मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आरती म्हणजे काय व आरतीची उत्पत्ती कशी? ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ आरती म्हणजे काय व आरतीची उत्पत्ती कशी? ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

आरती म्हणजे औक्षण. ‘ शब्द कल्पद्रुम ‘ नावाचा ग्रंथ आहे, त्यात हे औक्षण किती करायचे या संदर्भात एक श्लोक आहे. मूर्तीच्या पायाशी चार वेळा, नाभी भोवती दोन वेळा, मुखाभोवती एक वेळ आणि सर्वांगावरून सात वेळा.-बस संपली आरती. आरती म्हणण्याची प्रथा कधी सुरु झाली हा थोडा संशोधनाचा विषय. महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींच्या काही आरतीसदृश रचना आहेत असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वरांनी काही अशा रचना केल्या होत्या, पण त्या भगवतगीतेचं कौतुक करणाऱ्या. माझ्या मते हा प्रकार श्री रामदासस्वामी या लोकोत्तर संताने चालू केला असावा.  जशी त्यांनी मारुतींची स्थापना केली, व्यायामशाळा चालू केल्या, त्याच पद्धतीने समाज एकत्र यावा, मोंगलांची त्यांच्या मनातील भीती कमी व्हावी, म्हणून हा प्रपंच मांडला होता का ? राम जाणे. एवढी छान पूजा केली आहे तेव्हा देवाला ‘ येई हो विठ्ठले ‘ म्हणून संगीत आवतण आर्ततेने द्यायचं. यात खूप आरत्या त्या देवाच रूप, काम सांगणाऱ्या आहेत, आणि शेवटी ‘ देवा तू ये ‘ अशी आळवणी. आणि या आळवणीला देव प्रतिसाद देतो तो प्रसाद अशी समजूत .

अथर्ववेदाचे एक परिशिष्ट वाचायला मिळाले, त्यात एक गोष्ट वाचली. राक्षसांच्या पुरोहिताने काहीतरी मंत्रप्रयोग करून, इंद्राची झोप उडेल म्हणजे निद्रानाश होईल असे काहीतरी केले. इंद्र त्रस्त झाला व त्याने बृहस्पतीना यासाठी उपाय विचारला. तेव्हा बृहस्पती म्हणाले की “ मी तुला एक उपाय सांगतो त्याला अरार्त्रिक म्हणतात. एक तबक घेऊन त्यात वेगवेगळी फुले ठेव व एक त्यात दीप लावून सुवासिनीकडून औक्षण करून घे. व हे करताना एक मंत्र म्हण. यामुळे तुला या त्रासातून मुक्ती मिळेल.” या अरात्रिकामधून आरती या विषयाचा जन्म झाला. देवाला झोपविण्यासाठी पहिली आली ती शेजारती. मग त्याला परत उठविण्यासाठी आली ती काकडआरती. पूजेनंतर ५ वाती किवा दिव्याने ओवाळून करायची ती पंचारती. एकच दिवा असेल तर एकारती, धूप जाळला असेल तर धुपारती, कापूर असेल तर कापूरारती . 

समर्थांनी जवळ जवळ ८० ते ८२ आरत्या लिहिलेल्या आहेत. सर्व अत्यंत प्रासादिक. गेली ४०० वर्ष याची मोहिनी जनमानसावरून उतरलेली नाही. एखाद्या महान व्यक्तीच्या काव्याला, शब्दांना मंत्राचं पावित्र्य येत ते असं. याला म्हणतात चिरंजीविता .यात एक गम्मत अशी की रामदास हे काही आजच्यासारखे संधीसाधू ,दलबदलू नाहीत. गणपती बाप्पा असो की  मारुतीराया असो, की कुठलीही देवी असो, आरतीमध्ये तिचे गुणगान करतील, पण प्रत्येक आरतीमध्ये शेवटी त्या देवाला ‘ साहेब तुमचं मी कौतुक केलं असलं, तरी मी दास रामाचा ,’ ही आठवण ते करून देतातच. रामदासांनी अनेक आरत्या लिहिल्या आहेत. सर्व सुंदर आहेत. त्यातील देवतांची वर्णनंही खूप सुंदर. 

पण या आरतीपेक्षा संत एकनाथांनी लिहिलेली दत्ताची आरती एक वेगळी आणि सुंदर आहे. या आरतीचे स्वरूप इतर आरत्यांच्यापेक्षा वेगळे अशाकरिता की कुठल्याही आरतीत त्या देवाचे रूपवर्णन, त्याचे पराक्रम आणि नंतरच्या कडव्यामधून साधारण फलश्रुती असा प्रकार असतो. पण दत्ताच्या आरतीत ‘ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ‘, ‘अभाग्यासी कैची कळेल हि मात ‘ अशा ओळी आहेत. म्हणजे थोडक्यात, मला तो कळलाच नाही असा पहिल्या दोन कडव्यात स्वानुभव आहे व उरलेली दोन कडवी फलश्रुती आहे. याचे कारण असे की एकनाथ महाराज त्यांच्या गुरूच्या म्हणजे जनार्दनस्वामी यांचेकडे हट्ट धरून बसले की मला दत्त महाराजांचे दर्शन घडवा. जनार्दनस्वामींनी त्यांना दौलताबाद येथे किल्ल्यावर बोलावले. एक दिवस एक योगी एकनाथ महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. एकनाथांनी त्यांना आपण कोण असे विचारले, तेव्हा तो योगी त्यांना आशीर्वाद देऊन न बोलता निघून गेला आणि नंतर जेव्हा जनार्दनस्वामी हसले तेव्हा एकनाथ महाराजांना समजले की दत्तमहाराज दर्शन देऊन गेले. तेव्हा ही आरती एकनाथ महाराजांनी तेथे लिहिली आणि ते लिहून गेले– ” सबाह्याभ्यंतरीं तू एक दत्त ,अभाग्यासी कैची कळेल ही मात “–फारच सुंदर चुटपूट .

मंडळी मी या विषयातील तज्ञ नाही. मी जे वाचतो, ऐकतो ते मित्रमंडळींना सांगावे, एवढीच इच्छा असते .

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – प्रस्तावना आणि सूक्त (१ : १) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – प्रस्तावना आणि सूक्त (१ : १) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्रस्तावना आणि सूक्त ( १ : १ )

सनातन धर्माचे तत्वज्ञान ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये सांगितलेले आहे. विद् या धातूपासून वेद या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. विद् या धातूचे जाणणे, असणे, लाभ होणे आणि विचार करणे, ज्ञान देणे असे विविध अर्थ आहेत. 

वेद हे अपौरुषेय ज्ञान आहे. संपूर्ण ब्रह्मांडात जे काही आहे, त्या सर्वांचे जे काही गुणधर्म आहेत ते सर्व असप्रज्ञात आत्मसाक्षात्काराने जाणून घेतल्याने वेदांची निर्मिती झाली. हे सर्व ज्ञान मूलतः ज्ञानी ऋषींच्या अनुभूतिजन्य प्रज्ञेत साठविलेले होते आणि ते केवळ मौखिकरित्या त्यांच्या शिष्याला दिले जात असे. पुढे श्रीगणेशाने  देवनागरी लिपी निर्माण केल्यानंतर केव्हा तरी ते ग्रंथ स्वरुपात उपलब्ध झाले असावेत. वेद जुन्या संस्कृत भाषेत किंवा गीर्वाण भाषेत आहेत. 

यातील ऋग्वेद मराठी गीतरुपात मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ऋग्वेदातील अनेक खंडांना मंडळ अशी संज्ञा असून त्यातील प्रत्येक अध्यायाला सूक्त म्हणतात. काही श्लोकांनी म्हणजेच ऋचांनी  प्रत्येक सूक्त बनते. वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या छंदांत या ऋचा रचलेल्या आहेत. मूळ ऋचा दीड ते दोन चरणांच्या आहेत. सुलभ आकलनासाठी आणि गेयता प्राप्त होण्यासाठी मी त्यांचा मराठीत भावानुवाद केलेला आहे. गीतऋग्वेदाचा भावानुवाद येथे मी क्रमशः प्रसिद्ध करणार आहे. 

ही गीते सुश्राव्य गीतात गायली गेलेली असून त्यांचे व्हीडीओ युट्यूबवर प्रसारित झालेली आहेत. या व्हिडीओत गीतांबरोबरच त्या त्या सुक्तात आवाहन केल्या गेलेल्या देवतांची रेखाचित्रे देखील  उपलब्ध आहेत. प्रत्येक गीताच्या तळाशी मी आपल्या सोयीसाठी मुद्दाम त्या गीताच्या व्हिडिओची लिंक प्रसारित करीत आहे. सर्वांनी मुद्दाम त्या स्थळी भेट देऊन या व्हिडिओचा आस्वाद लुटावा. 

डॉ. निशिकांत श्रोत्री, एम. डी., डी. जी. ओ. 

——————————————————————————————————————————-

ऋग्वेद अग्निसुक्त १.१

देवता : अग्नि 

ऋषी : मधुछन्दस वैश्वामित्र

मराठी भावानुवादित गीत : डॉ. निशिकांत श्रोत्री

 

अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्‍न॒धात॑मम् ॥ १ ॥

अग्निदेवा तूचि ऋत्विज यज्ञपुरोहिता

होऊनिया आचार्य अर्पिशी हविर्भाग देवता

अनुपम रत्नांचा स्वामी तू निधीसंचय करितो

स्तवन तुला हे अग्निदेवते भक्तीने भजतो ||१||

अ॒ग्निः पूर्वे॑भि॒र्ऋषि॑भि॒रीड्यो॒ नूत॑नैरु॒त । स दे॒वाँ एह व॑क्षति ॥ २ ॥

धन्य जाहले प्राचीन ऋषींना अग्निस्तुती करण्या

अर्वाचीन ऋषी उचित मानिती अग्नीला स्तवण्या

याग मांडिला विनम्र होऊनी अग्नीला पुजिण्या

सिद्ध जाहला अग्नीदेव देवतांसि आणण्या ||३||

अ॒ग्निना॑ र॒यिम॑श्नव॒त्पोष॑मे॒व दि॒वेदि॑वे । य॒शसं॑ वी॒रव॑त्तमम् ॥ ३ ॥

भक्तांसाठी प्रसन्न होता तू वैभवदाता

वृद्धिंगत हो शुक्लेंदूवत हरण करी चिंता

यशोवंत हो पुत्रप्राप्ती तुझ्या कृपे वीरता

कृपादान हो सर्व सुखांचे अग्निदेव भक्ता ||३||

अग्ने॒ यं य॒ज्ञम॑ध्व॒रं वि॒श्वतः॑ परि॒भूरसि॑ । स इद्दे॒वेषु॑ गच्छति ॥ ४ ॥

कृपादृष्टी तव चहूबाजूंनी ज्या यज्ञावरती

तया होतसे वरदाने तव पवित्रता प्राप्ती

प्रसन्न होती देवदेवता पावन यज्ञाने

स्वीकारुनिया त्या यागाला तुष्ट तयांची मने ||४|| 

अ॒ग्निर्होता॑ क॒विक्र॑तुः स॒त्यश्चि॒त्रश्र॑वस्तमः । दे॒वो दे॒वेभि॒राऽग॑मत् ॥ ५ ॥

अग्नीद्वारे समस्त देवा हविर्भाग प्राप्त

पंडित होती बुद्धीशाली मिळे ज्ञानसामर्थ्य

आळविलेल्या सर्व प्रार्थना अग्निप्रति जात

देवांसह साक्षात होऊनी यज्ञ करीत सिद्ध ||५|| 

यद॒ङ्‍ग दा॒शुषे॒ त्वम् अग्ने॑ भ॒द्रं क॑रि॒ष्यसि॑ । तवेत्तत्स॒त्यम॑ङ्‍गिरः ॥ ६ ॥

अंगिरसा हे अग्निदेवते आशीर्वच देशी

मंगल तुझिया वरदानाने तृप्तीप्रद नेशी

कृपा तुमची हे शाश्वत सत्य भक्ता निःशंक

शीरावर वर्षाव करावा तुम्हा हीच भाक ||६||

उप॑ त्वाग्ने दि॒वेदि॑वे॒ दोषा॑वस्तर्धि॒या व॒यम् । नमो॒ भर॑न्त॒ एम॑सि ॥ ७ ॥

अहोरात्र हे अग्निदेवते वंदन तुज करितो

प्रातःकाळी सायंकाळी आम्ही तुला भजतो

तुझी अर्चना मनापासुनी प्रज्ञेने करितो

लीन होउनी तव चरणांवर आश्रयासि येतो ||७||

राज॑न्तमध्व॒राणां॑ गो॒पामृ॒तस्य॒ दीदि॑विम् । वर्ध॑मानं॒ स्वे दमे॑ ॥ ८ ॥

पुण्ययज्ञि तू विराज होउन विधिरक्षण करिशी

यज्ञाधिपती यज्ञविघ्न नाश पूर्ण करिशी 

हीच प्रार्थना अग्नीदेवा तुझिया पायाशी 

तेज तुझे दैदिप्यमान किती आमोदा वर्धिशी ||८||

स नः॑ पि॒तेव॑ सू॒नवेऽ॑ग्ने सूपाय॒नो भ॑व । सच॑स्वा नः स्व॒स्तये॑ ॥ ९ ॥

आम्ही लेकरे अग्निदेवा मायाळू तू पिता

लाड पुरवुनी तूच आमुचे हरुनी घे चिंता

नकोस देऊ आम्हा अंतर लोटू नको दूर

क्षेम विराजे तुझिया हाती नसे काही घोर ||९||

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तनोटराय देवी…. लेखिका – सुश्री विभा पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ तनोटराय देवी…. लेखिका – सुश्री विभा पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तनोट राय देवी – खरं तर हे नावसुध्दा मी आधी ऐकले नव्हते. पण आम्ही राजस्थान टूरला गेलो असताना जैसरमेलला टेन्टमधे राहून तेथील थरचे वाळवंट व त्या अनुषंगाने   वालुकामय सौंदर्याचा आस्वाद घेत असताना आमच्या गाईडने सांगितले की येथून साधारण २०० किलोमीटरवर प्रसिध्द श्री तनोट राय देवीचे जागृत मंदिर आहे. तेथे जायला ४ तास लागले. मंदिरात प्रवेश करतानाच मला नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटले. चौकशीअंती कळले की हे मंदिर BSF – Border Security Force च्या अखत्यारीत आहे व या मंदिराची पूर्ण देखभाल अगदी पूजेसहीत BSF करते. त्यामुळे सर्वत्र एकप्रकारची शिस्त जाणवते. कसलेही अवडंबर नाही. सकाळची पूजा झाल्यावरचे प्रसन्न वातावरण, देखणी फुलांची आरास केली होती. स्थानिक लोक भक्तीभावाने दर्शनास येत होते. दर्शन लांबूनच होते. शेजारी बरेच गोटानारळ ठेवलेले होते, ते प्रत्येकजण घेऊन वाढवत होते. अर्धा देवीपुढे व अर्धा प्रसाद –हे सर्व विनाशुल्क. मंदिरात कोणीही पुजारी वा गुरूजी नव्हते. पण सारे काही शांतपणे चालले होते. 

मंदिर परिसरात फिरत असताना तेथे शोकेसमधे खूप सारे जवानांचे व बॉम्बचे फोटो दिसले. अशी माहिती मिळाली की BSF चे हे आराध्य दैवत आहे. १९६५च्या युध्दात पाकिस्तानी सैन्याने या मंदिराच्या परिसरात ३०००+ बाँम्ब फेकले होते, पण तरीही मंदिराचे काहीही नुकसान झाले नाही व सर्व बाँम्ब न फुटता वाया गेले. तेथे आजही बरेच बाँम्ब पहायला ठेवले आहेत. एवढे बॉम्ब टाकल्यावर कसलेही नुकसान न होणे हा आपल्या व पाकिस्तानी सैन्यासाठी एक चमत्कारच होता. म्हणून या देवीला ‘ बमवाली देवी ‘ असे पण म्हणतात. हा चमत्कार पाहून पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडीयर शाहनवाज यांनी देवीदर्शनाची परवानगी मागितली. आपल्या सरकारने अडीच वर्षाने ती दिल्यावर त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिराला चांदीची छत्री अर्पण केली, जी आपल्याला आजही पहायला मिळते . 

मंदिराबाहेर १९६५च्या भारत पाकिस्तान युध्दाची आठवण म्हणून एक विजयस्तंभ उभारला आहे. हा स्तंभ आपल्या मनात आपल्या जवानांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण जागवतो. मंदिराएवढेच या विजयस्तंभासमोर नतमस्तक होत असताना मी परत एकदा माझ्या हजारो जवानांचे प्राण वाचवणाऱ्या देवीपुढे विनम्रपणे झुकले व प्रार्थना केली की ‘ देवीमा अशीच माझ्या जवानांवर तुझी कृपा ठेव व अखंड पाठीशी रहा.’ 

येथून भारत पाकिस्तान सीमा २० किमी आहे. तेथे जाण्यासाठी या मंदिर परिसरातच BSF ने काही औपचारिकता पूर्ण केल्यावर पास देण्याची व्यवस्था केली आहे. ती पूर्ण करून आपल्याला बॉर्डरपर्यंत जाता येते. तेथे मोठा वॅाचटॅावर आहे. येथून सर्व परिसर छान दिसतो. यावेळी प्रथमच Front line – Border वर कार्यरत असलेली महिला ऑफिसर ड्युटीवर दिसली . तिच्याशी संवाद साधत आम्ही तिच्याप्रती वाटणारा आदर व अभिमान व्यक्त केला. त्यांचे नाव श्रीमति सुमती, व त्या श्री गंगानगरच्या असल्याचे त्यांनी सांगितले. या बॅार्डरपोस्टचा नंबर ६०९ आहे व शेवटचे गाव आहे बावलीया.  प्रत्यक्ष बॅार्डरवर, जेथून पाकिस्तान फक्त १५० मीटरवर आहे, तेथे जाण्याचा एक संस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही समला परतलो.

 

लेखिका : सुश्री विभा पटवर्धन  

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिंदू धर्मातील एक ते दहा अंकांचे महत्त्व  ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ हिंदू धर्मातील एक ते दहा अंकांचे महत्त्व  ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

०१ —-

एक जननी ( मूळ माया ) :   जगदंबा

०२—-

दोन लिंग: नर आणि नारी / दोन पक्ष : शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष

दोन पूजा: वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणोक्त) / दोन आयन :  उत्तरायण आणि दक्षिणायन

०३ —-

तीन देव :  ब्रह्मा, विष्णु, शंकर / तीन देवी : महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली

तीन लोक ;  पृथ्वी, आकाश, पाताळ / तीन गुण : सत्वगुण, रजोगुण, तमोगुण

तीन स्थिति :  ठोस, द्रव, ग्यास / तीन स्तर :  प्रारंभ, मध्य, अंत / तीन पडाव :  लहान, किशोर, वृद्ध 

तीन रचना : देव, दानव, मानव / तीन अवस्था : जागृत, मृत, बेशुद्ध / तीन काळ ; भूत, भविष्य, वर्तमान

तीन नाडी ;  इडा, पिंगला, सुषुम्ना / तीन संध्या ;  प्रात:, मध्याह्न, सायं / 

तीन शक्ती :  इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती

०४ —-

चार धाम ;  बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम्, द्वारका / चार मुनी : सनत, सनातन, सनंद, सनत कुमार

चार वर्ण : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र / चार नीती : साम, दाम, दंड, भेद

चार वेद ;  सामवेद, ॠग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद / चार स्त्री :  माता, पत्नी, बहीण, मुलगी 

चार युग : सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग / चार वेळा : सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र

चार अप्सरा : उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा / चार गुरु : आई, वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु

चार प्राणी : जलचर, थलचर, नभचर, उभयचर / चार जीव : अण्डज, पिंडज, स्वेदज, उद्भिज

चार वाणी : ओंकार, आकार्, उकार, मकार /  चार आश्रम : ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास

चार भोज : खाद्य, पेय, लेह्य, चोष्य / चार पुरुषार्थ : धर्म, अर्थ, काम, मोक्ष

चार वाद्य : तत्, सुषिर, अवनद्ध, घन

०५ —-

पाच तत्व : पृथ्वी, आकाश, अग्नि, जल, वायु / पाच देवता : गणेश, दुर्गा, विष्णु, शंकर, सूर्य

पाच ज्ञानेन्द्रिय ;  डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा / पाच कर्मेन्द्रिय : रस, रुप, गंध, स्पर्श, ध्वनि

पाच बोटे : अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा / पाच पूजा उपचार :  गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य

पाच अमृत : दूध, दही, तूप, मध, साखर / पाच प्रेतं : भूत, पिशाच, वैताळ, कुष्मांड, ब्रह्मराक्षस

पाच स्वाद : गोड, तिखट, आंबट, खारट, कडू / पाच वायू  :  प्राण, अपान, व्यान, उदान, समान

पाच इन्द्रिये : डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा / पाच पाने : आंबा, पिंपळ, बरगद, गुलेर, अशोक

पाच वटवृक्ष : सिद्धवट (उज्जैन), अक्षयवट (प्रयागराज), बोधिवट (बोधगया), वंशीवट (वृंदावन), साक्षीवट (गया)

पाच कन्या : अहिल्या, तारा, मंदोदरी, कुंती, द्रौपदी

०६ —-

सहा ॠतू : ग्रीष्म, वर्षा, शरद, वसंत, शिशिर / सहा ज्ञानाचे प्रकार: शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष

सहा कर्म : देवपूजा, गुरु उपासना, स्वाध्याय, संयम, तप, दान

सहा दोष : काम, क्रोध, मद (घमंड), लोभ, मोह, आलस्य

०७ —-

सात छंद :गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, वृहती, पंक्ति, त्रिष्टुप, जगती

सात स्वर : सा, रे, ग, म, प, ध, नि / सात सूर : षडज्, ॠषभ्, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद

सात चक्र : सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार

सात वार : रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि.. 

सात माती:   गौशाळा, घुड़साल, हाथीसाल, राजद्वार, बाम्बी ची माती, नदी संगम, ताळ

सात महाद्वीप : जम्बुद्वीप (एशिया), लक्षद्वीप, शाल्मलीद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप

सात ॠषी : वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज

सात धातु (शारीरिक) : रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, वीर्य

सात रंग : तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा,

सात पाताळ : अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ

सात पुरी : मथुरा, हरिद्वार, काशी, अयोध्या, उज्जैन, द्वारका, काञ्ची

सात धान्य :  गहू, चणे, तांदूळ, जव, मूग,उडिद, बाजरी

०८ —-

आठ मातृका :  ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐन्द्री, वाराही, नारसिंही, चामुंडा

आठ लक्ष्मी : आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी

आठ वसु : अप (अह:/अयज), ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास

आठ सिद्धि : अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व

आठ धातू :  सोने, चांदी, तांबे, शिसे, जस्त, टिन, लोह, पारा

०९—-

नवदुर्गा :शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कुष्मांडा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री

नवग्रह : सूर्य, चन्द्रमा, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतु

नवरत्न : हिरा, पाचू (पन्ना ), मोती, माणिक, मूंगा, पुखराज, नीलम, गोमेद, लसण्या

नवनिधि : पद्मनिधि, महापद्मनिधि, नीलनिधि, मुकुंदनिधि, नंदनिधि, मकरनिधि, कच्छपनिधि, शंखनिधि, खर्व/मिश्र निधि

१0 —-

दहा महाविद्या: काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्तिका, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमला

दहा दिशा: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैॠत्य, वायव्य, ईशान, खाली, वर

दहा दिक्पाल : इन्द्र, अग्नि, यमराज, नैॠिति, वरुण, वायुदेव, कुबेर, ईशान, ब्रह्मा, अनंत

दहा अवतार (विष्णुजी):  मत्स्य, कच्छप, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्कि

दहा सती :  सावित्री, अनसूया, मंदोदरी, तुलसी, द्रौपदी, गांधारी, सीता, दमयंती, सुलक्षणा, अरुंधती. 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्रीची निर्मिती ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्रीची निर्मिती ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

देवाधिपती ज्यावेळी स्त्रीची  निर्मिती करत होते त्यावेळी  त्यांना खूप वेळ लागला…

सहावा दिवस होता,..  आणि स्त्रीची निर्मिती अद्याप बाकी होती, म्हणून देवदूताने विचारले…

“ देवा….. आपणांस इतका वेळ का लागत आहे ?? “

देवाने उत्तर  दिले…

“ ह्या निर्मितीत इतके सारे गुणधर्म आहेत की जे अनंत काळासाठी जरूरी आहेत…..

— ही प्रत्येक प्रकारच्या  परिस्थितीला सामोरी जाते….!!

—-ही आपल्या सर्व मुलांना सारखेच वाढवते, आणि आनंदी ठेवते….!!

—आपल्याच प्रेमाने, पायाला झालेल्या जखमेपासून विव्हळणा-या हृदयापर्यंत सगळे घाव भरून टाकते…..!!

—तिच्यामध्ये सर्वात मोठा गुणधर्म असा आहे की, ती आजारी पडली तरी स्वतःची काळजी स्वतःच घेते, 

    आणि तरीही अखंड कार्यरत राहू शकते…!! “

देवदूत चकित झाला, आणि आश्चर्याने त्याने विचारले…..  “ देवा,…हे सर्व दोन हातांनी करणे शक्य आहे ???”

देवाधिपती बोलले… “ म्हणूनच ही एक खास निर्मिती आहे….!!”

देवदूत जवळ जातो….स्त्रीला हात लावून म्हणतो…. “ देवा….ही खूप नाजूक आहे…!! “

देवाधिपती ~ “ हो… ही खूप नाजूक आहे..,पण हिला  खूप शक्तिशाली बनविले आहे….!! तिच्यामध्ये प्रत्येक  परिस्थितीत सामोरे जाण्याची ताकद आहे….!!

देवदूताने विचारले ~”  ही विचार सुद्धा करू शकते का…??”

देवाने उत्तर दिले. ~ “ ती विचार करू शकते, आणि मजबूत होऊन धैर्याने ‘लढा’ ही करू शकते..!! “ 

देवदूताने  जवळ जाऊन स्त्रीच्या  गालाला हात लावला, आणि म्हणाला …” देवा  गाल तर ओले आहेत….!!

 कदाचित ह्यामध्ये चुक झाली असेल…..!!” 

देवाधिपती बोलले….. “ ह्यात काहीही चुक नाही….!! हे तिचे अश्रू आहेत….!! “

देवदूत ~ “ अश्रू कशासाठी ??”

देव  बोलले ~ “ ही सुद्धा तिची ताकद आहे…!!…. अश्रू…..तिला  तक्रार  करायची आहे, प्रेम दाखवायचे आहे, आपले एकटेपण दूर करायचा हा एक मार्ग आहे….!!

देवदूत ~ “ देवा, ही आपली निर्मिती अद्भुत आहे….! आपण सर्व विचार करून ही निर्मिती केली आहे. आपण महान आहात….!!” 

देवाधिपती  बोलले ~ “ ही स्त्रीरूपी अद्भुत निर्मिती प्रत्येक पुरुषाची ताकद आहे, जी त्याला प्रोत्साहित करते, सर्वांना आनंदित पाहून ही सुद्धा आनंदी राहते…!! सगळ्याच परिस्थितीत कायम हसत राहते…..!! तिला जे पाहिजे ते ती लढून सुद्धा घेऊ शकते…!! तिच्या प्रेमात काही अटी नसतात…!! तिचे हृदय तेव्हाच विव्हळते जेव्हा आपलेच तिला धोका देतात…!! परंतु प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची तिची तयारी असते….!! “

देवदूत ~ “ देवाधिपती आपली निर्मिती अद्वितीय आहे, संपूर्ण आहे..!!” 

देवाधिपती बोलले ~ “ अद्वितीय नाही……तिच्यातही एक त्रुटी आहे……… ती आपली महत्ता विसरून  जाते…..” . 

लेखक – अज्ञात 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगण्याचा तोल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगण्याचा तोल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(एका स्पॅनिश कवितेचा मुक्त अनुवाद)

पाऊस पडून गेला की

आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमलतं;

त्याला पाहून मातीनं रुसावं का?

सगळे रंग आकाशात तसेच ठेवून आलास,

मला काय दिलंस?  म्हणून भांडावं का?

*

नाहीच भांडत ती,

मान्य करून टाकते की,

त्याचं रंगहीन होऊन आपल्याकडे येणं,

उगीच मनाला लावून घ्यायचं नाही,

त्या कोरडय़ा सुंदर रंगापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहायचं    !

*

तो भरभरून बरसतो, तेव्हा रंगहीन असतो हे खरं;

पण तो तिला जगण्याची,उमलण्याची, 

स्वत:तून रंग फुलवण्याची जादू देतो.

त्या जादूनं,

काळ्या मातीतून किती रंग उमलतात,

आणि रंगच कशाला,

किती गंध, किती आकार,

किती प्रकारचं जगणंही बहरतं !

क्षणभर उजळणाऱ्या रंगापेक्षा

स्वत: अनेक रंगांत उमलण्याची जादू 

म्हणून तर काळ्या मातीला

किती युगं झाली, तरी हवीच असते त्याच्याकडून.

*

जगण्याचा तोल हा असा असतो !

कुणाला क्षणभराचे रंग मिळतात,

कुणाला सुंदर क्षण मिळतात,

कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं,

तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज.

त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते.

एकदा ती जादू आली की,

रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत,

ते उमलत राहतात,

बहरत राहतात….. 

**

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सस्पेन्शन” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ “सस्पेन्शन” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

नॉर्वे हा युरोपमधील एक देश आहे. तिथे कुठेही जाता हे दृश्य सहसा सापडेल… 

एक रेस्टॉरंट, एक महिला त्याच्या कॅश काउंटरवर येते आणि म्हणते — 

” ५ कॉफी, १ सस्पेंशन “…

मग ती पाच कॉफीचे पैसे देते आणि चार कप कॉफी घेऊन जाते. थोड्या वेळाने दुसरा माणूस येतो, म्हणतो —

” ४ लंच, 2 सस्पेंशन “!!! 

तो चार लंचसाठी पैसे देतो आणि दोन लंच पॅकेट घेऊन जातो. मग तिसरा येतो आणि ऑर्डर देतो — 

” १० कॉफी, ६ सस्पेंशन” !!! 

तो दहासाठी पैसे देतो, चार कॉफी घेतो. 

थोड्या वेळाने जर्जर कपडे घातलेला एक म्हातारा काउंटरवर येऊन विचारतो —

” एनी सस्पेंडेड कॉफी ??” 

उपस्थित काउंटर-गर्ल म्हणते -” येस !!”–आणि त्याला एक कप गरम कॉफी देते.

काही वेळाने दुसरा दाढीवाला माणूस आत येतो आणि विचारतो – ” एनी सस्पेंडेड लंच ??”

–काउंटरवरील व्यक्ती गरम अन्नाचे पार्सल देते आणि त्याला पाण्याची बाटली देते. 

आणि हा क्रम सुरू… एका गटाने जास्त पैसे मोजावेत, आणि दुसऱ्या गटाने पैसे न देता खाण्यापिण्याचे पदार्थ घ्यावेत,असा दिवस जातो. म्हणजेच, अज्ञात गरीब, गरजू लोकांना स्वतःची “ओळख” न देता मदत करणे ही नॉर्वेजियन नागरिकांची परंपरा आहे. ही “संस्कृती” आता युरोपातील इतर अनेक देशांमध्ये पसरत असल्याचे समजते.

आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना केळी किंवा संत्री वाटली, तर ते सर्व मिळून त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या संघटनेचा ग्रुप फोटो काढून वर्तमानपत्रात छापतो, हो की नाही ???

अशीच “सस्पेंशन” सारखी खाण्या-पिण्याची प्रथा भारतात सुरू करता येईल का किंवा दुसरं काही तरी ???

….. न गवगवा करता

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्ट – DART (Double Asteroid Redirection Test) ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

डार्ट – DART (Double Asteroid Redirection Test) श्री राजीव ग पुजारी 

जर तुम्हाला हॉलिवूड सिनेमांची आवड असेल तर तुम्हाला नक्कीच अर्मागेडन हा ब्लॉकबस्टर सिनेमा आठवत असेल. या सिनेमात ब्रुस विलीस आणि बेन ऐक्लेफ एका लघुग्रहापासून पृथ्वीला वाचविण्याच्या मोहिमेवर निघतात. या सिनेमाच्या कहाणीला अमेरिकन अंतरीक्ष संस्था अर्थात नासा (NASA) मूर्त स्वरूप देत आहे.

दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी स्पेस एक्स (Space-X)च्या फाल्कन-९ (Falcan-9) या प्रक्षेपकाद्वारे नासाने DART (Double Asteroid Redirection Test) या अंतरिक्ष यानाचे प्रक्षेपण केले. या मोहिमेचा उद्देश डायमॉर्फस या लघुग्रहाला धडक देऊन त्याची कक्षा बदलणे हा होता. या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही, पण भविष्यात एखाद्या लघुग्रहापासून पृथ्वीचे रक्षण करण्याची वेळ आलीच तर त्याची रंगीत तालीम म्हणून या मोहिमेकडे पाहता येईल. नासाने या मोहिमेला ग्रहीय संरक्षण मोहीम (Planetary Defence Mission) असे नाव दिले आहे.

२७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजून ४४ मिनिटांनी या आंतरिक्ष यानाने एक कोटी सहा लाख किलोमीटर दूर असलेल्या डायमॉर्फस या लघुग्रहाला ताशी २४००० किलोमीटर या वेगाने धडक दिली आणि नासाच्या जोन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीतील तंत्रज्ञ व वैज्ञानिक आनंदाने बेभान झाले. कारण मानवी इतिहासातील हा क्षण एकमेवाद्वितीय होता. 

संपूर्ण मोहिमेसाठी २५०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. नासाचे ग्रहीय संरक्षण अधिकारी लिंडले जॉन्सन म्हणतात, ” सध्याचा विचार केला तर, असा कोणताही लघुग्रह नाही, ज्याच्यापासून पृथ्वीला नजिकच्या भविष्यात धोका संभवू शकेल. परंतु अंतराळात पृथ्वीच्या जवळपास मोठ्या संख्येने लघुग्रह आहेत. नासाचा प्रयत्न असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा आहे, की ज्यामुळे भविष्यात प्रत्यक्षात जर एखाद्या लघुग्रहापासून पृथ्वीला धोका वाटला, तर वेळेअगोदर त्यावर उपाय करता येईल. आम्ही अशी वेळ येऊ देणार नाही की एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येईल व त्यावेळी आम्ही आमच्या क्षमतेचे परीक्षण करू.”

डायमॉर्फस हा १६० मिटर व्यासाचा लघुग्रह असून तो डिडीमॉस या ७६० मिटर व्यासाच्या दुसऱ्या लघुग्रहाभोवती फिरतो. डायमॉर्फस व डिडीमॉस ही जोडगोळी सूर्याभोवती ज्या वेगाने परिभ्रमण करते, त्यापेक्षा खूप कमी गतीने डायमॉर्फस डिडीमॉसभोवती फिरतो. त्यामुळे DART ने दिलेल्या धडकेचा परिणाम आपणास सहज मोजता येईल. या धडकेमुळे डायमॉर्फसच्या डिडीमॉसभोवती फिरण्याच्या कक्षेत १% पेक्षा कमी फरक पडेल पण पृथ्वीवरून दुर्बीणीच्या सहाय्याने तो मोजता येण्याजोगा असेल.

DART अंतराळयानाने लिसीयाक्यूब (LICIACube) नावाचा लहान उपग्रह सोबत नेला होता. हा उपग्रह इटालियन स्पेस एजन्सीने बनवला आहे. DART च्या धडकेअगोदर तो DART पासून अलग केला गेला व त्याने डायमॉर्फसवरील DART च्या धडकेचे तसेच त्यावेळी निर्माण झालेल्या धुळीच्या ढगाचे फोटो घेऊन नासाकडे पाठवले आहेत. पृथ्वीवरील व अंतराळातील दुर्बिणी, धडकेनंतर डायमॉर्फसच्या कक्षेचा वेध घेतील व त्याच्या कक्षेत किती फरक पडला आहे हे नजिकच्या भविष्यात आपणास कळू शकेल.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र – भाग 3 (मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी भावानुवाद) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र – भाग 3 (मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी भावानुवाद) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

(रचैता : शंकराचार्य  — वृत्त : दुसरी सवाई) 

करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते

मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।

निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१५॥ 

 

मधुर सुरांनि तुझी मुरली  करिते पिकद्विज  लज्जित  कंठा 

मधुर तुझा घुमतो स्वर पर्वतकंदर गात पुलींद पहा

शबर कुळातिल सद्गुणि चारुसवे तव  खेळ कितीक रंगे 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१५|| 

कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे

प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे

जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१६॥ 

 

झगमगते कटिलाच  पितांबर  चंद्र चंदेरि झळाळि तया 

मुकुटमणीहि  असूरसुरांचे झळाळित पादनखांनि तुझ्या

नगशिखरे गजशीर्ष उरोज तुझे  बघुनी लपुनी बसले 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१६|| 

 

विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते

कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते ।

सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते ।

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१७॥ 

 

सहस्र करांनि सहस्रअसूरा रणातसहस्रे विजीत जशी

असूर वधीसि ग तारकसूर रिपूसि जिवा प्रसवूनी उमे

सुरथ नृपासि समाधिस  वैश्य प्रसन्न समान ग गिरीसुते  

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१७|| 

पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे

अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।

तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१८॥ 

 

तव करुणापदि पद्मनिवास पवित्र  असूनि उमे कमले

पदकमलांचि करीत सेवा कमला निवास प्राप्त करे

पदकमलांवर  दृष्टि खिळोनि अत्युच्च पदासि सुप्राप्त करे  

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति सुकुंतले ||१८|| 

 

कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम्

भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।

तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम्

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१९॥ 

 

सिंचन करीत सुवर्ण झळाळि जलासि तुझीच  भक्ती भवनी 

शचिकुचकुंभ करीत सुखी जणु इंद्र तसे सुख ही मिळुनी  

तव चरणी शरणागत गौरि महान सुतागिरि देवि  शिवे 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति सुकुंतले ||१९|| 

तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते

किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।

मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥२०॥ 

 

विमल शशीसम शुभ्र वदनानि वधीसि  हसूनि  दुरीत जना

नंदनवनातिल मोहकशा असुनी मज मोहविती न स्त्रिया    

शिवधन प्राप्ति कृपेविण कैसि  कधी न कुणास तशी मिळते

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||२०|| 

अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे

अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ।

यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥२१॥

 

मजसि देई तव आशिष गे जननी नगपुत्रि दयाळु रमे 

कणव असेल नसेल तरीहि  अपाप करीसि ग शैलसुते

उचित तुला गमते करुनी जवळी मजलाचि धरी गिरिजे 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||२१||

— समाप्त —

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र – भाग 2 (मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी भावानुवाद) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र – भाग 2 (मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी भावानुवाद) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

(रचैता : रामकृष्ण —-वृत्त : दुसरी सवाई) 

धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके

कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके ।

कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥८॥

 

कंगण लखालख होत जयांचि धनूसह शोभत  युद्धभुमी 

शर कनकासह शोणित होती रुधीर तयांवर लाल मणी   

करुनि निनाद बटू बनवूनि असूर वधीसि रिपूस रणी 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||८|| 

 

सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते

कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते ।

धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥९॥

 

तत ततथा थयि ताल घुमोनि पदे थिरकीत तुझीच रमे  

कुकुथ गडाद ददीक रमून मनातुनि मृदुंग ताल घुमे 

रंगुनि धुधूकुट धुक्कुट मृदुंग धिंधिमिता करितात  स्वरे

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||९|| 

 

जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते

झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते ।

नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१०॥ 

 

जयजयकार करीतच  विश्व समस्त तुलाच प्रणाम करी

झणझणझीझिमि नाद करोनी भुताधिपतीसि मुदीत करी

नटनटिनायक अर्धनटेश्वर तल्लिन होउनि  नृत्य करे 

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१०|| 

 

अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते

श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते ।

सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥११॥ 

 

अग सुमने सुमनासह सूमन कांति तुझी लखलाति रणी 

रजनि तुझी रजनीधव जैसि रजनि प्रभा दिपवीत झणी  

भ्रमर जसे तव नेत्र पतीभ्रमरि भ्रमरास जशी भुलवी

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||११|| 

 

सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते

विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते ।

शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१२॥ 

 

मुकुल जशी दिसशी अतिकोमल वा सुमनासम भिल्ल दिसे

सुमन जसे दिसते रुधिरासम वर्ण तुझा अरुणासम गे

मदत करीत तुझी शुर येउनि साथ रणांगणि देत तुला     

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१२|| 

 

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्गजराजपते

त्रिभुवनभूषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।

अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१३॥ 

 

अविरत वाहत मत्त गजा मद उल्हसिता जणु भाससि तू

बलरुप शोभित तीहि जगात कलावति शोभित राजसुते

मधुर सुहास्य अती तव  लाघवि सुतामदनासम  मोहविते

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१३|| 

 

कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते

सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले ।

अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१४॥ 

 

कमलदलासम कोमल कांति विशाल सुभाल असून तुला

तव पदि डोलत  नाचत  हंस जणू भरुनी अति मोद भला

कमल  सुशोभित कुंतल मंडित साथ तयांस  बकूळ फुले  

जय जय हे महिषासुरमर्दिनि मोहक पार्वति  सुकुंतले ||१४|| 

– क्रमशः भाग दुसरा

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print