मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

साक्षात शंकर महादेवाची पत्नी गणपती आणि कार्तिकेयाची माता असलेल्या पार्वतीला सुद्धा कधीतरी खूप एकाकी वाटे. भगवान शंकर ध्यानात मग्न आणि पुत्र आपापल्या उद्योगात. त्यामुळे तिला वाटले आपल्याला समजून घेणारी आपल्या भावनांची कदर करणारी अशी एक कन्या आपल्याला हवी. एकदा भगवान शंकर तिला इंद्राची राजधानी अमरावती येथे घेऊन गेले. तेथे सुंदर वृक्षवल्ली पाहून पार्वतीला खूप आनंद झाला. तेथे कल्पवृक्ष पाहून तिला खूप आनंद झाला .  तिने आपल्याला एक मुलगी हवी अशी इच्छा बोलून दाखवली. कल्पवृक्षाने तिला एक सुंदर बालिका दिली. पार्वती खुश झाली. तिने तिचे नाव ठेवले अशोक सुंदरी. दुःख दूर करणारी एक सुंदर स्त्री म्हणजे अशोकसुंदरी. अशोकसुंदरी हळूहळू मोठी झाली. तारुण्याने मुसमुसली .तेव्हा पार्वतीने तिच्या लग्नाविषयी विचार सुरू केला. चंद्रकुलात उत्पन्न झालेला राजपुत्र नहुुश हा आपला जावई व्हावा असे तिला वाटले. तिने अशोक सुंदरीला सांगताच तिला सुद्धा ते पटले .एक दिवस हुंड राक्षसाचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने तिला लग्नाविषयी विचारले. तिने नकार देताच त्याने तिचे कपटाने अपहरण केले. अशोक सुंदरीने त्याला शाप दिला, मी साक्षात पार्वती देवीची कन्या आहे .तुझा मृत्यू नहुशाच्या हातून घडेल असा मी तुला शाप देते. मग  ती तिथून निसटली. व कैलास पर्वतावर पार्वतीकडे गेली. इकडे घाबरलेल्या हुंडा राक्षसाने नहुशाचे पण अपहरण केले.  तेथील एका दासीने त्याला गुपचूप पळवले आणि वशिष्ठ ऋषींच्याकडे सुपूर्द केले. वशिष्ठ- अरुंधती यांनी त्याचे चांगले पालनपोषण केले. त्याला खूप शिकवले . त्याने हुंड राक्षसाशी युद्ध करून त्याला ठार केले आणि अशोक सुंदरीशी विवाह केला. अशी ही पार्वतीची पर्यायाने शंकर- पार्वती यांची कन्या अशोक सुंदरी.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फिदाई हुसैन हवेली / मीना बाजार कोठी” – लेखिका : सुश्री प्रमिला बत्तासे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “फिदाई हुसैन हवेली / मीना बाजार कोठी” – लेखिका : सुश्री प्रमिला बत्तासे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

(ऐतिहासिक दस्तावेजांप्रमाणे औरंगजेबाने शिवाजीमहाराजांना जिथे कैदेत ठेवले, ते ठिकाण…)

मागील आठवड्यात 29 नोव्हेंबर 2024 या दिवशी आग्रा येथे पर्यटनासाठी गेलो होतो. दोन दिवस आधी जयपुर फिरून झाले होते. जयपूरहून निघून आग्र्याला येताना रस्त्यात फतेहपूर सिक्री बघितले. तेथील मुघल बादशाह अकबर यांचा भव्य महाल बघितला. तिथल्या गाईडच्या तोंडून अकबराच्या हिंदू पत्नी जोधाबाई यांच्यासाठी बांधलेला महाल, त्यांच्यासाठीच स्वतंत्र स्वयंपाक घर इत्यादी, इत्यादी बघून झाले. दुसऱ्या दिवशी आग्र्याला आल्यावर प्रथम आग्र्याचा किल्ला बघितला. भरपूर भव्यदिव्य आहे. सोबत गाईड घेतलेला असल्यामुळे बरीच माहिती, छोटे छोटे बारकावे तो सांगत होता. हा किल्ला बघत असतानाच एका सुंदर अशा महालात गाईडने माहिती दिली की इथे औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत ठेवले होते. त्यांच्या आयुष्याची शेवटची आठ वर्षे ते इथेच कैदेत राहिले. तिथून ताजमहालाची भव्य वास्तू स्पष्ट दिसत होती. या ताजमहाला कडे बघत बघतच त्यांच्या कैदेतली वर्षे संपलीत कैदेतच त्यांचा अंत झाला..

अर्थात हा सगळा इतिहास मी दुसऱ्यांदा ऐकत होते. या आधी पाच वर्षांपूर्वी आम्ही गार्डन्स क्लब चे सदस्य हा किल्ला बघून आलो होतो. त्याही वेळी गाईड कडून ही सगळी माहिती ऐकलेली होती. त्यामुळे माझे लक्ष तिकडे जेमतेमच होते.

किल्ला बघून होत आला होता. प्रतीक आणि त्याच्या बाबांची काहीतरी खुसुर- फुसुर गाईड बरोबर चालू होती. सुनील शी बोलताना नंतर कळले की हे दोघेही गाईडला विचारत होते, आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवले गेले होते ती जागा कोणती? ती आम्हाला बघायची आहे. ( ही गोष्ट खरंतर पाच वर्षांपूर्वीच्या ट्रिपमध्येही आमच्या कुणाच्याही लक्षात आली नव्हती आणि याही वेळी माझ्या लक्षात नव्हतीच).

गाईडने उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली होती. किल्ल्यामध्ये तर तशी कुठलीही जागा नव्हती, जिथे त्यांनी शिवाजी महाराज येथे होते असे सांगितले.

शेवटी गुगल बाबा ची मदत घेऊन या दोघांनी गाईडला गुगल वरील लोकेशन दाखवले. ‘शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेली जागा’ असे गुगल वर टाकले तेव्हा ह्या किल्ल्यापासून पाच किलोमीटर वरील एक लोकेशन गुगलने दाखवले. गाईडने अर्थातच खांदे उडवले. आमच्याबरोबर येण्यासाठी त्यांनी नकार दिला. पण या दोघांच्या मनातली जिज्ञासा संपली नव्हती.

आपण आग्र्यामध्ये दोन दिवस राहायचे, अकबर, जहांगीर यांचे राजवाडे बघायचे, शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहाला पुढे नतमस्तक व्हायचे आणि ज्या साम्राज्यामध्ये आमचा मराठी राजा शंभर दिवस कैदेत होता त्या जागेवर, त्या वास्तूमध्ये माथा न टेकता आग्रा सोडायचे हे आमच्या मनाला पटेना. गाईडला निरोप देऊन आम्ही किल्ल्याच्या बाहेर पडलो आणि गुगल लोकेशन नुसार शिवाजी महाराजांच्या कैदेचे ठिकाण शोधायला सुरुवात केली.

भोसले आणि बत्तासे असा सात जणांचा ग्रुप बरोबर असल्यामुळे आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर सारखी एक मोठी गाडी केलेली होती. तीच गाडी घेऊन निघालो. आग्रा शहर एका बाजूला टाकून बाहेरच्या रस्त्याला लागलो. शहरापासून लांब नव्हता, पण शहराच्या बाहेरून जाणारा म्हणजे एखाद्या गावकुसासारखा तो रस्ता होता. लोकेशनच्या साधारण एक किलोमीटर अलीकडे आमची गाडी थांबली. पुढचा रस्ता नीरुंद आणि काटेरी झाडांनी वेढलेला होता. ड्रायव्हरने गाडीवर ओरखडे पडायला नकोत म्हणून पुढे येण्यास नकार दिला.

गाडी तिथेच उभी करून मी, सुनील रश्मी व प्रतीक आम्ही चौघे चालत चालत त्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या एका बाजूला गावकुसा बाहेरची वस्ती जाणवत होती. रस्ता काटेरी तर होताच वर अस्वच्छही खूप होता. पायाखालच्या रस्त्याचे, रस्त्याकडेच्या घाणीचे फार काही वाटतच नव्हते, कारण 400 मीटरच्या अंतरावर आपल्याला हवे ते ठिकाण दिसू लागले होते. शेवटी एका खूप मोठ्या इमारती जवळ आम्ही येऊन थांबलो. भले मोठे लोखंडी गेट बंद होते. आजूबाजूला झाडी वाढलेली होती. ‘राजा जय किशनदास भवन’ असे ह्या इमारतीवर नाव होते. गेट जवळ गेल्यावर एक छोटेसे फाटक नजरेत आले. त्याला कडी होती पण कुलूप नव्हते. कडी काढून सरळ आत घुसलो. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हते. गेटच्या आत मात्र स्वच्छता होती. हवेली पूर्ण बंद होती पण कोणाचातरी वावर तिथे आजूबाजूला आहे एवढे लक्षात येत होते. कुणाला काही विचारावे असे आजूबाजूला कोणी नजरेतही येईना. इतक्यात शेजारच्या वस्तीतील एक जण आमच्यासमोर आला. ‘क्या चाहिये आपको?’

आम्ही थोडसं चाचरतच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत आणि शिवाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवले होते ती जागा बघण्यासाठी बाहेर पडलो आहोत. गुगलने आम्हाला या जागेवर आणून सोडले आहे, हे सांगताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ‘आप सही जगह पर आये हो’ त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले.

त्या माणसाने जी काही माहिती दिली ती अशी होती – या इमारतीला ‘कोठी मीना बाजार’ किंवा ‘कोठी मीना बाजार हवेली’ असे म्हणतात. शिवाजी महाराजांना अटक करून इथेच नजर कैदेत ठेवले होते. 99 दिवस ते इथे होते आणि शंभरव्या दिवशी ते इथून निसटले.

मुघल राजवटीनंतरच्या काळात कोठी मीना बाजार हवेली ब्रिटिशांच्या ताब्यात होती. ब्रिटिशांनी जेव्हा त्यांची राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवली तेव्हा 1857 मधे ही कोठी लिलावात विकली होती. राजा जय किशनदास या व्यक्तीने ती खरेदी केली होती. सध्या राजा जयकिशनदास यांचेही कुणी वारसदार या कोठीमध्ये राहत नाहीत. फक्त त्या कोठीची देखभाल करण्यासाठी एक-दोन कुटुंब आजूबाजूला आहेत. बाकी बऱ्याचशा जागेवर अतिक्रमण पण झालेले आहे. गुगल सर्च वर नंतर बरीच माहिती वाचायला मिळाली. त्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारने या जागेत शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्याचा घाट घातलेला आहे. त्याला अर्थातच स्थानिक जागा बळकावणाऱ्यांनी विरोधही केलेला आहे आणि हा निर्णय कायद्याच्या आधीन आहे. त्यामुळे ही वास्तू जैसे थे अशी उभी आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावण्यात आलेला नाही. फक्त ब्रिटिशांनी ही वास्तू राजा जय किशन दासला लिलावात दिल्याचा उल्लेख असलेली एक पाटी तिथे बघायला मिळाली. दरवाजे अर्थातच बंद असल्यामुळे आत जाता आले नाही. तिथेच बाहेर उभे राहून शिवाजी महाराजांच्या धैर्याला, धाडसाला आणि शौर्याला आठवत नतमस्तक झालो. डोळे भरून ती वास्तू मनात साठवली आणि परत फिरलो. चार-पाच दिवसांच्या सहलीमधे जयपूरचा हवामहल, अमेर फोर्ट, फत्तेपूर सिक्रीचा अकबराचा किल्ला, आग्र्याचा किल्ला, ताजमहाल हे सगळं बघत फिरत होतो. पण या ट्रिप मध्ये खरे समाधान वाटले ते मीना बाजार कोठीची इमारत बघून.

इथे लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे आणि आग्र्यात जाणाऱ्या तमाम मराठी माणसाची पाऊले इकडेही आधी वळावीत असे मनोमन वाटले. या मीना बाजार कोठी पर्यंत पोहोचता आले याबाबत खूप समाधान वाटले.

पाच वर्षांपूर्वी आग्रा फिरताना हा इतिहास आपल्याला आठवलाही नव्हता याची खंत सुद्धा वाटली.

असो.

पण या वेळच्या समाधानाचे सगळे क्रेडिट अर्थातच माझ्या इतिहास प्रेमी नवऱ्याला आणि शाळेत शिकलेला सर्व इतिहास तोंडपाठ असणाऱ्या माझ्या प्रतीकला.

लेखिका : सुश्री बत्तासे प्रमिला

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ““नीलवर्ण मृत्यू… कृष्णवर्ण देवदूत !! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ” ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

नीलवर्ण मृत्यू… कृष्णवर्ण देवदूत ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपले भगवान श्रीकृष्ण नीलवर्ण, आपले प्रभू श्री रामचंद्र नीलवर्ण…. आपले भगवान श्री शिवशंकर नीलकंठ ! निळा रंग विशाल, अथांग अवकाशाचे प्रतिक. पण सामान्य मानवाच्या देहावर, त्यातल्या त्यात तान्ह्या बाळांच्या नाजूक कांतीवर नखं, ओठ इत्यादी ठिकाणच्या नाजूक त्वचेवर निळ्या रंगाची छटा… म्हणजे साक्षात मृत्यूची पदचिन्हे ! वैद्यकीय भाषेत या अवस्थेला ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ असे नाव आहे.

सुमारे ८० वर्षांपूर्वीची गोष्ट. अमेरिकेत एका वैद्यकीय महाविद्यालयात एक हृदयशस्त्रक्रिया सुरु होती. ती पहायला तेथील तज्ज्ञ डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक, डॉक्टर हेलन ताऊसीग हे दोन तज्ज्ञ शल्यविशारद. या दोघांनी या रुग्णाचे हृदय उघडले होते…. रुग्णाचे वय होते पंधरा महिने… मुलगी होती… तिचे नाव होते Eileen Saxon. पण या दोन्ही डॉक्टरांच्या मागे उभे राहून 

ही शस्त्रक्रिया नेमकी कशी करायची याचे मार्गदर्शन करत होती एक वैद्यकीय डॉक्टर नसलेली व्यक्ती… त्या वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून नेमणूक असलेला एक कृष्णवर्णीय माणूस !

शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असती तर त्या दोन्ही डॉक्टरांचे संपूर्ण वैद्यकीय आयुष्य उध्वस्त झाले असते. शस्त्रक्रिया करताना तसा प्रसंग उद्भवला सुद्धा होता…. पण वैद्यकीय पदवी नसलेल्या त्या कृष्णवर्णीय माणसाने वेळीच मार्ग दाखवला आणि ते मूल पुन्हा श्वास घेऊ लागले… बाळाच्या शरीरावरील निळे डाग गेले… आणि बाळाची कांती गुलाबी झाली… !

जगातली अशा स्वरूपाची ती पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली होती… जगभरात डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक, डॉक्टर हेलन ताऊसीग यांचे नाव झाले…. लाखो बालके त्या विशिष्ट विकारातून मुक्त झाली. काय होता तो विकार?…..

… नायट्रेट नावाचा पदार्थ रक्तात गेला की त्याचे नायट्राईट मध्ये रूपांतर होते. आणि यामुळे रक्ताची प्राणवायू वहन करण्याची क्षमता अत्यंत कमी होते… त्यामुळे हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते. यावर १९४४ पर्यंत काही उपाय सापडत नव्हता. विशेषत: अमेरिकेत या आजाराने खूप लोकांचा, विशेषत: बालकांचा बळी घेतला होता. नायट्रेट असलेले विहिरीचे पाणी पोटात जाणे, ते पाणी वापरून तयार केलेले द्रवपदार्थ, खाद्यपदार्थ पोटात जाणे अशी काही कारणे यामागे होती. शिवाय हा विकार अनुवांशिक सुद्धा आहेच.

सुतारकामाचे धडे आपल्या वडिलांच्या हाताखाली राबून गिरवणारा एक तरुण. त्याला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी त्याने सात वर्षे अधिकचे काम करून काही रक्कम बँकेत जमा करून ठेवली होती. पण त्यावेळी आलेल्या जागतिक मंदीमुळे बँक बुडाली आणि याचे स्वप्नसुद्धा. पण पठ्ठा धैर्यवान होता. पुन्हा पैसे जमा करण्याच्या उद्योगाला लागला. जादाची कमाई करावी म्हणून एका वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून त्याने चाकरी स्वीकारली.. तुटपुंज्या वेतनावर. रंगाने काळ्या असणा-या कर्मचा-यांना तेथे प्रवेश करण्यासाठी मागील दाराने यावे-जावे लागे… त्या इमारतीत प्रवेश करणारे ते एकमेव कृष्णवर्णीय असत… इतर काळ्या लोकांना तिथे प्रवेश नव्हता…. इतका वर्णद्वेष त्या काळी अमेरिकेतही होता.

डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक हे जॉन्स हाफ्कीन्स वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. तर डॉक्टर हेलन ताऊसिग या लहान मुलांच्या डॉक्टर होत्या. या आजारावर उपाय शोधण्याचा आग्रह डॉक्टर हेलन यांनी धरला आणि डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांनी तसा प्रयत्नही सुरु केला. कुत्र्यांच्या हृदयात असा विकार निर्माण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून, रक्तवाहिन्यांची वेगळी जोडणी करून काही करता येते का, हे त्यांनी आजमावयाला सुरुवात केली. त्या सफाई कर्मचाऱ्याने त्या कामात मदत करणे स्वत:हून स्वीकारले. सुतार काम सफाईने करण्याची सवय असलेल्या या तरुणाने कित्येक कुत्र्यांची हृदये उघडून त्यात तो विकार निर्माण करण्याचा यत्न कित्येक दिवस सुरूच ठेवला. त्यात त्याचा इतका हातखंडा झाला की, इतर प्रशिक्षित सहाय्यकाना जे काम शिकायला सहा महिने लागत होते, ते काम हा माणूस चार दिवसांत शिकला… आणि एके दिवशी त्याने त्यात यशही मिळवले… त्याने रक्तवाहिन्या अशा काही जोडल्या होत्या की जणू त्या तशा जन्मत:च, नैसर्गिकरीत्या तशाच असाव्यात…. देवाने बनवलेल्या असतात तशा !

अक्षरश: डोळे बंद करून तो रक्तवाहिन्या ओळखू, जोडू, कापू शकायचा. हे पाहून डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून बढती दिली… मात्र पगार स्वच्छता कर्मचाऱ्याएवढाच. फक्त एक झाले की… त्या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील दाराने प्रवेश करणारा तो पहिला काळा माणूस ठरला !

तो विकार मुद्दामहून निर्माण केल्यानंतर तो विकार बराही करण्याचे तंत्र डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक आणि या काळ्या माणसाने विकसित केले. त्यासाठी लागणारी हत्यारे याच काळ्या माणसाने स्वत: तयार केली ! दरम्यानच्या काळात या काळ्या माणसाने अनेक वेळा अनेक प्रकारचे अपमान सहन केले. बायको, दोन मुली यांचा खर्च भागवण्यासाठी हा माणूस मोकळ्या वेळात सुतार कामही करू लागला. एवढेच नव्हे तर त्याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकांनी दिलेल्या पार्टीत तो चक्क वेटरचे कामही करत होता.. पैशांसाठी. खरे तर आता तो वैद्यकीय प्रयोगशाळा सहाय्यक होता… पण त्याला तसा मान आणि वेतन देणे मात्र तेथील गोऱ्या कातडीच्या व्यवस्थेने नाकारले. यामुळे एकदा तर तो माणूस नोकरी सोडून निघालाही होता… पण जगभरातील लहानग्या लेकरांचे नशीब थोर… तो कामावर परतला. आणि मग तो पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेचा इतिहास घडला.

डॉक्टर अल्फ्रेड ब्लालॉक यांच्या कामाची दखल साऱ्या वैद्यकीय विश्वाने घेतली.. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला… पण खुद्द डॉक्टर आल्फ्रेडसुद्धा या काळ्या माणसाच्या अतुलनीय योगदानाचा साधा उल्लेखही करण्यास धजावले नाहीत. आपण शोध लावलेल्या कृतीचे जग कौतुक करत असताना हा मात्र दूर उभा राहून हे सारे ऐकत होता ! साहजिकच त्याने गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.. जाताना मात्र तो व्यवस्थेविरुद्ध बोलून गेला… पण अशक्त लोकांचे बोल सशक्त व्यवस्थेच्या कानांवर काहीही प्रभाव टाकत नाहीत !

पण त्याच्या पत्नीने त्याला त्या कामावर परत जाण्यास प्रोत्साहित केले… कारण त्याला त्याच्या आयुष्यात तेच करायचे होते… लेकरांचे जीव वाचवायचे होते… नव्या तरुण डॉक्टरांना प्रशिक्षित करायचे होते. तो प्रयोगशाळेत परतून आला… पुढे शेकडो प्रशिक्षणार्थी तरुण डॉक्टरांना शिकवले. डॉक्टर आल्फ्रेड दुस-या विद्यापीठात नोकरीस निघाले होते… त्यांनी यालाही सोबत चल म्हणून गळ घातली… पगार चांगला मिळेल असेही सांगितले.. पण हा गेला नाही ! सुमारे ४५ वर्षे शिकवत राहिला. मध्ये एकदा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो का ते पहायला गेला होता… पण अपुरे शिक्षण पाहून त्याला कुणी प्रवेश दिला नाही… अनुभव तर प्रचंड होता… एखाद्या निष्णात डॉक्टरएवढा. आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणे त्याला अशक्य होते…. मग तो शिकवण्यात रमला ! एका निष्णात डॉक्टरला हे जग मुकले !

डॉक्टर अल्फ्रेड कालवश झाले. त्यांचे तैलचित्र त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लावले गेले…. हा माणूस आता वैद्यकीय प्रयोगशाळा प्रमुख म्हणून कार्यरत होता… पगारात फारसा फरक पडलेला नव्हता… पण त्याच्या प्रेरणेने जगात कित्येक बाळांचे जीव वाचू शकतील असे शिक्षण लोक घेत होते.

त्याच्या जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर मात्र व्यवस्थेला त्याची दखल घ्यावी लागली… त्याला “ मानद डॉक्टर “ ही उपाधी सन्मानपूर्वक देण्यात आली. त्याचे तैलचित्र डॉक्टर अल्फ्रेड यांच्याशेजारी लावण्यात आले. त्याने शोधण्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या शस्त्रक्रिया-पद्धतीच्या नावात त्याच्याही नावाचा समावेश करण्यात आला ! “ Blalock-Thomas-Taussig shunt ! “ होय, त्यांचे नाव होते विवियन Thomas…. डॉक्टर विवीयन Thomas ! पण दुर्दैवाने त्यांना कधीही प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाऊ शकली नाही…. ! कारण ते औपचारिकरित्या प्रशिक्षित डॉक्टर नव्हते !

या विषयावर एक अत्यंत सुंदर चित्रपट, एक माहितीपट बनवला गेला. त्यामुळे Thomas यांचे कार्य जगाला माहित झाले. त्यांचे आत्मचरित्रही गाजले. मात्र चित्रपट अधिक प्रभावशाली आहे. ‘ Something the Lord made ! ‘ हे या चित्रपटाचे नाव. सुमारे दोन तासांचा हा चित्रपट इंग्लिश भाषेत असून इंग्लिश सब-टायटल्स उपलब्ध असल्याने संवाद समजायला सोपे जाते. अभिनयाबाबत बोलायचे झाले तर शब्द नाहीत…. विवियन यांची भूमिका जगला आहे अभिनेता मॉस डेफ. डॉक्टर आल्फ्रेड उभे केले आहेत अभिनेते अलन रिकमन यांनी. चित्रपटातील एकही दृश्य अर्थहीन नाही !

…. निळ्या मरणाला गुलाबी श्वासांचे कोंदण देणारा हा कृष्णवर्णीय मनुष्य वर्णद्वेषाच्या गालावर एक चपराक लगावून गेला…. !

(अमेरिका, भारत आदी देशांत आजही हा विकार आढळतो. पण यावर आता उपाय आहेत. हा वैद्यकीय विषय मला समजला तसा मांडला आहे. तांत्रिक बाबी तपासून पहाव्यात. मात्र चित्रपट जरूर पहावा ज्यांना जमेल त्यांनी. एच. बी. ओ. वर आणि युट्यूब वर उपलब्ध आहे. पुस्तकेही आहेतच. पहिले छायाचित्र अभिनेत्यांचे आहे. दुस-या छायाचित्रात पांढरा कोट घातलेले आहेत ते मानद डॉक्टर विवियन थॉमस!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नायक… –  लेखक : श्री राजेश्वर पारखे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ नायक… –  लेखक : श्री राजेश्वर पारखे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

भल्या पहाटे माझ्या मुलीला, डॉ. प्राप्तीला व माझ्या आईला शिर्डीला सहा वाजताच्या भुसावळ एस. टी. बसने जळगावला जाण्यासाठी सोडवून परत माघारी श्रीरामपूरला निघालो.

पहाटेची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होते. आदल्या तीन दिवस आधीच जवळ जवळ एक हजार किलोमीटरच्या आसपास एस. टी. प्रवास झालेला होता. प्रवासात नेहमी मला कोणी न कोणी असामान्य व्यक्तिमत्त्व नक्कीच भेटते… परंतु पूर्ण प्रवासात असा कोणीच भेटलेला नव्हता.

आपली २००६ सालची मारुती व्हॅन घेऊन राहताच्या चौफुलीवर गाडीचा वेग कमी केला आणि तिथेच एका १९ ते २० वर्षाच्या तरुणाने मला थांबण्यासाठी हात केला. त्याला पाहून आपसूक माझा पाय ब्रेक वर अलगद गेला.

रस्ता पूर्णपणे मोकळा होता तिथेच हा मुलगा उभा होता. उंचापुरा, सडपातळ शरीरयष्टी, निमगोरा, उभट चेहरा असलेला, हलकीशी कोवळी दाढी चेहऱ्यावर असलेला, हॅवरसॅक पाठीमागे लटकावलेली, कानात अगदी साध्या पद्धतीच्या हेड फोन चे बोळे अडकवलेले, चेहरा मात्र प्रचंड आकर्षक असलेल्या या तरुणाला बघून त्याच्या जवळच मी गाडी थांबवली.

त्याने एक स्मित हास्य दिले. माहीत नाही तो किती वेळेपासून इथं असा एकटाच उभा राहिला असेल, ही जाणीव ठेवूनच थांबलो आणि त्याला पुढील सीट वर बसायला सांगितले. विनम्रपणे तो ‘थँक्यू’ म्हणायला विसरला नाही…

श्रीरामपूरच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. सकाळच्या मस्त वातावरणात त्या गार हवेचा आनंद घेत सहज मी त्याच्याकडे बघितले. तसा तो हळुवार हसला. मी त्याला विचारले “कुठे जायचे आहे?”

तो म्हणाला “बाभळेश्वर. “

मी म्हटलं, “तिथेच की अजून कुठे, “

तो म्हणाला “मला ममदापूरला जायचे आहे. “

मी म्हटलं, “अरे वा! रस्त्यातच आहे. सोडतो मी तुला. ” पुढे अजून विचारले, “तिथं कुठं राहतो?”

तो म्हणाला “माझे वडील येतील मला घ्यायला. “

मी म्हटलं “कुठून… ” उत्तर आले “वाकडी तुन”

मी त्याला म्हटलं “मग आपण अस्तगाव मधून जाऊ. तिथे वाकडी चौफुलीलाच तुला सोडतो. ” त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

गाडीने मस्त वेग घेतला होता, मी मध्येच विचारले, “आता कुठून आलास?”

तो म्हणाला “लातूर हून… ” असे म्हणताच “लातूर हून का बरं?”

तो म्हणाला, “माझा सत्कार होता लातूरला. मोटेगावकर सरांनी सत्कार केला. “

माझ्या कपाळावर विस्मयकारी आठ्या आल्या आणि पुन्हा उत्सुकता ताणून राहिली म्हणून विचारले, “कसला सत्कार?”

तो म्हणाला “ते नीट परीक्षेत मला ५९२ मार्क्स पडले म्हणून!”

मला तर आश्चर्याचा धक्काच बसला… भले भले कितीतरी मुलं कष्ट, पैसा खर्च करून या ‘नीट’ च्या अति अवघड परीक्षेत यशस्वी होत नाही अन् या बहाद्दराने तर कमालच केली होती. मी अक्षरशः वेग कमी करून गाडी साईडला थांबवली आणि पुन्हा त्याला विचारले, “किती मार्क्स?”

तो उत्तरला “५९२ मार्क्स. “

मी आश्चर्याचा सुखद धक्का पोहचल्यागतच त्याच्याशी मनोभावे हस्तांदोलन केले व त्याचे अभिनंदन केलें. मनात म्हटलं ‘अरे! हा तर टॉपच्या गव्हर्मेंट कॉलेजला डॉक्टर डिग्री घेणारा भावी विद्यार्थी आहे… माझ्या व्हॅन मध्ये पहिल्यांदाच ‘नीट’ मध्ये इतके मार्क्स पडलेला भावी डॉक्टर विद्यार्थी बसलेला होता.

आता मी त्याची विचारपूस करायला सुरुवात केली. त्याने त्याचे नाव विनायक विठ्ठलराव एलम असे सांगितले. वडील विहीर खोदकामाच्या ट्रॅक्टर वर ब्लास्टींग चे अतिशय जोखमीचे काम करतात असे तो म्हणाला. त्याची मोठी बहीण, तिलाही दहावीला ९७. ७०% मार्क्स मिळाल्याचे त्याने सांगितले, तीने ही Msc (maths) केले आहे आणि दोन नंबर ची बहीण इंजिनिअरिंग करून MPSC ची पहिली परीक्षा पास झाल्याचे सांगितले.

तो सांगत होता आणि मी फक्त आणि फक्त ऐकतच होतो… एका मागून एक शैक्षणिक धक्के मला बसत होते… मी विचारले “तुझ्या वडिलांचे शिक्षण ते किती ?”

तो म्हणाला “पाचवी. आई दुसरी झालेली. हातावरचे मिळेल ते काम करून या आई वडिलांनी पोटाला चिमटा देऊन आम्हाला शिकवले” असे तो भावुक होऊन सांगू लागला… हे सांगताना त्याचे डोळे पाणावलेले मला जाणवले.

मी म्हटले “तुमच्या वडिलांचीही आता माझी भेट होईल. खूप समाधान व आनंद वाटेल मला !

तो गालात हसला, म्हणाला, “माझ्या वडिलांनी दिवसा ट्रॅक्टर वर व रात्री मिळेल ते काम करून आम्हां तिघाही भावंडाना शिकविले. त्यांच्या कष्टाचे चीज झाले. ” तेव्हढ्यात वाकडी गावाची चौफुली आली. मी गाडी थांबवली. त्याने वडिलांना फोन करून तशी कल्पना दिली होतीच.

मी व भावी डॉक्टर खाली उतरलो. तेव्हढ्यात जुनाट होंडा गाडीवर त्याचे वडील विठ्ठलराव आले. उंचेपुरे, रापलेला चेहरा, अंगावर कामावरचे अक्षरशः मळके कपडे, वरची गुंडी उघडी पण अतिशय लोभस व कष्टाळू व्यक्तिमत्त्व मी जवळून पहात होतो.

मी अदबीने हस्तांदोलनासाठी हाथ पुढे केला… त्यांनीही लाजत आपला हाथ पुढे केला. एका प्रचंड कष्टकऱ्याचा कडक व यशस्वी हाथ मी पहिल्यांदाच अनुभवत होतो… त्यांचे मनःपुर्वक खूप खूप अभिनंदन केले.

मी म्हणालो, “विठ्ठलराव, मानलं राव तुम्हांला. पोरांनी तुम्हां आई बापाचं नाव कमावलं. “

त्यांचं उत्तर आलं, “आपण काढलेले वाईट दिस लेकरांना येऊ नये बस एव्हढंच मनासनी ठेवलं… बाकी भगवंताची क्रिपा.. ” हे वाक्य म्हणतांना डोक्यापासून ते पाया पर्यंत नागमोडी वेव्हज घेत ते ओशाळून अगदी अदबीने सांगत होते… “मी तुम्हाला पण ओळखतो. मी अन् सचिन एलम लई वर्षांपूर्वी एकदा ट्रॅक्टर चा पंप तुमच्याकडे घेऊन आलो होतो… “

बराच वेळ विचार करीत असतानाचे उत्तर मला मिळाले. यांची स्मरणशक्ती दांडगी आहे आणि तीच या मुलात आल्यामुळे त्याची हुशारी उदयास आली…

मी म्हणालो, “आता जग तुम्हांला ओळखील… “

मनाला खूप समाधान वाटले, “एक फोटो होऊन जाऊ द्या डॉक्टर” असे त्या मुलाला म्हणताच तो लाजला. आपल्या वडिलांना इशारा करून वरची गुंडी लावायला त्याने आवर्जून सांगितली.

या वयात परिपक्वतेचा अनुभव घेणारा हा ‘विनायक’ आता आमच्या पंचक्रोशीतच नव्हे तर जवळपासच्या सगळ्या तालुक्यामधील शिक्षणातला ‘ नायक झाला होता*…

मोटारसायकल लिलया वळवत विठ्ठलराव यांनी विनायकला पाठीमागे बसवून मला टाटा करीत आपल्या घराकडे निघाले. काळ्या मातीत राब राब राबून एक ‘नायक’ या बापाने या समाजाला दिला होता, कारण त्याची पै न पै कष्टाची होती आणि सृष्टी निर्मात्याला ती मान्य होती… ते दिसेनासे होइपर्यंत मी फक्त एकटक त्यांच्या कडे बघतच होतो…

अनुभवातील शब्द….

लेखक : राजेश्वर पारखे, श्रीरामपूर

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहज सुचलं म्हणून… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ सहज सुचलं म्हणून… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

मनुष्याच्या जडणघडणीत अनेक गोष्टी आपली महत्वाची भूमिका बजावत असतात. यातील अनेक गोष्टींचा प्रभाव मनुष्याच्या मनावर दीर्घकाळ राहू शकतो, त्याला प्रभावित करू शकतो, नव्हे करतोच करतो…..

प्रत्येक मनुष्याचे आयुष्य, जीवन म्हणजे कंगोऱ्यांची वाटी म्हणता येईल. कंगोऱ्याची आत गेलेली बाजू जर दुःख मानली तर बाहेर आलेली बाजू सुख मानावी लागेल. प्रत्येकाच्या वाटीला असे कंगोरे कमीअधिक प्रमाणात असतात.

मनुष्याला प्रभावित करणारे अनेक पैलू आहेत. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा त्यातील एक महत्वाचा मानला जातो.

एक मनुष्य होता. त्याला दोन मुले होती. दोघेही दहावीला होते. एक मुलगा नापास झाला तर दुसरा शाळेत पहिला आला. पत्रकारांनी त्या दोघांची मुलाखत घेतली तेव्हा दोघांनी एकच उत्तर दिले की माझे बाबा वारले म्हणून माझा शाळेत पहिला क्रमांक आला आणि माझे बाबा वारले म्हणून मी नापास झालो. घटना एकच आहे पण दोघांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्याच्या त्याच्या जीवनात वेगवेगळा प्रभाव दर्शवित असतो….

एकाने असे ठरवले असेल की आता माझे बाबा नाहीत, मी चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवून दाखवले तर माझ्या बाबांना आनंद होऊ शकेल, त्याने तसा प्रयत्न केला आणि भगवंताने त्याला त्यात यश दिले…

आणि दुसऱ्याने…?

दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा. दृष्टी तर प्रत्येकाला असते पण जो मनुष्य विवेकाने आपला दृष्टिकोन बदलतो, तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते….. !

जगात अनेक घटना घडत असतात, कधी त्यातील एक घटना आपल्या आयुष्यात घडते, ती आपली परीक्षा असते…. ! परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायचा की घाबरून परीक्षा न देण्याचा निर्णय घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे ?

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रवास पुस्तकाचा… सादर नमन… — हिन्दी लेखक : श्री. प्रदीप शर्मा ☆ भावानुवाद – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रवास पुस्तकाचा… सादर नमन… — हिन्दी लेखक : श्री. प्रदीप शर्मा ☆ भावानुवाद – सुश्री प्रभा हर्षे  ☆

एखाद्या पुस्तकाचा प्रवास खरंतर तेव्हा सुरू होतो, जेव्हा एखादा वाचक ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. या प्रवासाची सुरुवात कुठूनही कशीही होऊ शकते.. कधी ठरवून तर कधी अचानक… कधी स्टडी रूममधून.. कधी बेडरूम मधून.. तर कधी लायब्ररीमधून. इतकंच नाही तर कधी ऑफिसमध्ये

किंवा कॉलेजमध्ये कुणाच्या लक्षात येऊ न देता.. इतरांचा डोळा चुकवून ! नाहीतर मग ट्रेनच्या लांबच्या प्रवासाच्या साथीने…

आणि पुस्तक वाचण्याची प्रत्येकाची पध्दतही अगदी वेगळी असते. काहीजण फक्त पानं चाळून बघतात, काहीजण फक्त काही पाने वरवर वाचून मजकुराचा अंदाज घेतात.. काहीजण ‘फक्त’ ते पूर्ण वाचतात. आणि अगदी मोजकेच वाचक असे असतात की जे पुस्तक अगदी मनापासून.. चवीने परत परत वाचतात.. ते पूर्ण समजेपर्यंत.. मनाचे समाधान होईपर्यंत वाचतात.!

पुस्तकाची मजा कशी घ्यायची हे खरंच वाळवीकडून शिकावं ! काही जण अगदी ‘ पुस्तकातला किडा ‘ म्हणावेत असे असतात, तर काही जण पुस्तकांवर अगदी मनापासून खूप प्रेम करतात … इतकं प्रेम की त्यांची नसलेली.. इतरांकडची पुस्तकेही त्यांना आपलीच वाटतात.. त्यांच्या घरातल्या पुस्तकांना ते वर्तमान पत्राइतकीच किंमत देतात आणि परक्यांच्या पुस्तकांवर मात्र जणू स्वतःचाच हक्क असल्याचे समजतात.

त्यांना दुसऱ्याची पुस्तके हडप करण्याचा जणू छंदच असतो. पुस्तकप्रेमी माणसांना पुस्तक मागायला लाज वाटता कामा नये, असा एक समज आहे. स्वतः विकत घेतलेल्या पुस्तकांना स्वतःची वैयक्तिक लायब्ररी म्हटले जाते.. मग ती पुस्तके कुणी वाचो किंवा न वाचो. पण चांगल्यातली चांगली आणि महागातली महाग पुस्तके स्वतः विकत घेणे हीच खरं म्हणजे सुशिक्षित आणि बुद्धिजीवी माणसाची ओळख ठरते.

एखाद्याने पुस्तक स्वतः खरेदी केलेलं आहे की दुसऱ्या कुणाकडून मागून आणलंय हे ते पुस्तक स्वतः कधीच कुणाला सांगत नाही. त्याच्या मालकाने त्याला कधी हात तरी लावलाय का हेही रहस्य ते बिचारे पुस्तक कधीच कुणाला सांगत नाही. काही बिचारी दुर्दैवी पुस्तके तर कुणी आजवर हातातही घेतलेली नाहीत हे त्यांच्या चिकटलेल्या पानांवरुन समजते. पण असे ‘ कुमारी ’.. ‘ अछूत ’ पुस्तक जेव्हा एखादा सच्चा पुस्तकप्रेमी हातात घेतो तेव्हा ती चिकटलेली पानं फडफडायला लागतात… जणू त्यांचं भाग्य उजळलेलं असतं.

कुठलंही पुस्तक आकाशातून पडावं इतक्या सहजपणे जन्माला येत नाही. प्रत्येक पुस्तकाच्या जन्माची स्वतःची अशी एक वेगळीच… विशेष अशी कथा असते. प्रत्येक पुस्तक ही कुणाची तरी कलाकृती असते … त्याचाही कुणीतरी रचनाकार असतो … निर्माता असतो. त्या रचनेला कुणी लेखक शब्दरूप देतो आणि त्यालाही ‘ सृजनाची प्रक्रिया ‘ असंच म्हटलं जातं. जेव्हा त्याची ती रचना पुस्तकरूपात प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचते तेव्हा लेखकाच्या अनेक वर्षांच्या तपस्येचं ते फळ असतं.

तो लेखकच त्याच्या रचनेला एक नाव देतो. ‘ हा मुलगा कुणाचा आहे ‘ ही ओळख जशी सांगितली जाते, तशीच ओळख त्या पुस्तकाची असते … ‘ ज्याने लिहिले त्याचे पुस्तक ‘. ‘ छान आहे हे पुस्तक – लेखक कोण आहे ?’ असेच विचारले जाते. ते पुस्तक प्रकाशकाचं नसतं … विकत घेणाऱ्याचं नसतं … आणि वाचकालाही ते वारसाहक्काने मिळालेलं नसतं. ते एका लेखकाचं …त्याच्या मेहनतीचं फळ असतं … त्याने कितीतरी वर्षं पाहिलेलं स्वप्न असतं ते.

प्रत्येक पुस्तक एका सूज्ञ वाचकापर्यंत पोहोचावं हाच त्या पुस्तकाचा अंतिम उद्देश असतो. धनवान लोकांच्या अति महागड्या वस्तूंनी गच्च भरलेल्या शेल्फातल्या त्या वस्तूंप्रमाणे, ती पुस्तकेही पुस्तकांच्या दुकानांची.. ग्रंथालयांची किंवा एखादाच्या घरातल्या पुस्तकाच्या कपाटाची केवळ शोभा वाढवण्यासाठी साठवलेली असू नयेत….. लक्ष्मीला कुठे जखडून ठेवलेले असते ते सगळेच जाणतात.

सरस्वतीचं वाहन आहे ‘हंस‘… आणि नीर क्षीर विवेकाचं प्रतीक अशी त्याची ओळख आहे. पुस्तकं म्हणजे ज्ञानाचं भांडार तर आहेच, पण असंख्य गोष्टी स्वतः आपणहून शिकण्यासाठीचा तो सर्वश्रेष्ठ पर्याय आहे हे ध्यानात ठेवायलाच हवे. … सरस्वतीला कधीच कैदेत जखडून ठेऊन चालणार नाही …. त्यामुळे पुस्तकांचा प्रवास अविरत सुरू रहायला हवा.

एक प्रगल्भ वाचकच कुठल्याही चांगल्या पुस्तकाचे ‘ वाहन ‘ होऊ शकतो …. सरस्वतीच्या हंसासारखा ….

हे वीणावादिनी … असा वर दे … वर दे.. !! 

मूळ हिंदी लेखक : श्री. प्रदीप शर्मा 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जबरा पहाडिया – ऊर्फ तिलका मांझी” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जबरा पहाडिया – ऊर्फ तिलका मांझी☆ सुश्री शोभा जोशी ☆

‘स्वातंत्र्याशिवाय जगणे म्हणजे आत्म्याशिवाय शरीर होय ‘असं अमेरिकन फिलाॅसाॅफर खलिल जिब्राननी म्हटलं आहे. इंग्रजांनी आपल्या देशाच्या आत्म्यावरच घाला घातला होता. त्याला इंग्रजांच्याआधिपत्याखालून मुक्त करण्यासाठी म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जनजातीतील सुध्दा हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले. तिलका मांझी हा असाच एक जनजातीतील स्वातंत्र्य सेनानी ज्यानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं.

ईस्ट इंडिया कंपनीने बादशहा शाहआलमकडून बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांची दिवाणीची सनद मिळविली. तो १८व्या शतकाचा उत्तरार्ध होता. त्या काळापर्यंत भारतीय राजे जनजातींकडून महसूल वसूल करित नसत. पण जनतेचे अधिकाधिक शोषण करण्यासाठीच इंग्रजांनी भारतीय जनतेवर जबरदस्त महसूल लादला. त्यामुळे त्या भागातील सर्व जमातीच्या लोकांनी इंग्रज सत्तेविरूध्द लढे दिले. इंग्रजांनी, भारताच्या पूर्व व दक्षिण भागातील प्रदेश सर्वप्रथम गिळंकृत केल्याने याच भागातील भारतियांनी सर्वप्रथम त्यांना विरोध केला. म्हणून या भागातील क्रांतीवीर आद्यक्रांतीकारक ठरतात. त्यातील तिलका मांझी हा इंग्रजांविरूध्द लढणारा पहिला क्रांतिकारक ठरला.

बिहारच्या, बंगालला लागून असलेल्या राजमहल व भागलपूरमधल्या पहाडातील संथाल जमातीचा तिलका मांझी हा एक बहाद्दूर, शूरवीर व कुशल संघटक होता. त्याने या प्रदेशातील हिंदू-मुस्लीमांसह अन्य जातींमधीलही लढवय्यांचे उत्तम संघटन करून इंग्रजी सत्तेशी प्राणपणाने टक्कर देऊन आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

तिलकाचा जन्म ११ फेब्रुवारी १७५० रोजी सुलतानगंज ठाण्याअंतर्गत तिलकपूर या गावी, संथाल जमातीतील मुर्मू समाजात झाला.

डोंगर दर्‍यातील निवासामुळे त्याचे शरीर दणकट बनले होते. त्याच्या अंगी असलेल्या ताकदीमुळे त्याला जबरा पहाडिया म्हणत. परंपरागत शिकारीचा व्यवसाय असल्याने तो नेमबाजीत तरबेज तसेच धाडसी होता. त्याच्या अंगी एक अध्यात्मिक शक्ती होती. ती त्याला कशी प्राप्त झाली माहित नाही. पण तो जे म्हणेल तसेच घडून येई असं म्हणतात. त्याच्या सात्विक जीवनपध्दतीमुळे तरूणांचा त्याच्याकडे सतत ओढा असायचा. त्याच्या अंगी असलेल्या अध्यात्मिक शक्तीमुळे लोकांची त्याच्यावरची श्रध्दा वाढू लागली. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांविषयी त्याच्या मनात भेदभाव नव्हता. लोकांचा छळ करणार्‍या इंग्रजांना आपल्या प्रदेशातून हाकलून द्यायचा त्याने दृढसंकल्प केला.

भागलपूर मध्ये, आपल्या संकल्पपूर्तीसाठी तो तरूणांच्या गुप्त सभा घ्यायचा. ‘ एकी हेच बळ ‘हे त्याला माहित होतं म्हणून आदिवासी हिंदू व मुसलमानांचे त्याने एक उत्तम संघटन केले. ते सर्व लोक लहानपणापासूनच निशाणबाजीत तरबेज होते. वनवासींची जमीन, शेती, जंगलं, झाडं यावर इंग्रजांनी अधिकार गाजवायला सुरूवात केली होती.

इंग्रज, त्यांचे दलाल, जमीनदार, सावकार हे सर्व मिळून करीत असलेल्या शोषणाविषयी तिलकाने लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणिाइंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावायचे याविषयी त्यांची मने तयार केली.

 गंगेच्या काठच्या प्रदेशातून मार्गो व तेलियागदी या दर्‍यांमधून येणारा जाणारा इंग्रजांचा खजिना लुटून गोरगरीबांच्यात वाटून टाकण्यास त्याने सुरूवात केली. तो अत्यंत निःस्वार्थी होता. सन १७७६ मध्ये आॅगस्टस क्वीवलॅंड राजमहलचा मॅजिस्ट्रेट म्हणून आला. त्यानंतर तो भागलपूरचा मॅजिस्ट्रेट झाला.

गंगा व ब्राह्मी नद्यांच्या दुआबातील जंगल तराईच्या प्रदेशात तसेच मुंगेर, भागलपूर व संथाल परगाण्यात तिलकाच्या इंग्रजांशी अनेक लढाया झाल्या. तिलका मांझी त्यांना पुरून उरला. त्याच्या नेतृत्वाखालील वनवासी इंग्रजांना भारी पडत होते. इंग्रजांनी रामगढ कॅम्पवर ताबा मिळवला होता. तिलकाने पहाडिया सरदारांना बरोबर घेऊन १८७८मध्ये इंग्रजांचा पराभव करून रामगढ कॅम्प मुक्त केला.

जानेवारी १७८४ रोजी तिलका मांझीने भागलपूरवर चढाई केली. एका ताडाच्या झाडावर चढून त्याने, घोड्यावरून जात असलेल्या क्लीवलॅंडच्या छातीवर बाण मारला. क्लीवलॅंड तात्काळ घोड्यावरून खाली पडला आणि लगेच मरण पावला. त्याच्या निधनाने इंग्रज सैन्य हबकून गेले आणि मार्ग सापडेल तिकडे पळून गेले.

तिलका मांझीचा विजय झाला. त्याचे सैन्य विजयाचा आनंद साजरा करत असताना रात्रीच्या अंधारात सर आयर कूट व पहाडिया सरदार यांनी मिळून तिलका मांझीच्या बेसावध सैन्यावर अचानक हल्ला केला. त्या लढाईत तिलका मांझीचे बरेच सैनिक मारले गेले आणि पुष्कळसे गिरफ्तार करण्यात आले. तिलका मांझी आपल्या उरलेल्या सैनिकांसह सुलतानगंजच्या डोंगरात आश्रयाला निघून गेला आणि पुढची योजना ठरवू लागला. नंतर काही महिने त्याचे सैन्य इंग्रज सैन्याला आणि पहाडिया सैनिकांना गनिमीकाव्याने लढून बेजार करत होते.

तिलका मांझीचा पाडाव कसा करावा या विचाराने सर आयर कूट संत्रस्त झाला होता. त्याने तिलकाचे आश्रयस्थान असलेल्या डोंगरांना वेढे दिले. त्यांना बाहेरची रसद मिळू दिली नाही. अन्नपाण्यावाचून तिलकाच्या सैनिकांचे हाल होऊ लागले. तेव्हा गनिमीकाव्याने लढणे सोडून त्याने इंग्रजांशी आमने – सामने लढायचे ठरविले. आपल्या सैन्यासह तो डोंगर उतरून खाली आला व निकराने लढू लागला. त्या लढाईत धोक्याने तिलका इंग्रजांच्या हाती सापडला. त्याला जेरबंद करण्यात आले. सर आयर कूट त्यामुळे आनंदाने बेहोश झाला. त्याने तिलका मांझीला दोरखंडाने बांधून चार घोड्यांकरवी भागलपूरपर्यंत रस्त्यावरून फरपटत नेले. त्याचे अंग अंग सोलून निघाले तरी तो जिवंत राहिला. सर आयर कूटने त्याला भागलपूरच्या एका झाडावर फाशी दिली. नंतर त्याचे प्रेत त्या वडाच्या बुंध्याशी बांधून त्याच्या छातीत मोठे मोठे खिळे ठोकले. अशाप्रकारे या महान आदिवासी नेत्याने स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भागलपूरमधील त्या चौकाला ‘ तिलका मांझी चौक ‘ असे नाव देण्यात आले आणि त्या चौकात एक चबुतरा उभारून त्यावर तिलका मांझीच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाले.

©  सुश्री शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय अर्वाचीन गणिती : भास्कराचार्य आणि रामानुजन” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय अर्वाचीन गणिती : भास्कराचार्य आणि रामानुजन☆ श्री जगदीश काबरे ☆

गणिताच्या क्षेत्रातील भारतीय गणितज्ञांचा इतिहास मागे वळून पाहिला तर थोर भारतीय गणिततज्ञांची मालिकाच डोळ्यांसमोर येते. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, माधवाचार्य, नीलकंठ सोमया, इ. या मालिकेत आपला ठसा जगावर उमटवणारे जेष्ठ व श्रेष्ठ गणितज्ञ ‘भास्कराचार्य द्वितीय’ यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. 

भास्काराचार्यांचा जन्म इ.स. १११४ मध्ये उज्जैन जवळील ‘विज्जलविड’ येथे झाला. भास्कराचार्यांचे ज्योतिषशास्त्रातील (त्या काळात खगोलशास्त्र ही संज्ञा अस्तित्वात नव्हती. म्हणून आकाशातल्या ज्योतींचा अभ्यास करणारे ते ज्योतिषी, असे सगळ्या खगोलशास्त्रींना म्हटले जायचे.) त्यांच्या घराण्यात पूर्वीच्या सहा पिढ्या गणिताच्या अभ्यास करणाऱ्या होत्या. त्यापैकीच ‘ब्रम्हगुप्त’ हे एक होते. भास्कराचार्य हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. त्याचे शिक्षण त्याच्या वडिलांजवळ झाले असे त्यांनी खालील बीजगणितांतल्या श्लोकात गुंफले आहे.

आसीत् महेश्वर इति प्रथितः पृथिव्याम् । 

आचार्यवर्यपदवीं विदुषां प्रपन्नः ।। 

लब्धावबोधकलिकां तत एव चक्रे । 

तज्जेन बीजगणितं लघु भास्करेण ।।

या श्लोकावरून त्यांचे वडील महेश्वर हे त्यांचे गुरु होत. त्यांच्यापाशीच भास्कराचार्यांनी बीजगणिताचे पाठ घेतल्याचे ते सांगतात. 

त्यांचा काव्य, व्याकरण, गणित, ज्योतिष वगैरे विषयांचा व्यासंग सर्वांग परिपूर्ण होता. पूर्वकाळी आचार्य पदवी मिळविण्यास किती ग्रंथांचे अध्ययन करावे लागत असे हे २६१ व्या श्लोकावरून समजून येते. गणेश दैवज्ञाने आपल्या टीकेत त्यांना ‘गणकचक्रचूडामणि’ ही पदवी अर्पण केली आहे. गणित व ज्योतिष हे विषय शिकविण्यांत ते निष्णात होते. त्याकाळची विद्वान मंडळी भास्कराचार्याच्या शिष्यांशीं वादविवाद करण्यास कचरत असत हे ताम्रपटांतील श्लोकांवरून दिसून येतें. भास्कराचार्याचा ‘सिद्धांत शिरोमणी’ हा गणितावरील प्रमुख ग्रंथ आहे. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहून पुरा केला. या ग्रंथाचे लिलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय, गोलाध्याय असे चार खंड आहेत. 

ज्याप्रमाणें ‘लीलावती’ हा अंकगणितावरील उत्कृष्ट ग्रंथ आहे, त्याचप्रमाणें ‘बीजगणित’ हे अव्यक्त गणितावरचे उत्कृष्ट पुस्तक आहे. या पुस्तकावरही अनेक टीकाग्रंथ झाले. जगांतील प्रमुख भाषांतून लीलावती व बीजगणित यांची भाषांतरे झालेलीं आढळतात. बीजगणिताचे फारसी भाषांतर शहाजहानच्या कारकीर्दीत अताउल्ला रसीदी या ज्योतिषाने इ. स. १६३४ मध्ये केले. स्ट्राची या इंग्रज लेखकाने १८१३ साली इंग्रजी भाषांतर केले. ग्रहगणिताध्यायांत चंद्रसूर्यांच्या गति, भ्रमणें, ग्रहणें वगैरे गहन व क्लिष्ट विषय आलेले आहेत. याशिवाय भास्कराचार्याचे अनेक ग्रंथ आहेत. ते म्हणजे ‘करणकुतूहल’, ‘सर्वतोभद्रयंत्र’ ‘वसिष्ठतुल्य’ व ‘विवाहपटल’ हे होत. या सर्व ग्रंथाच्या मूळ हस्तलिखित प्रती आज आपल्याच अनास्थेमुळे कुठेच उपलब्ध नाहीत. प्राचीन वस्तूंचे जतन कसे करावे ही कला आम्हा महाराष्ट्रीयांना ठाऊक नाही. तथापि लीलावतीची सटीक हस्तलिखिते अजून उपलब्ध आहेत हेही नसे थोडके.

पायथागोरसच्या प्रमेयाची काटकोन त्रिकोणासंबंधीची एक सिद्धताही त्यांनी मांडली होती. ही सिद्धता कांही गणित तज्ञांच्या मते पायथागोरसच्या मूळ सिद्धतेशी वरीच मिळती जुळती आहे. गणितातील अनंत या संकल्पनेचा सर्वात पहिला सदर्भ त्यांच्या ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथातील बीजगणित ह्या खंडात आलेला आहे. पुढे सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाची फार्सी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, तामीळ भाषांत भाषांतरे झाली आहेत.

लीलावतीतील श्लोकांतून भास्कराचार्यांनी अनेक प्रकारचे कौशल्य दाखविले आहे. धर्म, वेद, पुराणे, महाकाव्ये यांची जाताजाता विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश असल्यामुळे त्यांनी गणिताच्या प्रश्नात या सर्व गोष्टींचा वापर केलेला आहे. ‘पार्थकर्णवधाय’ हा श्लोक रथासंबंधीं सर्व माहिती देण्यास उपयुक्त आहे. अर्जुनाचा कर्ण हा भाऊ असला तरी प्रामुख्यानें वैरी होता, ही गोष्ट विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणली गेली आहे. पण याहीपेक्षा ह्या श्लोकांत प्रत्यक्ष लढाईचा देखावा वाचकांपुढे ठेवला आहे. कालिदासाच्या शाकुंतलांतील ‘ग्रीवाभंगाभिरामम्’ या श्लोकाशी वरील श्लोकाची तुलना होऊ शकेल. हंसांच्या समूहाचे वर्णन किंवा हत्तींच्या कळपाचे वर्णन, भुंग्यांच्या कळपाची संख्या, पाळलेल्या मोराचे सापावर तुटून पडणे, कमळ वाऱ्याच्या झोताने पाण्यात बुडणे इत्यादि सर्व गोष्टी विद्यार्थ्यांस निसर्ग सान्निध्यांत घेऊन जातात व विषय कंटाळवाणा होत नाही. 

भास्कराचार्यांनी कोठेच सूत्रसिद्धि दिलेली नाही, याचे कारण काय असेल? अर्थात् पूर्वीचे आचार्य सूत्रसिद्धि देत नव्हते. कारण ते सूत्रे काव्यामध्ये गुंफत होते. म्हणून त्यांना सूत्रसिद्धि आवश्यक वाटत नव्हती. भास्कराचार्यांनी पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवून सूत्रसिद्धि दिली नाहीं, पण उदाहरणे मात्र भरपूर दिलेली आहेत. आर्यभट्ट ते भास्कराचार्य या ७०० वर्षाच्या काळात शास्त्रीय ग्रंथ कविता रूपात लिहिले जात व सिद्धांताचे स्पष्टीकरण किंवा सिद्धता देण्याच्या खटाटोपात कोणीच पडत नसे, याला भास्कराचार्यही अपवाद नव्हता. पण त्यामुळे भारतीय गणितशास्त्राचे केवढे नुकसान झाले आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे. कारण सैद्धांतिक उपपत्ती लिहून तिचे दस्तऐवजीकरण करण्याची कमतरता पाश्चात्य शास्त्रज्ञांनी भरून काढल्यामुळे ते आज विज्ञानात अग्रेसर ठरले आहेत.

भास्कराचार्य हे दृकप्रत्ययवादी ज्योतिषी होते. ग्रहणे, युत्या, वगैरे अंतरिक्ष चमत्कार पंचांगांत दिलेल्या वेळेवर होत नसतील तर पंचांगे सुधारली पाहिजेत असे त्याचे मत होते. सनातनी लोक पुष्कळदा काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगीत. त्यात राहू व केतु हे चंद्र व सूर्य यांना ग्रहणकाली गिळतात अशी एक खुळी कल्पना लोकांत दीर्घकाल रूढ होती. वास्तविक चंद्रग्रहणसमयी चंद्र पृथ्वीच्या छायेत गेल्यामुळे अदृश्य होतो. भास्कराचार्याला ही गोष्ट ठाऊक असूनही लोकांना ती पटविणे कठीण होते. ते लोकांना सांगत की, ‘ मंडळींनो, राहू-केतू नावाचे राक्षस नाहीत. पृथ्वीची छायाच चंद्राचा ग्रास करते. पण तुम्हांला राहू हवाच असेल तर असे म्हणा की, राहूने पृथ्वीच्या छायेत शिरून चंद्राचा ग्रास केला.’ अशा रीतीने जुन्या-नव्याचा समन्वय ते करीत असत. ते सुधारणावादी व्यवहारी शास्त्री होते. असे असले तरी तत्त्वाला मुरड घालण्यास ते तयार नसत. गणितासारख्या अमूर्त आणि गहन विषय मनोरंजनात्मक व काव्यामय पद्धतीने शिकविणारे ते आद्य पंडित होते. अशा या थोर गणितीने जे संशोधन केले त्याला इतिहासात तोड नाही. 

भास्कराचार्यानंतर महाराष्ट्रांत तरी विद्वान व प्रसिद्ध असे गणिती फारसे झालेच नाहीत. त्यांच्याच ग्रंथाची घोकंपट्टी करणारे बरेच होते, पण नवीन संशोधन करणारे असे विद्वान १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत थोडेच झाले. त्यांत नाव घेण्यासारखे दोन-चारच असतील. त्यातील एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे रामानुजन.

रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला त्यावेळच्या मद्रास प्रांतातील तंजावर येथे झाला. रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 

१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजननी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. त्यांच्या गणितातील भरीव कार्याचा गौरव म्हणून भारतात २२ डिसेंबर हा दिवस “गणित दिन” म्हणून पाळण्यात येतो.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आनंदाचा निर्देशांक !” – लेखक : श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आनंदाचा निर्देशांक !” – लेखक : श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आनंदाचा निर्देशांक ! अर्थात् “ Happiness Index.” 

       ….. हा नेमका काय प्रकार आहे ?

सकाळी कितीही लवकर उठून मुलाला/मुलीला कामासाठी बाहेर जायचं असेल, तर त्याचे प्रातर्विधी,स्नान होवून तो तयार होईपर्यंत आई त्याला गरम गरम स्वादिष्ट पोहे करून देते, त्याला तो नको म्हणत असताना बसून खायला लावते, शिवाय थोडे एका डब्यात भरून त्याच्या हातात ठेवते.तुला जेवायला उशीर झाला, तर हे पोहे खा,पोटाला थोडा आधार होईल.

 

असं म्हणणा-या आईच्या या प्रेमळपणाचं आयुष्यात कितीतरी वर्षांनी स्मरण होतं, डोळे आणि हृदय दोन्हीही तिच्या आठवणीने भरून येतात.या आठवणीने मनात आनंदाचे तरंग उठतात,या प्रत्यक्ष अनुभवाला येणा-या आनंदाचा निर्देशांक कसा मोजायचा ?

 

हिवाळ्यात कडक थंडीतल्या सकाळी वडिलांना त्यांच्या कंपनीच्या बस स्टॉपपर्यंत स्कूटरने रोज सोडायला जाणा-या प्रेमळ मुलाच्या कपाळावर ओठ टेकवून ,त्याच्या डोक्यावर कृतज्ञतेने, प्रेमाने हात फिरवून नंतर बसमध्ये बसल्यावरही खिडकीतून बराच वेळ हात हालवत भरलेल्या डोळ्यांनी त्याचा निरोप घेणा-या वडिलांनी आणि त्या मुलाने जो प्रेमाचा स्पर्श अनुभवला,तो पुढेही कित्येक वर्षे स्मृतींच्या रुपात पुनः पुन्हा साथ संगत करतो.हा निर्मळ आनंद कसा मोजता येईल ?

 

खिशात पैसे नसलेल्या एका जीवलग मित्राच्या हातावर त्याची मैत्रीण थोडे पैसे ठेवताना तिला त्याच्या डोळ्यात दिसणारी अगतिकता पहात त्याचा हात प्रेमाने हातात घेऊन नुसत्या डोळ्यांनी,त्या हळव्या स्पर्शाने एक शब्दही न बोलता ” हे ही दिवस निघून जातील रे ! चांगला काळ येईल अशी सांत्वना देते त्या क्षणी आणि नंतर कित्येक वर्षे तो क्षण कृतज्ञतेने आठवताना मनात ज्या आनंदाच्या लहरी उसळतात,त्या आनंदाचे मोजमाप कसे करायचे ?

 

इंटरव्ह्यूला जाणा-या भावाला धीर देणारी, त्याच्या कपड्यांना चांगली इस्त्री करून, ‘ तू आज हा ड्रेस घालून जा, आणि छान आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दे, तुझा जॉब पक्का ! ‘ असं म्हणणा-या, लहान असूनही पोक्तपणाने वागणा-या बहिणीच्या आठवणीने ती तिच्या सासरी अगदी सुखी आहे,रमली आहे हे माहित असूनही जेव्हा पुनः पुन्हा ते जुने क्षण, तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारे प्रेम आपण अनुभवतो, तेव्हा या अश्रू भरल्या आनंदाची मात्रा कशी मोजायची ?

 

वृद्धापकाळी रात्री तीन चार वेळा उठाव्या लागणा-या आजोबांची चाहूल लागताच ताडकन् उठून बसत त्यांचा हात धरून त्यांना टॉयलेटपर्यंत नेणारा लाडका नातू नोकरीसाठी दूर जाताना त्यांचा निरोप घेतो, तेव्हा त्याच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून आपले थरथरते हात फिरवत नंतर त्याचे हात घट्ट धरून ठेवत, हा वियोग त्यांच्यासाठी किती अवघड आहे,याची न बोलता जाणीव करून देतात, हे मनात दाटून येणारे भावनांचे कढ कोणत्या परिमाणात मोजता येतील ?

 

आनंद आहेच ! तो क्षणाक्षणाला अनुभवाला येतो.

.. तो स्पर्शाने अनुभवता येतो… शब्दांनी अनुभवता येतो… नि:शब्द शांततेत शब्दाविना होणाऱ्या मूक संवादातून अनुभवता येतो… प्रेमळ माणसांच्या सहवासात अनुभवता येतो… या सहवासाच्या स्मृतींनीही जन्मभर अनुभवता येतो.

 

सत् चित् आनंद याचा अर्थ आनंदच सत्य आहे, आणि त्याचं वास्तव्य सतत तुमच्या चित्तातच असतं !

तुम्ही आनंदी असता किंवा नसता ! आनंदाचं मोजमाप करता येईल, असं उपकरण खरोखरच विज्ञानाला कधी शोधता येईल ?

… अमर्याद जिज्ञासा आणि शोधक बुध्दी ज्यांच्याकडे आहे, त्यांना खुशाल शोध घेऊ द्या … आनंदाच्या नेमक्या निर्देशांकाचा. …. आपण निरंतर आनंदात डुंबत राहू या.

 

आनंद आहेच ! दुःखाला कारण लागतं !! ती कशाला शोधायची ? 

आनंदाचे डोही आनंद तरंग !!!! 

 

लेखक : श्री अभय भंडारी

 पुणे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके  ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

स्व विंदा करंदीकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

श्रेष्ठ कविवर्य स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’

(जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०)

मुंबईतील एक नामवंत संस्था. साहित्यिकांना मोठमोठे पुरस्कार देऊन त्या अकादमीतर्फे सन्मानित केले जाई. एक श्रीमंत सिंधी गृहस्थ त्या अकादमीचे प्रमुख होते. ते विविध वाङ्मयीन उपक्रमही चालवीत असत. त्याकाळात अकादमीचा मोठाच बोलबाला होता.

श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांना घरातले आणि जवळचे लोक भाऊ म्हणत. भाऊ कडवे कोकणी होते. प्रतिभावंत, प्रखर तत्वनिष्ठ आणि स्पष्टवक्ता.

एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, ” हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी (पवार) मी बोललोय तो येतो म्हणालाय. तूही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना? “

मी ताबडतोब होकार दिला. भाऊ आणि दयाकाका या दिग्गजांच्यासोबत कार्यक्रम म्हणजे धमाल.

कार्यक्रम एका मोठ्या हॉटेलमध्ये होता. कार्यक्रम झकास झाला. खूप रंगला. भाऊ दिलेला नारळसुद्धा वाजवून बघायचे. पाणी कमी असेल तर दुसरा आणा असं स्पष्ट सांगायचे. कोकणी बाणा.

भाऊंनी संयोजकांना स्टेजवर बोलावले, म्हणाले, ” चला, व्यवहाराचे उरकून टाका. “

संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हा तिघांना दिली. भाऊंनी पाकीट उघडून तिथेच पैसे मोजले. पाकीटात ७०० रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले, ” मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते. “

आम्हा दोघांना भाऊ म्हणाले, “अरे, तुमचीही पाकीटे उघडून बघा. व्यवहार म्हणजे व्यवहार, त्यात संकोच कसला?”

पण दयाकाका म्हणाले, “भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट उघडून बघायचं ना?”

संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले, ” माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली. “

आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं उघडून बघितली.

दयाकाकांच्या पाकीटात २०० रूपये होते आणि माझ्या पाकिटात शंभर. म्हणजे तिघांना प्रत्येकी एक हजार देण्याऐवजी तिघांना मिळून एक हजार दिलेले. भाऊ तडकले. भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. तीन म्हणजे एक नव्हे. आत्ताच्या आत्ता पूर्तता करा… आणि हो, दरम्यान तुमच्या चुकीमुळे टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला. काय समजले? “

भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, ” तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा. “

एके दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना छोटीशी देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये.

त्यांना सी. एम. ना किंवा अन्य कुणालाही भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.

मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बांद्र्यावरून बसने आले. आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकारी चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, ” धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलंत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी हरीकडून असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अत्यंत मचूळ असतो. मला आज माझ्या जिभेची चव बिघडवून घ्यायची नाही. पण विचारल्याबद्दल धन्यवाद. आज मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका.”

अधिकार्‍याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्‍याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती. ही म्हणे छोटीशी देणगी. जे भाऊ नारळसुद्धा वाजवून घ्यायचे ते पाच लाखाची देणगी भूकंपग्रस्तांना मदत म्हणून कोणताही गाजावाजा न करता देऊन गेले.

आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, ” भाऊ, इथल्या टपरीवरील चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?”

भाऊ म्हणाले, “असं म्हणतोस? ही माझ्या चहाची वेळ नाही. पण चल घेऊया. मात्र एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो. “

भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हेही सांगायचे. ते त्यात आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्याच फजितीचा एक प्रसंग…..

विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट तिघा कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्या काळात फार गाजत होता. कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा अकलुजच्या साखर कारखान्याचे निमंत्रण आले. चेअरमन शंकरराव मोहिते पाटील तमाशाचे शौकीन. कुणीतरी म्हणाले, ‘काव्यवाचन ठेवू या’. ते लगेच तयार झाले.

स्वत: एम. डी. आले होते निमंत्रण घेऊन मुंबईला. त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्य वसंत बापटांनी त्यांच्या हातात २७ अटींचा कागद सोपवला.

पुढच्या वेळी येताना फोन करून, वेळ घेऊनच यायला बजावले.

लेखी नियमांप्रमाणे अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम. डी. भेटायला आले.

परत कविवर्य बापटांनी त्यांना दारातूनच कटवले. तसे बापट अतिशय सोशल होते. पण दोन वेळा एम. डी. शी ते कळत नकळत असं वागून गेले. कदाचित त्यांच्या मनात काही नसेलही. पण एमडी रागावले. बापट स्वभावाने ओलावा असलेले. पण….

एम. डीं. नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन मोहिते पाटील म्हणजे नामांकित पण बेरकी राजकारणी होते. त्यांनी २७ नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठविण्यात आली. कवींना कुर्डुवाडी स्टेशनवर घ्यायला मर्सिडीज गाडी पाठविण्यात आली.

राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली होती. प्रत्येक अटीचे काटेकोर पालन केलेले.

कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपूर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम. डी. आणि चेयरमन दोघेच.

कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन म्हणाले, ” तुमच्या २७ अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील. “

…… स्वत:ची चूक बापटांच्या लक्षात आली. पण ती कबूल करायला तेव्हा ते तयार नव्हते. भाऊ पुढे झाले. ते चेअरमनना म्हणाले, ” मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो. “

चेअरमन म्हणाले, “अहो, आमचा माणूस ४०० किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणूसघाणेपणा ?”

….. व्यवस्थापकांच्या वतीने भाऊंनी चूक झाल्याचे मान्य केले. सपशेल माफी मागितली.

चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, ” मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्रॅम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा निरोप आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा सांस्कृतिक चेंज. “

५ मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.

त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मात्र बापट यांच्याकडून भाऊंनी स्वत:कडे घेतली. भाऊ म्हणायचे, “ हरी, राजकारणी लोक महाहुषार असतात. शहाण्याने त्यांच्याशी पंगा घेऊ नये. कसा धडा शिकवतील सांगता येणार नाही !” 

लेखक : प्रा. हरी नरके

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares