श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ लाख दिव्यांचा प्रकाश ☆
कुठून येते रोज वावटळ मनात माझ्या
गरळ मिसळते रोज रोज ती सुखात माझ्या
आज दुधाचा चहा करूनी प्यावा म्हटले
आणि नेमके विरजण पडले दुधात माझ्या
शिरा पाहिजे म्हणून रडती घरी लेकरे
कधी न पडली साखर येथे रव्यात माझ्या
अंधारावर राज्य करावे मला लागते
कधीच नसते तेल इथे रे दिव्यात माझ्या
निसर्ग नाही जरी कोपला शेत आडवे
शेजाऱ्याने गुरे सोडली पिकात माझ्या
उघड्यावर मी लाख दिव्यांचा प्रकाश मिळतो
दिडकी नाही आज जरी ह्या खिशात माझ्या
रोज लावते फेअर लव्हली मी नेमाने
काही नाही फरक तरीही रुपात माझ्या
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈