मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चारोळ्या ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

☆ कवितेचा उत्सव ☆ चारोळ्या ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

[1]

पहाटेचा मंगलमय प्रहर

झाला गजर खोचला पदर

गृहकृत्याला करायला हसत

आपलेपणाने स्वतः हजर

[2]

झटकून घालत चादरीच्या घड्या

आळसाला दूर पळवते

अंगण झाडून काढतानाच

अमंगल सारे कचऱ्यात टाकते

[3]

कोरड्या पिठाला ओलावा देत

करते मळून नरम गोळा

लाटून गरम तव्यावर जाता

टम्म् फुगतात सोसत झळा

[4]

खसाखसा भाज्या चिरून

खमंग फोडणीत ठेवते शिजत

अतरंग एकत्र मिसळत

खुमासदार सारं असतं घडत

[5]

बागेमघे ठेवते पाणी अन शित्

चिमणपाखरू चिवचिवत येतं

अंगण सार बोलक होतं

घरातल्या बाळाला बाळसं येतं

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांधेजोड ☆ सौ.नीलम माणगावे

सौ.नीलम माणगावे

☆ कवितेचा उत्सव ☆ सांधेजोड ☆ सौ.नीलम माणगावे ☆ 

त्याच्या पांढऱ्या राजाला

मी असं कोंडीत पकडलं,

की एक पाऊल उचलणं त्याला कठीण होऊन बसलं

शरणागती पत्करून मागे जावं,

तर माझा घोडा

अडीच पावलं टाकून त्याला मारायला तयार होता

कसाही वार करण्याच्या पवित्र्यात

उजवीकडे प्रधानाने रस्ता आडवला होता

डावीकडे लांबवर तिरक्या चालीचा उंट

टपूनच बसलेला

बाकी सभोवती त्याच्याच सैन्याने त्याचा रस्ता रोखलेला

आता हरण्याशिवाय पर्याय नव्हता

बचावाच्या भूमिकेतून त्याने पुन्हा , चेक देऊन

खिंड लढवणार्या माझ्या सशक्त हत्तीला मारून

आपला रस्ता मोकळा केला

आणि त्याचक्षणी

माझ्या छोटुल्या प्याद्याने

त्याच्या राजाला उडवून टाकला

‘हरलास, तुझा राजा मेला..’मी म्हणताच

पडलं तरी नाक वर च्या अविर्भावात तो म्हणाला,

‘चल, आपण राजा नसताना खेळून पाहूया’

त्याच्या लक्षातही आलं नाही,

की जीवनात फक्त खेळच महत्त्वाचा नसतो

की नसते फक्त जीत

हरण्यातही गंमत असते

जोडीदाराच्या चेहऱ्यावरचा जेतेपदाचा आनंदही

बेड्या तोडण्याची नशा देते

खऱ्या अर्थाने.. ती सांधेजोड असते

मोकळ्या जागा भरून काढते

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – तुळशी विवाह ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य – तुळशी विवाह ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कार्तिकाची एकादशी

त्रिपुरारी पौर्णिमेचा

कालखंड सौभाग्याचा

तुळशीच्या विवाहाचा.. !

वृंदा नामे पतिव्रता

तुळशीचे निजरूप

विष्णू कृपा लाभण्याला

विवाहाचे वाजे सूप. . . . !

हिंदू धर्म संस्कृतीने

तुळशीला दिला मान

शेषशायी विष्णू शोभे

वर तिचे पंचप्राण. . . . !

चिंचा, बोरे आवळ्याने

तुळशीची भरू ओटी.

ऊसमामा आणि वधू

फराळाची ठेव मोठी.

आरोग्याची वृंदावन

अंगणात सजवावे

सृजनाच्या सौभाग्यात

आनंदाने मिरवावे . . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोकळा श्वास ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ मोकळा श्वास ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 

मोकळा श्वास घेण्या

धैर्यास गाठले मी

मुखवटे मीच माझे

टरटरा फाडले मी

 

साधण्या  स्वार्थ माझा

शकूनीही जोडले मी

कपटी कुटील फासे

कटकटा तोडले मी

 

कितिदा अश्व माझा

बैलांसवे  जुंपला मी

ती गाठ कासऱ्याची

सरसरा सोडली मी

 

शाश्वत विचार माझे

मी दाबले मुखाशी

बुरखा तटस्त्त तेचा

चरचरा फाडला मी

 

आनंद जीवनाचा

लूटण्या अधीर झालो

तो मोह मृगजळाचा

हळुवार टाळला मी

 

आहे तसाच जगण्या

बाहेर मी निघालो

पिंजरा प्रतिष्ठेचा

तटतता तोडला मी

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 74 – हे ईश्वरा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 74 ☆

☆ हे ईश्वरा ☆

किती स्वप्ने, दुःस्वप्ने पडतात नित्य..

 

परवरदिगारा….मसिहा….

जगाच्या नियंत्या…विश्वकर्मा…

कुठे चाललो आहोत आपण…

मनीचे भय कसे जाते निघून…

शिरावे सहज त्या अंधारगुहेत तसे ….

 

अन उमगते मग आलो कुठे हे…

दबा धरून होते…

कुणी तरी तेथे…..

 

हे ईश्वरा सख्या तूच बनतोस वाली…

आणि सर्व काही फक्त तुझ्याच हवाली!

 

मी अष्टभैरवांना घालीत साद होते,

शिवशक्तिला उराशी घेऊन नित्य होते!

गुरूपावलांना वंदित फक्त  होते!

 

हे नास्तिक्य आस्तिक्य येथे विरून जाते….

भक्तीचा मार्ग मिळता सारे तरून जाते…

ना जात, धर्म बंधन….श्रद्धा अतूट आहे…

 

गोरक्षनाथास मी रक्ष रक्ष म्हणते! तेहतीस कोटी देवांस हृदयी पाचारण करते .

या अल्लाह…ही विनवते…प्रभू देवबापास प्रार्थिते अन् सारे सुखी, सुखरूप रहाता सदा!

मी “आमेन ” उद् गारते अन् पराधीन मानवाला निष्ठेत बांधते!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ठेव ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

☆ कवितेचा उत्सव ☆ ठेव ☆ सौ. नीला देवल ☆

 

लेक गेला परदेशी, हुरहूर कासाविशी

मन गेले ते त्यापाशी तन उरे झुरे स्वतःशी

 

किती येड येड मन ठरयेना मज जवळी

समजाऊ किती त्याला राही व्याकुळ होऊनी

 

किती काळ गेला गेला तू आला आला वाटे

डोळे अंथरून वाटेवर जीव भ्रमला फार फार

 

नादावल फार फार नित्य काळजी सकल

उडे भुरकन भूर फिरून लेका तुझ्याजवळ

 

काय करू त्याला तोड लागे भेटीची ओढ ओढ

व्हॉट्सअँप,इंस्टाग्राम सारा मृगजळी सरंजाम

 

चंद्रताऱ्यांच्या डोळा भेटी तश्या संगणकी भेटी गाठी

हाय हॅलो रोज बोली रुक्ष ख्याली खुशाली

 

कशी करू याला तोड साऱ्या जीवाची घाल मेल

प्रेम झाले मती मोल धनापुढे सारे फोल

 

पैसा रोकडा ट्रान्स्फर एक गुलाब कटे फार

ये म्हणता नाही सवड डोळे अश्रूंनी कवाडं

 

तुला बोलावी आभाळ तोकडे जननीचे मोल

माझी अमूल्य तू ठेव, देवा ती ठेव सुखी ठेव

 

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

Email:- [email protected]

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – अभंग ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

??️ एकादशी विशेष – अभंग ?️?

आज एकादशी

जावे पंढरीशी

भेटाया विठूशी

सावळ्या त्या!!१!!

 

सुरेख सावळी

उभी भीमातटी

सुंदर गोमटी

विठाबाई!!२!!

 

माझी विठूआई

सौंदर्यांची खाण

नसे तिथे वाण

कोणतेही!!३!!

 

चंद्रभागे तीरी

भक्त पुंडलीक

साधू जवळीक

त्याची आधि !!४!!

 

वाळवंटी होई

मृदंग गजर

टाळ चिपळ्या त्या

निनाद ती!!५!!

 

नामदेव चिरी

वसे महाद्वारी

सबाह्य अंतरी

दुजे नाही!!६!

 

चोखोबा बंकोबा

जनाईची भेट

तेव्हा दिसे नीट

पांडुरंग !!७!!

 

तुकोबा रायांना

ओढ विठ्ठलाची

झाली अनावर

दर्शनाची!!८!!

 

तुकोबा म्हणती

धन्य हे वैकुंठ

झाले हो प्रकट

भूमिवरी !!९!!

 

दिनांक:-२६-११-२०

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 73 ☆ गीत – लावणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 73 ☆

☆ गीत – लावणी

यूट्यूब लिंक >>  रंगणार विडा नक्की

स्वर : सावनी रविंद्र :: संगीत : सागर – संतोष :: गीत ‌ : अशोक भांबुरे

रंगमहाली बैठक जमली

पानविड्यांनी मैफिल रंगली

 

चुना लावला, कात पेरला, त्यात सुपारी पक्की

रंगणार, राया विडा हा नक्की… धृ

 

पान मनाचं माझ्या कोर

नाजूक देठाच हिरवं गार

अलगद घ्याना तळहातावर

थोडं केशर घाला त्यावर

लवंग टोचा, प्रेमाने खोचा, आत सुपारी कच्ची

रंगणार, राया विडा हा नक्की… १

 

नेसून आले पैठणी कोरी

रागू- मैनेची नक्षी भारी

अवतीभवती होत्या पोरी

तरी दिलाची झालीच चोरी

कुठं शोधावं, काही कळेना, झाले मी वेडी पक्की

रंगणार, राया विडा हा नक्की… २

 

हवा तेवढा देईल मोका

ईश्काचा दोघे घेऊ झोका

चुकेल माझ्या काळजाचा ठोका

द्याल कधी जर मजला धोका

तक्रार देईल, चौकीत नेईल, पिसाया लागल चक्की

रंगणार, राया विडा हा नक्की… ३

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दान ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ दान ☆ श्री प्रकाश लावंड ☆ 

चिंब चिंब काळी आई

थेंब  थेंब  झेलतेय

गारठ्याशी शिरशिरती

झोंब अधिरी खेळतेय

 

कोंभ कोंभ डवरले

पान पान तरारले

हिरव्याकंच वावरात

गच्च तुरे पिसारले

 

फुललेल्या वावरीत

अंकुरते बीज दडे

मुळे रुजली,मातीची

गच्च गच्च दिठी पडे

 

जाता जाता दान दिलं

परतीच्या पावसानं

बळीराजा सुखावला

चढे त्याला अवसान

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

☆ विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

कुठे थांबायचे हे समजले पाहीजे”

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कुठे थांबायचे हे समजले पाहीजे. हे जीवन जगण्याचे तत्वच आहे. हे कुठेही लागु होते.बर्‍याच जणांना समजत नाही म्हणा किंवा बर्‍याच जणांच्या लक्षांत येत नाही कुठे थांबायचे ते. ज्यावेळी लक्षांत येते त्यावेळी खुप ऊशिर झालेला असतो आणि नुकसानही खुप झालेले असते. तेंव्हा कुठे थांबायचे हे तत्व आपण सर्वांनी अंगिकारले पाहीजे.

आता पर्यावरणाचाच प्रश्र्न घ्या. आपण निसर्गावर अत्याचार करीत आलेलो आहे.त्याचा परिणाम पर्यावरणाचा  र्‍हास होण्यात झालेला आहे. खरी जंगले न वाढवता आपण सिमेंटची जंगले वाढवित गेलो. दिल्लीसारख्या ठिकाणी तर लोकांना श्र्वास घेणे अवघड होत चाललेले आहे.ही परिस्थिती बहुतेक सर्व मोठ्या शहरांमधुन आहे. विकास करीत असताना योग्य ठिकाणी न थांबल्यामुळे ही परिस्थिती ऊदभवली.

कांहीवेळा आपल्याला प्रचंड राग येतो. रागाच्या भरात आपण खुप बोलतो असे नाही तर कांहीही बोलतो. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणायची की राग आला की १ ते १० अंक मोजायचे. हेतु हा की अंक मोजेपर्यंत राग थोडा तरी शांत होतो. रागाच्या भरात बोलताना कुठे थांबायचे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलत सुटतो. अद्वातद्वा बोलतो. माणसे दुखावली जातात, दुरावली जातात. हे टाळले पाहीजे. राग आला की योग्य ठिकाणी थांबता आले पाहीजे. म्हणजे पुढील अनर्थ टळतील.

अलिकडे असे लक्षांत आले आहे की तरूणपिढी व्यायाम, जीम याकडे अधिक लक्ष देत आहे. पण हे करीत असताना कुठे थांबायचे हे या तरूणपिढीला समजत नाही. अशा बातम्या वाचनात आल्या आहेत की व्यायाम करीत असताना कांही मुले अति व्यायामामुळे दगावली आहेत. तेंव्हा तरूण पिढीने व्यायाम करताना कुठे थांबायचे हे लक्षांत घेतले पाहीजे.

सध्या सर्वांकडे स्मार्ट फोनस आहेत. कंपन्याचे तीन तीन महीन्यांचे पॅकेजेस असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी बोलण्याचे चार्जेस पडत नाहीत. अनेकजण त्यामुळे फोनवर बोलायला लागले की थांबतच नाहीत. तासन तास बोलत राहतात. या कालावधीत एखाद्याला यांचेशी संपर्क साधावयाचा असेल तर यांचा फोन बिझी. त्यामुळे फोनवर बोलताना कुठे थांबायचे हे समजलेच पाहीजे.

अलिकडे सर्वांना “व्हाटसअॅप” हा फार मोठा विरूंगळा आहे. आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्याचे एक चांगले माध्यम आहे.आपल्याकडील माहीतीसुध्दा आपण शेअर करू शकतो. पण कांहीजण याचा दुरूपयोग करतात. आला मेसेज की कर फॉरवर्ड. कांहीवेळा मेसेज वाचायचेसुध्दा कष्ट घेत नाहीत. एकाचवेळी वीस वीस तीस तीस फोटो, ६०/७० एमबीचे व्हीडीओज पाठविणे कितपत योग्य आहे. याचा विचार अतिशय आवश्यक आहे. पण तो होताना दिसत नाही. व्हाटसअॅपवरती मेसेजस पाठविताना कुठे थांबायचे हे समजले पाहीजे नाहीतर मेसेजेस डीलीट करण्याचे कामच होऊन जाते.

पुर्वी लग्नसभारंभात जेवणाच्या पंक्ति ऊठायच्या. आपुलकीचे,जिव्हाळ्याचे प्रदर्शन व्हायचे. जेवताना पाहुणेमंडळीना प्रचंड आग्रह केला जायचा. अन्नाची नासाडी व्हायची. आग्रह करण्याला “कुठे थांबयचे” हे न समजल्यामुळे असे घडायचे. आता थोडी पध्दत बदलली आहे. पंक्तिच्याऐवजी बूफे पध्दत आली. तरीसुध्दा अन्न वाढुन घेताना काय काय घ्यायचे काती किती घ्यायचे हे न समजल्यामुळे अन्नाची नासाडी ही होतेच. फक्त प्रमाण थोडे कमी.

थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. म्हणतात ना अति तेथे माती. या लेखाचे सार हेच की कुठे थांबायचे हे आपल्याला समजले पाहीजे आणि हे समजले तर आपले सर्व नातेसंबंध नॉर्मल राहतील, सुधारतील.

मैत्रीत, नातेसंबंधात बर्‍याच वेळा चेष्टा केली जाते. जोपर्यंत मजेत चालले आहे तोपर्यंत ठीक वाटते. पण चेष्टेचा अतिरेक झाला की नातेसंबंध बिघडतात. ह्या गोष्टी टाळल्या पाहीजेत.

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares