मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भिंगरी घर… – सौमित्र ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? काव्यानंद ?

☆  भिंगरी घर… – सौमित्र ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज आपण एक आगळीवेगळी कविता या ठिकाणी पाहणार आहोत… जीवन स्थिर नसतं,पण आपल्याला स्थैर्य हवं असतं… तुम्ही आम्ही सर्व जण कधीच एका जागी स्थिर असत नाही… सतत फिरते … प्रगती विकास च्या नावाखाली हलत राहतो… कधी स्वता तर कधी दुसरा आपल्याला हलवत असतो… गती देत असतो… जशी गती मिळते तेव्हढं आपण स्वता भोवती गिरकी घेत राहतो..

स्वताच्या पायावर उभे राहतो काही क्षण… गती संपताच आपण कलडूंन पडतो..पायाच नसल्या सारखं… एखादी भिंगरी सारखं…. होय आपण ओळखलंत .. कवि सौमित्र यांची भिंगरी घर या कवितेबद्दल बोलतोय…

☆ भिंगरी घर ☆

आधी घर छोटं होतं म्हणून तू बाहेर झोपायचास

नंतर डोक्याला शांतता हवी म्हणून बाहेर असायचास

*

मग गेले वडील तेव्हा त्यांची जागा तुझी झाली

काही दिवसांनी भावाचं लग्न,त्याची बायको घरात आली

गुपचुप उचललास बिछाना आणि हळुच देऊळ गाठलंस

फुटपाथ रस्ता देऊळ दुकान यानांच आपलं मानलंस

*

अचानक मग अधून मधून तू शहराबाहेर जायचास

एकटा एकटा एकटा फिरून पुन्हा परत यायचास

*

पैसे देऊन हक्काची जागा हाॅटेलमधे शोधायचास

काही दिवस काही रात्री काॅंफीडंटली वागायचास

*

एक दिवस प्रेमात पडलायस असं कुठुन कळलं

तुझं सारंच आठवलं अन् काळीज उगाच जडलं

*

एका जागी स्थिरावणार,तू याचंच हायसं वाटलं

शेवटी एकदाचं तुझ्या हक्काचं कुणी तुला भेटलं

*

आणि मग तू लग्न केलंसन घर घेतलस स्वत:च

खरंच खूप छान केलंस,ऐकलंस फक्त मनाचं

*

मग एक दिवस आई म्हणाली,’घर मोठ्ठं आहे तरी?’

तुझी बायको म्हणते,तू अधूनमधूनच असतोस घरी?

*

अंग थरथर कापू लागलं जीभ माझी कोरडली

आईनं हातात पट्टी घेतली,आई माझी ओरडली

*

सांग…सांग तुझी जागा तू कुठे जाऊन फेकलीस?

अशी कशी भिंगरी बाळा पाया लावून घेतलीस?

… छोट्या घरात राहणाऱ्या मोठ्या कुटुंबाची कहाणी… झोपायची अडचण … वडीलधारी मंडळी घरी झोपावीत म्हणून बाहेर झोपणारा मी सतत दुसऱ्याची सोय बघत गेलो… वडील गेले नि घरात जागा झाली हक्काची काही क्षणाची… भावाने लग्न केले मुहूर्तावर बायको आली घरी नि माझी वरात फिरून दारी…पाहता पाहता त्या निरंकुशतेच्या कुशीत शिरलो… तिनं दाखवले ते आकर्षणाचं जगं… एक जागा अशी राहिली नाही सतत बदलत गेलो… फुटपाथ रस्ता देऊळ दुकान सगळा फुकटचा आणि उघडयावरचा कारभार… मग शहाराची लागली चटकं.. ते सुख सुखासुखी सोडवत नव्हते… कधी खिसा गरम असला तर चार पैसे टाकून हाॅटेलच्या गादीवर रात्र काढू लागलो बिनधास्त…

… प्रेमाचं बिंग फुटलं,.. आईला बरंच वाटलं..चंचलेला लगाम बसेल .. मी स्थिर होईन हि आशा वाटली… हक्काची सावली मिळणार होती… लग्न हि झालं तसं स्वताच घरही झालं… आता भिरभिरणाऱ आयुष्य संपलं असं त्यांना वाटलं…. पण ते माझं मन मला कासाविस करू लागलं… हक्काचं ते असून बाहेरचं सुख सुखासुखी सोडवत नव्हते…बायकोची तडफड आईला समजली… फैलावर घेत ती मला म्हणाली… घर असताना का भिकेचे डोहाळे लागले…. भिंगरी लावून घर घर का भिरभिरतोस … आता तरी स्थिर हो…

भिंगरीचं घर रुपक  सतत दुसऱ्यानं गती दिली तर फिरते… तेव्हा ती स्वताचं भान हरपते.. स्वताच्या पायावर तोल सा़भाळते स्थिर दिसते पण गती संपताच कलंडून कोलमोडून पडते… पायाच नसल्या सारखी.. अडगळीत पडल्या प्रमाणे…  माणसं भि़गरी सारखी गरगर फिरतात स्वताच्या जीवनामध्ये … स्थैर्य हवं असतं म्हणून… कुणाला लाभलं असं वाटतं तर कुणाला नाही … साराच भासआभासाचा खेळ असतो तो….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विरुपा…. कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆  विरुपा…. कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

माझ्या सुदैवानेच कवयित्री आश्लेषा महाजन यांची विरुपा ही कविता वाचनात आली. आणि स्पदनांनी मनातल्या जाणिवा जागृत केल्या. काही विचार मनात आले . मला या कवितेतून जे जाणवले, कळले , समजले  ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

☆ कविता  – विरुपा ☆

इथे फक्त काळोख डोहातला अन्

फणा कालियाचा विषारी निळा

इथे जीवघेणी मिठी प्राक्तनाची

तथा प्राणमोही व्यथांचा टिळा

*

इथे लौकिकाचा जगद्व्याळ गुंता

तथा संभ्रमांची न येथे क्षती

कसोटी सदाचीच कर्तव्य मूढा

तुझ्या उद्धृतांची कुठे संगती?

*

कधीची उभी अष्टवक्रा विरुपा

तुझ्या दर्शनाचीच तृष्णा खरी

कुठे गुंतला व्यापतापामध्ये तू

कळेना कशी हाय! कुब्जा तरी —

*

तुझ्या पंचप्राणातुनी फुंकलेली

हवी सानिका- सुर -संमोहिनी

किती येरझारे जरी या ललाटी

उपेक्षाच मी जन्महिना कुणी —

*

असू दे तुझी वेद -शास्त्रे- पुराणे

नको त्यातली गूढ अर्थांतरे

हवा मृण्मयी देह बुद्धीस माझ्या

तुझा सावळा मानवी स्पर्श रे!!!

कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन

रसग्रहण

आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी परिस्थितीच्या किंवा विचारांच्या वादळाला सामोरे जावे लागते. त्यावेळी सभोवती संपूर्णपणे अंधःकार दाटलेला भासतो. आजूबाजूची प्रत्येक गोष्ट न् गोष्ट त्या अंधाराशी संधान बांधून त्या अंधाराची भयावहता वाढवणारी वाटू लागते .मनाला हतबलता ,अगतिकता ,विवशता या भावनांशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. संपूर्ण परिस्थिती या अंधाराशी नाळ बांधून आली आहे असे वाटत राहते. या कवितेतील “ती” म्हणजे विरूपा! तिच्या मनातल्या अशा भावनांशी समरस होऊन तिचे मनोगत कवयित्रीच्या संवेदनशील मनातून उलगडू लागते. तिच्या जाणीवांना कवयित्रीने बोलते केले आहे.

विरुपा

इथे फक्त काळोख डोहातला अन्

फणा कालियाचा विषारी निळा

इथे जीवघेणी मिठी प्राक्तनाची

तथा प्राणमोही व्यथांचा टिळा

कवितेचे विरूपा हे शीर्षक अतिशय लक्षवेधी!! कवितेतील आशयाकडे सजगतेने, सूचकतेने बघण्याचे भान वाचकांच्या मनात जागवणारे. या विरूपेच्या अवती भोवती फक्त आणि फक्त काळोखच जाणवतो आहे .कुठेही थोडासाही आशेचा कवडसा ,बदलत्या परिस्थितीचा किरण दृष्टिक्षेपात येत नाही. हा काळोख ही असा तसा नाही तर डोहातला. परिस्थितीचे गांभीर्य जाणवून देणारा.. अगम्य , गूढ वातावरण निर्माण करणारा—-अशा या गूढ डोहात दाटलेला काळोख न हलणारा, अचल असा. त्यात काहीही बदल होणार नाही याची जणू ग्वाही देणारा ..आशावादास तिलांजली देणारा हा काळोख पुरेसा नाही म्हणूनच की काय तेथे कालिया ही  आपला विषारी निळा फणा उभारून तयार आहे. तिला डसण्याचा ,दंश करण्याचा निग्रही निर्धार/विचार त्याच्या मनात आहे. हा काळोख, कालियाचा दंश नशिबात लिहिलेलाच आहे.मनात दहशत निर्माण करणारा आहे.कारण या डोहातुन तरुन जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राक्तनाची मिठी /प्राक्तनाची साथ ही आधाराची नसून केवळ जीवघेणीच आहे.अर्थात दैवाची हवीहवीशी वाटणारी साथ मिळणार नाही याची जाणीव झाली आहे.

संपूर्ण आयुष्याला प्राणमोही /प्राणघातक व्यथांचा टिळा लाभलेला आहे.कुठून ही कुणाची ही कसली ही मदत नाही हे स्पष्टपणे दिसून आले आहे.त्यातून सुटका कशी आणि कुणी करावी?? हा प्रश्न अनुत्तरित राहणार याची खात्री होते.

इथे लौकिकाचा जगद्व्याळ गुंता

तथा संभ्रमांची न येथे क्षती

कसोटी सदाचीच कर्तव्य मूढा

तुझ्या उद्धृतांची कुठे संगती?

लौकिकार्थाने जगताना जगव्यापी गुंत्याचा सामना करावाच लागतो .असे करताना मनाला पडणाऱ्या संभ्रमांनाही इथे क्षती नाही,अंत नाही. ते क्षितिजापर्यंत पसरलेले आहेत .ते वारेमाप ,अपरंपार आहेत. समजूतींना भेद व छेद देणारे आहेत .त्या संभ्रमांना सोडून व आपलेसे करून जगण्याचे ठरवले तर कर्तव्यदक्ष व कर्तव्य मूढ मनाची कसोटी ही सदाचीच आहे. कर्तव्यदक्ष मन हे बरेचदा कर्तव्याच्या मूळ व मूढ कल्पनेशी परंपरेने व पारंपरिकतेने गुंतले जाते हे सत्य ही कवयित्रीने स्पष्ट केले आहे. या सर्वाला अपवाद विरळाच!! देवावर श्रद्धा असणाऱ्याने त्याच्या (देवाच्या) वचनांचा /बोलांचा आधार घ्यावा म्हटले तर त्याचीही संगती न लागण्या सारखी परिस्थिती दृष्टीस पडते .त्याच्या वचनांची संगती आजूबाजूच्या परिस्थितीशी मेळ साधत नाही . किंबहुना बरेचदा फारकतच दिसून येते .अशा वेळी सर्व बाजूने विवश झालेली अष्टवक्रा विरुपा मात्र कधीची ताटकळत उभी आहे त्याच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत!! तिच्या मनाला आणि मनात त्याच्या दर्शनाची आस आहे . तिला त्याच्या रुपाची ओळख व्हावी याची तहान, तृष्णा लागलेली आहे .आणि जगात इतर बाबी जरी भ्रामक असल्या तरी तिची आस ही मात्र एकमेव खरी गोष्ट आहे हे ती ठासून सांगते आहे. बाकी सारे संभ्रमाचे राज्य याची जाणीव ती करून देते. तिच्या प्रतिक्षेला अजूनही फळ आलेले नाही, त्याचे प्रत्यक्ष दर्शन तिला झालेले नाही. त्यामुळे ती म्हणते की जगाच्या व्यापा-तापामध्ये तू गुंतलेला आहेस ,गुंतून पडला आहेस .अशावेळी माझ्यासारख्या विरूपेचे/कुब्जेचे अस्तित्व ,तिचे मन तुला कसे कळणार ?अशी कुणी “एक” आहे याचे भान तरी तुला कसे असणार? हे सर्व जाणूनही ती त्याला त्याच्याकडून तिला जे काही हवे आहे ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयास करते.

तुझ्या पंचप्राणातुनी फुंकलेली

हवी सानिका- सुर -संमोहिनी

किती येरझारे जरी या ललाटी

उपेक्षाच मी जन्महिना कुणी —

तिच्या मनातल्या “त्याने” मनापासून अगदी पंचप्राण लावून फुंकलेल्या बासरीतून उमटलेल्या सुरांची संमोहिनी तिला हवी आहे ,ती तिला खुणावते आहे. तिला इतर काहीही नको. त्या सूर संमोहिनीत तिला तिचा जीव ,तिचे अस्तित्व विसरायचे आहे. तिला त्या सुरांच्या अस्तित्वात तिचे अस्तित्व मिसळून टाकायचे आहे .तिला कल्पना आहे की हे सारे अगदी सोपे, सहज नाही .यासाठी तिच्या ललाटी किती जन्म लिहिले असतील कोण जाणे !ही सुर संमोहिनी लाभण्याकरता तिला अनेक जन्म घ्यावे लागतील ही!! कदाचित नुसत्या येरझारा ही घालाव्या लागतील आणि तरीही हाताला काहीच लाभणार नाही. “जन्म हिन कुणी “असे आणि हेच वास्तव तिच्या नशिबी असेल .त्या सूर संमोहिनीचे सौभाग्य तिला लाभणारं ही नाही कदाचित..

असू दे तुझी वेद -शास्त्रे- पुराणे

नको त्यातली गूढ अर्थांतरे

हवा मृण्मयी देह बुद्धीस माझ्या

तुझा सावळा मानवी स्पर्श रे!!!

जीवनातील साऱ्या सत्याला सामोरे जाण्याची तिच्या मनाची तयारी आहे.. सर्व जाणूनही ती त्याला म्हणते वेद ,शास्त्र , पुराणे यातील तत्त्व, वचने, त्यातील ईश्वराचे अस्तित्व, जगण्याचे तत्वज्ञान, द्वैत अद्वैताची विस्तृत चर्चा, त्याचे अनुभव, गूढ गर्भित अर्थ तसेच, त्यांच्या अर्थांतरात तिला  स्वारस्य नाही.मत मतांतरे जाणून घेण्याची तिला अजिबात आस नाही .या सर्व ज्ञानाचा मोह तिला अजिबात नाही. मातीत मिसळणाऱ्या तिच्या नश्वर देह बुद्धीला मात्र आस आहे ती तिला भावलेल्या त्या सावळ्या रूपा सारखी वर्तणूक असणाऱ्या मानवी स्पर्शाची.. अर्थात वेद,शास्त्रातले तत्त्वज्ञान कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात आचरणाऱ्या, ते जगणाऱ्या मानवाची. केवळ कल्पना ,संकल्पना यात अडकून न राहता जगण्याचे प्रत्यक्ष भान असणारा मानवी स्पर्श तिला हवा आहे . कुब्जा /विरूपा हे प्रतीक आहे प्रत्येक मानवाच्या मनाचे .त्याला सूज्ञ व सम्यक विचारांनी जगणाऱ्या मानवाचीच प्रतीक्षा आहे . दुर्दैवाने ते दुर्मिळ आहे असे वाटते. माणसाने माणसातच देव शोधावा, पहावा आणि तो सुदैवाने त्याला मिळावा यासारखे सद्भाग्य ते कोणते! हा सारा मला वाटलेला अर्थ आहे. तो व्यक्त करावासा वाटला मनापासून इतकेच ..

ही कविता वाचकांना अंतर्मुख करते ,विचार करायला लावते. कुठेही ,काहीही स्पष्टपणे न सांगता किंवा त्याकडे निर्देशही न करता अपेक्षित परिणाम साधणारी ही कविता मनाला भुरळ घालते हे मात्र नक्की. त्याची वृत्तबद्धता ,समर्पक शब्दांची योजना त्या कवितेला लय ताल आणि गेयता ही प्राप्त करून देते हे विशेष.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शिदोरी… – कवयित्री : डाॅ. सौ. संजीवनी तोफखाने ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ शिदोरी… – कवयित्री : डाॅ. सौ. संजीवनी तोफखाने ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गझलकारा डॉ. सौ. संजीवनी तोफखाने यांच्या शिदोरी या गझलेचे रसग्रहण.

गझल हा एक वृत्तात्मक काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझलेची रचना ही सर्वसाधारण कविता म्हणून वेगळी असते. त्यात दोन दोन चरणाचे शेर असतात आणि संपूर्ण गझल जरी एकाच विषयावर असली तरी प्रत्येक शेर स्वतंत्र असतो.  एकच विषय न घेता वेगवेगळ्या विषयांवरील स्वतंत्र शेरही गझलरचनेत स्वीकारार्ह्य आहेत.

आता ही गझल पहा.

☆ शिदोरी ☆ डॉ. सौ. संजीवनी तोफखाने ☆

 गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

 शोधात याच सारे आयुष्य लांघते मी

*

पाहून वागण्याच्या एकेक या तर्‍हा हो

होते अवाक बाई श्वासास रोखते मी

*

मी मंदिरात जाते ठावे चराचरी तो

श्रद्धा अशी असोनी पाषाण पूजते मी

*

मिळणार ना फळे मज माझी हयात सरली

खातील लोक कोणी कोयीस लावते मी

*

गुलमोहरास जमते ग्रीष्मात रंगणे जर

पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी

*

का ओढ लावसी रे धारेपल्याड तीरा

मज यायचेच आहे पक्केच जाणते  मी

*

घेते करून काही सत्कर्म सोबतीला

संगे हवी शिदोरी यात्रेत मानते मी

ही गझल वाचल्यानंतर पटकन  लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या गझलेतील मी एका दीर्घ आयुष्याचा अनुभव घेतलेली स्त्री आहे. तिने पाहिलेला समाज यात आहे.

मतल्यात ती म्हणते,

“गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

 शोधात याच सारे आयुष्य लांघते मी”

माझ्या चहुबाजूला माणसांची इतकी गर्दी आहे, आयुष्य सरत आले तरी मला माणसातला माणूस अजून काही सापडला नाही.

आपण नेहमी म्हणत असतो आजकाल माणसातली माणुसकी हरवत चालली आहे. जग स्वार्थाने भरले आहे. स्वतःची पोळी भाजली की झाले. आपल्या मुलांनाही जन्मदात्यांकडे लक्ष देण्यास, त्यांच्यासोबत चार सुखाच्या गोष्टी करण्यास वेळ नाही.  हीच खंत या मीने  वाचकांजवळ व्यक्त केली आहे.

“पाहून वागण्याच्या एकेक या तर्‍हा हो

 होते अवाक बाई श्वासास रोखते मी”

हा दुसरा शेर!

व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो. गझलेतील या स्त्रीने तिच्या आज पर्यंतच्या आयुष्यात नाना तर्‍हेची माणसे पाहिली आणि त्यांच्या वागण्या बोलण्याच्या एक तर्‍हा पाहून ती म्हणते मी अवाक झाले. त्यांच्याविषयी काय कसे बोलावे हेच तिला समजत नाही. कोणीतरी चांगला देव माणूस उर्वरित आयुष्यात भेटेल या आशेने ती तिचा श्वास रोखून अजून उभी आहे. यात तिचा कुठेतरी सकारात्मक भाव आपल्याला दिसून येतो.

या तिसऱ्या शेरात ती तिच्या मनातील आणखी वेगळे भाव व्यक्त करते. ती म्हणते,

“मी मंदिरात जाते ठावे चराचरी तो

श्रद्धा अशी असोनी पाषाण पूजते मी”

आयुष्याच्या या प्रवासात या स्त्रीला समजले आहे की चराचर विश्वात ईश्वराचे वास्तव्य भरून आहे. जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती अशी तिची श्रद्धा आहे. तरीही ती मंदिरात जाते, गाभाऱ्यातल्या दगडाला देव मानून त्या पाषाणाची मनोभावे पूजा करते.

या ठिकाणी ही ‘मी’ मला दुनियेतली सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणारी वाटते. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे ठाऊक असूनही आपण सगुणाचीच पूजा करतो.  आपणच त्या देवाला रंग रूप आकार देतो.

“मिळणार ना फळे मज माझी हयात सरली

 खातील लोक कोणी कोयीस लावते मी”

हा शेर खूप काही सांगून जाणारा आहे. निसर्गाचा असा नियमच आहे की आज पेरल्यावर लगेच उद्या उगवत नाही. बिजास अंकुर फुटून, रोप वाढवून त्याला फळे लागेपर्यंत त्या माणसाची हयात सरेल, परंतु त्याचा आनंद घरातील आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना मिळेल, आणि मी लावलेल्या   कोयीचा मोठा आम्रवृक्ष होऊन माझे प्रियजन जेव्हा त्याला लागलेले आंबे खातील तेव्हा मला खरा आनंद मिळेल.

“गुलमोहरास जमते ग्रीष्मात रंगणे जर

 पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी”

या शेरात जीवनाचे फार मोठे तत्त्वज्ञान गझलकारा संजीवनीताई सांगून जातात.

जीवनाच्या वाटेवर आनंदाची फुले असतात आणि त्याच सोबत दुःखाचे काटेही पसरलेले असतात. रोजचा दिवस कधीच सारखा नसतो. या शे रातील  गुलमोहरचा दिलेला हा दृष्टांत

अगदी रास्त आहे.ग्रीष्म ऋतूत रणरणत्या उन्हात,

उष्णतेचा दाह होत असताना गुलमोहर कसा लाल केशरी फुलांनी बहरून जातो. त्याला उष्णतेची पर्वा नसते.  हे पाहून या गझलेतील ही ‘मी’ म्हणते की मी सुद्धा

अशीच हसत असते.मला संकटांची पर्वा नाही. संकटांवर मात करून पुढे जावे आणि आनंदी रहावे हा सकारात्मक बोध या शेरातून संजीवनी ताईंनी वाचकांना दिला आहे.

 

” का ओढ लावशी रे धारेपल्याड तीरा

 मज यायचेच आहे पक्केच जाणते मी”

 

 एक ठराविक आयुष्य जगल्यानंतर

 प्रत्येकालाच भवसागराच्या या तीरावरून पलीकडे दुसऱ्या तीरावर जाण्याची सुप्त ओढ लागलेली असते आणि आज ना उद्या त्या तीरावर जायचेच आहे हेही पक्के ठाऊक असते.  तरीसुद्धा माणसाच्या मनात कुठेतरी मृत्यू विषयी भय असतेच हाच विचार या शेरात ताईंनी मांडला असावा का?

 

आता हा शेवटचा शेर पहा.

 

” घेते करून काही सत्कर्म सोबतीला

 संगे हवी शिदोरी यात्रेत मानते मी”

 

 माणूस महायात्रेला निघतो,त्याचे निर्वाण होते तेव्हा तो सोबत काय नेतो? पैसा- अडका धन- दौलत, नाती-गोती सर्व काही त्याला इथेच ठेवून जायचे असते. मात्र त्याच्या कर्मांची नोंद वरती चित्रगुप्ताकडे झालेली असते.  सत्कर्म आणि कुकर्म ज्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे दुसऱ्या जन्मात त्याला ते भोगावेच लागते. यालाच आपण पूर्वसंचित म्हणतो. हेच तत्व लक्षात घेऊन या शेवटच्या शेरात ही ‘मी’ म्हणते, “या प्रवासात मी माझ्यासोबत सत्कर्मांची शिदोरीबांधून नेते.”

 

 आनंदकंद वृत्तात बांधलेली अशी ही तत्व चिंतन पर गझल आहे. साधारणपणे गझल म्हटली की ती

 शृंगार रस प्रधान असते. त्यात प्रियकर प्रेयसीचे मिलन, विरह, लटकी भांडणे वगैरे विषय प्रामुख्याने हाताळलेले असतात. अध्यात्माकडे वळणाऱ्याही काही गझला असतात. ही गझल अध्यात्मिक आहे असे म्हणता येणार नाही, परंतु अध्यात्माकडे झुकणारी नक्कीच आहे. माणुसकी हे या गझलेचे अंतरंग आहे असे मी म्हणेन.

 

 प्रत्येक शेरातील खयाल,उला आणि सानी यातील राबता अगदी स्पष्ट आहे. शोधते, लांघते, रोखते, पूजते, लावते, हासते, जाणते, आणि मानते हे सर्व कवाफी अगदी सहजतेने वापरल्यासारखे वाटतात. लगावलीचे तंत्र सांभाळताना कुठेही ओढाताण वाटत नाही,  तसेच यातील गेयता आणि लयही अगदी सहज सुंदर आहे. अशी ही सर्वगुणसंपन्न गझलरचना मला फार आवडली,  तुम्हालाही ती नक्कीच आवडेल याची खात्री आहे.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आता तरी सावरा रे… कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ आता तरी सावरा रे… कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

कधी कधी मनाची अस्वस्थता इतकी टोकदार असते की अशावेळी कुणी सोबत असण्यापेक्षा एकटेपणातच डुबून जाणं अधिक सुखाचं वाटतं  किंवा आपल्या भोवतालचं जग हे किती ढोंगी, फसवं आहे याची जाणीव झाल्यामुळे या सर्वांपासून दूर राहण्यातच मन:शांती आहे अशा तऱ्हेची एक एकाकी मानसिकता बनते.  शिवाय, “माझं मीच पाहून घेईन” माझं यश माझं अपयश याचं काय करायचं ते मी बघेन.” अशा तऱ्हेचा   कणखर  कल मनाचा  त्याच  क्षणी होतो.  माननीय सुहास पंडित  हे अशाच प्रकारचा  विचार त्यांच्या, आता तरी सावरा रे या कवितेतून मांडत आहेत. मला ही कविता फारच आवडली आणि या कवितेत दडलेले अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी याचा रसास्वाद घ्यावा असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ आता तरी सावरा रे ☆

मी किती अस्वस्थ आहे शांतविण्या येऊ नका

दाह आहे अंतरीचा  लेप वरचे लावू नका.

*

निसटले जे यश तयाला निश्चये मिळवेन मी

दूर माझा गाव गेला तरी  तो पुन्हा गाठेन मी

*

शब्द  साधे बोलतो तरी का बरे ते बोचती

फूल  वेचायास गेलो काटेच सारे टोचती

*

कष्टणारा कष्टतो अन् पाहती सारे मजा

मूर्ख  सुखी लोळतो अन् शहाणा भोगी सजा

*

थांबवा हे खेळ फसवे लाज थोडी बाळगा रे

तोल ढळत्या या भूमीला, आता तरी सावरा रे

 – सुहास  रघुनाथ  पंडित  .सांगली.

ही संपूर्ण कविता वाचल्यानंतर  कवितेतला विषाद प्रकर्षाने जाणवतो. विचारातून विषाद आणि विषादातून सत्याकडे जाण्याचा एक अदृश्य प्रवास या कवितेत अनुभवायला मिळतो आणि या विषयातलं वास्तव मनाला भिडतं. वाचकालाही ते विचार करायला लावतं.

मी किती अस्वस्थ आहे शांतविण्या येऊ नका

दाह आहे अंतरीचा लेप वरचे लावू नका…

कवी म्हणतात,” माझी अस्वस्थता का आणि किती आहे हे तुम्हाला कळणारच नाही किंबहुना ती कळून घेण्याची क्षमता तुमच्यात आहे का याबद्दलच मी साशंक आहे.  माझ्या अंतरात पेटलेली ही धग आहे आणि ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल?  तुमचे शब्द, तुमचे सांत्वन हे वरवरचे आहे आणि ते लटके आहे.  त्यात कुठल्याही खऱ्या भावनांचा अंश नाही म्हणूनच सांगतो जरी मी अत्यंत अस्वस्थ असलो तरी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका.  तुमच्या या सांत्वनपर शब्दलेपनाने माझ्या अंतःकरणातला जाळ निवणार नाही. त्यापेक्षा मला एकटेच राहू द्या. LEAVE ME ALONE.”

लेप वरचे लावू नका ही काव्यपंक्ती खूपच लक्षवेधी आहे. लोक  मुखवटे घालून आपल्या आजूबाजूला फिरत असतात. अधरी एक आणि उदरी एक अशी त्यांची दुहेरी वृत्ती असते आणि या लोकांच्या बेगडीपणामुळेही कवी कमालीचे अस्वस्थ आहेत.

निसटले जे यश तयाला निश्चये  मिळविन मी

दूर माझा गाव गेला तरी पुन्हा गाठेन मी

अपयशाने सर्वसामान्य माणूस खचतो. काही क्षणाची निराशा जीवनात येते ही. कधी ते नैराश्य जगण्या बोलण्यातून व्यक्त होते आणि भोवतालची माणसं सहानुभूतीपूर्वक काही सल्ले देतात तर काही असेही महाभाग असतात की ते नैराश्यात अधिक भर घालतात त्यापेक्षा हे काही नकोच.

“माझ्या निराश मनाला मी सावरेन. जे निसटले ते पण स्वबळाने, जिद्दीने मी मिळवेन. स्वप्नभंगाचं दुःख पचवून, देअर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम असा विचार बाळगून जे दुभंगलं ते सांधण्याचा प्रयत्न करेन.”

दूर माझा गाव गेला तरी पुन्हा गाठेन मी  ही ओळ रूपकात्मक आहे. इथे माझा गाव यात माझ्या  स्वप्नांचा गाव म्हणजेच माझी स्वप्नं असा अर्थ अभिप्रेत असावा आणि त्या दृष्टीने कवी म्हणतात की,” एक ना एक दिवस मी माझे स्वप्न पूर्ण करेनच.”

शब्द साधे बोलतो तरी का बरे ते बोचती

फूल वेचावयास गेलो काटेच सारे टोचती

कवीच्या मनात खंत आहे. ते म्हणतात,”खरं म्हणजे लोकांच्या या दुनियेत ना मी स्वतःला सिद्धच करू शकलो नाही. लोकही माझ्या विचारापर्यंत पोहोचू शकले. कुणीच मला खऱ्या अर्थाने समजून घेण्यास सफल झालेले नाहीत.  माझ्या साध्या बोलण्याचाही विपर्यास केला जातो.मला समजत नाही  त्यातून नकारात्मक अर्थ काढून ते टोचणारे का ठरावेत? वास्तविक मला फुलं वेचायची असतात पण माझ्या वाटेला मात्र काटेच येतात.. असे का? “

फुले वेचावयास गेलो काटेच सारे टोचती ही ओळ  रूपकात्मक आहे. ज्याचे  चिंतावे भले  तो म्हणे आपलेच खरे

“काहीतरी चांगलं पेरण्याचा मी प्रयत्न करतो पण ते सारं फुकाचं ठरतं. करायला जातो एक पण घडतं मात्र भलतंच.”

कष्टणारा कष्टतो अन् पाहती सारे मजा

मूर्ख सुखी लोळतो आणि शहाणा भोगी सजा…

कवीच्या मनात असे नकारात्मक विचार येण्यास कारणीभूत आहे  सद्य परिस्थिती हे निश्चितच.  आजकाल जीवनात खरोखरच कष्टांना मोल राहिलेलं नाही. कष्ट करणारी व्यक्ती समाजात हास्याचा नाहीतर उपहासाचा  विषय होतो.

“फुका कष्टतो तू लेका” असे शब्दांचे फटकारे त्याला मारले जातात.

हे कडवं वाचताना कवीच्या मनातले विचार वाचक वाचू शकतो. केल्या कष्टाची अथवा कामाची दखल घेतली जात नाही. पुरेशी दाद मिळत नाही, ॲप्रिसिएशन हे तर फारच दूर राहिलं पण कित्येक वेळा आपल्या श्रमाचे श्रेय कोणीतरी दुसराच घेऊन जातो आणि आपण मात्र त्याच खड्ड्यात राहतो.  ज्याला अक्कल नाही, उमज नाही तो राज्यपदावर सहज बसतो आणि शहाणा मात्र न केलेल्या अपराधाची  शिक्षा भोगतो.

कवी सुहास पंडितांनी केलेलं हे भाष्य म्हणजे ज्वलंत वस्तुस्थिती आहे. यात नकारात्मकता  असली  तरी त्यात एक दारुण सत्य, वास्तव, दडलेलं आहे. कुणाही जागृत,संवेदनशील मनाच्या माणसाला याची चीड येणं, विषाद वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे.

थांबवा हे खेळ  फसवे  लाज थोडी बाळगा रे

तोल ढळत्या या भूमीला आता तरी सावरा रे…

हा शेवटचा चरण म्हणजे  कवीच्या संपलेल्या सहनशक्तीचा परिपाक आहे. भोवतालचा बदललेला माणूस,  त्याची घसरलेली मूल्ये, नीती, बेरडपणा ढोंगीपणा, खोटेपणा, मतलबीपणा, आत्मकेंद्रीतपणा, मूळातच हरवलेली विश्वासार्हता, सडलेली सारी यंत्रणा आणि त्यात भरडलेली अस्सल माणूसकी पाहून कवीचं मन रक्तबंबाळ झालं आहे.  त्याच्या मूल्याधिष्ठित, तत्त्वप्रेमी मनाला या सर्वांशी जुळवून घेणे आता अशक्य झाले आहे आणि त्याचाच उद्रेक झाला आहे आणि त्यामुळेच त्याच्या मुखातून असे उद्गार बाहेर निघतात,

“अरे षंढा! हे फसवे खेळ आता तरी थांबव. थोडी तरी लाज बाळग. सद् सद् विवेकबुद्धीला विचारून पहा आणि तुला याची जाणीव आहे का तुझ्या या मायाजालात तूच गुंतत चालला आहेस. जागा हो माणसा! जागा हो! डोळे उघड.”

तोल ढळत्या या भूमीला आता तरी सावरा रे यातही एक सुंदर रूपक आहे. भूमीचा तोल ढळतोय म्हणजे साऱ्या विश्वातच नैतिकतेची पातळी ढळलेली आहे, खालावलेली आहे. एक अनाचार, अनागोंदी सर्वत्र माजलेली आहे. या दोन ओळीत मला साऱ्या जगात चाललेला मानवतेचा संहार जाणवतो. सत्तेसाठी होणारी युद्धे, बळी तो कान पिळी हा जंगलचा कायदा बोकाळलेला दिसतोय हे पाहून कवीचं मन अत्यंत उद्विग्न होतं आणि त्या क्षणी त्याला एकच जाणवतं, ज्यांच्यामुळे ही  परिस्थिती निर्माण झाली आहे ती सावरण्याचं कामही  आता त्यांचंच आहे.बूमरँग सारखी  त्यांची स्थिती झाली आहे म्हणूनच कवी त्यांना म्हणतो,” “आता तरी सावरा रे.. अजून वेळ गेलेली नाही.  या मानवी जीवनात शांती, समृद्धी, एकोपा, समता, बंधुता आणि खऱ्या भावनांची, सहानुभूतीची पेरणी व्हायला हवी.”

अशी सुंदर संदेश देणारी खोल, गंभीर अर्थ उलगडवणारी  सुरेख काव्यरचना. हे वैयक्तिक विषादातून निर्माण झालेलं काव्य असलं तरी एक जळजळीत वास्तव मांडणारं आहे.

येऊ नका— लावू नका, मिळवेन मी— गाठीन मी, बोचते— टोचते, मजा— सजा ही काफियत मनातल्या उद्रेकाच्या भावनांना चांगलीच अधोरेखित करते. ही संपूर्णपणे नियमात रचलेली गझल नसली तरी या रचनेला गझलेचा बाज जाणवतो. वाचताना वाचक कवीच्या भावनांशी तितक्याच आवेशाने जोडला जातो हे या काव्यरचनेचे संपूर्ण यश आहे असे मला वाटते.

कुठलाही कवी कविता रचतो तेव्हां त्याच्या मनातले विचार वाचकाला जसेच्या तसे उमजतीलच हे संभाव्य नाही.

इतकं सारं लिहिल्यानंतर मला क्षणभर असेही वाटले की विकासाची धुंदी चढलेल्या माणसामुळे पर्यावरणाची जी  प्रचंड हानी होत आहे त्यामुळे तर कवीचं मन या ठिकाणी अस्वस्थ झालेलं आहे का? आणि कुठल्याही प्रकारची विकासास पोषक ठरणारी समर्थनं त्याला आता ऐकायचीच नाहीत? एकाच विचाराने कवी घेरलेला आहे की आता हे

भूमीला ओरबाडणारं विकासयंत्र थांबलंच पाहिजे.  पृथ्वीचा तोल सांभाळलाच पाहिजे.

थोडक्यात ही कविता श्र्लेषात्मक आहे.

अनेकार्थी आहे. म्हणूनच interesting आहे वाचकहो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ समस्या… ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ समस्या… ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

बा.भ. बोरकर म्हणतात,

 मी पण ज्यांचे

पक्व फळापरी

सहजपणे गळले हो

 जीवन त्यांना कळले हो!

जीवनाविषयी अगदी नेमकं सांगणाऱ्या या ओळी पण खरोखरच हे इतकं सोपं आहे का?  जीवन म्हणजे नक्की काय हे संपेपर्यंत कळतं का? आपण जन्माला आलो,  जगलो,  म्हणजे नेमकं काय याचा सखोल विचार मनात कधी येतो का?  जीवनाविषयी खूप भाष्ये आहेत.

 जीवन एक रंगभूमी आहे.

 जीवन म्हणजे दोन घडीचा डाव.

 जीवन म्हणजे नदी आणि समुद्राचा संगम.

 जीवन म्हणजे कुणाला माहित नसणारं प्रत्येकाचं निरनिराळं  एक गोष्टीचं पुस्तक.

 यश अपयशाचा लेखा जोखा.

 सुख दुःख यांचे चढउतार.

 जीवन म्हणजे संसार.

 जसा तवा चुल्ह्यावर

 आधी हाताला चटके।

 तेव्हा मिळते भाकर. ।।

जीवनाविषयीचा विचार करताना त्यातली दुर्बोधता जाणवते.  खरोखरच जीवन कोणाला कळले का?  हा अत्यंत मार्मिक प्रश्न डॉ.  निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या समस्या या लघुकाव्यात सुंदरपणे मांडला आहे.  या कवितेचा आपण रसास्वाद घेऊया.

☆ समस्या ☆

 जीवन ही तर एक समस्या

 कुणा न सुटली कुणा उमगली।ध्रु।

 

 कशास आलो कशास जगतो

 मोह मनाचा कुठे गुंततो

 कोण आपुला कोण दुजा हा

गुंता कधीचा कुणाल सुटतो ।।१।।

 

सदैव धडपड हीच व्यथा का

जीव कष्टतो कशा फुकाचा

स्वप्न यशाची दुर्मिळ झाली

मार्ग शोधता नजर पोळली ।२।

 – डॉ.  निशिकांत श्रोत्री

समस्या  या शीर्षकांतर्गत दोनच कडव्यांचे  हे अर्थपूर्ण चिंतनीय गीत आहे.  एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कळली असते असे आपण म्हणतो तेव्हा ती  खरंच का आपल्याला उमगलेली असते?  जो बोध अपेक्षित असतो तो आपणास झालेला असतो का?  उलट जितके आपण त्या प्रश्नात रुततो तितकी त्यातली समस्या अधिक गंभीरपणे जाणवते.  म्हणूनच ध्रुवपदात डॉ. श्रोत्री म्हणतात,

 जीवन ही तर एक समस्या

कुणा न सुटली कुणा उमगली।ध्रु।

या दोन ओळीत जीवनाविषयीचा नकारात्मकतेने विचार केला आहे असेच वाटते पण त्यात एक वास्तव दडलेलं आहे.  सभोवताली जगणारा माणूस जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरोखरच जाणवतं की जीवन हे सोपं नाही. कुणासाठीच नाही.  ते कसं जगायचं, जीवनाकडे नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे आणि ते कसे जमवायचे हीच एक फार मोठी समस्या आहे,  कोडे आहे.  आणि आजपर्यंत हे कोडे ना समजले ना सुटले.

कवीने वापरलेला समस्या हा शब्द खूप बोलका आहे. इथे समस्या याचा अर्थ फक्त संकट,  आपत्ती,  चिंता, एक घोर प्रश्न असा नाही तर समस्या म्हणजे एक न सुटणारे कोडे.  एक विचित्र गुंतागुंत.  एकमेकांत अडकलेल्या असंख्य धाग्यांचे गाठोडे  आणि माणूस खरोखरच आयुष्यभर हा गुंता सोडवतच जगत असतो.  तो सुटतो का?  कसा सोडवायचा याचे तंत्र त्याला सापडते का हा प्रश्न आहे.

 कशास आलो कशास जगतो

 मोह मनाचा कुठे गुंततो

कोण आपला कोण दुजा हा

 गुंता कधीच कुणा न सुटतो ।१।

नेटाने आयुष्य जगत असताना निराशेचे अनेक क्षण वाट्याला येतात.  ही निराशा वेगवेगळ्या कारणांमुळे आलेली असते. अपयशामुळे, अपेक्षा भंगामुळे, अचानक उद्भवलेल्या अथवा अनपेक्षितपणे बदल झालेल्या परिस्थितीमुळे,” काय वांच्छीले अन काय मिळाले” या भावनेतून, फसगतीतून, विश्वासघातातून… वगैरे वगैरे अनेक कारणांमुळे माणसाच्या जीवनात नैराश्य येते आणि मग त्यावेळी सहजपणे वाटते  का आपण जन्माला आलो?  कशासाठी आपण जगायचं पण तरीही यातला विरोधाभास भेडसावतो. एकाच वेळी जगणं असह्य  झालेलं असतं,  मरावसंही वाटत असतं पण तरीही कुठेतरी जगण्याविषयीचा मोह सुटत नाही.  मनाने मात्र आपण या जगण्यातच गुंतलेले असतो.

फसवणूक तर झालेलीच असते. ज्यांना आपण आपली माणसं म्हणून मनात स्थान दिलेलं असतं त्यांनीच पाठीमागून वार केलेला असतो किंवा कठीण समयी साथ सोडलेली असते. मनात नक्की कोण आपलं कोण परकं, कुणावर विश्वास ठेवावा याचा प्रचंड गोंधळ उडालेला असतो.  मनाला जगण्यापासून पळून जावसं वाटत असतं पण तरीही पावलं मागे खेचली जातात कारण मोह, लोभ यापासून मुक्ती मिळालेली नसते.  पलायनवाद आणि आशावाद यामध्ये सामान्य माणसाची विचित्र होरपळ  होत असते. जगावं की मरावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते आणि डॉक्टर श्रोत्रींनी या द्विधा मनस्थितीचा अत्यंत परिणामकारक असा सहज सुलभ शब्दात या कडव्यातून वेध घेतलेला  आहे हे जाणवतं.

कशास आलो कशास जगतो

या ओळींमागे आणखी एक भावार्थ आहे.

माणसाचा जन्म पूर्वसुकृतानुसारच होतो.

जन्मत:च  त्याने करावयाची कर्मेही ठरलेली असतात. पार्थ का भांबावला. कारण युद्ध करणे,अधर्माशी लढणे हा त्याचा क्षात्रधर्म होता. पण तो मोहात फसला. गुरु बंधुंच्या पाशात गुंतला आणि किंकर्तव्यमूढ झाला. माणसाचाही असाच अर्जुन होतो. तो त्याची कर्मं किंबहुना त्याला त्याची कर्मं कोणती हेच कळत नाही. भलत्याच मोहपाशात अडकतो. भरकटतो,सैरभैर होतो.आणि हीच त्याच्या जीवनाची समस्या बनते.

मोह मनाचा कुठे गुंततो या काव्यपंक्तीला एक सहजपणे प्राप्त झालेली अध्यात्मिक झालर आहे. मनुष्य जीवनाला काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर या षड्रिपुंनी  ग्रासलेलं तर आहेच. स्थितप्रज्ञता मिळवणे  किंवा त्या पायरी पर्यंत पोहोचणे  ही फार मोठी तपस्या आहे आणि जोपर्यंत माणूस हा नर असतो नारायण नसतो तोपर्यंत त्याला या सहा शत्रूंचा वेढा असतोच.  त्यात मोहाची भावना ही अधिक तीव्र असते आणि त्यासाठी माणूस जगत असतो आणि जगताना मोहापायी अनेक दुःखांचा वाटेकरी  होत असतो. चिंतित, पीडित असतो. डॉक्टर श्रोत्रींनी या कडव्यात केलेलं भाष्य हे वरवर पाहता जरी नकारात्मक वाटत असलं तरी ते एक महत्वाचा  संदेश देतं. माणसाच्या वाट्याला दुःख का येतात याचे उत्तर या काव्यात मिळतं. विरक्ती, दूरस्थपणा, अलिप्तता या तत्त्वांचा यात अव्यक्तपणे पाठपुरावा केलेला आहे. एकाच वेळी जेव्हा आपण जीवन ही एक समस्या आहे असं म्हणतो त्याचवेळी त्या समस्येला सोडवण्याचा एक मार्गही त्यांनी सूक्ष्मपणे सुचवला आहे असे वाटते. “सूज्ञास जास्ती काय सांगावे?” हा भाव या कडव्यात जाणवतो.

 सदैव धडपड हीच व्यथा का

 जीव कष्टतो कशा फुकाचा

 स्वप्न यशाची दुर्मिळ झाली

 मार्ग शोधता नजर पोळली ।२।

माणूस आयुष्यभर मृगजळापाठी धावत असतो.  तो एक  तुलनात्मक आयुष्य जगत असतो.  तुलनात्मक आयुष्य म्हणजे जीवघेणी  स्पर्धा.  स्पर्धेत असते अहमहमिका, श्रेष्ठत्वाची भावना, I AM THE BEST  हे सिद्ध करण्याची लालसा आणि त्यासाठी चाललेली अव्याहत धडपड.  जिद्द, महत्त्वाकांक्षा स्वप्नं बाळगू नयेत असे मुळीच नाही. SKY IS THE LIMIT.

आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्याचा पिंजरा  या विचारात तथ्य नाही असे मुळीच नाही. झेप घेणं, भरारी मारणं, ध्येय बाळगणं,  उन्नत प्रगत होणं यात गैर काहीच नाही पण त्याचा अतिरेक वाईट.  पंखातली ताकद अजमावता आली नाही तर नुसतेच कष्ट होतात. फुकाची धावाधाव,  पळापळ हेलपाटणं होतं.  स्वप्न पाहिलं पण यश मिळालं नाही अशीच स्थिती होते.  माणूस दिशाहीन होतो भरकटतो आणि अखेर जे साधायचं ते साधता आलं नाही म्हणून निराश होतो. आयुष्याच्या शेवटी प्रश्न एकच उरतो.. काय मिळालं अखेर आपल्याला? का आपण इतकं थकवलं स्वतःला?  ज्या सुखसमृद्धीच्यापाठी आपण धावत होतो तिला गाठले का? मुळात सुख म्हणजे नेमकं काय?  हे तरी आपल्याला कळलं का? सुखाचा मार्ग शोधता शोधता नजर थकली. समोर येऊन उभा ठाकला तो फक्त अंधार. ही वस्तुस्थिती आहे. हेच माणसाचं पारंपारिक जगणं आहे आणि याच वास्तवाला उलगडवून दाखवताना डॉ. श्रोत्री मिस्कीलपणे त्यात दडलेल्या अर्थाचा, प्रश्नाचा आणि उत्तराचाही वेध घ्यायला लावतात. पाठीवर हात फिरवून सांगतात,” का रे बाबा! स्वतःला इतका कष्टवतोस? तू फक्त कर्म कर.  कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. त्या कर्मांवरही तुझा हक्क आहे. पण कर्मातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करू नकोस.  अपेक्षा मग ती कोणतीही असू देत… यशाची, स्वप्नपूर्तीची, सुखाची, समृद्धीची पण अंतिमतः अपेक्षा दुःख देते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मलहेतुर्भूमा ते संङ्गोsस्तवकर्मणि।।

समस्येचे मूळ कसे शोधावे याची एक दिशा या काव्यातून दिलेली आहे.  हे काव्य  अत्यंत चिंतनीय आहे. प्रत्येक कडव्याच्यामागे तात्त्विक अर्थ आहे. हे वाचताना मला सहजपणे विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांच्या भाष्यांची आठवण झाली.  ते म्हणत,

“आपले ईहलोकीचे जीवन— कलह, द्वेष, मत्सर, युद्धे, काळजी, भीती, दुःख्खे यांनी भरलेले आहे.  याच्या मुळाशी मनो बुद्धी विषयीचे अज्ञान आहे.  नेमकं हेच ज्ञानमीमांसात्मक सत्य डॉ. श्रोत्रींनी अत्यंत सुबोधपणे समस्या या त्यांच्या लघुकाव्यातून मांडलेलं आहे. या काव्याबद्दल मी गमतीने म्हणेन मूर्ती छोटी पण कीर्ती महान

असे हे आत्मचिंतनात्मक, समत्व योग असलेले, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे  नेणारे उत्कृष्ट गीत.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माती सांगे कुंभाराला… कवी मधुकर जोशी ☆ रसग्रहण.. श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? काव्यानंद ?

☆माती सांगे कुंभाराला… कवी मधुकर जोशी ☆  रसग्रहण.. श्री प्रसाद जोग ☆

जीवनाचे अंतिम सत्य सांगणाऱ्या  माती सांगे कुंभाराला या मधुकर  जोशी यांच्या गीताविषयी :

संत कबीरांच्या “माटी कहे कुम्हार को” या भजनावरून. मधुकर जोशी  यांना जे गाणे सुचले. त्याला श्री. गोविंद पोवळे यांनी सुंदर  चाल लावून म्हटले आहे.

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी

तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी !

जेव्हा एखादा कुंभार मातीची भांडी बनवत असतो त्यावेळेस त्याआधी तो त्या मातीला तुडवून घडण्या योग्य बनवत असतो. त्यानंतर तिला फिरत्या चाकावर ठेवून आपल्या हातांनी आकार देण्यास सुरुवात करतो. कालांतराने ती माती एका सुंदर वास्तूच्या रुपात सगळ्यां समोर येते. सगळे तिच कौतुक करू लागतात आणि  त्याच वेळेस त्या मातीला आकार देणाऱ्या कुंभाराचा अहं देखील हळूहळू वाढू लागतो. या सगळ्याचा कर्ता “मी” आहे ही भावना दिवसेंदिवस त्याच्या मनात रुजू लागते आणि त्याच वेळेस त्याच्या अहंकाराच्या फुग्याला वेळीच फोडण्यासाठी कवी त्याला .वरील ओळींच्या माध्यमातून  सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडक्यात तो परमेश्वर / निसर्ग माणसाला वेळोवेळी अप्रत्यक्षपणे सूचित करीत असतो की तू कितीही फुशारक्या मारल्यास, कितीही यश मिळवलेस, तरी तुला या सगळ्याचा त्याग करून माझ्यातच समाविष्ट व्हायचे आहे.

मला फिरविशी तू चाकावर

घट मातीचे घडवी सुंदर

लग्‍नमंडपी कधी असे मी, कधी शवापाशी !

या ओळींमध्ये मातीच्या माध्यमातून कवी सुचवतो की, कित्येक वेळेस ज्ञानाच्या जोरावर आपल्या इच्छाशक्तीने तू काही काळापुरता जय मिळवतोस आणि समजतोस की हेच अंतिम सत्य आहे.पण प्रत्यक्षात मी अनादी अनंत आहे.  एखादवेळेस तुझ्या लग्न मंडपात असणारा मी उद्या तुझ्या शवापाशी देखील असणार आहे.

वीर धुरंधर आले, गेले

पायी माझ्याइथे झोपले

कुब्जा अथवा मोहक युवती, अंती मजपाशी !

या ओळींमधून कवी  माणसाला आठवण करून देतो कि, जसा आज तू स्वतःला कर्ता समजत आहेस तसेच यापूर्वीही अनेक जण होऊन गेले आहेत. अनेकांनी अनेक राज्ये स्थापिली, अनेक मान सन्मान मिळवले, अनेक पराक्रम गाजवले पण शेवटी त्यांना देखील माझ्यातच विलीन व्हावे लागले. माझ्या दृष्टीने सगळेच समान आहेत. मी कुणातही भेदाभेद करत नाही. माझा न्याय हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. ज्यावेळेस तुमची माझ्यात विलीन होण्याची वेळ येते त्यावेळेस मग ती व्यक्ती कुरूप असो वा रुपगर्विता, राजा असो वा पराक्रमी सरदार… या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.

गर्वाने का ताठ राहसी ?

भाग्य कशाला उगा नासशी ?

तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी !

या कडव्यात कवी माणसाला सांगतो, उगाच वृथा अभिमान बाळगून का राहतोस? या गर्वाचा काहीही उपयोग होत नाही. झाला तर फक्त तोटाच होईल. एक लक्षात ठेव शेवटी  तुला माझ्यातच विलीन व्हायचे आहे. त्यांमुळे गर्व सोड

मनुष्य स्वभावर भाष्य करणारे मधुकर जोशी यांचं हे गाणं ऐकून सारेच अंतर्मुख झाले असतील .

मधुकर जोशी यांना विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संधीप्रकाश… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संधीप्रकाश… – कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

निवृत्ती हा आयुष्यातील अवघड कालखंड असतो. शरीराने ज्येष्ठत्वाकडे झुकलेला पण मनाने अजूनही कार्यक्षम अशा अवस्थेत मनाची कुतरओढ होते. डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या “संधीप्रकाश” या कवितेत याच अवस्थेतील मनस्थिती मांडली आहे. आपण या कवितेचा आता रसास्वाद घेणार आहोत.

☆ संधीप्रकाश ☆

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशांनं 

अन् बावरून गेलो मी एकदम

*

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टीच होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

*

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप …..

पहाटेचा की कातरवेळेचा ….. ?

*

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे;

अन्  मग काय …..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

*

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो ….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

*

 मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून ?

छातीचा भाता फुटेल ना !

*

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात …..

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात …..

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशाबरोबरच …..

नेमकं उलट्या दिशेने ?

©️ डॉ‌. निशिकांत श्रोत्री

९८९०११७७५४

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशानं

अन् बावरून गेलो मी एकदम

पूर्ण रूपकात्मक असणारी ही कविता मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचल्यावर प्राप्त परिस्थितीने गांगरलेला कवी आपली मनोव्यथा सांगतो आहे. अखंड कार्यरत असणारा कवी कालपरत्वे निवृत्तीच्या वयावर येऊन ठेपला. वय विसरून काम करताना अचानक सामोऱ्या आलेल्या निवृत्तीने तो कावराबावरा होतो. मनाला एक प्रकारची मरगळ आल्याने गोंधळून जातो.

इथे संधीप्रकाश हे निवृत्तीसाठी योजलेले रूपक आहे. त्यावेळी उजेड मंदावतो. एक विचित्र उदासी मनाला घेरून टाकते. इथे तशीच अवस्था निवृत्त होण्याच्या विचाराने कवीची झालेली आहे.

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टी होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

इथे कवीने सूर्यप्रकाश, दिव्यांचा पिवळा उजेड ही रूपके वापरली आहेत ती उमेद म्हणजे जोम असणे आणि क्षमता कमी होणे यासाठी. तरुणपणात अंगात जोम असतो, मनात उमेद असते. आता वाढत्या वयाबरोबर तेवढी क्षमता राहिलेली नाही. आता आपली ताकद कमी पडेल अशी जाणीव व्हायला लागल्याने कवी बावचळून जातो आणि आता कसे होणार ही भीती त्याला सतावू लागते.

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप…..

पहाटेचा की कातरवेळचा…….?

कवी आपल्या कामकाजात इतका गढून गेलेला होता, यशोमार्गावर चालण्यासाठी अगदी झोकून देऊन कार्यरत होता की त्याला संधीप्रकाश दाटून आलेला कळलेच नाही आणि म्हणूनच क्षणभर त्याला हे लक्षातच येईना की हा संधीप्रकाश पहाटेचा आहे का संध्याकाळचा ?

पहाटे आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला संधीप्रकाश पसरतो. पहाटेच्या संधीप्रकाशा नंतर लख्ख सूर्यप्रकाश पसरतो आणि आपण मोठ्या उमेदीने कामाला लागतो. तेच संध्याकाळच्या संधीप्रकाशाने हळूहळू उजेड कमी होत जाऊन अंधार वेढून येतो आणि आपोआप काम थंडावते. नेमकी अशीच अवस्था वाढत्या वयाच्या निवृत्तीमुळे होते. पण कामाच्या तंद्रीत ही गोष्ट कवीला वेळेवर लक्षात येत नाही.

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे ;

अन् मग काय…..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

 

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

अजून सकाळ आहे, अजून खूप काम करायचं आहे असं मनात असतानाच संध्याकाळ झालेली जाणवल्यामुळे कवीची दोलायमान अवस्था होते. मग तो ही निवृत्ती, हा संधीप्रकाश पुढे ढकलण्यासाठी जीवतोड मेहनत करायच्या मागे लागतो. जिद्दीने काम करून निवृत्ती टाळायचा प्रयत्न करू लागतो. पण त्यामुळे आणखीन आणखीनच थकू लागतो. इथे सुवर्णकन्या हे मेहनती तरुणांचे रूपक आहे.

कवी सुध्दा तरूणांना लाजवेल इतकी मेहनत घेतो. पण त्यामुळे त्याची ताकद आणखी कमी होऊ लागते. वयाचा आणि कामाचा मेळच बसत नाही. कारण मनाची उभारी अजून शाबूत आहे पण शरीरच त्याला साथ देत नाही ही अवस्था म्हणजेच संधीप्रकाश. त्यामुळे कितीही जरी प्रयत्न केले तरी ही निवृत्ती कवीला किंवा कुणालाच टाळता येत नाही हेच सत्य आहे.

मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून

छातीचा भाता फुटेल ना !

कवीने कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्वीच्या जोमाने काम करू शकत नव्हता‌. निवृत्तिचा संधीप्रकाश टाळू शकत नव्हता. त्यामुळे आता नेमके काय करावे हा त्याला प्रश्न पडला होता. सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा जसा खाली उतरत नाही, चिकटूनच बसतो. तशीच ही निवृत्ती पण आता लोचटासारखी कवीच्या मानगुटीवरच बसली आहे. कितीही झटकली तरी ती खाली उतरत नाही, दूर होत नाही. त्यामुळे कवी भांबावून गेला आहे. अती धावाधाव केल्याने त्याची पूरती दमछाक झाली आहे. या नादात काही विपरीत घडू नये अशी त्याला आशा आहे.

सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा ही उपमा या निवृत्तीला चपखल लागू पडते आहे.  कितीही प्रयत्न केला तरी कवीची त्यापासून सुटका होत नाही.

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशा बरोबरच…..

नेमकं उलट्या दिशेने ?

बेसावध कवीला निवृत्तीने गाठले. त्याचे मन ते स्वीकारायला तयार नाही. मग तो जास्ती जोमाने राहिलेली कामे करायला लागतो आणि जास्तच थकून जातो. हे पाहिल्यावर तो सावध होतो आणि त्याला आपली चूक लक्षात येते. ‘आपल्या या आततायी वागण्याने निवृत्ती पासून दूर जायच्या ऐवजी आपण जास्त कमजोर बनत निवृत्तीच्या बाजूला धावतो आहोत ‘ हे पाहून मनाने ठरविलेल्या मार्गाच्या उलट आपण धावतोय हे त्याच्या लक्षात येते.

सर्वसामान्यपणे आपण योग्य वयात आपल्या कामधंद्याला लागतो. संसार सुरू होतो. असंख्य जबाबदाऱ्या, योजना, ध्येयं, उद्दिष्टे साध्य करण्यात आपण पूर्णपणे गढून जातो. पण पुढे जाणारा काळ त्याचे काम करीत असतो. यथावकाश आपले वय वाढत जाते. कार्यक्षमता कमी होत जाते आणि एक दिवस या कामातून आता निवृत्त व्हायला हवे असा क्षण येऊन ठेपतो. कामाच्या नादात आपल्या कार्यकाळाची संध्याकाळ समोर दाटून आली आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.

अजून कितीतरी गोष्टी करायचे बेत आखलेले असतात. काही कामे अर्धवट असतात. मनातली उभारी अजून तशीच असते पण शरीर पूर्वीसारखे आता नीट साथ देत नाही ही वस्तुस्थिती असते. कामे अजून व्हायचीत अन हाताशी वेळ कमी आहे या परिस्थितीत मनाची ओढाताण होते आणि अट्टाहासाने मन पुन्हा नेटाने काम करायला लागते. पण त्यामुळे निवृत्ती पुढे जायच्या ऐवजी आपली आणखी दमछाक होते. शरीर आणखीनच थकल्याने उलट निवृत्तीला आपणच जवळ ओढल्यासारखे होते. आयुष्यभर उत्तम रीतीने कार्यरत असणाऱ्यांची ही सर्व घालमेल कवीने इथे अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.

कवितेची सौंदर्यस्थळे :– ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. आयुष्याच्या संध्याकाळी येणारी निवृत्ती म्हणजे मळभ दाटवणारा संधीप्रकाश हे रूपक त्या वेळची परिस्थिती अचूकपणे स्पष्ट करते. ‘सूर्यप्रकाश ‘हे रूपक तरुणवयातला जोम, उमेद तर ‘दिव्यांचा पिवळा प्रकाश’ हे क्षमता कमी होण्याची स्थिती उलगडतात.

‘सुवर्णकन्या’ हे अव्याहतपणे ध्येयासाठी कार्यरत तरुणांचे रूपक आहे. कितीही प्रयत्न केला तरी लोचटासारखी चिकटलेली निवृत्ती कितीही झटकली तरी दूर होत नाही. यासाठी ‘सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा’ ही उपमा अगदी अचूक ठरते. ‘धूसर मन’ म्हणजे नीट दिसत नाही अशी बावचळलेली मनाची अवस्था.

ही सर्व रूपके, उपमा प्रत्येकाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचे अचूक वर्णन करत त्या अनुभवाचा पुन:प्रत्यय देतात.

प्रत्येकाच्या आयुष्यातील निवृत्तीचा काळ म्हणजे जेव्हा मनाची उभारी अजून पूर्वीसारखीच आहे पण त्याला वाढत्या वयातील शरीर तेवढी साथ देत नाही‌ तो कालखंड. अशावेळी अजून बरीच स्वप्नं खुणावत असतात पण ती पूर्ण होतील की नाही या शंकेने उलघाल होते. वाढत्या वयाचा आणि कामाचा ताळमेळ न बसण्याची ही कातरवेळेची अवस्था कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘संधीप्रकाश’ या कवितेत अतिशय सुंदर समर्पक शब्दांत सांगितलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ धर्म बुडाला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ धर्म बुडाला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ धर्म बुडाला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

धर्म बुडाला द्यूतपटावर नाही कुणाचा धाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||ध्रु||

*

अंधराज कर्णहीन झाला अंधपुत्रप्रेमाने

पितामहांनी नेत्र झाकले कर्तव्यशून्यतेने

धुरंधर गुरु कर्म विसरले मानवता अगतिक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||१||

*

दानवीर परी झोळीमध्ये नाही स्त्रीदाक्षिण्य

सहस्रदानांचे त्याला का मिळेल काही पुण्य

पतिव्रतेला संबोधी तो पतिता उपभोगिता

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||२||

*

उठी भीमा कसुनी तव बाहू दाखविण्या सामर्थ्य

चापबाण गाळून धनुर्धर दुर्मुखलेला पार्थ

याज्ञसेनी तेजस्वी अगतिक पांच पती नपुंसक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||३||

*

हरुनी जाता सर्वस्व कसा दारेवर अधिकार

धर्माहस्ते अधर्म कैसा झाला घोर अघोर

चंडप्रतापी पती असोनी शील होतसे खाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक  ||४||

*

भगिनीसाठी अशा अभागन  तूच एक भ्राता

श्रीकृष्णा रे धावुन येई दुजा कोण त्राता

चीर पुरवूनी लाज राखी मम बंधुत्वाची भाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक  ||५||

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

काव्यानंद : धर्म  बुडाला

रामायण व महाभारत ही दोन महाकाव्ये आपल्या सगळ्यांना अगदी मनापासून भावणारी! नुकत्याच झालेल्या रामनवमीच्या दिवशी आपण रामायणाची आठवण नक्की केली असेल. आज महाभारताची आठवण करून देणार आहे .महाभारत हा अत्यंत प्राचीन संस्कृत ग्रंथ महर्षी व्यास यांनी गणपती कडून लिहून घेतला. या ग्रंथाचे आधीचे नाव जय होते. महाभारत हा भारताच्या धार्मिक, तात्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट आहे. महर्षी व्यासांनी मानवी भावभावनांचे अतिशय सुस्पष्ट रूप महाभारतातील व्यक्तिरेखां मधून करून दिले आहे. जीवनातील असा कोणताही गुण ,दुर्गुण ,स्वभाव नसेल ज्याचा ऊहापोह/परामर्श या काव्यात घेतलेला नाही  आयुष्याशी निगडीत अशा या महाभारताचा सर्वसामान्यांना तर मोह पडतोच पण कविमनाला त्यातील प्रसंग, कथा, व्यक्तित्व खुणावत राहतात. असंच काहीसं डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांच्या बाबतीत घडलं.द्रौपदीची अत्यंत महत्त्वाची भूमिका या महाभारतात आहे याची आपल्याला कल्पना आहे. तिचा करारी ,स्वाभिमानी स्वभाव आणि त्याच वेळेला त्याला असलेली अहंकाराची किनार यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व महाभारतात फार महत्त्वाचं ठरतं. तिच्यामुळे महाभारत घडलं असेही काही जाणकार मानतात .भर सभेत तिच्या बाबतीत घडलेला वस्त्रहरणाचा प्रसंग हा सर्वांना भावुक बनवणारा तसेच चीड  आणणारा आहे. या प्रसंगाने तिच्यासारखी स्त्री अबला होते आणि श्रीकृष्णाचा, तिच्या सख्याचा धावा करते हा प्रसंग कवितेमध्ये सरांनी शब्दबद्ध केलेला आहे.कवितेचे नांव  धर्म बुडाला  !  अगदी समर्पक नांव! या नांवापासूनच या कवितेतील काही वैशिष्ट्ये  मी रसग्रहणात्मक रूपाने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कविताच खरं तर इतकी अप्रतिम सुंदर आहे की मी काही वेगळे भाष्य करण्याची गरज यावर नाही याची मला कल्पना आहे.तरी पण—! या कवितेला स्वतःची एक उंची आणि त्याचबरोबर खोली पण आहे. मी आता म्हटलं तसं कवितेच्या नांवापासूनच या कवितेचे वेगळेपण जाणवायला लागतं .कवितेच्या पहिल्या दोन ओळीत कवितेचा विषय स्पष्ट होतो.तसंच कवितेचे सार ही पहिल्या ओळीत विशद होत आहे असं वाटतं .द्यूतपटाचा खेळ खेळताना धर्म बुडाला आणि  कुणाला कुणाचा धाक उरला नाही असं कवी म्हणत आहे. येथे धर्म बुडाला ही शब्दयोजना मला फार महत्त्वाची वाटते. यातून दोन अर्थ ध्वनित होतात .एक म्हणजे खरा धर्म जो जीवन मूल्यांशी ,आचार विचारांशी निगडित आहे तो आणि दुसरा म्हणजे धर्मराज युधिष्ठिर! दोघंही बुडाले किती सुंदर आणि चपखल शब्दयोजना आहे ही. द्रौपदीच्या मनाची दारुण अवस्था ही अशीच एका वाक्यात अत्यंत समर्पक शब्दात मांडली आहे. रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक अशा शब्दांत द्रौपदीच्या मनाची दारुण अवस्था मांडली आहे. ते सारे दृश्य या एका ओळीतून आपल्यासमोर उभे करण्याची ताकद या शब्दांत आहे. धृतराष्ट्र हा दुर्देवाने अंध होता या वस्तुस्थितीची जाणीव करून देताना तो  आपल्या  पुत्रा बद्दलच्या अंध प्रेमाने कर्णहीन ही  झाला आहे हे सत्य कवीने आपल्या समोर मांडले आहे. इथेही कर्ण हीन ही शब्दयोजना मला फार आवडली.द्रौपदीचा

टाहो , तिचा धावा त्याच्या कानापर्यंत पोहचतच नाहीये अशा अर्थाने ही  शब्द योजना!

तसेच अंधपुत्र हा शब्द ही फार परिणामकारक.धृतराष्ट्र तर दुर्योधनाच्या प्रेमात आंधळा आहेच. स्वतः दुर्योधन ही सत्ता, संपत्ती यांच्या मुळे अंध झाला आहे.उचित व अनुचित भान त्याला राहिले नाही.अंधराज व अंधपुत्र यांचा परस्परसंबंध सहजतेने , सहेतुक पणे सांगताना उत्तम अनुप्रास ही साधला आहे.

तसेच पुढे पितामह भीष्म जे अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात, किंवा त्यांचा महाभारतामध्ये तसा लौकिक आहे, त्यांनी नेत्र झाकून घेतले अशी शब्दयोजना केली. म्हणजेच कर्तव्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले.तसेच धुरंधर म्हणून प्रसिद्ध पावलेले गुरू सभेमध्ये उपस्थित असताना ते स्वतः कर्म ,कर्मा प्रतीची श्रद्धा, निष्ठा विसरले.इथे  त्या व्यक्तिरेखेचा ,व्यक्तित्वाचा जो महत्त्वाचा अंश आहे त्याला अनुसरून त्यांनी काय करणे अपेक्षित होतं आणि त्यांनी काय केलं याचं मला वाटतं विरोधाभास म्हणता येईल अशा पद्धतीने सगळा प्रसंग काव्यबद्ध केलेला आहे .

आणि इथे सरांनी माणसे नव्हेत तर सारी मानवता अगतिक झाली असे लिहिले आहे.या मुळे तर ही कविता एका मोठ्या उंचीला गेली आहे असं मला वाटतं. यथार्थ, अर्थवाही शब्द योजना करून हा सारा प्रसंग कवीने उत्तम रीतीने शब्दबद्ध केला आहे, काव्यबद्ध केला आहे. तसेच पुढे कर्णाची  व्यक्तिरेखा येते तेव्हा हा कर्ण जो दानवीर म्हणून प्रसिद्ध आहे  त्याच्या झोळीमध्ये स्त्रीदाक्षिण्याचे पुण्य मात्र नाही अशी स्पष्टोक्ती सहज पणे करून दिली आहे.सहस्त्रदाना पेक्षाही महत्त्वाचे स्त्रीदाक्षिण्याचे पुण्य कर्णाच्या  दानशूर व्यक्तित्वाशी जुळत नाही,मेळ घेत नाही. आणि अशा या विरोधाभासातून कर्ण ही व्यक्तिरेखा ,तिचा फोलपणा दर्शविते. आणि एवढंच नाही तर कर्ण द्रौपदी सारख्या पतिव्रतेला  पतीता आणि एक उपभोग्य वस्तू समजतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या चारित्र्याची हीन पातळी या कवितेत अधोरेखीत केली गेली आहे. हे सर्व सांगताना पतिव्रता पतिता हा अजून एक सुंदर अनुप्रास साधला आहे.या शिवाय पतिव्रता पतिता उपभोगिता हे लयबध्द शब्द योजून कवीने  शब्दांवरील  हुकुमत दर्शविली आहे. पहिल्या दोन कडव्यात द्रौपदी समोर अत्यंत विचित्र, अपमानास्पद परिस्थिती उभी ठाकली आहे तिचं प्रत्ययकारी वर्णन अत्यंत ताकदीने उभे केले आहे. अशा या परिस्थितीत न्यायाने, धर्माने, जबाबदारीने, कर्तव्यबुद्धीने वावरणारे ज्येष्ठ लोक मूग गिळून गप्प बसले आहेत याची जाणीव झाल्यावर ती भीम आणि अर्जुन या आपल्या पतींना आवाहन करते .भीमाला ती म्हणते की हे भीमा!तुझं सामर्थ्य दाखव. तुझे बाहू कसून तुझे सामर्थ्य दाखव आणि माझे रक्षण कर. आता इथे सुद्धा बाहू कसून या दोन शब्दांत भीमाचे बाहू सामर्थ्य आणि कसून या शब्दांत द्रौपदीची त्याला केलेली आर्त आणि आर्जवी विनवणी  आपल्या ध्यानात येते. ती अर्जुनाला आवाहन करते. आणि त्याच्याकडे पाहून ती म्हणते हा धनुर्धर पार्थ धनुष्य व  बाण गाळून  हताश होऊन  दूर बसला आहे .गाळून या शब्दात अर्जुनाची अवस्था आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.  नुसतंच आवाहनाची तीव्रता नाही तर त्या व्यक्तिरेखांची परिस्थिती आपल्यासमोर या शब्दांतून अत्यंत ताकदीने कवींनी विदित केली आहे.

याज्ञसेनी द्रौपदीला लाभलं होतं  यज्ञाचे तेज.त्यामुळे अशा तेजस्वी बाणेदार व्यक्तिमत्वाच्या द्रौपदी पुढे तिचे अगतिक पाच पती नपुंसक ठरतात. त्यामुळे या तेजस्वी व्यक्तिरेखेच्या पुढे पतींचा नपुसंकपणा ही मनावर कोरला जातो.येथे याज्ञसेनी हे द्रौपदीचे नामाधिधान  अतिशय उचित! त्याचा परिणाम आपल्या मनावर ठसतो. तिची आर्त साद तिच्या परिस्थितीची जाणीव करून देते आणि तरीही कोणीच काही प्रतिक्रिया देत नाही हे पाहिल्यावर  ती धर्माचा विचार मांडते . धर्मराज जो   स्वतः हरला आहे त्याला  स्वतःच्या बायकोवर काय अधिकार उरतो असा योग्य सवाल करून  इथेही धर्मा कडूनच केलेला अधर्म ही वस्तुस्थिती  दर्शविली आहे.हा प्रचंड विरोधाभास आपल्या लक्षात येतो .तसंच घोर अघोर ही शब्दयोजना आहे त्या शब्दांतून द्रौपदी वरील अन्यायाची तीव्रता आपल्या मनावर ठसते .चंडी प्रतापी पती म्हणजे माता चंडीसम प्रतापी  पती  असूनही द्रौपदीचे शील धोक्यात आले आहे. आणि  आपण सर्वस्व म्हणतो ते स्त्रीचं शील खाक होणार ही भीती

द्रौपदीच्या मनात आहे. या  द्रौपदीच्या सगळ्या भाष्या वर सभा तटस्थ आणि त्रयस्थपणे  बसून आहे .वचनांचा ,शौर्याचा ज्येष्ठत्वाचा  आधार घेऊन द्रौपदी तिच्यावरील होऊ पाहणाऱ्या अन्यायाला दूर करण्याचा प्रयत्न करते आणि तो फोल होतोय हे पाहून शेवटी भावा समान कृष्णाचा धावा करते .अभागी बहिणीसाठी तूच एक त्राता असे आवाहन ती करते. उत्तम शब्दयोजना पहा. भगिनी साठी अभागन तूच एक भ्राता! भ तसेच ग आणि न या शब्दांची द्विरुक्ती कवीच्या शब्द सामर्थ्याची आणि कल्पनाशक्तीची जाणीव करून देते .श्रीकृष्णा शिवाय आता दुसरा कोणीही त्राता उरला नाही ही गोष्ट द्रौपदीच्या  मनात पक्की होते आणि ती त्याला वस्त्र पुरवण्याची आणि त्यायोगे तिचं रक्षण करण्याची विनंती करते. आणि त्याला म्हणते माझ्या बंधुत्वाची भाक, आण, शपथ मी तुला देते आणि माझे रक्षण करण्याची विनंती करते .तर असा हा महाभारतातील वस्त्रहरणाचा एक महत्त्वाचा प्रसंंग ज्यामध्ये कितीतरी संमिश्र भावनांचा  अंतर्मुख करणारा   कल्लोळ  आहे.त्याच  एक दृश्यमान  चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करण्यात कवी यशस्वी ठरलेला आहे .आणि त्या सगळ्याचे श्रेय  समर्पक, अर्थवाही शब्दांची योजना यांना! पर्यायाने कवीला आहे हे नि:संशय!

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मुक्त… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ मुक्त… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

मुक्त (गझल~सौ. राधिका भांडारकर)

रसग्रहण

आयुष्यात सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात. जे आपल्याला हवं असतं ते मिळतच असंही नाही. पण हवं असलेलं न मिळाल्यामुळे आयुष्य थांबत नाही. ते पुढे जात असतं, त्यासाठी अनेक वाटा असतात आणि त्यातलीच एखादी वाट भविष्यासाठी निवडायची असते. आपलं वर्तमान आपण जगायचं असतं अर्थात जगताना भूतकाळाचा कप्पा मधून मधून किलकिला होतो आणि त्यातून पुन्हा झिरपणाऱ्या कवडशाने कधी कधी मन व्याथितही होतं. अशाच आशयाची सौ. राधिका भांडारकर यांची मुक्त ही गझल नुकतीच वाचनात आली आणि त्याचा रसास्वादही घ्यावासा वाटला.

सौ राधिका भांडारकर

☆ मुक्त ☆

अपराध काय माझा भांबावले कशाला

वाटेतल्या रिपुंना  ओवाळले कशाला

*

नव्हते कधीच माझे ते दूर ठेविले मी

कळले जरी मला हे मी त्रासले कशाला

*

वेडातल्या स्मृतींना केव्हांच दूर केले

आता उगा उजाळी पाणावले कशाला

*

डोळ्यातल्या छबीला पुसलेच मी जरीही

आता फिरोनि दुःखा कुरवाळले कशाला

*

अंधार जात आहे वाटेतल्या उजेडी

मुक्तीतल्या मनाला मी बांधले कशाला

 – राधिका भांडारकर

ही गझल वाचल्यावर प्रथम असेच वाटले की ही एका असफल प्रेमाची वेदना असावी. अर्थात हे प्रेम एखाद्या मित्रावरचे असेल, अथवा मैत्रिणीवरही  असू शकते. शिवाय प्रेमाचे रंगही वेगळे असतात. प्रेम म्हणजे प्रीत. प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारा लोभ, ओढही असू शकते .शिवाय प्रेमात देवाणघेवाण अपेक्षित असते ती जर नसेल तर असे प्रेम एकतर्फी असू शकते आणि ते मनाला वेदना देणारे ठरू शकते असा काहीसा सूर या गझलेत नक्कीच जाणवतो. हा स्वतः कवयित्रीचा अनुभव असेल किंवा तिच्या सहवासातल्या  एखाद्या व्यक्तीविषयीचं कवीने टिपलेलं मनही असू शकतं.

मतल्यातच कवयित्री म्हणते

अपराध काय माझा भांबावले कशाला वाटेतल्या रिपुंना ओवाळले कशाला…

मी प्रेम केलं हा काय माझा अपराध आहे का? जरी ते सफल झालं नाही तरी मला सैरभैर होण्याची काय गरज आहे? या माझ्या असफल प्रेमाबाबत मला सल्ला देणारे अनेक भेटले. वरवर मला ते चांगले वाटायचे, खरे वाटायचे म्हणून मी त्यांना त्यावेळी मानही दिला. पण त्याही बाबतीत माझी निराशाच झाली ते केवळ हितशत्रूच होते आणि त्यांना मी विनाकारणच महत्त्व दिले असे आता वाटते.

इथे भांबावले हे क्रियापद मनाच्या सैरभैरतेची जाणीव देते आणि ओवाळले म्हणजे महत्त्व दिले याअर्थी असावे.

नव्हते कधीच माझे ते दूर ठेवले मी कळले जरी मला हे मी त्रासले कशाला

मला पक्कं माहित होतं की ज्याची मी मनी ओढ धरली होती ती व्यक्ती माझ्यासाठी कधीच असणार नव्हती आणि म्हणूनच मी त्याही वेळेला जाणून बुजून त्या व्यक्तीला दूरच ठेवले होते. माझ्या मनाची तशी पूर्ण तयारी होती मग आता त्या नकारात्मकतेचा मी कशाला त्रास करून घेऊ?

नाहीच घेणार

हे त्यामागचं अव्यक्त उत्तरही या पंक्तीत जाणकार वाचकाला सहज मिळून जातं.

वेडातल्या स्मृतींना केव्हाच दूर केले आता उगा उजाळी पाणावले कशाला..

काळ कोणासाठी थांबत नाही तो पुढे वाहतो शिवाय काळाबरोबर भावनाही स्वाभाविकपणे बोथट होतात पण असा एखादा क्षण निवांतपणे सहज मनावर रेंगाळतो तो असतो आठवणींचा. पण मनावर ताबा मिळवण्यासाठी कवयित्री पुन्हा पुन्हा म्हणते !”छे! आता कशाला त्या आठवणी? वेड्या, अनघड, अजाण वयातलं ते सारं काही केव्हाच पुसून टाकलय्  मग आता पुन्हा कशापायी त्यात गुंतून उदास व्हायचं?

डोळ्यातल्या छबिला पुसलेच मी जरीही आता फिरोनी  दुःखा कुरवाळले कशाला

आता त्या व्यक्तीचा चेहराही मला आठवत नाही इतका काळ व्यथित झाला आहे मग आता गेल्या गोष्टीची खंत कशासाठी बाळगायची?

या शेरातल्या दोन पंक्ती कवयित्रीच्या मनाचा एक ठाम कल व्यक्त करतात.

आता फिरोनी दुःखा कुरवाळले कशाला या त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलेल्या प्रश्नातच एक उत्तर दडलेलं आहे …आता सगळंच पुसलंय आणि भूतकाळाविषयी मला जराही खेद वाटत नाही.

अंधार जात आहे वाटेतल्या उजेडी मुक्तीतल्या मनाला मी बांधले कशाला

आता आयुष्यातला तो अंधकार जाऊन वाटा  प्रकाशमय झाल्या आहेत. यातला दडलेला अर्थ असा आहे की स्वतःची चूक समजल्यामुळे आता आयुष्याचा पट लख्ख झाला आहे आता त्या सर्वांतूनच मी मुक्त आहे मग का मी माझं मन अजूनही त्या गतस्मृतींत गुंतवून ठेवू? पुन्हा यातलं अलिखित उत्तर… मी आता गुंतून राहणारच नाही, कारण आता मी या साऱ्यातून कधीच मुक्त झाले आहे.

याच गझलेला आणखी एका वेगळ्या अर्थातही  पाहता येईल.

सहजीवनात, आपल्या जोडीदाराविषयी आपल्या काही अपेक्षा किंवा कल्पना असतात आणि आता मागे वळून पाहताना कवयित्रीला वाटत आहे की अशा कल्पना, अपेक्षा बाळगणे काही चुकीचे होते का? कदाचित या कल्पनांच्या निर्मितीमागे आपल्या सभोवतालची माणसेच असतील ज्यांच्या सांगण्यामुळे आपण प्रवृत्त होत गेलो. आता मात्र वाटत आहे की त्यांचं आपण कां  ऐकलं?

खरं म्हणजे जे कधीही घडू शकणार नव्हतं, बदलू शकणार नव्हतं त्या  सहजीवनाविषयीच्या कल्पना बाळगून आपण कां त्रास करून घेतला? आता आपण मनातून काढून टाकलेत ते विचार मग तरी कधी कधी डोळे का पाणावतात?

जे जीवनाचं चित्र रेखाटलं होतं ते प्रत्यक्षातून आता पुसूनच टाकले आहे मग त्याच त्याच विचाराने पुन्हा पुन्हा का खेद करायचा?

आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की मन स्थिर आहे, स्वीकृत आहे. कदाचित तो अविचार असेल, अविवेकी बुद्धीतून ते उपजलं असेल पण आता या साऱ्या कल्पना, अपेक्षांच्या पलीकडे मन गेले आहे, आता ते मुक्त आहे. आणि या मुक्ततेतच मला राहायचं आहे

राधिका भांडारकर यांची ही गझल वरवर जरी व्यथित मनाची कहाणी वाटत असली तरी वास्तवात ती तशी नाही हे विचारांती जाणवते. कवयित्रीचं एक कणखर आणि ठाम मन त्यामागे असल्याचं जाणवतं आणि ते अत्यंत सकारात्मक आहे. “झालं गेलं विसरून जावे आणि पुढे जावे” असा एक सुरेख संदेश त्यांनी यातून दिला आहे. जीवन हे वर्तमानात जगावे. भूतकाळाच्या वेदनेची सावली त्यावर कशाला पडू द्यायची असा एक स्थिर मनाचा विचार त्यांच्या या गझलेत दडलेला आहे आणि म्हणूनच ही गझल मनाला भावते. पटकन “वा!” अशी दाद दिली जाते.

राधिका भांडारकर यांची ही गझल आनंदकंद वृत्तात बांधलेली आहे मतला आणि चार शेर अशी या गझलेची बांधणी आहे. कशाला हा रदीफ आहे आणि भांबावले, ओवाळले, त्रासले, पाणावले, कुरवाळले,बांधले या कवाफी  गझलेची खयालयात उत्तमपणे राखतात. खरोखरच एक छान अर्थ देणारी मनावर रेंगाळणारी अशी ही सुरेख गझल… मुक्त

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अजून मी आहे… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

रसास्वाद  : ज्योत्स्ना तानवडे

समाजात गैर रूढी, परंपरा चुकीच्या धारणा खोलवर रुजलेल्या आहेत. त्या विरुद्ध अनेक समाजसेवी कार्यकर्ते अतिशय तळमळीने कार्य करीत असतात. पण त्यांना म्हणावे तसे यश येत नाही. तरीही मोठ्या निर्धाराने ते आपला लढा सुरूच ठेवत असतात. अशाच एका कार्यकर्त्याची तळमळ मांडली आहे डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी अजून मी आहे या त्यांच्या एका वेगळ्या विषयावरच्या अतिशय सुंदर कवितेतून. आज आपण त्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत.

☆ अजून मी आहे ☆

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

 

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्री-भृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती-जमातीतील तेढ मिटविण्याचे

———

———

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

 

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ (व्रात्य) पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

 

कधी संभ्रम पडला सश्यासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत राहणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून.

 

म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे

अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे

 

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

 

अजून मी आहे

आयुष्याचा आनंद घेतो आहे

जीवनाचा थांग शोधतो आहे

समाजाचे पांग फेडतो आहे

मुक्तछंदातील ही कविता प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. कवी समाजाच्या भल्यासाठी झटणारा एक प्रामाणिक, तळमळीचा कार्यकर्ता आहे. तो त्याच्या वाटचालीविषयी आपल्याशी संवाद साधतो आहे.

तो आयुष्याचा मनापासून आनंद घेतो आहे. मानवी जीवनाचा थांग सहजासहजी लागणे शक्य नसते. पण तो जिद्दीने असा थांग शोधतो आहे. समाजाप्रती प्रत्येकाची काही कर्तव्ये असतात. कवी आपली अशी कर्तव्ये करण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे. प्रत्येकाने वैयक्तिक जीवन आनंदात जगताना समाजासाठी असलेले आपले कर्तव्य सुद्धा उत्तम रीतीने पार पाडायला हवे. दोन्हीचा छान समन्वय साधायला हवा.

कवी अशी वाटचाल बऱ्याच काळापासून करतो आहे. हे ‘अजून’ या शब्दातून स्पष्ट होते आहे. निवृत्तीचे वय होत आले, बरीच वाटचाल झाली तरी त्याने आपली सामाजिक भूमिका बदललेली नाही. तो पूर्वीच्या जोमाने अजूनही काम करीत आहे.

कवीने इथे अन्योक्ती अलंकाराचा छान वापर केलेला आहे. स्वतःचे मनोगत सांगत असताना ही कविता समाजातील थोर कार्यकर्त्यांना उद्देशून पण आहे. त्यांच्या प्रती आदर दाखवणारी आहे.

माणुसकीला काळे फासणाऱ्या

स्त्रीभृणहत्या रोखण्याचे

गुर्मीत लडबडलेले

पुरुषप्राधान्य झुगारून देण्याचे

माणसाला माणसापासून तोडणारी

जाती- जमातीतील तेढ मिटवण्याचे

———-

किती किती स्वप्ने पाहिली आयुष्यभर

मोराच्या पिसाऱ्याच्या डोळ्यातून

मन व्यथीत करणाऱ्या असंख्य दुष्प्रवृत्ती समाजात आहेत. त्यातून असंख्य वाईट घटना घडतात. स्त्रीभृणहत्या हा तर मानवतेला लागलेला फार मोठा कलंक आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने स्त्रीवर सतत अन्याय, अत्याचार केलेले आहेत. जाती-जमातीत तेढ निर्माण करून माणसाला माणसापासून तोडणारी विघातक कृत्ये केली जातात. कवीने या फक्त या तीन स्वप्नांचा उल्लेख केला आहे आणि त्यानंतर दोन ओळी नुसत्याच मोकळ्या सोडल्या आहेत. त्यांना फार मोठा अर्थ आहे. समाजाच्या  भल्यासाठी काम करण्याच्या अनुल्लेखित अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांची यादी खूप मोठी आहे. हेच त्या दोन ओळी दर्शवितात.

समाजात इतर वाईट कृत्ये, अत्याचार, स्वकेंद्रित व्यवस्था अशा अनेक अपप्रवृत्ती, आपत्ती आहेत. त्यांना संपवण्याची, समाज धारणा बदलण्याची अशी कितीतरी स्वप्ने कवीने पाहिलेली आहेत. मोराच्या पिसाऱ्यात जसे हजारो डोळे असतात तसेच कवीने असंख्य दृष्टीने, विविध अंगाने ही स्वप्ने पाहिली आहेत. त्याची तीव्रता मोराच्या पिसाऱ्यातील डोळे ही उपमा अतिशय सुंदरपणे स्पष्ट करते. या गोष्टींमुळे कवीच्या  मनात खूप आर्तता दाटलेली आहे.

काहींची चाहूल लागली

चोरपावलांची

काही दूर पळाली

नाठाळ ( व्रात्य )पोरासारखी

तर काही आभासच राहिली

रणरणत्या वाळवंटातील मृगजळासारखी

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर

हेलकावायला माझ्या या

चक्रवाकासारख्या आर्त मनाला

कवीने पुन्हा पुन्हा काही स्वप्नं बघीतली. त्यातल्या काहींची चाहूलही लागली. आता ती स्वप्ने खरी होतील अशी आस वाढली आणि ती स्वप्ने एखाद्या नाठाळ पोरासारखी दूर निघून गेली. एखादे नाठाळ ( व्रात्य ) पोर कसे करते, त्याला एखादी गोष्ट कर किंवा करू नकोस असे कितीदाही बजावले तरी ते अजिबात ऐकत नाही. तशीच ही स्वप्नेही फक्त वाकुल्या दाखवतात आणि सत्यात न येता नाहीशी होतात. त्यांना ‘नाठाळ’ ही अगदी छान आणि समर्पक उपमा कवीने योजलेली आहे.

रणरणत्या वाळवंटात दिसणारे मृगजळ हे सत्य नसतेच. तो फक्त आभास असतो. तसाच काही स्वप्नांचा फक्त आभासच होता. त्यामुळे कवीच्या पदरी निराशाच येते.चक्रवाक जसा पावसासाठी आर्ततेने वाट पाहत असतो तसेच कवीचे मन आर्तपणे आशा निराशेच्या हिंदोळ्यावर नुसतेच झुलत राहते. पण हाती काही गवसत नाही.

कधी संभ्रम पडला सशासारखा

माकडीणीच्या पिलासारखी

उराशी कवटाळलेली

माझी तत्त्वच तर मिथ्या नाहीत

चकव्यात भेलकावणाऱ्या

फसव्या रस्त्यांसारखी ?

तरीही मोठ्या शर्थीने

दीपस्तंभासारखा पाय रोवून

तसाच उभा राहिलो

त्या स्वप्नांना

त्या तत्त्वांना

त्या आदर्शांना

उराशी कवटाळून अजूनही

दुर्दम्य आशेने कन्याकुमारीच्या.

जाळी तुटली तरी

परत विणत रहाणाऱ्या

कोळ्याचा आदर्श मनी धरून

ससा जसा बिळातून बाहेर जाताना बावचळतो. बाहेर कोणी नाही ना, कोणत्या दिशेला जावे, नक्की काय करावे अशी त्याची संभ्रमावस्था होते. तशीच इथं स्वप्नं सत्यात येत नसल्याने आता नक्की काय करावे अशी कवीची संभ्रमावस्था होते आहे. माकडीण जशी पिलाला उराशी अगदी कवटाळून धरते तशीच कवीने आपली स्वप्ने निगुतीने जपलेली आहेत. पण ती खरी होत नाहीत हे बघून शेवटी कवीला आपली तत्त्व तर खोटी नाहीत ना अशी शंका वाटू लागते. एखाद्या चकव्यातल्या कोणत्याही वाटेने गेले तरी शेवटी पहिल्याच ठिकाणी परत येणे होते. वाट पुढे जातच नाही. तसंच काहीसं स्वप्नांच्या बाबतीत झाल्याने कवीला संभ्रम पडला आहे. तरीही त्याने जिद्द सोडलेली नाही.

दीपस्तंभ जसा कितीही लाटा आदळल्या तरी ठाम रहातो तसाच कवी सुद्धा कितीही अडथळे आले, समाजाचा विरोध अंगावर आला तरी खचून न जाता आपल्या विचारांवर ठाम आहे. त्याचबरोबर दीपस्तंभ जसा मार्ग दाखवण्याचे काम करतो तसाच कवी सुद्धा समाजाला योग्य विचार, योग्य मार्ग दाखवण्याचे मोठे काम करतो. आपली तत्त्व, आपली स्वप्नं, आपल्या आदर्शांना त्याने अजूनही आपल्या उराशी तसेच घट्ट कवटाळून धरलेलं आहे. दुर्दम्य आशावादाचे प्रतीक म्हणजे कन्याकुमारी. तशीच आशा कवीच्या मनात अजूनही शाबूत आहे. आशा निराशेची बरीच पायपीट झाली. तरीही कवी खचलेला नाही. निराश झाला नाही. ती स्वप्ने खरी करण्यासाठीचा त्याचा लढा अद्यापही तसाच सुरू आहे. हे वास्तव ‘अजूनही’ या शब्दातून सामोरे येते. कितीदाही जाळी तुटली तरी पुन्हा पुन्हा ती विणत रहाणाऱ्या कोळ्याचा आदर्श त्याच्या मनावर पूर्णपणे ठसलेला आहे. त्यामुळे कवी अजूनही आस न सोडता धडपडतोच आहे.

 म्हणूनच म्हणतो

अजून मी आहे

अपयशातूनही

आयुष्याचा आनंद घेतो आहे

गटांगळ्या खात खात

जीवनाचा थांग शोधतो आहे अवहेलनेतूनही

समाजाचे पांग फेडतो आहे

 

हो

अजून मी आहे .

म्हणूनच कवी सांगतो आहे की ,” मी हार मानलेली नाही. अजूनही मोठ्या जिद्दीने मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहे. कितीही अपयश आले तरी त्यातूनही धडा शिकत नव्या जिद्दीने आयुष्याचा आनंद घेतो आहे. या जीवन प्रवाहात कितीही जरी गटांगळ्या खाव्या लागल्या तरी, मी त्यात तग धरून आहे आणि त्याचा थांग अजून शोधतोच आहे. या माझ्या प्रयत्नांना समाजाने नावे ठेवली, मला अपमानित केले तरीही मी माझी कर्तव्यं सोडलेली नाहीत. समाजाच्या सुखासाठी मी धडपडतोच आहे आणि समाजऋण फेडायचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.” म्हणूनच शेवटी कवी मोठ्या  उमेदीने सांगतोय,”  मी हरलेलो नाही. मी अजून आहे.”

समाजातील अन्याय्य प्रथा बंद व्हाव्यात, समाजमनात चांगला बदल व्हावा, समाज पुन्हा एक होऊन जवळ यावा यासाठी प्रामाणिकपणे धडपडणारा कवी हा असंख्य लहानथोर समाजसेवकांचे प्रतिनिधित्व करतो आहे. अशी माणसे शेवटपर्यंत ध्यास न सोडता या अन्यायाविरुद्ध लढत रहातात. यातूनच अनेक वाईट अन्यायकारक गोष्टी बंद झालेल्या आहेत. म्हणूनच इथे कवीही जिद्द न सोडता ‘मी अजून आहे’ असे सांगतो आहे.

एखाद्या कुटुंबावर काही संकट आले, कुणी काही त्रास देत असेल, अन्याय करत असेल तर घरातील वडीलधारी व्यक्ती घरातल्यांना समजावते,” घाबरू नका. मी अजून आहे.” तशीच भूमिका हे समाजसेवक बजावत असतात. समाजहितासाठी ते सदैव तत्पर असतात. पाठीराखे होतात. हेच वास्तव कवी  इथे सांगतो आहे.

कवितेची सौंदर्य स्थळे :–  समाजाच्या भल्यासाठी अतिशय तळमळीने काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याचे हे मनोगत यथार्थ वर्णन करण्यासाठी कवीने ‘चक्रवाकाची आर्तता’ ही उपमा दिली आहे. परमोच्च आर्तता म्हणजे चक्रवाक. त्यामुळे या शब्दातून कवीचीही आर्तता अचूक लक्षात येते. कवी अनेक प्रश्नांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आहे, हे सांगण्यासाठी मोराच्या पिसाऱ्यातील डोळ्यांची सुंदर उपमा दिलेली आहे.

समाज बदलण्यासाठी कवी जी स्वप्ने बघतोय त्यांचेही खूप अचूक आणि समर्पक शब्दात वर्णन केलेले आहे. ही स्वप्न काहीही झाले तरी खरी होत नाहीत हे सांगतोय ‘नाठाळ’ शब्द. त्यातून व्रात्य, नाठाळ मुलासारखी अजिबात न ऐकणारी ही स्वप्नं  कवीला सतत सतावतात हे लक्षात येते. ही स्वप्न आभासीच ठरतात. तरीही ती चोर पावलांनी चाहूल देत असतात. असे असूनही यामुळे खचून न जाता कवी ठाम राहतो कसा तर, दुर्दम्य आशावादी कन्याकुमारी सारखा, दीपस्तंभासारखा ठाम राहतो. या सर्व उपमा कवितेच्या सौंदर्यात भर घालत सखोल अर्थ उलगडून दाखवतात.

या कवितेतील ‘अन्योक्ती’ अलंकारांमध्ये मुळे ही कविता कवी बरोबरच अशा सर्व थोर सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल आदर दाखविणारी झाली आहे.

अशा या अतिशय आशयघन कवितेमध्ये कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी एका अत्यंत तळमळीने समाजासाठी कार्यरत असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याची आंतरिक तळमळ मांडलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print