मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पद्मश्री”… पोस्टाने पाठवा साहेब !… श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

☆  “पद्मश्री”… पोस्टाने पाठवा साहेब !… श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

(एक अफलातून सत्यकथा)

पद्मश्री हलधर नाग

“पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब ! दिल्लीपर्यंत  यायला पैसे नाहीत  “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब ! – पद्मश्री हलधर नाग

ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !

त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत …. “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब !

अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची.

कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी, कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.

आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या “हलधर ग्रंथावली – भाग -2” याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आलाय.

साधाच वेष, शक्यतो पांढरं धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत .

हे  खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधरजीसारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले– तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !

*श्री हलधरजी यांची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर ही पोस्ट करतोय.

ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले. आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधरजी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडावी लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली व त्यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.

*

नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन – पेन्सिल – आणि शालेय वस्तूंच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले.  आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले.

*

आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधरजी यांनी १९९५ च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत “राम शबरी” सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची ही कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाला.

अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधरजी फक्त तिसरीपर्यत शिकलेले , पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट  विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.

त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,

आप किताबो में प्रकृति को चुनते है

पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।

डीडी क्लास : भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधरजी– त्यांच्यासारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. ” सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं ” अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच ही  आजची हलधरजी यांची कहाणी तुम्हापुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो,

काहीही होवो….. रडायचं नाही

तर लढायचं आणि लढून जिंकायचं !

लेखक — धनंजय देशपांडे

 संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हरखचंद सावला..माणसातला देव” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆“हरखचंद सावला..माणसातला देव” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

परळ भागातील प्रसिद्ध टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहून तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दीकडे टक लावून पाहत राहायचा. मृत्यूच्या दारात उभं राहिल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसणारी ती भीती, त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्याने होणारी ती धावपळ पाहून तॊ तरुण खूप अस्वस्थ व्हायचा.

बहुसंख्य रुग्ण बाहेर गावाहून आलेले गरीब लोक असायचे. कुठे कोणाला भेटायचे, काय करायचे हेही त्यांना ठाऊक नसायचे. औषधपाण्यासाठीच नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाही पैसे नसायचे. ते सारे दृश्य पाहून तो तरुण खूप खिन्न मनाने घरी परतायचा. ‘ त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे.’..  रात्रंदिवस त्याने ह्याच विचाराचा ध्यास घेतला.

आणि एक दिवस त्याने त्यातून मार्ग काढलाच.

आपलं चांगलं चाललेलं हॉटेल त्याने भाड्याने दिलं आणि काही पैसे उभे राहिल्यावर त्याने चक्क टाटा हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे २७ वर्षे अविरत सुरु राहील याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती.

कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील असंख्य लोकांना आवडला. सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजन देता देता शंभर, दोनशे, तीनशे अशी संख्या वाढू लागली.  तसे असंख्य हात त्यांच्या सोबतीला येऊ लागले. बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली. कधी हिवाळा,कधी उन्हाळा तर कधी मुंबईतला भयंकर पावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडू शकला नाही. तोपर्यंत दररोज मोफत भोजन घेणाऱ्यांची संख्या ७०० पार करून पुढे गेली होती.

हरखचंद सावला एवढं करूनच थांबले नाहीत. त्यांनी गरजू रुग्णांना मोफत औषधं पुरवायलाही सुरुवात केली.

त्यासाठी त्यांनी औषधाची बँकच उघडली. त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डॉक्टरांची अन सोशल वर्करची टीमच त्यांनी स्थापन केली. कॅन्सरग्रस्त बालरुग्णांसाठी त्यांनी टॉयबँकही उघडली.

आज त्यांनी स्थापन केलेला “जीवन ज्योत” ट्रस्ट ६० हून अधिक उपक्रम राबवत आहे. ५७ वर्षीय हरखचंद सावला आजही त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांच्या त्या अफाट उत्साहाला, त्यांच्या त्या प्रचंड कार्याला शतशः प्रणाम !

२४ वर्षे क्रिकेट खेळून २०० कसोटी आणि शेकडो एक दिवसीय सामने खेळून १०० शतके अन ३० हजार धावा केल्या म्हणून सचिन तेंडूलकरला “देवत्व” बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.

पण २७ वर्षात १०-१२ लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद सावलाना मात्र कोणी ओळखतही नाही—-

आणि त्यांना देवही मानत नाही — ही आहे आपल्या देशातील मीडियाची कृपा. ( विशेष म्हणजे गुगलवर अथक परिश्रम करूनही त्यांचा फोटो सापडला नाही ).

कधी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात, कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात, कधी शिर्डीच्या साई मंदिरात, तर कधी त रुपतीच्या बालाजी मंदिरात… आणि नाहीच  जमलं तर जवळपासच्या मंदिरात जाउन देवाचा शोध घेणाऱ्या त्या करोडो भक्तांना देव कधीच सापडणार नाही. तो आपल्या आजूबाजूलाच असतो. पण आपल्याला मात्र त्याचा पत्ताच नसतो. आपण मात्र वेड्यासारखे कधी बापू, कधी महाराज, कधी बाबा म्हणून त्यांच्या मागे पळत असतो. सगळे बाबा, महाराज, बापू अब्जाधीश होतात आणि आपल्या व्यथा, वेदना, आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत.

गेल्या २७ वर्षात लाखो कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाइकांना मात्र देव सापडला तो हरखचंद सावला यांच्या रुपात.

जसे चारोळी, कविता, जोक, इतर बातम्या लगेच पुढे पाठविता तसेच हे सुध्दा सगळयांना पाठवा. अशा माणसाचा सन्मान झाला पाहिजे. त्यांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे !

माहिती संकलन  : अनामिक

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्रावण महिन्यातील पर्यावरण व्रते” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “श्रावण महिन्यातील पर्यावरण व्रते” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. निसर्ग हिरवा गार, श्रावणाच्या रिमझिम सरी व ईश्वर आराधना याच सोबत, पर्यावरणाशी तादात्म्य राखणे, यासाठी काही व्रते सुचवीत आहे—-

 १-  रोज किमान एका झाडाची निगा राखेन. 

 २-  रोज किमान पंधरा मिनिटे झाडांच्या सानिध्यात राहीन. 

 ३-  श्रावण महिन्यात एक तरी झाड लावीन.  

 ४-  श्रावण महिन्यात एकातरी मित्राला किंवा मैत्रिणीला झाड लावायला प्रवृत्त करेन. 

 ५-  सणानिमित्ताने दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू या पर्यावरण-पूरक आणि पर्यावरणाला अनुकूल ठरतील अशाच देईन. 

   —-(नो प्लास्टिक) 

 ६-  श्रावण महिन्यात एकदा तरी वनविहार करीन.  

 ७-  श्रावण महिन्यात मी वापरलेले सर्व प्लास्टिक एकत्र करीन व महिना संपल्यानंतर त्याचे वजन करीन.  

 ८-  श्रावण महिन्यात किमान अकरा औषधी वनस्पतींची माहिती करून घेईन.  

 ९-  घरातल्या पाणी वापराची समीक्षा करेन- ऑडिट करेन.  

१०-  घरातील खरकटे, भाजीपाला, देठं, इत्यादी कचऱ्यापासून खत करीन.  

११-  खरेदीसाठी खिशात कापडी पिशवी ठेवीन.  

१२-  घराबाहेर असताना कचराकुंडी व्यतिरिक्त  इतरत्र कोठेही कचरा टाकणार नाही.  

१३-  रोज जास्तीत जास्त एक तास मोबाइलचा वापर करेन.  

१४-  व्हाट्सअप फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम इत्यादी दिवसातून फक्त एकदाच पाहिन.

१५-  लिफ्टचा वापर कमी करेन व रोज किमान दोन मजले जिना चढून जाईन.

 

अशीच काही व्रते आपल्याला सुचली तर आपण यात भर घालू शकता. 

व्रत म्हणून या गोष्टी अंगिकारल्या तर त्या सहजपणे रुजतील व त्यांचा कायमस्वरूपी प्रभाव आपल्या जीवनावर राहील.

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पोएम – लेखक – विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पोएम – लेखक – विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

भारताच्या इसरो म्हणजेच Indian Space Research Organisation (ISRO) ने अवकाशात एका नवीन ‘पोएम’ ची सुरूवात केली आहे. पोएम चा इंग्रजी अर्थ हा कविता असा होतो. त्यामुळेच एखाद्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेने अवकाशात पोएम लिहीण्याचा श्रीगणेशा केला हे वाचून अनेक भारतीय बुचकळ्यात पडू शकतात. ३० जून २०२२ ला इसरोच्या रॉकेटने अंतराळात उपग्रहांना त्यांच्या योग्य कक्षेत प्रक्षेपित करताच इसरोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी यशस्वी प्रक्षेपणानंतरच्या भाषणात एक वाक्य म्हटलं, जे खूप अर्थाने महत्वाचं होतं. त्यांचे शब्द होते, 

“Write some poems in orbit” –ISRO Chairman S Somanath. 

राजकीय विषयांवर एकमेकांच्या झिंज्या ओढणाऱ्या, जातीवरून, धर्मावरून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या आणि एकमेकांच्या खाजगी आयुष्यात अतिशय रस असणाऱ्या भारतीयांकडून इसरोच्या चेअरमनचे शब्द कानावर पडणार नाहीत हे सर्वश्रुत होतं. अर्थात ते पडले असते तरी एका कानातून जाऊन दुसऱ्या कानातून बाहेर पडून विसरले गेले असते. पण त्यामुळे त्या शब्दांचं महत्व कमी होत नाही. अमेरिका, चीन, युरोपियन युनियन देशांच्या तगड्या अवकाश संस्थांना मात देताना आणि जे भारतीय इसरोने करू नये यासाठी अमेरिकेने सगळ्या साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला, तेच भारताच्या इसरोने ३० जूनच्या चाचणीत करून दाखवलेलं आहे. यासाठीच इसरोच्या चेअरमनचे शब्द भारतासाठी आणि भारतीयांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. 

तर पोएम म्हणजे नक्की काय? पोएम चा अर्थ होतो PSLV Orbital Experimental Module  (‘POEM’). पोएम समजावून घ्यायला आपल्याला एकूणच रॉकेट कशा पद्धतीने काम करते हे थोडक्यात समजावून घ्यावे लागेल. कोणतेही रॉकेट टप्प्याटप्प्याने उड्डाण करते. या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी इंजिने, फ्युएल आणि इतर तंत्रज्ञानाचा समावेश असतो. ज्याला आपण स्टेज असं म्हणतो. रॉकेटने उड्डाण केल्यावर आपण अनेकदा रॉकेट स्टेज १, स्टेज २, स्टेज ३ आणि स्टेज ४ मधले टप्पे गाठत असताना ऐकलेलं असेल. तर त्याप्रमाणे भारताचे PSLV (Polar Satellite Launch Vehicle) हे ४ टप्प्यांत उड्डाण करते. याचा अर्थ जमिनीवरून उड्डाण करून एखाद्या उपग्रहाला साधारण ४०० ते ६०० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करायला या रॉकेटमध्ये ४ स्टेज वापरण्यात येतात. 

आजवर PSLV (Polar Satellite Launch Vehicle) ने उड्डाण केल्यावर त्याच्या पहिल्या तीन स्टेज आपलं काम पूर्ण झाल्यावर मुख्य रॉकेटपासून विलग होऊन समुद्रात कोसळत होत्या. राहिलेली चौथी स्टेज ही अंतराळात कचरा म्हणून जमा व्हायची आणि कालांतराने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून नष्ट व्हायची. भारताच्या वैज्ञानिकांनी या चौथ्या स्टेजचा वापर आपण करू शकतो का यावर संशोधन सुरू केलं. कारण पृथ्वीपासून लो ऑर्बिट वरून या स्टेज अनेकवेळा पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालून मग नष्ट होत होत्या. मग जर रॉकेटचा भाग म्हणून फुकट अवकाशात प्रक्षेपित झालेली ही स्टेज आपण जर वापरू शकलो तर त्याचे दूरगामी परिणाम आपण साधू शकतो हे भारताच्या म्हणजेच इसरोच्या लक्षात आलं. PSLV हे रॉकेट ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपित करते म्हणजे जे उपग्रह पृथ्वीच्या दक्षिणोत्तर ध्रुवांकडून प्रवास करतात. आपले रिमोट सेन्सिंग उपग्रह, हेरगिरी करणारे उपग्रह, जमिनीवर चालणाऱ्या गोष्टीचं मॅपिंग करणारे उपग्रह याच कक्षेत परिभ्रमण करत असतात. मग जर भारत या आयत्या प्लॅटफॉर्मचा वापर करून घेऊ शकला तर त्याचे आर्थिक आणि सैनिकी परिणाम खूप दूरगामी असणार होते. 

२०१९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या PSLV C ४४ मिशन मध्ये पहिल्यांदा या चौथ्या स्टेजचा वापर करून कलामसॅट व्ही २ या विद्यार्थ्यांच्या उपग्रहाला प्रक्षेपित करण्यात आलं. याचा अर्थ काय होता तर रॉकेटने आपलं मिशन फत्ते केल्यावर संपलेल्या आणि अवकाशात अधांतरी फिरत राहणाऱ्या ४ थ्या स्टेजच्या प्लॅटफॉर्मवर इसरोने हा उपग्रह ठेवलेला होता. लिथियम आयन बॅटरीचा वापर करून त्याची कक्षा योग्य ती करत विद्यार्थ्यांचा हा उपग्रह अवकाशात काम करायला लागला. त्यामुळे इसरोला असे वैज्ञानिक किंवा नमुना म्हणून उपग्रह फुकटात पाठवण्याचा ‘प्लॅटफॉर्म’ मिळाला. लक्षात घेतलं पाहिजे एखादा उपग्रह निर्माण करायला सोपे असते, पण त्याला प्रक्षेपित करण्याचा खर्च हा कैक पटीने जास्त असतो. इसरो इकडे थांबली नाही. नुसत्या बॅटरीवर न थांबता जर यात आपण सौर पॅनल बसवले तर या बॅटरी रिचार्ज होत राहतील आणि आपण अधिक काळ या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकू हे इसरोला लक्षात आलं. 

अश्या पद्धतीने इसरोने आपल्या ४थ्या स्टेजचा वापर करू नये यासाठी अमेरिका दबाव टाकत होती. याचं कारण होतं हा प्लॅटफॉर्म दुहेरी तलवार आहे हे त्यांना चांगलं माहित होतं. जसे याचे आर्थिक आणि वैज्ञानिक फायदे आहेत त्यापेक्षा अधिक सैनिकी फायदे आहेत. भारत उद्या अश्या पद्धतीने अवकाशात मिसाईल स्थापन करू शकतो आणि वेळ पडल्यास तिकडून डागू शकतो. हे अमेरिकेला रुचणार नव्हतं. भारताने आधीच ‘ए सॅट मिसाईल’ ची निर्मिती करून आपण लो अर्थ ऑर्बिट मधील उपग्रह नष्ट करू शकत असल्याची जगाला वर्दी दिलेली होतीच. त्यात आता अवकाशातून अवकाशात किंवा अवकाशातून जमिनीवर मिसाईल डागण्याची क्षमता अशा प्लॅटफॉर्ममुळे भारताला उपलब्ध होणार होती. आपण लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळात अवकाशात युद्धाची बीजे पेरलेली असणार आहेत. अशावेळी भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने इसरोने घेतलेली ही उडी अतिशय महत्वाची होती. 

३० जून २०२२ च्या PSLV उड्डाणात इसरोने यशस्वीरित्या PSLV Orbital Experimental Module  (‘POEM’) अवकाशात स्थापन केलेलं आहे. ज्यात सौर पॅनल बसवलेले होते. उपग्रहाने आपलं काम फत्ते केल्यावर म्हणजे उपग्रह प्रक्षेपित केल्यावर काम संपलेल्या ४थ्या स्टेजच्या टाक्यांना जोडलेले सौर पॅनल उघडले गेले. हा प्लॅटफॉर्म Navigation Guidance and Control (NGC) ने जोडला गेलेला होता. याचा अर्थ होतो की या प्लॅटफॉर्मला आपण पृथ्वीवरून आपल्या हव्या त्या कक्षेत स्टॅबिलाइझ म्हणजेच स्थिर करू शकत होतो. त्याची जागा, कोन, उंची हे सगळं इसरो नियंत्रित करू शकणार होती. तसेच यावर हेलियम गॅस थ्रस्टर बसवलेले आहेत. जे चालवून आपण आपल्याला हवं तिकडे हा प्लॅटफॉर्म नेण्यास सक्षम झालो आहोत. याचा अर्थ जर का आपण यावर एखादं मिसाईल भविष्यात बसवलं तर त्याला आपण आपल्या मर्जीप्रमाणे गरज वाटल्यास शत्रू देशांचे उपग्रह किंवा जमिनीवरील इतर टार्गेट कोणाच्याही लक्षात न येता भेदू शकतो. ३० जूनच्या मिशनमध्ये अजून एक गोष्ट महत्वाची भारताने साध्य केली आहे ती म्हणजे या प्लॅटफॉर्मवर असणारे दोन उपग्रह हे Indian National Space Promotion and Authorization Center (IN-SPACe) च्या माध्यमातून भारतातील खाजगी कंपन्यांकडून बनवलेले होते. दिगंतरा आणि ध्रुव स्पेस या दोन खाजगी कंपन्यांचे उपग्रह या प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत. यातून भारताने एक नवं क्षेत्र भारतीयांसाठी खुलं केलेलं आहे. ज्याप्रमाणे स्पेस एक्स सारख्या कंपनीचा अमेरिकेत उदय झाला त्याच धर्तीवर भारतात खाजगी स्पेस इंडस्ट्री उभी करण्याच्या दृष्टीने ही खूप मोठी मजल आहे. 

PSLV च्या ‘पोएम’ ने एका नव्या क्रांतीची बीजं ३० जून २०२२ च्या उड्डाणात रोवली आहेत. ज्याची फळं येत्या काळात आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळेच इसरोचे चेअरमन एस. सोमनाथ यांचे वाक्य अनेक अर्थाने महत्वाचे ठरते. इसरोचे या यशासाठी अभिनंदन. या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व अभियंते, वैज्ञानिक, कर्मचारी आणि खाजगी कंपन्या त्यांचे कर्मचारी या सर्वांचे आभार. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!   

फोटो शोध सौजन्य :- गुगल, इसरो  ( PSLV सी ५३ आकाशात उड्डाण घेताना ३० जून २०२२ ) 

शब्दांकन :  विनीत वर्तक ©️ (कॉपीराईट आहे.) (साभार) 

माहिती संकलन : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रोड हिप्नोसिस म्हणजे काय..? – डॉ श्रीकांत गुंडावार ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

☆ रोड हिप्नोसिस म्हणजे काय..? – डॉ श्रीकांत गुंडावार ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते. रस्त्यावर वाहन चालवतांना साधारण पणे 2.5 तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते. संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही, परिणाम रोड हिप्नोसिस…  तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचे पहिले कारण आहे.

रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो कोणत्या वेगाने जात आहे, किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही, सहसा टक्कर 140 किमी पेक्षा जास्त वेगाने असते. रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर 2.5 तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी, थोडी विश्रांती घ्यावी, 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे. तसेच वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला वाहन चालवितांना शेवटच्या 15 मिनिटांतील काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि सह प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. रोड संमोहन हे सहसा रात्रीच्या वेळी घडते आणि अशावेळी प्रवासी झोपलेले असतांना परिस्थिती खूप गंभीर होते.

डोळे लागले तर अपघात अटळ आहे, पण डोळे उघडे असतांना मेंदू क्रियाशील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे… सुरक्षित रहा आणि सुरक्षित वाहन चालवा !!

लेख स्रोत सौजन्य: 

डॉ श्रीकांत गुंडावार, रेडिओलॉजिस्ट, पूना.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ टाटा सुमो… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ टाटा सुमो… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

टाटा मोटर्सचे सर्व मोठे पदाधिकारी दररोज दुपारचं जेवण एकत्रच घेत असत, परंतु गेल्या काही दिवसांपासून सुमंत मुळगावकर हे नेमके लंचच्या सुमारास आपली कार घेऊन बाहेर जात आणि लंच संपल्यानंतर लगेच पुन्हा आपल्या कार्यालयात परत येत. 

अशी चर्चा होती की टाटा मोटर्सचे काही डीलर्स त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लंचसाठी बोलावून घेतात. 

एक दिवशी टाटा मोटर्सच्या काही पदाधिकाऱ्यांनी लंच ब्रेकच्या वेळी मुळगावकर यांच्या कारचा पाठलाग केला. मुळगावकरांनी आपली कार एका महामार्गावरील ढाब्यापाशी उभी केली, त्यातून ते खाली उतरले, ढाबेवाल्याला जेवणाची ऑर्डर दिली. टाटा मोटर्सची उत्पादनं वाहून नेणारे ट्रक ड्रायव्हर्स तिथेच  जेवण करीत होते. त्यांच्यासोबत बसून त्यांनी आपलं दुपारचं जेवण घेतलं.  टाटा ट्रक्समध्ये काय चांगलं आहे आणि काय बदलायला हवं याबद्दल त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्या चर्चेचं टिपण तयार केलं आणि मग ते तिथून आपल्या कार्यालयात परतले. हे पाहून हे सर्व पदाधिकारी थक्क झाले होते. मुळगावकर कोणत्या कारणासाठी लंचच्या वेळेस बाहेर जातात हे त्यांना कळलं होतं. या माहितीचा उपयोग करून टाटा ट्रक्स मध्ये कोणत्या सुधारणा करायला हव्यात याचा विचार करून ते टाटा ट्रक्सच्या गुणवत्तेत सुधारणा करीत.

कोणत्याही कंपनीच्या उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कंपनीतर्फे टाटा सुमोची भेट मिळणं हा त्याचा आजही सर्वोच्च सन्मान समजला जातो 

‘सुमो’ या ब्रँड नेम मधील सुमो हे नांव अनुक्रमे सुमंत आणि मुळगावकर या नावांच्या आद्याक्षरांपासून तयार झालंय. 

मुळगावकरांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना सन्मान देणाऱ्या टाटांचंही या निमित्तानं मनःपूर्वक अभिनंदन.

आजपर्यंत सुमो म्हणजे जपानी कुस्तीगीर एवढंच मला माहीत होतं…

लेखक : अनामिक 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रध्वज – लेखक –स्व. वि. दा. सावरकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रध्वज – लेखक –स्व. वि. दा. सावरकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

“ब्रिटिशांचा युनियन जॅक हाच हिंदुस्थानचा ध्वज म्हणून आमच्या भर कॉंग्रेसमधेच मिरविला जाई, जयजयकारिला जाई.  ह्यासाठी स्वतंत्र हिंदुस्थानचा भावी ध्वज कसा असावा ह्याविषयी अभिनव भारतात होणाऱ्या चर्चेची जी एक कल्पना मॅडम कामाबाई आणि हेमचंद्र दास ह्यांना आलेली होती, तिचेच स्वरूप निश्चित करून पॅरिसला चित्रकलानिपुण हेमचंद्र दास ह्यांनी तत्काल एक सुंदर ध्वज चित्रवून दिला. 

तो घेऊन कामाबाई त्या परिषदेला स्टुटगार्ड (जर्मनी)  येथे गेल्या. त्यांची भाषणाची पाळी येताच ब्रिटिशांचे राज्य उलथून पाडून हिंदुस्थान स्वतंत्र करणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या वतीने त्यांनी आपले उद्दीपक भाषण करताकरता मध्ये तो ध्वज काढून, आवेशाने पुढे मागे फडकवीत त्या उद्गारल्या, “behold!! This is the flag of independent India.” हा पहा आमचा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज ! 

त्यासरशी अकस्मात चकित होऊन तेथील सर्व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी उठून त्या ध्वजास मानवंदना 

दिली !!  स्वतंत्र भारताचा जगातील प्रबळ राष्ट्रांच्या मेळाव्यात प्रकटपणे उभारला गेलेला हा पहिलाच राष्ट्रध्वज होय !!!

– स्व. वि. दा. सावरकर

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातला  मुख्य फरक … ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यातला  मुख्य फरक … ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

1)  15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात , तर …   26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात  कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

🇮🇳

2)  15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting)  म्हणतात तर…    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला  जातो. त्याला (flag unfurling)  म्हणतात. 

🇮🇳

3) 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.         तर… 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच, पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.

🇮🇳

4)  15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर * ध्वजारोहण * होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.        

🇮🇳

आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

🇮🇳

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बारीपाडा…भाग -2 ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ बारीपाडा…भाग -2 ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

( तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्‍यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.) –इथून पुढे — 

एखाद्या गावात जैवविविधता किती आहे, म्हणजे किती झाडे, पशु पक्षी, सजीव या परिसरात आढळतात याची नोंद करण्याचा एक मोठा प्रकल्प शासनानं हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे रमेश मुंगीकर मुद्दाम या गावात येवून लोकांशी संवाद साधताना मी पाहिले.

मी त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले की ‘ गेल्या ९ वर्षांपासून अशी नोंद ठेवणारे बारीपाडा हे महाराष्ट्रातले एकमेव गाव आहे. ’ म्हणजे इकडे शासकीय नोंदी ठेवायच्या म्हटलं की भल्याभल्यांची कोण धांदल उडते. शिवाय या नोंदी खोट्या असतात हे तर सांगायची गरजच नाही.

या गावानं तब्बल ११०० एकर जंगल राखलं आहे. सकाळी एका घरात मला चहा पिण्यासाठी बोलावलं. घरच्या माणसानं मला आत,अगदी आत स्वयंपाकघरात येण्यास सांगितलं. त्या छोट्या खोलीत मला वाटलं चहा चुलीवर उकळत असेल. तर तिथे गॅस चालू होता. या गावानं ११०० एकर जंगल राखलं म्हणून यांना विशेष योजनेखाली एलपीजी गॅस सिलेंडर मिळतात.

डॉ. हेडगेवार रूग्णालयातील डॉ आनंद फाटक यांनी या गावात काही वर्षांपूर्वी… अनेक वर्षे आरोग्य सेवा दिली व या बदलाचा ते भाग आहेत….ते आत्ता पण या गावात नियमित भेट देऊन तेथील लोकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय मार्गदर्शन करत असतात.

या गावाच्या या आगळ्यावेगळ्या कहाणीमागचे नायक चैतराम पवार शांतपणे फारसं काहीच न बोलता सर्वत्र फिरून कामं होतं आहेत की नाहीत हे पहात होते. त्यांना काही विचारलं की हसून अतिशय मोजकं बोलून ते पुढे कामाला निघून जायचे.

वनभाज्यांच्या पाककला स्पर्धेसाठी जवळपासच्या भागातून हजार एक नागरिक तिथे जमा झाले होते. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून या गावाने ३० रूपये इतके अल्प शुल्क आकारले होते.

चैतराम पवारांच्या मागे रांगेत उभे राहून आम्हीही ही ३० रूपयांची कुपनं घेतली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे शुटिंग करायला आलेले ‘ एबीपी माझा ‘ चे मिलींद भागवत आणि त्यांच्या सगळ्या टिमनेही कुपनं घेतली.

नागलीची भाकरी, तुरीचे वरण, तेर नावाची वनभाजी व त्या भागातील प्रसिद्ध इंद्रायणी तांदूळाचा सुवासिक भात असं जेवण सगळ्यांसाठी तिथल्या बायकांनी शिजवलं होतं.

कार्यक्रम आटोपला. स्पर्धा संपली. मांडव काढत असताना जवळच्या आंब्याखाली आम्ही बसून होतो. जवळच तिथले गावकरी स्त्री पुरुष बसून दिवसभराचा सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेत होते.

एकूण ४०७ लोकांनी कुपनं घेतली आणि ताटं मात्र ५०० च्या पुढे गेली होती. कुपनं न घेता कोण जेवलं असं मी विचारता ते गावकरी लाजले आणि काही बोलेचनात. मला वाटले गावातीलच काही लोक, कार्यकर्ते असतील. पण मला कळले की गावातील एकही माणूस जेवायच्या ठिकाणी आला नव्हता. ते तर बिचारे आपल्या घरीच जेवले होते. कुणीच काही सांगेना.

मला दिवसभर साथ करणार्‍या तरूण मुलाला मी जरा बाजूला घेतले. हळू आवाजात विचारले, ‘ काय रे कुणीच काही सांगेना, कोण होते हे फुकटे जेवणारे ?’

त्या पोरानं जे उत्तर दिलं, त्यानं अन्नसुरक्षेच्या भिकेची खरी गरज कुणाला आहे हे अगदी स्पष्टपणे उघड झालं.

तो पोरगा म्हणाला, ‘अहो साहेब, हे जे शासनाचे लोक आले होते ना, वन विभागाचे, पोलिसांचे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे, जे लाचखोरी करतात, तसेच महाविद्यालयातले प्राध्यापक ज्यांना सातवा वेतन आयोग मिळतो, ते सगळे फुकट जेवून गेले.’

ज्याला गरीब समजून त्याच्यासाठी कळवळा दाखवला जात आहे तो सामान्य गरीब आदिवासी अतिशय स्वाभिमानी आहे.

तो कधीही भीकमाग्या योजनांची मागणी करत नाही. पण या गरिबांचा कळवळा दाखवून ज्यांना आपली पोटं भरायची आहेत त्यांनीच या योजना आणल्या आहेत हे या गावानं काहीच न बोलता आपल्या कृतीनं दाखवून दिलं….

असं हे बारीपाडा गाव,  ता. साक्री जि. धुळे

— समाप्त —

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बारीपाडा…भाग -1 ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ बारीपाडा…भाग -1  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

वाचाच अन् लाजाही थोडं …

श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात?

जे लोक दिवस भरात २००रु ची दारु ३००रु ची कोंबडी फस्त करतात त्यांनी ?

बारीपाडा हे महाराष्ट्रातले एक छोटेसे गाव (ता. साक्री, जि. धुळे). पलीकडे गुजरातचा डोंगराळ डांग जिल्हा पसरलेला.

मागील महिन्यात शासन जेव्हा अन्नसुरक्षेच्या ‘भिकमाग्या’ विधेयकाची तयारी करत होतं तेव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात १०० च्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी वस्त्यांमधील स्त्रियांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहित नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या.

एका म्हातार्‍या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयकाबाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली….

मी परत विचारल्यावर तिने साधा प्रश्न केला…. ‘ काय देवून राहिले भाऊ त्यात? ’

मी आपलं पोपटपंची केल्याप्रमाणे, ‘ १ रूपयाला ज्वारी/बाजरी, २ रूपयाला गहू, ३ रूपयाला तांदूळ ’ असं सांगितलं.

ती म्हातारी हसून म्हणाली, ‘ ज्वारी आमी खाईना, गहू बी जमत नाई.’ मला वाटले आता हिला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील.

मी म्हणालो, ‘तांदूळ खाता ना तुम्ही?’

तिने मान डोलावली….. ‘ मग हा तांदूळ तूम्हाला मिळंल की खायला ’….मी.

म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली. ‘ त्यो तसला तांदूळ आमी खाईना.’

मला कळेना शासनाच्या या भिकमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे?

मग मला बाजूला उभ्या असलेल्या एका तरूण पोरानं समजावून सांगितलं… ‘ साहेब, यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबेमोहोरासारखा घमघम वास येतो. त्याचं नाव इंद्रायणी. हा तांदूळ हे लोक शेतात स्वत:पुरता घेतात. बाहेर फारसा विकतही नाहीत.’

मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हिला शासनाचा तांदूळ नको.

मग मी त्या तरूणाला विचारले… ‘ गावात इतर गोर गरीब असतील ना. त्यांना तर हे अन्न फायद्याचे ठरेल.’

त्या तरूणाने मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेले. अतिशय चांगले बांधलेले सभागृह. तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते. त्यात गावची लोकसंख्या, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, असली बरीच माहिती होती. एका मोलाच्या माहितीकडे त्याने माझे लक्ष वेधले. त्याने काहीही न बोलताही माझे डोळे खाडकन उघडले.

तिथे लिहीलं होतं…. ” दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शून्य “.

या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही, ग्रामपंचायतीचे सभागृह, शाळेच्या खोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही, तिथे हे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दरिद्री नाही.

— म्हणजे तिकडे दिल्लीला ‘ सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भुकेने मरत आहे. त्याला कसे जगवले पाहिजे, ’ असं सर्व नेते सांगत आहेत. आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही.

गावात ४ थी पर्यंत शाळा. शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं. शाळेत रजा न देता गैरहजर राहणार्‍या शिक्षकाला गावानं ५००० रूपयाचा दंड ठरवून दिला आहे. परिणामी इथे नौकरी करायला दांडीबहाद्दर मास्तर घाबरतात. गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते. व्यवस्थित नाल्या काढलेल्या. कुठेही घाण कचरा साठलेला नाही.

अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवलेले. सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली.

मी विचारले, ‘ याची काय गरज? ’

माझ्या सोबतचा तरुण पोरगा म्हणाला… ‘ कुनीबी फोन लावून इचारू शकते ना भाऊ.’

म्हणजे इकडे दिल्लीला संसदेत विरोधी पक्षांनी गोंधळ घालावा म्हणून सत्ताधारीच प्रयत्न करतात. कारण काय तर गोंधळात महत्त्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात. चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचूप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर. तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्‍यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.

क्रमशः… 

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print