श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

कवितेचा उत्सव 
☆ रंजना जी यांचे साहित्य # 83 – मानाचा मुजरा ☆
सह्याद्रीचा सिंह गर्जता झुकती या नजरा ।
छत्रपती शिवबांना हा मानाचा मुजरा ।।धृ।।
दुराचारी हे यवन मातले करू लागले अत्याचार ।
मायभूमीला ग्रहण लागले ग्रासू पाहे अंधःकार।
शिवनेरीवर बाळ जन्माला जणू हा तेजपुंज तारा।।१।।
माय जिजाऊ नित्य पेरते संस्कारांचे बीज।
रामकृष्ण अन्अर्जुनाच्या सांगे शौर्याचे तेज।
पराक्रमाची शर्थ जणू हा शक्ती युक्तीचा झरा ।।२।।
बाल लीला ही वीराची या असे जगा वेगळी ।
तलवारींचे खेळ खेळती बालवीर आगळी ।
स्वराज्याची शपथ घेतली साक्षी ठेवून रायरेश्वरा।।3।।
वीर मावळा संगे घेऊन करीतसे घोडदौड ।
स्वराज्याचे तोरण बांधिले घेऊन तोरणगड।
चंद्ररावांना घडता अद्दल बसला यवनांना हदरा ।।४।।
असुरी अफजलखान कोसळे ,बोटे सोडून शाईस्ता पळे।
पुरंदरचा तह सांगतो,स्वामीनिष्ठा प्रती कळवळे ।
आग्र्याहून सुटका ही तर, चपराक शाही दरबारा।।५।।
अगणित वीरांनी ही दिधल्या , प्राणांच्या आहूती।
गोब्राम्हण प्रतिपालक , शिवबा बनले छत्रपती ।
वीर मातेचे स्वप्न पुरवी हा सह्य गिरीचा हिरा ।।६।।
शिस्त मोडता घडते शासन , न्याय देविचे होई पूजन।
परस्त्रीलाही माता मानून , परधर्मांना अराध्य मानून ।
लोकहिताला सदै जागृत , राजयोगी हा खरा।
छत्रपती शिवबांना माझा
मानाचा हा मुजरा।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈