डॉ. सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ हे नराधमा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
हे नराधमा..
हिंमतीने वादळ झेलणारी ती
जन्माला येईलच
मुलीला जन्माला घालू नये
म्हणणारी पळपुटी ती नाही
ती पुन्हा तिला जन्माला घालेल
*
तू तिच्यावर बलात्कार केलास,
पण जिद्दीने परत
तिने स्वतःला उभे केले
*
तू अॕसिड फेकून
तिचा चेहरा विद्रुप केलास,
पण जिद्दीने परत
तोच चेहरा घेऊन…
तिने स्वतःला उभे केले
*
जेव्हा तुला कळली तिची जिद्द
तू अत्याचार करुन तिला संपवलेस
अनेकदा जाळून टाकलेस
*
आता मात्र कहर होत चालला
सामूहिकतेने बलात्कार करून
विकृतीलाही लाजवेल
अशी निर्घृण, अमानवी, पाशवी
कृती करून काय मिळवतोस.. ?
*
तू कसा विसरतोस रे मुर्खा
तिच्याशिवाय तू नाहीस
तिच्याच पोटचा जन्म तुझा ?
*
पण लक्षात ठेव
याच राखेतून ती स्वतःला
पुन्हा उभी करेल…
अनेक उभ्या राहतील
तुझ्या वृत्तीला संपवायला.
*
तिने तुला जन्माला घातलंय,
तिने तुला वाढवलंय पोटात
तू तिला वाढवले नाहीस
हे तू कदापि विसरु नकोस..
*
तुझ्या मागे कितीही असू देत हात
विकृत, मतलबी, स्वार्थी
सत्ता लाचारीत बरबटलेले
तुला संपवायलाही ती आता
मागे-पुढे पाहणार नाही…
*
तिने ठरविलेच तर
तुझा जन्म नाकारु शकते
पण ते कसे चालेल हे जाणून,
ती तसे करणार नाही.
*
आता बस्स
Enough is enough
वृत्ती तुझी कळली तर
आई म्हणून
घरीच तुला ठेचेल वा
करेल तुला पोलिसांच्या हवाली..
*
तोडून टाकेल ती
तुझे अत्याचारी हात आणि लिंग..
ज्याच्या जोरावर म्हणवत होतास
स्वतःला मर्द
तुझ्या पाशवी वृत्तीची शिक्षा
का सोसावी इतरांनी… ?
*
झालीच कायद्याची अडचण तर
घालेल तुला गोळ्या
पूर्ण आरपार…
*
लक्षात ठेव.
“ती” च तुला संपवेल,
पण पद्धत तिची वेगळी असेल..
*
तू हे विसरू नको
ती घाबरट वा भित्री नाही
हिंमतीने वादळ झेलणारी
सावित्री-ज्योतिबाची लेक ती
पुन्हा जन्माला येईल
ती पुन्हा तिला जन्माला घालेल.. !
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈