मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 20 ☆ मधुर बासरीचे स्वर… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 20 ☆ 

☆ मधुर बासरीचे स्वर … ☆

मधुर बासरीचे स्वर

गोकुळात घुमले

गाई वासरे गोपाल

हर्षभरीत झाले…

 

दूध काढता गोपिका

हात तो थांबला

डोईवर घागर पाणी

एकीचा तोल गेला…

 

वासरू गोंडस,

गाईस पिण्या विसरले

फक्त बासरीच्या स्वरात

स्वानंदी रममाण झाले…

 

अशी ही जादूगिरी

त्या मुरलीची झाली

कृष्ण वाजविता सहज

समग्र सृष्टी मोहरली…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – 2 ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

नवदुर्गांच्या औषधी रुपांचे वर्णन आजच्या चारोळ्यांमध्ये आहे.

या चारोळ्या अष्टाक्षरी छंदात गुंफलेल्या असून ” रुणुझुणुत्या पाखरा ” या सिनेगीताच्या चालीवर म्हणायला खूप छान वाटतं.

– साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -2???

मार्कण्डेय पुराणात

सांगितले आहे असे

दु:ख दैन्य ग्रहपीडा

देवी दूर करीतसे !!

 

नवरात्री पर्वकाल

उपोषण फलदायी

आदिशक्ती आदिमाया

आशीर्वाद नित्य देई !!

 

उपासना नवरात्री

आदिमाया देवीशक्ती

महालक्ष्मी महाकाली

बुद्धी दात्री सरस्वती !!

 

नवरात्री तिन्ही देवी

युक्त अशी नऊ रुपे

औषधांच्या स्वरुपात

जगदंबा सत्वरुपे !!

 

मार्कण्डेय चिकित्सेने

नऊ गुणांनी युक्त ती

ब्रह्मदेवही तिजला

दुर्गा कवच म्हणती !!

 

नऊ दुर्गांची रुपे ही

युक्त आहेत औषधी

उपयोग करुनिया

होती हरण त्याव्याधी !!

 

शैलपुत्री ती पहिली

रुप दुर्गेचे पहिले

हिमावती हिरडा ही

मुख्य औषधी वर्णिले !!

 

हरितिका म्हणजेच

भय दूर करणारी

हितकारक पथया

धष्टपुष्ट करणारी !!

 

अहो कायस्था शरीरीं

काया सुदृढ करिते

आणि अमृता औषधी

संजीवन आचरीते !!

 

हेमवती ती सुंदर

हिमालयावर असे

चित्त प्रसन्नकारक

जणू केतकीच दिसे !!

 

यशदायी ती श्रेयसी

शिवा ही कल्याणकारी

हीच औषधी हिरडा

शैलपुत्री सर्वा तारी !!

 

क्रमश:….

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शोध मनातल्या मनाचा ☆ श्री राजेंद्र परांजपे

 ☆ कवितेचा उत्सव ? शोध मनातल्या मनाचा ? श्री राजेंद्र परांजपे ☆ 

 

अरे आहेस कुठे? कधीचा मी शोधतोय तुला!

माझ्यातल्या मला मी साद घालतो पुन्हा पुन्हा !

 

इतकी वर्ष झाली, कधीच निवांत भेटला नाहीस !

गप्पा मारू म्हंटल तर जरा जवळ बसत नाहीस !

 

तसं लांबूनच बघतो म्हणा, कधीकधी मी तुला !

वाटतोस जरा ओळखीचा पण खात्री नाही मला !

 

राहतोस तू माझ्याच मनात, कुठल्यातरी कोपऱ्यात !

पण कसं शोधू सांग, तुला मी इतक्या ह्या पसाऱ्यात?

 

तरीही हुडकून काढतोच कधीतरी तुला मी हिय्या करून !

आणि हिंडवतो तुला, माझ्याच कवितांच्या मखरांमधून !

 

पण मला माहित आहे तुझा अस्थिर, चंचल स्वभाव !

हळूच सटकतोस तिथून, आणि उंडारतोस गावोगाव !

 

बरेच दिवस तुला विचारीन म्हणतो, पण धीर होत नाही !

किती पेला संपला, किती आहे भरलेला, सांगशील काही ?

 

तुला तरी काय माहित म्हणा, तू तर माझ्यातच भरलेला !

कसा वेडा मी, विचारतोय माझ्याच मनातल्या मनाला !

 

© श्री राजेंद्र परांजपे

१३ मार्च २०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लावणी ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ. अस्मिता इनामदार

 ☆ कवितेचा उत्सव ☆ लावणी ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

 

जरतारीच्या साडीचा हा पदर हाती धरा

जिवलगा मला संगतीनं घेऊन फिरा ||

 

नवी नव्हाळी अंगी ल्याली

काया माझी मुसमुसलेली

जीव कसाहा आसुसला हो

नाही मनाला थारा..

जिवलगा मला संगतीनं घेऊन फिरा….

 

पिरतीची ही रीतच न्यारी

विरहाची ती सुरी दुधारी

जीव ओढतो तुम्हासाठी हो

लवकर या ना घरा…

जिवलगा मला संगतीनं घेऊन फिरा…

 

तुम्हासाठी मी सजले धजले

वाट पाहूनी डोळे थकले

किती दिसांनी तुम्ही आला हो

जाऊ नका माघारा…

जिवलगा मला संगतीनं घेऊन फिरा….

 

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवनाली ☆ स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆ कवितेचे रसग्रहण सौ.अमृता देशपांडे

स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)

इंदिरा संत

 ☆  कवितेचा उत्सव ☆ दिवनाली ☆ स्व. इंदिरा संत ☆ 

(या कवितेचे काव्यानंद मध्ये रसग्रहण सौ.अमृता देशपांडे)

सदोदित अवतीभवती तुझे असणे दरवळावे

म्हणून तुझ्याकडे एकच फूल मागितले

तर – माझ्या अंगणातील हिरवेगार वृक्ष

तिन्ही त्रिकाळी सतत बहरत राहिले ll

 

कानात अखंड गुंजत रहावा म्हणून मी

तुझा फक्त एक शब्द हवा म्हटले

तर – तू समुद्राच्या गाजत्या लाटांचे

फेनिल तुषारवेल माझ्या कानांवर गुंफलेस ll

 

तुझ्या स्पर्शाच्या अबीर- प्रसादासाठी मी

तुझ्यापुढे मनोभावे मान उंचावून धरली

आणि तुझ्या मध्यमेची कोमल लाली

माझ्या कपाळावर ज्योतीशी

उमटली ll

 

या तुझ्या सा-या अपरूपात मी

संध्या रंगासारखी उजळून गेले,

तेवती दिवनाली झाले ll

 

स्व. (इंदिरा दीक्षित) इंदिरा संत

(चित्र साभार मराठी विश्वकोश https://vishwakosh.marathi.gov.in)

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली-1 ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्री सद्गुरुंनी माझ्याकडून लिहवून घेतलेल्या “चिंतामणी चारोळी व श्रीचामुण्डेश्वरी चरणावली या संग्रहाचे पूजन व प्रकाशन अष्टविनायक चिंचवड मंडळाचे प्रमुख विश्वस्त मा.श्रीआनंद महाराज तांबे यांचे हस्ते दिनांक ३०-१२-१९ सोमवार विनायकी चतुर्थी या दिवशी क्षेत्र थेऊर श्री चिंतामणी मंदीर प्रांगणात संपन्न झाले.

त्यातील चामुण्डेश्वरी चरणावली संग्रहातील चारोळी मी शारदीय नवरात्रात रोज सादर करण्याची माझी इच्छा आहे व हे सद्भाग्य मला सद्गुरु कृपेने लाभते आहे यासाठी मी आपल्या सर्व  बंधूभगिनींची कृतज्ञ आहे.

साधक उर्मिला इंगळे

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – 1???

आलं आलं नवरात्र

ऋतू शरदाचा काल

देवपूजा आराधना

उपासना तिन्ही काल!!

 

आलं आलं नवरात्र

सजवूया घर छान

देवी येणार पाहुण्या

त्यांचा करु मानपान !!

 

आलं आलं नवरात्र

कुलाचार घरोघरी

यथाशक्ती यथामती

होई पूजा घरोघरी !!

 

नवरात्र परंपरा

व्हावे रक्षण कुलाचे

कृपाछत्र घरावरी

सदा रहावे देवीचे !!

 

नवरात्री फलप्राप्ती

वंशवृद्धी होत असे

व्हावे कल्याण विश्र्वाचे

प्रार्थनेत ध्येय वसे!!

 

नवरात्र पर्वकाळ

प्रतिपदा ते नवमी

दिन दहावा दसरा

देई मांगल्याची हमी !!

 

प्रतिपदा ते सप्तमी

सप्तरात्री व्रत असे

नवरात्री चार अंगे

घटस्थापना ती असे!!

 

शेतातील काळी माती

सफ्तधान्ये पेरावीत

हळदीने रंगवावी

सप्तधान्ये ती पाण्यात!!

 

मोठी समई धातूची

जोडवात ती तेलात

कापसाची वीतभर

नवरात्री लावतात!!

 

नवरात्री कुलाचार

हरदिनी कृपाछत्र

होम हवनाचा थाट

घरोघरी हो सर्वत्र !!

 

देवीपुढे तेलदिवा

नवरात्री तेवतसे

नंदादीप हा अखंड

देवी कृपा करीतसे !!

 

!! श्रीजगदंबार्पणमस्तु!!

 

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अधिक मास ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ अधिक मास ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

चांद्रवर्ष- सौरवर्ष मापन

करते मराठी रीत खास

तीन वर्षातून मेळ घाली

तेहेतिसावा अधिक मास !!

 

पुरुषोत्तम,धोंडा,अधिक,

मलमास अशी नावे यास

श्रीविष्णूंचे जप-जाप्य,पोथी

आराधना देई फल खास!!

 

पुरुषोत्तम मुरलीधर

स्वामी स्मरावा महिनाभर

करा मनापासुनी पूजन

ठेवी कृपा हस्त शिरावर !!

 

अन्नदान,प्रिय वस्तूदान

लोभ,मोहास जिंकून घेणे

मौनव्रत शिकवी मनाला

योग्य अचूक कैसे बोलणे !!

 

ज्ञानविज्ञान अध्यात्माची ही

सांगड घातली सुयोग्य छान

सत्कर्म, दान, परमार्थाने

देव कृपेचे जोडावे धन !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वेळ झाली भर माध्यान्ह ☆ स्व आत्माराम रावजी देशपांडे (कवी  अनिल)  

स्व आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल) 

☆ कवितेचा उत्सव ☆ वेळ झाली भर माध्यान्ह ☆ स्व आत्माराम रावजी देशपांडे (कवी  अनिल)  ☆ 

(या कवितेचे काव्यानंद मध्ये रसग्रहण.. सौ ज्योती विलास जोशी)

वेळ झाली भर माध्यान्ह माथ्यावर तळपे ऊन

नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला

 

तप्त दिशा झाल्या चारी भाजत असे सृष्टी सारी

कसा तरी जीव धरी माझ्या प्रीतीच्या फुला

 

वाहतात वारे जळते पोळतात फुलत्या तनु ते

चित्त इथे मम हळहळते माझ्या प्रीतीच्या फुला

 

माझी छाया माझ्याखाली तुजसाठी आसावली

कशी करू तुज सावली माझ्या प्रीतीच्या फुला

 

दाटे दोन्ही डोळा पाणी आटे नयना तच सुकुनी

कसे घालु तुज आणुनी माझ्या प्रीतीच्या फुला

 

मृगजळाच्या तरंगात नभाच्या निळ्या रंगात

चल रंगू सारंगात माझ्या प्रीतीच्या फुला

 

गायिका: उषा मंगेशकर

कवी : स्व आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल) 

संगीतकार :यशवंत देव

(चित्र साभार विकिपीडिया)

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 10 – खरंतर जाऊच नये ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 10 ☆

☆ खरंतर जाऊच नये ☆

 

कोणत्याही कवितेच्या वाटेला

पडू नये तिच्या उगमाच्या फंदात

उसवून टाकेल ती तुम्हाला

तिच्या जन्मदात्यासकट

ते जे काही आहे ते रहावं गुपितच

जे असू शकतं अक्षरशः काहीही

अगदी एखादं जन्मानंदाचं

परम निधान किंवा

मरणजाणिवेचा अथांग खोल

असा डोह देखील…

होऊ नये पंचनामा त्याच्या भावनांचा-

भोगू द्यावं तिचं प्रवाहीपण

त्याचं त्याला एकट्यानं…

आपण व्हावं मूक साक्षीदार

किनाऱ्यावरूनच…

हो-उगाच बुडून जायची भीती नको-

अन जळत्या जिवाचा

चटका देखील नको…

सामाजिक विलगीकरण-

चांगली कल्पना आहे ही…

फक्त येऊ नये कोडगेपण सवयीनं-

दुरूनच का होईना ठेवावी

त्याच्या जाणिवांची जाणीव

एवढसंच केलं तरी

जगतील दोघेही आनंदानं

शेवटापर्यन्त–

त्यांच्या आणि आपल्याही.

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

09/06/20

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हुरहूर……… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ हुरहूर……… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 

रोज पिकलेले पेरू ती कुरतडून टाकायची.

खाली पडलेले पेरू पाहून तिडीक मस्तकात जायची.

ती खारुडी दिसुदे,देईन दणका

अशी मनात होती धारणा.

विचार करत हलवायचो,जोराने पाळणा.

पण ती दिसायची नाही,

पेरू कुरतडणे सोडायची नाही.

तिला पकडायचे केले किती कारनामे.

पण जाळ्यात यायचीच नाही.

धावायची खोडाच्या मार्गाने.

आज मात्र सारे पेरू दिसले मस्त,

मी तोडून घेतले बिनधास्त,

घरी आलो,पाहीले सर्वच होते

धष्टपुष्ट.

मन झाले बेजार

कुठेही दिसेना खारुडीचा वारं.

मी तर दिला नाही मार,

मग काबरे तिने सोडला परिवार?

आज वाटते पुन्हा तिने यावे ,

पेरू पुन्हा कुरतडावे.

असावा का हा भुतदयेचा विचार

की असावा संस्काराचा भार?

मन सैरभै र झाले हो फार .

उघडावेसे वाटते तिच्यासाठी दार,

वाटते मनाला हुरहूर, अंन झालो बेजार………

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares