श्री नितीन सुभाष चंदनशिवे


चित्रकाव्य 


– प्रिय प्रिये… –
☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
☆
ती राधा बनून दूर आहे
तिचा खांदा घेऊन उभी आहे
ती मनात साठवत राहते मलाच
पण ओठावर शब्दांना जकात लावते..
माझा उंबरा ओलांडून येत नाही आत
पण माझ्या काळजाच्या ती चौकात राहते…
मीरेची प्रीत तिच्या ओंजळीत भरलेली
गुलाबाची दोन फुलं
तिने जीवापाड जपलेली
आतल्या आत बरसत राहते मुसळधार
पण डोळ्यात दुष्काळ दाखवायची
तिची कला एकदम बहारदार
तरीही कोरड्या डोळ्यात तिच्या
कधी कधी भरून येतं धरण
माझ्या आठवणीचं जळत असतं सरण
पाखरू माझं रुसत नाही
एका जागी बसत नाही
दमून गेली तरी
थकले रे सख्या असं कधी म्हणत नाही…
कृष्णाला धरता धरता
रुक्मिणीला जपणारी ती
जराशी ठेच मला लागता लागता
भळभळणारी जखम ती…
वाटतं ना आत्ताच सगळं घडल्यासारखं..
वाटतं ना वादळ येऊन गेल्यासारखं..
नाही जाणार सोडून तुझी प्रीत
गात राहीन आपल्या जगण्याचं गीत
तू माझा गुलाब जपते आहेस
माझ्यासाठी खपते आहेस
नदीसारखी वाहता वाहता
आतल्या आत झुरते आहेस…
प्रिय प्रिये…
तू माझी
मी तुझा होण्यासाठी
मी लिहित जाईन खुळ लागल्यासारखं…
आणि करीन प्रकाशन लवकरच
जगाला वेड लागल्यासारखं…
आठवतं ना त्यादिवशी
तू मला मांडीवर घेतलं होतंस
तेव्हा आपोआप डोळे मिटले माझे
खरं सांगू??
जग जिंकल्याची जाणीव तेव्हाच झालीय मला..
ऐक ना….
कविता थांबवूच वाटत नाही
पण…
तूच वाहून जाऊ देत नाहीस मला..
तुला भीती वाटते ना
मी वाहून हरवून जाण्याची….
त्या वेड्या खुळ्या तुझ्या मनासाठी
तुझीच कविता
थांबवत आहे…
हं.. थांबतोय…
☆
कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈