मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तो आणि मी…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “तो आणि मी… ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

तो आणि मी

खूप दिवसांनी

एका निवांत क्षणी

भेट सुंदर घडली….

*

रुसलेली खळी 

खुदकन हसली

गालावरती छान

लाली पसरली….

*

डोळ्यांत पाणी 

ओठांवर गाणी

त्याच्या माझ्या भेटीची

अजब कहाणी….

*

सतत जवळ असूनी 

भेट घडत नाही

तडफड भेटीची

काही केल्या संपत नाही…

*

काढून वेळात वेळ

जमला आज मेळ

संपवून टाकला मग 

लपाछपीचा खेळ…..

*

रोज रोजचे ते

दुरुन पाहणे

होता नजरा नजर

स्वतः स रोखणे….

*

आज मात्र घडले

डोळ्यात पाहणे

खोलवर जाऊन

तळ मनाचा शोधणे….

*

तो आणि मी

उत्सुकता किती

जगाला मात्र तो

दिसतच नाही….

*

सर्वांसोबत असतानाही

मनात तो दडलेला

पण कधीच येतं नाही

जगासमोर भेटीला….

*

प्रेम आमचे एकमेकांवर नितांत

जगाच्या गर्दीत करते आकांत

मोकळ्या क्षणी देतो दृष्टांत

सखा तो माझा नाव त्याचे एकांत….

*

एकटेपणाची नसते भीती

एकांत म्हणजे थोडी शांती 

अखंड असतो तो सोबती

जडावी लागते फक्त त्याच्यावर प्रीती..

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काक… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

काक  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

काव काव करी | एरव्ही कावळा

हाकलती त्याला | सारेजण

आठवतो काक | तिसरे दिवशी 

पितृपक्ष म्हाळ | दोन्ही वेळी

आशा ठेवी कसा | गत प्राण देह ?

पोटभर द्या रे | जीतेपणी

जीतेपणी छळ | द्वेष गोळा करी

मेल्यावर का रे | स्नेह दाटे

तिसरा, तेरावा | श्राद्ध वा तर्पण 

जीभेचे चोचले | गोडधोड 

सोवळे ओवळे | श्राद्ध अंधश्रद्धा 

दवा उपचारा | नड असे

अशी रे कितीशी | कावळ्यांची भूक | 

नासाडी अन्नाची | नको करु

तहानेला पाणी | भूकेलेल्या अन्न

हेची पुण्य कर्म | संतवाणी 

सोना म्हणे मग | मिळे खरी मुक्ती 

थोडेसे चिंतन | विवेकाशी

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काजवे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ काजवे ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

काळोखाला हळूवार उजळत

पथदर्शक ठरणारा

काजव्यांचा स्वयंप्रकाशित थवा

आता सक्रिय झाला आहे.

 

तोच दाखवील आता समाजाला 

पानथळ आणि गर्द हिरव्या झाडीन बहरलेलं नवं नंदनवन,

भविष्यातल्या चिरस्थायी वास्तव्यासाठीच…….

 

तिथं आपण सारेच 

एक जथा करून 

घाम गाळून राबत जगायला

कसलीच नसणार आहे आडकाठी 

 

लागणार नाहीत कुणाच्या 

भ्रष्टाचारी कुबड्या आधारासाठी 

या काजव्यांना जपू या जीवापाड 

जावूया स्वयंस्फूर्तीने त्यांच्या सोबत.

 

सांगू या त्यांना आपल्या कथा व्यथा

कारण त्यांची निर्मिती केली आहे निसर्गान,

अंधारबन उजळायला माणसांनी निर्माण केलेलं

 

आता आपणच आधारवड ठरूया काजव्यांचे.

त्यांना देऊया संधी मनमुराद चमकायला,

ते सक्षम आहेत त्यांचं आणि आपलंही 

वर्तमान उज्वल करण्यासाठी…..

 

देऊया आझादी त्यांना

त्यांच्या सुसंस्कृत, विशाल, विश्वासू कर्तृत्वा साठी 

पुढे जाऊन तेच ठरतील दीपस्तंभ.

इतकं तर आपण त्यांच्या साठी नक्कीच करू शकतो.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “अर्धस्फुट ओठी माझ्या…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “अर्धस्फुट ओठी माझ्या…” ☆ प्रा. भरत खैरकर 

अर्धस्फुट ओठी माझ्या..

गाणे कोण गातो वेडा

कधी मनामध्ये वसतो

ते कधीकधी नामानिराळा!

*

अर्धस्फुट ओठी माझ्या..

एक गीत फुलकळीचे

ऐन वसंतात आल्या

आकस्मित पानगळीचे !

*

अर्धस्फुट ओठी माझ्या..

हुंदके कोण देई कोकिळ

घरट्यात कावळे तिच्या

जीवनाचे करुनी वारूळ!

*

अर्धस्फुट ओठी माझ्या..

आर्जवाचे मौनगीत

क्षुधा माझी सांज रंगी 

हरवलेली शोधी प्रीत!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पॅशन… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

स्व-परिचय

मी सौ. अर्चना प्रमोद निकारंगे, राहणार मुंबई येथे, मला कविता व कथा लिहायला खूप आवडतात. मी शिकविण्या घेते. मला लेखनाचा व वाचनाचा छंद आहे .

? कवितेचा उत्सव ?

☆ पॅशन… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

पॅशन जपावी प्रत्येकजण म्हणतो खरं,

ना नशिबी आली तर विस्कटतं का सारं ?

पूर्ततेसाठी हिच्या मनुष्य सर्वस्व देतो

आपल्या अमूल्य गोष्टींचा तो दाता होतो.

*

असते पॅशन शब्दात रेंगाळण्याची,

तर कधी उपजत गुणांना फुलवायची.

पॅशन असो कुठल्याही वयाची

मुभा असते त्यात मनमुराद डुंबण्याची.

*

मनाच्या कप्प्यात दडलेल्या तिला

काढावे हळुवार अलगद बाहेर ;

आणि बहरू द्यावे मनसोक्त 

मजेत मस्त आनंदाच्या लहरींवर 

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काकस्पर्श … ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “काकस्पर्श…” ☆  डॉ. शैलजा करोडे

कावळ्यांना आलेत चांगले दिवस

पितृपंधरवडा सुरू झालाय

नेहमी अन्नाच्या शोधात काक

स्पर्शासाठी मानपान घेऊ लागलाय

*

स्पर्श करता काकने म्हणे

पितरांनी घेतलंय भोजन

जिवंतपणी करत असतात

अर्धपोटी, तर कधी उपोषण

*

पिंडाला शिवता कावळा जाणतसे

पितरं झालेत आता संतुष्ट

हयातीत मात्र तयांना 

दिलेले असतात अपार कष्ट

*

सेवा करा हो माता पित्यांची

जिवंतपणी खाऊ घाला सगळं

मग नाही केलंत तर्पण पिंडदान

तरीही काही घडणार नाही वेगळं

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फक्त उदाहरण म्हणून… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ फक्त उदाहरण म्हणून…  सुश्री नीलांबरी शिर्के 

 कृष्णाष्टमीला कृष्णजन्म

रामनवमीला जन्म रामाचा

दिवस उरला आहे केवळ

उत्सव साजरा करण्यापरता

*

 कुणी न करतो रामाचरण

 कुणी न द्रौपदीचा कृष्ण 

 महाभारत नित्यच घडते

 आमच्या भवती हे कारण

*

 देवाचे अवतार जाहले

 मानव जिवा उद्धरण्या

 पुजनासवे वसा असावा

 थोडे अनुकरण करण्या

*

 देव देवळातच राहतील

 महाभारतच घडत जाईल

 लाज राखणारा कृष्णसखा

 उदाहरणी केवळ राहील

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मॉडर्न ते गोल्डन…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? कवितेचा उत्सव  ?

☆ “मॉडर्न ते गोल्डन…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

आम्ही परसाकडे जात होतो तेव्हा,

तुम्ही शौचालय गाठलं

आम्हालाही वाटलं

तुमच्यात यावं

म्हणून,

आम्ही पण शौचालयाजवळ आलो

पण तुम्ही,

ते सोडलं आणि

बाथरूममध्ये गेलात

आम्हीच आम्हाला मागास ठरवून

बाथरूममध्ये येणारच

तोवर तुम्ही टॉयलेटकडे पळालात

मग,

आम्ही पण धावत टॉयलेटजवळ आलो

पण तेवढ्यात तुम्ही वॉशरूम घेतलं

आम्ही वॉशरूमपर्यंत यायच्या आधीच

तुम्ही,

डायरेक्ट फ्रेश व्हायला निघून गेलात…

तुमचा पाठलाग करून आम्ही थकून गेलो

तुम्ही आम्हाला गावंढळ समजून लांब ठेवलं…

आम्ही मिरच्या भाजून

झणझणीत ठेचा कुटला

तेव्हा तुम्ही सॉस घेतला

आम्ही आळणी वाढणार

तेवढ्यात तुम्ही सूप पिले

पातीचा कांदा आम्ही ताटाला लावला

तर तुम्ही सॅलड मागवलं..

आम्ही चुलीवर

पिठलं भाकरी बनवून दिली

तुम्ही पिझ्झा बर्गर जवळ केला..

साजूक तुपातली खिचडी घेऊन

आम्ही तुमच्याजवळ आलो

तुम्ही चायनीज नूडल्सची ऑर्डर दिली

तुमचा पाठलाग करून

आम्ही थकून गेलो

तुम्ही आम्हाला गावंढळ समजून

लांब ठेवलं

आम्ही भारतातच राहिलो

तुम्ही इंडियामध्ये सामील झालात

पण एक लक्षात ठेवा

तुम्ही कितीही मॉर्डन झालात तरी

फ्रेश होऊन

पिठलं भाकरी खायला

तुम्हाला भारतातच यावं लागेल…

आम्ही मॉडर्न होण्याचा नाद सोडलाय

आम्हाला कळून चुकलं आहे

आम्ही गोल्डन आहोत

आम्ही गोल्डन आहोत

आम्ही गोल्डन आहोत….

कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दोन काव्ये — (१) पुढच्या वर्षी लवकर या… श्री प्रमोद वामन वर्तक (२) संपदा… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पुढच्या वर्षी लवकर या… श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आपण येणार म्हणून

वर्षभर वाट पाहिली,

उद्या जाणार म्हणून 

आसवे डोळा दाटली !

*

 येत राहील आठवण

 दणदणीत आरत्यांची,

 खड्या सुरात म्हटलेल्या 

 मंत्र पुष्पांजलीची !

*

चव आता आठवायची 

रोजच्या गोड प्रसादाची,

डोळ्यासमोर आणायची 

आरास तुमची दिव्यांची !

*

 झालो आम्हीच लंबोदर 

 लाडू मोदक खाऊन,

 पुन्हा शेपमधे येणे आहे 

 दररोज जिमला जावून !

*

आपण जाताच घरी

मखर होईल सुने सुने,

माफी असावी गणराया

झाले असेल अधिक उणे !

झाले असेल अधिक उणे !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संपदा☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(वृत्त : केशवकरणी)

सोनसळी ते रान जाहले भरले दाणे कुणी

लोंबले तुरे टपोरे तृणी

*

निर्माता तो या सृष्टीचा अगाध लीला खरी

तोचि बघ उदरभरण हो करी

*

सूर्य उगवतो प्रकाश देतो जलधारा बरसती

वावरे मोदभरे डोलती

*

पर्वत शिखरे नद्या धबधबे सागराची भरती

सर्व ही त्या एकाची कृती

*

वृक्ष लता अन् तृणपुष्पे ही देवाची लेकरे

मानवा तुझ्याचसाठी बरे

*

घाव कशाला घालतोस तू जाळतोस जंगले

कळेना काय तुला जाहले

*

बंधुत्वाचा भाव असूदे तुझ्या मनी रे सदा

जपावी निसर्ग ही संपदा

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “जीवन व्हावे कोकीळ गाणे…“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

जीवन व्हावे कोकीळ गाणे…  श्री सुहास सोहोनी ☆

साधी सुंदर सोपी वाट

ताशिव पाषाणाचा घाट

एका बाजुस सुमने पुष्पे

दुजा बाजुला निर्मल पाट…

*

यात्रिक पाथिक आणिक बहुजन

भले बुरे नेण्यासी वाहुन

स्थितप्रज्ञशा सजग पायऱ्या

सिद्ध नाम करिती सोपान…

*

तांबूस पिवळी पहाट यावी

चाहुल हलकी कानी पडावी

पदचिन्हे तव भाग्य घेउनी

नकळत वाटेवर उमटावी…

*

सायंकाळी बाळ प्रदोषा

घेऊन येई मंगल आशा

पुण्यदायिनी दोषनाशिनी

वाट अंगणी येवो ईशा…

*

पवित्र मंगल वाटेवरुनी

सदैव व्हावे येणे जाणे

आनंदाचा घन बरसावा

जीवन व्हावे कोकिळ गाणे…

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
image_print