सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 71 ☆
☆ माणुसकी ☆
“माणुसकी हरवत चालली आहे”
हे वाक्य मी वाचते जेव्हा सर्वत्र,
तेव्हा मला ती सापडते,
माझा नातू सोसायटीतल्या भटक्या कुत्र्यांना लावतो लळा,
प्रेमाने खाऊ घालतो,बिस्किटे, अंडी, ताजी चपाती, चिकन, मटण!
त्याच्या भूतदयेत माणुसकी दिसते मला!
माझ्या घरातल्या प्रत्येकातच सापडते ती कुठल्या कुठल्या प्रसंगात!
मी लहानपणी पेशवे पार्कात हरवले होते तेव्हा मला आईपर्यंत आणून सोडणा-या….
त्या कॅथलिक मुलीची आठवण काढायची आई नेहमीच…
मला तो प्रसंग आठवत नाही,
पण आईने केलेल्या पारायणातून
आठवते त्या मुलीतली माणुसकीच !
“मला काय त्याचे?”
या वृत्तीचे फारसे कोणी भेटलेच नाही
अशी माणसे दिसतात फक्त बातम्यात,सिनेमात, वर्तमानपत्रात, कथा कादंबरीत!
माझ्या अंतःवर्तुळातली सारीच माणसे माणुसकी जपणारी,
ती दिसते अवतीभवती,
नर्सेस डाॅक्टर्स, पोलीस कर्मचारी,
सेवाभावी संस्था, आणि विविध सेवा पुरविणा-या सर्वांमध्ये ,
देवालयात, पंडित-पुज-यामध्येही !
शिक्षक-प्राध्यापकांत,कवीकुळात,रसिकवर्गात अनुभवाला आली ती
उदंड माणुसकीच!
मी म्हणू शकत नाही, माझ्यापुरतं,
माणुसकी हरवत चालली आहे,
पण माझ्या विश्वा बाहेरच्या विश्वातूनही माणुसकी हरवू नये कदापिही—–यासाठी करते नित्य नियंत्याची प्रार्थना…..
हिच असावी माझ्यातली ही माणुसकी!
सा-याच प्रवृत्ती मानवी मनात कमी जास्त प्रमाणात निर्माण करणा-या विश्वनिर्मात्याला हे पक्के ठाऊक आहे, माणुसकीला काळीमा फासणा-या घटना घडत आहेत युगानुयुगे…………
पण माणुसकी टिकून राहणार आहे विश्वाच्या अंतापर्यंत !!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈