सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ कवितेचा उत्सव ☆ देवीचे नवरंगी नवरात्र ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
पहिल्या माळेला रंग करडा,
देवीला देऊ या मानाचा विडा!
दुसरी माळ सजे केशरी रंगाने,
सजवी देवीला झेंडूच्या हाराने!
पांढऱ्या रंगाची माळ तिसरी,
पावित्र्य घेऊन आली साजरी!
लाल रंग घेऊन चौथी माळ आली
जास्वंदीची लाली देवीच्या गाली!
पाचव्या माळेला निळे आभाळ,
कुंकुमार्चनाने खुले देवीचे भाळ!
शेवंतीची फुले वाहू सहाव्या माळेला,
पिवळ्या रंगाचा शालू शोभे देवीला!
सातव्या माळेला हिरव्या ची किमया,
देवीला भरू या बांगड्या हिरव्या!
आठवी माळ करी जांभळ्याची उधळण!
देवीला खेळाया मंदिराचे प्रांगण!
नववी माळ सजे गुलाबी रंगाने,
देवी सौख्य देई गुलबक्षी साजाने!
नवरंगाची पखरण होई नऊ दिवस,
दसर्यास सज्ज होई देवी सीमोल्लंघनास !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈