प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ गंध अक्षरांचा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
आली अक्षरे जीवनी गंध रानीवनी गेला
बंध जुळती रेशमी पांघरला जणू शेला
नाती मुलायम किती जणू प्राजक्त बहरे
अक्षरांशी जडे नाते असे नाजुक गहिरे…
अक्षरांच्या कुंदकळ्या रातराणी बहरते
जाईजुई तावावर अलगद उतरते
कोरांटीची शुभ्र फुले जणू अक्षरे माळते
पिवळी पांढरी शेवंती रोज मला मोहवते ..
दरवळ केवड्याचा माझ्या अक्षरांची कीर्ति
मोतीदाणे झरतात अशी अक्षरांची प्रीती
अनंताचे अनमोल फुल उमलते दारी
रोज घालते जीवन माझ्या अक्षरांची झारी …
लाल कर्दळ बहरे चाफा मनात गहिरा
मांडवावर दारात मधुमालती पहारा
गुलाबाच्या शाईने मी कमलाच्या पानांवर
उतरतात अक्षरे पहा रोज झरझर…
वर्ख शाईने लावते मोती दाणे हिरेमोती
झोपाळ्यावर अंगणी माझी अक्षरेच गाती
बाळगोपाळांच्या मुखी केली अक्षर पेरणी
गंध आला अक्षरांना दरवळली हो गाणी…
काना कोपऱ्यात गेली जणू फुलला पळस
गुलमोहराचा टीळा केशराचा तो कळस
निशिगंध नि मोगरा माझ्या अक्षरांची रास
रोज घालते ओंजळ तुम्हासाठीच हो खास
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈