ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १९ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

कॅ. गोपाळ गंगाधर लिमये (२५सप्टेंबर१८८१  ते १९ नोहेंबर १९७१ ) हे कथाकार आणि विनोदी लेखक होते. ते व्यवसायाने डॉक्टर. वैद्यकीय परीक्षेत त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. ’इंडियन मेडिकल सर्व्हिस’ साठी त्यांची १९१८ साली कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. ३वर्षे त्यांनी सैन्यात काम केले. १९२२ पासून ते मुंबई महानगर पालिकेत आरोग्याधिकारी होते.

१९१२ मध्ये त्यांची पहिली कथा मासिक मनोरंजन मध्ये प्रकाशित झाली. कथेचा नाव होतं ‘प्रेमाचा खेळ.’ ’बापूंची प्रतिज्ञा’ ही विनोदी दीर्घ कथा पुस्तक रूपात प्रकाशित झाली. वनज्योत्स्ना हेही त्यांच्या दीर्घ कथेचे पुस्तक. तिच्याकरिता, हेलकावे हे त्यांचे कथा संग्रह. कॅ. गो. गं. लिमये यांच्या निवडक कथा हे पुस्तक राम कोलारकर यांनी संपादित करून प्रसिद्ध. केले.

कथेइतकेच मोलाचे कार्य त्यांनी विनोदाच्या क्षेत्रात केले. विनोद सागर, जुना बाजार, गोपाळकाला, तुमच्याकरता विनोदबकावली, इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे विनोदी लेखन लोकप्रिय झाले कारण त्यांचे सूक्ष्म अवलोकन. साध्या साध्या घटनातून त्यांनी विनोद निर्मिती केली. त्यांच्या विनोदात कधीही बोचरा उपहास नसे.

‘सैन्यातील आठवणी’ हे त्यांचे आत्मनिवेदनात्मक पुस्तक. याशिवाय त्यांनी वैद्यक, सुश्रुषा यावरही पुस्तके लिहिली आहेत.

या महान लेखकाला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २.इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १८ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

काही महिन्यांपूर्वीच म्हणजे 28/8/2021 ला ज्यांचे निधन झाले त्या आनंद अंतरकर यांचा आज जन्मदिन.(1941)

हंस, मोहिनी आणि नवल ही मासिके मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय.या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर.त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंद अंतरकर यांनी या मासिकांचे संपादन केले.या मासिकांतून त्यांनी गूढ,विज्ञान,संदेह,रहस्य अशा वेगळ्या वाटेवरील साहित्याला प्राधान्य दिले.हंस चे अनेक अंक हे अनुवाद विशेषांक होते तर मोहिनीने रसाळ विनोदाची मोहिनी घातली.

श्री.आनंद अंतरकर यांनी संपादकीय जबाबदारी बरोबरच साहित्य निर्मितीत ही यश संपादन केले.घूमर,झुंजूरवेळ,रत्नकीळ,सेपिया,एक धारवाडी कहाणी ही त्यांची साहित्य संपदा.सेपिया ही व्यक्तीचित्रे आहेत तर  एक धारवाडी  कहाणी हे पुस्तक अनंत अंतरकर आणि सुप्रसिद्ध कथा लेखक जी.ए.कुलकर्णी यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारावर आधारीत आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हणमंत नरहर जोशी, अर्थात “काव्यतीर्थ” कवी सुधांशु

इथेच आणि या बांधांवर, भुलविलेस साजणी, या धुंद चांदण्यात तू  यासारखी भावनांनी ओथंबलेली भावगीते आणि गुरूदत्त पाहिले कृष्णातिरी, दत्त दिगंबर दैवत माझे, देव माझा विठू सावळा, या मुरलीने कौतुक केले, स्मरा स्मरा हो दत्तगुरू ही भक्तीरसपूर्ण अवीट गीते ज्यांच्या  एकाच लेखणीतून पाझरली असा शब्दांचा पुजारी म्हणजे काव्यतीर्थ सुधांशु !

हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा आज स्मृतीदिन. (1917). तरूण वयातच त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला.गीत दत्तात्रेय या त्यांच्या गीतांचा कार्यक्रम लोकप्रिय झाला होता. आपल्या मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी त्यांच्या गावी औदुंबर येथे साहित्य संमेलन भरवण्यास प्रारंभ केला. पहिले संमेलन 1939 ला मकर संक्रांतीला आयोजित करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी संक्रांतीला हे संमेलन भरत आले आहे.पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते महामहोपाध्याय दत्तो  वामन पोतदार.अशाच नामवंतांची परंपरा पुढे चालू राहिली आहे. साहित्य क्षेत्रातील या कार्याव्यतिरिक्त सुधांशु यांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता. खादीचे कपडे व खांद्यावर एक शाल असा त्यांचा साधा पेहराव होता. आपल्या परिसरात त्यांनी ग्रामसुधारणेचे अनेक प्रयोग यशस्वी केले.

कवी कुंजविहारी यांनी त्यांना सुधांशु हे नाव बहाल केले. श्री शंकराचार्यानी त्यांना ‘काव्यतीर्थ’ ही उपाधी दिली. 1974मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ ने गौरविले. वाराणसी विद्यापीठाने त्यांना डी.लीट्. पदवी प्रदान केली. मराठी साहित्य परिषदेने त्यांना कवी यशवंत पुरस्कार दिला. तर समस्त सांगलीकरांच्या  वतीने त्यांना ‘सांगलीभूषण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

सुधांशु यांचे पद्य लेखन:

कौमुदी, गीतदत्तात्रय, गीत सुगंध, गीतसुधा, जलवंती, झोपाळा, भावसुधा, यात्री, विजयिनी, स्वर इ.

त्यांचे गद्य लेखन:

खडकातील झरे(कथा), दत्तजन्म(एकांकिका), चतुरादेवी, सुभाष कथा(बालसाहित्य) इ.इ.

या भावुक सत्वशील कवीस सादर वंदन! ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:   विकीपीडिया, मराठी विश्वकोश, मराठी सृष्टी, बाइटस्ऑफइंडिया

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १७ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज १७ नोव्हेंबर :–

फक्त ’ साहित्यिक ‘ एवढीच उपाधी ज्यांच्यातल्या जन्मजात चतुरस्त्र लेखकासाठी खरोखरच अपुरी वाटते, अशा श्री. रत्नाकर मतकरी यांचा आज जन्मदिन. 

( १७/११/१९३८ — १८/५/२०२० ) 

नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य, अशा साहित्य-विश्वातल्या अनेक महत्वाच्या प्रांतांमध्ये, आश्चर्य वाटावे इतकी भारावून टाकणारी मुशाफिरी करता-करता, त्यांनी स्वतःतला साहित्यिक तर कायम उत्तम तऱ्हेने जोपासलाच, पण त्याचबरोबर, स्वतःमधला एक सृजनशील दिग्दर्शक, निर्माता, रंगकर्मी, आणि उत्तम चित्रकारही सतत कार्यरत राहील, आणि स्वतःच्या साहित्याइतकाच रसिकांना कमालीचा आनंद देत राहील, याची रसिकांना खात्री पटवून दिली. 

मालिका-चित्रपट यासाठी लेखन आणि दिग्दर्शन, वृत्तपत्रांमध्ये वैविध्यपूर्ण सदरलेखन, कथाकथन,  असे सगळे करत असतांनाच, ‘ माध्यमांतर ‘ हा एक अवघड लेखन- प्रकारही श्री मतकरी यांनी अगदी लीलया पेललेला आहे. या प्रकाराबद्दल थोडक्यात असे सांगता येईल की, एखादी साहित्यकृती रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेले माध्यम बदलून, दुसऱ्या वेगळ्या माध्यमातून ती सादर करणे — जसे की एखाद्या कथेचे नाटकाच्या माध्यमातून , किंवा एखाद्या नाटकाचे चित्रपटाच्या माध्यमातून मूळ माध्यमाइतक्याच सशक्तपणे सादरीकरण करणे. या कामांमधूनही  त्यांचे लेखन-कौशल्य दिमाखदारपणे रसिकांसमोर आलेले आहे. दर्जेदार गूढकथा-लेखक ही त्यांची ओळख वाचकांना वेगळेपणाने करून देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. 

त्यांनी केलेले अतिशय महत्वाचे आणि आवश्यक काम हे, की त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. स्वतः उत्तम बालनाट्ये लिहिली. आणि नुसते लिहून न थांबता, स्वतः खर्च करून त्या नाटकांची निर्मितीही केली. हा सगळा उद्योग त्यांनी जवळजवळ तीस वर्षे अगदी मनापासून पेलला. त्यासाठी ‘ बालनाट्य ‘ ही स्वतःची नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली होती. “ झोपडपट्टीतील मुलांना त्यांच्यामुळे ‘ नाटक ‘ हा आनंददायक प्रकार फक्त कळलाच नाही, तर स्वतःला तो शिकताही आला, “ असेच अगदी सार्थपणे म्हणता येईल. 

‘ बालनाट्य ‘, आणि ‘ सूत्रधार ‘, या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माते, या सगळ्या भूमिका तर त्यांनी समर्थपणे सांभाळल्याचं, आणि बरेचदा त्या नाटकांमध्ये नट म्हणूनही काम केले. दूरदर्शनवरील ‘ शरदाचे चांदणे ‘, ‘ गजरा  ‘ अशा कार्यक्रमांचे सादरकर्ते,  म्हणूनही त्यांची रसिकांना ओळख होती. दूरदर्शनवर लोकप्रिय ठरलेल्या ‘ गहिरे पाणी ‘, अश्वमेध ‘, ‘बेरीज वजाबाकी ‘, या मालिकांचे लेखन श्री. मतकरी यांनीच केलेले होते. 

उत्तम चित्रकार, प्रभावी वक्ते, याबरोबरच श्री. मतकरी यांची आवर्जून सांगायलाच हवी अशी एक ओळख म्हणजे, ‘ नर्मदा बचाओ आंदोलन ‘, ‘ निर्भय बनो आंदोलन ‘ अशामधला त्यांचा सक्रिय सहभाग. 

त्यांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे काम पाहता, “ श्री रत्नाकर मतकरी म्हणजे चौफेर कर्तृत्व “ असेच म्हणायला हवे. 

बावीस नाटके, अनेक एकांकिका, तेवीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह , आणि या विपुल लेखनाबरोबरच, आपल्या रंगभूमीवरच्या कामाचा सखोल विचार करणारा “ माझे रंगप्रयोग “ हा आत्मचरित्रात्मक ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे.

रत्नाकर मतकरी यांचे एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्व, त्यांचे एकूण लेखन, या विषयांवरच्या त्यांच्या मुलाखती, हा पहिला भाग;; त्यांच्या कथा, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका, लेख, कविता, पत्रे अशा साहित्यप्रकारांचा समावेश असणारा दुसरा भाग,; इतर मान्यवरांना मतकरी कसे वाटतात हे सांगणारा तिसरा भाग; आणि त्यांच्या संग्रहित आणि असंग्रहित अशा संपूर्ण साहित्याचा आणि नाट्यप्रयोगांचा तपशील देणाऱ्या दीर्घ सूचीचा चौथा भाग; अशा चार भागात त्यांचा  “ रत्नाक्षरं “ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्यांची सगळीच पुस्तके इतकी लोकप्रिय झालेली आहेत, की त्यातल्या कोणत्या मोजक्या पुस्तकांचा इथे उल्लेख करावा हा मोठाच प्रश्न मला पडला आहे. 

श्री मतकरी यांना कितीतरी पुरस्कार देऊन अनेकदा गौरवले गेलेले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ज्योत्स्ना भोळे पुरस्कार, २१ पुस्तकांना साहित्य पुरस्कार, ‘ माझं घर माझा संसार ‘ या चित्रपटाच्या उत्कृष्ट पटकथेसाठी  दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन अमेरिका याचा विशेष साहित्य-गौरव पुरस्कार, साहित्य अकादमी बाल -साहित्य पुरस्कार, उद्योग भूषण पुरस्कार, केंद्रशासनाची ‘ सामाजिक जाणिवेचा ज्येष्ठ रंगकर्मी ‘ म्हणून २ वर्षांची शिष्यवृत्ती, हे त्यापैकी काही पुरस्कार. २००१ साली पुण्यात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

मराठी साहित्य-शारदेला इतक्या विविध आणि सुंदर अलंकारांचा साज चढवणाऱ्या श्री रत्नाकर मतकरी यांना आजच्या जन्मदिनी अतिशय आदरपूर्वक विनम्र प्रणाम ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १६ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

कालची पहाट उगवली, ती अतिशय दु:खद बातमी घेऊन. आपल्या अमोघ वाणीने शिवशाहीचे साक्षात दर्शन घडवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या चाहत्यांना वाटत होते, बाबासाहेब नाबाद सेंच्युरी पूर्ण करून पूढील वाटचाल सुरू करणार, पण ईश्वरेच्छा बलीयसी हेच खरं!’शिवचरितराच्या रूपाने घराघरात पोचलेल्या बाबासाहेबांचा जन्म २९ जुलै १९२२चा. बाबासाहेबांना महाराष्ट्र सरकारने २०१५ मधे ‘महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केले. ‘जाणता राजा’ या महानाट्याने त्यांना जगभरात लोकप्रियता मिळवून दिली. शंभरीठी त्यांच्या वाणीतला जोश आणि उत्साह कायम होता. ई- अभिव्यक्तीचे लेखक श्री. प्रमोद वर्तक यांनी सार्थपणे म्हंटले आहे,

रडू कसळले गड किल्ल्यांना, हरपला तारणहार तयांचा

आज सर्वां सोडून गेला, कर्ता धर्ता शिवचरित्राचा.

तो शिवशाहीर स्वर्गी गेला, राजांचरणी सेवेस रुजू झाला.

शिवशाहीरांच्या निधनाने, इतिहास पोरका झाला.

या शिवशाहीरांच्या स्मृतीस आज विनम्र अभिवादन.?

☆☆☆☆☆

१६ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे जन्मलेले डॉ. निर्मलकुमार फडकुले जसे संतसाहित्याचे आभासक होते, तसेच ते परिवर्तनवादी विचारसरणीचे अध्वर्यू होते. ते ललित लेखक होते आणि समीक्षकही होते. ते उत्तम वक्ते होते. त्यांच्या वक्तृत्वाला  एक वेगळाच डौल होता. त्यांच्या व्याख्यानात चिंतनशीलता, वैचारिकता आणि सौंदर्य यांचा सुरेख मेळ होता.  त्यांचे वडील पंडीत जीनशास्त्री, हे सस्कृत भाषेचे मोठे विद्वान होते.

डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा लोकहितवादी : काल आणि कर्तृत्वहा संशोधनाचा प्रबंध होता. नांदेड आणि नंतर सोलापूरयेथील संगमेश्वर कोलेज येथे त्यांनी अध्यापन केले. त्यांनी ललित लेखन केले, त्याचप्रमाणे संतसाहित्यावरही विपुल लेखन केले.

अमृतकण कोवळे , अश्रूंची कहाणी,आनंदाची डहाळी, कल्लोळ अमृताचे, काही रंग काही रेषा, चिंतनावच्या वाटा , परिवर्तनाची चळवळ, मन पाखरू पाखरू, , संतकवी तुकाराम: एक चिंतन, संत साहित्य आणि समकालीन संतांच्या रचना, संत साहित्य: सौंदर्य आणि सामर्थ्य, साहित्यातील प्रकाशधारा, सुखाचा परिमळ,हिरव्या वाटा इ. त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. त्यांची स्वतंत्र अशी २८ पुस्तके आहेत व ११ पुस्तके त्यांनी संपादित केलीत.

डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी आंबेडकर , कवी कुंजविहारी, ना.सी. फडके, प्र.के. अत्रे,  म. फुले, सावरकर यांच्यावर दिलेली व्याख्यानेही लिखित स्वरुपात प्रकाशित आहेत.

डॉ. निर्मलकुमार फडकुले यांना साहित्य समेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही अनेक वेळा मिळाला आहे. राष्ट्रीय बंधुता समाज साहित्य संमेलन, जैन साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन इ. साहित्य संमेलनानचे ते अध्यक्ष होते.

डॉ. निर्मलकुमार फडकुले यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा, आचार्य कुंदकुंद, विद्यानंद साहित्य, प्रज्ञावंत, चरित्र चक्रवर्ती, भैरूरतन दामाणी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण जीवनगौरव इ. पुरस्कार मिळाले आहेत.  

त्याचप्रमाणे डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानतर्फेही २००७ पासून दरवर्षी साहित्य व समाजासेवेतील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतो.

राज्य मराठी विकास संस्थेचे ते काही काळ संचालक होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्यावर साहित्य: सामाजिक अनुबंध हा गौरव ग्रंथ तयार करण्यात आला आहे. सोलापूरयेथील एका सभागृहाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

. . या महान लेखकाला आणि वक्त्याला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २.इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

 

? १५ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

मंगेश तेंडुलकर:

विज्ञानशास्त्राचे पदवीधर असलेले श्री.मंगेश तेंडुलकर कलेच्या शास्त्राचेही उत्तम जाणकार होते.म्हणून तर आपल्या कुंचल्याच्या फटका-याने शब्दांविनाही बरच काही सांगून जाणारे  तेंडुलकर एक लोकप्रिय व्यंगचित्रकार, साहित्यक्षेत्रातही आपला ठसा उमटवून गेले. केवळ व्यंगचित्रच नव्हे तर विनोदी लेखन,ललित लेखन ,नाट्य समीक्षा असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे.याहून वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ते एक उत्तम वाचक होते.वाचनाला वय,वेळ काळाचे बंधन नसते अशी त्यांची धारणा होती.

त्यांनी पहिले व्यंगचित्र 1954मध्ये काढले.त्यांच्या साहित्य संपदेपैकी भुईचक्र,रंगरेषा व्यंगरेषा हे आत्मचरित्र,संडे मूड हा 53 लेख व व्यंगचित्रांचा संग्रह या काही प्रमुख कलाकृती.

त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं.वि.जोशी पुरस्कार,अ.भा.नाट्य परिषदेचा वि.स.खांडेकर पुरस्कार,व्यसनमुक्ती प्रसारासाठी  राज्य शासनाचा पुरस्कार,मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले होते.

15/11/1936 हा त्यांचा जन्मदिवस .त्यांचे निधन 2017मध्ये झाले असले तरी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते अजरामर झाले आहेत.

शिरीष पै– 

कथा,कादंबरी,नाट्य,ललित,अनुवाद असे विविध प्रकारचे लेखन केले असले तरी शिरीष पै प्रामुख्याने कवयित्री म्हणूनच लक्षात राहतात.याचे कारण म्हणजे 1975 साली त्यांनी ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी  काव्यप्रकार प्रथम मराठीत आणला व रूजवला.त्यांचे स्वतःचे  अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.सुप्रसिद्ध साहित्यिक कै.आचार्य अत्रे यांच्या  त्या कन्या.सुरूवातीला त्यांनी  अत्रे यांच्या दैनिक मराठा मध्ये पत्रकार म्हणून काम केले.नंतर नवयुग साप्ताहिकाच्या साहित्य पुरवणीचे संपादनही त्यांनी केले.पुढे त्या मराठा च्या संपादिकाही झाल्या.सुमारे 25 वर्षे त्या वृत्तपत्र व्यवसायात कार्यरत होत्या.

त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहील्या.त्या अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नवयुग या साप्ताहिकामध्ये भरपूर संधी दिली.कवितांचे नाट्यपूर्ण सादरीकरण हे त्यांचे आणखी एक  वैशिष्ट्य.

14 कथासंग्रह , 20हून अधिक काव्य व हायकू संग्रह,कादंबरी,आत्ममकथन अशी विपुल साहित्य संपदा त्यांनी निर्माण केलेली आहे.त्यापैकी काही :

कविता संग्रह- अंतर्यामी,आईची गाणी,आव्हान,ऋतुचित्र,एकतारी,कस्तुरी,हायकू इ.

ललित–  अनुभवांती,आजचा दिवस,आतला आवाज, खायच्या गोष्टी इ.

कादंबरी– आकाशगंगा,लालन बैरागीण..

कथासंग्रह– उद्गारचिन्हे,कांचनबहार,खडकचाफा,  प्रणयगंध इ.

नाटक– कळी एकदा फुलली होती,झपाटलेली

आत्मकथन– वडिलांचे सेवेसी

प्राप्त पुरस्कार–

वडिलांचे सेवेसी ,मी माझे मला आणि ऋतुचित्र या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार.

एका पावसाळ्यात  ला कवी केशवसुत राज्य पुरस्कार.

हायकू निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार.

प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ज्योत्स्ना देवधर,शरदचंद्र आणि अक्षरधन साहित्य सेवा पुरस्कार.

आज त्यांचा जन्मदिन.त्यांची एक काव्यरचना वाचूया ‘कवितेचा उत्सव’ मध्ये.

सुहास शिरवळकर —

‘ टिक टिक वाजते डोक्यात’

अजून कानात घुमतय ना  ‘ दुनियादारी ‘ मधलं हे गीत.

प्रचंड गाजलेला हा चित्रपट ज्या दुनियादारी या कादंबरीवर आधारीत होता त्या कादंबरीचे लेखक श्री सुहास शिरवळकर यांचा आज जन्मदिन!त्यांच्या लेखनाची सुरूवात रहस्यकथा लेखनाने झाली.1974 ते 1979 या काळात त्यांनी सुमारे 250रहस्यकथा लिहिल्या.पण त्यानंतर ते सामाजिक विषयावरील  कादंबरी लेखनाकडे वळले. रहस्यकथा, लघुकथा, बालकथा,कादंबरी, नभोनाट्य,एकांकिका असे विपुल लेखन त्यांनी केले.

त्यांच्या साहित्यापैकी अतर्क्य,अनुभव,असीम,ऑर्डर ऑर्डर,कणाकणाने,कल्पांत,कोवळीक,दुनियादारी, प्राणांतिक,मर्मबंध,कथापौर्णिमा,इथून तिथून  शिवाय स्वर्गावर स्वारी, गर्वहरण, मुर्खांचा पाहुणचार हे बालसाहित्य प्रसिद्ध आहे.

विनोबा भावे —-

थोर स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी विचारवंत लेखक विनायक नरहरी भावे म्हणजेच सर्वांचे परिचित असे विनोबा भावे यांचा आज स्मृतीदिन! (1982).

त्यांचे शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यापीठात,बडोदा येथे झाले.पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त त्यांचे अफाट वाचन,चिंतनशिलता यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व घडत गेले.

त्यांच्या साहित्यापैकी काही प्रमुख कलाकृती म्हणजे अष्टादशी,मधुकर,ईशावास्यवृत्ति,गीताई,गीता प्रवचने,उपनिषदांचा अभ्यास ,निवडक मनुस्मृती ,लोकनीती,साम्यसूत्रे या आहेत.

त्यांना रेमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त झाला होता.तसेच त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

साभार: विकीपीडिया 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १४ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज १४ नोव्हेंबर :==

“ मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका “ अशा शब्दात ज्यांचे वैशिष्ट्य सांगितले जायचे, त्या लेखिका श्रीमती पद्मजा फाटक यांचा आज जन्मदिन. ( १४/११/१९४२ – ६/१२/२०१४ ). वयाच्या २२-२३ व्या वर्षांपासून ‘ स्त्री ‘, ‘ वाङ्मयशोभा ‘ अशा तेव्हाच्या लोकप्रिय मासिकांमधून पद्मजाताईंनी लेखनास सुरुवात केली. आणि विविध प्रकारचे लेखन केले. त्यांनी वीसेक पुस्तके लिहिली, त्यातील काही सांगायची झाली तर — ‘ आवजो ‘ हे प्रवासवर्णन, ‘ चमंगख- चष्टिगो’, चिमुकली चांदणी ‘ असे बालसाहित्य, ‘ बापलेकी ‘ या नावाने संपादित आत्मकथने ज्यात अन्य दोन संपादिकांचाही सहभाग होता, ‘ बाराला दहा कमी ‘ या नावाने विज्ञानकथा, ‘ सोव्हेनियर ‘ आणि ‘ हॅपी नेटवर्क टु यू ‘ हे अमेरिकन जीवनावरील लेख, ‘ हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी ‘ ‘ हे आत्मकथन ज्यावर ‘ मजेत ‘ असे स्वतःचे टोपणनाव त्यांनी लिहिले होते, आणि या सगळ्याच्या जोडीने, ‘ गर्भश्रीमंतीचे झाड ‘, ‘ दिवेलागणी ‘, ‘ माणूस माझी जात ‘, ‘ राही ‘, अशी त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित झालेली होती. ‘ पुरुषांच्या फॅशन्स ‘ या विषयावर स्त्री मासिकासाठी त्यांनी केलेले लेखन विशेषत्वाने सांगायला हवे. या वैविध्यपूर्ण साहित्यिक मुशाफिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे ५ पुरस्कार, इतर अनेक पारितोषिके, सन्मान, शिष्यवृत्ती असे गौरव प्राप्त झाले होते. ‘ बाराला दहा कमी ‘ ही विज्ञानकथाही विशेष पुरस्कारप्राप्त ठरली होती. 

याच्या जोडीनेच, दूरदर्शनवरील “ सुंदर माझं घर “ आणि “ शरदाचं चांदणं “ या कार्यक्रमाच्या निवेदिका म्हणूनही त्यांनी काम केले होते. 

श्रीमती पद्मजा फाटक यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी मनःपूर्वक प्रणाम ?

☆☆☆☆☆

बालसाहित्यिक, सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबरीकार, कथाकार, व्याख्याते, संपादक, मुद्रक, प्रकाशक अशा विविध भूमिका समर्थपणे पेलत ख्यातनाम झालेले लेखक श्री. — नारायण हरी तथा ना. ह.आपटे  यांचा आज स्मृतीदिन. ( ११/७/१८८९ – १४/११/१९७१ ) 

काही ऐतिहासिक आणि इतर सामाजिक, अशा जवळपास ६० कादंबऱ्यांसह श्री आपटे यांची ग्रंथ-संपदा सुमारे १०० इतकी लक्षणीय आहे. काहीही झाले तरी इंग्रजांची नोकरी करायची नाही, या निश्चयाने त्याकाळी ज्या काही लोकांनी इतर कामं करून हिम्मतीने संसार केला त्यापैकी,  केवळ लिखाण करून संसार केलेले श्री आपटे हे एक होते. 

अजिंक्यतारा, संधीकाळ, लांच्छित चंद्रमा, राजपूतांचा भीष्म , या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय ठरल्या. त्यांनी लिहिलेल्या सामाजिक कादंबऱ्याही खूप प्रसिद्ध झाल्या होत्या– न पटणारी गोष्ट, उमज पडेल तर, एकटी, सुखाचा मूलमंत्र, गृहसौख्य, पहाटेपूर्वीचा काळोख, आम्ही दोघे ( ते आणि मी ), ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे. आराम-विराम, बनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध होते. लेखन कुठल्याही प्रकारचे असले तरी लिखाणाच्या शैलीतील प्रासादिकता आणि प्रसन्नता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आयुष्याचा पाया, गृहसौख्य, अशा पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन, अशा विषयांवर विचारपूर्ण सखोल विवेचन केलेले होते. 

जरठ-कुमारी विवाह ही त्या काळातली ज्वलंत समस्या मांडणारा, आणि अत्यंत गाजलेला “ कुंकू “ हा ‘ प्रभात ‘ ने काढलेला सिनेमा श्री आपटे यांच्या “ न पटणारी गोष्ट ‘ या कादंबरीवर आधारलेला होता. तसेच, त्यांच्या ‘ भाग्यश्री ‘ कादंबरीवरून ‘ अमृतमंथन ‘ हा चित्रपट, ‘ राजपूत रमणी ‘ वरून त्याच नावाने काढलेला चित्रपट, ‘ पाच ते पाच ‘ या कथेवरून ,१९४२ च्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवणारा ‘ भाग्यरेखा ‘– हे  सिनेमे  निर्मिलेले  होते.  या वरून त्यांच्या लेखनातील सकसपणा आणि प्रभावीपणा ठळकपणे दिसून येतो. ‘ न पटणारी गोष्ट ‘ या कादंबरीचा, १९८६ साली महाराष्ट्र टाईम्सच्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत समावेश केला गेला होता. 

लेखनाबरोबरच त्यांचे आणखी कार्यकर्तृत्व असे— ‘ किर्लोस्कर खबर ‘ चे ते पहिले उपसंपादक होते. उद्यान, लोकमित्र, आल्हाद, या साप्ताहिकांचे, आणि मधुकर या मासिकाचे ते संस्थापक-संपादक होते. त्यांनी ‘ आपटे आणि मंडळी ‘ या नावाने प्रकाशनसंस्था सुरु केली होती, आणि त्यासाठी ‘ श्रीनिवास ‘ हा स्वतःचा छापखानाही सुरु केला होता. 

१९३३ साली बडोदा इथे झालेल्या वाङ्मय – परिषदेच्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, १९४१ साली पुण्यात झालेल्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष, १९६२ साली साताऱ्यात झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ,– अशी महत्वपूर्ण पदे त्यांनी भूषवलेली होती. 

“ ना. ह. आपटे –व्यक्ती आणि वाङ्मय “ या पुस्तकाद्वारे डॉ. सौदामिनी चौधरी यांनी त्यांचे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व शब्दांमधून रेखाटलेले आहे. 

श्री. ना. ह. आपटे यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली. ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १३ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

गोविंद बल्लाळ देवल

कर हा करी धरिला शुभांगी, मृगनयना रसिक मोहिनी,

सुकांत चंद्रानना पातली, माडीवरी चला ग सये,

म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान,

तेचि पुरूष दैवाचे,चिन्मया सकल ह्रदया….

अशी कितीक नाट्यपदे अगदी कालपरवाची वाटावीत अशी.या पदांचे रचनाकार आणि नाट्य लेखक व नाट्य दिग्दर्शकही गोविंद बल्लाळ देवल यांचा 13 नोव्हेंबर हा जन्मदिन! 13/11/1855 मध्ये जन्मलेल्या देवलांचे बालपण व शिक्षणाची सुरूवात सांगलीतून झाली. नंतरचे शालेय शिक्षण बेळगावात झाले. तेथे त्यांचा नाट्य लेखक व निर्माते अण्णासाहेब किर्लोस्कर यांचेशी संबंध आला. देवलांनी त्यांच्या नाटकात काही भूमिका केल्या. तसेच सहदिग्दर्शनाची भूमिकाही पार पाडली. पुढे ते पुण्यात शेतकी शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागले. पण नाट्य विश्वाची त्यांचा संबंध सुटला नव्हता. त्यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी ही स्वतःची  संस्था स्थापन केली. 1913 मध्ये त्यांनी गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केला. परंतू 1916 मध्ये त्यांच्या निधनामुळे अखेरचा पडदा पडला.

देवलांनी एकंदर सात नाटके लिहिली. त्यातील तीन इंग्रजी नाटकांवरून, तीन संस्कृत नाटकांवरून व एक स्वतंत्रपणे लिहिले. त्यांची नाटके ही प्रयोगक्षम असल्यामुळे व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी ठरली. देवलांनी मराठी सामाजिक रंगभूमीचा पाया घातला असे म्हणणे उचित ठरेल. कारण त्यांच्या शारदा या नाटकाचा  विषय जरठ तरूणी बालविवाह हा पूर्णपणे सामाजिक होता. हे नाटक इतके प्रभावी ठरले की जरठ विवाह बंदीसाठी त्या वेळच्या सरकारने जो कायदा केला तो ‘शारदा ॲक्ट’ या नावाने ओळखला जाऊ लागला. साहित्यिकाची लेखणी काय करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

मृच्छकटिक, विक्रमोर्वशिय, झुंजारराव, शापसंभ्रम, शारदा आणि संशयकल्लोळ ही त्यांची नाटके आजही लोकप्रिय आहेत.

सांगली जवळील हरिपूर येथे कृष्णा वारणेच्या संगमाकाठी ज्या ठिकाणी बसून ते नाट्यलेखन करीत असत ती जागा नाट्यरसिकांना आजही पाहता येते.

नाटपंढरीच्या या ज्येष्ठ वारक-याला त्याच्या जन्मदिनी सादर वंदन!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

साभार: विकीपीडिया, मराठी विश्वकोश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १२ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज बारा नोव्हेंबर. मराठी साहित्यातील  दोन ज्येष्ठ साहित्यिकांचा आज स्मृतीदिन आहे तर एका ज्येष्ठ साहित्यिकाचा आज जन्मदिवस आहे. आज त्यांच्या साहित्य सेवेबद्दल जाणून घेऊया.

रावबहादूर विष्णू मोरेश्वर महाजनी हे मागच्या पिढीतले चतुरस्त्र साहित्यिक. त्यांचा जन्म 12/11/1851चा. त्यांचे शालेय शिक्षण धुळे व महाविद्यालयीन शिक्षण डेक्कन काॅलेज, पुणे येथे झाले. पुढील काळात त्यांनी एज्युकेशन इन्स्पेक्टर या पदावरून नोकरीला सुरूवात केली व डायरेक्टर ऑफ एज्युकेशन या उच्च पदावरून ते निवृत्त झाले. या सर्व कालावधीत त्यांच्यातील साहित्यिक , लेखक अखंडपणे कार्यरत होता. त्यांनी कादंबरी, कविता, नाटक, समीक्षा, चरित्रलेखन , प्रवासवर्णन तर केलेच. पण याशिवाय अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण,

शिक्षणशास्त्र या विषयांवरही मार्मिक समीक्षात्मक लेखन केले आहे. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी ज्ञानसंग्रह या नावाचे मासिक काढून ते काही वर्षे चालवले. व-हाड शाला-पत्रक हे मासिकही काही वर्षे चालवले.

त्यांची काही महत्वाची साहित्य संपदा अशी:

कुसुमांजली(भाषांतरीत कवितांचा संग्रह), डेक्कन काॅलेजच्या आठवणी, रामायणकालीन लोकस्थिती हा निबंध, तारा, मोहविलसित आणि वल्लभानुनय ही तीन नाटके. ही तीन नाटके म्हणजे शेक्सपियरच्या तीन नाटकांची भाषांतरे आहेत.

( अनुक्रमे  सिंबेलाईन, द विंटर्स टेल, ऑल वेल दॅट एन्डस वेल , )

1907 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जळगाव येथील कविसंमेलनातील ‘ कवी आणि काव्य’ हे त्यांचे व्याख्यान खूप गाजले. आत्मपर भावकविता मराठीत आणण्याचे श्रेय श्री. महाजनी यांना जाते.

अशा या चतुरस्त्र साहित्यिकाचा 1923   मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीस वंदन !

☆☆☆☆☆

मोहन आपटे :

एकीकडे भौतिकशास्त्राची पदवी आणि त्याच वेळेला चित्रकला, काव्य एवढेच नव्हे तर कुस्तीचीही आवड असे अजब रसायन म्हणजे मोहन आपटे. मुंबईतील सोमाणी महाविद्यालयात भौतिक शास्त्राचे अध्यापन करणारे मोहन आपटे एक उत्तम साहित्यिकही होते. त्यांचे लेखन हे विज्ञान संबंधी असले तरी सोपे करून सांगण्याच्या भाषावैशिष्ट्यामुळे हे सर्व लेखन लोकप्रिय झाले. त्यांनी अवकाशशास्त्र, भौतिकशास्त्र,  शरीरशास्त्र,

संगणक, गणित, इतिहास, निसर्ग अशा विविध विषयांत लेखन केले आहे. त्यांची इंग्रजी भाषेतही नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विज्ञान विषयी जागृती करण्यासाठी त्यांनी लेखन, व्याख्याने व प्रदर्शने यांचे आयोजन केले. ‘मला उत्तर हवंय’ ही 11 पुस्तकांची विज्ञान शंका निरसन मालिका सुरू करून जनजागृती घडवली. भास्कराचार्यांचे संस्कृत श्लोक, गणिती सूत्रे, सोप्या मराठीत उपलब्ध करून दिली. त्यांची 75 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही :— अग्निनृत्य, अण्वस्त्रांचा मृत्यूघोष, आकाशगंगा, आपली पृथ्वी, डळमळले भूमंडळ, निसर्गाचे गणित, स्मरणशक्ती कशी वाढवावी इ. इ. इ.

त्यांच्या कार्याबद्दल त्यांना खगोल मंडळ मुंबई यांचेकडून पहिला भास्कर पुरस्कार 2005 साली मिळाला. तसेच महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारही मिळाला आहे. ते जनसेवा समिती, मराठी विज्ञान परिषद, लोकमान्य सेवा संघ, अ. भा. विद्यार्थी परिषद अशा विविध सामाजिक संस्थांशी निगडीत होते. अशा या अष्टपैलू साहित्यिकाचे 2019 मध्ये निधन झाले. त्यांना आदरांजली.

☆☆☆☆☆

रावसाहेब कसबे :

आंबेडकरवादी विचारांचा स्विकार करून आपल्या लेखनातून ते मांडणारे ज्येष्ठ लेखक श्री. रावसाहेब कसबे यांचा दि 12/11/1944 हा जन्मदिवस. त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

त्यांच्या ग्रंथसंपदेतील डाॅ. आंबेडकर आणि भारतीय घटना, आंबेडकर आणि मार्क्स, देशीवाद समाज व साहित्य, भक्ती आणि धम्म, रेषेपलीकडील लक्ष्मण, गांधी: पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा, झोत ही काही प्रसिद्ध पुस्तके. झोत या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची समीक्षा केली आहे.

त्यांना स्नेहबंध पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार, मिलिंद समता पुरस्कार, सुगावा पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2014 मध्ये नाशिक येथे भरलेल्या अ. भा. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.  तसेच 2015 मधील सम्यक साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. म. सा. परिषद चे उपाध्यक्ष व अध्यक्षपद त्यांना लाभले होते.

त्यांच्या लेखन कार्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा !

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

साभार: विकीपीडिया, विकासपिडीया,  मराठी विश्वकोश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ११ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज ११ नोव्हेंबरलेखक आणि संपादक म्हणून, आणि त्याचबरोबर लोकनेते, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही सुप्रसिद्ध असणारे अनंत काशिनाथ भालेराव यांचा आज जन्मदिन. (११/११/१९१९–२६/१०/१९९१ ) 

भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, आणि नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ या सर्व लढ्यांमध्ये सक्रीय असणाऱ्या श्री. भालेराव यांनी, त्यासाठी फक्त तुरुंगवासच नाही, तर सक्तमजुरीची शिक्षाही भोगलेली होती. पुढे त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. नंतर औरंगाबादच्या दैनिक मराठवाडामधून ‘ देशाचा विकास आणि समाजहित ‘ या विषयावर त्यांनी सातत्याने लेखन केले. १९७७ साली  देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली. आधी साप्ताहिक असणाऱ्या ‘ मराठवाडा ‘चे दैनिक झाले, आणि आधी सहसंपादक असणारे श्री. भालेराव संपादक म्हणून कार्यरत झाले. हैदराबादमधील पत्रकार-संघाचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते. पुरोगामी आणि विकासात्मक पत्रकारिता, आणि लोकहिताचे प्रश्न, यासाठी त्यांनी सातत्याने एक मंच उपलब्ध करून दिला होता. म्हणूनच, “ पत्रकार आणि साहित्यिक यांची एक पिढी घडवण्याच्या कामात त्यांचे मोलाचे योगदान होते “ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. 

याबरोबरच साहित्य चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. साहित्य-परिषदेतली वेगवेगळी पदे त्यांनी भूषवलेली होती. त्यांच्या दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी नव्या जाणिवांचे प्रवाह साहित्यात आणणाऱ्या साहित्यिकांना सतत प्रोत्साहन दिले. एकीकडे त्यांचे स्वतःचे लेखनही जोमाने सुरू होते. आलो याच कारणासी, कावड, हे त्यांचे लेखसंग्रह– पळस गेला कोकणा हे प्रवासवर्णन–मांदियाळी या शीर्षकाने व्यक्तिचित्रे — तसेच, स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी– पेटलेले दिवस, आणि, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा ,—- असे त्यांचे विपुल लिखाण प्रसिद्ध झालेले होते. 

‘ अनंत भालेराव– काळ आणि कर्तृत्व, ‘ आणि ‘ समग्र अनंत भालेराव ‘ ( दोन खंड ) ही, त्यांचे एकूण सगळेच कार्यकर्तृत्व उलगडणारी पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत. 

लेखक, कलावंत, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना दिल्या जाणाऱ्या  “ अनंत भालेराव स्मृती पुरस्काराने “ आजपर्यंत ग.प्र.प्रधान, संवादिनी-वादक आप्पा जळगावकर, नरेंद्र दाभोळकर, मंगेश पाडगावकर, ना.धों. महानोर, विजय तेंडुलकर, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, अनिल अवचट, चंद्रकांत कुलकर्णी, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला गेला आहे.

स्व. अनंत भालेराव यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी आदरपूर्वक वंदन. 

☆☆☆☆☆

आज डॉ.  श्री. जनार्दन वाघमारे यांचाही जन्मदिन.( जन्म : ११/११/१९३४ ) 

मराठीबरोबरच  इंग्लिशमधूनही सकस लेखन करणारे, आणि नांदेड इथे स्थापन झालेल्या  मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू असणारे श्री. वाघमारे हे सुरुवातीला इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. नंतर कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही कार्यरत होते. निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ख्यातनाम असणाऱ्या  श्री. वाघमारे यांची राज्यसभेचे खासदार म्हणूनही नियुक्ती झाली होती. 

बखर एका खेड्याची, मंथन, मातीवरच्या ओळी, यमुनेचे पाणी, राज्यसभेतील सहा वर्षे, सहजीवन, असे त्यांचे ललित-लेख-संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. मूठभर माती, आणि चिंतन एका नगराध्यक्षाचे, या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, तसेच, महर्षी दयानंद सरस्वती– विचार, कार्य और कृतित्व, समाज परिवर्तनकी दिशाएं, यासारखे सात अनुवादित ग्रंथही त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी खूप सारे वैचारिक लेखनसुद्धा केले आहे. जसे की— ‘ अमेरिकन निग्रो – साहित्य आणि संस्कृती ‘, ‘ आजचे शिक्षण– स्वप्न आणि वास्तव ‘, दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी, ‘ बदलते शिक्षण- स्वरूप आणि समस्या ‘, ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातीअंताचा लढा ‘, महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण, हाक आणि आक्रोश, ‘ प्राथमिक शिक्षण– यशापयश आणि भवितव्य ‘, इत्यादी– असे त्यांचे लेख अभ्यासनीय म्हणून प्रशंसनीय ठरलेले आहेत. 

डॉ. जनार्दन वाघमारे यांना आजच्या जन्मदिनी सादर प्रणाम आणि हार्दिक शुभेच्छा.   

☆☆☆☆☆

“ ती पहा, ती पहा, बापूजींची प्राणज्योती, तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहताती “ ही शाळेत शिकलेली कविता आणि पुस्तकातला कवितेच्या अलीकडच्या पानावरचा गांधीजींचा काठी हातात घेऊन चालतांनाच आडवा फोटो, आणि त्या फोटोत दूरवर दिसणारी तेवत्या पणतीची ज्योत— हे सगळं माझ्याप्रमाणेच बऱ्याच वाचकांना नक्कीच आठवत असेल. या अजरामर कवितेचे कवी, म्हणजे — लोककवी मनमोहन ‘ म्हणून प्रसिद्ध असलेले गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा आज जन्मदिन. ( ११/११/१९११ – ७/५/१९९७ ) काव्यरसिकांच्या थेट मनापर्यंत पोहोचतील अशा कितीतरी कविता त्यांनी लिहिल्या. आणि त्या खूप गाजल्याही.—– “ शव कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता ।।” ही अतिशय हळुवार भावना व्यक्त करणारी कविता,  “ मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला “ ही भावगीत म्हणून प्रसिद्ध झालेली कविता, “ मी मुक्तांमधला मुक्त आणि तू, कैद्यांमधला कैदी “ ही जराशी अबोध वाटणारी पण सुंदर कविता, “ आमुचे नाव आसू गं “ अशी मनाला भिडणारी कविता —-ही त्यांच्या कवितांची काही उदाहरणे. त्यांची आवर्जून सांगायला हवी अशी एक कविता म्हणजे —- “कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा “– सुरुवातीला या कवितेवर “अश्लील“ असा शिक्का मारून, ती लोकांसमोर सादर करायला विनाकारण आक्षेप घेतला गेला होता. पण त्यावेळचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. गजानन वाटवे यांनी या कवितेला स्वतः चाल लावून स्वतःच्या भावगीत-गायनाच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये ती सादर करायला बेधडकपणे सुरुवात केली, आणि ही कविता अतिशय लोकप्रिय झाली. 

मनमोहन नातू यांचे , ‘ अफूच्या गोळ्या ‘, ‘ उद्धार ‘, ‘ युगायुगांचे सहप्रवासी ‘, ‘ शिवशिल्पांजली ‘, 

‘ सुनीतगंगा ‘, असे काव्यसंग्रह, आणि  ‘ बॉम्ब ‘ सारख्या काही दीर्घकविताही प्रसिद्धीप्राप्त ठरलेल्या आहेत.     

मनमोहन नातू हे फक्त कवी नव्हते, तर, लघुकथा, कादंबऱ्या , ललित लेख असे त्यांचे इतरही  विपुल लेखन प्रसिद्ध झालेले होते. छत्रपती संभाजी, छत्रपती शाहू, छत्रपती राजाराम, संभवामि युगे युगे, अशी चरित्रात्मक पुस्तके, तसेच तोरणा, प्रतापगड, आग्र्याहून सुटका, सूर्य असा मावळला, अशा त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. 

‘ मीनाक्षी दादरकर ‘ या टोपणनावानेही त्यांनी काही रचना केल्या होत्या, ५००० मंगलाष्टके रचली होती, लिखित रूपात भविष्ये लिहिली होती, ही त्यांची रसिकांना माहिती असावी अशी माहिती. 

कविवर्य श्री. मनमोहन यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनी मनःपूर्वक आदरांजली.  ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १० नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

कुसुमावती देशपांडे– (१० नोहेंबर १९०४ ते १७ नोहेंबर १९६१ ) 

कुसुमावती देशपांडे कमल देसाई आणि सानिया  या तिघीही  नामांकित लेखिका. तिघींचाही जन्म १० नोहेंबरचा. या तिघीही प्रयोगशील लेखिका असून मराठीला त्यांनी नवे रूप व नवचैतन्य दिले. तीघींचाही मराठी आणि इंग्रजी वाङ्मयाचा दांडगा व्यासंग होता

कुसुमावतींनी इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजी विषयात बी.ए. ची पदवी मिळवल्यानंतर, नवी दिल्ली इथे आकाशवाणीवर स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या प्रमुख निर्मात्या होत्या. त्यांचा कवी आनिल यांच्याशी १९२९ साली प्रेमविवाह झाला. तो त्या काळात खूप गाजला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार होता. त्यातील निवडक पत्रांचे सांपदन म्हणजे ‘कुसमानिल’ हे पुस्तक. दीपकळी, दीपदान, दीपमाळ, मोळी हे त्यांचे काही कथासंग्रह. नवकथापूर्व काळात त्यांच्या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या, त्या तंत्रापेक्षा त्यांनी मांडलेल्या दृष्टीकोनामुळे. ‘मराठी कादंबरीचे पहिले शतक’ (१९५३) हे पुस्तक त्यांच्या व्यासंगाची आणि समालोचनात्मक लेखनशैलीची ग्वाही देते. मराठी वाङमय समीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी केलेले लेखन अतिशय महत्वाचे मानले जाते.  ‘पासंग’ या पुस्तकात त्यांचे लेख आहेत.

ग्वाल्हेर येथे १९६१ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. १८७८पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. त्यानंतर कुसुमावती या पहिल्या महिला संमेलांनाध्यक्षा होत्या.  

अनंत देशमुख यांनी कुसुमावतींच्या वाङ्मायाचा चिकित्सक अभ्यास करून ‘कुसुमावती देशपांडे ‘ हे पुस्तक सिद्ध केले.

☆☆☆☆☆

कमल देसाई – (१० नोहेंबर १९२८ ते १७ जून २०११ )  

कमलताई या प्रयोगशील लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या बहुतेक कथा ‘सत्यकथा’मधून प्रकाशित झाल्या. सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा अर्थ लावणारं आणी चिंतन करणारं लेखन त्यांनी केलं. विद्रोही, स्त्रीवादी लेखन , देव, धर्म, विश्व, लैंगिकता, पुरुषी दृष्टीकोनाचे वर्चस्व आशा विषयांवर आपल्या लेखनातून त्यांनी स्वतंत्र विचार मांडले. रंग-१, रंग- २, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, काळासूर्यं आणि हॅट घालणारी बाई, इ. त्यांची पुस्तके. त्यांच्या बव्हंशी कथा दुर्बोध आहेत. त्यांनी सौंदर्यशास्त्रावर व्याख्याने दिली. त्या प्राध्यापिका होत्या. विवरणाची आणि समजावून देण्याची त्यांची पद्धत मात्र अतिशय सुबोध होती. ‘जय हो’ हे त्यांचे आत्मकथन आहे. आधुनिकतेचा स्पर्श त्यांच्या कथांना आहे. कथा, कादंबरी, समीक्षा, नाटके, कविता, अनुवाद असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे.

☆☆☆☆☆

  सानिया (१० नोहेंबर १९५२)

सानिया म्हणजे सुनंदा कुलकर्णी. स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि आत्मभानाचा  वेध सानियांनी आपल्या कथातून घेतला. ‘अशी वेळ, अवकाश, आवर्तन, खिडक्या, ओमियागे, परिणाम, प्रतीति, प्रवास, वलय इ. त्यांचे कथासंग्रह आहेत. त्यांच्या अनेक कथा, कन्नड, गुजराती, उर्दू, बंगाली, इंगलीश, जर्मन इ. भाषांमधून अनुवादीत झाल्या आहेत. आपल्या कथांमधून त्यांनी माणसा-माणसातील, नातेसंबंध, भाव-भावना आनंद, सुख-दु:ख यांचा शोध घेतला आहे. त्यांच्या नायिका चारचौघींपेक्षा वेगळ्या आहेत. स्वतंत्र विचार करणार्‍या, जगावेगळं जीवन जगणार्‍या आहेत.

☆☆☆☆☆

ल.रा. पांगारकर (३जुलै १८६२ ते १० नोहेंबर १९४१ )

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे अगदी जुन्या पिढीतले लेखक. ते अध्यात्ममार्गी होते. संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी लिहिलेले ‘भक्तिमार्ग प्रदीप’ हे प्रचंड खपाचे पुस्तक त्या काळाइतकेच आजही लोकप्रिय आहे. आजही अनेक घरातून हे पुस्तक आढळते. हे पुस्तक म्हणजे भक्तिपर वेच्यांचा संग्रह आहे. ‘मुमुक्षू ‘ या साप्ताहिकाचे ते १३ वर्षे संपदक होते. त्यांनी संत एकनाथ. संत ज्ञानेश्वर यांची चरित्रे लिहिली. ‘मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन’ हा ग्रंथ लिहिला. याशिवाय त्यांनी आनंद लहरी (काव्यसंग्रह ) , चरित्रचन्द्र ( आत्मचरित्र ), नवविद्या भक्ति , पारिजातकाची फुले , मराठी भाषेचे स्वरूप इ. पुस्तके लिहिली. त्यांचे सगळ्यात मोठे कार्य म्हणजे मराठी वङ्मयाचा इतिहास, खंड १ व २  यांचे संपादन होय.

‘‘भक्तिमार्ग प्रदीप’ च्या माध्यमातून घरा-घरात पोचलेल्या ल.रा. पांगारकर यांना आज स्मृतीदिनानिमित्त सादर वंदन. 

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २.इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print