डाॅ. मीना श्रीवास्तव
काव्यानंद
☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव
(काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.)
सवैय्या
आता सवैय्या म्हणजे काय हे बघू या मंडळी! सवैया एक छन्द (वृत्त) आहे. चार ओळी (प्रत्येक ओळीत २२-२६ शब्द) अशा या छंदांना समूह रूपात हिंदीत ‘सवैया’ असे परंपरेने म्हणतात. रसखान यांचे सवैये फार प्रसिद्ध आहेत. निम्नलिखित कविता ‘मानुष हौं तो वही रसखानि’ ही त्यांच्या कृष्णभक्तीचे सुंदर उदाहरण आहे. यात विविध प्रकारे कवी असे सांगतो की मला कृष्णाशिवाय काही नको. त्यांच्या साऱ्या कवितांचा आत्मा कृष्णलीला हाच आहे. कृष्णाची काठी व कांबळे यांवर आठ सिद्धी व नऊ निधींचे वैभवही ओवाळून टाकावे, अशा अलौकिक शब्दांत कवीने आपली कृष्णभक्ती प्रकट केली आहे. आता रसखान यांच्या या प्रसिद्ध कवितेचा आस्वाद घेऊ या. यांतील कांही मोजक्याच सवैयांचा अर्थ समजून घेऊ, कारण कविता रसपूर्ण तर आहे पण बरीच मोठी आहे. हे रसग्रहण करतांना कवीची कृष्णभक्ती जशीच्या तशी प्रस्तुत करायचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे.
“मानुष हौं तो वही रसखानि”
मानुष हौं तो वही रसखानि, बसौं मिलि गोकुल गाँव के ग्वारन।
जो पसु हौं तो कहा बस मेरो, चरौं नित नंद की धेनु मँझारन॥
पाहन हौं तो वही गिरि को, जो धर्यो कर छत्र पुरंदर धारन।
जो खग हौं तो बसेरो करौं मिलि कालिंदीकूल कदम्ब की डारन॥
रसखान ब्रजभूमीशी इतके समरस झालेत की तेथील कृष्णाशी संबंधित प्रत्येक गोष्टीशी त्यांना नाते जोडायचे आहे. कवी वरील सवैयात आपल्या इच्छा व्यक्त करीत म्हणतात, ‘देवा, माणसाच्या जन्माला घालायचे तर गोकुळातल्या एखाद्या गुराख्याच्या किंवा गवळ्याच्या जन्माला घाल, पशूच्या जन्माला घालायचे तर गोकुळातील नंदाच्या घरच्या गाई किंवा पाड्याच्या जन्माला घाल, रोज कान्हा वनात घेऊन जाईल याची ग्यारंटी! अन हो, दगडच व्हायचे तर जो गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला ना तिथेच पडून राहू दे मला. त्या पवित्र पर्वताचे छत्र करंगळीवर धारण करून कधी काळी इंद्रदेवाच्या कोपापासून गोकुळातल्या लोकांचे प्राण वाचवले होते त्या गिरीधराने! अरे पक्ष्याच्या जन्माला घातलेस तरी हरकत नाही, मात्र अशी सोय कर बाबा की, मी ब्रजभूमीवर जन्म घेईन अन कालिंदीच्या तटावरील एखाद्या कदंबाच्या फांदीवर आपले घरटे बांधीन. अरे कधी काळी याच कदंबाच्या फांद्यांचे हिंदोळे घेत असतील राधा अन गोपाळकृष्ण! नाही तर याच कदंब वृक्षावर बसून तो कृष्ण मुरली वाजवून गोपींना रिझवीत असेल! असे माझे नशीब असेल का की, जिथे जिथे कृष्णाचा आणि गोपगोपींचा वास होता तिथंच मी पण जन्म घेईन?’
या लकुटी अरु कामरिया पर, राज तिहूँ पुर को तजि डारौं।
आठहुँ सिद्धि, नवों निधि को सुख, नंद की धेनु चराय बिसारौं॥
ए रसखानि जबै इन नैनन ते ब्रज के बन बाग तड़ाग निहारौ।
कोटिक हू कलधौत के धाम, करील के कुंजन ऊपर वारौं॥
वरील सवैयात कवी रसखान यांना श्रीकृष्णाच्या बालपणीच्या वस्तूंचा भारीच मोह पडलाय असे दिसते. त्यांच्यासाठी ते कशा कशाचा त्याग करायला तयार आहेत हे बघा! ते म्हणतात, ‘या गवळ्याची काठी आणि कांबळे मला अतिप्रिय, त्यांच्यावरून त्रिलोकाचे राज्य जरी मिळाले तरी मी ओवाळून टाकीन! नंदाच्या गाई चरावयास घेऊन जायचे सुख मिळणार असेल तर आठ सिद्धी (अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व) तसेच नऊ निधी (पद्म निधि, महापद्म निधि, नील निधि, मुकुंद निधि, नंद निधि, मकर निधि, कच्छप निधि, शंख निधि आणि खर्व) यांच्या सुखाचा मी त्याग करू शकतो. मी स्वतःच्या नेत्रांनी ब्रजभूमीतील वने, उपवने, उद्यान आणि तडाग हे सर्व जीवनभर बघत राहून ते नेत्रात साठवीन. ब्रजभूमीतील काटेदार वृक्षवेलींकरता कोटी कोटी सुवर्ण महाल अर्पण करावयास मी आनंदाने तयार होईन.’
सेस गनेस महेस दिनेस, सुरेसहु जाहि निरंतर गावै।
जाहि अनादि अनंत अखण्ड, अछेद अभेद सुबेद बतावैं॥
नारद से सुक व्यास रहैं पचि हारे तऊ पुनि पार न पावैं।
ताहि अहीर की छोहरियाँ, छछिया भरि छाछ पै नाच नचावैं॥
कवी वरील ओळींमध्ये म्हणतात, ‘शेष (नाग), गणेश, महेश (शिव), दिनेश (सूर्य) आणि सुरेश (इंद्र) हे देव त्याचे (कृष्णाचे) निरंतर ध्यान करतात, त्याचे आकलन करू न शकलेले वेद त्याचे गुणगान असे गातात ‘तो अनादी, अनंत, अखंड, अछेद (छिद्र नसलेला) आणि अभेद्य, आहे.’ नारद मुनी, शुक मुनी, वेदव्यास सारखे गाढे ज्ञानी ऋषी मुनी ज्याच्या नावाचा सतत जप करतात, तरीही त्याचा भेद जाणू शकत नाहीत, असा परात्पर परब्रह्म असलेल्या या गोकुळातील बाळकृष्णाला या गवळणी (अहीर की छोरियाँ) ताकाचे भांडे (छछिया-ताक ठेवण्याचे मातीचे लहान भांडे) दाखवत नाचायला लावतात, कधी पैंजण घालायला लावतात तर कधी घागरा चोळी!’ जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण! त्याच्या लीला अपरंपार! आणि या जगदीश्वराला आपल्या मनाला वाटेल तसे नाचवणाऱ्या या गवळणींचे भाग्य किती थोर बरे! त्याचे बालरूप इतके मनमोहक आणि सुजाण असूनही अजाण गोपींसाठी हा अशा लीला करतो.
(असे म्हणतात की स्त्रीरूप घेऊन भगवान विष्णूंशी एकरूप होण्यासाठी देव आणि ऋषी मुनी यांनी गोपिकांचे रूप घेतले. पण गोपिका झाल्यावर ते आपले मूळ रूप विसरले आणि भोळ्या भाबड्या गोपिकांच्या रूपात त्यांना कृष्णाचा असा सहवास लाभला! खरे काय अन खोटे काय त्या पूर्णब्रह्म कृष्णालाच माहित, एक मात्र सत्य, जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण गोपींसाठी नृत्य करायला सदैव तयार असायचा, फक्त लोण्याचा गोळा अन वाडगाभर ताक द्यायला लागायचं!)
धुरि भरे अति सोहत स्याम जू, तैसी बनी सिर सुंदर चोटी।
खेलत खात फिरैं अँगना, पग पैंजनी बाजति, पीरी कछोटी॥
वा छबि को रसखान बिलोकत, वारत काम कला निधि कोटी।
काग के भाग बड़े सजनी, हरि हाथ सों लै गयो माखन रोटी॥
वरील सवैयात एक गोपी आपल्या सखीजवळ कृष्णाच्या सुंदर रूपाचे वर्णन करीत म्हणते, “सखे, अगं, धुळीत खेळून खेळून कृष्णाचं सगळं अंग धुळीने माखलय, कित्ती शोभून दिसतोय नाही हा असा! आणि त्याचे कुरळे केस बघ कसे सुंदर बांधले आहेत,, एक चोटी (चुट्टी) शिरावर शोभून दिसतेय (द्वारकेत गेल्यानंतर सोन्याचा मुकुट आला तरी ही बालपणीची शेंडी काहीं न्यारीच!) अंगणात खेळता खेळता खाणे अन खाता खाता खेळणे हे तर हृदयंगम दृश्य, खातो काय तर पोळी अन लोणी (माखन रोटी). असे धावत पळत अन पडत असतांना पायातील चाळ (पैंजण) छुनून छुनून वाजताहेत, ते नादब्रह्म म्हणजे सप्तसुरांपलीकडले, अर्थात आठवे!!!, आठवावा आठव्याचा (कृष्णाचा) आठवा स्वर, अर्थात त्याच्या पैंजणाची झंकार! (रुमझुम रुमझुम चाल तिहारी, काहे भयी मतवारी, हम तो बस बलिहारी, बलिहारी!!!) त्याने पीतवर्णाची लंगोट घातलेली आहे (मोठे झाल्यावर पितांबर, धन्य हो, किसनकान्हा!). या कृष्णाच्या मनमोहक आणि मनभावन स्वरूपाने सगळ्यांना वेड लावलच आहे, त्याच्या सौंदर्यशोभेपुढे प्रत्यक्ष कामदेव आणि कलानिधी चंद्र देखील आपल्या करोडो सुंदर रूपांना ओवाळून टाकीत आहेत. अगं सखये, जरा बघ तरी, त्या मेल्या कावळ्याचे भाग्य कसे फळफळलेय ते, चक्क कृष्णाच्या हातातील ‘माखन-रोटी’ वर झपाटून डल्ला मारला आणि ती घेऊन कसा उडून गेला बघ!”
कानन दै अँगुरी रहिहौं, जबही मुरली धुनि मंद बजै है।
मोहनी ताननि सो रसखानि अटा चढि गोधन गैहै तौ गैहे॥
टेरि कहौ सिगरे ब्रज लोगनि काल्हि कोऊ सु कितौ समुझे है।
माई री वा मुख की मुसकानि, सम्हारि न जैहै, न जैहै, न जैहै॥
रसखान वरील ओळींमध्ये गोपी कृष्णाच्या प्रेमात किती वेड्या झालेल्या आहेत ते सांगतात. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, कृष्णाची मंद मंद सुरेल नादमधुर बासरी वाजते ना तेव्हा, माझ्या कानात कोणी बोटे घालावी, अर्थात मला ना त्याच्या बासरीची तान मुळी ऐकायचीच नाही बाई! तो ना माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर चढून येईल आणि मुद्दामच माझ्या मनाला मोहून घेणाऱ्या ताना घेत गायी चरायला नेत असता गवळी म्हणतात ती गाणी (गौचारण) गात बसेल. पण मी ना सर्व ब्रजवासीयांना ओरडून ओरडून सांगेन, मला भलेही काहीही अन कितीही समजावून सांगून बघा, पण हे सखी, या श्यामलतनु कृष्णाच्या मुखावरील ते मंद, मधुर स्मितहास्य तर माझ्या मनाचा ताबा घेतंय! मला माझं मनच आटोक्यात ठेवता येत नाहीय. तो माझ्या हृदयकमलाभोवती भ्रमरासारखा गोड गुंजारव अन प्रेमालाप करीत फिरतोय! अर्थात् मी कृष्णाच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेय. मी इतकी व्याकुळ आणि उन्मत्त झाले आहे की काय सांगू अन कसं सांगू! मी सगळी लाज सोडून श्रीकृष्णाकडे धाव घेत आहे.”
मोर-पखा सिर ऊपर राखिहौं गुंज की माला गरे पहिरौंगी।
ओढि पितंबर लै लकुटी वन गोधन ग्वारनि संग फिरौंगी॥
भाव तो वोहि मेरो रसखानि सो तेरे कहे सब स्वाँग करौंगी।
या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधरा न धरौंगी॥
कवीने या सवैयात गोपीचे कृष्णावरील आगळेवेगळे प्रेम प्रकट केले आहे. कृष्णाच्या वस्तूंना धारण करण्याची तिची कशी तयारी आहे बघा. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, मी ना आपल्या शिरावर (कृष्णासारखाच) मोरपंखाचा मुकुट धारण करेन. गुंजांची माळ गळ्यात घालीन, झालच तर पीत वस्त्रे परिधान करून हातात काठी घेऊन आणि गवळण बनून वनावनात गायी चरायला घेऊन जाईन अन त्यांच्या मागे फिरत फिरत छान रखवाली करीन. कृष्ण तर मला इतका परमप्रिय आहे, की त्याच्यासाठी मी वाट्टेल ते करीन, त्याला प्राप्त करायला तू सांगशील ते सोंग घेईन. पण एक लक्षात ठेव बाई, कृष्णाची जी मुरली आहे ना, जिला तो अधरात धरून ठेवतो, तिला मात्र मी माझ्या अधरात कध्धी म्हणून कध्धी धरायची नाही हं!” (सवत आहे ना!)
मोरपखा मुरली बनमाल, लख्यौ हिय मै हियरा उमह्यो री।
ता दिन तें इन बैरिन कों, कहि कौन न बोलकुबोल सह्यो री॥
अब तौ रसखान सनेह लग्यौ, कौउ एक कह्यो कोउ लाख कह्यो री।
और सो रंग रह्यो न रह्यो, इक रंग रंगीले सो रंग रह्यो री।
गोपिका म्हणतात, ‘शिरावर मोरपंख, ओठांत मुरली आणि गळ्यात वनमाळा घातलेल्या कृष्णाला बघत राहिल्याने मन वाऱ्यावर डोलणाऱ्या कमलपुष्पासारखं डुलतय. माझ्या अशा प्रेममग्न अवस्थेत कोणी वैरीण जरी उलटे सुलटे बोलली तरी सहन केल्या जातंय! रसखान म्हणतात, जेव्हा लावण्याचा गाभा अशा कृष्णाशी इतके स्नेहबंध जुळले आहेत की, कोणी एक म्हणू दे किंवा कोणी लाख वेळा टोकले तरी, आता इतर कुठलाच रंग असो व नसो, त्या सावळ्या कृष्णसख्याच्या रंगातच रंगून राहायचे आहे!’ जाता जाता याच अर्थाचे माणिकबाईंचे गाणे आठवले, ‘त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरू कसे ग!’
ज्याच्या गळ्यात वैजयंतीमाला शोभायमान होते अशा कुंजबिहारी, गिरधरकृष्ण मुरारी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ही शब्द कुसुमांजली अर्पित करते!
– समाप्त –
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
दिनांक १५ ऑगस्ट २०२3
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈