डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा १६ ते २४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्सूक्त)
ऋषी – मेधातिथि कण्व
देवता – १६-२३ अप् (पाणी); २४ अग्नि;
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी ती मुख्यतः जलदेवतेला उद्देशून हे अप् सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील सोळा ते तेवीस या ऋचा अप् (पाणी) आणि चोविसावी ऋचा अग्नि यांचे आवाहन करतात. या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अप् (पाणी) आणि अग्नि या देवतांना उद्देशून रचलेल्या सोळा ते चोवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
☆
अ॒म्बयो॑ य॒न्त्यध्व॑भिर्जा॒मयो॑ अध्वरीय॒ताम् । पृ॒ञ्च॒तीर्मधु॑ना॒ पयः॑ ॥ १६ ॥
यजमानाच्या या यज्ञाच्या माता प्रेमळ
मोद वर्धिती मधुर करोनी जलास अपुल्यातील
आशीर्वच देऊन ऋत्विजा मार्गासी जात
कर्तव्याची जाण ठेउनी अपुल्या मार्गे वहात ||१६||
☆
अ॒मूर्या उप॒ सूर्ये॒ याभि॑र्वा॒ सूर्यः॑ स॒ह । ता नो॑ हिन्वन्त्वध्व॒रम् ॥ १७ ॥
सन्निध असती त्या सूर्याला अहो भाग्य त्यांचे
भास्कर जवळी त्यांच्या उजळाया जीवन त्यांचे
त्या तर साऱ्या अमुच्या जननी हित अमुचे चिंतित
आशिष देऊनीया यज्ञाला यशाप्रती नेवोत ||१७||
☆
अ॒पो दे॒वीरुप॑ ह्वये॒ यत्र॒ गाव॒ः पिब॑न्ति नः । सिन्धु॑भ्य॒ः कर्त्वं॑ ह॒विः ॥ १८ ॥
कपिला अमुच्या प्राशन करिती पवित्र तोय जयांचे
आपदेवते कृतज्ञतेने आमंत्रण द्यायचे
सरितांमधुनी अखंड वाहे अमुचे जीवन
नतमस्तक होऊन तयांना हवीचे अर्पण ||१८||
☆
अ॒प्स्व१न्तर॒मृत॑म॒प्सु भे॑ष॒जम॒पामु॒त प्रश॑स्तये । देवा॒ भव॑त वा॒जिनः॑ ॥ १९ ॥
हे जल आहे अमृतसम दिव्य सर्वगुणी
ओखदमयी हे निरामयी हे बहुगुणी संजीवनी
देवांनो यज्ञासी यावे त्वरा करोनी झणी
स्तवन कराया या उदकाचे सुरातुन गाउनी ||१९||
☆
अ॒प्सु मे॒ सोमो॑ अब्रवीद॒न्तर्विश्वा॑नि भेष॒जा । अ॒ग्निं च॑ वि॒श्वश॑म्भुव॒माप॑श्च वि॒श्वभे॑षजीः ॥ २० ॥
अग्निदेव हा सकलांसाठी दयाळू शुभंकर्ता
राखुनिया अंतर्यामी जल आरोग्याचा दाता
रोगांचे परिहारक दिव्य उदक श्रेष्ठ बहुगुणी
ज्ञानी केले आम्हाला हे सोमाने सांगुनी ||२०||
☆
आपः॑ पृणी॒त भे॑ष॒जं वरू॑थं त॒न्वे३मम॑ । ज्योक् च॒ सूर्यं॑ दृ॒शे ॥ २१ ॥
जलशक्ती हे तुला प्रार्थना आरोग्या द्यावे
अनंतकाली आम्हासी सूर्याचे दर्शन व्हावे
निरामयाच्या वरदानास्तव दिव्यौषधी मिळावे
प्रसन्न होऊनी आम्हावरती आशीर्वच हे द्यावे ||२१||
☆
इ॒दमा॑प॒ः प्र व॑हत॒ यत् किं च॑ दुरि॒तं मयि॑ । यद्वा॒हम॑भिदु॒द्रोह॒ यद्वा॑ शे॒प उ॒तानृ॑तम् ॥ २२ ॥
पवित्र पावन निर्मल असशी जलाचिया देवते
दुर्गुण दुष्टावा शत्रुत्व नष्ट करी माते
असत्य वर्तन माझ्या ठायी त्याचे क्षालन करा
जीवनास या कृपा करोनी नेई उद्धारा ||२२||
☆
आपो॑ अ॒द्यान्व॑चारिषं॒ रसे॑न॒ सम॑गस्महि । पय॑स्वानग्न॒ आ ग॑हि॒ तं मा॒ सं सृ॑ज॒ वर्च॑सा ॥ २३ ॥
सर्व जलांनो तुमच्या पायी शरणार्थी झालो
मधुर रसांशी तुमच्या ठायी एकरूप झालो
जलनिवासि हे अनला देवा प्राप्त येथ होई
तव तेजाचे दान करोनी कृपावंत होई ||२३||
☆
सं मा॑ग्ने॒ वर्च॑सा सृज॒ सं प्र॒जया॒ समायु॑षा । वि॒द्युर्मे॑ अस्य दे॒वा इंद्रो॑ विद्यात्स॒ह ऋषि॑भिः ॥ २४ ॥
गार्ह्यपत्यदेवा आम्हाला दे आभा संतती
दीर्घायुचा आशिष देई हात ठेवुनी माथी
तुम्ही दिधले वैभव अमुचे देवांना हो ज्ञात
सर्व ऋषींसह देवेंद्राही होऊ देत विदित ||२४||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 16 – 24
Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 16 – 24
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈