मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #272 ☆ आली जीवनी सरिता… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 272 ?

आली जीवनी सरिता…  श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आली जीवनी सरिता, स्वच्छ वाटते मनास

थांब सांगतो मी आता, तीव्र उन्हास उन्हास

*

दरवळ हा कशाचा, मला वाटे ओळखीचा

स्पर्श वाऱ्याच्या सारखा, आहे माझ्याच सखीचा

तिच्या श्वसात भरला, आहे सुवास सुवास

*

नाही बिघडले काही, सूर्य उगवला नाही

शुभ्र कातीचा उजेड, मला  वाटतो प्रवाही

माझ्या भोवताली आहे, तिचा प्रकाश प्रकाश

*

आले अंगणी चांदणे, त्याच्या सोबत चालणे

फडफड ही डोळ्यांची, तिचे मिठास बोलणे

नाही राहत मी आता, कधी उदास उदास

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “टांगलेले शिंकाळे…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “टांगलेले शिंकाळे…” ☆ सुश्री शीला पतकी 

बाल मुकुंदाचे लोणी

शिंक्क्यांमध्ये ग टांगले

ईगतीने केले फस्त

सारे पसार पांगले

*

जनाबाईचा भाकऱ्या

सावत्याचा भाजीपाला

 गोऱ्या कुंभाराचा कर्हा

त्याने राखिला राखीला

*

दारांमध्ये टांगलेला

त्यांन राखीला कोहळा

 कुणा पाप्याची नजर

नाही लागली घराला

*

रानी पेरायच्या बिया

 बीज टांगून राखले

 जिमिनीत किती  किती

किडा मुंगीचे दाखले

*

टांगलेले शिंके मला

 सांगे संसाराचे सार

दोन जीव टांगणीला

परी एकच ईचार

*

दोन दोऱ्या दोन जीव

 एकमेकांत गुंतती

जीव लावती टांगणी

अन् आधार ग देती

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवा छंद ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ नवा छंद  ⭐ श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

वेड वाचनाचे मजला

होते काल परवा पर्यंत,

शेकडो पुस्तके वाचली,

अथ पासून इतिपर्यंत !

 *

आजकाल वाचायचा

येतो मज फार कंटाळा,

कळत नाही वाचतांना

कधी लागतो डोळा !

 *

मग ठरवले मनाशी

वाचन तर करायचे,

पण पुस्तकां ऐवजी

माणसांना वाचायचे !

 *

नवीन छंद माझा मला

मनापासून आवडला,

वाचनापेक्षा आनंद

मी त्यातच अनुभवला !

 *

पण झाला एक घोटाळा

घडले वेगळेच आक्रीत,

भेटता पुस्तकांतील पात्रे

झालो खरा मी चकीत !

 *

जागेपणी ‘भेटलेली’ पात्रे

‘वाचली’ होती पुस्तकांत,

विश्वास ठेवा माझ्यावर

काढू नका मज वेड्यात !

काढू नका मज वेड्यात !

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – बालपणीचा काळ सुखाचा… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बालपणीचा काळ सुखाचा.? श्री आशिष  बिवलकर ☆

बालपणीचा काळ सुखाचा,

हलक्या फुलक्या आठवणी |

मौज मजा धमाल मस्ती सारी,

सुखाची आकाशाला गवसणी |

*

आभाळ ही वाटालं ठेंगण तेव्हा,

सुंदर स्वप्नांची उंच उंच भरारी |

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद,

नव्हती कसलीच दुनियादारी |

*

काळ्या मातीत मुक्त बागडणे,

मोकळ्या मैदानावरचे खेळ |

माळरानाची बिनधास्त सफर,

मित्रमंडळींसाठी भरपूर वेळ |

*

कैऱ्या चिंच पेरू रानमेवा,

रोज चालायची मेजवानी |

पंचतारांकीतच होत जगणं,

ऐट सारी होती राजावानी |

*

अंगावर फाटका कपडा तरी,

नव्हती परिस्थितीची लाज |

मर्यादित साधन सामुगीत,

संस्कारांनी चढवला साज |

*
दुर्मिळ होत चाललय आता सर्व,

जीवघेण्या स्पर्धेत बालकांची उडी |

हिरावून घेतलं जातंय बालपण त्यांचं,

माफ कशी करेल तुम्हां आताची पिढी?

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “प्रेम…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “प्रेम…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

नाही आडपडदे, नाही आडवळणं…

नितळ निर्मळ झऱ्यासारखं सतत झुळझुळत असतं

प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

नको जातीपातींचे चढउतार… नको नात्यागोत्यांची कुंपणं

उघड्या बोडक्या खडकावर अल्लाद फ़ुंकूनही फुलणारं

मऊ लुसलुशीत गवत असतं… तसंच अगदी तसंच…

प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

नाही व्यवहाराचा वायदा… नाही परतफेडीचा तगादा

नाही कोणती लिखापढी… नाही कर्तव्याची तागडी…

कारण कर्तव्यात प्रेम असावंच असं नसतं…

आणि प्रेमात तर दुसरं तिसरं काहीच नसतं…

 प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

नाही नर – नारी हा भेद, नाही बंधन वयाचे

सारे सान सारे थोर… होती एकाच मापाचे

साऱ्यांसाठी एकच गुबगुबीत मऊ उबदार पांघरूण असतं…

प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

अथांग सागर… अमर्याद आभाळ… इवल्याशा मनात दाटलेलं

शेषशाही विष्णू अन घननीळ कृष्ण… तिथेच जणू विसावलेले

मग तिथेच नकळत जन्मलेलं देवत्व असतं…

तिथेच खरं प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…

*

 प्रेम म्हणजे प्रेम.. म्हणजे फक्त प्रेमच असतं…

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ध्यास… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ ध्यास ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तो नभीचा चांद होता की फुलांचा ताटवा

शांतविण्या या मनाला एकदा हो भेटवा

*

ओढणीचा मेघ झाला चांदवा तो झाकला

स्पर्शिण्या परि चांदण्याला जीव गुंतू लागला

*

मी कधी ना पाहिलेले पाहिले हो काल रात्री

लावणीचा शृंगार सारा साठला अद्याप नेत्री

*

एक होती ती डहाळी रातराणीच्या फुलांची

मोग-याची वेल होती की रास होती पाकळ्यांची

*

यौवनाचे गीत होते तो सूर होता आगळा

संयमाला धार होती तो रोख होता वेगळा

*

स्वप्न होते, सत्य होते, काय होता भास तो

गुंतले हे ह्रदय माझे, एक आता ध्यास तो

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणूसपण… ☆ श्री सुजित कदम  ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ माणूसपण… ☆ 

☆ 

परवा ह्या झाडाखाली बसलो

तेव्हा खूप छान वाटलं

आज त्याचे हाल पाहून

टचकन डोळ्यात पाणी दाटलं..!

 

म्हटलं विचारावं झाडाला

नक्की झालं तरी काय?

कोणत्या नराधमाने

त्याचे तोडले हात पाय

 

मी म्हटलं… ऐकना रे झाडा

तुझ्याशी थोडं बोलायचंय

तुझ्या मनातलं आज मला

सारं काही ऐकायचंय..!

 

सुरवातीला झाड …

काही एक बोललं नाही;

आणि नंतर कितीतरी वेळ

त्याचं रडणं काही थांबलं नाही..!

 

मी म्हटलं झाडा असं

रडू नको थांब

काय झालं एकदा

मला तरी सांग

 

काय सांगू मित्रा तुला

झालं काल काय ..?

कुणीतरी येऊन माझे

तोडू लागलं पाय..!

 

पायाबरोबर जेव्हा माझे

हात सुध्दा तोडू लागले

तेव्हा मात्र माझ्या मनातले

माणूसपण पुसू लागले..!

 

मी जोर जोरात

ओरडत होतो

पण ऐकलं नाही कुणी

आणि तेव्हा कळलं देवानं

आपल्याला दिली नाही वाणी.

 

काय चूक झाली माझी

मला सुद्धा कळलं नाही

इतकी वर्षे सावली दिली

ती कुणालाच कशी दिसली नाही..?

 

कुणीतरी म्हटलं तितक्यात

उद्या येऊन झाडाचे बारीक तुकडे करा..!

बारीक बारीक तुकडे नंतर

गाडीमध्ये भरा…!

 

अरे सावली देणारे हातांचे

असं कुणी तुकडे तुकडे करतं का..?

तूच सांग मित्रा माणसांचं

हे वागणं तुला तरी पटतं का..?

 

माझे हाल झाले त्याचं..

मला काहीच वाटत नाही

पण..आज परतून येणा-या पाखरांना

त्याचं घर मात्र दिसणार नाही

 

मित्रा…

झाडांमध्ये ही जीव असतो

हे माणसांना आता कळायला हवं

आणि आमचा आवाज ऐकू येईल

इतकं माणूसपण तरी टिकायला हवं..!

© श्री सुजित कदम

मो.7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋणानुबंध… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ ऋणानुबंध… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रथम ऋण ते परमेशाचे जन्म देतो तोच आम्हा

उठल्यावरती म्हणत चला हो, रामा रामा हरे रामा

उपकृत करते वसुंधरा हो ऋण किती ते मोजा ना

गणना करता सरेल आयु ध्यानी मनी हो तुम्ही घ्याना…

*

चंद्र सूर्य हे रोज उगवती करून पहाना सेवा अशी

हात जोडूनी उभा ठाकतो सहस्त्ररश्मी दाराशी

मातपिता ते कसे मी वर्णू अनंत त्यांचे ऋण शिरी

रक्षणकरण्या पाठवतो तो परमदयाळू श्रीहरी..

*

वसुंधरेची बाळे सारी वृक्ष नि वेली उद्याने

किती फुलवली वसुंधरा ती अमाप त्या सौंदर्याने

पिकपाणी नि धनधान्ये ती खनिजे पाणी रत्ने ही

किती ते देणे वसुंधरेचे अफाट पडतो पाऊस ही…

*

राती चांदणे फुलते कसे हो कुंभ सांडती धरेवरी

रजतपटी तो खेळ खेळतो खड्या चांदणी श्रीहरी

नक्षत्रे ती किती मनोहर  नयनपारणे फिटते हो

झुंबर चंद्राचे ते पाहून मनच हरखून जाते हो…

*

वारे वाहती नद्या हासती प्रपात कोसळती मोदे

आम्ही देतो इतके म्हणूनी कधीच केले ना सौदे

अफाट आहे ऋण धरतीचे नारायण तो कृष्णाचे

म्हणून म्हणते व्हा उतराई मुखी नाम राहो त्यांचे…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – बिंब – प्रतिबिंब – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – बिंब – प्रतिबिंब – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

बिंबाचे हे प्रतिबिंब 

किती दिसते साजिरे 

बसे मायेच्या कुशीत 

पहा दृष्टी भिरभिरे ||

*

वात्सल्याच्या पदराला 

कशी घेते लपेटून 

अनुकरण आईचे

दिसे भारीच शोभून ||

*

मायलेकीतली नाळ 

असे घट्ट बांधलेली 

तिच्या भावी आयुष्याची 

स्वप्नं उरी दाटलेली ||

*

कष्ट मायेचे बघते 

जाण लेकीत रुजते 

लेकीसाठी राबताना 

माय स्वप्नात रंगते ||

*

स्वप्नं माझी हरवली 

लेक आणील सत्यात

तिच्या रूपाने लाभले 

बळ कष्टांना हातात ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 260 ☆ राधा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 260 ?

राधा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

☆ 

चंदेरी रात्र

कालिंदी पात्र

उत्सुक गात्र

राधा आतुरली !

 *

कृष्णाचा छंद

मोगरी गंध

प्रीतीत दंग

राधा सुखावली!

 *

विरह शाप

अधुरे माप

तृष्णेत ताप

राधा दुखावली !

शीतल छाया

चंदनी काया

मोहन माया

राधा विसावली !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares