मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रुक जाना नही… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ रुक जाना नही… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(लेखक भावे भाटिया यांच्या पुस्तकावरून)

“आई, मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. सगळेजण मला ‘आंधळा, आंधळा’ असं चिडवतात”.

आईने कुशीत घेऊन भावेशला समजाविले की,’तू जग पाहू शकतोस की नाही याने काहीही फरक पडत नाही. मात्र तू असे काम करून दाखव की सारे जग तुझ्याकडे पाहू लागेल’

आईचा उपदेश हृदयावर कोरून छोट्याशा भावेशने जीवनात निश्चयपूर्वक वाटचाल चालू केली.

भावेश भाटिया यांना’रेटिना मस्क्युलर डिजनरेशन’या आजारामुळे  बालपणीच दृष्टी गमवावी लागली.  जिद्द, निश्चय व मेहनतीच्या बळावर त्यांनी स्वतः बनविलेल्या विविध आकाराच्या, आकर्षक, सुगंधी, रंगीत मेणबत्यांची विक्री महाबळेश्वर इथे एका हातगाडीवर सुरू केली . आज त्यांची ‘सनराइज कॅन्डल्स’ही कंपनी देश-विदेशात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करीत आहे.

सुरवातीला भावेश यांचे वडील गोंदिया इथल्या सिमेंट वर्क्समध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते.  गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलमध्ये भावेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. आई वडिलांनी त्यांना सर्वसामान्य मुलाप्रमाणे वागविले. शाळेत फळ्यावरील काही दिसत नसल्याने आई त्यांना सर्व अभ्यास तसेच त्यांची आवडती कॉमिक्सची पुस्तके वाचून दाखवीत असे. कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे अशी दैनंदिन कामे शिकवून  आईने त्यांना स्वयंपूर्ण केले. वडील त्यांना सिनेमाला नेत. सायकलवरून सर्व ठिकाणी फिरवून तिथली माहिती सांगत. वडिलांना शास्त्रीय संगीताची व गझल ऐकण्याची आवड होती.  गझलमधील अनेक शब्द त्यांच्या विशेष भावार्थासह ते भावेशला समजावून सांगत. तीच आवड भावेश यांच्यामध्येही उतरली.  भावेश यांनी घरातच त्यांनी जमविलेल्या कॉमिक्सची लायब्ररी सुरू केली. त्यामुळे अनेक मुलांबरोबर त्यांची छान मैत्री झाली. सिमेंट फॅक्टरीमधल्या वाळूमध्ये खेळणे, ओल्या वाळूतून वेगवेगळे प्राणी बनविणे,  लाकडाच्या वखारीतून बांबू आणून ते तासून त्याच्या वस्तू बनविणे , झाडांवर चढणे ,शेतात भटकणे, निरनिराळ्या पक्ष्यांची किलबिल ऐकणे यात त्यांचं बालपण गेलं. फॅक्टरीमध्ये सिमेंटचे पाईप बनविताना त्याचे डाय  कसे वापरले जातात हेही त्यांनी समजावून घेतलं.

भावेश यांचे मोठे भाऊ जतीन यांना कुत्रा चावल्यामुळे मृत्यू आला. त्यामुळे खचलेल्या आईला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी नातेवाईकांनी  शिवणक्लासमध्ये घातलं. भावेश आईबरोबर तिथे जात. तिथे कला कौशल्याच्या वस्तूही बनवायला शिकवत. छोट्या भावेशने स्पर्शाच्या सहाय्याने अनेक आकार शिकून घेतले व कापडाची खूप खेळणी बनविली.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी दोन मित्रांबरोबर सायकलवरून गोंदिया ते काठमांडू असा दोन हजार किलोमीटर्सचा   प्रवास केला. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव , मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने, वाटेतील अडचणी या साऱ्यांना तोंड देऊन त्यांनी धाडसाने  तो प्रवास कसा पूर्ण केला हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे.

काही काळाने वडील  महाबळेश्वरला कच्छी समाजाच्या आरोग्य भवन इथे  व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. तिथल्या आवारात त्यांना एक लहानशी खोली राहायला मिळाली.

आईच्या कॅन्सरच्या आजारात भावेश यांनी शर्थीने पैशांची जमवाजमव  करून मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये अनेक खेपा घातल्या. आईच्या मृत्यूनंतर त्यांना खऱ्या अर्थाने दृष्टिहीन झाल्यासारखे वाटले.

मुंबईला वरळी येथील नॅब(National association for blind) इथे त्यांना ब्रेल लिपी आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचे शिक्षण मिळाले. तिथेच त्यांनी मेणबत्ती बनवण्याचे शिक्षणही घेतले.

अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी महाबळेश्वर येथे भाड्याने हातगाडी घेऊन सुंदर, सुगंधी, विविध आकारातील मेणबत्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्यावेळी भावेश अर्थशास्त्र घेऊन एम. ए. झाले होते.

सुट्टीसाठी म्हणून महाबळेश्वरला आलेल्या नीता, उत्स्फूर्तपणे भावेश यांना त्यांच्या मेणबत्ती विक्रीच्या कामात मदत करू लागल्या. मदतीचा हात देताना त्या , रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या भावेश यांच्या प्रेमात पडल्या.  सुशिक्षित, धनाढ्य कुटुंबातील एकुलती एक मुलगी असलेल्या, बी.कॉम झालेल्या नीताच्या या ‘आंधळ्या प्रेमाला’ सहाजिकच घरच्यांचा विरोध होता. जेव्हा नीता यांनी भावेश यांच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते अंतर्बाह्य थरारून गेले. पण भावेश यांना फक्त सहानुभूती नको होती . नीता तिच्या या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयावर  ठाम होती.   घरच्यांचा विरोध असूनही फक्त आईच्या पाठिंब्यावर अगदी साधेपणाने हे लग्न झाले.  भावेश यांची एकच अट होती की, नीताने माहेरचा एकही पैसा त्यांच्या घरात आणायचा नाही. 

नीता यांनी भावेशना सर्वार्थाने डोळस साथ दिली. खरं म्हणजे नीताच्या रत्नपारखी नजरेने भावेश यांच्यामध्ये लपलेला लखलखणारा हिरा पाहिला आणि त्याला पैलू पाडून जगासमोर आणला.  उत्तम पद्धतीने संसाराची घडी बसवली. अनेक मानसन्मानासहित नीताने स्वतःसह भावेश यांना खूप उंचीवर नेऊन ठेवले. ‘अंध व्यक्तीशी लग्न करण्याचा वेडेपणा करून तू आत्महत्या करीत आहेस’ या माहेरच्या मताला नीताने स्वकर्तृत्वाने  उत्तर दिले. लग्नानंतर दोन वर्षांनी कुणाल या त्यांच्या अव्यंग, सुदृढ अपत्याच्या जन्म झाला .सासर माहेर एक झाले.

महाभारत काळात  गांधारी आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी  बांधून वावरली हा फार मोठा त्याग समजला जातो. भावेश यांच्या मताप्रमाणे गांधारीने डोळ्यांवर पट्टी न बांधता, महाराज धृतराष्ट्रांचे डोळे बनून राहणं अधिक आवश्यक होतं. गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर कदाचित महाभारताचे युद्धही झाले नसते. नीताने गांधारीपेक्षाही अनेक पटीने त्याग केला आहे. ती केवळ भावेश यांचे डोळे झाली नाही तर तिच्या तेजस्वी  डोळ्यांनी तिने भावेश यांना सुंदर जगाचा परिचय करून दिला. उभयतांनी अनेक प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन भावेश यांची कला जगासमोर आणली.

भावेश आणि नीता यांचा उद्देश केवळ स्वतःची प्रगती साधण्याचा नव्हता.  इतर दृष्टिबाधित मित्रांना रोजगार मिळून ते स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी दोघांनीही अथक प्रयत्न केले. महाबळेश्वर येथे राहत्या घराजवळ एक छोटी जागा भाड्याने घेऊन त्यात अंध मुला-मुलींच्या राहण्याची  सोय केली. त्यांना मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आणि स्वतःच्या पायावर उभे केले. मेणबत्ती व्यवसाय शिकण्यासाठी वाढत्या संख्येने येणाऱ्या  दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाबळेश्वर- सातारा रोडवर मोळेश्वर येथे एक जागा विकत घेतली आणि दीडशे मुला- मुलींचे वसतीगृह उभारले. जागा मिळविणे आणि वसतीगृह बांधणे यासाठी अनंत अडचणी उभ्या राहिल्या. त्यावेळी अनेक सुहृदांनी  अनंत हस्ते  त्यांच्या या सत्कार्याला मदत केली. प्रतीथयश व्यक्तींचे पूर्णाकृती पुतळे बनवून त्यांनी एक वॅक्स म्युझियमही उभारले आहे.  अनेक लोक त्याला आवर्जून भेट देतात.

कॉम्प्युटर इंजिनियर झालेला कुणाल याचे या कामात खूप मोठे योगदान आहे. भारतातील अनेक प्रांतातील  दृष्टिहीन मुला-मुलींना त्यांच्या घरीच मेणबत्त्या बनविणे, कागदी पिशव्या बनविणे व इतर  उद्योग शिकण्यासाठी कुणालने अनेक ॲप्स विकसित केली आहेत. त्याचा भारतभरच्या अंध विद्यार्थ्यांना फायदा होतो. तसेच कुणाल परदेशी निर्यातीचे सर्व काम सांभाळतो.

भावेश यांनी त्यांची मैदानी खेळाची आवड जपली आणि नीताच्या सक्रिय सहाय्यामुळे वाढविली. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, पॉवर लिफ्टिंग, फुटबॉल, कबड्डी, अशा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पॅरालिंपिक व इंडियन ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशनची एकूण ११४ पदके त्यांनी जिंकली आहेत. त्यामध्ये ४० सुवर्ण पदके आहेत. ते अनेक वेळा प्रतापगड, सिंहगड चढून गेले आहेत. इतकेच नाही तर कळसुबाई शिखरावरही तीन वेळा गेले आहेत. डॉक्टर भावेश यांचे असे म्हणणे आहे की, खिलाडू  वृत्ती आपल्याला परिपूर्ण बनवते, अंतर्बाह्य माणूस बनविते.  शरीर सुदृढ असेल तर मेंदू आणि मन हे सुद्धा सुदृढ राहतात. यशस्वी उद्योजक आणि दृष्टिहीनांसाठी कार्यरत असलेल्या भावेश यांना तीन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने चन्नमा विद्यापीठातर्फे भावेश यांना डॉक्टरेट ही पदवी दिली.

गुजराती समाजाच्या रक्तातच उद्योगधंद्याचं बाळकडू असतं. व्यापारासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची त्यांची तयारी असते. नीता यांचे बालपण पूर्व आफ्रिकेतील सोमालिया इथे गेले कारण वडील व्यापारासाठी तिथे गेले होते.

भावेश यांचे   पहिले मेणबत्ती प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर पुणे इथे यशस्वीपणे पार पडले . त्यासाठी महाबळेश्वर येथील ‘आनंदवन’ या सुप्रसिद्ध हॉटेलचे मालक वैद्य कुटुंबीय यांनी खूप मदत केली ,मेहनत घेतली. अनेक गुजराती व्यवसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यानंतर या धडपडणाऱ्या व्यवसाय बंधूला गुजराती समाजातून फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. त्यांच्या उद्योगधंद्याची भरभराट होण्यासाठी, दृष्टिहीनांसाठी वसतीगृह उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यात आली .’एकमेका सहाय्य करू’ हा गुजराती लोकांचा  विशेष गुण अनुकरणीय  आहे.

आज डॉ .भावेश यांना त्यांचे अनुभव आणि विचार ऐकविण्यासाठी सन्मानाने झारखंड येथील ‘टाटा स्टील’ पासून इतर सर्व मोठ्या उद्योगधंद्यामध्ये आवर्जून बोलावलं जातं. हा सर्व प्रवास महाबळेश्वरपासून ते एकट्याने करतात. त्यांचे अनुभव सांगताना भावेश सांगतात की अंध, अपंग व्यक्तींबद्दल नुसती सहानुभूती,दया दाखवून त्यांना मदत करू नका.  त्याऐवजी अंध अपंगांना सक्षम करण्यासाठी स्वतःच्या पायावर ते उभे राहतील अशा उद्योग धंद्यात मदत केलेली जास्त चांगली. अंध व्यक्तींची इतर  ज्ञानेन्द्रिये अधिक प्रगल्भ असतात. अशा व्यक्ती अधिक संवेदनशील असतात. या त्यांच्या गुणांचा फायदा घेऊन त्यांचा आत्मविश्वास जागृत करावा व योग्य ती मदत जरूर करावी. ‘सर्व शिक्षा अभियानां’तर्गत आता पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणे अंधांनाही सहज शक्य आहे. ते स्वानुभावावरून सांगतात की अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा नकोत तर त्यांना इतर  सर्वसामान्य मुलांबरोबर नेहमीच्या शाळेत शिक्षण मिळाले पाहिजे .

एखाद्या वाढदिवसानिमित्त किंवा काही कारणासाठी आपण अशा अंध, अपंग संस्थांमध्ये भोजन देणे, भेटवस्तू देणे असे करतो. भावेश यांना ते अजिबात पसंत नाही. कारण त्यामुळे या अंध, अपंगांना तुम्ही दुबळे करता, त्यांना घेण्याची सवय लावता असं ते अनुभवाने सांगतात.त्यांचं स्पष्ट मत असं आहे की अंध अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांपैकी फारच थोड्या संस्था तळमळीने काम करतात. इतर अनेक संस्थांमधील परिस्थिती भीषण असते. अंधांकडून काम करून घेतले जाते पण त्यांना पुरेसा आहार, पैसे दिले जात नाहीत. उलट संस्थाचालकंच ‘मोठे’ होत जातात. अंध निधीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा केला जातो. प्रत्यक्षात त्यातील फार थोडा पैसा अंधांसाठी खर्च होतो. समाजाने जागृत होऊन योग्य ठिकाणी मदत केली पाहिजे. दृष्टीहीनांनी अभ्यासाबरोबर कौशल्य विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे ते सांगतात.

डॉक्टर भावेश यांच्या संस्थेतर्फे दृष्टीहीनांवर आधुनिक उपचार करून थोडे यश मिळत असेल तर तसा प्रयत्न केला जातो. लहान मोठी ऑपरेशन करण्यासाठी मदत केली जाते. समाजाने  नेत्रदान चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला  तर त्याचा अनेक दृष्टीहीनांना लाभ होईल असं डॉक्टर भावेश यांना वाटतं.

नीता या स्वतः दुर्गम भागात जाऊन दृष्टीबाधित भगिनींना भेटतात. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन, नीता त्या अंध भगिनींना प्लास्टिक हार, तोरणे, कागदी पिशव्या, डिटर्जंट बनविणे  अशी अनेक कामे शिकवतात.

डॉक्टर भावेशजींसारखं व्यक्तिमत्व ज्यांचं संपूर्ण आयुष्य ऊर्जा व सकारात्मकतेने परिपूर्ण आहे ते आणि आपण इतर डोळस यांच्यात खऱ्या अर्थाने दृष्टिबाधित कोण आहे असा प्रश्न  हे पुस्तक वाचताना नक्की पडतो .

डॉक्टर भावेश यांचे आयुष्य घडविणाऱ्या महत्त्वाच्या  दोन व्यक्तींमधील एक अर्थातच त्यांची आई! आईने त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकून त्यांना आत्मविश्वासाने उभे केले आणि दुसरी व्यक्ती म्हणजे पत्नी नीता! नीता यांच्या ‘डोळस प्रेमाची’ एक छोटी गोष्ट सांगून थांबते.

एका आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेण्यासाठी भावेश यांना दररोज पंधरा-सोळा किलोमीटर धावण्याची प्रॅक्टिस करणे जरुरी होते. नीता यांनी काय करावे? आपल्या चार चाकी गाडीला कॅरियर बसून घेतले. त्याला पंधरा फुटांची एक लांब दोरी घट्ट बांधली. दोरीचे दुसरे टोक भावेश यांच्या हातात दिले आणि दररोज त्यांना पोलो ग्राउंडवर नेऊन धावण्याची प्रॅक्टिस करता येईल अशा पद्धतीने गाडी चालवून त्यांचा सराव करून घेतला. महाबळेश्वरला आलेले पर्यटक आणि पोलो ग्राउंडवर आलेले खेळाडू यांनी हे दृश्य डोळे भरून पाहिले.

 गृहिणी सचिव सखी प्रिया… असलेल्या नीता यांना आदराने नमस्कार

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कवी भूषण… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ कवी भूषण…  ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

कवी भूषण हे आधी राजा छत्रसाल व नंतर शिवाजी महाराजांच्या दरबारात कवी होते. कवी भूषण यांच्याविषयी फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपूर येथे झाला. स्वाभिमानी भूषण लहान वयातच घर सोडून बाहेर पडले. अनेक रजपूत राजे तसेच औरंगजेब, कुमाऊँ राजे, छत्रसाल अशा अनेकांच्या दरबारी जाऊन त्यांच्यावर काव्यरचना केल्या. त्यांनी रचलेले भूषण हजारा, भूषण उल्हास व दूषण उल्हास  सारखे अनेक ग्रंथ व काव्यरचना काळाच्या उदरात गडप झाल्या. मात्र त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाने, व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन लिहिलेला ‘शिवभूषण’ हा काव्यग्रंथ उपलब्ध आहे. 

छत्रपतींना भेटण्यासाठी ते उत्तर भारतातून रायगडावर १६७० साली आले. तेथील व्याडेश्वर मंदिरात त्यांची महाराजांबरोबर भेट झाली. पण त्यावेळी त्यांना हेच शिवाजी महाराज आहेत हे माहित नव्हते. महाराजांनी विचारणा केल्यावर भूषण यांनी खाली उद्धृत केलेला छंद खड्या आवाजात गायला. तो ऐकून सर्व मावळे रोमांचित झाले. त्यांनी भूषण यांना तो पुनःपुन्हा गायला लावला. तब्बल अठरा वेळा गायल्यानंतर मात्र भूषण यांना थकवा आला. 

मग महाराजांनी आपली खरी ओळख दिली व राजकवी म्हणून त्यांची नियुक्ती केली. गाव, हत्ती वगैरे इनाम दिले. भूषण यांनी तीन वर्षे रायगडावर वास्तव्य केले. मराठ्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास आपल्या वीररसपूर्ण, अलंकारिक काव्यात शब्दबद्ध  करून तो ‘शिवभूषण’ काव्यग्रंथ १ जून १६७३ रोजी महाराजांना सादर केला. पं. विश्वनाथ प्रसाद  मिश्र यांनी संपादित केलेल्या ‘भूषण ग्रंथावली’ या पुस्तकात कवी भूषण यांचे ५८६ छंद आहेत. त्यापैकी ४०७ शिवभूषणचे, ‘शिवबावनी’ चे ५२  ‘छत्रसाल दशक’ चे १० व  इतर ११७ छंद आहेत. यात संभाजी महाराज, शाहू महाराज, थोरले बाजीराव पेशवे, मिर्झा जयसिंह यांच्यावर रचलेले छंद देखिल आहेत. एकूण त्यांच्या रचना वीररसपूर्ण आहेत. शृंगाररसयुक्त अशा फक्त ३९ रचना आहेत. त्यांनी औरंगजेबाची निंदा करणारे, मुघलांनी उद्ध्वस्त केलेली काशी, मथुरा इ. मंदिरे, तिथे उभ्या राहिलेल्या मशिदी यांचे व धार्मिक अत्याचारांचे वर्णन करणारे छंद देखिल रचले आहेत.

त्यांनी लिहिलेले ५८६ छंद प्रसिद्ध आहेत. त्यापैकी हा पुढील छंद, महाराजांवरील एका टी व्ही सिरीयलच्या शीर्षक गीतात वापरला गेल्यामुळे, अलीकडील काळात जास्त प्रसिद्ध झाला. हा पूर्ण छंद असं आहे —–

 

इंद्र जिमि जंभ पर,

बाड़व ज्यौं अंभ पर,

रावन सदंभ पर

रघुकुलराज है। 

पौन बारिबाह पर, 

संभु रतिनाह पर, 

ज्यौं सहस्रबाहु पर 

राम द्विजराज है। 

दावा द्रुमदंड पर, 

चीता मृगझुंड पर,

भूषन बितुंड पर 

जैसे मृगराज है। 

तेज तम-अंस पर,

कान्ह जिमि कंस पर,

यौंन म्लेंच्छ-बंस पर 

सेर सिवराज है॥

         — कवी भूषण 

याचा थोडक्यात अर्थ असा :-

जसे इंद्राने जंभासुर दैत्यावर आक्रमण करून त्याचा वध केला. 

जसा वडवानळ समुद्रात आग निर्माण करतो. 

जसा रघुकुल शिरोमणी श्रीरामाने अहंकारी रावणाचा वध केला. 

जसे जलवाहक मेघांवर पवनाचे प्रभुत्व असते. 

जसे रतीचा पती कामदेवाची क्रोधित शिवाने जाळून राख केली. 

जसे सहस्त्र बाहु असलेल्या कार्तवीर्य अर्जुनाला परशुधारी रामाने, म्हणजेच परशुरामांनी त्याचे हजार बाहु कापून टाकून त्याचा वध केला. 

जसा जंगलातल्या मोठमोठ्या वृक्षांना दावानल भस्मसात करतो. 

जसा हरणांच्या कळपावर चित्ता तुटून पडतो. 

जसा जंगलाचे भूषण असलेल्या हत्तीवर सिंह झेप घेतो. 

जसा सूर्याच्या तेजाने अंधाराचा विनाश होतो. 

आक्रमक कंसावर जसा श्रीकृष्णाने विजय मिळवला —

— तद्वतच, नरसिंह असलेल्या शिवाजी महाराजांनी मुघल वंशाच्या शत्रुला सळो की पळो करून सोडलेलं आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

निवेदन- आज याबरोबरच चांगदेव पासष्टी हे सदर संपत आहे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ११ ते १६ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ११ ते १६— म राठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा – ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवातेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या अकरा ते सोळा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

 अ॒स्माकं॑ शि॒प्रिणी॑नां॒ सोम॑पाः सोम॒पाव्ना॑म् । सखे॑ वज्रि॒न्सखी॑नाम् ॥ ११ ॥

 अमुचा अमुच्या सहचारीणींचा तू हितकर्ता

आम्हा पाठी सदैव असशी होऊनिया तू भर्ता

तुला आवडे सोमरसाचे करण्याला प्राशन

वज्रधारी देवेंद्रा तुजला  सोमाचे अर्पण ||११||

तथा॒ तद॑स्तु सोमपाः॒ सखे॑ वज्रि॒न्तथा॑ कृणु । यथा॑ त उ॒श्मसी॒ष्टये॑ ॥ १२ ॥

 वज्रधारी हे देवेंद्रा रे तू अमुचा मित्र

तुझ्या कृपेचे सदा असू दे अमुच्यावर छत्र

प्रसन्न होउनि देई आम्हा शाश्वत वरदान

अभिलाषा ना असावी दुजी इंद्रकृपेवीण ||१२||

रे॒वती॑र्नः सध॒माद॒ इंद्रे॑ सन्तु तु॒विवा॑जाः । क्षु॒मन्तः॒ याभि॒र्मदे॑म ॥ १३ ॥

 अमुच्या सहवासे इंद्राला परम मोद व्हावा

दिव्य वैभवाचा आम्हाला लाभ सदैव व्हावा

जलधिसारखी अमुची असुदे समृद्धी परिपूर्ण

या सामर्थ्ये आम्हा व्हावा अतुल्य परमानंद ||१३||

 आ घ॒ त्वावा॒न्त्मना॒प्तः स्तो॒तृभ्यो॑ धृष्णविया॒नः । ऋ॒णोरक्षं॒ न च॒क्र्योः ॥ १४ ॥

 चंडप्रतापी हे देवेंद्रा तुला सर्व मान

अनुपम तू रे अन्य तुला ना काही उपमान

आळविली प्रार्थना ऐकुनि सिंहासन सोडिशी

आंसापरी रे शकटाच्या तू धाव झणी घेशी ||१४||

 आ यद्दुवः॑ शतक्रत॒वा कामं॑ जरितॄ॒णाम् । ऋ॒णोरक्षं॒ न शची॑भिः ॥ १५ ॥

आभा पसरे  तव प्रज्ञेची  तेजोमय दिव्य

दास तुझे ही तुझ्या कृपेने  तृप्त सुखी  सदैव

हवी मिळाया सेवकासी तव जागृत तू राहशी

आंसापरी रे शकटाच्या तू धाव झणी घेशी ||१५||

शश्व॒दिंद्रः॒ पोप्रु॑थद्‍भिर्जिगाय॒ नान॑दद्‍भिः॒ शाश्व॑सद्‍भि॒र्धना॑नि ।

स नो॑ हिरण्यर॒थं दं॒सना॑वा॒न्स नः॑ सनि॒ता स॒नये॒ सः नो॑ऽदात् ॥ १६ ॥

 उन्मादाने नाद करिती ते सवे अश्व घेउनी

पराक्रमाने अपुल्या आणिशी संपत्ती जिंकुनी

शौर्य तयाचे अद्भुत जितके उदार तो तितुका

दाना दिधले सुवर्णशकटा वैभवास अमुच्या ||१६||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/o9wi_A2EK1g

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पोरींनो, तर्क गहाण टाकलाय का कुठं????????” … सुश्री साधना पवार ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “पोरींनो, तर्क गहाण टाकलाय का कुठं????????” … सुश्री साधना पवार ☆

शुक्रवारी ग्रहण आहे,चंद्रग्रहण…

ग्रहण म्हंटलं की माझ्या तर पोटात खूप मोठा गोळा येतो, कारण त्या दिवशी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि माझ्या मुली ‘शिक्षित’ होताहेत या समजावरही सावली पडते…

गेल्या वर्षी पाटण मधली एक बातमी वाचली आणि हादरून गेले… एक आठ महिन्याची गर्भवती, ग्रहण आहे म्हणून वीस एक तास एकाच जागी, हातपाय न हलवता, काहीही न खाता पिता बसून राहिली. खूप खूप तहान लागली,घरी खूप विनवण्या केल्या ,माहेरून आईला बोलावून घेऊन पाणी देण्यासाठी विनंती केली. पण गर्भाला काही problem उद्भवू शकतो म्हणून कुणीही तिला घोटभरही पाणी दिलं नाही,

तडफडून तडफडून ,टाचा घासून घासून मरून गेली बिचारी शेवटी…

खूप रडले हो ही बातमी वाचून.आधी तिच्याभोवतालच्या मूर्ख बायकांचा खूप खूप राग आला,परत काही वेळानं त्यांची कीव आली आणि त्यानंतर काही वेळाने आपल्या समाजात ज्याप्रकारे रूढी रेटल्या जातात त्याचा विचार करून, आपण तरी ‘कुठे कुठे’ पुरे पडणार अश्या प्रकारचं औदासिन्य आलं………..

Msc, BE, वगैरे असलं क्वालिफिकेशन असणाऱ्या मुली जेव्हा विचारतात, “ मॅडम, शुक्रवारी ग्रहण आहे, काय काय काळजी घ्यायची ?” …. तेव्हा वाटतं अरे या भूगोल न शिकताच उच्चशिक्षित झाल्या की काय?

की आपली घोकंपट्टीवाली शिक्षणपद्धती त्यांना कुठे तर्क लावायला शिकवतंच नाही?

ग्रहण म्हणजे पृथ्वीची चंद्रावर पडणारी सावली, त्याच्यामुळे आपल्या पोटातील गर्भाला कसा काय प्रॉब्लेम होईल हा विचार करायची तसदी सुध्धा घ्यायची नाही. आम्ही डॉक्टर्स सांगतो की ग्रहण पाळण्याची वगैरे काही गरज नाही, बाळामधील व्यंगाचा आणि ग्रहणाचा दुरून दुरून सुदधा संबंध नाही तरी ,तरीही विषाची परीक्षा नको म्हणून ,घरातील पन्नाशी साठीतील ज्येष्ठ स्त्रिया दुखावल्या जातील ,आकांड तांडव करतील म्हणून या बिचाऱ्या गर्भवती ते पाळतात…

ग्रहण पाळतात म्हणजे काय तर ग्रहणाचे वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत खुर्चीवरती बसून राहायचं, हातपाय हलवायची नाहीत, मांडी घालून बसायचं नाही, काहीही खायचं प्यायचं नाही, काही चिरायचं नाही ,बोलायचं सुध्धा नाही म्हणे……नाहीतर……..नाहीतर काय होईल हे यांचे तर्क ऐकून चाटच पडते मी तर. 

त्यांच्यामते हे असं ग्रहण न पाळल्यास ,बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं, म्हणजे गर्भवतीने त्या काळात भाजी चिरली तर बाळाचा ओठ आतल्याआत चिरला जाणार, तिने मांडी घातली तर बाळाचे पाय वाकडे होणार, तिने काही खाल्लं पिलं तर बाळाच्या नरड्याला छिद्र पडणार(?हा ,हा?)…

किती किती हास्यास्पद आहे हे. या अश्या समजुती तीस एक वर्षांपूर्वी एक वेळ मानूनही घेतल्या असत्या. पण आता गर्भवती माता साक्षर असतात, त्यांना बेसिक science तर माहिती असतंच की. त्या कशा काय अश्या खुळचट तर्कांबाबतीत प्रश्न विचारत नाहीत याचं आश्चर्य वाटतं. 

अरे पोरीनो, गर्भामध्ये व्यंग होणे याची कारणे वेगळी आहेत. .. म्हणजे फॉलीक असिडच्या कमतरतेने बाळाला मेंदू आणि मज्जारज्जूचे व्यंग होते,अनुवंशिकतेने, गुणसूत्रांच्या दोषाने, काही व्यंग होतात.  आपल्याकडे नात्यात ,समाजात लग्न होत असल्याने जोडप्याच्या खराब गुणसूत्र एकत्र येऊन त्यामुळे गर्भामध्ये व्यंग तयार होण्याचं प्रमाण जास्त आहे. काही औषधे गर्भावस्थेत चुकून घेतल्याने, गर्भावस्थेतील uncontrolled मधुमेहामुळे,  अशी अनेक संशोधनामध्ये सिद्ध झालेली कारणे आहेत. पण ते आपण डॉक्टरांकडून कशाला समजून घ्यायचं हो ,आपण आपलं आपल्या आजूबाजूच्या अडाणी बायका काय म्हणतात त्यावरच डोळे झाकून विश्वास ठेवायचा, होय ना? या त्याच बायका असतात ज्या गर्भावस्थेत झोपलं की बाळाचं डोकं मोठं होतं, डिलिव्हरी झाल्यावर जास्त पाणी प्यायचं नाही नाहीतर पोट सुटतं, कॉपर टी ने अंगाची झीज होते, पिशवी कुजते, असले धादांत खोटे समज मुलींवर लादतात…जाऊ दे..  तो तर एक स्वतंत्रच लेखाचा विषय होईल…….

या सर्व ग्रहण पाळण्याच्या dramya मुळं त्या गर्भवतीचे रक्ताभिसरण मंदावते, त्यामुळे रक्तामध्ये गुठळी होऊन ती फुफ्फुसात जाऊन अडकण्याची शक्यता वाढते, हातापायांवर सूज चढते, bp वाढतो,रक्तातील साखर कमी होऊन तिला व तिच्या बाळाला जीवाला धोका उदभवतो, हे सगळं आम्ही डॉक्टर कानी कपाळी ओरडून सांगत असताना देखील या बायका काही आपला हेका सोडत नाहीत…..हेतू प्रेमापोटीची काळजी हा असेलही कदाचित त्यांचा ,पण त्याला बळी नको पडायला…….

कमीत कमी सुशिक्षित स्त्रियांनी तरी जरा तर्क वापरून आपापल्या आई, मावशी ,सासू ,आजेसासू ,शेजारणी यांना हे ग्रहण पाळण्याच्या अघोरी पद्धतींमधला फोलपणा आणि धोके स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजेत आणि तरीही त्या असे काही करायला भाग पाडत असतील तर थोडं बंड करायला हवं,

हो ना???

मग काय ,तरीही पाळणार ग्रहण????????????????

लेखिका : डॉ. साधना पवार.

संग्राहक – श्री सुनील देशपांडे

  • माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन (ऑर्गन डोनेशन) रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०.
  • उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई.
  • संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक.
  • सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती (महाराष्ट्र शासन)

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मॅजिक राॅक्स… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

मॅजिक राॅक्स… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

शनिवारी सकाळी मेघाचा, माझ्या मैत्रीणीचा हॉस्पिटलमधून फोन आला. “अंजूला मुलगी झाली. अंजू बरोबर दोन तास बसायला येतेस का? अमित नेमका कामासाठी बाहेरगावी गेलाय.”

मी अंजूसाठी तिला आवडणारी सालीच्या मुगाची खिचडी-कढी केली. पापड भाजले व डबे भरले. आल्याचा चहा थर्मास मध्ये भरला. गुलाबी कार्नेशनच्या फुलांचा गुच्छ घेतला आणि हॅास्पिटलमधे पोचले.

मी हॅास्पिटलच्या लॅाबीकडे जात असताना मेघाचा टेक्स्ट आला.. “डॅाक्टरांचा राऊंड झाला की मेसेज करते.”

मी लॉबीमध्ये बसले. आजूबाजूला बसलेले काळजीग्रस्त चेहरे, थकलेली शरीरे आणि नश्वर देह जवळून बघत होते. विधात्यानं रेखाटलेल्या आयुष्यरेषा लांबवण्याच्या प्रयत्नात दमून जाणारे जीव आपण ! पृथ्वीतलावरचा कितीही पैसा टाकून विकत न मिळणारा “वेळ” कसा वाढवता येईल त्यासाठी सर्व धडपड ! 

तेवढ्यात समोर लहान मुलांच्या वॅार्डमधे गडबड दिसल्याने विचारांची श्रुंखला तुटली. पोटात कालवलं.

 “ परमेश्वरा लहान मुलांना का आजार देतोस रे बाबा ” म्हणत असतानाच नीना दिसली.

नीना माझी आवडती विद्यार्थिनी ! सेवा करण्यासाठीच जन्माला आलेली !  उंच बांध्याची, हसताना मोहक खळया पडणारी अंतर्बाह्य सुंदर नीना नर्सच्या निळ्या कपड्यात फारच गोड दिसत होती. मी दिसताच लहान मुलीसारखी पळत आली.

“Mrs Ranade, so good to see you.” 

“कशी आहेस नीना” म्हणत मी तिला घट्ट मिठी मारली. “पेडियाट्रिक वॉर्डमध्ये काम करतेस हल्ली? ठीक आहे ना सगळं?” मी विचारले.

हातातला स्टेथास्कोप तिच्या ऍप्रनच्या खिशात ठेवत ती म्हणाली, ” हो. आजची गडबड फार वेगळी आहे. आमचे छोटे पेशंटस एकदम खूष आहेत आज. अनेक शाळांकडून त्यांना आज मॅजिक रॅाक्सची भेट आली आहे. खरं तर त्याला “काइंडनेस रॉक्स”(Kindness Rocks) म्हणतात, पण मी त्यांना “मॅजिक रॅाक्स” म्हणते.

“मॅजिक रॅाक्स?? मी काही शाळांच्या पटांगणात कधी एखाद्या झाडाच्या बुंध्याशी, कधी बागेत, कधी बीचवर, रंगीबेरंगी, छान मजकूर लिहिलेले लांबट गोलाकार दगड बघितले आहेत. पण तो मुलांचा चित्रकलेचा प्रोजेक्ट वगैरे असावा यापलीकडे त्याचा फारसा विचार केला नव्हता. तेच का मॅजिक रॅाक्स?” मी नीनाला विचारले.

तेवढ्यात तिथे असणाऱ्या १४ वर्षाच्या पेशंटला नीना म्हणाली, “अरे, मॅडमना दाखव ना तुला आज काय मिळाले ते?”

त्याने उत्साहाने छोटी केशरी रंगाची गिफ्ट बॅग उघडली. त्यातून एक लांबट, गोलाकार दगड बाहेर काढला. हाताच्या तळव्यात मावेल एवढा. तो लांबट दगड वरून सपाट होता त्यामुळे आपण पाटीवर लिहितो तसे त्यावर लिहिणे शक्य होते. तो दगड पांढऱ्या रंगाने रंगवला होता. त्यावर केशरी बास्केटबॉलचे चित्र काढले होते. शेजारी लिहिले होते,” यार, लवकर बरा हो. पुढच्या मॅचला तू हवासच.”

तो त्याच्या प्लास्टरमधे असलेल्या पायाकडे बघत म्हणाला, “ नक्की खेळू शकेन मी पुढची मॅच.” आपण पुढची मॅच खेळत आहोत हे चित्र त्याच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होते.

“ मिसेस रानडे ”, नीना म्हणाली, ” मनाने घेतले मॅच खेळायची की बघता बघता हा पळायला लागेल बघा. माझं काय होणार, कसं होणार म्हणून रडत बसले की हिलींगला वेळ लागतो.. मनाची शक्ती प्रचंड असते. ती नाही कळत आपल्याला ! ती शक्ती मॅजिक रॅाक जागी करतो असं मला वाटतं. “

“पेडियाट्रिक वॉर्डच काय..हल्ली सर्व पेशंटना…. जगातल्या सर्व पेशंटना हं ” म्हणत तिने माझ्याकडे वळून बघितलं.. “ हे उभारी देणारे रंगीबेरंगी रॅाक्स सुंदर संदेश घेऊन भेट म्हणून येतात. पेशंटचा मूड एकदम इतका सुधारतो की विचारू नका !”

पुढच्या खोलीत छोटा पेशंट होता. सात वर्षाचा ! त्यानेही आम्हाला त्याला आलेली भेट दाखवली. त्याच्या हातातल्या मॅजिक रॅाकवर शब्द होते “बी (Bee) हॅपी.” आणि त्यावर एक हसरा चेहरा, एक सूर्य, आणि एक मधमाशी (Bee) काढली होती. चित्रकार अगदी बिगरीतला होता हे दिसतच होते.

तो मुलगा म्हणाला, ” निखिलला चित्रं काढता येत नाहीत.. ही मधमाशी, हा चेहरा…हाहाहा..म्हणत तो मनापासून  हसत होता.

नीना म्हणाली,” बघितली मॅजिक रॅाकमधली शक्ती? साहेब सकाळी रडत बसले होते आणि आता बघा.”

पुढे लागलेल्या वॉर्डमध्ये एक इन्स्पेक्टर काका होते.  नीना म्हणाली,” यांना शेजाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाने फार सुंदर रॅाक पाठवलाय.”  निळसर रंगाने रंगवलेल्या त्या दगडावर युनिफॉर्ममधल्या पोलिसांचे चित्र काढले होते. खाली लिहिले होते, ” काका तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. लवकर बरे व्हा आणि घरी या. हसायला विसरू नका.” नीना म्हणाली, “काका तुम्हाला मॅजिक रॅाक पाठवलेल्या मुलाला कॅडबरी द्या बरं का !” काकांनी त्यांचा रॅाक उचलून कपाळाला लावला. म्हणाले, ” भलेभले मला रडवू शकत नाहीत पण या पोरानं ही भेट पाठवून रडवलं बघा.”

लहानपणी जादूचा दिवा, जादूची सतरंजी वगैरे पुस्तकं वाचताना भान हरपल्याचे आठवत होते. पण एकविसाव्या शतकातला मॅजिक रॅाक मला नि:शब्द करून गेला होता.

एक साधा दगड .. पण त्याला शेंदूर लागला की त्याचा देव होतो.. एक साधा दगड.. पण त्याला छिन्नी हातोडा लागताच त्यातून हवा तो ईश्वर प्रकट होतो..  तसाच एक साधा दगड…ज्याच्यावरचे संदेश माणसाला उभारी देतात. “ तुम्ही एकटे नाही..आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर ” म्हणतात. 

काय लागतं माणसाला कठीण परिस्थितीतून जाताना? …… 

कुणीतरी आपलं हित चिंतत आहे, कुणीतरी आपली आठवण काढत आहे, कुणीतरी आपलं भलं व्हावं म्हणून प्रार्थना करत आहे.. बस. . एवढंच हवं असतं…. मॅजिक रॅाकवर आलेले निरागस संदेश किती जणांचं  मनोधैर्य वाढवत होते. हिलींग घडवून आणत होते…. सगळेच अगम्य !

आता मला ठिकठिकाणी बघितलेले ” मॅजिक रॅाक्स ” आठवू लागले. जवळच्या बीचवर मला मॅजिक रॅाक दिसला होता. त्यावर सोनेरी रंगात लिहिले होते..  “ एखाद्या ढगाळलेल्या आयुष्यातले इंद्रधनुष्य बन !”

एकदा टीव्हीवर एका जवानाने त्याच्या मुलाखतीत ” तू घरी येण्याची मी वाट बघतेय.” लिहिलेला रॅाक दाखवला होता. मुलांनी शाळेत जे मॅजिक रॅाक्स विखुरले होते त्यावर “तू एकटा नाहीस”, “क्षमा”, “दया”, “आनंद”, “Love”, “Keep trying” असे शब्द लिहिले होते. एकावर “बाजीगर” लिहिलं होतं. “तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्यातच आहे ” लिहिलेला गुलाबी मॅजिक रॅाक जाणाऱ्या-येणाऱ्याला  क्षणभर थांबावयास भाग पाडून अंतर्मुख करत होता.

कठीण आजाराशी झुंज देणाऱ्या एका मैत्रिणीला ”The worst is over” लिहिलेला रॅाक दिसल्याने आपण आता बरे होणार असा संदेश “वरून” आला आहे असं वाटलं होतं. मॅजिक रॅाक्स ठेऊन शुभशकून निर्माण करणाऱ्या काही परोपकारी जीवांना आयुष्याचा खरा अर्थ कळला होता. 

मनात आलं….. कागदावरचा संदेश व मॅजिक रॅाकवरचा संदेश यात पहिला फरक आहे स्पर्शाचा ! ज्या मातीतून आपण निर्माण होतो आणि ज्या मातीत परत जातो तिथला दगड हा नैसर्गिक घटक आहे, म्हणून कदाचित त्याच्याशी पटकन नातं जुळत असावं. देवळातल्या गाभाऱ्याशी  व  तिथे असणाऱ्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब पडणाऱ्या जलाबरोबर जसं तत्क्षणी नातं जुळतं तसंच ! 

विचारांची आवर्तनं, मेघाचा टेक्स्ट आला “वर ये” , म्हणून थांबली. नीनाने मला दगडातला देव दाखवल्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानले. “उद्या जेवायला ये” म्हटलं व थेट हॉस्पिटलच्या अंगणात गेले. एक लांबट गोलाकार बदामी रंगाचा दगड उचलला. तिथल्या नळावर धुऊन रुमालाने कोरडा केला.  पर्समधून गुलाबी शार्पी काढून त्यावर लिहिलं,

“अंजू-अमित तुम्ही खूप छान आई बाबा होणार आहात. तुमच्या प्रिन्सेसला खूप खूप शुभेच्छा ! “

घाईघाईने अंजूच्या खोलीकडे गेले.  तिला सर्व भेटी दिल्या व “मॅजिक रॅाक” पण  दिला.  तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले. मावशी “काइंडनेस रॉक“ बनवलास ना माझ्यासाठी! सो वंडरफुल ! तुला कसे माहिती असते ग हे सगळे?”

मी गालातल्या गालात हसत तिला जवळ घेतले आणि म्हणाले, ” तू घरी आलीस ना की तू, मी व तुझी आई “धन्यवाद” देणारे रंगीबेरंगी मॅजिक रॅाक्स बनवू. तुझ्या प्रिन्सेसचं नाव लिहू त्यावर ! बाळाच्या बारशाला छान रिटर्न गिफ्ट होईल ना?”

एक लहानशी गोष्ट माणसासाठी काय करू शकते याचे हे उदाहरण आहे. 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे.

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके 

कॅप्टन अनुज नय्यर 

खूप व्रात्य होता हा मुलगा. उंच शिडशिडीत बांधा आणि अभ्यासासोबत खेळात अत्यंत कुशल ! पण त्याच्या खोड्या सर्वांना पुरत्या जेरीस आणणाऱ्या असत. गणिताच्या शिक्षकांचा हा तसा लाडका पण त्याच्या या स्वभावाचे गणित त्या शिक्षकांना कधी सोडवता आले नाही ! त्याला ते ‘उत्साहाचं गाठोडं’ म्हणत असत. 

असेच एका दिवशी साहेबांनी कुणाची तरी कुरापत काढली आणि सुंबाल्या केला. सर्वच त्याला शोधत होते… सरांनी तर चक्क फळ्यावर  लिहिले…. Wanted Anuj…. dead or alive! अर्थात हे सगळं गंमतीत! कारण  त्याच फळ्यावर दिलेलं गणित वर्गात अनुज शिवाय दुसरं कुणीच सोडवू शकत नव्हते! स्वारी मात्र दुसरीकडेच कुठे तरी नवीन खोडी काढण्यात दंग होती!

व्हॉलीबॉल खूप खेळायचा अनुज ! वडील म्हणायचे,”अरे, शर्ट खराब होईल !” तर यावर पठ्ठ्या शर्ट काढून खेळू लागला ! मग नंतर पँट खराब होईल असं वडील म्हणू लागले तेव्हा साहेब फक्त हाफ पँट घालून खेळत… पण खेळ पाहिजेच. पोराने चाळीतल्या एकाही घराची खिडकीची काच फोडायची म्हणून शिल्लक ठेवली नव्हती… पण तरीही त्याच्यावर कुणी डाफरलं नाही.. कारण पोरगं गुणाचं होतं. सर्वांच्या मदतीला धावून जायचं तर त्याच्या स्वभावाचा एक भागच होता.

पुढे अनूज आर्मी स्कूल मध्ये पुढील शिक्षणासाठी गेला आणि एक सच्चा सैनिक आकार घेऊ लागला… शाळेच्या अभ्यासात आणि खेळांच्या मैदानात ! पाहता पाहता अनुज सैन्य अधिकारी प्रशिक्षणासाठी निवडला गेला आणि तेथून उत्तीर्ण होऊन हा प्राध्यापक नय्यर साहेबांचा मुलगा सैन्य अधिकारीही झाला !

‘ तुला सैनिकच का व्हायचं रे? ‘ असं त्याला कुणीतरी तो अगदी लहान असताना विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, ” मला सियाचीन मध्ये जाऊन बघायचं आहे, थंडीचा माणसावर काय परिणाम होतो ते !”

आणि कर्मधर्मसंयोगाने त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली ती कारगिल मध्ये, आणि सहकारी होते लढाऊ जाट रेजिमेंटचे. एका वादळाला आणखी काय हवं असतं.. त्याला गर्जायचं असतं… फक्त वातावरण तयार झालं पाहिजे !

सैन्यात येऊन अनुजसाहेबांना जेमतेम दोन वर्षे झाली होती. जाट पलटणी मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून जबाबदारी मिळाली. मोकळा वेळ मिळाला की साहेब आई वडिलांना, मित्रांना पत्र लिहीत.. अगदी नेमाने ! इतके की सहकारी त्यांना letter man संबोधू लागले ! त्यांच्या अनेक पत्रांतून त्यांनी आपल्या देशसेवेच्या कल्पना मांडल्या होत्या. ‘सामान्य निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवणे हा आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे, असे ते नेहमी म्हणत. 

१९९९…. आपला देश क्रिकेटच्या विश्वचषकाच्या धुंदीत होता. तिकडे पाकिस्तान भारतीय हद्दीत घुसत होता…. लपून छपून ! छुप्या रीतीने पाकिस्तानी सैनिकांनी नागरिकांच्या वेषांत कारगिलच्या उंचच्या उंच पहाडांवर भारतीय भूभागावर हल्ला करता येईल अशा जागा पटकावून ठेवल्या होत्या. 

या घुसखोरीची खबर मिळाली तेव्हा तसा खूप उशीर झाला होता. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छिन्नविछिन्न देह पाहून आपल्या सैनिकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती ! आहे त्या परिस्थितीत, साधनसामुग्रीत भारतीय सैन्याने घुसखोरी मोडून काढण्याची मोहिम सुरू केली.

आपण युद्धक्षेत्रातच नेमणूकीस आहोत, याची खबर अनूजसाहेबांनी घरी लागू दिली नव्हती. उंच पहाडावरील एक महत्त्वाची जागा आपल्या ताब्यात घेणे अतिमहत्त्वाचे होते. सोळा हजारापेक्षा जास्त फूटावर असलेल्या त्या ठिकाणी चढाई करणे केवळ अशक्यप्राय गोष्ट. आणि हे करताना हवाईदलाची मदत घेणे गरजेचे होते. परंतू हवाईदलाची मदत पोहोचेपर्यंत थांबण्यात धोका होता.. पाकिस्तान आपली पकड अधिक मजबूत करू लागला होता… उशीर म्हणजे नुकसान !   

६ जुलै १९९९. उद्या सकाळी पहाडावर कब्जा करायला निघायचं होतं. अनूज साहेबांनी वडिलांना फोन लावला. सांगितलं नाही नेमकं कुठं हल्ला करणार आहेत ते, पण ‘मोठी कामगिरी करायला निघालोय’ एवढं मात्र सांगितलं.

प्राध्यापक नय्यर त्यांना म्हणाले होते, “देखो ! हार कर नहीं आना ! वरना मैं तुम्ही गोली मार दुंगा !” अर्थात हे सर्व प्रेमात आणि मुलावरच्या विश्वासानं बोललं जात होतं. हे दोघं केवळ मुलगा आणि वडील नव्हते तर दोन दोस्त होते, सखे होते !

त्यावर अनूज साहेब म्हणाले होते, “आपका बेटा हूँ… हारने की बात सोच भी नहीं सकता !” 

या पूर्वीच्या पत्रात त्यांनी स्पष्टच लिहिलं होतं…. ‘देशाप्रती असलेलं माझं कर्तव्य पूर्ण करण्याआधीच मरण्याएवढा मी बेजबाबदार नाही पपा ! भारतीय सेना आणि भारतीय जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो पाहून यावेळी मरणाचा विचार करणं अतिशय गैर ठरेल. शेवटच्या शत्रूच्या शरीरातून प्राण निघून जाईपर्यंत मी माझे श्वास घेतच राहीन… जयहिंद !’

पहाडावर चढाई सुरू झाली. पुढच्या तुकडीच्या हालचाली शत्रूने वरून अचूक टिपल्या आणि आगीचा वर्षाव सुरू केला. त्यात आघाडीचे सैन्याधिकारी, सैनिक जखमी झाले, धारातीर्थी पडले. मोहिम अयशस्वी होण्याची चिन्हे होती. 

दुसरी ताजी कुमक पहाडावर पाठवण्यात आली. यात अनूजसाहेब होतेच. पहाडावरून येणाऱ्या बातम्या त्यांच्याही कानी पडत होत्या. पहाडावर जाताना पुरेसा दारूगोळा सोबत असलाच पाहिजे, याचा त्यांना अंदाज होताच. वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता त्यांनी आपली बॅग़ भरायला आरंभही केला होता. एखादं लहान मूल जसं कुठं बाहेर जायचं असल्यास आपल्या पिशवीत जमतील तेवढी खेळणी भरून घेतं ना, त्यातीलच हा प्रकार. 

वरिष्ठ साहेब त्यांच्या पाठीमागेच उभे होते… त्यांनी हाक मारताच… अनूजसाहेब म्हणाले….”आया साहब ! बस और थोडे हॅन्डग्रेनेड्स ले लू ! इनकी जरुरत पडेगी !” जणू खेळायला निघालेल्या ह्या पोराचा खेळ प्रत्यक्ष मृत्यूच्या अंगणात ठरलेला होता. 

योगायोगाने जेव्हा अनूजसाहेब आपली युद्धाची तयारी करीत होते त्यावेळी दिल्लीत त्यांच्या मातोश्री त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांच्या पिशव्या भरत होत्या…. कारगिलमधे लेकाला पाठवण्यासाठी. आणि दुसऱ्या एका घरात आणखी एक व्यक्ती अनूजसाहेबांसाठी चॉकलेट्स पॅक करीत होती… त्यांची जीवाची मैत्रिण… टिम्मी ! 

थोड्याच दिवसांत अनूज आणि टिम्मी विवाहबद्ध होणार होते… दोघांनी एकाच नजरेने स्वप्नं पाहिली होती ! साहेबांच्या बोटांत सोन्याची एंगेजमेंट रिंग शोभत होती. मोहिमेवर निघताना अनूजसाहेबांनी आपली ही अंगठी आपल्या मोठ्या साहेबांच्या हवाली केली…. ” मी परत नाही येऊ शकलो तर ही माझी लाखमोलाची ठेव माझ्या प्रेयसीच्या हाती सोपवा !”

चढाई सूरू झाली ! अनूजसाहेबांचे वरिष्ठ मेजर रामपाल साहेब आघाडीवर होते. लढताना जबर जखमी झाले. त्यांना मागे आणावे लागले. त्यांची जागा अनूजसाहेबांनी घेतली. त्यांना आता कॅप्टन म्हणून बढती मिळाली होती… भर युद्धाच्या दिवसांत ही बढती म्हणजे देशाने खांद्यावर दिलेली एक मोठी जबाबदारी. 

निकराचा हल्ला करीत निघाले साहेब आणि त्यांचे बलवान जाट सैनिक. चढाई सोपी नव्हती… सोळा हजार फूट…. कडेकपारी…. पाय निसटला की जीवन निसटून जाईल याची खात्री… वरून प्रचंड गोळीबार होत होता. 

सैनिकांजवळचे अन्न पदार्थ संपले ! पोटात भुकेचा वणवा भडभडून पेटलेला होता. पण लढण्यासाठी दारूगोळा महत्त्वाचा होता. अन्नाचं ओझं होईल….! त्या बहाद्दरांनी अन्नाऐवजी बंदुकीच्या गोळ्या, हातबॉम्बचं ओझं सोबत नेणं पसंत केलं…. ‘सैन्य पोटावर चालतं’ ही म्हण या शूरांनी इथं खोटी ठरवली एका अर्थानं !

उपाशीपोटी लढणं….. कल्पना तरी करवते का सामान्य माणसांना? पण असामान्य माणसांची कथा आहे ही…. आणि खरी आहे ! 

अनूजसाहेब सर्वांत पुढे होते. उंचावरच्या सांदी कोपऱ्यात पाकिस्तानचे चार बंकर्स होते. त्यात बसून ते आरामात फायरिंग करीत होते. साहेबांनी गोळीबाराच्या पावसात पुढे धाव घेतली आणि पहिले तीन बंकर्स उध्वस्त केले… त्यातील नऊ शत्रू थेट वरती पाठवले…. त्यांच्या मशिनगन्स निकामी केल्या…. पण… चौथा बंकर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात तिकडून आलेल्या एक आर.पी.जी.गोळ्याने त्यांच्या शरीराचा वेध घेतला…. रॉकेट प्रॉपेलर गन ! हिच्यातून गोळी नाही तर बॉम्बच डागला जातो एक प्रकारचा. त्या अस्त्राने या अभिमन्यूचे प्राण हिरावून नेले ! 

तोवर कामगिरी फत्ते झाली होती…. पहाड ताब्यात आला होता… पाकिस्तानची राक्षसी पकड त्यामुळे ढिली पडणार होती ! पुढे विजय आवाक्यात होता, दृष्टीपथात होता ! पण हे पहायला कॅप्टन अनूज नय्यर आणि त्यांचे काही साथीदार या जगात नव्हते ! 

प्राध्यापक एस.के.नय्यर यांच्या घरातील टेलिफोन खणखणला…. लष्करी अधिकारी होते फोनवर…. “जयहिंद सर….” आणि असंच काही बोलून ते अधिकारी नि:शब्द झाले काही वेळेसाठी….

नय्यर साहेब म्हणाले….. ” माझा लेक लढतानाच मरणाला सामोरं गेला ना?”

” सर, केवळ भारतीय सेनाच नव्हे तर संपूर्ण भारत देश आपल्या सुपुत्राचा ऋणी राहील कायम !” ते अधिकारी कसेबसे म्हणू शकले ! काय बोलणार अशा वेळी? 

केवळ चोवीस वर्षे वयाचे, केवळ दोनच वर्ष लष्करी सेवा झालेले कॅप्टन अनूज नय्यर… मरणोपरांत महावीर चक्र ! त्यांनी आपले शब्द खरे केले…. शत्रूचा नि:पात झाल्यावरच आपला श्वास थांबवला ! 

 ७ जुलै….. या पराक्रमाचा स्मरण दिन ! भावपूर्ण आदरांजली हे महावीर योद्धा !

…  जय् हिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बाईपण भारी’… आणि वैशाली नाईक… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बाईपण भारी’… आणि वैशाली नाईक ☆ सौ. गौरी गाडेकर

तुम्ही केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा ‘ बघितला असेलच.

ही कथा  आहे मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहा बहिणींची.

यांच्या मनावर लहानपणी खेळलेल्या मंगळागौरीच्या खेळांच्या आठवणीची जादू आहे. त्यामुळे आणि भरघोस बक्षिसाच्या आशेने आणि कोणी ‘इगो’ सुखावण्यासाठीही  या स्पर्धेत भाग घेतात.

पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पूर्वीच्या सडपातळ, चपळ, लवचिक शरीराने केव्हाच साथ सोडलीय. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या संसारात आपापल्या परीने बाईपणाचं ओझं वाहतेय. तर अशा या बहिणी स्पर्धा जिंकायची तयारी कशी करतात, त्यांचं ते स्वप्न पुरं होतं का, त्या धडपडीत त्यांच्या हाती इतरही काही लागतं का, ते तुम्ही बघितलं असेलच. नसल्यास जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.

आज हा लेख या सिनेमाची जाहिरात करण्यासाठी लिहिलाय की काय अशी शंका येईल कदाचित.. पण तसं अजिबातच नाही. हा लेख लिहिलाय तो – या चित्रपटाची प्रभावी आणि पठडीबाहेरची कथा, पटकथा, आणि त्यातले खुमासदार संवादही जिने लिहिले आहेत –  त्या वैशाली नाईक या जेमतेम ३३-३४ वर्षाच्या तरुणीच्या कौतुकास्पद अशा अफाट कल्पनाशक्तीची आणि लेखन-सामर्थ्याची कल्पना माझ्यासारखीच इतरांनाही यावी म्हणून. . हा चित्रपट म्हणजे वैशालीचं  मराठी सिनेसृष्टीतलं पहिलं दमदार आणि यशस्वी पाऊल.

यापूर्वी तिने ‘दिया और बाती’,  ‘ये उन दिनों की बात है’, ‘बॅरिस्टर बाबू ‘, ‘तू मेरा हिरो’ वगैरे अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं लेखन केलं आहे. सद्या ती ‘ये रिश्ता क्या क्या लाता है’ या हिंदी मालिकेचं लेखन करत आहे.

वैशालीने यापूर्वी ‘सेव्हन स्टार डायनॉसर एन्टरटेनमेंट’ ही शॉर्ट फिल्म बनवली आहे.

‘सेव्हन स्टार डायनॉसर….’ ही फिल्म ‘धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’, ‘पाम (palm) स्प्रिंग्ज इंटरनॅशनल शॉर्ट फेस्ट 2022’, ‘ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल 2022’, ‘मॅंचेस्टर फिल्म फेस्टिवल 2022’, ‘न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2022’, ‘ऍथेन्स इंटरनॅशनल फिल्म अँड व्हिडीओ फेस्टिवल 2022’, ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिवल’ वगैरेमध्ये प्रदर्शित केली गेली आणि वाखाणलीही गेली, हे आवर्जून सांगायला हवे. 

‘IFFLA’ ( इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलीस)मध्ये या फिल्मने ‘Audience Choice Award’ पटकावलं आहे. 

याशिवाय वैशालीने काही हिंदी बालकथाही लिहिल्या आहेत. त्या म्हणायला बालकथा असल्या तरी त्या मोठ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत हे विशेष. 

सी. एस.( कंपनी सेक्रेटरी ) आणि एल. एल. बी. अशा पूर्णपणे व्यावसायिक आणि रुक्ष म्हणता येईल अशा विद्याशाखांच्या पदव्या प्राप्त केलेली वैशाली, साहित्याच्या या सुंदर आणि समृद्ध विश्वात अचानक पाऊल टाकते काय आणि बघता बघता इतक्या कमी वयातच इथे पाय घट्ट रोवून दिमाखाने उभी रहाते काय …. .. हा तिचा वेगवान आणि झपाट्याने यशाच्या दिशेने होत असलेला प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. 

वैशाली नाईक या प्रतिभाशाली तरुण लेखिकेची साहित्य- क्षेत्रातली मुशाफिरीच इतकी दमदारपणे सुरु झालेली आहे की, “ आता ही पोरगी काही कधी मागे वळून बघणार नाही “ असं अगदी खात्रीपूर्वक म्हणता येईल. 

वैशालीची ही साहित्यिक घोडदौड अशीच चौफेर चालू राहो, आणि तिला नेहेमीच असे भरघोस यश मिळो, याच तिला मनःपूर्वक शुभेच्छा !

 सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

१८५७ पूर्वीचा भारत

(मागील भागात आपण पाहिले की फॅनी पार्कस् हिला भारतासंबंधी कुतूहल होते. भारतात अनुभवलेल्या विविध विषयांचे सचित्र वर्णन तिने केले आहे. आता त्या पुढील भाग…)

हिंदुस्थानातल्या अनेक प्रकारच्या झाडांची माहिती, त्यांचे उपयोग, धनुष्य बनविण्याची पद्धत, सतार कशी बनविली जाते, स्थानिक भाषेतील म्हणी व वाक्प्रचार असे अनेक विषय फॅनीच्या लिखाणात येतात. वन्य प्राणी, कीटक, जीवजंतू यांचीही ती अभ्यासक होती.

फॅनीने लिहिले आहे की, ‘कंपनी सरकार नेटिवांच्या अंधश्रद्धेचा फायदा उकळते. प्रयागला संगमावर स्नान करण्यासाठी प्रत्येकी एक रुपया कर द्यावा लागतो. एक रुपयात एक माणूस महिनाभर सहज जेवू शकतो हे लक्षात घेतले तर हा कर भयंकर आहे.’

सुरुवातीला आलेल्या काही इंग्रजांनी मुगल राजघराण्यात विवाह केले होते आणि त्यांच्यासारखे ऐश्वर्य उपभोगत होते. अशा अँग्लो- इंडियन्सना व्हाईट मुघल्स म्हटले जाई.

बर्मा वॉरवर गेलेल्या काही परिचितांकडून फॅनीला हिंदू ,बौद्ध देवदेवतांच्या मूर्ती भेट मिळाल्या होत्या. त्यातील एक सोन्याची, काही चांदीच्या आणि बाकी ब्रांझ आणि संगमरवराच्या होत्या. अनेकांनी अशा मूर्ती फोडून त्यांच्या डोळ्यांच्या जागी बसविलेले हिरे काढून घेतले. काही मूर्तींच्या तर डोक्यात हिरे साठवलेले होते. फॅनीने आठवण म्हणून मिळालेल्या मूर्ती तशाच ठेवल्या.

प्रचंड टोळधाडीमुळे फॅनी उदास झाली. त्यावेळेच्या भीषण दुष्काळाचे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. आई- वडील धान्यासाठी, पैशासाठी आपली मुलेही विकत होती.

महादजी शिंदे यांचा दत्तक मुलगा दौलतराव यांची विधवा पत्नी बायजाबाई शिंदे यांची व फॅनीची चांगली मैत्री झाली होती.

हिंदू धर्माप्रमाणेच फॅनीने मोहरमचा सण, त्या मागची कथा, प्रेषितांच्या कुटुंबाची माहिती,शिया आणि सुन्नी यामधील फरक या सगळ्याविषयी लिहिले आहे. वाघाच्या शिकारीच्या अनेक कहाण्या तिने लिहिल्या आहेत. उच्च स्तरातील इंग्रजांची आयुष्यं सुखाची होती. त्यांच्याकडे सगळ्या कामांसाठी नोकर- चाकरांची फौज होती. संस्थानिकांकडून त्यांना किमती हिरे माणके  अशा भेटींनी भरलेली ताटे मिळत असत. इंग्रज परके आहेत, शत्रू आहेत ही जाणीव भारतीय नेणीवेत उरली नव्हती.

तीव्र उन्हाळ्यामुळे आजारी पडून फॅनी मसूरीजवळच्या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास सहा महिने राहिली. तिथेही तिने पहाडात फिरुन, माहिती गोळा करून तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशाचा आणि हवामानाचा दस्तऐवज करून ठेवला आहे. पहाडातला पाऊस, दरडी कोसळणे भूकंपाचे हलके धक्के, तिथली माणसे, झाडे, इतर वनस्पती, पक्षी, फुलपाखरे या सगळ्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. पहाडी बायकांचे जिणे फार कष्टप्रद असते असेही लिहिले आहे.

फॅनी स्वतंत्र बुद्धिमत्तेची आणि भारताविषयी प्रेम असणारी होती. हा भारत तिचा तिने शोधलेला होता. तीव्र निरीक्षण शक्ती आणि रसाळ लेखणी यामुळे तिचे लेखन आजही टवटवीत वाटते. घोड्यावर बसून फिरणारी, सतार वाजवणारी, उर्दू बोलणारी, सिगरेट ओढणारी, देवळांमध्ये, घाटांवर, बाजारात फिरणारी, गलबत घेऊन एकटीच प्रवासाला जाणारी ही मेम हे भारतीयांसाठीही एक आश्चर्यच होते.

अभ्यासू लेखिका सुनंदा भोसेकर यांचा ऋतुरंगमधील फॅनीने पाहिलेल्या भारतावरील लेख मी वाचला होता. आवडलेल्या लेखांच्या झेरॉक्स प्रति   जमविण्याची मला आवड होती. करोनाच्या कंटाळवाण्या काळात कपाट आवरताना निराश मनःस्थितीत यातील बहुतेक सर्व लेखांना मुक्ती मिळाली .सुनंदाताईंना या लेखासाठी जेव्हा मी मेल केली तेव्हा अगदी तत्परतेने त्यांचे उत्तर आले. हा लेख माझ्या अजून लक्षात आहे याचेच कौतुक करून त्यांनी मला ऋतुरंग आणि शब्द रुची मधील त्यांच्या लेखांची पीडीएफ लगेच पाठविली. त्यांनी असेही कळविले की, फॅनीने पाहिलेल्या भारताचे लेख समाविष्ट असलेले त्यांचे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. भारतात येऊन गेलेल्या परदेशी प्रवाशांविषयी त्यांच्या स्वतःच्या प्रवास वर्णनावर आधारित लेखमाला या पुस्तकात असेल चंद्रगुप्ताच्या दरबारात आलेल्या  मेगास्थेनिसपासून जहांगीराच्या दरबारात आलेल्या थॉमस रो पर्यंतचे लेख या पुस्तकात असणार आहेत. आपण या पुस्तकाची वाट पाहूया.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदकंद ऐसा… भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदकंद ऐसा… भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

१८५७ पूर्वीचा भारत

इ.स.१८२२. फॅनी  पार्कस् आणि चार्ल्स क्रॉफर्ड पार्कस् हे दांपत्य पाच महिने बोटीने प्रवास करून इंग्लंडहून कोलकत्याला उतरले. फॅनीचा नवरा चार्लस् ईस्ट इंडिया कंपनीत कारकून होता.फॅनी चांगली चित्रकार होती. प्रवास आणि घोडदौड हे तिचे छंद होते . इथले लोकजीवन, धर्म, राजकारण, इतिहास, भूगोल हे सर्व  जाणून घेण्यात तिला रस होता . ती नेहमी स्वतःजवळ डायरी आणि स्केच बुक बाळगत असे. भारतात २४ वर्षे राहून ती लंडनला परत गेली. त्यानंतर  तिच्या डायऱ्या व अनुभव यावर आधारित तिने  पुस्तक लिहिले आहे. ते दोन खंडांमध्ये आहे.या पुस्तकातील बहुतेक सगळी रेखाचित्रे तिची स्वतःची आहेत.  पुस्तकावरील फॅनी पार्कस्  हे नाव आणि  सगळ्या चित्रांखाली तिची सही उर्दूमध्ये आहे. पुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘श्री गणेश’ असं देवनागरीत लिहून त्याच्याखाली एखाद्या हिंदू घरातला सर्व देवदेवता असलेला देव्हारा असावा तसे चित्र आहे. शंख, घंटा, पळी पंचपात्र, ताम्हन यांचीही चित्रे आहेत. ती गणपतीला सलाम करते.  ‘ही गणपतीसारखी  लिहिते’ असे म्हटले जाऊ दे!’ असा आशीर्वाद ती गणपतीकडे मागते.

फॅनीने लिहिले आहे की, कोलकत्यामध्ये कॉलरा, देवी,एंन्फ्लूएंझा  असे साथीचे रोग होते.   घरात, बागेत सर्रास साप- विंचू सापडत होते.

नंतर चार्लसची बदली अलाहाबादला झाली. बोटीने ८०० मैल आणि घोड्यावरून ५०० मैल असा प्रदीर्घ प्रवास त्यांनी वाटेतल्या डाकबंगल्यांमध्ये मुक्काम करत केला . वाराणसीमध्ये ती हिंदू देवळांमध्ये गेली. तिने लिहिले आहे की हिंदूंचे सगळ्यात पवित्र शहर अंधश्रद्धेने भरलेले आहे. भोळसटपणा हा एक वाढीव अवयव हिंदूंमध्ये आहे.

अलाहाबादला पोहोचल्यावर त्यांनी यमुना नदीच्या किनाऱ्यावर  घर घेतले. फॅनी लिहिते की अंधाऱ्या,  धुक्याने काळवंडलेल्या लंडनमध्ये राहणारे लोक या उत्साही, आनंदी हवामानाची कल्पनाही करू शकणार नाहीत.

लखनौचा एक  इंग्रज सरदार अवधच्या नबाबाला भेटणार होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी फॅनीला तिच्या लखनौच्या मैत्रिणीने आमंत्रण दिले.  नबाबी थाटाचे जेवणाचे समारंभ,नाच- गाणे, जनावरांच्या झुंजी झाल्या. इंग्रज पाहुणी म्हणून फॅनीला अनेक काश्मिरी शाली, भारतीय मलमलीचा आणि किनखाबाचा एकेक तागा , मोत्याच्या माळा, किमती खड्यांच्या बांगड्या, इतर दागिने भेट मिळाले.

अलाहाबादला  राहत असताना तिने सती जाण्याचा प्रसंग पाहिला. त्याचे हृदयद्रावक वर्णन आपण वाचू शकत नाही.

 १८३० मध्ये तिच्या नवऱ्याची बदली कानपूरला हंगामी कलेक्टर म्हणून झाली.दीडशे मैलांचा हा प्रवास पालखीतून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात झाला.  या काळात उत्तर हिंदुस्थानात ठगांच्या टोळ्यांनी  धुमाकूळ घातला होता.हे ठग  प्रवाशांना लुटून, मारून त्यांची प्रेते विहिरीत फेकून देत. फॅनीने ठगांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवून त्याचे सचित्र वर्णन केले आहे.

कानपूरमध्ये चामड्याच्या वस्तूंचा धंदा जोरात होता. चामड्यासाठी विष घालून जनावरे मारण्याचा प्रकारही सर्रास होत असे.

२६ जुलै १८३१ ला फॅनीच्या डायरीत नोंद आहे की गव्हर्नर जनरलने आग्र्याची प्रसिद्ध मोती मस्जिद रुपये १,२५,००० या रकमेला विकली. ती पाडून तिचे संगमरवर विकण्यात येणार आहे. ताजमहालही विकण्यात येणार आहे असे जाहीर झाले आहे.  फॅनीने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ती लिहिते की गव्हर्नरजनरलला ताजमहाल विकण्याचा काय अधिकार आहे? पैशासाठी असे करणे अशोभनीय आहे. पुढे पार्लमेंटमध्ये गदारोळ झाल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला आणि ताजमहाल वाचला.

१८३४   मध्ये फॅनीने एक लहान गलबत खरेदी केले .  खलाशांना घेऊन ती एकटीच प्रवासाला निघाली.तिने ताजमहालचे अगदी बारकाईने वर्णन केले  आहे. आग्र्याच्या किल्ल्यातील संगमरवरी नक्षीकाम केलेले आणि रत्नमाणकं जडविलेले बाथटब काढून गव्हर्नरजनरलने ते इंग्लंडच्या राजाला पाठविल्याचे तिने लिहिले आहे. तसेच तिथल्या गुप्तपणे फाशी देण्याच्या अंधाऱकोठडीबद्दलही लिहिले आहे.

१८५७ पूर्वीचा भारत— भाग एक समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तित्व… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ अस्तित्व… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

आजचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गाव. महाभारतातील कौरव पांडवांच्या काळातील एकचक्र नगरी. एके काळची जुनी बाजारपेठ. ऐतिहासिक गाव. या इतिहासाच्या खुणा आज भग्नावस्थेत का होईना पण एके काळच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. वेगवेगळे जुने ऐतिहासिक दरवाजे, वाडे, बुरुज, बारव आजही गतवैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवत आहेत. गावात प्राचीन मंदिरे आहेत. राम मंदिर, केशवराज मंदिर, गणेश मंदिर, शिव मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. जवळच पद्मालय म्हणून एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी श्री गणेशाचे जागृत असे देवस्थान आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा अशा दोन गणेश मूर्ती आहेत. मंदिराबाहेर ४४० किलो वजन असलेली एक पंचधातूची प्रचंड मोठी घंटा आहे. तिचा आवाज अनेक किमी पर्यंत दूर ऐकू जातो असे म्हणतात. मंदिरासमोर असलेल्या तळ्यात सुंदर कमळे उमललेली असतात. म्हणूनच पद्मालय असे सार्थ नाव या पवित्र ठिकाणाला आहे. श्री गणरायाला रोज कमलपुष्पे अर्पण केली जातात. येथे अंगारकी, संकष्टी चतुर्थी आणि सुट्यांच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. येथून जवळच भीमाने बकासुराचा वध ज्या ठिकाणी केला ती जागा आहे. 

एकचक्रनगरी या नावाव्यतिरिक्त एरंडोल शहराची अरुणावती आणि ऐरणवेल अशीही नावे असल्याचे सांगितले जाते. कदाचित ऐरणवेल या नावाचा अपभ्रंश होऊन एरंडोल हे नाव पडले असावे. अशा या गावात पांडव अज्ञातवासात असताना राहिले होते. ते या ठिकाणी ज्या वाड्यात राहिले होते, त्या वाड्याला पांडववाडा असे नाव पडले आहे. आजही हा वाडा या पौराणिक घटनेची साक्ष देत उभा आहे. या वाड्याच्या प्रवेशद्वारावर कमळफुलांची नक्षी आहे. आत प्रवेश केल्यावर भरपूर मोकळी आणि प्रशस्त जागा, रुंद आणि अनेक खिडक्या असलेल्या भिंती आहेत. त्यांच्यावर नक्षीकाम आहे. आज मात्र या पांडववाड्याकडे बघवत नाही. तिथे जामा मशीद उभी आहे. वास्तू कडीकुलुपात बंदिस्त आहे. या पांडव वाड्याजवळच एक धर्मशाळा आहे. एक मोठे वडाचे झाड आहे. तिथे पारावर एका बाजूला गणपती आणि देवीचं मंदिर आहे. 

याच पांडव वाड्याच्या उजव्या बाजूला एक ऐतिहासिक केशवराजाचं मंदिर उभं आहे. मंदिरात काळ्या पाषाणापासून तयार झालेली केशवाची देखणी आणि रेखीव मूर्ती आहे. या मंदिराची देखभाल आणि मालकी मैराळ परिवाराकडे गेल्या सात ते आठ पिढ्यांपासून आहे. काही भाविकांचे हे कुलदैवतही आहे. याच मंदिरात ज्यांचं वास्तव्य होतं असे प्रकाशराव मैराळ हे माझे नात्याने साडू आणि माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ. पण साडू किंवा मेहुणे यापेक्षाही आमच्या नात्याला मैत्रीच्या नात्याची किनारच जास्त ! 

लग्नानंतर आमचं खूपदा एरंडोलला जाणं येणं व्हायचं. मंदिरात पाऊल ठेवताच प्रकाशराव हसतमुखाने आमचं तत्परतेनं स्वागत करायचे. साधारण पाच फूट उंची पण सुबक ठेंगणी अशी त्यांची मूर्ती. पिळदार आणि गोटीबंद शरीर. चेहऱ्यावर सदैव हास्य विराजमान. प्रकाशराव म्हणजे उत्साहमूर्ती ! त्यांचा दिवस सकाळी पाच वाजताच सुरु व्हायचा. मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीचं पाणी सकाळी रहाटाने काढून सगळ्यांसाठी भरून ठेवणार. त्याच पाण्याने स्तोत्र म्हणत त्यांचं स्नान व्हायचं. मग केशवराजाची यथासांग पूजा असायची. मंत्र, आरती सगळं काही शुद्ध आणि खणखणीत आवाजात. प्रकाशराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. त्यांच्या विविध गावी बदल्या व्हायच्या. पण कुरकुर, तक्रारीचा सूर कधीच ऐकू यायचा नाही. देवाची पूजा झाली की ही वामन मूर्ती सायकलवर बसून आपल्या शाळेत वेळेवर हजर असायची. गावकरी, शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थी साऱ्यांनाच हवेहवेसे वाटणारे आणि आपल्या कर्तव्यात कधीही कसूर न करणारे हे व्यक्तिमत्व होते. 

देव काही काही माणसांना प्रचंड ऊर्जा देतो. तसंच प्रकाशरावांच्या या उत्साहाचं मला नेहमी कौतुक वाटायचं. देवपूजा, घरातील कामं हे सगळं आटोपून वेळ मिळाला की स्वारी सायकलला टांग मारून शेतावर जायची. त्यांची पत्नी म्हणजेच माझ्या सौभाग्यवतीची तीन नंबरची बहीण सुद्धा प्रचंड कष्टाळू . खरं तर ती स्टेनो झालेली होती. शहरात उत्तम पगाराची नोकरी तिला त्या काळात कुठेही सहज मिळाली असती. पण तिने प्रकाशरावांचा संसार प्रकाशमान केला. स्वतःला त्यात विलीन करून टाकले. आपल्या दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा यांना शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार प्रकाशराव आणि बेबीताईंनी दिले. 

दोघांनीही केशवराजाच्या सेवेत कधी कसूर केली नाही. सगळे सण, उत्सव ते मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने करीत राहिले. चातुर्मासात प्रकाशराव मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी भागवताचे वाचन करीत. एरंडोल गावातील गावकऱ्यांसाठी प्रकाशराव आणि बेबीताई दोघेही आदराचे स्थान. केशवराजा या दोघांची कसून परीक्षा घेत होता. पण हे दोघेही त्यात कुठेही कमी पडले नाहीत. त्याचे फळ केशवराजाने पदरात घातले. दोन्ही जुळ्या मुली प्रेरणा आणि प्रतिमा यांना उत्तम स्थळे मिळून त्यांचा विवाह झाला. मुलगा श्रीपाद एम फार्म होऊन मुंबईला कंपनीत रुजू झाला. यथावकाश त्याचेही लग्न झाले. केशवराजाच्या कृपेने उच्चशिक्षित, सद्गुणी अशी प्राजक्ता सून म्हणून घरात आली. प्राजक्ता आणि श्रीपादच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या. एक मुलगा आणि एक मुलगी. 

असं सगळं सुखात चाललं होतं. प्रकाशराव आपला सेवाकाल पूर्ण करून निवृत्त झाले होते. आता खरे तर त्यांचे सुखाचे आणि आरामाचे दिवस होते. पण माणसाच्या नशिबी असलेले भोग काही चुकत नाहीत. मुखात अखंड गोपाळकृष्णाचे नाव असलेल्या या उत्साही, आनंदी आणि तत्पर माणसाला संधी मिळताच आजारांनी ग्रासले. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार लागला. पुढे पुढे तर मेंदूचे शरीरावर असणारे नियंत्रण कमी कमी होत गेले. जवळपास अकरा ते बारा वर्षे प्रकाशरावांना जळगाव येथील मेंदूरोग तज्ज्ञांचे उपचार सुरु होते. कधी थोडीफार सुधारणा दिसायची. पण पुन्हा सगळ्यांना त्यांची काळजी लागून राहायची. या सगळ्या कालावधीत बेबीताई पदर खोचून धीराने उभ्या राहिल्या. जवळ कोणी नसताना गाडी करून त्यांना जळगावला उपचारासाठी त्या घेऊन जायच्या. शनिवार रविवार श्रीपाद मुंबईहून येऊन आईला मदत करायचा. प्राजक्ताही आपल्या दोन लहानग्यांना सांभाळून सासू सासऱ्यांच्या सेवेत तत्पर असायची. 

अशा परिस्थितीही बेबीताईंनी केशवराजाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष होणार नाही याची भक्तिभावाने आणि प्रेमाने काळजी घेतली. चातुर्मासात प्रकाशरावांचा भागवत सांगण्याचा वारसा त्यांनी घेतला. आम्ही अधूनमधून एरंडोलला जायचो. आम्ही गेलो की यापूर्वी सदैव उत्साही असणाऱ्या असणाऱ्या  प्रकाशरावांना असं परावलंबी होऊन अंथरुणावर पडलेलं पाहताना गलबलून यायचं. शेवटी शेवटी तर फिट्स यायला सुरुवात झाली. बेबीताई आणि मुलांनी उपचारात कसूर ठेवली नाही. पण फार काही सुधारणा होत नव्हती. प्रकाशरावांच्या मुखातून गोपाळकृष्णाचे नाव मात्र ऐकू येई. आपल्या केशवराजावर त्यांचं अतोनात प्रेम आणि श्रद्धा. 

आधी गावभर, मंदिरभर, घरभर असणारे प्रकाशरावांचे अस्तित्व आता अंथरुणावर होते. गेल्या महिन्यात परिस्थिती आणखी बिघडली. प्रकाशरावांना जळगावला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. पण सुधारणा होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्यांना शेवटी कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर त्यांना घरी नेण्यास सांगितले. घरी आणल्यानंतर तीन साडेतीन तासात केशवराजाच्या साक्षीने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एक प्रकाश दुसऱ्या प्रकाशात विलीन झाला होता. एक उत्साहमूर्ती शांत झाली होती. निर्जीव देहाच्या रूपात आता त्यांचं अस्तित्व उरलं होतं. काही तासांनी तेही अस्तित्व लोप पावलं. तिसऱ्या दिवशी केवळ अस्थींच्या स्वरूपात हे अस्तित्व उरलं. काही दिवसांपूर्वी आपल्याशी हसून खेळून बोलणाऱ्या व्यक्तीचं अस्तित्व आपल्यासमोरच कसं हळूहळू नष्ट होत जातं याचा विषण्ण अनुभव मी घेत होतो. यथावकाश त्या अस्थीही नर्मदेत विसर्जित करण्यात आल्या. रक्षा नदीत सोडून देण्यात आली. आता त्यांच्या अस्तित्वाच्या त्याही खुणा नष्ट झाल्या होत्या. 

प्रकाशराव गेल्यावर गावातील लोक हळहळले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी स्त्री पुरुषांनी गर्दी केली. श्रीपादच्या मित्रांनी अंत्यविधीची सगळी व्यवस्था केली. नगराध्यक्षांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या घरी तीन दिवस जेवण आणि चहाची व्यवस्था गावातील लोकांनीच केली. ग्रामीण भागातील लोकांचे प्रेम आणि माणुसकी अजून टिकून आहे याचे दर्शन या निमित्ताने घडले.

आता मंदिरात होती त्यांची प्रतिमा हार घातलेली. आता त्यांचं अस्तित्व फोटोतच असं म्हणायचं का ? त्यांनी मुलांना दिलेले संस्कार, आपल्या ज्ञानदानाने घडवलेले विद्यार्थी, गावातील लोकांना दिलेलं प्रेम या सगळ्यांच्या रूपात त्यांचं अस्तित्व आहेच ! तुकाराम महाराज म्हणतात 

तुका म्हणे एका मरणेची सरे । उत्तमची उरे कीर्ती मागे ।।

हा देह नाशिवंत आहे. हाताने नित्य सत्कर्म करावे आणि मुखाने परमेश्वराचे नाम घ्यावे. त्यातच जीवनाचे सार्थक आहे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असेच तुकोबाराय सांगतात. एरंडोल नगरीत महाभारतकालीन पांडववाडा, विविध मंदिरे, दरवाजे आदींचे अस्तित्व उरले आहे. त्या काळातील कीर्ती त्या वास्तू गात राहतील. प्रकाशरावही स्मृती रूपाने आपले अस्तित्व मागे ठेऊन गेले आहेत. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print