डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा १ ते ७
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या सात ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
यच् चि॒द्धि ते॒ विशो॑ यथा॒ प्र दे॑व वरुण व्र॒तम् । मि॒नी॒मसि॒ द्यवि॑द्यवि ॥ १ ॥
वरूण राजा तुमची प्रजा अज्ञानी आम्ही
तुमची आज्ञा आम्हा अज्ञा उमगत ना काही
अवधानाने उल्लंघन झाले अमुच्या आचरणे
विशाल हृदयी क्षमा करोनी हृदयाशी घेणे ||१||
☆
मा नो॑ व॒धाय॑ ह॒त्नवे॑ जिहीळा॒नस्य॑ रीरधः । मा हृ॑णा॒नस्य॑ म॒न्यवे॑ ॥ २ ॥
आज्ञेच्या अवमानासाठी देहान्त शासन
कोप करोनी आम्हावरती नका करू ताडण
झाला आज्ञाभंग तरी तो केला ना बुद्ध्या
नका देऊ हो बळी अमुचा तीव्र अपुल्या क्रोधा ||२||
☆
वि मृ॑ळी॒काय॑ ते॒ मनो॑ र॒थीरश्वं॒ न संदि॑तम् । गी॒र्भिर्व॑रुण सीमहि ॥ ३ ॥
वेसण घालूनिया वारूला योद्धा बांधून ठेवी
स्तोत्रे तशीच अमुची वेसण मना जखडूनि ठेवी
सुखा मागण्या तुमच्या ठायी बद्ध आम्ही होतो
तव चरणांवर अर्पण करुनी श्रद्धा निरुद्ध करतो ||३||
☆
परा॒ हि मे॒ विम॑न्यवः॒ पत॑न्ति॒ वस्य॑इष्टये । वयो॒ न व॑स॒तीरुप॑ ॥ ४ ॥
द्विजगण अवघे घेत भरारी अपुल्या कोटराते
मनोरथांची कल्पना तशी तुम्हाकडे पळते
तुमच्या चरणी आर्त प्रार्थना आलो घेऊनिया
सुखलाभाच्या वर्षावाचे दिव्य दान मागण्या ||४||
☆
क॒दा क्ष॑त्र॒श्रियं॒ नर॒मा वरु॑णं करामहे । मृ॒ळी॒कायो॑रु॒चक्ष॑सम् ॥ ५ ॥
चंडपराक्रम अलंकार हा तुमचा वरूणदेवा
प्रसन्न होऊन अमुच्यावरती यज्ञी झडकरी धावा
तुष्ट होऊनीया भक्तीने आम्हाला वर द्यावा
जीवनात अमुच्या वर्षाव सुखतृप्तीचा व्हावा ||५||
☆
तदित्स॑मा॒नमा॑शाते॒ वेन॑न्ता॒ न प्र यु॑च्छतः । धृ॒तव्र॑ताय दा॒शुषे॑ ॥ ६ ॥
उभय देवता अती दयाळू स्वीकारून घेती
समसमान वाटुनिया अमुच्या हविर्भागा घेती
आज्ञाधारक यजमानावर प्रसन्न ते होती
वरदायी होती, तयाला निराश ना करिती ||६||
☆
वेदा॒ यः वी॒नां प॒दम॒न्तरि॑क्षेण॒ पत॑ताम् । वेद॑ ना॒वः स॑मु॒द्रियः॑ ॥ ७ ॥
मुक्त विहंगत व्योमातुनिया द्विजगण अगणित
मार्ग तयांचा कसा जातसे हे जाणुनि आहेत
निवास यांचा सागरावरी सदैव नि शाश्वत
तारु तरंगत कैसे जात ज्ञात यांसि वाट ||७||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
https://youtu.be/YfxdaAdbE_8https://youtu.be/YfxdaAdbE_8
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 1-7
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈