सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
Marathi Kavita
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ काही नेम नाही … ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
काही नेम नाही,
फसव्या मृगाचा.
फसवा पाऊस,
फसव्या ढगांचा.
*
कधी कृष्णमेघ,
कधी स्वच्छ हे आभाळ.
जरी चार थेंब,
तरी पाऊस सांभाळ.
*
तुझे माझे आता,
आकाश वेगळे.
वेगळा पाऊस,
वेगळे सोहळे.
*
नको करू आता,
नवी मांडवली.
लखलाभ तुला,
तुझी भातुकली.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ टपोरी व्हायाचं… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं
चार – पाच टपोर्या पोरी घेऊन झुंडीनं र्हायाचं ॥
*
सगळीकडे महिलांसाठी आहेच ना आरक्षण
तरी पण त्यांना सांग कुठे असते गं संरक्षण
आता तुझ्यावर अन्याय करणार्याला उभं तू जाळायचं
शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं ॥
*
रहा तू बिनधास्त जगात हातात अस्त्र बाळगून
महिषासूर मर्दिनी, काली पहा जरा निरखून
शिरजोर होऊ लागताचं कोणी त्याला आडवं चिरायचं
शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं ॥
*
अन्याय करणार्यांना कठोर शासन होत नाही
न्यायदेवता आहे आंधळी – पांगळी
तू का नाही याचा फायदा घेत?
काढ राक्षसांच्या कोथळी
काळकोठडीत गेलीस तरी अब्रूनच रहायचं
शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं ॥
*
एक एका राक्षसाला तूच आता गाठ
झुंडीनं हल्ला चढव दाखव स्मशान घाट
कालिकेचं रूप तुझं नराधमांना दावायचं
शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं ॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ नाते… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
रीत माणसांची न्यारी
म्हणे पाऊस लहरी
छळवाद करण्याची
त्याची चाले कामगिरी
*
वाट पाहून थकती
तेव्हा शिव्याशाप देती
तोच जोरात येताना
लोकं जीवाला जपती
*
होतो पाऊस खजील
थांबवितो हालचाल
कोण घेत नाही कधी
त्यांच्या मनाची चाहूल
*
कुठे तोडून चालते
जगी जोडलेले नाते
पण लोकांचे बोलणे
दोन्ही बाजूंनी चालते
*
जग सारे पोसायस
आहे बांधील पाऊस
तोच भारावून म्हणे
जरा जोमाने बरस
*
करी धरणी स्वागत
पावसाला वाटे खंत
हात सोडता आभाळ
पाणी दाटते डोळ्यात
*
कवी मन भारावते
त्यांचे काळीज जाणते
पावसाचे किती होते
आभाळाशी दृढ नाते
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ यशाची हंडी ! श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
उंच बांधा हंडी ध्येयाची
रचा मनोरा मेहनतीचा,
हंडी लागता मग हाती
स्वाद घ्या गोड काल्याचा !
*
जरी कोसळला मनोरा
हंडी फोडतांना यशाची,
नव्या दमाने पुन्हा उभारा
रचना तुम्ही मनोऱ्याची !
*
होता पार मार्गातील
सारे अडचणीचे थर,
कर पोचता हंडीपर्यंत
फुलेलं अभिमानाने ऊर !
*
हाती येता हंडीचे श्रीफळ
फोडा मटकी तुम्ही यशाची,
लुटाल मजा आयुष्यभर
तुम्ही कृष्ण जन्माष्टमीची !
तुम्ही कृष्ण जन्माष्टमीची !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
सुश्री त्रिशला शहा
कवितेचा उत्सव
☆ विडंबन गीत – मळ्यातली भाजी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
(चाल–एका तळ्यात होती बदके पिले सुरेख )
☆
एका मळ्यात होती भाजी सुरेख ताजी,
मन मोहवून गेले पाहूनी रान सारे…
*
झाडावर वांगी डुलती, कोवळी सुरेख ताजी,
भेंडी, गवार, मिरची वाऱ्यासवे हलती
चुटूक लाल गाजर
भूमीत लपती मुळे
मन मोहवून गेले, पाहूनी रान सारे…
*
द्राक्षाचे हलती घोस, आंब्याचा फुले मोहर
केळीची फुलली बाग, ऊसाचा वाढे फड
पाण्याचे पाट वाही भिजवून शेत गेले
मन मोहवून गेले पाहुनी रान सारे…
*
खुडली सुरेख मेथी, चवदार काकडी ती
ज्वारीची केली भाकर, वांग्याची भरली भाजी
ठेच्यासवे दही विरजले, जेवावयास यावे
मन मोहवून गेले, पाहुनी रान सारे…
*
भरभरुनी दान मिळते, निसर्गाची हीच किमया
घेऊ किती कळेना, भूमीतला खजिना
ही जाण ठेवा सारे, रक्षण करु निसर्गाचे
मन मोहवून गेले, पाहुनी रान सारे…
☆
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सौ. ज्योती कुळकर्णी
अल्प परिचय :
मराठीत वाङ्मय पारंगत आहे.
काही काळ कारंजा व अकोला येथे वरिष्ठ महाविद्यालयात कंत्राटी प्राध्यापिका म्हणून कार्यरत.
कवितेचा उत्सव
☆ कृष्ण आहे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(वृत्त: आनंदकंद)
☆
स्वप्नात भासले मज दारात कृष्ण आहे
मी जागता कळाले विश्वात कृष्ण आहे
*
राधा सखी कितीदा मुरलीधरास शोधे
जाणीव होत गेली हृदयात कृष्ण आहे
*
वाटेत चालताना वाटाच बंद झाल्या
दिसतील मार्ग नक्की स्मरणात कृष्ण आहे
*
कृष्णास शोधते पण दगडात देव नाही
साधेच नाम घेता ओठात कृष्ण आहे
*
युद्धास तोंड देते पळण्यात शौर्य नाही
साथीस आज माझ्या समरात कृष्ण आहे
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “ती सध्या काय करते?” ☆ श्री आशिष मुळे ☆
☆
ऐक पोरा बोल अनुभवाचे
ऐकायला काहीच खर्च नाही
‘ ती सध्या काय करते ‘
याला काही अर्थ नाही
*
चिडू नकोस रडू नकोस
त्याचे तिला काहीच नाही
परी हृदयावर हसऱ्या
तिची तलवार…. चालत नाही
*
खरंच होते का नव्हते
याने शिलकीत भर नाही
काय होते किती होते
हिशोबात या…. ‘अर्थ‘ नाही
*
तिच्यासाठी झुरण्यापेक्षा
मर्द बनण्यात नुकसान नाही
असेल गरज तर येईलही
नाही आली तरी….. हरकत नाही
*
हो अभेद्य उत्तुंग इतका
चोर वाटांची गरज नाही
उधळू दे अश्व आत्मज्ञानाचा
अश्वमेधाला…. मुहूर्त नाही
☆
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ समंजसतेने… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
किती जागवाव्या रात्री
टक्क पापण्यांनी….
किती होरपळावे या
चंद्र चांदण्यांनी…
*
किती ग्रीष्म शिशिरांना
सोसावे निमूट…
किती समंजसतेने
वागायचे नीट…
*
किती कश्या कश्याचे रे
पेलायचे भार…
शांततेने वादळे नी
सहायचे पूर…
*
किती वाहू द्यावे पाणी
ओंजळीमधून…
किती जगायचे, दार
मनाचे झाकून…
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
सोबती… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
सोबत सोडून मित्रांची
म्हटले एकटेच फिरूया
एकदा आपल्या डोळ्यांनी
दुनिया आपण अनुभवूया
*
बघतांना अनोखी दुनिया
फिरून फिरून थकलो
आणि नेहमीच्या सवयीने
पार्किंग लॉटात विसावलो
*
कधी लागला माझा डोळा
माझे मलाच नाही कळले
पडता अंगी पिवळी बेडी
डोळे खाडकन उघडले
*
“लॉटच्या मधे उभा मी
यात नियम कुठे मोडला?”
धीर करून विचारले
एका अदृश्य पोलीसाला
*
“सोबत मित्रांची सोडलीस
हाच तुझा मोठा गुन्हा
आज ताकीद देतो तुला
करू नको ही चूक पुन्हा”
करू नको ही चूक पुन्हा”
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
उमलून आले स्थलपद्म… ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
☆
उमलून आले स्थलपद्मम्
रूप मनोहर विहंगम्
कलिका बहरती शतपुष्पम्
मम् मानसी रुजले पाटलम्
*
पावस ऋतु हा मनमोही
रूप पाहुनी लवलाही
अंतरमन गाणे गाई
शुभ्र धवल रूपडे पाही
*
बहरून आल्या पहा खुळ्या
हिरव्या पानी शुभ्र कळ्या
पर्जन्याचे स्वागत करण्या
गुलाब झाल्या त्या सगळ्या
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈