मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 242 ☆ पंधरा ऑगस्ट…🇮🇳 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 242 ?

पंधरा ऑगस्ट…🇮🇳 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

या ही वर्षी सगळी मंडळे,

जोरात साजरा करतील,

आपला स्वतंत्रता दिवस!

देशप्रेमाच्या गाण्यात मधेच एखादी,

विसंगत रेकॉर्ड,

पोरी जरा जपून…..सारखी !

कर्ण कटू आवाज,

रस्त्यावर घर असल्यामुळे,

रहदारीच्या आवाजाबरोबरच,

देशभक्तिचे आवाज!

लहानपणचा पंधरा ऑगस्ट,

किती सुंदर होता,

झेंडा वंदनाचा,

प्रभात फेरीचा….

कलेक्टर ऑफिस मधे,

पेढा मिळाल्याच्या आनंदाचा!

 अगदी साधा सुधा,

देशासाठी बलिदान देणाऱ्या,

शहिदाच्या आठवणींचा,

ए मेरे वतन के लोगो…..

किंवा

वंदेमातरम्…..

सारख्या मधूर गाण्यांचा !

 माणसांसारखाच ,

हा राष्ट्रीय सणही बदलला आहे !

पण सगळेच बदल अपरिहार्य,

आता पटवून द्यावेच लागेल,

पुढच्या पिढीला,

मेरा भारत महान

कसाकाय ते !

☆  

© प्रभा सोनवणे

११ ऑगस्ट २०२३ 

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “स्वरधुंद पाऊस… —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वरधुंद पाऊस…—” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

पाऊस येई घेऊन संगे सप्तसूर मनमोही 

स्वतःच धरुनी ताल आणि हा आळवितो आरोही ।।

 *                  

कधी वाटे हा अहीरभैरव, गुणगुणतो कानाशी 

कधी आळवे संथपणे जणू, गुजरी तोडी खाशी ।।

*

थांबवुनी सूर्यास ऐकवी, मुलतानी, मधुवंती 

भीमपलासी मारीत ताना, फिरे स्वत:च्या भवती ।।

*

मधेच होई उदास का हा, पडे जणू एकला 

सोबत येई पूरिया आणि मारवाही साथीला ।।

*

भान नाही या दिनरातीचे, स्वरात किती हा दंग 

जग रंगे त्या मालकंसी वा, भूप-यमनी हो गुंग ।।

*

कधी कधी परि होई नाहीसा, विसरून सूरच सारे 

जो तो शोधीत त्याला, होती सैरभैरही वारे ।।

*

आर्त होऊनी विश्वच मग हे गाई मेघमल्हार 

विसरुनी रुसवा मनीचा आणि बरसे फिरून ही धार ।।

*

स्वत:च उधळी मैफल परि कधी, होत अती बेसूर 

सूर सृष्टीचे वाहून जाती, अश्रूंना ये पूर ।। 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरसा … ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “आरसा …—” ☆  डॉ. शैलजा करोडे

(अष्टाक्षरी कविता)

प्रतिबिंब चेहर्‍याचे

कधी मोठे कधी छोटे

आरसाच दावितसे

कधी खरे कधी खोटे…

*

साक्षी तो वर्तमानाचा

भूतकाळी ना रमणे

नसे जमत कधीही

भविष्यात डोकावणे…

*

सुंदरता ती मनाची

नच दावितो आरसा

बाह्यरूपी सौंदर्याचे

प्रतिबिंबी कवडसा…

*

धुरकट दर्पणात

मळकट मुख दिसे

स्वच्छ काचेत चेहरा

सूर्यासम तेज असे…

*

सोळा शृंगार पाहूनी

पहा आरसा लाजतो

रूप सुंदरीचे तेज

जणू चंद्रमा भासतो…

*

वय सोळावे असता

बने आरसा सोबती

दर्पणात न्याहाळता

रूप गर्विता लाजती…

*

आरशात डोकावता

खुले ठेवा मनद्वार

नष्ट होती मुखवटे

निर्मळता आरपार…

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दोन काव्ये — (१) आडवा मनोरा… श्री प्रमोद वामन वर्तक (२) सांग पावसा… ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आडवा मनोरा… श्री प्रमोद वामन वर्तक ☆

त्यांच्या मंदीच्या भीतीने 

झाली बाजाराची चाळण,

पंधरालाख कोटी बुडाले 

उडाली बाजाराची गाळण !

*

उडी घेण्याआधी बाजारी 

सारासर विचार करावा,

तुमचे आमचे काम ना हे 

टुकीने संसार चालवावा !

*

नादी लागून बाजाराच्या 

गमावले सर्वस्व अनेकांनी,

धीर धरून अनेक वर्षे 

धन कमावले काहींनी !

*

जर खायची असेल रोज 

मीठ भाकरी सुखाची,

एखाद्या चांगल्या बँकेत 

FD बघा काढायची !

FD बघा काढायची !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सांग पावसा… सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सांग पावसा सांग मला

काय देऊ मी सांग तुला

फुललेला तू ऋतू दिला

रंग गुलाबी फुला फुला

*

पाकळी मजला मोहविते

कळी कळी उमलून देते

हिरव्या हिरव्या पर्णपाचुच्या

देठासंगे घेई झुला

सांग पावसा……

*

कधी मी बावरुनी जाते

गोड खळी गाली येते

प्रेम झुल्यावर घेताना

हिंदोळा हा खुला खुला

सांग पावसा……..

*

अवचित लाली आलेली

सर ओलेती न्हालेली

कुंतलात मग अलगद माळून

छेड छेढतो कानडुला

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 241 ☆ प्रश्न आहे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 241 ?

प्रश्न आहे☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

का ? कशासाठी जगावे प्रश्न आहे

सोबतीला भंगलेले स्वप्न आहे

*

आज त्यांच्या भांडणाचे अर्थ कळले

त्या तिथेही चाललेला जश्न आहे

*

मी कुठे जाऊ ? स्वतःचे गाव नाही

भग्न वाडा ,झोपडीही भग्न आहे 

*

 तू तुझे झाकून ठेवावेस सारे

या जगाचे दान सारे नग्न आहे

*

काल ज्याला पाहिले संन्यस्त तेथे

आज कळले आज त्याचे लग्न आहे

*

पक्ष त्याचा वेगळा वाटे मलाही

चोर सारे पंथ हा संलग्न आहे

*

दार मी ठोठावताना समजले की

देवही सौख्यात त्याच्या मग्न आहे

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घन – मेघांनो… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ घन – मेघांनो… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

आषाढातील घनमेघांनो, जा घेऊन संदेश, 

बने, उपवने, सरीता, सागर, शोधा सर्व प्रदेश ।। धृ ।।

*

भेटीतील खग, विहंग यात्री, मार्गामाजीं तुम्हां, 

लोप पावल्या नक्षत्रांच्या, दिसतील पाऊलखुणां, 

पुसा वायुला, असे जयाला जगती मुक्त प्रवेश || १ ||

*

शैल शिखरेंही, जिथे चुंबीती गगनाचे भालं, 

कैलासाचें दर्शन घ्याया, थांबा क्षणकालं, 

मार्ग दाखवील प्रसन्न होऊन, उमापती शैलेश || २ ||

*

निर्मळ निर्झर मानसरोवर, कुठे पुष्प वाटिका, 

कमल दलातील श्रृंग बाबरा, मिलनोत्सुक सारिका, 

कथा तयांना बिरह व्यथेने, व्याकुळ यक्ष नरेश || ३ ||

*

हवा कशाला स्वर्ग, हवी मज प्रियाच स्वप्नांतली, 

विरहाश्रूचे सिंचन करुनीं, प्रीती मी फुलवली, 

सजल सख्यांनो, कथा तियेला, अंतरीचा आदेश || ४ ||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महापूर… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ महापूर… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पाणावले डोळे,

पापणीस पूर.

ऊर फाटून विदीर्ण ,

सोडताना घर.

*

असे कसे झाले,

पाणी अनावर .

बंध संयम तोडून ,

आला महापूर.

*

उघड्या डोळ्यांनी सताड,

मृत्यू सोहळे पहावे.

अशा निर्दयी पाण्याला ,

कसे जीवन म्हणावे?

*

आर्ततेने आता,

हाक कोणास मारावी?

दयाघना तूच सांग,

कशी प्रार्थना करावी.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #250 ☆ प्रेमभंग… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 250 ?

प्रेमभंग…  ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सर्व विसरलो प्रीत सागरी पडल्यावरती

शुद्ध हरपली समोरून ती गेल्यावरती

*

अर्थशास्त्र हे तिचे कळाले नंतर मजला

प्रेमभंग हा झाला पैसे सरल्यावरती

*

हाॅटेलातुन ती तारांकित आली दिसली

चहा पीत मी बसलो होतो ठेल्यावरती

*

पाठवणीचा हृद्य सोहळा तिच्या पाहिला

श्वास मोकळा झाला थोडे रडल्यावरती

*

एक रात्र ती छान राहिली माझ्यासोबत

स्वप्नाने बघ कृपाच केली निजल्यावरती

*

प्रेमभंग अन मधुमेहाचे साटेलोटे

दोन्ही व्याधी संपतात बघ मेल्यावरती

*

भेटायाला तशी एकदा आली होती

मृत्यूशय्येवर तो आहे कळल्यावरती

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पांडुरंग दिसला…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “पांडुरंग दिसला…” ☆ सुश्री शीला पतकी 

पांडुरंगा विठ्ठला हरी धावरे तू धावरे/ 

हाक देतो तुझे कृपाळा पाव हरी तू पाव रे /

आणि येतो भेटण्याला वारी संगे आज मी/

शक्ती दे मज पावलांना पाव हरी तू पाव रे //

*

टाळ वाजे वीणा वाजे वाजे मृदंग /

नाव हरीचे सर्व मुखी अन चिंतनात दंग/

पायाखालचा रस्ता होतो अवघे पंढरपूर/

भेटेन केव्हा हरी रे माझा मनातही हुरहुर //

*

वारकरी बुक्का टिळ्यातील तूच भासे रे हरी/

तो मला अन मी तयाला आज होतो माऊली/

सारे मागे सारुनी तव भेटण्या मी  चाललो /

दर्शनाची ओढ देवा दाव मुख तू दाव रे /

*

हरिपाठ तो भजन प्रवचन चाले हो वारी /

प्रत्येकाच्या नेत्री दिसतो तूच रे श्रीहरी/

आभाळातून तूच बरसतो मायेचा धागा /

आणि होते त्याचीच मगरे नदी चंद्रभागा //

*

आली आली पंढरीही  कळसही तो दिसला/

पाय धुते चंद्रभागा देव मनी हसला/

मंदिरी मूर्ती तुझी पाहून मीही हरखलो/

चरणी माता टेकला अन तृप्त मी ही जाहलो //

*

वारी आता पोहोचवली मी नको येरझाऱ्या/ 

जन्म मृत्यूच्या नकोच आता नकोच रे वाऱ्या /

मुखी माझ्या सतत असावे नाव तुझे देवा /

टाळ वीणा मृदुंग चिपळ्या गजर मनी होवो//

*

देवा गजर मनी होवो देवा गजर मनी होवो

पांडुरंग पांडुरंग पांडुरंग……..!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेमबाज — ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

नेमबाज —  ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

एक कोवळी कळी उमलली

चैतन्यमयी अंतर उर्मीने

दिशांत उधळला सुगंध

तिच्या अपूर्व कर्तृत्वाने

*

भारतीय धुरंधर नेमबाज

 मनू भाकर नाम तियेचे

ऑलिंपिक नेमबाजी स्पर्धेत 

ती नव्याने इतिहास  रचे

*

अथक प्रयत्नांची जोड 

असे जिद्द तिच्या मनाशी

ध्येयावरती लक्ष तियेचे

स्वप्न जपले तिने उराशी

*

पॅरिस भूमीत पदक जिंकूनी

मनु, सरबज्योत  द्वयाने

भारत भू च्या शिरपेचातची

तुरा खोवला अभिमानाने

*

जिगर असावी लागते मनी

तेजतर्रार हवी नजर

एकाग्रतेने लक्ष्य भेदण्या

गरुडापरी झेप जबर

*

मूर्ती लहान कीर्ती महान

उक्ती ही तर सार्थ ठरे

दिशा दिशांत दुमदुमती

या विजयाचे सदैव नारे

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print