मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 230 ☆ मातृदिनानिमित्त : आई गेल्यावर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 230 ?

☆ मातृदिनानिमित्त : आई गेल्यावर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आई गेल्यानंतर..

तिचं कपाट आवरताना,

किती सहजपणे टाकून दिल्या..

तिने  अनेक वर्षे जपून ठेवलेल्या तिच्या वस्तू,

जुनी पत्रे..लग्नपत्रिका…कागदपत्रे…जुने फोटो..विणकामाच्या सुया ..लोकर आणि बरेच काही सटर फटर…. जे तिला खुप महत्वाचे वाटत  असावे!

 

तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या,

त्या लाकडी कपाटाला नेहमीच कुलुप असायचे !

होते त्यात काहीतरी खुप जपून जपून ठेवलेले…

कादंब-या, पाकशास्र, भरतकाम विणकामाची दुर्मिळ पुस्तके….

एक सुलट एक उलट करता करता…संपून गेले आयुष्य!

 

आत्यांनी विचारले,जुन्या आठवणी  काढत…

“वहिनीं ची भावगीतांची पुस्तके आहेत का?,त्या म्हणून दाखवायच्या त्यातली गाणी…”

 

हाती लागलेल्या, “गोड गोड भावगीते” या पुस्तकांवर तिच्या लग्नाची तारीख… कुणीतरी लग्नात भेट दिलेला भावगीतांचा संच… मुखपृष्ठावर बासरी वाजवणारा कृष्ण…  शेजारी राधा… राधेच्या हातावर स्वर्गीय पक्षी!

 

आतल्या पानांवर… वाटवे, पोवळे, नावडीकर, शांता आपटे, माणिक वर्मा, मधुबाला जव्हेरी, ज्योत्स्ना भोळे… यांचे तरूण चेहरे आणि गाणी…

 

एक भला मोठा कालखंड बंदिस्त करून ठेवलेला त्या लाकडी कपाटात !

कपाटातल्या सा-याच भावमधूर स्मृती….किती विसंगत तिच्या वास्तवाशी!

कपाटात कोंडलेले… डाचत होते बहुधा तिला आतल्या आत  !

 

आईचे कपाट आवरताना…

बरेच काही समजले तिच्या अंतर्मनातले….!

 

राधेच्या हातावरचा स्वर्गीय पक्षी,

पंख पसरून तसाच स्थिर….गेली कित्येक वर्षे!

आईचा प्राणपक्षी दूर…दिगंतरा….    !

 

सत्तावन्न वर्षाच्या सासरच्या वास्तव्यातली…फडफड…तडफड….शांत…!

 

आई गेल्यानंतर पाहिले,

कित्येक वर्षे गोठविलेले कपाटातले बंदिस्त विश्व !

आता मनात एक रूखरुख….

किती सहजपणे टाकून दिले आम्ही, तिला महत्वाचे वाटणारे बरेच काही!

(आई गेली. ….तेव्हा ची कविता)

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हसरा वैशाख… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ हसरा वैशाख ☆ श्रीशैल चौगुले ☆

वैशाख हसतो

सत्य वाटते का ?

वैशाख,हसतोच हसतो

असत्य का वाटावे ?

बहावा-गुलमोहर फुलतो

कुठेतरी निर्मळ झरा वहातो

पाणंद झाडातून कोकिळ गातो

तापल्या मातीस आम्रतरु बिलगू पहातो

वैशाख हसतोच.

मनात आठवणी उदास भासती

रणरण उन्हाचे निसर्गही सोसती

तरी सांजवेळी डुंबताना दिवस रंगतो

वैशाख हसतोच हसतो

हे निर्विवाद सत्य….!

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त : आई ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ मातृदिनानिमित्त : आई ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

शीतल मोहक चांदण्यामध्ये चल ना आई जाऊ

घोस खुडूनी नक्षत्रांचे जीवनास नटवू ||धृ||

*

शिशुपणी मजला अपुल्या संगे उद्यानाअंतरी

थकली तरीही घेई उचलुनी मजला कडेवरी

कुठे पांग फेडू गे तव मी तुझाच तर सानुला

तव स्वप्नांच्या पूर्तीचा मी वसा मनी धरला   ||१||

*

बालपणीची शुभंकरोति निरांजनीची वात

भीमरूपी अन रक्षण करण्या रामरक्षेचे  स्तोत्र

स्वाध्यायी उत्कर्ष घडावा ध्यास कसा विसरू

ध्येय तुझे हे साध्य जाहले दुजा कुणा ना वाहू  ||२||

*

वियोग कधि ना तुझा घडावा  मनात एकच आंस

सुखशय्येवर तुला पहाणे हाच लागला ध्यास

सारे काही अवगत झाले तुझीच गे पुण्याई

दंभ नको ना अहंकार या संस्कारा तू देई ||३||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #237 ☆ मातृदिनानिमित्त – अमृत सिंचन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 237 ?

☆ मातृदिनानिमित्त – अमृत सिंचन ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आई म्हणजे माझ्यासाठी झिजणारे ते चंदन आहे

स्तुतिसुमनांना गंध आणण्या करतो मीही चिंतन आहे

*

देव पुजेचा मुहूर्त माझा कधी कधीतर टळून जातो

रोज सकाळी उठल्यावरती माते चरणी वंदन आहे

*

झुंजायाला तयार असते भट्टीसोबत तीही कायम

राख तिची तर झाली नाही जळून होते कुंदन आहे

*

डोळ्यांमधल्या वाचत असते चुका वेदना सारे काही

कधी घालते नेत्री माझ्या जळजळीत ती अंजन आहे

*

मशागतीची सवय लावली मनास माझ्या तिनेच आहे

बीज पेरुनी मग ती करते भरपुर अमृत सिंचन आहे

*

लोक म्हणाया मला लागले अता टोणगा नसे काळजी

ती तर म्हणते तिचा लाडका मी छोटासा नंदन आहे

*

सागरात मी मेरू पर्वत घेउन आलो रवी सारखा

चौदा रत्ने यावी वरती मनात चालू मंथन आहे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त – बाईपण भारी देवा ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मातृदिनानिमित्त – बाईपण भारी देवा ☆ सौ. गौरी गाडेकर

(This is how the mother feels 🙂

मी आई आहे म्हणुनी

पिल्लांवर छाया धरते

ती मोठी झाली तरीही

मी चिंता त्यांची करते.

*

मी आई आहे म्हणुनी

अस्तित्व हरवले माझे

मज कधी वाटते भीती

पिल्लांवर माझे ओझे.

*

मी आई आहे म्हणुनी

माझी सारी पुण्याई

बछड्यांच्या कामी यावी

ही विनवणी देवापायी

*

मी आई झाले म्हणुनी

लाभला मला नव जन्म

आईपण मिरवत गेले

मम धन्य जाहला जन्म.

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आठवणी दाटतात… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– आठवणी दाटतात – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

गुंतलेल्या रेखांचं भावविश्व माझं,

त्यात मी जगत आहे |

गुंता जरी किती असला जीवनी,

माझा मी सोडवत आहे |

*

सुखाच्या रेशांनी,

कधी हुरळून जात नाही |

दुःखाच्या रेघोट्यानी,

कधी पळून जात नाही |

*

अपेक्षाभंग जरी आला नशिबी,

निराशेची चादर ओढत नाही |

क्षणिक सुख दुःखाच्या पेल्यात,

सहजासहजी बुडत नाही |

*

वादळे किती जरी आली,

झेलण्याची जिद्द आहे उरात |

आभाळ जरी कोसळलं,

पाय रोवून संकटांच्या दारात |

*

अमृत कुंभाचा मोह नाही,

हलाहल कंठात साठवतो |

मृत्यू असो वा अमरत्व,

जटा भस्मात गोठवतो |

*

खडतर जीवन वाटेवर,

माझ्या पावलांचे ठसे उमटतात |

मागे वळून पाहताना,

संघर्षाच्या आठवणी दाटतात |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 173 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 173 ? 

अभंग☆ महंत कवी राज शास्त्री ☆

भाव सुमनांची, गुंफुनिया माळ

भजनात काळ, घालवावा.!!

*

नका देऊ काही, अन्य भगवंता

कर्ता करविता, तोचि आहे.!!

*

त्यासी नचं लगे, द्रव्य प्रलोभन

त्यानेच निर्माण, केले सर्व.!!

*

स्वतःला ओळखा, स्वतःला पारखा

आखा लेखाजोखा, आयुष्याचा.!!

*

कवी राज म्हणे, भक्तीची आखणी

देईल पर्वणी, मुचण्याची.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साठमारी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ साठमारी☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आजच्या राजकारणापेक्षा

पूर्वीची साठमारी बरी होती

मैदानावर जीव खाऊन पळता येत होतं

अंगावर घेत पिसाळलेला हत्ती….

*

हरलो तर त्याच्या पायाखाली चिरडून एकदाच मरून मुक्त होता येत होतं

मिटत होत्या कायमच्या यातना

पण आत्ताच्या या मग्रूर सांडांच्या लढाईत

धडपणे मरताही आणि जगताही येत नाही माणसाला

नरकवासातील यातना भोगत जिवंत राहून करायचं तरी काय ?

*

जिथे परंपरागतांच्या तोंडचा मालकीहक्काचा घासच हिरावून घेतला जात आहे

त्यांनीच निवडून दिलेल्या दानवाकडून

त्याना शासनतरी करणार कोण ?

*

मायभूमीवर किड्यामुंग्यांचा नाही

माणसांचा रहीवास आहे

हेच विसरलेत शासनकर्ते

*

एकामेकांची उणीदुणी काढत ही गिधाडं सामान्यांचे लचके तोडत

आपलं अस्तित्व शाबूत ठेवून आरामात जगण्यात मश्गूल

राहून

आमचीच दिशाभूल करत आहेत

*

सामान्यानो जागे व्हा हीच ती नेमकी वेळ आहे.

देशाला सावरण्याची आणि मातलेल्या पुंडपाळेगाराना आवरण्याची

*

वणव्यात जळून मरण्यापेक्षा

तो विझवण्यासाठी प्रयत्न करुया

एकजूटीने आपल्या

जागते रहा रात्र वै-याची आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मतदान करू…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “मतदान करू” ☆ श्री सुनील देशपांडे

चला चला मतदान करू

लोकराज्य मजबूत करू

*

लोकशाहीची फळे मधुर हो

मतदानास्तव तुम्ही चतुर हो

योग्य तया मतदान करू

लोकराज्य मजबूत करू

*

लोकशाही मजबूत हवी जर

पाऊस थंडी गर्मी जरी वर

केंद्रावरती गर्दी करू

लोकराज्य मजबूत करू

*

लोकशाहीचा उत्सव करूया

सुट्टी पिकनिक नंतर करूया

चला घरा बाहेर पडू

लोकराज्य मजबूत करू

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जा ही र ना मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 🕺 जा ही र ना मा ! 🤣 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

जा हीरनामा सर्वच पक्षांचा

असतो एक पोकळ मनोरा,

अशक्यप्राय अशा वचनांनी

उभा करती सारा डोलारा !

*

हि तगुज करती मतदार राजाशी

त्याच्या चंद्रमौळी घरात,

भाकर तुकडा “फोटोसाठी”

खाती त्याच्याच ताटात !

*

र स्तोरस्ती काढून मिरवणूका

लोकांचा करती खोळंबा उगाच,

कर्णकर्कश्य आवाजाने होतो

फुका ध्वनी प्रदूषणाचा जाच !

*

ना ही आठवत वचननामे त्यांना

एकदा निवडून आल्यावर,

 चार हात दुरून करती नमस्कार

 जे आधी असायचे खांद्यावर !

*

मा मा बनतो भोळा मतदार

 मतदान इमाने इतबारे करतो,

 न झाल्याने वचनांची पूर्ती

 पुन्हा पाच वर्षे मनी झुरतो !

 पुन्हा पाच वर्षे मनी झुरतो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares