☆ सेवा परमो धर्म: – लेखक – श्री विनीत वर्तक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
१४ जानेवारी २०२३ चा दिवस होता. एकीकडे देश मकरसंक्रांती साजरी करण्याची तयारी करत होता. तर तिकडे मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडचे कामगार झोझीला बोगद्याचे काम करत होते. संध्याकाळी साधारण ५:४० च्या सुमारास अचानक हिमस्खलन झालं, त्यासोबत तिकडे काम करणारे तब्बल १७२ कामगार त्यात अडकले. त्यांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला.
हे हिमस्खलन इतकं भीषण होतं की सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. परिस्थितीचं गांभीर्य आणि तब्बल १७२ लोकांच्या जीवाची जबाबदारी ओळखून मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडच्या प्रोजेक्ट इंजिनिअरने तात्काळ भारतीय सेनेशी संपर्क साधला. समोर आलेल्या प्रसंगाची व्याप्ती लक्षात घेऊन भारतीय सेनेने तात्काळ प्रशिक्षित सैनिकांची एक तुकडी रवाना केली. त्या भीषण परिस्थितीत संपूर्ण बर्फातून आपल्या जीवाची तमा न बाळगता त्यांनी रात्रीच्या अंधारात त्या १७२ लोकांना बर्फातून शोधून काढलं. त्यांना शांत करून भारतीय सेना आपल्या ‘सेवा परमो धर्म:’ या आपल्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही, असं सांगून आश्वस्त केलं.
१५ जानेवारीचा सूर्य उगवताच भारतीय सेनेच्या आसाम रायफल्स रेजिमेंटने त्या अडकलेल्या कामगारांना सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर मिशन हाती घेतलं. अश्या वातावरणाची सवय असलेले प्रशिक्षित स्पेशल कमांडो, हत्यारे आणि प्रशिक्षित कुत्रे त्यांनी या मिशनसाठी रवाना केले. त्याशिवाय यात अडकलेल्या लोकांच्या तब्यतेची काळजी घेण्यासाठी मेडिकल टीमही पाठवण्यात आली.
भारतीय सेनेने एकाही कामगाराला इजा न होऊ देता तब्बल १७२ कामगारांची त्या भीषण परिस्थितीतून सुखरूप सुटका केली. एकीकडे देश जिकडे संक्रांतीचा सण साजरा करत होता, तिकडे दुसरीकडे भारतीय सेनेने १७२ जणांच्या जीवावर आलेल संकट दूर केलं होतं.
भारतीय सेनेच्या त्या अनाम वीर सैनिकांना माझा कडक सॅल्यूट…
जय हिंद!!!
लेखक – श्री विनीत वर्तक
( फोटो शोध सौजन्य :- गुगल )
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे का, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.
गुजराथच्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगातील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथकडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊनही दर वेळी सोमनाथचं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.
मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.
मंदिराशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यात स्थित असलेला बाण स्तंभ. हा स्तंभ मंदिराच्या आवारातच बसवला असून त्यावर संस्कृतमध्ये श्लोक लिहिलेला आहे. अबाधित ज्योतिमार्ग, म्हणजे स्तंभ आणि समुद्राच्या पलीकडे थेट दक्षिण ध्रुव, यांच्यामध्ये जमिनीचा एक तुकडाही नाही. या स्तंभापासून ते अंटार्क्टिकापर्यंत अधे-मधे जमिनीचा थोडाही भाग नाही, असा या श्लोकाचा सोप्या शब्दात अर्थ आहे.
संग्राहक – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(हे सूक्त व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
माजी अमेरिकन टेनिसपटू आंद्रे आगासी तुम्हां सगळ्यांना आठवत असेल. आंद्रे आगासीची एक मुलाखत नुकतीच माझ्या पाहण्यात आली. त्यात आगासीने एक जबरदस्त किस्सा सांगितला…
तेव्हा जर्मनीच्या बोरीस बेकरने आगासीला सलग तीन सामन्यांमध्ये हरवले होते. बोरीस बेकर ज्याप्रमाणे सर्विस करायचा ती भेदणे जवळपास अशक्य होतं. आणि यावर मात कशी करायची यासाठी आगासी जंग जंग पछाडत होता. त्याने बोरीस बेकरच्या अनेक व्हिडिओ कॅसेट्स सारख्या बघितल्या. केवळ एकाच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या अँगलने पण बघितल्या.
खूप बारीक अभ्यास करत असताना आगासी ला बेकरची एक सवय लक्षात आली. प्रत्येक वेळी सर्व्हिस करत असताना बेकर आपली जीभ बाहेर काढत असे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी बेकरच्या सर्व्हिस ची दिशा आणि जिभेची दिशा एकच असायची. आगासीने वारंवार अनेक कॅसेट्स बघितल्या. प्रत्येकवेळी बेकरची जीभ त्याच्या मनात काय चाललं आहे हे आधीच सांगायची. मुख्य म्हणजे बेकरच्या नकळतच हे घडत होतं.
एकदा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आगासीला बेकरची सर्व्हिस भेदणें फार कठीण गेले नाही. मात्र बोरिस बेकरला संशय येऊ नये म्हणून आगासी मुद्दामच थोड्या चुका करत राहिला. कारण आपल्याला प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस कळली आहे हे आगासीला लपवून ठेवायचे होते.
त्यानंतर सलग पुढचे ९ सामने आगासीने जिंकले. अचानक हा बदल कसा झाला हे बोरिस बेकरला शेवटपर्यंत कळले नाही. अखेरीस बोरिस बेकर निवृत्त झाल्यानंतर आगासीने बोरिसला याबद्दल सांगितले. ते ऐकून बोरिस जवळजवळ खुर्चीतून पडलाच !
बोरिस म्हणाला प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर सामना हरल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हणायचो की “ हा माणूस माझं मन वाचतोय असं मला वाटतं आहे….” पण हे कसं ते कळत नव्हतं !!
मित्रांनो, स्पर्धा कितीही मोठी आणि स्पर्धक कितीही तगडा असला तरी आपण न डगमगता निकराने सामना केला पाहिजे. कुठेतरी काहीतरी मार्ग सापडतोच. पण तो मार्ग शोधण्यासाठी अभ्यास, मार्ग मिळेपर्यंतचा ध्यास आणि मी जिंकेनच हा आत्मविश्वास या तीनही गोष्टी अंगी असल्या पाहिजेतच !!
आंद्रे आगासीच्या या गोष्टीतून आपल्याला हीच शिकवण मिळते.
संग्राहक : माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या, एका तथाकथित ‘सेक्युलर’ स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं :
पत्रकार : “इस्लामचा संस्थापक कोण आहे?”
स्वामीजी : “मोहम्मद पैगंबर”
पत्रकार : “आणि ख्रिस्ती धर्माचा?”
स्वामीजी : “येशु ख्रिस्त.”
पत्रकार : “आणि हिंदु धर्माचा संस्थापक?”
आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे, असा तिचा समज झाला होता. ती विजयी स्वरात पुढे म्हणाली.. :
” या धर्माचा कुणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही, हेच सिद्ध होतं.”
स्वामीजी म्हणाले :
“अगदी बरोबर.!”
” हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळी ! हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे. मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे.”
— त्या महिला पत्रकाराला काहीच कळलं नाही….
आता, स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.
स्वामीजी : ” भौतिक शास्त्राचा संस्थापक कोण? “
पत्रकार : ” कुणाही एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार.”
स्वामीजी :- ” बरं, रसायनशास्त्राचा संस्थापक कोण? “
पत्रकार : ” इथंही कुणा एका व्यक्तीचं नांव, नाही सांगता येणार.”
स्वामीजी : ” प्राणिशास्त्राचा संस्थापक कोण?”
पत्रकार : “अर्थातच, कुणा एका व्यक्तीचं नांव नाही सांगता येणार. अनेक शास्त्रज्ञांनी, तसंच वेगवेगळ्या काळात; ह्या शास्त्रांबद्दलच्या ज्ञानात आपापल्या परीनं वेळोवेळी भर घालून, ही शास्त्रे समृद्ध केली आहेत.”
यावर स्वामीजी बोलले –
“आधुनिक शास्त्रज्ञांनी मानवाच्या भौतिक गरजांचा विकास करण्यासाठी, वैज्ञानिक संशोधन केले आहे. त्याप्रमाणे,
हिंदूधर्मही विज्ञानच आहे—
‘ ऋषी ‘ या शब्दाचा अर्थ ‘शास्त्रज्ञ’ ! त्यांनी मानवाचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास करण्यासाठी संशोधन करून, लोक जागृती केली. अनेक ग्रंथ लिहून मार्गदर्शन केले आणि शतकानुशतकं त्याचा विकास होत आलेला आहे. अनेक थोर संतमहंतांनी, ऋषिमुनिंनी यावर वेळोवेळी संस्कार करून आणि आपल्या संशोधन आणि अनुभवांद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवलेलं आहे.—- इस्लामचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – कुराण – पुरेसा आहे. ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – बायबल – पुरेसा आहे.——
— पण हिंदुत्व म्हणजेच ‘ मानव जीवन मार्गाचा ‘ अभ्यास करण्यासाठी, अनेक ग्रंथालयांत जाऊन शेकडो पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. कारण हिंदू धर्म हा संपूर्णपणे विज्ञानाधिष्ठित धर्म आहे. तो एकाच कोणी व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही. मानवाच्या जीवन विकासाकरिता आणि मानवाचे जीवन सुखी आणि संपन्न होण्याकरिता जो मार्ग भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, अनेक ज्ञानी ऋषी, मुनी आणि संतांनी दाखवला आहे; त्या सत्य महामार्गालाच ‘ सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म ‘ असे म्हणतात.”
— यावर ती महिला पत्रकार निरुत्तर झाली.
आज हिंदू धर्मीय लोकांनाही त्यांच्या धर्माबाबत अज्ञान आहे, कारण ते धर्मग्रंथांचा अभ्यास करत नाहीत. म्हणूनच म्हणतात, की जर ग्रंथ समजले तर संत समजतील, आणि संत समजले तर भगवंत समजेल; तसेच धर्म ही समजेल.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ही सर्व श्रीरामाची इच्छा …! ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
स्वामी विवेकानंद यांनी भ्रमंतीमध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या. काही चांगल्या तर काही वाईट…
अनेकदा ते उपाशी रहात तर कित्येकदा अत्यंत थकून जात. खूपदा भुकेलेही असत. अनेक दयाळू माणसेही त्याना भेटली व त्यांनी स्वामीजींना मदतही केली. बहुतेक गरीब आणि कनिष्ठ म्हणवणाऱ्या जातीतील अनेक लोकांनी त्यांना अन्न व आश्रय दिला आहे…
एकदा उत्तर प्रदेशात ते एका रेल्वे स्टेशनवर रणरणत्या उन्हात भुकेले व तहानलेले बसले होते. खिशात एकही पैसा नव्हता. एक जवळच बसलेला व्यापारी त्याना टोमणे मारत होता. त्याला संन्याशाविषयी वावडे होते.
तो स्वामीजीना म्हणाला, ” पहा बरं मला कसे सुग्रास अन्न पाणी चाखायला मिळते ! कारण मी पैसे मिळवतो व मला हव्या त्या उत्तम गोष्टी घेऊ शकतो. तुम्ही पैसे मिळवत नाही मग अशी उपासमार काढावी लागते.”
यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत. पण थोड्याच वेळात एक अद्भुत प्रसंग घडला. एक हलवाई आला.
त्याने स्वामींजीसाठी जेवण आणले होते. चटई अंथरुन त्याने ताट वाढले, पाणी ठेवले आणि त्यांना जेवायला बसायची विनंती करु लागला.
स्वामीजी त्याला म्हणाले, “अहो तुमची काही तरी गल्लत होत आहे. यापूर्वी मी तुम्हाला कधीही पहिल्याचे आठवत नाही.”…
हलवाई सांगू लागला,
” नाही हो ! मी तुम्हालाच स्वप्नामध्ये पाहिले. माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष श्रीराम आले व म्हणाले, यांना स्टेशनवर जेवण घेऊन जा. म्हणून तर मी आपणास लगेच ओळखले. आता सर्व जेवण गरम आहे तोवर कृपया आपण खाऊन घ्यावे.”
स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हलवायाला वारंवार धन्यवाद देऊ लागले.
तो मात्र.. ” ही सर्व श्रीरामाची इच्छा !” असेच म्हणत राहिला.
बाजूचा व्यापारी हे सर्व पाहून हतबुद्ध झाला. त्याला आपली चूक समजली. त्याने क्षमायाचना करीत स्वामीजींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले….
(रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांच्या ‘स्वामी विवेकानंद – जीवन आणि उपदेश’ या पुस्तकामधील काही भाग.)
संग्राहक : अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
स्त्री असो वा पुरुष, बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल.
महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरच्या महालात निजली होती..
तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले…. त्याला पाहून तिला रहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली..
ती म्हणाली, ” सख्या असा तर मी विचारच नव्हता केला.असं कसं झालं? ”
कृष्ण म्हणाले, “ पांचाली नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही, तर सर्वच कौरव संपले…. द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता..?”
द्रौपदी म्हणाली, “ कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?”
यावर योगेश्वर म्हणतात— “ नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही.”
मग द्रौपदी विचारते, “ कृष्णा मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का?”
कृष्ण म्हणतात, “ नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता !”
द्रौपदी विचारते, “ कृष्णा, मी काय करू शकत होते?”
कृष्ण म्हणतो, “ तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास…. त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते……
आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोलली नसतीसकी …”अंधे का पुत्र अंधा ” व खिदळून हसत त्याचा ” सार्वजनिक अपमान ” केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं….. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती…… “
— आपले शब्दच आपले कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात.
जगात फक्त मानव हाच एक असा प्राणी आहे की त्याच्या दातात नाही, तर जिभेत विष आहे…..
… म्हणून बोलतांना भान ठेवणं महत्वाचं असतं… बेलगाम बोलण्याने, आणि लिहिण्यानेच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडतं..!
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
☆ नासाची ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
मंगळावरील खडक आणि तुटलेले खडक /धूळ यांचे नमुने तपशीलवार अभ्यासासाठी पृथ्वीवर परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळसंस्था NASA व युरोपची अंतराळ संस्था ESA संयुक्तपणे काम करीत आहेत. मार्स पर्सव्हरन्स रोव्हर हा या आंतरराष्ट्रीय व अंतर्ग्रहीय योजनेचा पहिला चरण आहे. त्याचे काम मंगळावरील खडकांचे नमुने गोळा करणे व संग्रहित करणे हे असून हे काम तो व्यवस्थितपणे करत आहे. आज अखेर त्याने शास्त्रोक्त पद्धतीने अकरा नमुने गोळा करून ते संग्रहित करून ठेवले आहेत. त्याने कमीतकमी तीस नमुने गोळा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये हे नमुने पृथ्वीवर परत आणले जातील व अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने त्याचे परीक्षण केले जाईल. जेथे पर्सव्हरन्स कार्यरत आहे त्या जेझेरो क्रेटरच्या आसपासच्या परिसरात पर्सव्हरन्सच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी ‘मंगळ नमुना परत’ योजना आखण्यात आली आहे. यात दोन मोहिमा अंतर्भूत आहेत. पहिल्या मोहिमेअंतर्गत एक यान जेझेरो घळीत किंवा त्याच्या आसपास उतरेल, पर्सेव्हरन्सने मंगळ भूमीवर निर्धारित जागी ठेवलेले नमुने हस्तगत करेल व हस्तगत केलेले नमुने घेऊन मंगळावरून उड्डाण करून मंगळाच्या कक्षेत येईल. दुसऱ्या मोहिमेअंतर्गत दुसरे यान मंगळाच्या कक्षेत जाऊन हे नमुने ताब्यात घेईल व २०३३ साली हे नमुने सुरक्षितपणे पृथ्वीवर आणेल. अंतराळविज्ञानाच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्या ग्रहावरून गोळा करून आणलेले हे नमुने एका कळीच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील आणि तो प्रश्न म्हणजे : कधीकाळी मंगळावर जीवन अस्तित्वात होते का? पृथ्वीवरील अत्याधुनिक व उच्च दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने तपासल्यानंतरच आपणास वरील प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.
NASA व ESA हे कसे साध्य करणार आहेत हे आपण पाहू :
अ) सन २०२८ च्या मध्यावर नमुना पुनर्प्राप्ती लँडर (sample retrieval lander) मंगळावर उतरवला जाईल. त्याच्यावर नासाने तयार केलेला मार्स एसेन्ट व्हेईकल हा अग्निबाण आणि इसा (ESA) ने तयार केलेला नमुना हस्तांतरण बाहू (sample transfer arm)असतील. या लँडर बरोबर दोन हेलिकॉप्टर्ससुद्धा पाठवली जातील.
ब ) मंगळावरील नमुनेअसलेली पेटी घेऊन पर्सेव्हरन्स रोव्हर लँडर जवळ येईल. लँडर वरील नमुना हस्तांतरण बाहुच्या सहाय्याने ही पेटी मार्स एसेन्ट व्हेईकल या अग्निबाणाच्या टोकावरील एका कप्प्यात ठेवण्यात येईल.
ब-१) अलीकडेच नासाने केलेल्या अभ्यासावरून पर्सेव्हरन्स रोव्हरची कार्यक्षमता २०३० पर्यंत अबाधित राहील असा निष्कर्ष निघाला आहे. पण काही अनपेक्षित कारणांमुळे जर २०३० पर्यंत पर्सेव्हरन्स रोव्हर कार्यक्षम राहू शकला नाही तर लँडरवरील हेलिकॉप्टर पर्सेव्हरन्सने नमुन्याची पेटी ज्या जागेवर ठेवली असेल त्या जागेवर जाऊन ती पेटी उचलेल व अग्निबाणाच्या वरच्या कप्प्यात आणून ठेवेल. या हेलिकॉप्टर्सची रचना मंगळावर सध्या कार्यरत असलेल्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टर सारखीच असेल पण त्यास चाके असतील जेणेकरून नमुन्यांची पेटी घेण्यासाठी ते पेटीच्या अगदी नजीक जाऊ शकेल; तसेच पेटी उचलण्यासाठी त्याला एक लहानसा हात (arm) असेल.
क ) इसाने तयार केलेला पृथ्वी परत ऑर्बिटर (earth return orbiter) २०२७ सालच्या मध्यावर प्रक्षेपीत करण्यात येणार आहे. त्याच्यावर नमुने हस्तगत, प्रतिबंध आणि परतीची प्रणाली (capture, containment and return system) तसेच पृथ्वी प्रवेश वाहन असेल. हा ऑर्बिटर मंगळाच्या ठरलेल्या कक्षेत प्रवेश करून मंगळाभोवती भ्रमण करेल.
ड ) मंगळावरील खडकांच्या नमुन्यांची पेटी घेऊन मार्स एसेन्ट व्हेईकल हा अग्निबाण मंगळभूमीवरून उड्डाण करून earth return orbitar ज्या कक्षेत भ्रमण करत असेल त्या कक्षेत येईल. ऑर्बीटरमध्ये असलेली परतीची प्रणाली हे नमुने हस्तगत करून पृथ्वी प्रवेश वाहनात ठेवेल. त्यानंतर हा ऑर्बिटर मंगळाची कक्षा सोडून पृथ्वीकडे मार्गक्रमण करेल. पृथ्वीच्या जवळ आल्यावर ऑर्बीटरपासून प्रवेश वाहन वेगळे होईल व पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून २०३३ साली सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरेल.
इ ) वैज्ञानिकांद्वारा या नमुन्यांचे अत्याधुनिक उपकारणांद्वारे परीक्षण केले जाईल. त्यानंतरच ‘ मंगळावर कधीकाळी जीवन होते का? ‘ या बहुप्रतिक्षित प्रश्नाचे उत्तर मिळेल.
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंधराव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्र, त्वष्ट्ट, मित्र, वरुण, द्रविनोदस् अग्नि, अश्विनीकुमार आणि अग्नि या ऋतुकारक देवतांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त ऋतुसूक्त म्हणून ज्ञात आहे.
गार्ह॑पत्येन सन्त्य ऋ॒तुना॑ यज्ञ॒नीर॑सि । दे॒वान्दे॑वय॒ते य॑ज ॥ १२ ॥
गार्ह्यपत्य हे अग्नीदेवा अमुचा गृहस्वामी तू
सर्व ऋतुंच्या बरोबरीने अध्वर्यू होशी तू
मान देऊनी आर्जवासि या पाचारण हो करा
हविर्भागासह यज्ञाला देवांना अर्पण करा ||१२||
☆
(हे सूक्त व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ प्राचीन भारतातील सागरी विज्ञान — लेखक : श्री नारायण वाडदेकर ☆ सुश्री शुभा गोखले ☆
मोहरीएवढा चिमुकला मानवी गर्भ मातेच्या पोटातील गर्भजलात वाढतो. पण नंतर जमेल तेव्हा पाण्याकडे परतण्याची त्याची ओढ राहतेच. करमणूक म्हणून पोहणे, गरजेपोटी मासे पकडणे, साहसापोटी, व्यापारासाठी नद्या, समुद्रातून घरापासून अधिकाधिक दूर जाणे सुरूच राहते. यातूनच माणूस दर्यावर्दी झाला. भारताला नौकानयनाचा हजारो वर्षांचा इतिहास आहे.
कोची येथे बांधलेली भारताची सर्वात मोठी विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांतचे लोकार्पण झाले. या आत्मनिर्भरतेची बीजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते केवळ २५ वर्षांचे असताना नौकानयनाचे व्यापारी, आर्थिक, आरमारी महत्त्व ओळखून पेरली. ते नौकाबांधणी आणि बंदरांचा विकास करू लागले. योग्य माणसे पारखून त्यांना जबाबदारी, निधी आणि स्वातंत्र्य देऊन महाराजांनी ब्रिटिश, पोर्तुगीज, सिद्धींवर जरब बसेल, असे जलदुर्ग व नौदल उभारले. समुद्राचे, वाऱ्यांचे, नक्षत्रांचे, सागरी युद्धशास्त्राचे सखोल ज्ञान स्वत: मिळवलेच, शिवाय आपल्या सहकाऱ्यांनाही दिले. शिवकालीन मराठीत नाविक भांडय़ांसाठी (नौकांसाठी) तराफे, होडय़ा, गुराबे, शिबाडे, गलबते, मचवे, असे शब्द आहेत. ते अर्थातच नाविक व्यवहारांमुळेच रुळले आहेत. गुराब या शिडे आणि डोलकाठय़ायुक्त मोठया बोटीची वाहतूक क्षमता ३०० टनांपर्यंत असे. ती सुमारे १५० सैनिक आणि सात-आठ तोफाही वाहून नेई. शिबाड ही एका शिडाची, एका डोलकाठीची नाव युद्धकाळात तोफा बसवून सैनिकी वापरासाठी, तर शांतता काळात मालवाहतुकीस उपयोगी पडत असे. गलबते, मचवे, होडय़ा आकाराने व क्षमतेने लहान, पण शीघ्रगतीने वल्हवण्यायोग्य असत.
सम्राट चंद्रगुप्तांच्या मौर्यकालातील सैन्यात आरमाराला महत्त्व होते. समुद्रावरील चाच्यांचा बंदोबस्त, सागरसीमा सुरक्षित राखणे, समुद्रात उघडणाऱ्या नदीमुखांचे रक्षण, अशी कामे आरमार करत असे. जवळच्या श्रीलंकेपासून ते दूरच्या इजिप्त, सीरियापर्यंतही मौर्यकालीन जहाजांची ये-जा चाले. तमिळनाडूत चोला, चेरा, पांडय़ा ही अतिप्राचीन शिवोपासक राजघराणी साधारण ख्रिस्तनंतर तिसऱ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत कारभार करत होती. श्रीलंका, आफ्रिका, रोम, ग्रीसपर्यंत त्यांचा मसाल्याचे पदार्थ आणि माणिक-रत्नांचा व्यापार चाले. ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपासून सिंधू खोऱ्यातील हिंदी मेसोपोटेमियापर्यंत, तसेच पूर्वेला थायलंडपर्यंत व्यापारउदीम केला जात असे. ४५०० वर्षांपूर्वीची लोथल ही जगातील पहिली गोदी सिंधमधील आहे.
‘जयेम सं युधि स्पृध:’ हे आयएनएस विक्रांतचे ब्रीदवाक्य ऋग्वेदसंहिता प्रथम मंडल सूक्त ८, आणि नौसेनेचे ब्रीदवाक्य ‘शं नो वरुण:’ तैत्तिरीय उपनिषदातील आहे. ४००० वर्षांपूर्वीच्या अथर्ववेदात आणि त्याहीपूर्वीच्या ऋग्वेदात मोती, समुद्रसंपत्ती, शंभर वल्ह्यांच्या जहाजांची वर्णने आहेत. नंतर समुद्रप्रवास वर्ज्य असा संकेत रूढ झाला आणि आपल्या प्रगतीत बराच काळ अडथळा आला.
लेखक : नारायण वाडदेकर, (मराठी विज्ञान परिषद)
संग्रहिका : शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈