मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सौर शिडाचे अंतराळजहाज – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ सौर शिडाचे अंतराळजहाज – भाग-1 ☆ श्री राजीव ग पुजारी 

आपण सर्वांनी शिडाच्या जहाजाविषयी ऐकलेले असते. चित्रात आपण असे जहाज पहिलेले असते. पूर्वीच्या काळी दर्यावर्दी लोक अशा जहाजांच्या सहाय्याने समुद्र प्रवास करीत असत. या जहाजास जाड कापडाची शिडे लावलेली असतात. या शिडांवर वारा आपटल्यावर वाऱ्याच्या दाबाने जहाजास गती मिळते. पण एखाद्या अंतराळयानास शीड आहे व त्यावर सूर्यप्रकाश आदळल्यावर यानास गती मिळते हे आपण स्वप्नातच बघू शकतो. पण लवकरच अमेरिकेची अंतराळ संस्था अर्थात नासा हे स्वप्न सत्यात उतरविणार आहे.

चंद्रभूमीला भेट देऊन तेथे तळ स्थापण्याच्या नासाच्या महत्वाकांक्षी आर्टिमिस योजनेतील पहिली मोहीम अर्थात आर्टिमिस -१ ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार आहे. आर्टिमिस-१ यान प्रक्षेपणानंतर कांही वेळातच NEA स्काऊट (Near Earth Asteroid Scout) हे अंतरिक्ष जहाज अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. हे जहाज पृथ्वीजवळील 2020GE या अशनीला भेट देणार आहे. या जहाजाला सौर शिड असणार आहे आणि सूर्यप्रकाश या शिडावर पडल्यावर सूर्यप्रकाशातील फोटोन्सच्या दाबाने हे जहाज 2020GE या अशनीकडे मार्गक्रमण करणार आहे.

आता आपण नासाच्या सौर शिड अंतराळ जहाजा संबंधी विस्ताराने जाणून घेऊ :—-

NEA स्काऊट हा बुटाच्या खोक्याएव्हढ्या आकाराचा क्यूबसॅट प्रकारातील उपग्रह असून त्याला साधारण रॅकेटबॉलच्या मैदानाएव्हढे ऍल्यूमिनियमचा थर दिलेले सौर शीड बसविलेले आहे. आर्टिमिस-१ ने प्रक्षेपीत केल्यावर हे शीड उलगडेल व सूर्यप्रकाशाचा वापर करून या क्यूबसॅटला 2020GE या अशनीकडे नेईल.

2020GE हा अशनी एखाद्या शाळेच्या बसपेक्षाही लहान असून, एखाद्या अंतराळयानाने अभ्यासासाठी निवडलेला सर्वात लहान अशनी आहे. नासाची सुदूर अंतराळातली अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम आहे. ज्याला भेट द्यायची तो  2020GE  हा पृथ्वीचा एक निकटतम अशनी (Near earth asteroid) असून तो आकाराने ६० फुटांपेक्षा कमी आहे. आजपर्यंत ३३० फुटांपेक्षा कमी लांबीच्या अशनीचे एव्हढ्या जवळून अन्वेषण करण्यात आलेले नाही. हे जहाज त्याच्यावर बसविलेल्या वैज्ञानिक कॅमेऱ्याच्या मदतीने या अशनीचे जवळून निरीक्षण करेल. त्याचे आकारमान, आकार, गती आणि भूपृष्ठीय गुणधर्म आदींचा अभ्यास करेल, आणि त्याचवेळी या अशनीच्या आसपास काही धूळ किंवा दगडधोंडे आहेत का याकडे लक्ष देईल. कॅमेराचे रिझॉल्युशन एका चित्रपेशीला (pixel) ४ इंच असल्याने या मोहिमेच्या वैज्ञानिकांचा गट हे नक्की करू शकेल की, 2020GE हा एखाद्या खडकासारखा घन आहे, का  ‘बेन्यू ‘ सारख्या मोठया लघुग्रह भावंडासारखा लहान लहान धोंडे आणि माती यांचा गठ्ठा आहे.

या मोहिमेच्या, दक्षिण कॅलिफोर्नियास्थित नासाच्या जेट प्रॉपलशन लॅबोरोटरीतील मुख्य शास्त्रीय अन्वेषक ज्यूली कॅस्टिलो – रॉगेज म्हणाल्या, ” पृथ्वीवरील अनेक वेधशाळांनी  NEA स्काऊटसाठी १६ ते १०० फूट मापादरम्यानचे अनेक अशनी हेरून ठेवले होते. 2020GE अशा अशनींचे प्रतिनिधित्व करतो की ज्यांच्याविषयी सध्याच्या घडीला आपणाकडे अत्यंत कमी माहिती आहे.”

नासाच्या ग्रहीय संरक्षण समन्वयीन कचेरीसाठी पृथ्वीच्या निकटतम अशनींच्या शोधाचा एक भाग म्हणून काम करत असतांना, ऍरिझॉनाच्या ‘ कॅटलीना नभ सर्वेक्षणा ‘ला १२ मार्च २०२० ला हा अशनी सर्वप्रथम नजरेस पडला.

हंट्सविले, अलाबामा येथील मार्शल अंतराळ उड्डाण केंद्र हा नासाचा प्रगत अन्वेषण प्रणाली विभाग आणि जेट प्रॉपलशन लॅबोरेटरी यांनी विज्ञान व तंत्रज्ञान यांचे प्रात्यक्षिक स्वरूप ‘ NEA स्काऊट ‘  ही मोहीम विकसित केली आहे. ही मोहीम  पृथ्वीच्या निकटतम लहान अशनींसंबंधीच्या नासाच्या माहितीत भर घालेल. या मोहिमेसाठी वापरण्यात येणारे सौर जहाज सहा एकक क्यूबसॅट फॉर्म फॅक्टरने बनवले आहे. सप्टेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात  नासाच्या फ्लोरिडास्थित केनेडी स्पेस सेंटर येथून उड्डाण भरणाऱ्या ‘ स्पेस लॉन्च सिस्टीम ‘ या शक्तिशाली प्रक्षेपकावर असणाऱ्या दहा दुय्यम अभिभारांपैकी NEA स्काऊट हा एक अभिभार आहे. प्रक्षेपक आणि ओरियन यान यांना जोडणाऱ्या अडॅप्टर रिंगला जोडलेल्या डिस्पेन्सरद्वारा NEA स्काऊट अंतराळात सोडला जाईल.

ही मोहीम भविष्यातील मानवीय व यंत्रमानवीय मोहिमांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. या प्रकारच्या मोहिमांद्वारा अशनी व लघुग्रह यांचेवरील खनिजद्रव्ये पृथ्वीवर आणणे आणि पृथ्वीच्या निकटतम अशनी व लघुग्रहांपासून पृथ्वीचे रक्षण करणे या विषयी ज्ञान मिळेल.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ !! ब्रह्मचैतन्य रुग्णालय !! ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ !! ब्रह्मचैतन्य रुग्णालय !! ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

 हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा !

दवाखाना म्हणजे सवर्त्र औषधांचा गंध, चहूकडे गंभीर वातावरण असं चित्र डोळ्यासमोर येतं.

आणि मंदिर ? – उदबत्तीचा सुगंध, कुठेकुठे सुविचार, श्लोक लिहिलेले…असं काहीसं.

जर एका दवाखान्यात असंच मंगल वातावरण आहे – हे सांगितलं तर खरं वाटेल का?

पण हे खरंय…अहमदनगरचं “ब्रह्मचैतन्य रुग्णालय” अगदी एखाद्या मंदिरासारखं आहे.

डॉ. कुलकर्णी दाम्पत्याचं मूळ “चिंतामणी हॉस्पिटल”, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तीरसाने भारावून जाऊन “ ब्रह्मचैतन्य रुग्णालय “ झालंय. ह्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रशस्त ३ मजली मंदिर देखील आहे.

नाममात्र शुल्क (रू ३० फक्त !) आकारून ह्या रुग्णालयात रुग्णांची तपासणी होते .

OPD मधे रुग्णांचं स्वागतच मोठ्या प्रेमाने होतं :

प्रवेश केल्या केल्या मनाचे श्लोक दृष्टीस पडतात !

डॉक्टरांना भेटण्यासाठी आपल्या नंबरची वाट बघणारे रुग्ण “ रिकामे ” बसत नाहीत…! तिथे ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनं व इतर आध्यात्मिक पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध आहेत.

डॉक्टर कुलकर्णींचं केबिन तर एखाद्या देवघरासारखं भक्तीरसाने परिपूर्ण आहे…

वरच्या मजल्यावर admit झालेल्या रुग्णांसाठी जप-माळ आणि प्रवचनांचं पुस्तक ठेवलंय…! रुग्णावस्थेत ह्याने खूप मनःशांती मिळते.

एवढंच नाही, प्रत्येक ward ला, खोलीला संतांचीच नावं दिली गेली आहेत…

“ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर ” महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या भक्तीरसाने त्यांचं हॉस्पिटल न्हाऊन निघालं आहे.

चहूकडे देवळांचा धंदा चालू असताना आपल्या व्यवसायालाच देऊळ बनवणाऱ्या ह्या “वैद्य” दाम्पत्याची भक्ती अतुलनीयच !

वंदन…!   

संग्राहक :– सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संस्कृत: काही रोचक तथ्य…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ संस्कृत: काही रोचक तथ्य…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

संस्कृत भाषेबद्दल ही २० तथ्य समजल्यावर तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.

०१. संस्कृत ही सर्व भाषांची जननी मानली जाते.

०२. संस्कृत ही उत्तराखंडातील अधिकृत भाषा आहे.

०३. अरब लोकांनी भारतात येऊन हस्तक्षेप करण्याआधी संस्कृत ही राष्ट्रीय भाषा होती.

०४. NASA च्या म्हणण्याप्रमाणे संस्कृत ही पृथ्वीवर बोलली जाणारी सर्वात स्पष्ट भाषा आहे.

०५. संस्कृत भाषेत जगातील कुठल्याही भाषेपेक्षा जास्त शब्द आहेत. संस्कृत भाषेतील शब्दकोषात १०२ अब्ज- – ७८ कोटी ५० लाख शब्द आहेत. 

०६. कुठल्याही विषयासाठी संस्कृत हा एक अद्भुत खजिना आहे. उदाहरणार्थ : हत्तीला समानार्थी असे १०० हून जास्त शब्द संस्कृतमध्ये आहेत.

०७.  NASA कडे ताडपत्रांवर संस्कृत भाषेत लिहिलेल्या ६०००० पांडुलिपी आहेत, ज्यावर NASA चे संशोधन चालू आहे.  

०८.  Forbes Magazine ने जुलै १९८७ मध्ये Computer Software साठी संस्कृतला सर्वोत्तम भाषा मानले होते.

०९. कुठल्याही अन्य भाषांच्या तुलनेत संस्कृतमध्ये सर्वात कमी शब्दात वाक्ये पूर्ण होतात.

१०. संस्कृत ही जगातील एकमेव भाषा आहे की ती बोलतांना जिभेच्या सर्व मांसपेशींचा वापर होतो. 

११. अमेरिकन हिंदू युनिव्हर्सिटीच्या अनुसार संस्कृतमध्ये बोलणारा माणूस मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी रोगांपासून मुक्त होतो.

१२. संस्कृत मध्ये बोलल्याने मानवी शरीरातील Nervous System कायम सक्रिय राहते व त्यामुळे व्यक्तीचे शरीर सकारात्मक ऊर्जेने सक्रिय राहते. Speech Therapy मध्ये संस्कृत चा खूप उपयोग होतो, कारण त्याने बोलण्यात एकाग्रता येते.

१३. कर्नाटकातील मुत्तूर गावातील लोक केवळ संस्कृतच बोलतात.

१४. संस्कृतमधील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव आहे ‘सुधर्म’. १९७० मध्ये सुरु झालेल्या ह्या वृत्तपत्राचे online संस्करण आजसुद्धा उपलब्ध आहे. 

१५. जर्मनीत संस्कृतला मोठा मान आहे. जर्मनीतील १४ विद्यापीठात आज संस्कृत शिकवले जाते.

१६. NASA च्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ते अंतरिक्षात प्रवास करणाऱ्यांना संदेश पाठवत, तेव्हा त्यातील वाक्ये उलट-सुलट व्हायची व त्यामुळे संदेशाचा अर्थ लागत नसे किंवा अर्थ बदलत असे. त्यांनी बऱ्याच भाषांचा उपयोग करून पाहिला. परंतु प्रत्येक वेळेस असेच व्हायचे. शेवटी त्यांनी संस्कृतमध्ये संदेश पाठवला, कारण संस्कृतमधील वाक्ये उलटी झाली तरी अर्थ बदलत नाही. 

उदाहरणार्थ :   अहम् विद्यालयं गच्छामि।

                         विद्यालयं गच्छामि अहम्।

                          गच्छामि अहम् विद्यालयं ।

  • ह्या तीनही वाक्यांचा अर्थ एकच आहे.

१७. आपल्याला आश्चर्य वाटेल की Artificial intelligence programming साठी संस्कृत ही सर्वात suitable language आहे असा दावा NASA ने केला आहे.

१८. NASA च्या वैज्ञानिकांद्वारा 6th आणि 7th Generation चे Super Computers  संस्कृत भाषेवर आधारित असतील, जे २०३४ सालापर्यंत तयार होतील.

१९. संस्कृत शिकल्याने मेंदू तल्लख होतो आणि स्मरणशक्ती वाढते आणि म्हणूनच London  आणि Ireland मधील काही शाळांमध्ये संस्कृत भाषा शिकणे अनिवार्य केले आहे.

२०. हल्ली १७ हून जास्त देशातील कमीत कमी एका विद्यापीठात तांत्रिक शिक्षणाचे काही कोर्सेस संस्कृतमध्ये घेतले जातात.

🔔 जयतु संस्कृतम् 🔔

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिक्षकाची कदर…अल्बर्ट फर्नांडिस ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ शिक्षकाची कदर…अल्बर्ट फर्नांडिस ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अल्बर्ट फर्नांडिस यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे—-

  • रोममध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला. कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही. त्यामुळेकोर्टात जावं लागलं. न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारल्यावर मी म्हटलं,” प्रोफेसर आहे, कामात एवढा गुंतलो की वेळच मिळाला नाही.”

माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत न्यायाधीश म्हणाले,

  • अ टीचर इज इन द कोर्ट …!

लगेचच सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी माझी माफी मागितली व माझा दंडही रद्द केला गेला.

त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.

  • ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात ?
  • अमेरिकेत केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविशिष्ट मानलं गेलं आहे. वैज्ञानिक आणि शिक्षक.
  • फ्रान्सच्या न्यायालयांमधे केवळ शिक्षकांनाच खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.
  • जपानमध्ये सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या शिक्षकाला अटक करू शकतात.
  • कोरियात प्रत्येक शिक्षकाला ते सगळे अधिकार आहेत जे भारताच्या मंत्र्याला मिळतात– तेही केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.
  • अमेरिकन आणि युरोपीय देशांमध्ये प्राथमिक शिक्षकाला सर्वाधिक वेतन मिळतं, कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात.
  • ज्या समाजात शिक्षकांचा अपमान होतो, तिथं फक्त चोर, आणि भ्रष्टाचारी लोकच तयार होतात.

सर्व शिक्षकांना समर्पित. 

लेखक – अल्बर्ट फर्नांडिस

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मंत्र पुष्पांजली — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

अल्प परिचय

वैद्यकी व्यवसाय, पुणे.

कथा, कादंबरी, एकांकिका, काव्य,अशा सर्वप्रकारच्या साहित्य प्रकारातील व वैद्यकीय लेखन. सुमारे पन्नास पुस्तके प्रकाशित. शिवाय ध्वनिफिती /सी.डीं। चे ही प्रकाशन झाले आहे.

आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्ताप्राप्त भावगीतकार व अभिनेता.

? इंद्रधनुष्य ?

☆ मंत्र पुष्पांजली — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

— संस्कृत श्लोक

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय।
महाराजाय नम: ॥

ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥

॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥

— मराठी भावानुवाद —

यूट्यूब लिंक >> मंत्रपुष्पांजली मराठी / Mantrapushpanjali Marathi – YouTube

ॐ यज्ञासहित करुन आद्य विधी उपासनेचे

पूजन केले देवे यागरूपी त्या प्रजापतीचे

यज्ञाचरणे देवताधामा केले त्यांनी प्राप्त

याची कर्मे महानता झाली त्यांना अर्जित

 

अनुकूल सकला असे तुझे कर्म

मनीच्या कामनांची पूर्ती तुझा धर्म

अमुच्या इच्छा समस्त पूर्ण करा

नमन राजाधिराजा वैश्रवणा कुबेरा

 

कल्याणकारक असावे राज्य

भोग्य परिपूर्ण असे साम्राज्य

लोभमोहविरहित लोकराज्य

अधिपत्य अमुचे असो महाराज्य

 

क्षितीजसीमेपर्यंत अमुचे राज्य सुखरूप असो

सागरमर्यादेचे अमुचे राज्य दीर्घ आयुचे असो

राज्य आमुचे सृष्टी आहे तोवर संरक्षित असो

आयु या राज्याची परार्ध वर्षे सुरक्षित असो

 

असे राज्य कीर्तीमानसे व्हावे

म्हणोनी या  श्लोकास आम्ही गावे

अविक्षीत पुत्रांनी मरुद्गणांनी

परिवेष्टिले राज्य आम्हासि लाभो—-

भावानुवादकर्ता— ©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गंजणे आणि झिजणे  ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ थेरेसा सर्बर माल्कल! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

१) कोणालाही न दुखवता जगणे, याच्याइतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही.  आणि……ज्याला हे कळले  त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही.

२) कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे .

     खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे.

     वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.

     स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.

….आणि अतिशय महत्वाचे…..  ” दुसऱ्यांसाठी वेळ द्या कारण. ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..

३) ‘ पश्चात्ताप ‘ कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि ‘ काळजी ‘ कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही….!

      म्हणूनच… वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे…!!

४ ) माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे. कुणी पाहत नाही, असा अर्थ काढू नये. कारण जेव्हा नियती त्याचा हिशोब करते, तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही.

५) भावना कळायला मन लागतं,

     वेदना कळायला जाणीव लागते,

     देव कळायला श्रद्धा लागते,

     माणूस कळायला माणुसकी लागते,

     चांगलं जगायला सुंदर विचार लागतात,

     आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागते. 

६)  माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा “दरवाज्याचा” जन्म झाला, त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा “कुलूपाचा” जन्म झाला आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही. तेव्हा मात्र “सीसीटीव्ही” चा जन्म झाला.

  ७) जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे , अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे…….  तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…

८) देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच  गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचं असते.. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात……. कारण आपण *ओंजळीत पाणी पकडू तर शकतो…पण टिकवून नाही ठेवू शकत…आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात….कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो…

९)  संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामध्ये क्षमता असते. 

१०)  कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहचत असेल, तर ईश्वराचे आभार माना. कारण तो समर्थ असतांनाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केलेली असते. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात—-

       काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..

       काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..

       काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..

       आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी.

११)  माणूस मनापर्यंत पोहोचला …  तरच नातं निर्माण होतं …नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !! असे जगा की आपली “उपस्थिती” कुणाला जाणवली नाही तरी चालेल…पण आपली  “अनुपस्थिती ” मात्र जाणवली पाहिजे..!!!

१२)  चांगले कर्म , चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल, तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते. जास्त वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येताच गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तम “      

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहाटे तुळशीला पाणी का घालावे?… डाॅ. संतोष ढगे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पहाटे तुळशीला पाणी का घालावे?… डाॅ. संतोष ढगे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगीतले आहे. त्यापाठीमागे पुढील दोन महत्वाची कारणे आहेत —–

📖 अध्यात्मिक महत्व-

याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजीत करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते, “ तू कोण आहेस?”  त्यावर विष्णू आपल्या खऱ्या  रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला ‘ तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, ‘ असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, “ तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण  स्वीकारील ?” तेव्हा भगवंत म्हणतात, “ मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.” त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात.

ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘ शालिग्राम ’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

📖 वैज्ञानिक महत्व-

जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वत्थ –पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव अशी वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यू सोडते. व या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी,खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतून निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते.

या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले आहे.

॥ इति सर्वेश्वरी चरणार्पणमस्तु ॥

– ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, 

– त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.

– जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,

– तिथे भक्तीची कमतरता नसते. 

– जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते. 

– जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. 

– आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.

सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया: |

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग्भवेत् ||

ले. डॉ. संतोष ढगे

 

संग्रहिका : माधुरी परांजपे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पोत नात्यांचा… ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ पोत नात्यांचा… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आई ही कॉटनच्या साडीसारखी असते. शेवटपर्यंत तिच्या स्पर्शातून फक्त मायाच पाझरत राहते.खूप तणावाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगी आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपण्याच सुखं अनुभवणं हा एक  शब्दातीत अनुभव असतो.

बायको ही सिंथेटिक साडीसारखी असते. आकर्षक रंग आणि टिकाऊपणा हे तिचे गुणधर्म. कोणत्याही प्रसंगात ती टिकून राहते,  निभावून जाऊ शकते.  पण संशयाच्या अगर उपेक्षेच्या ठिणगीने पटकन पेट घेते.

प्रेयसी ही गर्भरेशमी साडीसारखी असते. सर्वांच्याच नशिबात असते असे नाही. तिच्या भावनांचा,मनाचा रेशीमपोत केवळ नजरेलासुद्धा जाणवतो,सुखावतो.  मनाच्या तळाशी जपून ठेवावासा वाटतो.

मुलगी अथवा बहीण ही भरतकाम केलेल्या साडीसारखी असते. सासर आणि माहेरच्या धाग्यांना कुशलतेने एकत्र आणून एक सुंदरसे डिझाईन तयार करते. तिला सगळेच धागे जपावे लागतात, कारण कोणतेही धागे तुटले तरी सगळ्याच भरतकामाची शान जाते. सासरची नाती जपता जपता ती माहेरच्या अंगणात रमत राहते.

मैत्रीण ही एखाद्या उबदार शालीसारखी असते.आपल्या मैत्रीचं पांघरूण घालून तुम्हाला जपत राहते, निष्पाप मनानं, कोणतीही अपेक्षा न ठेवता ! ती आहे ही जाणीवच आधार देणारी असते. न उच्चारलेले शब्द ऐकून जी हवा असलेला भावनिक, मानसिक आधार देऊ शकते ती खरी मैत्रीण !!

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पारसी – लेखक – विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पारसी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पारसी – नुसतं माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून चालत नसतं

🔥 बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं.

🔥 मूळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो. पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच *झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.

🔥 पण हे पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.

असं म्हणतात की ७ व्या शतकात मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती. यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.

🔥 अशीच एका जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातमधल्या “ नवसारी ” इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहोचली. तिथल्या राजासमोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.

🔥 राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे, आता आम्हाला आणखी माणसे नकोत.

🔥 तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या “दुधात थोडासा मध टाकला.” त्याचा अर्थ होता, की आम्ही इथे दुधात मध मिसळल्याप्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खूश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.

🔥 पारसी लोक बुद्धिमान होते, उद्यमी होते. ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.

🔥 ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटिशांच्या “मुंबई” सारख्या “बेटावर” त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला. अनेक पारसी कुटुंबांनी आपलं नाव कमावलं . पैसा कमावला.

🔥 पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली. त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काहीतरी देण्यासाठी वापरला.

🔥 पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणणारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. कॅम्पच्या बऱ्याच भागात हे पारसी वसले. इथलं  आल्हाददायक हवामान त्यांना मानवलं . त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपलं बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.

🔥 पारसींप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले “बगदादचे ज्यू डेव्हिड ससून” हे देखील भारतात आले होते. व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर “जमशेदजी जिजीभॉय” यांनी प्रचंड पैसा कमावला होता. ●यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.●

🔥 पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक “बैरामजी जीजीभॉय” हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या. जीजीभाय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक लहानसं ” वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र “ उभं केलं. त्याला त्यांचंच नाव देण्यात आलं”.

🔥 १८७१ साली स्थापन झालेलं ●हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी. जे. मेडिकल कॉलेज बनलं.●

🔥 एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेगसारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.

🔥 याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या “एडलजी कोयाजी” यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. “वाडियांनी” त्यांना पैशांची मदत केली. तर “सर कोवासजी जहांगीर” व “लेडी हिराबाई” या दांपत्याने जागा दिली. अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिलं .●या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं- जहांगीरच नाव देण्यात आलं.●

🔥 १९४६ साली त्याकाळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात  उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता. याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृदयरोगावर उपचार करायला ” केकी बैरामजी ” हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृदयरोगावरील विशेष उपचारांचे प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी ते आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांचं  एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव ” रुबी हॉल क्लिनिक “ असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले.

अशीच कथा के.ई.एम हॉस्पिटलची.

पुण्याच्या रास्ता पेठेत “सरदार मुदलियार” यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड जात होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी एडलजी यांनी प्रसूतीशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे, म्हणजेच “बानू कोयाजी” यांच्याकडे ही जबाबदारी दिली.

🔥 काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी, मात्र केईएम हे त्यांचं पुढच्या आयुष्यभराचं मिशन बनलं. बानू कोयाजी यांनी केईएमचं कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवलं . त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर कुटुंब नियोजनासारख्या समाजहिताच्या कार्यक्रमांसारख्या, जनजागृती करणाऱ्या अनेक उपक्रमांची त्याला जोड दिली.

🔥 डॉ. बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराचं आणि आपलेपणाचं नाव बनलं. 

आजही ही जहांगीरपासून ते केईएमपर्यंतची अनेक रुग्णालये पुण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या संकटात, मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटल्सनी पुण्याला जगवलं आहे.

🔥 “सायरस पूनावाला” यांच्यासारखे उद्योगपती औषध निर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.

🔥 प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो.  पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली– एक अजरामर पायंडा पाडला.

टिपः माझाच धर्म श्रेष्ठ म्हणून माणसं जगत नसतात…  प्रत्येक धर्मियाचा आदर हेच भारतीयत्व…  Live & Let Live

🔥 रतन टाटा, आदर पूनावाला, डाॕ.बानू कोयाजी, डाॕ.ग्र्ँट, होमी भाभा अशा अनेक पारसीधर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करुन भारताचा नावलौकिक वाढवला आहे.

🔥 आणि कोणत्याही जाती धर्माचा द्वेष हे महान लोक करत नाहीत…बघा जमलं तर विचार करा…….. 

 

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असाही चांगुलपणा… ☆ प्रस्तुती – श्री साहेबराव माने ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ असाही चांगुलपणा… ☆ प्रस्तुती – श्री साहेबराव माने ☆

मुलगी जन्मल्यावर या गावात घडतं काहीतरी फारच वेगळं… विचारात टाकणारं असंही एक गाव.

मुलगी झाली हो! असं ऐकलं की नाकं मुरडली जातात आजही! हो हे अगदी खरं आहे. मुलगी ही देणेकऱ्याचे देणं समजली जाते. मुलगी म्हणजे जबाबदारीच.. परिणामी मुलगी नकोच असा सूर आजही आळवला जातो.

ती इतकी नकोशी होते की तिचं नाव नकुशी ठेवण्यापासून आईच्या गर्भातच तिला मारण्यापर्यंत पावले उचलली जातात. स्त्रीभ्रूणहत्या कायद्याने गुन्हा असूनही समाजातल्या सर्वच स्तरांवर हे कृत्य केले जाते.

यामुळे मुलींचा जनन दर खूप खालावला असून काही वर्षांनी लग्नासाठी मुलगी हवी म्हणून मारामाऱ्या होतील अशी परिस्थिती आहे..यालाही काही अपवाद आहेतच. जे जाणतात मुलगी होण्याचे महत्व आणि स्वागत करतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचे..एक अभिनव परंपरा जपून.

कोण आहेत हे लोक? कोणती परंपरा यांनी सुरू केली? चला तर जाणून घेऊयात— राजस्थानच्या राजसमांड जिल्ह्यातील पिपलांत्री गाव. जे आज जगाच्या नकाशावर ‘इको-फेमिनिस्ट’ गाव म्हणून स्वतःची ओळख मिळवून आहे. त्याच गावात, गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर १११ झाडांचे वृक्षारोपण केले जाते.

भारतासारख्या विकसनशील देशात मुलीचा जन्म हा तिच्या माता-पित्यासाठी जबाबदारीचे ओझे मानला जातो. पण पिपलांत्री गावच्या लोकांनी मात्र मुलीचा जन्म हा आनंदोत्सव मानून साजरा करायला सुरवात केली ती २००६ पासून.

झालं असं की गावचे त्यावेळचे सरपंच शामसुंदर पालिवाल यांची लाडकी कन्या किरण हिचा डिहायड्रेशनने मृत्यू झाला. शोकाकूल पालिवाल परिवाराने तिच्या स्मृतीप्रित्यर्थ गावाच्या वेशीजवळ एक झाड लावले.

त्यानंतर शामसुंदर पालिवाल यांच्या मनात कल्पना आली की गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर हे असे वृक्षारोपण केले तर उत्तमच होईल. साऱ्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन या परंपरेला २००७ मध्ये सुरवात झाली. आज जवळपास एक हजार हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण झाले आहे.

पालिवाल सांगतात जेव्हा ते २००५ मध्ये सरपंच झाले तेव्हा साऱ्या परिसरात संंगमरवरासाठीचे खाणकाम चालू होते. या खाणींमुळे आजूबाजूचे डोंगर, परिसर उजाड झाला होता. पर्यावरणाचे नुकसान होत होते. आधीच कमी असलेल्या पाण्याची टंचाई अजूनच जाणवत होती.

पाण्याअभावी गावचा विकास रखडला होता. त्यातच राजस्थानातील इतर गावांप्रमाणे बालविवाह, मुलींना हीन वागणूक या गोष्टीही गावात होत्या. या मुलीदेखील कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून लहान वयातच मजूरी सारखी कामे करू लागत, ज्यामुळे त्या अशक्तच रहात व लहान वयातच मृत्यू पावत.

त्यातच २००७ मध्ये पालिवाल यांची मुलगी डिहायड्रेशनने मृत्यू पावली. हीच घटना एक नवीन वळण देणारी ठरली. त्याप्रमाणे आता गावात मुलीचा जन्म झाला की हिंदूंमध्ये शुभ मानल्या गेलेल्या संख्येइतकी म्हणजे १११ झाडे लावतात. यामुळे मुलीच्या जन्माचा आनंद तर साजरा होतोच पण पर्यावरणपूरकता ही वाढते. या संपूर्ण परिसरात आता जवळपास ३,५०,००० झाडे आहेत. ज्यात आंबा, उंंबर, चंदन, पिंपळ, बांबू, नीम यांसारखी पर्यावरणपूरक झाडे आहेत. या झाडांमुळे कधीकाळी उजाड,बंजर माळरान झालेली जमीन आज सदाहरीत बनली आहे.

मुलीच्या जन्माप्रित्यर्थ जरी वर्षभर वृक्ष लागवड होत असली तरी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात एका खास उत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यात त्या वर्षभरात जन्मलेल्या मुलींच्या हस्ते वृक्षारोपण होते.

५५०० लोकवस्ती असलेल्या या गावात दरवर्षी सरासरी ६० मुली जन्माला येतात. या मुली आपल्या नावाने लावलेल्या प्रत्येक झाडाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतात. इथे झाडांनाही आपल्या कुटूंबातील घटक समजतात.

इतकेच नाही तर ज्यांना मुली नाहीत असे लोक ही आपल्या पुढच्या पिढीत येवू घातलेल्या मुलींसाठी वृक्षारोपण करतात. हा बदल नक्कीच सुखावह आणि सकारात्मक आहे.

येणारा नवीन सरपंच आणि इतर अधिकारी वर्ग यांना वडाच्या झाडाच्या साक्षीने ही परंपरा पुढे चालू ठेवण्याची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

”राजस्थान हा योद्ध्यांचा देश आहे. पूर्वीच्या वीरांनी परकीय आक्रमणं थोपवली आणि आम्ही रोगराई आणि प्रदूषण यांच्याविरूद्ध लढतो आहोत.” पालिवाल सांगतात.

गेल्या काही वर्षांत पालिवाल यांच्या या योजनेने पर्यावरणपूरक आणि स्त्रीवादी चळवळीने व्यापक रूप घेतले आहे. वृक्षारोपणाबरोबरच नवजात मुलीच्या पालकांना एका शपथपत्रावर सही करावी लागते–ज्यात आमच्या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाही, तसेच तिचे शिक्षण ही पूर्ण करू, अशा अटी समाविष्ट असतात. याबरोबरच मुलीच्या पालकांकडून १०,००० रूपये व उर्वरीत गावातील लोकांच्या जमा वर्गणीतून अशी प्रत्येकी ३१००० रूपयांची दामदुप्पट ठेव पावती प्रत्येक मुलीच्या नावावर ठेवली जाते. मुलगी १८ वर्षांची झाली की ही जमा रक्कम मुलीच्या लग्नासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी दिली जाते. यामुळे स्त्रीभ्रुणहत्या, बालमजूरी,बालविवाह या  वाईट गोष्टींना आळा बसला तर आहेच, पण गावातील मुली चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होण्याची स्वप्नं बघत आहेत

पिपलांत्री गावात रुजलेल्या आणि वाढलेल्या या सदाहरीत जंगलामुळे आता भूजलाच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खाणकामामुळे उजाड बनलेल्या जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. झाडांमुळे वेगवेगळे पक्षी,प्राणी पिपलांत्रीमधे दिसतात. पायातून बागडणारे ससे किंवा दिवसा रस्त्यांवर फिरणारे मोर किंवा वेगवेगळ्या जातींचे पक्षी पिपलांत्रीमध्ये सहज दिसतात. ह्या सांस्कृतिक बदलामुळे स्त्रियांचेही जीवनमान उंचावले आहे. तुम्ही जर सतत काम करत राहिलात तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतातच आणि इतरही त्याच्याशी जोडले जातात हा पालिवाल यांचा अनुभव आहे.

मुलींचा सन्मान व पर्यावरणाचे रक्षण इतकाच या जंगलांच्या निर्मितीमागचा उद्देश नसून त्यातून स्थानिक लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा हाही हेतू होता. प्रत्येकालाच उद्योग किंवा कारखान्यांमध्ये नोकरी मिळेल हे शक्य नाही. त्यामुळे स्वयंरोजगार निर्मिती हाच आमचा उद्देश होता, असं पालिवाल सांगतात.

यात त्यांनी महिलांचे सहकारी बचतगट स्थापन करून त्याद्वारे महिलांना घरगुती पदार्थांचे उत्पादन आणि विक्री यांना प्रोत्साहन दिले जाते. एखाद्याचा मृत्यू झाला तरी ११ झाडांचे वृक्षारोपण केले जाते. या सर्व झाडांची लागवड गावाबाहेरील माळरान व रिकाम्या जागेत केली जाते.

पिपलांत्रीमध्ये वॉटर हार्वेस्टिंग बरोबरच, बंधारे बांधणे, त्यांचे रूंदीकरण तसेच शेततळ्यांची निर्मिती यांचीही कामे केली जातात. जर सरकारी योजनांचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर एकटा माणूसही किती मोठा बदल करू शकतो याचे पिपलांत्री हे उदाहरण आहे.

आज इको-फेमिनिस्ट म्हणून ओळख मिळवलेल्या या गावाला अनेक जण भेट देतात. तसेच पिपलांत्री पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठीही येतात. गावात लग्न होवून आलेल्या मुली,स्त्रियाही  दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून उच्चशिक्षित होतात. राज्यसरकारने पिपलांत्री मॉडेलच्या अभ्यासासाठी गावात एक ट्रेनिंग सेंटरही उभारले आहे, तसेच राहण्याचीही व्यवस्था केली आहे. गावाच्या या कार्याबद्दल गावाचा ‘ राष्ट्रपती पदक ’ देऊन गौरव करण्यात आला आहे. १११ झाडांच्या लागवडीने सुरू झालेली ही चळवळ आज पर्यावरणपूरक जंगलांच्या निर्मितीत बदलली आहे.

जेव्हा परंपरांच्या माध्यमातून एखाद्या उदात्त कार्याची सुरुवात होते तेव्हा ते कार्य नक्की यशस्वी होते. बदल होतो.  फक्त तो होण्याच्या इच्छेने कामाला सुरुवात केली पाहीजे. ह्या शामसुंदर पालिवाल यांच्या उदाहरणावरून हेच सिद्ध होते.

संकलन : श्री साहेबराव माने

पुणे 

9028261973.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print