कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 143 – विजय साहित्य
☆ आठवण…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
आठवण येता तुझी
शहारते तन मन
अलबेली वर्षा सर
वेचितसे क्षण क्षण…! १
आठवण येता तुझी
होते कलिकेचे फूल
आसवांची आठवांना
बघ लागते चाहूल….! २
आठवण येता तुझी
भावनांच्या पायघड्या
येती सुसाट धावत
शब्द रेशमाच्या लड्या…!३
आठवण येता तुझी
ऋतूराज रेंगाळतो
संसाराचा सारीपाट
कोण त्वरे गुंडाळतो…!४
आठवण येता तुझी
मन राहिना मनांत
विरहाच्या एकांतात
साद तुझी अंतरात…!५
आठवण येता तुझी
डोळे बोलके होतात
गात्र गात्र थकलेली
तुझी वाट पाहतात…!६
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈