मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #134 ☆ पंढरी माहेर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 134 – विजय साहित्य ?

☆ पंढरी माहेर… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

मुराळी होऊन

घेतसे विसावा

माये तुझ्या नेत्री

विठ्ठल दिसावा. . . . !

 

पंढरीची वारी

ऊन्हात पोळते

गालावरी माये

आसू ओघळते.. . . !

 

विठ्ठलाची वीट

उंबरा घराचा

ओलांडून येई

पाहुणा दारचा.

 

पंढरीची वारी

भेटते विठूला

आठवांची सर

आलीया भेटीला. . . . !

 

विठू दर्शनाची

घरा दारा आस

परी सोडवेना

प्रपंचाची कास.

 

पंढरीची वारी

हरीनाम घेई

माय लेकराला

दोन घास देई. . . . !

 

पंढरीची वारी

रिंगण घालते

माय शेतामधी

माया कालवते.. . . !

 

पंढरीची वारी

माऊलींच्या दारा

माय पदराचा

लेकराला वारा. . . . !

 

म्हणोनीया देवा

पंढरी माहेर

आसवांचे मोती

करती आहेर.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मृतीदिना निमित्त -पाहुणचार… ☆ ग. ल. ठोकळ ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ स्मृतीदिना निमित्त -पाहुणचार… ☆ ग. ल. ठोकळ

या बसा पाव्हनं असं, रामराम घ्या !

कोनच्या तुम्ही गांवाचं ? गाठुडं तिठं राहुं द्या !

 

घोंगडी टाकली इठं, बसा तीवर

अनमान करुं नका आतां, हें समजा अपुलं घर

 

वाढूळ चालतां जनूं, लई भागलां

हें पगा, काढलंय पाणी, आंघूळ कराया चला

 

आटपा बिगीनं जरा, ताट वाढलं

पाव्हनं, चला या आतां, हें पगा पिढं टाकलं

 

वाढली पगा ज्वारिची जाड भाकरी

निचितीनं जेवा आतां, जायचं न शेतावरी

 

लइ सुगरण मपली बरं कारभारिण

किती अपरुक झालं हाए, हें कांद्याचं बेसन !

 

लसणीची चटणी उजुन पगा वाढली

ती मधून तोंडी लावा, लागती तिखट चांगली !

 

चापून अतां होउं द्या, करुं नका कमी

मीठभाकरी गरीबाची, घ्या गोड करोनी तुम्ही

 

इकत्यांत कसं उरकलं? हें नव्हं खरं

आनकी येक चतकोर, घ्यायला पाहिजे बरं !

 

कां राव हात राखुनी असं जेवतां ?

ए अगS वाढ कीं त्यांना, हां ब्येस जाहलं अतां !

 

हो, झालंच आतां, उठा, चला भाइर

घ्या हातावरतीं पाणि, नी बसा पथारीवर

 

पाव्हनं, नीट भिंतिला बसा टेंकुनी

हें खांड घ्या सुपारीचं, घ्या तोंडामदिं टाकुनी

 

ही भरली चिलमीमदीं तमाखू अहा !

पेटली कशी पण नामी, झुरका तर घेउन पहा

 

जायचं काय म्हंगतां ? झोंप घ्या जरा

जाताल उद्यां, कां घाई ? छे, बेत नव्हं हा बरा

 

भारीच तुम्ही हे बुवा, जायचंच का ?

तारीख चालली वायां, गरिबाचं ऎकु नका

 

शेवटीं निघालांत ना ? जपूनीच जा

गरिबाची ओळख ठेवा, या बरं, रामराम घ्या !

 

– ग. ल. ठोकळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुखवटा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ मुखवटा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

       मुखवट्याचे जग

       वाचता वाचता

        झाले मुखवटा

         केव्हा नकळे !

        आता नाही भय

      कोण्या मुखवट्याचे

        जो तो मुखवटा

    अंतरी माझ्या !

      कधी तो हसवतो

       रडवतो कधी

   कधी गोंजारतो

   प्रेम भावे !

   नाही दुजाभाव

   अंतरीचा ठाव

  माझी समरसता

  मुखवटा !

   कुणीही आता

 बोलवावे मज

 अंतरी माझ्या

 शिरावे सहज !

 मन माझे झाले

 मुखवट्यांचा गाव

ज्याचा त्याचा स्वभाव

मुखवट्यामागे !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #118 – क्षणिका ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 118 – क्षणिका ☆

?

विठ्ठल – पांडुरंग

कुणी विठ्ठल म्हणा

कुणी म्हणा पांडुरंग ..

माझ्या सावळ्या हरीला

शोभे सावळाच रंग..!

?

आई..

आई.., इतके लिहावे वाटते तुझ्यावर

की देवाचाही जीव व्हावा खालीवर…!

?

पाखरांचे घर

केवढे हे ऊन आहे तापलेले

साउली चे झाड आहे तोडलेले…!

पाडले हे घर कुणी रे पाखरांचे

केवढे हे पाप माथी लागलेले…!

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मूक संवाद – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – मूक संवाद –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

चालता चालता श्वास घेण्यासी

विनीत थांबले होते जराशी

उमजले माझीच मी मला

त्या धुंद मुग्ध वळणापाशी…

सरसावता पुढे काळ थबकला

नकळत अलगद तो हात सुटला

कहर करूनी नभी घन गरजला

आठवणींनी ऊर भरूनी आला…

चिंब आठवणींत बिंबही हलले

प्रतिरुप वलये भिजूनी गेले

अलवार स्पर्शस्मृतींत तन रोमांचले

मूक संवादे सीमित हितगुज केले..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऐनवेळी… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ ऐनवेळी… ☆ श्री तुकाराम दादा पाटील … ☆ 

मज याद बोचणारी येतेच ऐनवेळी

होतो पुढे खुलासा भलताच ऐनवेळी

 

मंजूर सर्व केले रुसवा कशास आता

मारू नकोस बाई मुरकाच ऐनवेळी

 

मोठ्या दिलेर बाता मारून खूप झाल्या

झाला आवाज त्यांचा फुसकाच ऐनवेळी

 

देवा पुढे पुजारी करतोच ढोंग सारे

 भाळावरी टिळा का दिसतोच ऐनवेळी

 

या बोल घेवड्यांच्या शपथा हवेत गेल्या

आवाज गर्जनांचा नुसताच ऐनवेळी

 

विश्वास काय आहे ठाऊक ज्यास नाही

घ्यावी खुशाल त्याची फिरकीच ऐनवेळी

 

नाचून बैठकीला रंगेल खूप केले

गिरकी अचूक नाही जमलीच ऐनवेळी

 

अपमान झेलताना हसतो खुशाल ढोंगी

 सोडून लाज घेतो डुलकीच ऐनवेळी

 

या राजकारण्यांनी केली धमाल आहे

झालीय चाल त्यांची दुडकीच ऐनवेळी

 

झाल्यात पेरण्या पण आहे जरूर आता

पाऊस ठार वेडा रुसलाच  ऐनवेळी

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 142 ☆ प्रयाण ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 142 ?

☆ प्रयाण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(जुन्या डायरीतून…१ जानेवारी १९९७)

ती एकटीच निघाली आहे

दूरच्या प्रवासाला

रिक्त हाताने—

मुक्तपणे–फकिरीवृत्तीने

ती तोडू पहाते आहे–

तिच्या आयुष्याला जखडणारे

साखळदंड!

 

भीती एकच–

ती जिथे चालली आहे

तिथे असेल का माणसांचेच जंगल?

इथल्या सारखे तिथेही भेटतील का?

काही कनवाळू अन्

प्रेमळ पक्षी!

भव्य पिंपळवृक्ष आणि आधारवडही —

की अधून मधून इथे आढळणा-या लांडग्या,कोल्ह्यांचे आणि साप विंचवांचेच

असेल त्या जगात वास्तव्य??

 

निरीच्छपणे,एकाकी वाटेने जाताना

साखळदंडाच्या ओझ्यापेक्षाही

जंगलातल्या संभाव्य धोक्याचीच भीती—

गिळून टाकते अवसान,

समर्थपणे जगण्याचे!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संसार दोघांचा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ संसार दोघांचा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

तू म्हणतोस संसार दोघांचा,

मग दोघ मिळून करु या ना..!

 

तू चूल पेटवं , मी भाकरी  करते,

तू भाजी चीर, मी फोडणी देते,

मी कपडे धुते, तू वाळत टाक;

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघं मिळून करु या ना..!

 

भातुकलीत मी स्वयंपाक केला, 

आता ही मीच सगळं करते ;

झोपडीत तर मी खूप राबते,

महालात ही मीच..!

तू म्हणतोस घर दोघांचं,

घर काम ही मिळून करु या ना,

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघ मिळून करु या ना..!

 

मी आई हे “सत्य” ,

तू बाप हा “विश्वास” 

मी जन्म देणं निसर्ग नियम,

तू संगोपनाला हातभार लाव ना,

सत्य आणि विश्वासाने

मिळून मुलांना घडवूया ना..

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघ मिळून करु या ना..!

 

तुझ्या सुखदुःखाची मी सोबती

घराच घरपण मी, म्हणतोस,

मी थोडी “बाप” होते

तू थोडा “आई” हो…

मी तुझी आर्धांगिनी

तू माझं अर्धांग हो ना..

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघं मिळून करु या ना..!

© डॉ.सोनिया कस्तुरे

27/09/2019

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #147 ☆ स्वाद त्याचा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 147 ?

☆ स्वाद त्याचा…

मी सुदाम्या गुंतलो पोह्यात आहे

स्वाद त्याचा आजही स्मरणात आहे

 

मार्ग मैत्रीचा बदलणे शक्य नाही

ती अजुनही वाहते धमन्यात आहे

 

मैत्रि म्हणजे जीवनाचा मंत्र मित्रा

फक्त इतके ठेवले ध्यानात आहे

 

संकटी धावून येतो मित्र माझ्या

म्हणुन त्याचे नाव ह्या ओठात आहे

 

भेद काही आजही आहेत कायम

अन् तरीही प्रेम हे दोघात आहे

 

कैक दशके लोटली आहे तरी ही

तीच मैत्री आजही बहरात आहे

 

तीच विट्टी तोच दांडू त्याच गोट्या

पाहतो सारे तुझ्या डोळ्यात आहे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भास की आभास तुझा… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

सौ. कल्पना मंगेश कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ भास की आभास तुझा… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

गंधाळलेले श्वास

आसपास तुझेच भास

बेधुंद बरसणारा पाऊस

अन् दरवळणारा मातीचा वास..

 

पाऊस सुरू झाला

की दरवर्षी असं होत

तू नसतोस कुठेही

तरीही चराचर तुझंच होत ..

 

चिंब भिजलेल्या क्षणांना

मग पाझर फुटतो

डोळ्यात थोपवलेला पाऊस मात्र

पापण्यातच गोठतो ..

 

ओठावर झरू लागते

आर्त विराणी

पाऊसही गाऊ लागतो

गजल पुराणी..

 

पुन्हा भारावते मन

शोधू लागते तुला

शब्दांच्या ही पलीकडे जाऊन

कवितेत गुंफते तुला..

 

अव्यक्त भाषा थेंबांनी

मग पाऊसच बोलू पहातो

तुझ्या माझ्या विरहाचे

आर्त स्वर छेडू पहातो..

 

तरीही श्वास चालूच रहातो

तुझ्याविना जगू पहातो

दूर दूर क्षितिजापल्याड

एक तारा हळूच निखळतो..

 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares