मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 244 ☆ गजानन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 244 ?

☆ गजानन☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

बनविले खास

सुंदर मखर

बसविले त्यात

गजानन ॥

*

केली पूजाअर्चा

आर्पिली जास्वंद

झाले आनंदीत

गजानन ॥

*

दुर्वा हरळीची

केवडा पाहून

 गेले की मोहून

 गजानन ॥

*

मोदक सुबक

खीर तांदळाची

तृप्त की जहाले

गजानन ॥

*

खिरापत रोज

आवडेच भारी

लाडू पेढे खाती

गजानन ॥

*

आरती म्हणता

दिन-रात आम्ही

झाले की प्रसन्न

गजानन ॥

*

दहा दिवसाचे

असती पाहुणे

दरवर्षी येती

गजानन ॥

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “देव चिंतामणी… आले हो अंगणी“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ “देव चिंतामणी… आले हो अंगणी“…  श्री सुहास सोहोनी ☆

भाद्रपद मास, चतुर्थीचा दिस

येति स्वागतास, स्वर्ग साती

हासत नाचत, गायन करीत

आले गजानन, गणपती…

*

आले हो अंगणी, देव चिंतामणी

सुखाची पर्वणी, नेत्रा वाटे

काय वर्णू रूप, काय वर्णू तेज

भाषा शब्दकळा, थिटी वाटे…

*

मेखला कटीस, घुंगरू पायात

नादबद्ध लय, साधतसे…

स्थूलाचे सौष्ठव, नयनी मार्दव

अंतरी लाघव, नांदतसे…

*

नृत्य दर्शविते, लालित्य पदांचे

शुंडा आणि कर्ण, हिंदळती…

प्रसन्न चित्ताने, हासर्‍या मुद्रेने

आनंदाची फुले, उधळिती…

*

एका हाती पुष्प, कमळाची शोभा

तेज परशूचे, दुजातुन

तृतीय करात, मोदक प्रसाद

लाभे आशीर्वाद*, चौथ्यातुन…

*

गृहासि आमुच्या, लावावे चरण

हर्षोल्लासे तुम्ही, गणराया

कृपेचा कटाक्ष, राहो आम्हावरी

असो द्या स्मरणी, देवराया…

*

सानुल्या मूषका, भार वहाण्यासी

देता बळ तुम्ही, गजेंद्राचे

गौरिपुत्रा तैसी, द्यावी शक्ति आम्हा

आणायास राज्य, सद्धर्माचे…

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “बोला जय जय गणराया…“ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बोला जय जय गणराया☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

तुझ्या दर्शने हरती विघ्ने,

 जाती लयाला चिंता,

आनंदाची असे पर्वणी,

आगमन तुमचे बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 पूजतो तुजला भावभक्तीने,

 सान-थोर हा मेळा,

पार्थिवातूनी चैतन्याची,

 देसी प्रचिती बाप्पा! 

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 हात जोडूनी, नमन तुला हे,

 पायी ठेवता माथा,

 सकला देई विवेकबुद्धी,

 विद्याधीश तू बाप्पा! 

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 गोड मानूनी घ्यावे तू रे,

 अर्पियले जे तुजला,

 भक्तिभाव जो मनीमानसी,

 ओळखीसी तू बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 चिंतन व्हावे तुझ्या गुणांचे,

 ध्यास जडो ज्ञानाचा,

 जाण राहू दे माणुसकीची,

 माणसात तू बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया !

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “विश्वनायक” ☆ श्री दयानंद घोटकर ☆

श्री दयानंद घोटकर

? कवितेचा उत्सव ?

☆ विश्वनायक ☆ श्री दयानंद घोटकर

हे सुमुखा, हे विनायका

विश्वाधिपती, नमो नमः ।।

*

सर्वारंभी, तुझेच पूजन

अग्रभागी, तू देवलोकी

चराचरी तू, अणुरेणुतून

ज्ञान विज्ञानी, तिन्ही लोकी…

*

रक्तवर्णी, जास्वंद पुष्प अन्

दुर्वा, बेल, शमी, प्रिय तुला

शक्ती, भक्ती, अन् संयमाचा

वरदनायक, ऋद्धी सिद्धीचा..

*

स्थूल सूक्ष्म तू, सगुण-निर्गुण

पाशांकुश, धारक योद्धा

सकल कलांचा, तू निर्माता

प्रणवरुपी, शुभ-लाभ पिता…

*

वेद व्यासमुनी, तुज विनविती

महाकाव्याच्या, लेखना

तूच देसी, प्रतिभा-प्रतिमा

साहित्याची, तूच प्रेरणा…

*

नृत्य-नाट्य, रंग-वेष, अभिनय

निर्मिसी, जगती, श्रेष्ठ कला

सूर-ताल, सूर्य-चंद्रासम दिधले

चित्र-शिल्प, दिले या जगताला…

*

आनंद देसी, शांती देसी

मांगल्य देसी, सकल जीवा 

कलावंत तू, विद्याविभूषित 

वंदनीय, सा-या विश्वा…

© श्री दयानंद घोटकर (प्रेमकवी)

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आल्या गौरी गं ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ आल्या गौरी गं ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भक्तिगीत)

आल्या गौरी गं, महालक्ष्मी गं माहेरवाशिणी भादव्यात

लिंबा लोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥ धृ.॥

उंबऱ्यावर माप ओलांडी किणकिण घंटारव त्यात

बालगोपाळ सारे आनंदी घरामध्ये हो चिवचिवतात

देखणी आरास पाहून हसती गौरी गं कश्या मनात

लिंबलोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥१॥

 *

देवघरात तेज पसरे लेकुरवाळ्या  आल्या माहेरात

वस्त्र माळा गं, नवे शालू गं, दाग दागिने त्यांच्या गळ्यात

दूर्वा आघाडा सोळा पत्री ही फुल हार पहा सजतात

लिंबलोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥२॥

 *

फराळाचा ग केला थाट गेले सारे त्यांच्या पोटात

सोळा भाज्या ग कोशिंबिरीही पुरणाचे जेवण ताटात

चित्रांन्न साखर भात पंचपक्वान्न गौरींच्या थाटात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥३॥

 *

गोविंद विड्याचा मान त्यांना गं, पाणी ठेवले चांदी तांब्यात

त्यांच्या बाळांचे सारे कौतुक पाहून गाली पहा हसतात

गाठी घेऊन खिर कानवला नैवेद्याच्या दहीभातात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥४॥

 *

निरंजने गं, नंदादीप हे समया पहा तेजाळतात

सारी सुमने गंधाळलेली धूप दीप गं दरवळतात

लेकी निघाल्या सासुराला ग मोती हळूच ओघळतात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥५॥

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणेशाचे आगमन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ गणेशाचे आगमन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 गेले श्रावणाचे पाऊल,

 लागे भादव्याची चाहूल!

 हिरव्या दुर्वांची दिसे माळ,

 अन जास्वंदी लाल लाल!… १

*

रुळते सोंड छातीवर,

 दोंद त्याचे असे मोठे!

 कान त्याचे हत्तीपरी,

 सुपा सारखेच वाटे !…. २

*

 छोटे छोटे डोळे त्याचे,

 बघती सारी लगबग !

आपल्या आगमनाने,

 आली सर्वांनाच जाग. !… ३

*

 येतो पाहुणा म्हणून,

 पृथ्वीवरी चार दिस !

 त्याच्या आनंदात करू,

 मोदकाचा गोड घास !…. ४

*

 बुद्धिदाता, एकदंत,

 सर्वांस प्रिय असतो !

 त्याचे आगमन न्यारे,

साऱ्यांनाच मोद देतो !…. ५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || लवकर येई तू रे बाप्पा ||☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ || लवकर येई तू रे बाप्पा || ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

लवकर येई तू रे बाप्पा ..  लवकर येई तू रे बाप्पा ||

 *

आतुरले रे सारे प्रियजन 

सजविले घर, सजले अंगण 

आनंदाचा ठेवा देण्या, हाच मार्ग सोप्पा ||

लवकर येई तू रे बाप्पा ||

 *

दुर्वा आणि जपा सुमने 

शेंदूर आणि शमीची पाने 

पंचखाद्य नैवेद्याने 

भरून सज्ज खोपा ||

लवकर येई तू रे बाप्पा ||

 *

आलास की तू, नकोच जाऊस 

सदैव राहो तव कृपा पाऊस 

श्वासागणिक तव स्मरणाने

पार संकट टप्पा ||

लवकर येई तू रे बाप्पा ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #254 ☆ वल्लरीला भेटताना… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 254 ?

☆ वल्लरीला भेटताना ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

पालवीला डोलताना पाहिले

अन कळीला हासताना पाहिले

 

ओठ मिटुनी काल होत्या बैसल्या

आज त्यांना बोलताना पाहिले

 

पाकळ्या एकेक झाल्या मोकळ्या

साद त्यांनी घालताना पाहिले

 

झाड होते एकटे रानात त्या

वल्लरीला भेटताना पाहिले

 

पावसाने केवढे आनंदले

मोर होते नाचताना पाहिले

 

आग ही पोळ्यास कोणी लावली

सैन्य सारे धावताना पाहिले

 

माणसाने घातलेली धाड ही

मी मधाला चोरताना पाहिले

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मातृवंदना…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – मातृवंदना…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

भाग्य लाभले मज,

तुझ्या उदरी जन्मल्याचे |

संस्कार दिलेस मजला,

जीवनी पवित्र मांगल्याचे |

*

सोसल्यास अनंत कळा,

तळपत्या उन्हाच्या झळा |

कमी होऊन दिला नाहीस लळा,

तूझ्या मातृत्वाचा ऐसा जिव्हाळा |

*

जीवन माझे सरिता,

तू तिचे उगमस्थान |

काठी मायेचा ओलावा,

माऊली तू किर्तीमान |

*

कौतुके लोण्याहून मऊ,

चुकता वज्राहून कठोर |

दूर तुझ्या पासून जाता,

श्वासागणिक तुला घोर |

*

तुझ्या उदरातून केला,

जीवन प्रवास सुरु |

बोबडे बोल सुधारले,

तूच माझी आद्य गुरु |

*

वात्सल्यमूर्ती तू जीवनात 

शिरी मायेची शितल सावली |

जन्मदे तुझे किती थोरपण 

वात्सल्यसिंधू वाहे माऊली |

*

देव धर्म केला अपार,

असंख्य केलेस उपवास |

तुझ्या व्रतवैकल्याचे पुण्य,

आशिर्वाद माझ्या जीवनास |

*

हाडा मासाचा गोळा,

दिलास तू देहासी आकार |

सामर्थ्यही तूच दिलेस,

तुझे स्वप्न करीन साकार |

*

काळाच्या चाकावर,

वार्धक्य जरी तुझ्या वाटेला |

लेकरासाठी उभी खंबीर,

कोणत्याही कठीण घटकेला |

*

कितीही लिहावे तुझ्यावर,

अपूर्णतेची सल मनी राहते |

‘आई’ या दोन अक्षरासाठी,

पवित्र गंगा नयनी वाहते |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गजानन वंदन ☆ सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? कवितेचा उत्सव ?

☆ गजानन वंदन ☆ सुश्री नीलिमा खरे ☆

हे गजानना वेध जीवा तुझ्या आगमनाचे

या जगती भासते मना तुझेच रूप साचे 

ओंकाराचे ब्रह्मतत्व विलसते गजवदनी

पूजन प्रणवाचे चरणी पुष्पांजली वाहूनी

 *

केवडा शमी पत्री दुर्वांकुर जुडी हिरवी

तुज संगे सुंदर सजली सारी सुमने बरवी 

 *

धूपदीप नैवेद्य अन् भान हरपून आरती 

कर्ता करविता तू देवा आलो चरणाप्रती 

 *

जाणली थोरवी तू रे भक्तीभावाचा भुकेला

सकलांचा स्वामी जाणीसी चौसष्ट कला 

 *

सकळीक मनी स्मरण भालचंद्रा लंबोदरा

तू आराध्य दैवत कृष्णपिंगाक्षा कृपाकरा 

 *

गौरीसुता बुद्धिनाथा बुद्धिप्रिया बुद्धीदाता 

साष्टांग नमन करीते मी तुला रे वरदवंता!!!

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares