श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ कोणते मी गीत गावे … ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
मोकळ्या केसात सखये चांदणे माळून यावे
आणखी स्वप्नात माझ्या तू मला भेटून जावे
वाजणा-या पावलांच्या चाहुलीने जाग यावी
स्वागतासाठी तुझ्या मी दीप सारे पेटवावे
थांबुनी दारात थोडी घाल ना मज साद वेडे
तू मला दिसताक्षणी मी मोग-याचे फूल व्हावे
या धरेच्या हिरवळीची पाखरांना भूल पडली
खेळ मांडाया निघाले मोकळ्या रानात रावे
बंधने तोडून सारी ये मला भेटायला तू
कोरुया मग काळजावर फक्त दोघांचीच नावे
काय मागावे जगाला हेच आहे एक कोडे
जिंदगीच्या दोन घटका भोगुनी येथे मरावे
आठवांच्या रागदारी संगीताचा मी भुकेला
प्रश्र्न पडतो या मनाला कोणते मी गीत गावे
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈