मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हरवलेली कविता ☆ श्री राजेंद्र परांजपे

 ☆ कवितेचा उत्सव ? हरवलेली कविता ? श्री राजेंद्र परांजपे ☆ 

मधुघट पडले कोरडे अन् काव्य झाले सूने !

कवितेस माझिया माझेच घर भासतसे नवे !

 

ना शब्दांची आस ती ना अर्थाचा जिव्हाळा !

कुठे हरवली मम प्रतिभा, पडे प्रश्न मनाला !

 

बहु दिसात न झरले, उतरले काही मनीचे !

नकळे का असे हे जीवघेणे रुसणे शब्दांचे !

 

सांडले ते विषयही अवघे दूर अन् कोठेतरी !

सोडीली साथ माझी, का रुद्ध माझ्यावरी?

 

पाहतो वाट मी, पुन्हा कधी ती प्रसववेदना !

कधी पुन्हा माझ्यावरी होईल प्रसन्न शारदा !

 

अंतर्यामी हरवले जे, ते पुन्हा गवसेल का?

हृदयातली कविता हृदयातूनी प्रसवेल का?

 

© श्री राजेंद्र परांजपे

०७ सप्टेंबर २०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 53 – घडू दे दर्शन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 54 – घडू दे दर्शन ☆

तुच द्रौपदी, आहिल्या,

सीता, तारा, मंदोदरी।

किती युगे पालटली

कसोटीच्या त्याच परी।

 

इथे लागते  पणाला

रोज द्रौपदी नव्याने ।

कान्हा विसरला आज

धावा ऐकून  धावणे।

 

किती शापीत आहिल्या

शीलारुप गावोगावी।

तया उध्दारीना कोणी

आज रामाच्या अभावी।

 

दिला शब्द पाळणारा

हरिश्चंद्र ना जगती।

रोज लिलाव मांडण्या

हवी त्यास तारामती।

 

लाखो रावण मातले

पेटविल्या सीता किती।

हातबल राम आज

विसरला बाण भाती।

 

ज्ञानी योद्ध्या रावणास

उमजेना मंदोदरी।

पातिव्रत्य दानवाचे

सांभाळते घरोघरी.।

 

सत्व परीक्षा सोडून

करी असूर मर्दन।

काली दुर्गा भवानीचे

पुन्हा घडू दे दर्शन।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ केव्हा तरी पहाटे ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ केव्हा तरी पहाटे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(परीक्षेच्या वेळी लवकर उठून अभ्यास करायला कधीच जमले नाही)

केव्हातरी पहाटे,

उठवून माय गेली.

मिटले तरी मी डोळे

वरडून माय गेली.

पाहू तरी कसे मी,

प्रश्नांचे उत्तर सोपे

घेऊन गाईड माझे

फसवून शांती गेली.

ऐकतो आता कानात

आवाज थपडेचे.

डस्टर मास्तरांनी

फेकून बात केली.

स्मरल्या मलाच तेव्हा

माझ्या टुकार पंक्ती

मग शाल अंगावरची

उडवून माय गेली.

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पु. ल. देशपांडे जन्मदिवस विशेष – पु.ल………एक शब्दगुंफण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ पु. ल. देशपांडे जन्मदिवस विशेष – पु.ल………एक शब्दगुंफण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

जन्म – 8 नोवेम्बर 1919, मुंबई

सुसह्य व्हावे जगणे म्हणूनी विनोद केला तुम्ही

विनोद म्हणजे टवाळ खोरी,अर्थ काढला आम्ही.

 

विदुषी आणि विद्वानांनी इथे नसे  कमतरता

उपदेशाच्या नित्य वाहती  अमृतमय सरिता.

 

थकली काया,थकला मेंदू,कोण तया खुलवेल

नित्य ‘उद्या’ चे स्वागत करण्या कोण मना फुलवेल.

 

यंत्रामध्ये, शास्त्रामध्ये  पिचून  जाता  जीव

कुणा न आली दया आमुची,कुणा न आली कीव.

 

अशाप्रसंगी हास्यदूत तुम्ही बनून आला जगती

विनोद अस्त्रा सहज उचलले लढण्या अवतीभवती.

 

खिल्ली उडवून, उपरोधाने,कधी काढले चिमटे

तव शब्दांच्या दर्पणी बघता,खूण मनाला पटे.

 

प्रवासातले अनुभव केले  कथन विनोदातून

जीवन यात्रा पार होतसे  सहज तया ऐकून.

 

जगत्पटावर बहुरूप्याचे  पात्र तुम्ही हो झाला

विनोद आणिक मार्मिकतेचा संगम तुम्ही केला.

 

सप्तसुरांचा साज चढवूनी कधी गाईली कवने

मुक्त कराने मुक्तांगणी तुम्ही पेरीत गेला दाणे.

 

कधी न चुकला जागा कोठे जे जे होते तुजपाशी

माझे माझे कधी न म्हटले,उधळीत गेला सर्वांपाशी.

 

हास्यरसाच्या वर्षावाने अक्षर अक्षर झाले ताजे

पैलू बघता व्यक्तित्वाचे जो तो म्हणतो ‘पुलं माझे.’

 

‘पु.ल.’म्हणता पुलकित होती अजून अमुची मने

पुन्हा न होणे, तुम्हासारखे,  सरस्वतीचे लेणे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पापण्यातील आसवांना ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के 

सुश्री नीलाम्बरी शिर्के 

प्रकाशित पुस्तके –स्पंदन ,आत्मधून

आवड – वाचन, लिखाण, प्रवास, मैत्र जपणे, काव्यवाचन, व्याख्याने देणे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ पापण्यातील आसवांना ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆ 

पापण्यातील आसवांना

बांध पक्का बांधला

वाहतो जलौघ वेगे

तोल सावरून आतला

 

काळजातील यातना

अंतरातच कोंडल्या

तडकल्या भिंती जिथे

धीर धरूनी सांधल्या

 

थेंबही आता न येतो

पापणी काठावरी

हुंदक्यांना धाडले

काळजाच्या अंतरी

 

ओठांवरती विराजे

धीरगंभीर हास्यरेषा

जीवनाला कळाली

जिंदगीची गूढ भाषा

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निवृत्त ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ निवृत्त ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 

निवृत्त झालो कालच.……..

अन वेळ झाली तरी राहिलो घरीच .

 

ती लगबग..

काही राहिले का…आठवणे

उगाच पॅन्टचे खिसे चाचपडणे

पाकीट,चाव्या,रुमाल आत असूनही

उगाच त्यावरून हात फिरवणे.

पुन्हा पुन्हा भिंतीवरील घड्याळात पाहणे.

 

“अहो……. मोबाईल घेतला ना”.

ऐकताना चार्जिंग  तपासायचे

पुसलेल्या गाडीकडे उगीचच पहायचे.

कालचे महत्वाचे कागद मीच ठेवले,दिसत नाहीत म्हणून

पोरांवर ओरडायचे

अन कुणाचाही फोन कां नाही…..

मन बेचैन  व्हायचे

वाढलेले  अन्न,पेपर वाचत आत ढकलायचे.

 

आज काहीच नाही………

निवांत…..रिक्ततेची  जाणीव.

 

एक आवाज अंतर्मनाचा

जग………स्वतःच्या आनंदासाठी

निर्भयांच्या ,असह।य्यांच्या मदतीसाठी

जग ……लढण्यासाठी,दमनाच्या विरोधाशी,

जग…….वसुधेच्या अन मानवतेच्या रक्षणासाठी

अन् वेळ झाली….

 

उठलो मी नव्या उमेदीने

जीवन पूर्ततेसाठी.

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – स्वदेशी ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

??? स्वदेशी ???

हस्तांदोलन करणे

विषाणूला पाचारणे

मुखामुखी करुनिया

नका देऊ आवतणे !!१!!

 

सोडूनिया स्वदेशासी

कां हो जाता परदेशी

जननी जन्मभूमीश्च

स्वर्गादपि गरीयसि !!२!!

 

स्वधर्म आणि स्वदेश

न त्यजावा कदापिही

काय उणे स्वदेशात

कां फिरतां दिशा दाही !!३!!

 

उच्च आपुली संस्कृती

उच्च आचार विचार

एकवटूनि रहावे

करु नका अविचार !!४!!

 

मोळी जेव्हा होते सुटी

बिखरती सारे ऊस

जाती तीच गुऱ्हाळात

निघे गुळासाठी रस !!५!!

 

पक्षी शिकविती आम्हा

सारे जण एक रहा

शिकारी येता जवळ

कशी गंमत ती पहा !!६!!

 

प्रभाते प्यावे गोदुग्ध

देशी गाईचे ते घृत

करा सेवन गोमूत्र

होई मस्तच तब्येत !!७!!

 

दिनांक ५-११-२०

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उंबरठा ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ. अस्मिता इनामदार

 ☆ कवितेचा उत्सव ☆ उंबरठा ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

बाई आणि उंबरठा

नाते यांचे जुनेच आहे

घरादाराला बांधून ठेवण्याचे

ते एक दारच आहे…

 

स्वैपाकघर, माजघर

एवढेच तिचे विश्व होते

आखून दिलेल्या परिघाबाहेर

तिचे जिणे बंदिस्त होते…

 

उंबरठ्यावरचे माप ओलांडून

लक्ष्मी म्हणून तिचे स्वागत असे

तोच उंबरठा आज तिचा

वैरी म्हणून उभा दिसे…

 

उंबरठ्यापायी रामायण घडले

लक्ष्मणरेषेचे उल्लंघन झाले

परस्त्री म्हणून सीतेच्या नशिबी

दुर्दैवाचे फेरे आले…

 

आज बाई स्वतंत्र आहे

तिला तिची स्पेस आहे

संसाराच्या मर्यादेत

तरीही ती बंदीच आहे…

 

आजच्या फ्लॅट संस्कृतीत

हाय – फाय सर्व काही

मर्यादेने अडवणाऱ्या

उंबरठ्याला जागाच नाही…

 

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवे गीत ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

☆ कवितेचा उत्सव :  नवे गीत ☆ श्री मुबारक उमराणी ☆

रात्र बोले

माझ्या सवे

चांदण्याचे

पक्षी थवे

 

किर् किर्

आलापात

काजव्याची

दीप वात

 

चांदण्याचे

उल्कापात

ज्योतरेषा

ओढी रात

 

वारा होई

हळू थंड

रातराणी

करी बंड

 

पावसाचे

चार थेंब

पान पान

भिजे चिंब

 

घरट्यात

पक्षी मिठी

बेडकांची

वाजे शिटी

 

शुक्र तारा

बोले काही

रान फुल

सारे पाही

 

येतो सूर्य

रात्र पित

पक्षी बोले

नवे गीत

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 13 – ग़ज़ल ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 13 ☆

☆ ग़ज़ल ☆

शेवटी शेवटाचा खेळ सुरू जाहला

रेपणाने मांडलेला डाव झुरु लागला

मावे तरी किती जुन्याआठवांमधे

कि ‘त्या’ची चाहूल लागली आहे मला?

माधानी जीव हा व्हायचा परंतु

कळे असा हा कसा घात झाला?

रात्र ही काळी संपली नाही अजुनी

र्षाव तारकांचा का मधेच थांबला?

पाहता मागे वळूनी हे नेत्र वाहिलेले

गेच भावनांचा का बांध फुटू लागला?

खेळ शेवटाचा मग पुन्हा सुरू जाहला

सावराया आता वेळ नुरू लागला

तारून न्यावी कशी ही नौका पैलतीराला

रात्रंदिन लागे ही काळजी जीवाला.

 

© शेखर किसनराव पालखे 

सतारा

17/05/20

(टीप:  गजल की प्रत्येक पंक्तियों के पहले अक्षर से रचनाकार का नाम शेखर किसनराव पालखे सतारा बनता है। )

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

 

Please share your Post !

Shares