श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ आत्मा… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
(आनंदकंद)
स्वप्नात रोज माझ्या तू यायचे कशाला
इतक्या खुले पणाने वागायचे कशाला
कमळावरी देवाचे सजलेत छान मोती
स्पर्शून व्यर्थ त्यांना दुखवायचे कशाला
अलवार प्रेम होते भोगून संपलेले
विरहातले निखारे फुलवायचे कशाला
गेले घडून जे जे त्याचाच ग्रंथ झाला
निवडून पान त्याचे वाचायचे कशाला
आनंद घेत जगणे जगतो अजून आहे
सौंदर्य छान आहे मिरवायचे कशाला
सरणात वास्तवाच्या जळतोय एक आत्मा
दाऊन सौंख्य त्याला भुलवायचे कशाला
भरपूर त्रास देते छळतेच खूप जगणे
परतून जन्म असले मागायचे कशाला
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈