मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ थंडीची चाहूल ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ थंडीची चाहूल ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

सरे.. रिमझिम धारा

लागे..थंडीची चाहूल

दिवाळीसोबत… टाके

थंडी..हळूच पाऊल..१

 

बळीराजा.. आनंदून

करी..रब्बीची लागण

काळया.. आईच्या गर्भात

नव बीज.. अंकुरण….२

 

झाडाखाली.. दिसे सडा

जर्द.. पिवळ्या पानांचा

हुडहुडी.. भरण्याचा

ऋतू हा.. पानगळीचा..३

 

पाला.. पाचोळा सारा

होई…शेकोटीत गोळा

फड…रंगती गप्पांचे

मिळे.. आनंद वेगळा…४

 

बाळराजे.. पाळण्यात

निजे…शाल लपेटूनी

उबदार.. गोधडीत

आजीच्याच…आठवणी..५

 

सुका मेवा..पेरू,बोरे

तीळ.. शेंगदाणा चिक्की

शरीराची.. जपणूक

व्यायामाने.. होते नक्की..६

 

वाटे..हवासा गारवा

ऋतू..गुलाबी भेटीचा

शहारल्या..स्पर्शातून

धुंद..क्षण जपण्याचा..७

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 89 – एस टी..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #89 ?

☆ एस टी….! ☆

परवा माणसांनी गच्च

भरलेली एसटी पाहिलीआणि ..

सहज वाटून गेलं…

किती सहन करत असेल ना

ही एसटी…

ऐकून घेत असेल

एसटी मध्ये असणाऱ्या

प्रत्येकाचं सुख: दुःख

तर कधी…

उघड्या डोळ्यांनी

पहात असेल..

कुणाच्यातरी डोळ्यातून

ओघळणारे चार दोन थेंब..

तर कधी

गुदमरून जात असेल

 ह्या असंख्य माणसांच्या गर्दीत..

तिलाही वाटत असेल खंत..

हे सगळं ऐकत असून,

पहात असून आपण

काहीच करू शकत नाही ह्याची…

पण मला तिला सांगायचंय..

की तुला ठाऊक नाही

तुझा हात सोडून खाली

उतरल्यावर ही असंख्य माणसं

तुझे आभार मानत असतील..

कारण…गावी गेल्यावर ..

आईला पाहून जितका आनंद होतो ना..

तितकाच आनंद ह्या माणसांना

गावी जाताना तुला पाहिल्यावर होतो..

त्यांना ठाऊक असतं…

एसटी मध्ये बसल्यावर

आपलं ऐकणारी..

आपल्याकडे पाहणारी..

आपलं कुणीही नसताना

आपल्याला सुखरूप घरी पोहचवणारी..

आणि..

चार दोन क्षण डोळे मिटल्यावर

मायेच्या प्रेमानं कुशीत घेणारी..

जर कोणी असेल

 तर ती तू आहेस…

आणि म्हणूनच

ही माणसं तुला एसटी

म्हणत नाहीत तर

लाल परी म्हणतात…

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सापडावा सूर माझा ☆ श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ सापडावा सूर माझा ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

खुद्द आकाशाने

शोधावे मेघाला.

झाडांनी शोधावे

सावलीला .

तहान लागावी

वाहत्या पाण्याला.

पूर अनावर

नदी ,पापणीला .

कधी विसंगतीने

शोधावे भारुड.

जडावे गारुड

विपरीत .

एका जनार्दनी

आक्रोश घडावा

आणि सापडावा,

सूर माझा.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 111 ☆ अरुंधती ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 111 ?

☆ अरुंधती ☆

 ऋषीपत्नी अरुंधती

गाऊ तिचीच आरती

एकनिष्ठा पतिव्रता

सुयज्ञाची हीच माता !

 

वशिष्ठ नि अरुंधती

युगानुयुगे जन्मती

आदर्श हे पती पत्नी

अढळपदी पोचती !

 

पातिव्रत्य धर्म तिचा

असे मनस्वी मानिनी

 दक्षराजाची ती कन्या

कुलवती सौदामिनी !

 

आतिथ्य धर्म आचारी

तेजस्वी गुणसुंदरी

गाऊ गुणगान तिचे

सारे जन्म हो भाग्याचे

 

तारा तो चमचमता

देवी अरुंधतीमाता

नवदांपत्ये प्रार्थिती

लाभावया फलश्रुती

 

पुण्यवती पावन ती

 शुभांगिनी सुभाषिणी

अलौकिका ही भामिनी

कृतार्थ झाली जीवनी!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोस तू माझ्या जिवा रे ☆ बा.भ.बोरकर

बा.भ.बोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सोस तू माझ्या जिवा रे ☆ बा.भ.बोरकर ☆

(बालकृष्ण भगवन्त बोरकर (30 नोव्हेम्बर 1910- 8 जुलाई 1984))

सोस तू माझ्या जिवा रे,सोसल्याचा सूर होतो,

सूर साधी ताल तेव्हा भार त्याचा दूर होतो.

 

दुःख देतो तोच दुःखी जाणता हे सत्य मोठे,

कीव ये दाटून पोटी दुःख तेणे होय थोटे.

 

या क्षमेने सोसले त्या अंत नाही पार नाही,

त्यामुळे दाटे फळी ती पोळणा-या ग्रीष्मदाही.

 

त्या क्षमेचा पुत्र तू हे ठेव चित्ती सर्वकाळी

शीग गाठी दाह तेव्हा वृष्टी होते पावसाळी.

 

त्या कृपेचे स्त्रोत पोटी घेऊनी आलास जन्मा,

साद त्यांना घालिता तू सूर तो येईल कामा.

 

फळी=फळात
शीग= कमाल मर्यादा

– बा.भ.बोरकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांभाळ तू…. ☆ श्री राजकुमार कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सांभाळ तू…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

रोजचे सारे तरी…. सांभाळ तू

ना कशाची खातरी..सांभाळ तू

 

संकटांची वादळे घोंगावता

धीर-ज्योती अंतरी…सांभाळ तू

 

बंगला लाभेल ना लाभेलही

ही सुखाची ओसरी…सांभाळ तू

 

वाट हिरवाळीतुनी आहे जरी

खोल बाजूंना दरी… सांभाळ तू

 

सांत्वने येतील खोटी भेटण्या

आसवांच्या त्या सरी…सांभाळ तू

 

वाद..द्वेषा..मत्सरा.. दुर्लक्षुनी

बोलण्याची बासरी…सांभाळ तू

 

काम..घामावीण खोटा दाम रे

जी मिळे ती चाकरी…सांभाळ तू

 

भोग.. संपत्ती..न किर्ती..स्थावरे

आस ही नाही खरी…सांभाळ तू

 

खीर.. पोळी उत्सवांची भोजने

रोजची ही भाकरी…सांभाळ तू

 

लोक थट्टेखोर.. घेणारे मजा

वादळे मौनांतरी…सांभाळ तू

 

राहू दे स्वप्नात स्वप्नींची नभे

आपुली माती बरी…सांभाळ तू

 

सोबतीला वृध्द हे, सत्संग हा

या उबेच्या चादरी…सांभाळ तू

 

दुर्लभाचा लाभ..जाई हातचे

‘ठेव सारी’ तोवरी…सांभाळ तू

 

वेळ.. जागा …’घात’ ना पाहे कधी

आपुल्याही त्या घरी…सांभाळ तू

 

वाहता आजन्म तू धारांसवे

काठ हा आतातरी…सांभाळ तू

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 114 ☆ प्रकाशाचा पूर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 114 ?

☆ प्रकाशाचा पूर ☆

अमावास्येच्या रात्री

अंधारात भटकताना

एक चंद्र दिसला

आणि मार्गातला अंधार

थोडा कमी झाल्यासारखा वाटला

तसा मार्ग खडतर होता

ठेचकाळत चालताना

चंद्र मला सावरत होता

तोल माझा ढळताना

अंधाराला हळूहळू माग सारत गेल्या

चंद्रासाठी धावून मग चांदण्या पुढे आल्या

अंधाराचं मळभ आता झालं होतं दूर

चंद्रासोबत आला होता प्रकाशाचा पूर

चंद्र पौर्णिमेचा दिसेल वाटलं नव्हतं कधी

पंधरवड्याची यात्रा माझी झाली नव्हती आधी

आता माझे उजेडाशी जुळले आहेत सूर

भरून आहे घरामध्ये चंदनाचा धूर…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध :केतकी आणि कार्तिकचं कडाक्याचं भांडण चाललेलं होतं. तेवढ्यात केतकीच्या फोनची रिंग वाजली.  आता पुढे….)

“हॅलो, अगं, काय झालं, आई? रडतेयस कशाला?”

“………”

“घाबरू नकोस. मी येते आत्ता. डॉक्टरना फोन केला की करायचाय?”

“………”

“हो, हो. तो आहे इकडेच.”

खरं तर केतकी कार्तिकला काही सांगणारच नव्हती. पण तिचं बोलणं ऐकून त्यानेच विचारलं, “बाबांना बरं नाहीय का?”

“हो. तिच्या सांगण्यावरून तरी पॅरॅलिसिसचा अटॅक आल्यासारखं वाटतंय. मी जाते.”

“थांब. मीही येतो.”

केतकी त्याला ‘नको ‘ म्हणाली नाही.

वाटेत केतकीने पुष्करादादाला फोन केला. “काकांना एवढ्यातच काही बोलू नकोस… मी तिथे पोचल्यावर डॉक्टर काय म्हणतात, ते तुला सांगते. गरज पडली तर तू निघ.”

“……….”

“तो आहे माझ्याबरोबर.”

“……….”

“बरं. ये मग.”

मध्येच कार्तिकने गाडी थांबवली आणि तो एटीएममधून कॅश काढून घेऊन आला.

बाबांची अवस्था बघितल्यावर केतकीला रडूच आलं.

“स्वतःला कंट्रोल कर, केतकी. नाहीतर ती दोघं अजूनच घाबरतील,”  कार्तिक तिच्या कानात कुजबुजला.

‘म्हणे कंट्रोल कर. ह्याच्या वडिलांना असं झालं असतं तर?….. पण बरोबरच आहे ना, तो म्हणतोय ते,’ केतकीच्या मनात आलं.

तेवढ्यात डॉक्टर आले.त्यांनी ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितलं. तशी नोटही दिली.

पुष्करदादा आणि शीलूताईही आले.

आईला हॉस्पिटलमध्ये यायचं होतं. पण कार्तिकने सांगितलं, “ते अलाव नाही करायचे सगळ्यांना. तुम्ही येणार असाल, तर केतकी थांबेल घरी.”

“नको, नको. तिलाच जाऊदे. मी थांबते घरी.”

मग आईच्या सोबतीला शीलूताई थांबली. आणि ही तिघं बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.

ऍडमिशनच्या वेळी कार्तिकने कधी सूत्रं हातात घेतली, ते केतकीला कळलंच नाही. अर्थात कळलं असतं, तरी ती वादबिद घालायच्या मन:स्थितीत नव्हती.

दिवसा केतकी, शीलूताई, वहिनी आळीपाळीने थांबायच्या. अधूनमधून आई यायची.

रात्री मात्र कार्तिकच राहायचा तिकडे.

“थँक्स कार्तिक. मी खरंच आभारी आहे तुझी. आपल्यात काही रिलेशन राहिलं नसूनही तू माझ्या वडिलांसाठी……..”

यावर कार्तिक काहीच उत्तर द्यायचा नाही.

हळूहळू बाबांच्या तब्येतीला उतार पडला.

“एक-दोन दिवसात डिस्चार्ज मिळेल, असं डॉक्टर म्हणाले, आई. तू अजिबात काळजी करू नकोस. मी रजा घेते आणि तिकडेच राहायला येते. ब्युरोला फोन करून अटेंडंटची व्यवस्था करते.”

“बरं होईल गं, तू असलीस तर. मला एकटीला सुधरणार नाही हे. पण कार्तिकच्या जेवणाखाण्याचं काय? त्यालाही बोलव आपल्याकडेच राहायला.”

‘खरं तर त्या निमित्ताने आईकडे राहायला सुरुवात करता येईल. मग त्या कार्तिकचं तोंडही बघायला नको,’ केतकीच्या मनात आलं.

“त्यापेक्षा तुम्हीच या आमच्याकडे थोडे दिवस. आमच्याकडून हॉस्पिटल जवळ आहे. शिवाय तुमचा तिसरा मजला. लिफ्ट नाही. आमच्याकडून फॉलोअपसाठी न्यायलाही  सोईस्कर पडेल,” कार्तिकने सुचवलं.

“बरोबर आहे, कार्तिक म्हणतोय ते.आणि केतकीकडे स्वयंपाकाला   वगैरे बाई आहे. त्यामुळे काकीचीही धावपळ नाही होणार,”शीलूताईने दुजोरा दिला.

हे दोन्ही मुद्दे तसे बिनतोड होते.

‘ही कार्तिकची कॉम्प्रोमाईज करण्याची चाल तर नाही ना?’ केतकीला वाटलं, ‘पण तो म्हणाला, ते खरंच तर होतं. शिवाय स्वयंपाकाची बाई वगैरे सर्वच दृष्टींनी आपल्या घरी राहणं, आपल्यासाठी सोयीचं होतं. त्यातल्या त्यात नशीब म्हणजे कार्तिकने स्वतःहूनच हे सुचवलं होतं.’

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेम कोणीही करेना ☆ माधव जूलियन

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धनऊर्फ माधव जूलियन

(जन्म : बडोदा, २१ जानेवारी १८९४; – २९ नोव्हेंबर १९३९)

?  कवितेचा उत्सव ? 

☆ प्रेम कोणीही करेना ☆

प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी?

प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी?

 

आपुल्या या चारूतेशी विस्मरूनी जा सुकेशी

भाळता कोणास देशी का न भक्तीची कसोटी?

 

प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी

प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी.

                   

 – माधव ज्युलियन

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनोळखी गांव ☆ मेहबूब जमादार

? कवितेचा उत्सव ?

☆ अनोळखी गांव ☆ मेहबूब जमादार ☆

म्हणायचीस नेहमी तू, अखंड देईन साथ

मग का बरे सुटावा, मध्येच तुझा प्रेमळ हात?

 

कॉलेजकट्ट्यावर झालेली तुझी पहीली भेट

काय झाले,पण काळजात रूतूनी बसली थेट

 

हळुहळू रस्ते चुकले मग तास ही चुकून गेले

कॉलेजात येवूनही  सारे तास बगीच्यात झाले

 

भेटीवरून भेटी सरल्या, खरेच जुळले यमक

घरच्यानां कळून चुकले आपल्या भेटीतले गमक

 

ब-याच दिसानीं घडले विपरीत रस्ते चुकून गेले

ओळखीचे गांव आपुले, का बरेअनोळखी झाले?

 

– मेहबूब जमादार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares