मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – कानवसा – ☆ सुश्री उषा जनर्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – कानवसा –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

विसावली एक पक्षिणी

झाडाच्या एका फांदीवर

काय चालले तिच्या मनांत

कुठे असावे तिचे कोटर..?

कावरे बावरे चित्त तिचे

नजर बावरी दूर दूरवर

वाट पहात असावी ती

पिले उडाली तरी कुठवर..?

बसली आहे तरु शलाकेवर

भवतीच्या निसर्ग परिसरात

परी काहूर माजे मनी तिच्या

काय चाले कोवळ्या अंतरात..?

शुष्क कोरडेपणात मोहवी

हरित पालवीची नक्षी

कुणी पहात होता का तिज

तिच्या एकांताचा साक्षी..?

येतील कधी पिले परतूनी

आशा डोकावी नयनांत

तयां संगे मग घेईल फिरूनी

मोदीत झेप उंच गगनांत..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆☆ सार्थक ☆☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? कवितेचा उत्सव ?

सार्थक ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

इंद्रधनुष्याच्या रंगांनी आज

रंगून गेलंय आभाळ

सार्या रंगांनी फेरच

धरलाय आभाळात

आणि मी उडते आहे

त्या रंगांना पकडायला

कधी मला मिळतात

पंख परीचे

कधी  लाभतात

देवदूतांचे!

आणि मग कधी

मी फेर धरते

त्या इंद्रधनुषी

रंगांसवे, तर

कधी इंद्रधनुष्यावरच

स्वार होते, धरुन

रंगांचीच आयाळ

आणि मग परतते

सारे उडते रंग

गोळा करुन कवेत

माझ्या सार्या स्वप्नांच्या

पूर्ततेचं मिळवून सार्थक!

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 107 – येऊन जा जरा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 107 – येऊन जा जरा ☆

हा दाह जाळणारा शमवून जा जरा।

ही ओल भावनांची देऊन जा जरा।

 

नाही मुळीच माया माता पिता नसे।

हे बाल्य खेळवाया येऊन जा जरा।

 

नुरलेत त्राण देही वृद्धाश्रमी जरी।

घर आज आश्रयाला ठेऊन जा जरा।

 

झेलून या विषारी नजराच बोचऱ्या।

अबलेस तारणारा होवून जा जरा।

 

भोगीच आज योगी हे मातले अती।

धर्मांध दानवांना ताडून जा जरा।

 

थकलेत राबणारे जोडून हात ही ।

हे पाश सावकारी तोडून जा जरा।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावित्रीच्या लेकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सावित्रीच्या लेकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

आम्ही सावित्रीच्या लेकी,

  जुन्या की नव्या ?

प्रश्न पडतो कधी कधी,

  कशा होत्या त्या या जगी!

 

एक पुराणातील सावित्री,

 सत्यवानाचे प्राण राखी !

दुसरी आधुनिक सावित्री,

  स्त्रियांची ती झाली सखी!

 

होत्या दोन्ही बुद्धिवान स्त्रिया,

 जपून होत्या स्वातंत्र्याला !

एकीने  जोडला  निसर्ग ,

 तर दुसरीने शिक्षणाचा वर्ग!

 

वसा बुद्धी ज्ञान चातुर्याचा ,

 सावित्री जपे सत्यवानासाठी!

वसा ज्योतीबांच्या सावित्रीचा,

 होता स्त्रियांच्या उद्धारासाठी!

 

जुन्यातील चांगले जपू,

 नाविन्याला साथ देऊ!

सावित्रीच्या उतराई होऊ,

 स्त्रीत्वाचा सन्मान करू!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #129 – कातर वेळी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 129 – विजय साहित्य ?

☆ कातर वेळी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(दशाक्षरी कविता)

नदी रंगते, कातरवेळी

रविकिरणांच्या, पायघड्या

निरोप घेई,रवी कुणाचा

अंधारतीच्या, विश्वात बड्या…!

 

तरंग हळवे, थाट बडा

पाखरझुंडी, मंथर नाद

सुरावटीला, पाखरगाणी

बघ घरट्याची, आली साद…!

 

नदी किनारी, गोड सावल्या

रती मदनाचा, रंगे खेळ

सहवासाची,मादक धुंदी

हितगुज वारा,घाली मेळ….!

 

कोणी चुकला,कोणी मुकला

युवा वयस्कर, विसावला

नदी किनारी, गोड नजारा

भिरभिरताना, सुखावला…!

 

नाही घडले, विशेष काही

तरंग उठले, सभोवती

मार्ग जाहले,जरा प्रवाही

निरोप समई मनाप्रती..!

 

कातरवेळी, चंद्र चांदणी

ओला दरवळ मनोमनी

निरोप नाही, भेट रवीची

मनपटलावर क्षणोक्षणी…!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरीवर सरी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सरीवर सरी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

झांकोळले नभ

आला सोसाट्याचा वारा

गरजती मेघ

कशा कोसळती धारा

 

आल्या सरीवर सरी

वृक्ष वल्लरी भिजती

चिंब चिंब झाले रान

शेते वावरे डोलती

 

ओल्या मातीतला वास

भरे सुगंध श्वासात

वातावरणी गारवा

कुंद कुंद भासे रात

 

आली सागरा भरती

येती लाटांवर लाटा

झाले पाणी चहूकडे

दिसेनाश्या झाल्या वाटा

 

नद्या वाहती दुथडी

उड्या मारती निर्झर

वर्षाराणी नृत्य करी

थुई नाचतो मयूर

 

खिडकीत बसूनिया

झड मुखावरी घेऊ

पावसाचा हा धिंगाणा

डोळे भरूनिया पाहू

 

जाती घाटात पहाया

पावसाळ्याचा नज़ारा

जन ओलेचिंब होती

घेता अंगावरी धारा

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #113 – तुला पाहिले…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 113 – तुला पाहिले…!

 

तुला पाहिले अन् काळजात गलका झाला

हसताच गाली जीव हलका हलका झाला .

 

रांगेत उभा केव्हाचा, प्रेमात मी झुरणारा

डोळ्याला भिडता डोळा, स्वप्नांचा जलसा झाला.

 

रंगांची असते भाषा, माहित नव्हते काही

गालावर येता लाली, गुलाब कळता झाला.

 

हातात हात प्रेमाचा, नजरेची झाली भाषा

प्रेमाचा रंग नशीला, ह्रदयी वळता झाला.

 

झाले रूसवे फुगवे, मन मनांचे झाले

विश्वास सोबती येता,प्रवास सरता झाला.

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आला पाऊस पाऊस… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? आला पाऊस पाऊस ?   श्री रवींद्र सोनावणी ☆ 

आला पाऊस पाऊस, सारे भिजले पाण्यात

आणि अंकूरले बीज, ओल्या मातीच्या मनात

सुखे भिजे माळरान, सोडी निःश्वास कातळ

अंबराच्या डोळ्यांतले, भिजे ढगांचे काजळ

आला पावसाळा, झाली सैरभैर वावटळ

माती ग्रीष्मातली पिते, थेंब टपोरे नितळ

टपटपले अमृत, कुठे कोरड्या चोचीत

थेंब मोतीयांचे झाले, पानाफुलांच्या ओठांत

ग्रिष्म भोगल्या माणसा, नको पाणी पाणी करू

आली मृगाची पालखी, झाला घंटानाद सुरू 

ग्रिष्म वनवासी झाला, आता पुरे नऊ मास

आसुसल्या धरणीची, आता उजवेल कूस

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 136 ☆ माझी वटपौर्णिमा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 136 ?

☆ माझी वटपौर्णिमा… ☆

 कुणीतरी विचारलं सकाळी

चेष्टेने, “तुमचा हा कितवा जन्म”?

माझाही तोच सूर, “सात पूर्ण झाले,

हा आठवा, म्हणूनच,

नो कमिटमेंट “

 

वडाला फे-या मी कधीच घातल्या नाहीत!

लग्नानंतर काही वर्षे,

घरातल्या ज्येष्ठ बायका करतात

म्हणून धरला उपवास,

काही वर्षे कुंडीतल्या फांदीची पूजा !

आणि अचानक आलेली जाग,

नारी समता मंचावर आलेली…

तेव्हा पासून सोडून दिलं,

स्वतःच्या नावापुढे सौ.लावणं !

 श्रावणात सवाष्ण जेऊ घालणं,

आणि “हळदीकुंकू” करणंही !

 

मी नाहीच स्वतःला “स्त्रीवादी”

म्हणवण्या इतकी धीट !

 पण स्त्रीवादी विचारसरणीचा

पगडा मनावर मूलतःच !

माझी आई नेहमीच

धार्मिक कर्मकांड आणि

व्रतवैकल्यात रमलेली !

पण तिची आई–माझी आजी,

सामाजिक कार्याचं व्रत घेतलेली,

उपास तापास न करणारी !

माणूसपण जपणारी-कर्मयोगिनी !

आयुष्यात भेटलेली पहिली आदर्श स्त्री !

 

 त्यानंतर पुस्तकातून भेटल्या,

 “टीन एज”  मधे इरावती कर्वे,

छाया दातार, आणि हो…देवयानी चौबळही!

नंतरच्या काळात विद्याताई,

गौरी देशपांडे,अंबिका सरकार,सानिया

 आणि मेधा पेठेही!

 

जगणं स्पष्ट असावं संदिग्ध नको,

हे मनोमन पटलं !

आणि तळ्यात मळ्यात करत,

जगूनही घेतलं मनःपूत!

 

वटपौर्णिमेलाच कशाला,

नेहमीच म्हणते नव-याला,

“तुमको हमारी उमर लग जाए”

आणि या वानप्रस्थाश्रमात

जाण्याच्या वयात,

व्रत वसा फक्त पर्यावरणवाद्यांचा !

वसुंधरा बचाओ म्हणणा-यांचा,

 

हवा- पाणी -माती

प्रदुषण मुक्त करण्याचा !

झाडे लावण्याचा !

© प्रभा सोनवणे

१४ जून २०२२

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माहेर… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ माहेर… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

(वृत्त – अक्षरछंद – अष्टाक्षरी)

माझ्या माहेराची शान

काय सांगु तुला सये

माहेराचे गाव माझे

जसे आनंदाचे झरे . . . .१

 

वेस ओलांडता कशी

माहेराची ओढ वाढी

नदी खळाळे जोमाने

मन झुळुझुळु वाही . . . . २

 

माझे अंगण घराचे

सडा रांगोळीने खुले

उंबरठ्यावर माय

संस्कारांची वाही फुले . . . . 3

 

देवघर माहेराचे

प्रसन्नता तिथे जागे

माय माझी देवाकडे

सौख्याचेच दान मागे . . . . ४

 

ओंजळीने आई वाहे

देवा पायी जाई जुई

तेव्हा फुलांचा ही गंध

हातामध्ये भरू पाही . . . . ५

 

बापा डोळा येई पाणी

माया डोंगरा एवढी

डोळ्यातल्या आसवांनी

लेकराची दृष्ट काढी . . . . ६

 

सारी लगबग चाले

जेंव्हा लेक दिसे दारी

जसे पुन्हा नवलाई

येई माहेराच्या घरी . . . . ७

 

अशा माहेराची माया

साऱ्या लेकींना लाभावी

माय बापाची लेक ही

सुखी संसारी नांदावी . . . . ८

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares