळू चार महिन्यांवरून सहा महिने नदी वाहू लागली. पुढे हळूहळू सहा महिन्यांवरून आठ महिने आणि नंतर बारमाही वाहू लागली. नदी खळखळू लागली… आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळे काठांची झीज अन् पडझडही थांबली.

अन्नसाखळीचे महत्त्व…

आता जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले. त्यांना खाण्यासाठी बेडूक, सरडे आले. त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले. सरडे अन् सापांमुळे शिकारी पक्षीदेखील येण्यास सुरुवात झाली. अगदी सुवर्ण गरुडही तेथे आला. जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित पक्षीदेखील येऊ लागले. हजारो पक्षी इथे एकेका ऋतूत येऊन राहू लागले.

या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्याची झाडं उगवली. या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली. नदीत शेवाळ आले, कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले, त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या. हळूहळू मासे आले. मासे आल्यामुळे मुंगसासारखा बिवरेज वा पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले.

हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं, फांद्या टाकून बांध करू लागली. त्यांनी केलेल्या या सापळ्यांमध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली. अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच गेली. त्यामुळे बदकं आली, हेरॉन, बगळ्यांसारखे पक्षी आले. जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वलेदेखील आली. बेरीची फळे आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य.

तिथे असलेल्या क्वायटीज या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं. त्यामुळे या रानकुत्र्यांचे भक्ष्य असलेले ससे आणि चिचुंदऱ्या यांची संख्या वाढत गेली. त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड, बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले. तसेच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावर ताव मारायला गिधाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी आले. हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे प्राणी.

याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती अन् प्राणी सृष्टी पुनर्प्रस्थापित झाली. झाडं, गवतं, नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्नसाखळी तयार झाली. ती केवळ चौदा लांडग्यांमुळेच. हीच तर खरी गंमत आहे. म्हणजेच अन्न साखळीतील एक दुवा तुटल्यावर अगदी नदीसुद्धा आटू शकते. हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल.

ही गंमत जैवविविधता, निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे. नदीमुळे ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळे नदी, याचं उत्तर कोंबडी आधी की अंडे याच्या उत्तरासारखंच आहे, नाही का? निसर्गातल्या सगळ्यांच अन्नसाखळ्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत. माणसाच्या बेफाम अन् बेफिकीर वागण्याने पाणी प्रदूषणासोबतच विविध जल स्रोतांतील पाणी आटले आहे.

यामुळे आपण अन्नसाखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केलेत, किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे (Food chain pyramid) नष्ट केलेत याची यादी मोठी आहे. यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाश ही ओढवून घेतला जात आहे. त्यातून वाचायचे असेल तर जैवविविधता, अन्नसाखळ्या यांचे आकलन आवश्यकच आहे.

© श्री सतीश खाडे.

मो. 9823030218

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #190 ☆ संतोष के दोहे – धर्म… ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है संतोष के दोहे – धर्म आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 190 ☆

☆ संतोष के दोहे – धर्म ☆ श्री संतोष नेमा ☆

मानवता सबसे बड़ा, इस दुनिया का धर्म

साँच दया मत छोड़िये, करें नेक हम कर्म

दीन-दया करिये सदा, कहते दीन दयाल

परहित से बढ़कर नहीं, दूजा कोई ख्याल

आज धर्म के नाम पर, हिंसा करते लोग

समझ सके ना  मूल को, लगा अजब सा रोग

एक चाँद सूरज बने, यही धर्म का सार

सब की गणना चाँद से, एक ईश  करतार

घृणा करें मत किसी से, रखें प्रेम व्यबहार

यही सिखाता धर्म भी, करिये पर उपकार

प्रथम पूज माँ -बाप हैं, जो हैं ईश समान

उनकी सेवा कीजिये, होंगे तभी सुजान

जिनके जीवन में रहें, काम, क्रोध, मद, लोभ

उनको कब संतोष हो, बढ़ा रहे बस क्षोभ

धर्म, पंथ, मजहब सभी, सबका प्रेमाधार

धर्म सनातन कर रहा, सबका ही उद्धार

सत्य, अहिंसा, दान, तप, श्रद्धा, लज्जा, यज्ञ

इंद्रियसंयम, ध्यान, क्षमा, लक्षण कहते प्रज्ञ

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print