सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ धुकं – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ. हंसा दीप
(मागील भागात आपण पाहिले – आज गाडीने ठोकर मारल्याची बातमी ऐकूनही ती गप्प बसली. शांत रहाण्याचा हा पहिला अनुभव होता. ओरडण्याने आज पर्यंत काही
फरक पडला नव्हता. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं होतं. काहीही म्हंटलं, तरी खर्च काही थांबणार नाही. शांतपणे तिने ही बातमी पचवली. आतल्या आत खूप
गुदमरल्यासारखं झालं. स्वत:शीच संघर्ष केला. गप्प बसण्याची शपथ घेतली. जर मन शुद्ध असेल, तर ते काम चांगलंच असतं. पवित्र असतं. आणि…. आणि एका नव्या
आईचा जन्म झाला. – आता इथून पुढे)
एका आईचा नव्याने जन्म झाला खरा, पण ही गोष्ट कुणाच्याच गळ्याखाली उतरली नाही. घरात इन मीन चार माणसे. दोन मुले, दोन मोठी. आई-बाप-भाऊ-
बहीण. तिघे जण एका बाजूला होते, तर दुसरीकडे आई. आईचं म्हणणं म्हणजे वटहुकूमच असायचा. सक्तीने त्याचं पालन व्हायचं. सगळे आईला घाबरायचे. समोर
काही बोलायचे नाहीत, पण तिच्यामागे तिच्याकडे रागाने पहायचे. आता ही नवी आई सगळ्या घरासाठी अपरिचित होती. इतकी वर्षे त्या वातावरणात राहायची सवय झाली होती.
चर्चेचा मुद्दा असा होता – ‘असं काय झालं की आई, आई राहिली नाही. ’
‘आई, तू माझ्यावर ओरड. तुझ्या गप्प बसण्याने मला माझी चूक सतत सतावते. ’
आईला राग येण्याचे सतत प्रयत्न केले जात होते. ‘आई, सगळ्या फाईल्स डिलीट झाल्यात.
‘इस्त्रीमुळे पॅंट जळाली. ’
‘अवीचा परीक्षेत खूप खालचा नंबर आला. जेमतेम पास झाला. ’
आईला राग नाही आला, तर नाहीच आला. गोल मेज सभा झाली. जसं काही आई बेहोश होऊन कामातून गेलीय आणि अनेक गोष्टींची तिला आठवण करून देत
तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न चालू आहे. कुठल्याच उपायाचा उपयोग झाला नाही. इकडे आई पूर्णपणे शुद्धीवर होती. स्वैपाक करत होती. जेवत होती. पण नेहमीसारखं
पुन्हा पुन्हा सांगत नव्हती, की ‘नीट जेवा. ’
‘तुम्ही लोक बाहेरचं जेवण मजेत जेवता. घरचं जेवण आवडत नाही तुम्हाला. ’
‘पौष्टिक जेवण आहे. स्वाद बघू नका. त्याचे गुण बघा. ’
हे सगळं इतिहासाच्या पानांवर अंकित झालेलं होतं. सगळ्यात अवी बेचैन होता.
‘बाबा, आज-काल घरात असं वाटतय, की हे घर नाही, शांतिनिकेतन आहे. ’
‘जसं काही शांतिनिकेतनमध्ये तू राहून आला आहेस! इलाने भावाची तंगडी ओढली.
‘राहिलो नाही, म्हणून काय झालं? त्याबद्दल खूप वाचलं आहे. साउथ एशियन स्टडीज़ हा माझा एक विषय आहे. ’
‘बाबा, आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या. ’
‘अशा स्थितीत ब्रेन हॅमरेजसुद्धा होऊ शकतो. ’
‘तिच्या डोक्यात काही शिरतच नाही. ’
‘आईला सांभाळलं पाहिजे तिला राग आणायला पाहिजे. ’
दोघे बहीण-भाऊ रोजच्या कटकटीने वैतागत होते. आता शांततेमुळे वैतागले. आम्ही स्वार्थी आहोत, तर आहोत. आम्हा घरातल्या लोकांचा आईसाठीचा दुराग्रह योग्य
असेल, वा नसेल, पण आई तर दटावणी देणारीच असायला हवी ना! तिच्या दटावणीतही केवढं प्रेम असतं. हे आईचं थंडपणे ‘ठीक आहे’, असं म्हणणं सतत
सुरीसारखं टोचत रहातं. जेव्हा आई सारखी ओरडत होती तेव्हा अवीच जास्त तक्रार करायचा आणि आता आई शांत आहे, गप्प बसली आहे, तरीही तोच जास्त तक्रार करतो आहे. शेवटचं हत्यार होतं त्याच्यापाशी. त्याने नळ सुरू केला आणि तसाच चालू ठेवला. म्युझिक सिस्टीम चालू केली. ती इतकी जोरात, की ऐकणार्याचे कान फाटले पाहिजेत.
तिघेही जिथे उभे होते, तिथून हसायला लागले. असं वाटू लागलं की दोन दिवसापासून दाटलेलं धुकं, कुंदपणा आता सरेल आणि ढगाआडून सूर्य आग ओकू लागेल. आईने गुपचुप जाऊन म्युझिक सिस्टीम बंद केली आणि शांतपणे म्हंटलं,
‘ज्याने नळ उघडा टाकलाय, त्याने तो बंद करावा आणि फारशी पुसून काढावी. ’
अवीने पळत जाऊन नळ बंद केला. गडबडीत तिन्ही फारशा स्वच्छ करू लागला. जेवढा परिणाम आईच्या ओरडण्याचा होत नव्हता, त्यापेक्षा किती तरी जास्त परिणाम हा कोमल आणि मुलायम आवाज करत होता.
‘कोणत्या गोष्टीने नाराज आहेस का? की डोकेदुखी किंवा तापावरची चुकीचे औषध तर घेतले नाहीस ना! ’ बाबांनी अखेर बेचैन होऊन विचारलेच.
‘मी नाराज नाही की आजारीही नाही. खरं सांगायचं तर मी आत्ता ठीक झाले आहे. ’
तिघांचे डोळे उत्सुक होते. कान ऐकत होते – ‘मी तुम्हा सगळ्यांची इतकी काळजी करता करता तुम्हा सगळ्यांनाच दु:खी करते. माझ्या लक्षातच आलं नाही, की
तुम्ही आता लहान मुलं राहिली नाही आहात. तुम्ही आता मोठे झालात. आपली काळजी घेऊ शकता. आपले निर्णय स्वत: घेऊ शकता आणि तुमचे बाबा, तेही
माझ्यापुढे बालक बनूनच राहीले. आता तुमच्या कामांची जबाबदारी तुमची स्वत:ची. काही चुकीचं केलंत, तर ते तुमचं तुम्हीच सुधारायचं! ’
तिघे जण आवाक झाले होते. आई रागावायची म्हणून खुश नव्हते, आईच्या गप्प बसण्यावरही नाही. धुकं शा तर्हेने निवळलं होतं, की आईसाठी आकाश स्वच्छ
करून गेलं होतं. आता घर स्वयं अनुशासित होतं. प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वत: घेतली होती. पण तरीही तिघे जण, धुकं निवळण्याच्या थोड्याशा आशेने आपल्या आपल्या आकाशाकडे लक्षपूर्वक बघत रहात.
– समाप्त –
मूळ हिन्दी कथा – “कुहासा“
मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
दूरभाष – 001 + 647 213 1817 ईमेल – [email protected]
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈