श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “मनाचा ठाव”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 65 ☆
☆ मनाचा ठाव ☆
तुझ्यासारखाच छोटा, माझ्या डोळ्यांत सागर
माझे विश्व जर लोटा, तुझे विश्व हे घागर
तुझ्या घटातले पाणी, नाही कधीच अटत
डोळ्यांतील अश्रु सुद्धा, माझ्या नाही रे घटत
तुझ्या पोटातील मोती, त्यांना मोठीच किमंत
थोरा मोठ्यांच्या गळ्यात, त्यांना वाटते गंमत
मोती शिंपल्यात माझ्या, गळा आईच्या पडती
दुःख सांगती आईला, ढसाढसा ते रडती
तुझे नीर, माझे अश्रु, दोन्हीमध्ये खारे पाणी
किनारा नि ह्या पापण्या, होती ओल्या पून्हा दोन्ही
तुझ्या लाटांचे भूषण, तन भिजण्याची आशा
माझ्या डोळ्यांची आसवे, तेथे काळजाची भाषा
अश्रु आनंदाचे कधी, जाती आनंद देऊन
वाटते या मनाला की, आलो सागर पोहून
काल सागराच्या तळी, होती रत्नांचीच खाण
कर्म माणसांचे आहे, तेथे सापडते घाण
सहजच उतरून सागरातला, शोधलास तू गाव
कसा माणसा लागत नाही, तुझ्या मनाचा ठाव
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈