मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ त्रा ता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 त्रा ता ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

ताप वैशाख वणव्याचा 

साहवेना मजला आता,

बोले येऊन काकुळतीस

काळी भेगाळली माता !

 

जीव सुखला तुजवीण

रुक्ष लाव्हारुपी झळांनी,

अंग अंग पेटून उठले

मागू लागले सतत पाणी !

 

बीज कोवळे पेरणीचे

मज गर्भात आसुसलेले,

कधी होईल जन्म माझा

सारखे विचारू लागले !

 

चार थेंब पडता तुझे

तप्त साऱ्या अंगावरती,

हवा हवासा मृद् गंध

पसरेल साऱ्या आसमंती !

 

नांव सार्थ करण्या माझे

सकलांची धरणी माता,

नाही तुझ्याविना जगात

मज दुसरा कुणी त्राता !

© श्री प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाट्यपद ☆ गो.ब.देवल ☆

?  कवितेचा उत्सव ? 

☆ नाट्यपद ☆ गो.ब.देवल ☆

धन्य आनंददिन पूर्ण मम कामना

मुदित कुलदेवता सफल आराधना

 

लाभ व्हावा जिचा लोभ धरिला महा

प्राप्त मज होय ती युवती मधुरानना.

 

गो.ब.देवल.

नाटक संगीत संशयकल्लोळ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #142 ☆ अत्तर उडून गेले ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 142 ?

☆ अत्तर उडून गेले 

आता नव्या पिढीला मिळणार मोकळेपण

बंधन नसेल आणिक कोणी नसेल राखण

 

बांधीलकी कशाला आकाश स्वैर आहे

स्वीकार कलियुगाला व्यापार मुक्त धोरण

 

उघड्या कुपी मधूनी अत्तर उडून गेले

वेळीच या कुपीचे मी लावले न झाकण

 

नाही सकसपणा हा कोठेच राहिलेला

हे राज्य भेसळीचे मिळणार काय पोषण

 

नाही शुभंकरोती गीता न वाचली मी

संस्कार भावनांचे व्हावे कुठून रोपण

 

बोलू नकोस वेड्या त्यांच्या विरूद्ध काही

नेते करो कितीही अश्लाघ्य रुक्ष भाषण

 

दाणा कसा टिपावा पक्षास ह्या कळेना

हुसकून लावण्याला आहे तयार गोफण

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शोध… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ शोध … ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

सागराला भेटण्याच्या ओढीने

त्याच्या मनाचा तळ शोधत

त्यात आपलं मन गुंतवत

 कित्येक वर्षाच्या तपश्चर्येने

नदी झेपावली

उंच कड्यावरून उड्या मारत

अंतरात काटेसराटे साठवत

विरहाचं अंतर कापत कापत

अखेर ती पोचली

सागर किनाऱ्याजवळ

सागरानं तिला आपल्यात घेतलं

आणि

तिचं नदीपण संपूनच गेलं

आता ती स्वतःला शोधते आहे

आपल्याच उगमाजवळ..!

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनाचे श्लोक (निवडक) ☆ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ☆

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

?  कवितेचा उत्सव ? 

☆ मनाचे श्लोक (निवडक) ☆ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ☆

मना,नीट पंथे कधीही न जावे

नशापाणी केल्याप्रमाणे चलावे

जरी वाहने मागुनी  कैक येती

कधी ना तरी सोडिजे शांतवृत्ती!

           *      *   *

सदा खाद्यपेयावरी हात मारी

बिले देई सारून मित्रासमोरी

“अरेरे,घरी राहिले आज पैसे-“

खिसे चाचपोनी मना बोल ऐसे !

          *        *   *

इथे पायगाडी तिथे वाद्यपेटी

इथे पुस्तके वा तिथे हाथकाठी

अशी सारखी भीक मागीत जावे,

स्वताचे न काही जगी बाळगावे !

          *      *   *

जिथे चालल्या खाजगी कानगोष्टी

उभी आणि धेंडे जिथे चार मोठी,

मना,कान दे तोंड वासून तेथे,

पहा लागतो काय संबंध कोठे !

          *       *   *

 – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #84 ☆ आयुष्याच्या वाटेवर… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 84 ? 

☆ आयुष्याच्या वाटेवर… ☆

आयुष्याच्या वाटेवर, हसून खेळून जगावे

आयुष्याच्या वाटेवर, जीवन गणित पहावे..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, खाच खळगे असतील

आयुष्याच्या वाटेवर, ठेचा खूप लागतील..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, मित्र शत्रू बनतील

आयुष्याच्या वाटेवर, साथ सर्व सोडतील..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, सिंहावलोकन करावे

आयुष्याच्या वाटेवर, वाईट सर्व सोडावे..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, आपलेच आपण बनावे

आयुष्याच्या वाटेवर, स्वतः स्वतःचे डोळे पुसावे..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, पुन्हा वळण नसते

आयुष्याच्या वाटेवर, आठवण फक्त उरते..!!

 

आयुष्याच्या वाटेवर, श्रीकृष्ण फक्त स्मरावा

आयुष्याच्या वाटेवर, राज-योग मिळावा..!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी सांगतो कथा जी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मी सांगतो कथा जी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त: शुद्ध सती  मात्रा:८+४)

मी सांगतो कथा जी

तुमचीच रे कहाणी

तुमचेच हुंदके हे

तुमचीच ही विराणी !

 

आमंत्रणाविनाही

येतो कबीर दारी

गीतात नित्य वाजे

त्याचीच एकतारी !

 

ती दूरची तुफाने

त्यांचीहि गाज श्रवणी

वणव्यात दूर राने

त्यांचीहि राख कवनी !

 

तारा अनाम कोणी

माझा प्रकाश होतो

शब्दांस चांदण्याचे

आभाळ एक देतो !

 

त्या पैलपार हाका

भरती शिडात वारा

त्यांचीच ही कृपा की

कधि लाभतो किनारा !

 

मातीतल्या कहाण्या

झाल्या दिगंत काही

त्यांचीच मंत्रबाधा

या अक्षरांस काही !

 

जादू भगीरथांची

ये ओंजळीत गंगा

करी कोरडे निमित्त

घेण्यास श्रेय दंगा !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मित्रमूर्ती… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मित्रमूर्ती…  ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

नित्य एक मूर्ती

नयनात वसते

हृदयात असते

कुणी बरे,प्रश्न.

 

तोच हात माझे

दृष्टी तोच होई

वेळ काळ माझा

त्याचीयाच ठाई.

 

वाणी वदे सत्य

कर्म जरी तथ्य

श्रवण-मनन

देहाशी निमीत्य.

 

श्वास स्पंद तोची

ज्ञान चेतनात

किती सांगू गाथा

क्रिया अंतरात.

 

अदृश्य प्रसन्न

घडे क्रम भाव

सुख-दुःख ठाव

प्रकृती स्वभाव.

 

आत्म तो संवाद

साधीशी मनात

नाद गुंज मंत्र

जीवाशी ऋणात.

 

तो सखा सतत

सोबती जीवनी

मी सुदाम भोळा

सृष्टी वृंदावनी.

 

प्रेम भक्ती पोहे

आवडीने रुची

तोच घास सत्व

कृष्ण या प्रपंची.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तुझा पाय वामन ठरतो… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? तुझा पाय वामन ठरतो ?   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

इवल्या इवल्या रोपांसाठी

तुझा पाय वामन ठरतो

पाय  पडताच रोपांवर

 त्याच जगणच नष्ट करतो

म्हणून चालताना पहावच

पायाखाली येतय काय

आपण पुढे जाता जाता

डोळस असावेत आपले पाय

काहिंच फुलण झुलण सार

 केवळ असत दुसऱ्या साठी

 परिमलही वाऱ्यास देतात

 तीच गंधित श्वासासाठी

  आभार त्याचे मानू नका

  दुर्लक्षही करून चालू नका

  जमल तर थोड पाणी देऊन

  आधार तयांना द्यावा मुका

   हिरवाई टिकेल तरच

  सम्रुद्वीच होईल जगण

 आपल्या सकल हितासाठी

  सुधाराव  आपलच वागण

चित्र साभार – सुश्री नीलांबरी शिर्के 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देव… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ देव… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

देव दगडाचा तरी,

मन असावेच त्याला

म्हणूनच पुजायचा

आम्ही अट्टाहास केला-

 

आम्ही बांधीयली पुजा,

त्याचे हरवले मन

आणि आमच्या वाटेला

आला केवळ पाषाण-

 

कधीतरी पाषाणाला,

वाटे फुटेल पाझर

असा पिसारा फुलवी

 माझ्या मनाचा मयूर-

 

आता थकला मयूर,

 त्याचा झडला पिसारा

 आतातरी पाषाणाने

 व्हावे समाधीचा चिरा

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares