डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ६ (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र : छंद – गायत्री
मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – १ ते ३ इंद्र; ४ ते ६, ८, ९ मरुत्; ५ ते ७ इंद्रमरुत्; १० – इंद्र
—मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील सहाव्या सूक्तात इंद्र आणि मरुत् या देवतांना आवाहन केलेले आहे. तरीही हे सूक्त इंद्रसूक्त म्हणूनच ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल.
मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री.
यु॒ञ्जन्ति॑ ब्र॒ध्नम॑रु॒षं चर॑न्तं॒ परि॑ त॒स्थुषः॑ । रोच॑न्ते रोच॒ना दि॒वि ॥ १ ॥
व्योमामध्ये चमचमताती असंख्य नक्षत्रे
सज्ज जाहली या देवाच्या प्रस्थानास्तव खरे
इंद्राचे हे तेज किती हो उज्ज्वल प्रकाशते
सामर्थ्याने साऱ्या विश्वे संचारा करिते ||१||
यु॒ञ्जन्त्य॑स्य॒ काम्या॒ हरी॒ विप॑क्षसा॒ रथे॑ । शोणा॑ धृ॒ष्णू नृ॒वाह॑सा ॥ २ ॥
अती देखणे तांबटवर्णी अश्व सज्ज झाले
रथासी जुंपून सेवक त्यांना घेउनिया आले
पाहुनिया वारूंना लोभस अभिलाषा जागली
आरुढ होता इंद्र रथावरी तेजा येत झळाळी ||२||
के॒तुं कृ॒ण्वन्न॑के॒तवे॒ पेशो॑ मर्या अपे॒शसे॑ । समु॒षद्भि॑रजायथाः ॥ ३ ॥
जयासि ना आकार तयाला साकारा आणिले
जाड्य अचेतन तयामध्ये तू चैतन्या भरले
साक्ष होऊनी उषेसवे तू प्राणा साकारले
जन्म घेउनिया अवनीवर अवतारुनी आले ||३||
आदह॑ स्व॒धामनु॒ पुन॑र्गर्भ॒त्वमे॑रि॒रे । दधा॑ना॒ नाम॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ४ ॥
यज्ञाकरिता सर्वा परिचित असे नाम धारिले
पुनःपुन्हा जन्माला येण्या गर्भवास पावले
जननानंतर मरण अशा या सृष्टिक्रमा राखिले
कितीकदा या अवनीवरती जन्म घेउनी आले ||४||
वी॒ळु चि॑दारुज॒त्नुभि॒र्गुहा॑ चिदिन्द्र॒ वह्नि॑भिः । अवि॑न्द उ॒स्रिया॒ अनु॑ ॥ ५ ॥
बलशाली तू सुराधीपती योगसिद्ध राजा
सहज भेदिशी अशनी योगे अभेद्य ऐशा नगा
योगाच्या सामर्थ्याने तू गुंफा फोडुनीया
प्रभारूपी धेनूंना आणिसी शोधूनी तू लीलया ||५||
दे॒व॒यन्तो॒ यथा॑ म॒तिमच्छा॑ वि॒दद्व॑सुं॒ गिरः॑ । म॒हाम॑नूषत श्रु॒तम् ॥ ६ ॥
वैभवदायी देवेंद्राला कितिक स्तोत्र अर्पिली
समाधान देवाला अपुल्या देण्यास्तव गायिली
किती महत्तम सुरेंद्र तैसा यशोवंत फार
जगता साऱ्या विश्रुत आहे शचीपती तो थोर ||६||
इन्द्रे॑ण॒ सं हि दृक्ष॑से सञ्जग्मा॒नो अबि॑भ्युषा । म॒न्दू स॑मा॒नव॑र्चसा ॥ ७ ॥
देवेंद्राला भय ना ठावे शूर वीर तेजस्वी
तयासवे तव संचाराची शोभा ही आगळी
उभय देवतांचे हे तेज प्रदीप्त हो होते
मुदित पाहूनी दोघांना ही समाधान दाटते ||७||
अ॒न॒व॒द्यैर॒भिद्यु॑भिर्म॒खः सह॑स्वदर्चति । ग॒णैरिन्द्र॑स्य॒ काम्यैः॑ ॥ ८ ॥
इंद्राचे अनुचर ही असती सकलांना प्रीय
दहीदिशांना तेज फाकते त्यांचे तेजोमय
अवगुण त्यांच्या ठायी नाही सर्वगुणांनी युक्त
त्यांच्या पूजेसाठी घोष करीत त्याचे भक्त ||८||
अतः॑ परिज्म॒न्ना ग॑हि दि॒वो वा॑ रोच॒नादधि॑ । सम॑स्मिन्नृञ्जते॒ गिरः॑ ॥ ९ ॥
भक्त तुझा मी दास तुझा मी स्तोत्र तुझी अळवितो
तुझ्या स्तुतीने अपुली वैखरी अलंकृत करितो
सर्वव्यापी हे देवा करता विलंब का आता
द्युलोकीहून सत्वर यावे दर्शन द्यावे आता ||९||
इ॒तो वा॑ सा॒तिमीम॑हे दि॒वो वा॒ पार्थि॑वा॒दधि॑ । इन्द्रं॑ म॒हो वा॒ रज॑सः ॥ १० ॥
व्योमातुन वा पार्थिवातुन सत्वर ही यावे
दिव्यलोकही वा त्यजुनी आता साक्ष इथे व्हावे
इंद्राचा सहवास अर्पितो अभिष्ट आनंद
अभिलाषा ना अन्य ठेविली दर्शन हा मोद ||१०||
भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈