मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुवर्णवेध… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सुवर्णवेध… ☆ श्री संभाजी बबन गायके 

(भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्सचा अचूक लक्ष्यवेध !) 

तिचे डोळे भेदक आहेत… तिच्या पायांतील धनुष्याची प्रत्यंचा प्रचंड आवेगाने ताणलेली असते तिने… श्वास रोखून धरलेला असतो तिने आणि ते पहात असलेल्या माणसांनी सुद्धा. बाण निघतो.. वा-याशी गुजगोष्टी करीत… जणू एखाद्या सुंदर कवितेतील शब्द त्यांच्यातून अपेक्षित अर्थासह ऐकणा-याच्या कानांवर पडत राहावेत… तसा बाण अचूक जाऊन स्थिरावतो लक्ष्याच्या काळजात… मधोमध! हा सुवर्णवेध असतो! 

नोव्हेंबर, २०१६. बंगळूरू. दोन नवे कोरे करकरीत हात बसवल्यावर “तू सर्वांत आधी काय करशील?” असा प्रश्न निष्णात अस्थिशल्य चिकित्सक डॉक्टर शिवकांत यांनी तिला विचारला… त्यावर तिने उत्तर दिले, ”मला माझ्या या हातांत बांगड्या घालायच्या आहेत!” 

पंधरा वर्षांची नवतरुण पोर ती… या वयात तिला चारचौघींसारखं नटायला आवडणं साहजिकच होतं. ती जन्मलीच मुळी दोन्ही हातांविना. Phogomelia नावाचा एक अत्यंत दुर्मिळ विकार तिला झाला होता. आईच्या गर्भातच बाळाच्या हातांची वाढ खुंटते. हात खांद्यापाशी सुरु होतो आणि तिथेच संपतो. पण तिच्या आई-वडिलांनी याही स्थितीत तिला जगवलं, वाढवलं आणि शाळेतही घातलं. मुलली हाताशी नसते तेंव्हा आईला अगदी हात मोडल्यासारखं वाटतं.. इथे तर या मुलीला हातच नव्हते. ती तिला कशी मदत करणार घरात, शेतात? आणि तिचं तिला स्वत:चं सुद्धा तसं काहीच करता येत नव्हतं. पण पोटाचा गोळा… आई-बाप कसा बारा टाकून देतील? 

जम्मू-कश्मीर मधल्या ज्या अत्यंत दुर्गम अशा किश्तवाड जिल्ह्यातील लोईधार गावात ही पोर जन्माला आली तो भाग डोंगर द-यांनी वेढलेला. ही आपल्या कोवळ्या पायांनी दुडूदुडू धावायला शिकली आणि तिला सर्व डोंगर पायांखाली घालायचे बाळकडू मिळाले. केवळ पायांच्या साहाय्याने ती चक्क झाडांवर चढू उतरू लागली… पण तिच्या भविष्याच्या वाटेवर खोल दरी होती… आणि त्या दरीत ती आज न उद्या कोसळणार होती.

तिच्या राज्यात राष्ट्रीय रायफल्स ही तिच्याच देशाची मोठी लष्करी तुकडी तैनात आहे. तिच्या राज्यातली काही माणसं इतरांच्या सांगण्यावरून आपल्याच देशाविरोधात उभी राहीली तेंव्हा देशाने त्यांच्या बंदोबस्तासाठी हे सैनिक तिच्या राज्यात पाठवले होते. पण हे सैन्य केवळ बंदुकीच्या जोरावर मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत नाही, तर ‘सदभावना’ जागृत करून चुकीच्या मार्गाने जाऊ पाहणा-या युवकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असते. राष्ट्रीय रायफल्स, डोग्रा रेजिमेंटने मुघल मैदान येथे आयोजीत केलेल्या अशाच एका सद्भावना कार्यक्रमात अत्यंत चपळ, उत्साही असलेली ‘ती’ लष्करी अधिका-यांच्या नजरेस पडली… आणि वर वर कठोर भासणा-या सहृदयी लष्कराने तिला आपल्या पंखांखाली घेतले आणि आकाशात भरारी मारण्यास उद्युक्त केले!

देशासाठी प्राणार्पण केलेल्या मेजर अक्षय गिरीश साहेबांच्या मातोश्री मेघना गिरीश ह्या आपल्या शूर मुलाच्या स्मरणार्थ मदत संस्था चालवतात. लष्कराने त्यांच्याशी या मुलीच्या पुनर्वसनासंदर्भात संपर्क साधला. त्यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्याही कानांवर ही बाब घातली. The Being You नावाने NGO (बिगर शासकीय संस्था) चालवणा-या समाजसेविका प्रीती राय यांनीही तिच्या केस मध्ये समरसून लक्ष घातले.

तिच्या शरीराची रचनाच अशी होती की कृत्रिम हात बसवूनही फारसा उपयोग होणार नव्हता. पण तरीही त्यांनी हा प्रयत्न करून पाहिला. आणि त्याचवेळी प्रीती राय यांनी तिचा परिचय दिव्यांग जलतरणपटू शरथ गायकवाड, अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधार शेखर नाईक यांच्याशी करून दिला. दिव्यांग व्यक्ती क्रीडा प्रकारांत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होऊ शकतात, हे तिला नव्याने समजले. तिचे सर्वांग या नव्या साहसासाठी आतुर झाले.

प्रीती राय यांना मार्क स्टूटझमन नावाचा एक ऑलिम्पिक विजेता धनुर्धर माहित होता. दोन्ही हात नसताना केवळ पायांच्या साहाय्याने मार्क अगदी बिनचूक लक्ष्य वेधण्यात निष्णात होते. त्यांच्याच पावलांवर हिने पाऊल टाकले तर ही कमाल करून दाखवेल असा विश्वास सर्वांना वाटला. वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने तिची प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दोन प्रशिक्षक तिथे तिला लाभले.. कुलदीप वैधवान आणि अभिलाषा चौधरी. वैष्णोदेवी जवळच्या कटरा येथे प्रशिक्षण केंद्र होते. घरापासून कधी फारशी दूर न गेलेली ती.. आता तिच्या घरापासून तब्बल दोनशे किलोमीटर्सवर असलेल्या या अनोळखी ठिकाणी काहीतरी करून दाखवण्याच्या भक्कम इराद्याने आली… सोबत तिची आई शक्ती देवी सुद्धा आली होती. वडील आणि मोठी बहीण गावी शेती पाहण्यासाठी थांबली. सराव सुरू झाला. दोन पाय, दोन खांदे एवढेच काय ते तिच्यापाशी होते… धनुष्याची प्रत्यंचा ताणायला आणि बाण सोडायला. पायांत पेन्सिल धरून लिहायला ती शाळेत शिकली होतीच. तिला धनुष्याची दोरी चढवणे अवघड गेले नाही. पण बाण सोडायचा कसा? तिच्या प्रशिक्षकांनी स्वत: एक छोटे उपकरण विकसित केले.. जे तोंडात धरले की त्याच्या साहाय्याने बाण सोडता येतो! एकलव्याला अंगठा नव्हता… आणि हिला हात. पण काहीही अडले नाही. ती एका पायाने दोरी ओढते… जबड्याखाली दाबून धरते… एक डोळा मिटून घेते… ती अर्जुन बनते! अल्पावधीतच तिचे बाण नेमके लक्ष्यवेध करू लागले. अशा प्रकारे बाण मारू शकणारी ती… जगातली पहिली महिला ठरली… आणि या धनार्विद्येच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. सराव सुरू केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ती आंतरराष्ट्रीय धनुर्धर बनली. आशियाई स्पर्धेत चीन मध्ये, नंतर युरोपमध्ये झालेल्या दिव्यांग खेळाडूंच्या स्पर्धांत ती चमकली. एक नव्हे तर दोन सुवर्णपदके तिने पटकावली. एका स्पर्धेत तर ती प्रचंड आजारी असताना, सलाईन लावावे लागले अशा स्थितीत खेळली आणि जिंकली… यामागे तिची मेहनत, प्रशिक्षकांची चिकाटी आणि भारतीय लष्कराचे पाठबळ यांसारख्या अनेक बाबी होत्या… यश असे सहजासहजी मिळत नसते! 

ती भारतात परतली प्रचंड आत्मविश्वास घेऊन. आपण जिंकू शकतो याची जिद्द बाळगून. भारत सरकारने माननीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते तिला अर्जुन हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान करून गौरविले. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही तिला विशेष प्रोत्साहन दिले.

तिच्या यशाचे श्रेय तिने सर्वप्रथम तिच्या आईला दिले…. मां है तो मुमकीन है.. असे ती म्हणते. शक्ती देवी हे तिच्या आईचे नाव. ही निरक्षर आई तिच्या सोबत शक्ती बनून उभी राहिली! तिची कामगिरी पाहून प्रचंड प्रभावित झालेले उद्योगपती महिंद्र यांनी तिला दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष रचना असलेली मोटार कार भेट देण्याची घोषणा केली. तेंव्हा तिने ‘मी १७ वर्षांची आहे.. सज्ञान झाल्यावर आपली भेट स्वीकारेन.. ’ असे महिंद्र यांना नम्रपणे कळवले!

ही म्हणजे Paris दिव्यांग ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन करून देशाला पदक मिळवून देणारी शीतल मानसिंग देवी! 

भारतीय लष्कराने या बलशाली मुलीला खेड्यातून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. राष्ट्रीय रायफल्स आणि लेखात उल्लेख केलेल्या इतर सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांचे आणि अज्ञात सहका-यांचे हार्दिक अभिनंदन! जय हिंद!  🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वारूळ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ वारूळ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 चल गं सये वारुळाला, वारुळाला

 नागोबाला पुजायला पुजायला

 नागपंचमीच्या अनेक लोकगीतातील हे एक गीत शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, शेताच्या एका कडेला किंवा पडीक माळरानात आपल्याला वारूळ दिसते. या(आयत्या) वारुळात साप, नाग राहतात ते शेतकऱ्यांचे मित्र असतात म्हणून वारुळांची पूजा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केली जाते. तसेच वारुळात असणाऱ्या मुंग्यांना देखील लाह्या खायला देतात. याचे कारण पावसाळ्यात त्यांना वारुळाच्या बाहेर येऊन अन्न गोळा करणे शक्य नसते. यावरूनच शेतकऱ्यांच्या शेती जीवनातील वारुळाचे महत्त्व आपणास कळते. पूर्वीच्या माणसांना विज्ञान माहीत नव्हते मात्र अनुभवाचे ज्ञान दररोजच्या निरीक्षणातून पक्के होते. तो निसर्गातील वेगवेगळ्या चमत्काराबद्दल, किमयेबद्दल, सूक्ष्म बदलाबद्दल परिचित होता म्हणूनच निसर्गाबद्दल तो कृतज्ञ होता. पूर्वजांच्या सर्व चालीरितींचे अनुकरण आणि परंपरांचे पालन करत होता. निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून निसर्ग जपत होता, त्याची पूजाही करत होता.

निसर्ग आपला नेहमीच मार्गदर्शक असतो, निसर्गातील प्रत्येक घटक मानवास एक उपदेश, संदेश देत असतो. मुंगी निसर्गातील एक छोटासा घटक पण तिचे जीवन आपल्यापुढे एक आदर्श आहे. त्यांचे घर, एकोपा, परस्पर साहचर्य, नियोजन, चिवटपणा, जिद्द सर्वच गोष्टी माणसाने शिकण्यासारख्या आहेत.

मुंग्यांच्या घराला वारूळ असे म्हणतात. इंग्रजीत anthill. मातीचे कण आणि तोंडातील चिकट द्रवाला एकत्र करून मुंग्या वारूळ बांधतात. वरून साधे सोपे वाटणारे वारूळ आतून मात्र खोल खोल गुंतागुंतीच्या कप्प्यांचे असते. म्हणूनच पूर्वीच्या दंतकथामध्ये वारुळांच्या खाली भुयार, राजमहाल असल्याचे काल्पनिक उल्लेख आहेत. वारुळांची रचना अशी गूढच असते. वारुळाची रचना टोकाकडे निमुळती असल्याने कितीही पाऊस पडला तर पाणी वरून वाहून जाते आणि वारूळ आतून कोरडी राहतात. इतकेच नव्हे तर कारखान्याचा धूर जसा धुराड्यामार्फत उंचावर सोडला जातो त्याचप्रमाणे वारुळातील उष्णता या ढिगाऱ्यामुळे हवेत सोडली जाते. वर्षभर मिळेल तितके धान्य, अन्नकण वेचून मुंग्या वारुळात नेऊन धान्य कोठारात साठवतात आणि नडीआडीला हे धान्य वापरतात. माणूस जसे घराची साफसफाई करून घर स्वच्छ ठेवतो तसेच मुंग्याही आपल्या कोठारांची साफसफाई करतात. कचरा, निरुपयोगी धान्याचे कण, मेलेल्या कीटकांचे अवशेष त्या वारुळाबाहेर आणून टाकतात. कणसात दाणे भरले की पाखरे कणसांवर तुटून पडतात. पाखरांच्या चोचीतून खाली पडलेले असे धान्य तसेच खळ्यात पडलेले धान्य, मळणी करताना इकडे तिकडे पडलेले धान्य- बाजरी, ज्वारी, गहू मुंग्या वारुळात नेतात. सुगीचा काळ हा मुंगीपासून जनावरे, माणसे सर्वांनाच आनंददायी असतो. वेगवेगळ्या मुंग्यांची वारुळे वेगवेगळी असतात. मुंग्यांच्या जिद्दीचा अनुभव मी बरेचदा बघितला. रस्त्याच्या कडेला एकदा मुंग्यांनी वारूळ खोदायला सुरुवात केली. थोडीफार जमीन भुसभुशीत होताच मोठा पाऊस आला आणि वारूळ मुजुन गेले. मला वाटलं मुंग्या आता दुसरीकडे वारूळ करतील पण दुसऱ्या दिवशी पाऊस उघडल्यानंतर त्याच जागेला वारूळ खोदायला सुरुवात केली. बरेचदा एखाद्या प्राण्याने किंवा किटकाने त्यांच्यावर हल्ला केला की एकजुटीने त्या शत्रूस कडकडून चावतात अगदी सापाला सुद्धा!

वाळव्याची सुद्धा वारुळे असतात. असे म्हणतात की वारुळाच्या साहाय्याने भूगर्भातील पाणी शोधण्यास मदत होते. तसेच वारुळाच्या मातीचा औषधासाठी, शेतीतील उत्पादनवाढीसाठी होतो म्हणून शेतकऱ्यांना वारुळे फायद्याची असतात. गांडूळे जशी जमीन भुसभुशीत करतात तसेच मुंग्यासुद्धा जमीन भुसभुशीत करायचे काम करतात. मुंग्या माती फिरवतात आणि वायू देतात ज्यामुळे पाणी आणि ऑक्सिजन वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतात. मुंग्या बियांचा भाग असलेल्या पौष्टिक इलिओसोम्स खाण्यासाठी त्यांच्या बोगद्यात बिया घेतात. या बिया अनेकदा उगवतात आणि नवीन रोपे वाढतात, पसरतात यासाठीच वारुळांचे संवर्धन केले जाते. आतमध्ये वारूळ जितकी खोल तितकेच उंच वर आणलेले मातीचे निमुळते ढिगारे असतात. एक मीटर ते पाच-सहा मीटर पर्यंत त्यांची उंची असते. हिरवाईत लपलेले एखादे उंच वारूळ लांबून एखाद्या मंदिराप्रमाणे किंवा पर्वताच्या सुळक्यासारखे सुंदर दिसते. इयत्ता सातवीत आम्हाला बालभारतीमध्ये कवी श्रीकृष्ण पोवळे यांची ‘वारूळ’ नावाची अतिशय सुंदर कविता होती. त्यात कवीने वारुळाला हीच उपमा दिली आहे.

 वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ

 कृमी कीटकांनी बांधले देऊळ

 शेतकऱ्यांच्या जीवनात असलेले वारुळांचे महत्व आता शेतकरीच विसरू लागले आहेत. कधी साप, नाग पकडण्यासाठी तर कधी अंधश्रध्दापायी तर कधी शेतीचे क्षेत्र कमी होईल म्हणून वारूळ खोदून नष्ट केली जात आहेत. लहानपणी आम्हाला बाई वारुळाची पूजा करायला नेत असत. सोबत आणलेल्या लाह्या वारुळावर विस्कटायला लावत. त्यावेळी तो फक्त उपचार वाटत होता पण आज त्यामागील उपयुक्तता व सहसंबंध लक्षात येतो. जुनाट, कालबाह्य, निरुद्धेश्य रूढी म्हणून आपण चांगल्या गोष्टी, परंपरांचा त्याग करत आहोत, निसर्गाचा ऱ्हास करत आहोत पण निसर्ग आणि माणूस परस्परावलंबी आहेत. निसर्गाचा ऱ्हास हाच मानवाच्या विनाशाचे कारण ठरत आहे पण माणूस कधी डोळे उघडणार?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ढालगज भवानी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ढालगज भवानी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

ढाल म्हणजे ढाल आणि गज म्हणजे हत्ती अशी या शब्दाची फोड.

युद्धाच्या मैदानात अगदी पुढे जो ढालीसारखा शत्रूच्या सैन्याला सामना करणारा पहिल्या फळीतला हत्ती हा ढालगज असे.

या हत्तीवर राजचिन्हे, वस्त्रे सजवलेली असत आणि ध्वज घेऊन एक दोन सैनिकांना बसवले जायचे. त्यांचे काम ध्वज फडकवत ठेवणे आणि पुढे पुढे चाल करत राहणे हे असे. , ढालगजावरून ध्वज खाली उतरला कि मागच्या सैनिकांना पराभवाचा संदेश मिळे.

या ढालगजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या हत्तीच्या गंडस्थळावर एक मोठी ढाल बांधलेली असायची. पूर्वीच्या काळी किल्ले, राजवाडे यांच्या मुख्य द्वाराला ते कोणी तोडू नयेत म्हणून मोठे अणकुचीदार सुळे लावलेले असत. असे द्वार कपाळाला ढाल बांधलेला ढालगज हत्ती धडका देऊन तोडून टाके आणि किल्ल्याचा विजय सुकर करे. म्हणूनच ढालगज हत्तीला सैन्यात सर्वात जास्त महत्व असे.

जशी युद्धासाठी घोड्यांचे परीक्षण केले जायचे त्याच प्रमाणे ढालगज निवडण्यासाठी हत्तींचेही परीक्षण होत असे. पहिल्या फळीतला ढालगज होणे म्हणजे काही सोपे काम नव्हते. हा हत्ती चपळ, निडर आणि हुशार असायला हवा. तोफेच्या तसेच बंदुकांच्या आवाजाला न घाबरता पुढे चालत राहण्यासाठी त्याला विशिष्ट परीक्षेतून जायला लागायचे.

पूर्वी मराठ्यांनी जेवढी युद्धे जिंकली, त्यात जसे घोडे आणि सैनिकांचे पराक्रम आहेत तसेच या ढालगजांचे देखील आहेत.

मग ढालगज भवानी कोण?

भवानी ही पेशव्यांची ढालगज होती. आणि तिने केलेल्या पराक्रमांवरून तिचे नाव आपल्या बोली भाषेत ‘ भांडणाची खुमखुमी असलेल्या ‘ बायकांसाठी फेमस झाले. इतिहासात नोंद आहे कि भवानी हत्तीणीने पेशव्यांच्या सैन्यात खूप वर्षे ढालगजाचे काम केले आणि तिचा दबदबा खूप होता.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

पंचमहाभूतांपैकी पाणी आणि त्यातून सागराचे पाणी हे प्रचंड शक्तिशाली असते. सागराची भव्यता, त्यात उठणारी वादळे, महाकाय लाटा यांच्याशी मानवाला सामना करता येणे अतिशय कठीण. पण आपल्या सीमांचे रक्षण कायचे असेल तर जमीन, आकाश आणि जल आणि हल्ली अवकाश या चारही ठिकाणी सैनिकांना सज्ज ठेवावे लागते. आपल्याकडे युद्धनौका तर आहेतच पण आपल्या पाणबुड्या आणि त्यातील सैनिक हे जगातल्या नौसैनिकांतले उत्तम नौसैनिक म्हणून गणले जातात. पण पायदळ आणि वायुदल यांमधील सैनिकांच्या शौर्यकथा सामान्य जनतेला ब-यापैकी ठाऊक असतात, पण पाण्यात राहून शत्रूची वैर करणा-या आणि त्या शत्रूंना रोखून धारणा-या नौसैनिक, नाविक अधिकारी यांच्या पराक्रमाची महती काहीशी कमी असते. आज अशाच एका नौदल अधिका-याच्या असीम पराक्रमाची गाथा सादर करतो आहे.

समुद्रात पाणबुडीमध्ये काम करणे हे अत्यंत जिकीरीचे, हिमतीचे आणि धैर्याचे काम. या कामांत शत्रूकडून आणि प्रत्यक्ष समुद्राकडून सैनिकांच्या जीवाला सतत धोका असतोच असतो. १५ ऑक्टोबर, १९७४ रोजी अहमदाबादेत दराबाशा आणि आरमीन मोगल यांच्या पोटी जन्मलेले फिरदौस हे देशसेवेसाठी १९९२ मध्ये खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए. ) मध्ये प्रशिक्षणार्थी सैन्याधिकारी म्हणून दाखल झाले. मूळचे अतिशय धाडसी, बुद्धीमान असलेल्या फिरदौस यांनी पाणबुडी युद्धनौकेवर सेवा करण्याचा मार्ग निवडला. १ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी नौदलात प्रवेश केला.

स्वयंस्फूर्तीने कार्यरत असलेले फिरदौस यांनी प्रथमपासूनच कामात चमक दाखवली. पाणबुडीत काम करण्यासाठीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून पूर्ण केला. आय. एन. एस. (इंडियन नेवल शिप) शाल्की वर त्यांनी पाणबुडी विरोधी युद्ध अधिकारी पद मिळवले. आय. एन. एस. विशाखापट्टनम, आय. एन. एस. सातवाहन यावर त्यांनी सेवा बजावली. आय. एन. एस. शंकुश ते मुख्य अधिकारी बनण्याचा मान मिळवला. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वरिष्ठ अधिका-यांना मोठे कौतुक असे.

२९ मे, २०१० रोजी लेफ्टनंट कमांडर फिरदौस साहेबांनी आय. एन. एस. शंकुश वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. आय. एन. एस. शंकुश ऑगस्ट महिन्यात फ्रेंच नौदल आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने युद्धसराव सत्रात सहभागी होती. २९ ऑगस्ट रोजी या पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तातडीने दुरुस्ती करणे भाग होते. यासाठी ही पाणबुडी मुंबईच्या समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागावर आणली गेली. ३० ऑगस्ट, २०१० रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तीन नौसैनिक आणि एक इंजिनियरिंग अधिकारी असे चार जण या अवघड कामगिरीवर नेमले गेले. पाणबुडीच्या बाह्याभागावर असलेल्या केसिंग वर हे चौघे उतरलेले असतानाच अचानक समुद्रात एक प्रचंड लाट उसळली आणि दोन नौसैनिक आणि इंजिनियरिंग अधिकारी पाण्यात फेकले गेले. तिसरा नौसैनिक पाणबुडीच्या केसिंगवर लटकत राहिलेला होता.. आणि तो कधीही पाण्यात पडू शकत होता. फिरदौस क्षणाचाही विलंब न लावता स्वत: उफाणत्या दर्यात उडी घेतली. लटकत राहिलेल्या नौसैनिकाचा पाय जायबंदी झालेला होता. साहेब केसिंगवर चढले आणि स्वत;च्या जीवाची पर्वा न करता त्या सैनिकाला खालून ढकलून आपल्या खांद्यावर घेतले आणि शिडीवरून चढून जात त्याला पाणबुडीच्या ब्रिज वर चढवले. ही शिडीही पाण्यात निम्मी बुडालेली होती. लाटांचा मारा सुरु होता. समुद्र आणि साहेब यांच्यात वीस मिनिटांचा संघर्ष सुरु होता. यासाठी खूप शारीरिक शक्ती आणि मोठी हिम्मत लागते. पाण्यात पडलेले इतर सैनिक साहेबांकडे आशेने पाहू लागले होते… फिरदौस साहेब पुन्हा पाण्यात झेप घेते झाले. तोपर्यंत नेव्ही डायवर्स (पाणबुडे) समुद्रात उतरले होते. साहेबांनी या डायवर्सना मदत करायला आरंभ केला. सर्वांनी मिळून पाण्यात पडलेल्या सैनिकांना एकत्रितपणे पाणबुडीजवळ ढकलण्यात यश मिळवले. या सर्वांचा एक गट एकत्रितपणे पाणबुडीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला… तुफानी लाटा होत्याच.. त्यांना समुद्रात ओढणा-या. सर्वजण पाणबुडीवर चढण्याच्या अगदी बेतात असताना एक अजस्र लाट आली आणि साहेब आणि इतर सर्व पुन्हा पाण्यात खेचले गेले. साहेबांनी पुन्हा जोर लावला…. पाणबुडीजवळ पोहोचले… आपल्या खांद्यावर एकेकाला घेतले आणि वर ढकलत राहिले… समुद्र आता पुरता खवळला होता… साहेब म्हणाले… तुम्ही सर्व वर पोहोचल्याशिवाय मी वर येणार नाही…. तसेच झाले… इतर सर्व सुरक्षितरित्या पाणबुडीवर पोहोचले… पण साहेब खालीच राहिले… आणखी एका मोठ्या लाटेने साहेब पाणबुडीवर आदळले.. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला… तरीही साहेब तरंगत राहिले… पोहत राहिले. तोपर्यंत Helicopter ची मदत बोलावण्यात आली होती. नौसेनेच्या helicopter ने साहेबांना पाण्यातून उचलून घेतले आणि तातडीने आय. एन. एस. अश्विनी जहाजावर वैद्यकीय उपचारास नेले.. पण तो पर्यंत समुद्राने आपला डाव साधला होता…. त्याच्या लाटांशी प्राणपणाने झुंज देणारा हा वीर त्याने पराभूत केला होता… आणि नंतर त्याची त्यालाच शरम वाटली असावी… कारण काहीच वेळात समुद्र गप्प गप्प झाला… जणू काही झालेच नव्हते! सहा सैनिकांचे प्राण वाचवून लेफ्टनंट कमांडर फिरदौस दराबशाह मोगल साहेब स्वर्गात पोहोचले… फिरदौस म्हणजे स्वर्ग! एक स्वर्ग दुस-या स्वर्गात गेला…. सैनिक जिंकले तर भूमीचा भोग घेतात आणि धारातीर्थी पडले तर स्वर्गाची प्राप्ती होते त्यांना! 

हे असामान्य कामगिरी होती. एकवेळ जमीन, आकाश येथे माणसाचा निभाव लागू शकेल.. पण पाण्यात? अतिशय अवघड काम असते. तेच काम साहेबांनी करून दाखवले… आणि हुतात्मा झाले. वादळ प्रभावित जनतेला साहाय्य करण्यात साहेब सतत पुढे असत. माणसातील हिरा असे त्यांचे वर्णन त्यांचे सहकारी करीत.

In grey cold waves, when he went too far…. Strength of his spirit was the weapon of his war! अर्थात त्यांच्या आत्म्याची शक्ती हेच त्यांचे युद्धातील आयुध होते… जे त्यांनी प्राणपणाने चालवले आणि अमर झाले! मरणोत्तर शौर्य चक्राने देशाने साहेबांना सन्मानित केले… आंपण एक रत्न गमावले! ही कथा खरं तर सर्वांना माहीत असायला हवी होती… आता तरी इतरांना सांगा. हे आपले नायक… हे आपले भाग्यविधाते… हे आपले संरक्षक. यांच्या पराक्रमाच्या गाथा सतत गायल्या गेल्या पाहिजेत… जय हिंद. 🇮🇳

अहमदाबाद मधील एक रस्त्याला साहेबांचे नाव दिले गेले आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

इंग्लंडमधून भारतात परत आल्यावर रवींद्रनाथांनी ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नावाचे एक नाटक लिहिले. या वेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. रवींद्रनाथांना नाट्य, संगीत आणि काव्यलेखनाचे बाळकडू त्यांच्या घरातच अगदी लहानपणापासून मिळाले होते. त्यांचे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ नाटके लिहीत आणि बसवत असत. गुणिंद्रनाथ म्हणून त्यांच्या एका चुलतभावाला पण नाटकांची आवड होती. ज्योतिदांनी रवींद्रनाथांना नेहमीच उत्तेजन दिले. त्यामुळे रवींद्रनाथांची प्रतिभा साहित्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करू लागली होती.

‘वाल्मिकी प्रतिभा’ हे नाटक अनेक अर्थांनी आगळेवेगळे आहे. वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी होण्याआधी एक दरोडेखोर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मदेव आणि नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी ‘ रामायणाची ‘ रचना केली. परंतु ही रचना करण्याआधी त्यांनी क्रौंच पक्षाचे एक जोडपे एका झाडावर बसलेले पाहिले. त्या आपल्या आनंदात निमग्न असणाऱ्या एका पक्ष्याला एका शिकाऱ्याने बाण मारला. त्यामुळे त्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप पाहून वाल्मिकींचे हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून रामायणातील तो प्रसिद्ध श्लोक बाहेर पडला.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।

कधी नव्हे तो आपल्या तोंडून अशा प्रकारची सुंदर रचना कशी काय बाहेर पडली याचे त्यांना नवल वाटले. त्यानंतर त्यांनी ब्रम्हदेव आणि नारदांच्या आशीर्वादाने रामायणाची रचना केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जी मूळ घटना आहे, ती रवींद्रनाथांना मान्य होती. पण आपल्या नाटकात त्या घटनेला त्यांनी वेगळीच कलाटणी दिली.

त्यांच्या ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नाटकात वाल्या आणि त्याचे साथीदार यांची दरोडेखोरांची एक टोळी असते. ही सगळी मंडळी अत्यंत क्रूर आणि आडदांड असतात. ते प्रतिभा नावाच्या एका निरागस मुलीला पकडून आणतात आणि कालीमातेपुढे तिचा बळी देण्याचं ठरवतात. या निष्पाप मुलीचा आक्रोश ऐकून वाल्याचे हृदय द्रवते. तो आपल्या साथीदारांशी वैर पत्करून तिची सुटका करतो. टोळीतील सहकाऱ्यांना सोडून देऊन तिला घेऊन रानोमाळ भटकतो. त्यातूनच त्याचे हृदयपरिवर्तन होते. तो स्वतः विषयी विचार करू लागतो. अंतरात्म्याचा शोध घेतो. त्याची ही तळमळ पाहून ती मुलगी म्हणजे प्रतिभा आपल्या खऱ्या रूपात त्याच्यासमोर प्रकट होते.

ती म्हणजे प्रत्यक्ष साहित्य, कला आणि विद्येची देवता सरस्वती असते. ती त्याला म्हणते, ‘ तुझ्यातील माणुसकी जागृत होते की नाही याची परीक्षा मी पाहिली. त्यासाठी मीच बालिकेचे रूप घेतले होते. तुझ्या पाषाणहृदयाला ज्या आर्त करुणेच्या स्वरांमुळे पाझर फुटला, त्याच तुझ्या हृदयातून आणि वाणीतून आता माणुसकीचे संगीत जन्म घेईल आणि लक्षावधी मनांना कोमल भावनांनी शुद्ध करेल. तुझी वाणी देशोदेशी चिरकाल घुमत राहील आणि त्यातून अनेक कवींना प्रेरणा मिळेल. ‘ 

या नाटकात रवींद्रनाथांनी वाल्या कोळी लुटारूंपासून सरस्वतीला मुक्त करतो हे जे दाखवले आहे, प्रतिकात्मक आणि अतिशय महत्वाचे आहे. त्याचा अर्थ असा की ‘ सरस्वती ‘ आज साहित्यरूपाने लुटारुंच्या, धनदांडग्यांच्या ताब्यात आहे. तिला त्यांच्यापासून मुक्त केले पाहिजे. समाजाला बळ देणारे साहित्य आणि एकूणच साहित्य आणि कलाक्षेत्र हे साहित्यिक आणि कलावंतांच्याच ताब्यात असले पाहिजे. राजकारणी, धनदांडगे यांच्यापासून ते मुक्त असले पाहिजे. तरच ते सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल. समाजाच्या प्रगतीची दिशा त्यामुळे सापडू शकेल. साहित्यिकांना मोकळे आकाश मिळेल. रवींद्रनाथांनी त्याकाळी जे प्रतीकात्मक रूपाने सुचवले ते आजदेखील तेवढेच महत्वाचे आहे.

या नाटकाने रवींद्रनाथांनी जणू प्रायोगिक रंगभूमीची पायाभरणी केली. अनेक गोष्टी नवीन आणल्या. नाटकांवर इंग्रजी नाट्यभूमीचा प्रभाव होता, संगीताचा आणि रागदारीचा प्रभाव होता, त्या चौकटीतून नाटकाला बाहेर काढण्याचाच त्यांचा हा प्रयत्न होता. त्यांचे हे नाटक म्हणजे सुरांचा आणि स्वरांचा अविष्कार होता. त्याला एक प्रकारची आंतरिक लय होती. गाण्याच्या आणि रागदारीच्या बंधनांपासून काही अंशी मुक्त होत आपल्याला हवा तसा नाट्याविष्कार सादर करण्याचे आणि स्वरांच्या प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले होते. ते नुकतेच इंग्लंडहून परतल्यामुळे या त्यांच्या प्रायोगिक नाटकावर काही अंशी पाश्चात्य संगीत आणि आयरिश संगीताचा प्रभावही होताच. हे नाटक केवळ वाचण्यासाठी नव्हेतच तर ते पाहावे आणि अनुभवावे अशा प्रकारचे होते. या नाटकाने वयाच्या केवळ विसाव्या वर्षी रवींद्रनाथांचे नाटककार म्हणून दमदार पदार्पण झाले.

या नाटकातून साहित्यिक म्हणून आपल्या पुढील प्रवासाची दिशा रवींद्रनाथांना गवसली. आपले पुढील साहित्य कसे असेल याची जणू झलकच त्यांनी या नाटकाद्वारे दाखवली. दरोडेखोरांच्या किंवा धनदांडग्यांच्या तावडीतून सरस्वतीला मुक्त केल्याशिवाय कलावंताला सरस्वती प्रसन्न होत नाही हे त्यांना जाणवले होते. वाल्मीकींच्या अंतःकरणात जो दयेचा, करुणेचा झरा वाहू लागला, त्यामुळे जगाकडे आणि त्यातील क्रौर्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाल्मिकींना प्राप्त झाली. बालिकेला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवणे म्हणजेच सरस्वतीला नको असलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून मुक्त करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले. ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ हे नावच खरोखर अगदी सुंदर आहे. त्याच्या नावातच रवींद्रनाथ यांच्या प्रतिभेचाही विलास आपल्याला दिसतो. त्यांच्या प्रतिभेची झेप आपल्याला दिसते.

या नाटकात वाल्मिकींची भूमिका स्वतः रवींद्रनाथांनी केली तर सरस्वतीची भूमिका त्यांची एक भाची प्रतिभा म्हणून होती तिने केली. त्या काळात नाटकात किंवा रंगभूमीवर आपल्या घरातील मुलींना सनातनी विचारांचे लोक पाऊल ठेवू देत नसत. असे करणे म्हणजे प्रतिष्ठेला बाधा आणण्यासारखे होते. पण रवींद्रनाथांनी ही सुरुवात स्वतःच्या घरापासूनच केली. ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच होती. त्याची किंमतही टागोर कुटुंबीयांना मोजावी लागली पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. स्त्रियांना देखील कला, साहित्य, शिक्षण इ. क्षेत्रात मुक्त आकाश मिळाले पाहिजे असेच त्यांना वाटत होते. या नाटकात खरं तर त्यांच्या घरातील बहुतेक सदस्यांचा या ना त्या कारणाने सहभाग होता. हे नाटक पहिल्यांदा सादर झाले ते सुद्धा टागोर कुटुंबियांच्या जोराशंको वाडी इथेच ! कला, साहित्य इ प्रांतात पुढील काळात रवींद्रनाथांची जी वाटचाल होणार होती, त्याची सुरुवात आणि दिशादर्शन करणारे नाटक म्हणजे ‘ वाल्मिकी प्रतिभा ! ‘

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महात्मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? इंद्रधनुष्य ?

☆ महात्मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

भली मोठी पांढरी शुभ्र मरसिडीज, दूरदृष्टी महाराजांच्या बंड गार्डन रोडवरील राजवाड्या सदृश मठाच्या दारात थांबली. शोफरने धावत येवून दार उघडलं. आतून पांढऱ्या शुभ्र कपड्यातील एक खानदानी व्यक्ती अंगावरच्या श्रीमंतीच्या सगळ्या खुणा दाखवत उतरली. दूरदृष्टी महाराजांचे रोजचे प्रवचन, देशी विदेशी भक्तांच्या भरगच्च दरबारात चालू होते. ती व्यक्ती अदबीनं महाराजांच्या पाया पडली. रोजच्या प्रमाणे खिशातून पाचशेच्या नोटांची दोन कोरी बंडल्स काढली आणि महाराजांच्या पायाशी ठेवली. थोडावेळ खाली बसून प्रवचनाचा लाभ घेऊन, परत नमस्कार करून मठाच्या बाहेर पडून गाडीतून निघून गेली. एक महिनाभर हा प्रकार रोज सलग चालल्यावर, एक दिवस ती व्यक्ती बाहेर पडताच, महाराजांनी त्यांच्या सुखदेव नावाच्या खास शिष्याला खूण केली.

“महाराज त्यांचे नांव अनिरुद्ध महात्मे. पुण्यात ‘पुण्यात्मा’ नावाची त्यांची स्वतःची IT फर्म आहे. ” “अस्स, उद्या त्यांची आणि माझी भेट माझ्या खाजगी दालनात अरेंज करा.”

“नमस्कार महाराज, काय सेवा करू?” “नमस्कार महात्मे! आम्ही बघतोय, गेले महिनाभर तुम्ही आमच्या समोर रोज पाचशेच्या नोटांची कोरी बंडल्स……… ” “महाराज, गत आयुष्यात केलेल्या पापांच थोड तरी परिमार्जन व्हावे या एकाच हेतूने हे मी करतोय!” “नाही पण तुमच्या IT business मध्ये इतका पैसा ?” “महाराज, आपल्या पासून काय लपवणार आपल्याकडची बडी मंडळी आणि अनेक उद्योगपती यांची स्विस बँकेतली खाती मी मेन्टेन करतोय महाराज! तो पण माझा एक business च आहे, पण तो उघडपणे….. ” “समजलं महात्मे ! आमच्याकडे सुद्धा आमच्या फॉरीनच्या शिष्यानी दिलेली अनेक चलनातली अगणित रोख रक्कम…… ” “कळलं महाराज, आपण चिंता करू नका, फक्त आज्ञा द्या !” “महात्मे, उद्या सकाळी मला इथेच भेटा आणि ‘त्या’ सगळ्याची व्यवस्था स्विस बँकेत कशी लावता येईल ते पहा!” “जरूर महाराज ! उद्या सकाळी हा बंदा सेवेला हजर असेल !”

“सुखदेव, गेला आठवडाभर महात्मेची रोजची भेट बंद झाल्ये. ” “होय महाराज” “सुखदेव, त्यांचा काही निरोप ?” “काहीच नाही महाराज. ” “ठीक आहे. उद्या त्यांच्या IT फर्मला भेट द्या. ” “होय महाराज. “

“महाराज त्यांच्या फर्मला टाळं आहे. ” “काय ssss ?” “होय महाराज, अनिरुद्ध महात्मेनी फर्मची ती जागा तीन महिन्यासाठी भाड्याने घेतली होती, असं चौकशी करता कळलं. “

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १४ — गुणत्रयविभागयोग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १४ : गुणत्रयविभागयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

*

परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्‌ । 

यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥ १ ॥

*

कथित श्रीभगवान 

समस्त ज्ञानातील उत्तम ज्ञान पुनःपुनः कथितो तुजला 

मुनिवर सारे मुक्त होउनी प्राप्त करित परम सिद्धिला ॥१॥

*

इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः । 

सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥ २ ॥

*

धारण करुनी ज्ञानासी या मजठायी जे समरस झाले

आदिकाळी ना तया जनन ना व्यथा प्रलयकाले ॥२॥

*

मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम्‌ । 

सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ ३ ॥

*

गर्भधारते प्रकृती माझी महद्ब्रह्मरूप भूत योनी

संभव समस्त भूतांचा करितो मी तेथे गांडिवपाणि ॥३॥

*

सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः ॥ 

तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ ४ ॥

*

विविथ योनीतुनी जीव होताती मूर्त भारता

प्रकृती माता तयांची मी तर बीजद पिता ॥४॥

*

सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः । 

निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्‌ ॥ ५ ॥

*

सत्व रज तम होत प्रकृतीसंभव गुण

देहामध्ये आत्म्यासी ठेविती ते बांधुन ॥५॥

*

तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम्‌ । 

सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ ॥ ६ ॥

*

निर्मल सत्वगुण प्रकाशदायी निर्विकार

सुखासवे बंधन त्याचे तसेच ज्ञानाबरोबर ॥६॥

*

रजो रागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम्‌ । 

तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्‌ ॥ ७ ॥

*

वासना आसक्ती पोटी रागरूपी रजोगुण

कर्मफलाने वद्ध करी जीवात्म्या हे अर्जुन ॥७॥

*

तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम्‌ । 

प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८ ॥

*

अज्ञानज तो तमोगूण देहात गुंतल्या जीवांना

प्रमाद आळस निद्रा यांनी जखडुन टाकी जीवांना ॥८॥

*

सत्त्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत । 

ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सञ्जयत्युत ॥ ९ ॥

*

आच्छादुनिया सुखास सत्वगुण रजोगुण कर्मासी

तमोगुण झाकुनी ज्ञानासी प्रवृत्त करीती प्रमादासी ॥९॥

*

रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत । 

रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १० ॥

*

रज-तमासी परास्त करुनी वृद्धिंगत हो सत्त्वगुण 

सत्व-तमासी परास्त करुनी वृद्धिंगत हो रजोगुण 

सत्व-रजासी परास्त करुनी वृद्धिंगत हो तमोगुण 

गुणागुणांच्या प्राबल्यासी भरतवंशजा घेई जाणुन ॥१०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया —  लेखक : अज्ञात ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

विश्वेश्वरैया यांचे वंशज —  लेखक : अज्ञात ☆ श्री सुनील देशपांडे

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

अभियंता दिनाच्या निमित्ताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचं स्मरण करतो.

या निमित्ताने आजवर अनुभवलेल्या.. विश्वेश्वरैया यांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.

() २०१६ साली कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक VIP व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरु होईना. पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण  त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या VIP नां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं.

परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं. मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं. या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता. पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली VIP मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली. गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डान मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती.

याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती… फिरोज मोमीन हा तो अवलिया.

()  विजार-शर्टातला ITI शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजण कुतूहलाने पहात असतांना.. ” ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का ?” असा टोमणा त्यातील एकाने मारला.. त्या तरूणाने कार चार्ज केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली.

पुढे त्यांनी किमान जवळपास ५०  नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या.

१९७६ साली एका प्रख्यात जापनीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं Cycle Time याने इचलकरंजीमध्ये  १२ सेकंदात बसवून दाखवलं.

जगप्रसिद्ध फाय ग्रुपचे संस्थापक श्री पंडितराव कुलकर्णी हे या अभियंत्याचं नाव.

()  युरोपमध्ये फिरता रंगमंच पाहून “तो मी नव्हेच” या नाटकासाठी तो महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बऱ्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं. कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांच्या एका मित्राने पणशीकरांना  एका लोहाराच्या पालावर नेलं.. पणशीकरांनी अगदी अनिच्छेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली. त्या लोहाराने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला, जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.

किर्लोस्करांनी डिझेलवर चालणारा जनरेटर मार्केटमध्ये आणला तेव्हा या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला, जो डिझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० % किमतीत बनवला होता.

ही असामी म्हणजे इयत्ता दुसरी शिकलेले म्हादबा मिस्त्री अर्थात महादेव शेळके.

()  उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला, पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एक तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ  लागला. पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत, वस्त्रोद्योग, ऊर्जा, महामार्ग, बांधकाम यासारख्या क्षेत्रात त्याने आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला.

कित्येक उच्चशिक्षित अभियंत्याना घडवणारा बंडी, धोतर, गांधीटोपी वेशातला हा अशिक्षित पण विद्वान अभियंता म्हणजे रामचंद्र मारुती मोहिते 

()  सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक, मुंबईतील माझगाव डॉकवर वेल्डरचं काम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसायिक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरु केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे) जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे.

२०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला. बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.

हे आहेत मुंबईतील DAS Offshore चे श्री अशोक खाडे….

आणि DAS चा फुल्लफॉर्म आहेदत्ता, अशोक, सुरेश.

() टाटा मोटर्स मध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरने टाटा एस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरून कंपनीचे २. ५ करोड रुपये वाचविले. त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली.

टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला ज्याची मजल आज ७५, ००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे. पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीमे कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही…..

२२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, Life Science, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ Emergency Medical Service, मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे Peace Applications, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बऱ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली.

आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने आपल्या देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींच्या पुढे आहे.

महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये यांचं नाव अग्रक्रमावर येतं.

आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मूळचे रहिमतपूरचे आणि VIT कॉलेजचे Electronics इंजिनिअर असणारे BVG म्हणजेच भारत विकास ग्रुपचे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड —-

— या सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं.

हितीत असलेल्या, नसलेल्या अशा विश्वेश्वरय्यांच्या सगळ्याच खऱ्याखुऱ्या वंशजांना अभियंता दिनाच्या निमित्ताने मानाचा सलाम !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सीता सेतू ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सीता सेतू ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सीतामातेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वानरसेनेच्या साहाय्याने लंकेपर्यंत पोहोचणारा सेतू बांधला म्हणून त्या सेतूला रामसेतू म्हणतात. आधुनिक काळातील एका सीतेनेही असाच एक सेतू उभारला…. त्याला “ सीता सेतू “ म्हणूयात का?  

दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट. केरळ राज्यातील वायनाड नावाच्या डोंगराळ भागातील काही गावे त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावेच नाहीशी झाली… शेकडो लोक मातीच्या खाली गाडले गेले कायमचे. पावसाचे प्रचंड थैमान सुरु होते. सकाळी ही बातमी इतरांना समजली. सुरालमाला गावाजवळच्या मुन्दाकाई खेड्याच्या आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि मुख्य म्हणजे या गावांशी संपर्क करणयासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. या गावांतील बचावलेल्या नागरीकांना मदत पोहोचवण्यासाठी काहीतरी तातडीने करणे गरजेचे होते. या गावांच्या जवळ पोहोचण्यासाठी पुलाची उभारणी करायला पाहिजे होती. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली आणि लष्कराला माहिती मिळाली त्याच दिवशी बंगळूरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपने आपले सत्तर जवान आणि पुलासाठी अत्यावश्यक सारे साहित्य सुमारे २० गाड्यांमध्ये भरून रवाना केले.

या तुकडीचे नेतृत्व दिले गेले होते या तुकडीतील एकमेव महिला अधिकारी मेजर सीता अशोकराव शेळके या शूर महिलेकडे. या सीता ‘माई ‘ह्या अहमदनगर जिल्ह्यातील केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या गाडीलगाव या गावात अशोक भिकाजी शेळके या वकिलाच्या पोटी जन्मलेल्या चार अपत्यांपैकी एक. लोणी येथील प्रवरा इंजीनियारींग कॉलेजमधून त्यांनी (मेकॅनिकल)अभियांत्रिकी मधील पदवी प्राप्त केली. त्यांना अंगावर अभिमानाची, अधिकाराची आणि सन्मानाची वर्दी घालायची होती. म्हणून आधी त्यांनी आय. पी. एस. होण्यासाठी प्रयत्न केले. त्याच जोडीला भारतीय लष्करात दाखल होण्याचे प्रयत्न सुरूच होते. तिस-या प्रयत्नात त्या एस. एस. बी. परीक्षेत यशस्वी झाल्या आणि थेट गेल्या त्या चेन्नई मध्ये. ना प्रदेश ओळखीचा ना भाषा. परंतु सीतामाई डगमगल्या नाहीत. त्यांनी अत्यंत नेटाने कठीण लष्करी अभ्यासक्रम पूर्ण केला. व मद्रास इंजीनियरिंग ग्रुप मध्ये अधिकारी झाल्या. २०१२ पासून त्या सेवेत असून मेजर पदावर पोहोचल्या आहेत.

मेजर सीता शेळके यांनी आपल्या जवानांसोबत सतत ३६ तास पावसात, चिखलात उभे राहून काम केले. आपले सारे शिक्षण, ज्ञान, लष्करी प्रशिक्षण पणाला लावले. जवानांना त्या थंबी म्हणजे भाऊ म्हणतात! त्या सर्व भावांना प्रोत्साहित करत केवळ १६ तासांमध्ये हा १९० फूट लांबीचा लोखंडी पूल बांधून घेतला. या कामाच्या वेळी प्रचंड पाउस सुरू होता. पुराचे पाणी वाढत होते. मेजर जनरल व्ही. टी. थॉमस हे प्रमुख अधिकारी होते. मेजर अनिश मोहन कष्ट घेत होते. प्रमुख सर्वत्र चिखल, पुराचे वाढते पाणी, बघ्यांची गर्दी आणि पूल लवकरात लवकर बांधण्याचा ताण. सत्तर पैकी एकाही जवानाने तीन मिनिटांपेक्षा जास्त विश्रांती घेतली नाही, की आपले भिजलेले, चिखलाने माखलेले कपडे बदलण्यात वेळ घालवला नाही. जेवण, झोप हे त्यांच्या शब्दकोशातून त्यादिवशी गायब झाले होते…. निसर्गाशी त्यांची लढाई सुरू होती… Indian army never gives up! … १९० फूट लांबीचा, पुरेशा रुंदीचा, अवजड वाहनांचे वजन पेलू शकणारा मजबूत सेतू तयार झाला होता… मदतकार्य जोमाने सुरू होऊ शकले !

मेजर सीता अशोकराव शेळके… महाराष्ट्र कन्या.. तुम्हाला मानाचा मुजरा… salute officer! 

जय महाराष्ट्र ! जय हिंद ! जय हिंद की सेना !🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर – लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गणपतीच्या आराशीत नाट्यसृष्टीचं मिनिएचर लेखक – श्री महेश कराडकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

परवा मी आणि आशा शिवाजी मंडईत भाजी आणायला गेलो होतो. तो  गणपती उत्सवाचा सहावा दिवस होता. तिथं शिरीष रेळेकर नेहमीप्रमाणे हमखास भेटायचाच. अतिशय शिस्तबद्धपणे आपली ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा शिरीष आज लवकर शटर ओढून लगबगीने कुठं चाललाय म्हणून मी त्याला टोकलं. तर म्हणाला, संजय पाटलांच्या घरी गणपतीचा देखावा बघायला चाललोय, आम्ही सगळे मित्र. !फेसबुक वर त्यांनी टाकलंय ते बघा…

संजय पाटील म्हणजे कसदार लिहिणारा, उत्तम अभिवाचन करणारा, नाटक चळवळीत अतिशय गांभीर्यानं आणि जबाबदारीनं वावरणारा, आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्त होऊन आपल्याला हवंय तसं कलंदर जगणारा आमचा मनस्वी दोस्त! गेली तीन-चार वर्ष तो आणि त्याचा मुलगा सारंग आपल्या घरातल्या गणपतीची आरास खूप वेगळ्या पद्धतीने सजवतात. गेल्या वर्षी त्याने सांगली संस्थानच्या गणपती पंचायतन मंदिराची प्रतिकृती केली होती. त्याच्या आधीच्या वर्षी विठ्ठल आणि तुकाराम हा विषय घेऊन आरास मांडलेली. त्याही आधी कॅमेरा ही संकल्पना घेऊन घरातलं गणपती डेकोरेशन केलेलं. यावेळी नक्कीच काहीतरी खास असणार म्हणून तिथूनच त्याला फोन लावला. म्हटलं, ‘संजयराव सगळा गाव संस्थानच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला… नाहीतर सार्वजनिक मंडळांचे देखावे बघायला झुंडीने जातो हे माहित होतं. पण ही सगळी गर्दी तुझ्या घराकडे का चालली आहे, बाबा!… तुझी परवानगी असली तर आम्ही पण येतो रात्री.’

रात्री चिन्मय पार्कमधल्या त्याच्या घरातल्या हॉलमध्ये दहा बाय सहाच्या अडीच फूट उंचीच्या त्या स्टेजवर अवघी नाट्यपंढरी साकारलेली पाहिली आणि थक्क झालो. तिथं महाराष्ट्राच्या  नाट्य इतिहासातले गाजलेले नऊ रंगमंच दोन टप्प्यात बसवले होते. त्यातील प्रत्येक रंगभूमीवर विष्णुदास भावे यांच्या पहिल्या नाटकाच्या खेळातल्या नांदी पासून मराठी नाटक परंपरेच्या समृद्ध प्रवासात मैलाचा दगड ठरलेल्या नऊ नाटकातले नऊ प्रसंग, त्यातल्या हुबेहूब नेपथ्यासह आणि पात्रांसह मांडलेले होते… आणि हे सगळं प्रत्येकाला नीट समजावं, म्हणून बारा मिनिटांचा एक शो प्रदर्शित होत होता.

सुरुवातीला खोलीत अंधार व्हायचा. आणि फक्त मधला गणपतीची शाडूची मूर्ती असलेला रंगमंच उजळायचा. दीड बाय दोन फुटांच्या त्या बॉक्स मधल्या रंगमंचावर शाडूच्या मूर्तीसमोर संगीत नाटकातली असंख्य पात्रं एकत्रितपणे नांदी म्हणत असलेला प्रसंग डोळ्यासमोर आला. नांदीतील त्या गणेश स्तवनाने क्षणात मन शे-दीडशे  वर्षांची संगीत नाटकांची सफर करून आलं. संजय पाटलांच्या निवेदनातून एकेक गुपित उघड व्हावं तसं एक एक नाटक उलगडायचं… आणि तो रंगमंच उजळून निघायचा. तिथल्या प्रवेशानुसार असलेले संवाद ऐकू यायचे. पहिल्या रंगमंचावरील प्रकाश मंद होत बंद व्हायचा आणि दुसरा ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा. ‘नटसम्राट’मधील दृश्याबरोबरच श्रीराम लागूंचा पल्लेदार आवाज कानावर यायचा. त्या रंगमंचावरील संवाद संपता संपता तिसरा दामोदर हॉल, मुंबईचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा आणि सखाराम बाईंडर मधील निळू फुले बोलू लागायचे. त्यानंतर यशवंत नाट्यमंदिर, मुंबईच्या रंगमंचावर ‘गेला माधव कुणीकडे’ दिसू लागायचं. ऐकू यायचं. ते संपता संपता रवींद्र नाट्य मंदिरचा रंगमंच प्रकाशमान व्हायचा… आणि ‘अश्रूंची झाली फुले’मधील काशिनाथ घाणेकर लाल्या होऊन बोलू लागायचे. मग नुकत्याच जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातला पूर्वीचा रंगमंच प्रकाशमान होत श्रीमंत दामोदर पंतांच्या भूमिकेतला भरत जाधव बोलू लागायचा. मग ‘चार चौघी’तला तो जळजळीत डायलॉग कानात शिरत पुण्यातलं बालगंधर्व  नाट्यमंदिर उजळून निघायचं. त्यानंतर पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वाडा चिरेबंदीचा सेट दिसायचा, पात्रं बोलू लागायची. पुढे सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रा. अरुण पाटील दिग्दर्शित ॲमॅच्युअर ड्रामॅटिक असोसिएशनच्या ‘तू वेडा कुंभार’ या व्यंकटेश माडगूळकरांच्या नाटकातील प्रसंग उभा रहायचा. आणि सगळ्यात शेवटी संजय पाटील यांचा सुपुत्र सिनेमॅटोग्राफर, नेपथ्यकार ज्याला नुकतंच एका शॉर्ट फिल्म साठी जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये एका शॉर्ट फिल्मसाठी विशेष अवार्ड मिळालं आहे… अशा सारंग पाटील यांनी केलेल्या व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘वाटसरू’ या नभोनाटयाचं नाट्यमंचीय रूपांतर सादर व्हायचं.

हे सगळंच अद्भुत होतं. जणू अवघी नाट्यसृष्टीच त्या एका छोट्याशा स्टेजवर साकार झाली होती. दीड बाय दोन फुटाच्या प्रत्येक रंगमंचावरची पात्र, त्या पात्रांच्या प्रमाणात असलेल्या रंगमंचावरील

 नेपथ्यामधील वस्तू, इमारतींचे भाग… सगळंच अद्भुत! लहानपणी आपण किल्ले करत आलो, त्या किल्ल्यांच्या पलीकडले खूप    ॲडव्हान्स्ड, प्रगत असं रूप म्हणजे संजय पाटलांच्या घरात गणपतीच्या आराशीतून काळाच्या पडद्याआड गेलेला पण मिनीएचर सारख्या एका लघु रंगमंचावर प्रसन्नपणे आविष्कृत होणारे ते नऊ देखावे. जणू एखाद्या व्यापारी पेठेतील प्रमुख रस्त्यावरच्या, भव्य-दिव्य सार्वजनिक गणपती मंडळाचा देखावाच त्या दहा बाय सहा च्या घरगुती स्टेजवर साकार झाला होता. संकल्पक सारंग पाटील, नेपथ्यातील वस्तू तयार करणारा त्याचा मित्र आकाश सुतार, स्टेज  तयार करणारा राजू बाबर, प्रकाशयोजना करणारा कौशिक खरे आणि सारंग चे आई वडील म्हणजेच संजय पाटील आणि सौ. जाई पाटील हे हौशी आणि प्रयोगशील दांपत्य या सर्वांनीच हा गणपती उत्सव आजच्या घडीला कसा साजरा करायला हवा याचा एक नवा आदर्श धडाच समाजाला घालून दिला आहे… आज  गोंगाटात उद्देश हरवून बसलेल्या, विकृतीकडे झुकलेल्या, उत्सवांच्या बदलत्या स्वरूपातून बाहेर पडून तुमच्या आमच्यासारख्यांना दाखवलेला आशेचा समृद्ध असा नवा किरण आहे. त्याबद्दल पाटील परिवाराचे खूप खूप आभार!

लेखक – श्री महेश कराडकर

प्रस्तुती : श्री अमोल केळकर 

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.in,

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

kelkaramol.blogspot.com 

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print