सुश्री प्रभा सोनवणे
☆ गझल ☆
आज सा-या तारकांनो हे जरासे नोंदवा
रात्र होता काजळी मिरवून जातो काजवा
मी कशाला त्या सुखाची आर्जवे केली पुन्हा
दुःख माझे राजवर्खी ना कशाची वानवा
या जगाचे मुखवटे फाडून होते पाहिले
मैफिलीचे रंग खोटे, बाटलेल्या वाहवा
चित्रगुप्ता तू म्हणाला, नांदली आहेस ना
नांदताना भोगलेले आज येथे गोंदवा
जन्म सारा संभ्रमातच काढला आहे जरी
संत सज्जन कोण ते आता मलाही दाखवा
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011