मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-2…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-2…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

(संत श्री ज्ञानदेव महाराजांनी योगीराज चांगदेवांच्या कोर्‍या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी. संत ज्ञानदेवांच्या काळचं प्राकृत म्हणजेच मराठी आजच्या संदर्भात, सर्वसामान्य लोकांना कळायला अवघड आहे. म्हणून सुश्री शोभना आगाशे यांनी सध्या प्रचलित असलेल्या मराठीत या चांगदेव पासष्टीचं केलेलं रूपांतर प्रस्तुत करीत आहोत.)

जगती जे अणुरेणू

तसेच हो परमाणू

पृथ्वीचे परि पृथ्वीपण

नच झाकिती ते कण कण

विश्वाचा अविष्कार

झाकत ना त्या निराकार॥६॥

 

क्षयवृद्धीच्या कळा

चंद्रास ग्रासती सोळा

चंद्र परि नच हरपे

दीपरूपे वन्ही तपे॥७॥

 

तसाच विश्वी तोच असे

दृश्य तोच द्रष्टा असे॥८॥

 

लुगडे केवळ रूप असे

अंतरी सारे सूत असे

जसे मृद् भांडे रूप मात्र

मृत्तिका केवळ तेच पात्र॥९॥

 

द्रष्टा दृश्य यांचे परे

परमात्मतत्व असे खरे

अविद्ये कारणे मात्र असे

द्रष्टा दृश्य रूपे भासे॥१०॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरी तृतीया (तीज), आणि मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया.) ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ गौरी तृतीया (तीज), आणि मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया.) ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेला चैत्रगौर बसविली जाते. या दिवशी देवघरातच किंवा आपल्या सोयीनुसार इतर पवित्र ठिकाणी गौरीची स्थापना केली जाते. 

तृतीयेपासून चैत्र गौर बसविली जाते. या दिवसाला गौरी तीज असेही म्हणतात .देवातल्या अन्नपूर्णा देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया ) पर्यंत तिची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय. हा चैत्र महिन्यातील मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्या सुंदर पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात. या दिवशी आंब्याची डाळ,कैरीचे पन्हे,बत्तासे,भिजवलेले हरभरे,टरबूज,कलिंगड यासारखी फळे असा नैवेद्य देवीला अर्पण करण्याची पद्धत आहे. महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात.काही ठिकाणी घरी आलेल्या स्त्रिया आणि कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजवलेले हरभरे,फळे यांनी त्यांची ओटी भरतात आणि कैरीचे पन्हे,आंब्याची डाळ देऊन त्यांचे स्वागत करतात. काही ठिकाणी चैत्र गौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धत आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते . आपल्या आईकडून सर्व प्रकारची कौतुके करून घेते. मैत्रिणींबरोबर खेळते. झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते अशी कल्पना आहे. या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात रांगोळीने चैत्रांगण काढले जाते. या चैत्रांगणाच्या रांगोळीत देवीची शस्त्रे, तिची वाहने , तिची सौभाग्याची लेणी,स्वस्तिक , कमळ , सूर्य , चंद्र , गोपद्म यासारखी शुभ चिन्ह काढली जातात. रांगोळीत मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र,राधाकृष्ण , तुळशी वृंदावन अशी चित्रे काढली जातात . हीच ती चैत्रांगणाची रांगोळी.

मत्स्य जयंती, चैत्र शुद्ध तृतीया.

हिंदू वर्षाचा तिसरा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध तृतीया . हा दिवस मत्स्य जयंती म्हणून ओळखला जातो. विष्णूच्या प्रमुख दशावतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार. हा मत्स्य या दिवशी अवतीर्ण झाला असे मानतात. पुराणकथेनुसार पृथ्वीला प्रलयापासून वाचविण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला अशी कथा आहे.

राजा सत्यव्रत नदीत स्नान करून जलांजली देत असताना त्यांच्या ओंजळीत एक मासा आला. त्या माशाच्या विनंतीवरून राजा त्याला घरी घेऊन गेला. हा मासा दररोज असाधारण रीतीने मोठा होऊ लागल्याने राजाने त्याला मूळ रुपात दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू प्रकट झाले. पुढे सात दिवसांनी होणाऱ्या प्रलयाची कल्पना त्यांनी राजाला दिली पुढे त्यांनी राजाला प्राणी आणि सप्तर्षी यांना घेऊन माझ्या नावेतून चल असे सांगितले. या नावेतून जाताना मत्स्याने राजाला जी माहिती दिली ती मत्स्य पुराण म्हणून प्रचलित आहे. सत्यवत राजाने वाचविलेल्या काही प्रमुख लोकांपैकी राजा चाक्षुष हा राजा पुढे मनू म्हणून प्रसिद्धीस आला. याच मनूचे वंशज म्हणजे मानव किंवा मनुष्य, म्हणजेच आपण मानव.

या मत्स्य जयंतीच्या दिवशी “ओम मत्स्याय मनुपालकाय नम:” या मंत्राने मत्स्य अवतार प्रतिमेची किंवा भगवान विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे.

मत्स्य अवतारामागे हयग्रीव राक्षसाची पण कथा आहे. या राक्षसाने ब्राम्हदेवांचे सारे वेदांचे ग्रंथ चोरले.  त्यामुळे सर्वत्र अज्ञानाचा अंध:कार पसरला. अशा वेळी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून हयग्रीवचा वध केला आणि वेद सुरक्षितपणे ब्रम्हदेवांकडे पोहोचवले असे सांगतात.

संग्रहिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगातील एकमेव दत्त-हस्त पूजा स्थान… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ जगातील एकमेव दत्त-हस्त पूजा स्थान… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

जगातील एकमेव दत्त हस्त पूजा स्थान…… इथे आहे श्रीं चा प्रत्यक्ष कृपा हस्त …. 

कृष्णा-पंचगंगा परिसरात श्री नृसिंहसरस्वती महाराज १३६४ ते १३७६ या कालावधी दरम्यान वास्तव्यास होते. या पंचक्रोशीत ते भिक्षा मागण्यास जात असत. असेच ते शिरोळ या ग्रामी गंगाधरपंत कुलकर्णींच्या घरी भिक्षेस दुपारी गेले असता ‘ माई भिक्षा वाढा ‘ असे म्हणाले. गृह्स्वमिनीने त्यांना नमस्कार केला व चांगले स्वागत करून म्हटले की, “ गृहधनी बाहेर भिक्षेकरिता गेले आहेत. कृपया थोडे थांबावे. “ कुलकर्णीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. ‘ मी स्वयंपाक करते ‘ असे त्या म्हणाल्या. त्यांच्या घरी जोंधळ्याच्या कण्यानशिवाय काही शिल्लक नव्हते. त्याच त्यांनी शिजवल्या, पण त्या वाढायच्या कशावर असा प्रश्न होता. साधी व धड पत्रावळ देखील नव्हती.

महाराजांनी त्यांची अंतर अडचण जाणली. जवळचाच एक पाषाण घेऊन त्यावर प्रोक्षण करून त्यांनी त्यावर प्रणवचिन्ह काढले व भिक्षान्न त्यावर वाढण्यास सांगितले. भक्तवत्सल यतींनी मोठ्या प्रेमाने ते अन्न भक्षण केले व तृप्त होऊन त्यांनी तिला जाताना ‘ ह्या पात्राची पूजा करा, ४२ पिढ्यांचा उद्धार होईल, दारित्र्य, दुःख,पीडा नाहीश्या होतील, अन्नपूर्णा सदैव वास करेल ‘ असा आशीर्वाद दिला. थोड्याच वेळात कुलकर्णी घरी आले व त्यांना घडलेला वृतांत कळला. महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना वाईट वाटले. परंतू ज्या पात्रावर महाराज जेवले त्याची त्यांनी पूजा केली. त्या पाषाणावर शंख,चक्र,पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त अशी हाताची पाच बोटे उमटलेली त्यांना आढळली ! हेच ते शिरोळचे भोजनपात्र, या पात्राची पूजा कुलकर्णींच्या घराण्यात वंशपरंपरेने चालत आली आहे. प्रत्येक गुरुवारी पूजा, रात्री श्रीची पालखी, आरती इत्यादी कार्यक्रम होतात. शाही दसरा– महाराजांना ५ तोफांची सलामी दिली जाते व १२ वर्षांतून येणारे कन्यागत महापर्वकाळ वेळी २१  तोफांची सलामी असते. दत्तजयंतीला १० दिवस मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.

!!जय जय भोजनपात्रा सुपवित्रा 

                      सप्त ही जल चंद्र पूर्णा न कळे तव सुत्रा !!

!!श्री गुरुदेव दत्त!!!!

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १५ ते  २१ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १५ ते  २१   ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा १५ ते  २१

देवता : विष्णू

आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी विष्णुदेवतेला  उद्देशून रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील  बाविसाव्या सूक्तातील सोळा ते एकवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद : 

स्यो॒ना पृ॑थिवि भवानृक्ष॒रा नि॒वेश॑नी । यच्छा॑ नः॒ शर्म॑ स॒प्रथः॑ ॥ १५ ॥

कनवाळू हे पृथ्वीमाते रक्षण हे तव कर्म

विध्वंस न करणे कोणाचा हाची तुझा गे धर्म

सकलसमावेशक तू असशी आम्हावरी धरि दृष्टी

सौख्यदायि होउनी आम्हाला दान करी संतुष्टी ||१५||

अतो॑ दे॒वा अ॑वन्तु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥ १६ ॥

जेथे म्हणुनी श्रीविष्णूंनी केले आक्रमण 

अवनीच्या सप्तप्रदेशांचे  केले ते खंडन

सर्वप्रदेशी हे देवांनो करा अमुचे रक्षण

तुम्हाविना संरक्षण करण्या आहे दुसरे कोण ||१६|| 

इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दम् । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥ १७ ॥

श्रीविष्णूंनी अखील विश्व केले पादाक्रांत

वामनरूपे तीन पाऊले ठेउनिया जगतात

निमग्न झाली त्यांच्या चरणाच्या धुळीत सृष्टी

आम्हावरती धरा सदैव कृपापूर्ण तव दृष्टी ||१७||

त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥ १८ ॥

संरक्षण करतो जगताचा विष्णू अपराजित

स्थापियले अवनीवरती धर्माचे नियम समस्त

विशाल अपुली तीन पावले टाकुनिया त्याने 

अवघ्या विश्वाला व्यापीले अपुल्या मायेने ||१८||

विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥ १९ ॥

पराक्रमी विष्णूंची कर्मे अलौकीक गाजती 

कृत्यांच्या योगे ते  साऱ्या कर्मांना पाहती 

इंद्राचा हा सहाय्यकारक असे स्नेही त्याचा

श्रद्धेच्या दृष्टीने पहावे  कर्मांना त्याच्या ||१९||

तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यन्ति सू॒रयः॑ । दि॒वीव॒ चक्षु॒रात॑तम् ॥ २० ॥

पंडित जेव्हा  विष्णूच्या त्या परमपदा पाहती

महती त्याची जाणून घ्याया जिज्ञासू होती

चकित होऊनी विस्मयकारक विष्णूलोकाने 

नेत्र तयांचे विस्फारत जणु व्योमाच्या दर्शने ||२०||

तद्विप्रा॑सोःविप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते । विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दम् ॥ २१ ॥

सदैव जागृत भक्त स्तवितो बुद्धिशाली विद्वान 

परमपदाने विष्णूच्या त्या प्रभावीत होऊन 

ज्ञात जाहल्या विष्णूलोकाचे करिती स्तवन

अखील विश्वामध्ये प्रसार करिती त्या गाउन ||२१||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/khU_eGlo-GY

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21

Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 15 – 21

 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी थाळी— ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी थाळी— ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

अशी थाळी – Rice plate बहुतेक फक्त मराठीतच असावी — आवडीने जेवा. 

बोलाचा भात, 

बोलाची कढी, 

चापट पोळी, 

अक्षतांच्या वाटाण्याची उसळ 

पुराणातील भरले वांगे

मनातले मांडे

खुशीतल्या गाजराची कोशिंबीर

बिरबलकी खिचडी

ऊत आणलेली शिळी कढी

नावडतीचं अळणी मीठ

धम्मक लाडू

तिळपापड 

नाकाला झोंबणारी मिरची 

नाकाने सोललेले कांदे 

भ्रमाच्या भोपळ्याचं भरीत

भेंडी गवार मसाला

लपवलेल्या भांड्यातलं ताक 

ताकास लावलेली तूर

हातावर दिलेली तुरी

पाठीवरच्या धिरड्याने केलेला पचकावडा 

आंबट द्राक्षे न खाणारा कोल्हा आणि त्याला राजी असलेली काकडी

चिमणीच्या दाताने तोडलेल्या गोळ्या

वाजणारी गाजराची पुंगी

 

सर्वात शेवटी गोड/उर्दू पदार्थ म्हणून 

खयाली पुलाव

इज्जतचा फालुदा

 

आणि मुखशुद्धीला 

पैजेचा विडा !

 

असे जेवण झाल्यावर पाहुण्याला भरल्यापोटी नारळ देण्याची प्रथा आहेच !!

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – स्वा. सावरकरांची दहशत ! — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ – स्वा. सावरकरांची दहशत ! — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  

(— कोणाला व किती वाटायची —)

दिल्लीचे पालम विमानतळ ! 

विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. 

त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्याकाळी काम करत होती.

ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहिले आणि मराठीतून विचारले…

“तुम्ही श्री ***** ना ?”

त्या अधिकाऱ्याने सांगितले…”हो”.– ” पण मी आपणास ओळखले नाही !”

त्या प्राचार्यांनी सांगितले… ” तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये “

क्षणार्धात ओळख पटली.

प्राचार्यांनी विचारले…  *”ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहिले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्यात दीडशे गुणांचा फरक होता. आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते. बरोबर ?”*

ते अधिकारी उत्तरले “हो.”

“कारण माहीत आहे?”, प्राचार्यांनी विचारले.

“नाही” .. ते अधिकारी उत्तरले.

“जाणून घ्यायचंय ?” .. प्राचार्य.

“हो”, .. अधिकारी.

“सांगतो…”, प्राचार्य.

त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे —–

ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते “रत्नागिरी” ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .

त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता. सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.—-  “आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला…. ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षक असल्याने मला सर्व माहीत आहे.”

—सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.

जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले, ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.

— हे प्राचार्य होते रँग्लर रघुनाथराव परांजपे …

— आणि हा विद्यार्थी होता श्रीराम भि.वेलणकर ! संस्कृत भाषेचे तज्ञ ! —- *आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते….*

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

समर्थ रामदासजींनी दासबोध, आत्माराम, मनोबोध इत्यादी ग्रंथ रचले आहेत, तसेच शेकडो ‘अभंग’ही लिहिलेले आहेत. यासोबतच समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ९० पेक्षा अधिक आरत्या महाराष्ट्रातील घरा- घरात म्हटल्या जातात.

समर्थांचा गायनीकलेचा अभ्यास होता. ‘धन्य ते गायनी कला’ असे म्हणून समर्थांनी गायनीकलेचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेत लयीचा गोडवा अनुभवता येतो. पारमार्थिक विचार असो, आत्मनिष्ठ, अभ्यासपूर्ण चिंतन असो, ते लयीत मांडण्याची खुबी रामदास स्वामींजवळ आहे. याचा प्रत्यय त्यांनी रचलेल्या आरत्यांतून घेता येतो. 

गणपती उत्सवात रामदासांनी रचलेल्या आरत्या म्हटल्या जातात. त्या आबालवृद्धांच्या तोंडी सहजपणे येतात. त्या आरत्यांची लोकप्रियताही वर्षानुवर्षे टिकून राहिली आहे. याला कारण म्हणजे त्या आरत्यांतील गेयता, चपखल शब्दरचना, लयबद्धता, शब्दांचे माधुर्य, आघात, भाषेतील ठसका..!

वीररसाने युक्त अश्या हनुमंताची ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन’चा भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. 

आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

हनुमंताच्या ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ या आरतीतील शब्दरचना मारुतीची प्रचंड शक्ती, अद्भुत कार्य नजरेसमोर उभे करतात. त्यातील शब्द हृदयावर आघात करीत आपले बल वाढवतात. समर्थ भाषाप्रभू होते. गेयता, लय, उचित शब्दयोजना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात.

हनुमंताचे कार्य जेवढे अफाट, तेवढेच त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट. म्हणूनच हनुमंताची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते. परंतू , या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ नीट समजून घेतला, तर ती पाठ होणे अवघड नाही.  

समर्थ रामदास रचित, म्हणायला अवघड परंतू आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ —- 

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।

कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर, त्या झाल्या पळणी ।। १ ।।

(आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊ या. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने.)

भावार्थ :-समर्थ रामदास वर्णन करतात- मारुती स्वत:च्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली. सागराच्या पाण्यावर उत्तुंग लाटा उसळल्या आणि त्या आकाशापर्यंत पोचून तिथेही खळबळ माजली. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली. पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली. देव, मानव, राक्षस या सर्वांना पळता भुई थोडी झाली. ।।१।।

जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता, 

तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता।। धृ।।

(कठीण शब्दांचा अर्थ:- ‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू.)

भावार्थ :- अशा भीमकाय हनुमंता तुझा जयजयकार असो. तुझी कृपा असली, की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही. ।।धृ।।

 दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद ।

कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।

(कठीण शब्दांचा अर्थ –  ‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला. ‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक. ‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.)

भावार्थ :– सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला. त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला. त्याचा त्रास होऊन पर्वताचा सुद्धा थरकाप झाला. पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणीमात्रांवर मोठी आपत्ती आली. पक्ष्यांचा विनाशकाळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. तुझ्याठायी असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले. परंतू, या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्त्वाचे ! ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरलीस, यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे. 

— ‘दुमदुमले पाताळ’ किंवा ‘थरथरला धरणीधर’, ‘कडकडिले पर्वत’ या शब्दांतून वीररसाचा आविर्भाव होतो. हा वीरमारुती होय.

— ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1 …  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

(संत श्री ज्ञानदेव महाराजांनी योगीराज चांगदेवांच्या कोर्‍या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी. संत ज्ञानदेवांच्या काळचं प्राकृत म्हणजेच मराठी आजच्या संदर्भात, सर्वसामान्य लोकांना कळायला अवघड आहे. म्हणून सुश्री शोभना आगाशे यांनी सध्या प्रचलित असलेल्या मराठीत या चांगदेव पासष्टीचं केलेलं रूपांतर प्रस्तुत करीत आहोत.)

जंव अप्रकट परमेश

विश्वाचा होतसे भास

प्रकट होई तो जेधवा

नुरे विश्व भास तेधवा॥१॥

 

अप्रकट तो जरि भासे

प्रकट परि नच दिसे

दृश्यादृश्य परे

गुणातीत असे बरे॥२॥

 

विशाल जसजसा होत

व्यापतसे तो जगत

भासचि हा परि जाणी

असुनि नसे घे ध्यानी॥३॥

 

रूपे बहु घेई जरी

अरूपातच असे खरी

अलंकार बनले जरी

सुवर्णा ना उणे तरी॥४॥

 

लाटांच्या झिरमिळ्या

सागरास पांघरल्या

भासचि हा जाण केवळ

सकळ असे निव्वळ जळ॥५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझा कात्र्यांचा संग्रह !… श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

माझा कात्र्यांचा संग्रह !… श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

सर्वसाधारण माणसांच्या घरात हमखास आढळणारी एक साधी पण उपयुक्त वस्तू म्हणजे कात्री !  लहानपणी वापरायला बंदी असलेली आणि ” काका काकूवर कातावले. कारण काकूने काकांचे कामाचे काही कागद कात्रीने कराकरा कापून काढले ” अशा अनुप्रासातून मनात जाऊन बसलेली कात्री. सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया ( इजिप्त ) येथे एकाच धातूच्या पट्टीच्या दोन्ही टोकांना धारदार पाती असलेली कात्री अस्तित्वात होती. १६६३ मध्ये चीनमध्ये आणि १७६० मध्ये इंग्लंडमध्ये कात्र्यांचे उत्पादन होऊ लागले. आत्ताच्या स्वरूपातील कात्री रॉबर्ट हिंक्लीफ याने १७६१ मध्ये वापरात आणली. फिनलँडमधील कात्र्यांच्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या फिस्कर या गावाच्याच नावाने, म्हणजे FISKAR या ट्रेड मार्कखाली १८३० मध्ये कात्र्यांचे मोठे उत्पादन व्हायला सुरुवात झाली.

माझ्याकडे अशा अनेक कात्र्यांचा एक छोटेखानी संग्रह आहे.

कात्री ही दोन पात्यांची बनलेली असल्याने इंग्रजीत कात्रीला pair of Scissors  किंवा नुसतेच Scissors (मूळ फ्रेंच शब्द Cisoires) असे अनेकवचनी नाव वापरले जाते. संस्कृतमध्ये कात्रीला शरारी मुखी म्हणजे ” शर (↑ = बाण )  + आरी (l = छोटी करवत ) मुखी ” असे एक संयुक्तिक नाव आहे. कात्रीचे ‘ कापणे ‘ हे एकच काम असले तरी ती अत्यंत बहुगुणी, सर्वगामी, बहुरूपी आहे. महागाईमुळे खिशाला लागणारी, चित्रपटाला आणि नाटकाला सेन्सॉरची लागणारी, बजेटमध्ये खर्चाला लागणारी अशा अनेक अदृश्य कात्र्या आहेतच ! 

कात्रीने व्यापलेली क्षेत्रे, तिचे उपयोग आणि तिची भन्नाट रूपे पाहिली की आपण चक्रावून जातो. 

कापडाशी संबंधित — कापणे, भरतकाम,नक्षीकाम, काज करणे ( बटन होल ), काही खास आकार कापणे या सर्वांसाठी वेगवेगळ्या कात्र्या  

कागद —————— कापणे, किरीगामी, नक्षीकाम यासाठी वेगवेगळ्या कात्र्या  

धातू    —————— पत्रे, तारा कापणे. 

झाडे  ——————- छोट्या फांद्या छाटणे, मोठ्या फांद्या तोडणे, गवत कापणे, फुले  तोडणे, बोन्साय वृक्ष निर्मिती या सर्वांसाठी खास कात्र्या  

सौंदर्य साधना ——— केस, नखे, मिशी, भुवया कापणे / कोरणे. अगदी नाकातील व पानावरील केस कापण्यासाठी सुद्धा अत्यंत वेगळ्या कात्र्या उपलब्ध आहेत. 

वैद्यकीय शास्त्र ——– अत्यंत उच्च दर्जाच्या पोलादापासून बनविलेल्या कात्र्या – विविध अवयवांच्या शस्त्रक्रिया, बँडेज बांधणे – काढणे 

प्राणी ——————– शेळ्या मेंढ्यांच्या अंगावरील लोकर कापणे 

स्वयंपाकघर ———— विविध भाज्या कापण्यासाठी, तुकडे करण्यासाठी.  

गालिचे —————— गालिच्याच्या विणकामातून वर येणारे जाड धागे कापण्यासाठी. 

दिव्यांच्या वातींसाठी — दिव्याची वात जळत असतांना त्यावरील काजळी काढून टाकणे, वात कापणे यासाठी अत्यंत कलात्मक कात्र्या वापरल्या जात असत. त्यांना वातेऱ्या म्हटले जाते. 

काही खूप वेगळ्या प्रकारच्या कात्र्या — जर अर्धाच चिरूट ओढायचा असेल तर त्यासाठी चंद्रकोरीसारखी पाती असलेली कात्री उपलब्ध होती. याच आकाराची पण खूप मोठी कात्री बर्फाच्या मोठमोठ्या  लाद्या ओढून नेण्यासाठी वापरतात. पानवाले  विड्याची पाने कापण्यासाठी हलकी व मोठ्या मुठींची कात्री वापरतात. आपल्याकडे विविध उदघाटनांसाठी सुंदर आकाराच्या, चांदीच्या, सोन्याचे पाणी दिलेल्या कात्र्या वापरण्याची पद्धत आहे. पाश्चिमात्य देशात अगदी ३ ते ४ फुटांच्या, सोन्याचे पाणी दिलेल्या आणि हजारो रुपये किंमत असलेल्या कात्र्या वापरल्या जातात. 

डावखुऱ्यांसाठी खास कात्र्या —  कात्रीच्या टोकेरी पाते असलेल्या बाजूला अंगठा अडकविला जातो व अंगठा हा पात्याच्या अधिक जवळ असतो. खालच्या बाजूचे पाते हे रुंद असून त्याची मूठ ३ किंवा ४ बोटे राहतील इतकी मोठी असते. अशी रचना उजव्या हाताने कापणाऱ्यांसाठी आहे. डावखुऱ्या माणसासाठी असलेल्या कात्रीमध्ये ही रचना बरोबर उलट म्हणजे आरशातील प्रतिमेप्रमाणे असते. पण याचा खप फारसा नसल्याने ती आता खूपच दुर्मिळ झाली आहे. त्याचप्रमाणे पायाने चालविता येईल अशी कात्रीही निर्माण केली गेली होती. 

कात्री आणि अंधश्रद्धा ?

आता अंधश्रद्धा म्हटल्यावर त्या हिंदूंच्याच असतात का ? आपल्याकडे कात्री ही कुणाच्याही हातात देऊ नये, ती उघडलेल्या स्थितीत ठेऊ नये आणि त्याचा कचकच असा आवाज करू नये असे म्हणतात. पण याच्या मागे फक्त सुरक्षिततेचाच विचार आहे. कात्री दुसऱ्याच्या हातात न देता ती खाली ठेवावी व त्यांनी ती उचलून घ्यावी. देताना जर ती हातातून सुटली तर खाली पायावर उभी पडून मोठी इजा होऊ शकते. कात्री उघडी ठेवल्यामुळे आणि कचकच वाजवतांना होणारी हालचाल यामुळे इजा होऊ शकते. त्यामुळे या अंधश्रद्धा मुळीच नाहीत. पाकिस्तानात अशी कात्री ठेवणे किंवा वाजविणे अशुभ मानले आहे. ( म्हणजे एकूण तेच ). युरोपमध्ये लहान मुलाला वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून बाळाच्या पाळण्यावर नुसतीच छोटी कात्री किंवा क्रॉसप्रमाणे उघडून ठेवण्याची पद्धत होती. न्यू ऑर्लिन्स मध्ये तर रात्री उशीखाली उघडी कात्री ठेवल्यास दुष्ट शक्तींपासून रक्षण होते असे मानले जात असे. तर काही ठिकाणी कात्री उघडून ठेवल्यास एकमेकात भांडणे होतात असे मानत असत. आफ्रिकेतील काही भागांमध्ये नवरदेवाला अपशकुन करण्यासाठी, वाईट शक्तींकडून विघ्न यावे यासाठी उघडलेल्या कात्रीचा वापर केला जात असे. 

इतकी बहुगुणी आणि बहुपयोगी कात्री आपल्या समजुतींमुळे उगाच बदनाम होते. पण तिची मात्र काहीच कचकच नाही ! 

सोबतच्या विविध कात्र्यांची चित्रे जरूर पाहा ! 

(काही संदर्भ सौजन्य – विकिपीडिया)

(हा लेख व फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत)

लेखक : श्री मकरंद करंदीकर

[email protected]

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गुढीपाडवा… कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ गुढीपाडवा… – कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

अर्वाचिन संपदेला हिंदु संस्कृतीच जपती !

हिंदुकुशाते हिंदुसागरी वर्धिली हिंदु संस्कृती ! १-

 

आसेतु हिमाचल भ्रमण साधु संतांनी केले !

समृध्दी निर्मितीकरितां हजारो वर्ष ते झटले ! २-

 

हीनं दुष्यति इति हिंदु ! ऋग्वेदचि ठरे आपद्धर्म !

हीन त्यागतो !शत्रूस नमवितो तोच खरा हिंदु धर्म ! ३-

 

एक पत्नी एक वचनी कौसल्येचा राजा राम !

पितृवचन पालन करण्या वनवासी जाला राम ! ४-

 

चौदा वर्षे दंडकारण्ये ऋषिमुनींना अभय देई राम !

जनकल्याणास्तव खलनिर्दालन करितो राम ! ५-

 

राजधर्म पालन करणे प्रथमकर्तव्य रामाकरता !

पतिव्रता सीता करिते अग्निदिव्य रामाकरता ! ६-

 

रामासंगे सीता येतां धन्य जाले अयोध्याजन !

गुढ्या तोरणे उंच उभारतां जणु भासले आनंदवन ! ७-

 

कळक दावितो साधेपणा कलश तो समृध्दी वैभव !

काठपदरी घरपण बत्तासे कडुनिंब दावि आगळा भाव ! ८-

 

नरेंद्र लढतो सकल जनकल्याणार्थ !

नेणिवेने जाणिला जपला हाच असे परमार्थ ! ९-

 

अयोध्या मंदिर काशी विश्वेश्वर मुक्ती करती !

जाणवली दिव्यत्वाची येथ प्रचिती ! १०-

 

आठवे विनायकी विचार ! शस्रसिध्द राष्ट्रनिर्माण !

नरेंद्र दावितो सिध्दचि करितो साधुनि जनकल्याण ! ११-

 

तत्व स्वत्व नि स्वधर्म रक्षिण्या लढा देऊ या एकदिलाने !

उभवू या पुन्हा गुढ्यातोरणे ! जरिपटका तो सन्मानाने !

       …… जरिपटका तो सन्मानाने ! १२— 

 

कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print