मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तहान – भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ ☆ तहान – भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

फादर फिलिपनी क्रेश सुरू करायचं ठरवल्यावर एका लेप्रसी झालेल्या भिकारी जोडप्याकडून त्यांची साडे-तीन, चार वर्षाची मुलगी दत्तक घेतली.

‘आम्ही तिचा नीट सांभाळ करू. तिला खूप शिकवू. पुढचं शिकायला जर्मनीला पाठवू. पण एकच अट आहे. तुम्ही तिला आजिबात भेटायचं नाही. ओळख द्यायची नाही. पुन्हा क्रेशाकडे फिरकायचच नाही.’

भिकारी जोडप्याने ते मान्य केलं. ‘मुलीच्या आयुष्याचं तरी कल्याण होईल’ , असा त्यांनी विचार केला असावा. फादरनी डॉ.थॉमसना मुलीचं कंप्लीट चेकअप करायला सांगितलं. मुलीला महारोगाचा संसर्ग झालेला नव्हता. ‘प्रभूची लीला… ‘ हाताने छातीवर क्रॉस करत ते म्हणाले. नंतर तिचा बाप्तिस्मा झाला. सिस्टर नॅन्सीने नाव सुचवले, ’जस्मीन’ … प्रसन्न, सुंदर, टवटवीत… आपल्या अस्तित्वाने सारे वातावरण सुगंधित करणारं फूल, जस्मीन.

जस्मीन…. क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली पहिली मुलगी. सुरूवातीला रस्त्यावर वाढणारी जस्मीन त्या बंदिस्त वातावरणात इतकी भेदरून जायची, कुणीही अंगाला हात लावला, नुसतं जवळ जारी आलं, तरी आपलं अंग आक्रसून घ्यायची. पुढे ती तिथे रुळली.

जस्मीनने वेळोवेळी, क्रेशमधील इतरांच्या बोलण्यातून आपल्या जीवनासंबंधीचे गोळा केलेले हे तुकडे. एकटी असली की ते मांडून आपला जीवनपट जुळवण्याचा तिच्या मनाला छंदच लागून गेला होता. प्रत्यक्षात मात्र कुणाला काहे विचारायची तिची कधीच हिंमत झाली नाही. अगदी सशासारखी भित्री आणि बुजरी होती ती. जसजशी ती मोठी होत गेली, तसतसे तिच्या मनात विचार येऊ लागले, कोण असतील बरं आपले आई-वडील. फादरनी आल्याला प्रथम केव्हा, कुठे पाह्यलं असेल? त्यांच्या मनात केव्हा, कसं आलं असेल, आपल्याला अ‍ॅडॉप्ट करावं म्हणून? त्यांच्या मनात तसं आलंच नसतं तर? किंवा आई-वडलांनी आपल्याला द्यायचं नाकारलं असतं तर? आज आपण कुठे असतो? आपलं आयूष्य कसं जगत राहिलो असतो?

कल्पनेनेही तिच्या अंगावर शहारे येत. कदाचित् या समोरच्या भिकार्‍यांसारखाच आपलाही देह नासून गेला असता. कदाचित का, नक्कीच! त्यांच्यासारखीच लकतरे लेवून नासका देह फरफटत जगलो असतो आपण. काय वाटलं असतं त्या स्थितीत आपल्याला? की जीवन तसंच आहे, तेच जगणं स्वाभाविक आहे असं वाटलं असतं आपल्याला? कुणाच्या तरी दयेला, करुणेला आणि बर्‍याच वेळा घृणेला आवाहन करत जगत राहिलो असतो का आपण?

अनेक प्रश्न… प्रश्न… प्रश्नांचं चक्रव्यूह. प्रत्येक प्रश्न चक्रावून टाकणारा… ती आपल्या मनाशी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक वेळी वेगळं उत्तर. त्या स्थितीतलं आपलं रूप ती नजरेसमोर आणून पाही आणि तिच्या अंगावर शहारा उठे.

शाळेत जाता- येता रस्त्यात दिसणारे भिकारी, रेड टेंपल चर्चच्या आसपास वावरणारे महारोगी ती आसासून पाहत राही. चपटी नाकं, थोटकी बोटं, सुजून धप्प झालेले हात-पाय , धूळ माखलेले विटके कपडे… कधी कुणी चाकाच्या गाडीवर, दुसरं कुणी गाडी ओढणारं… किंवा बसूनच फरफटणारे महारोगी, त्या प्रत्येकाचे चेहरे ती लक्षपूर्वक न्याहाळी. त्यांच्यापैकी कुणात आपलं साम्य आहे का, हे शोधायचा प्रयत्न करी. कुणाचे डोळे तिला आपल्यासारखे वाटत. कुणाची हनुवटी, कुणाचा रंग. यापैकी कोण असतील आपले आई-बाप. विचाराने तिचा थरकाप होई. अंगावरची सारी लव ताठ उभी राही.

शाळेत जाताना ती त्यांच्याकडे पाहत, थबकत, रेंगाळत जाई. तिचे त्यांच्याकडे लक्ष जाताच सारे भिकारी कलकलाट करू लागत, काही तरी मिळेल, या आशेने.

‘ताई, गरिबाला दोन पैसे द्या. देव तुम्हाला श्रीमंत करेल. सुखी ठेवेल.‘

क्रमशः … भाग 3

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तहान – भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ ☆ तहान – भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

करुणा निकेतन क्रेशच्या पायर्‍या उतरून जस्मीन खाली आली आणि पाठोपाठ क्रेशमधील सारी जणही आली. गेटपर्यंत. तिला निरोप द्यायला. गेटच्या बाहेर सुनीता केव्हाची टॅक्सी थांबवून उभी होती. जस्मीनचे पाय मात्र तिथून निघता निघत नव्हते. पावले काशी जडशीळ झाली होती. क्रेशच्या दृष्टीने आत्ताचा क्षण ऐतिहासिक महत्वाचा होता.पंचवीस वर्षापूर्वी क्रेशने आपल्यात सामावून घेतलेली छोटी चिमखडी बघता बघता एम.बी.बी. एस. झाली होती आणि आता पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला निघाली होती. क्रेशमधल्या सगळ्यांनी तिला निरोप दिला. निरोप आणि हार्दिक शुभेच्छा. तिच्या शिक्षणासाठी …तिच्या भावी आयुष्यासाठी… तिच्या लोककल्याणकारी ध्येयासाठी…. त्या सार्‍यांच्या आत्मीयतेचं, सदीच्छांचं आपल्यावर खूप दडपण आलय, त्या दडपणाखाली आपण गुदमरत चाललोय, असं जस्मीनला वाटू लागलं. त्या सार्‍यांच्यामधून लवकर बाहेर पडावं, असं एकीकडे तिला वाटत असतानाच, दुसरीकडे पाय आणि मन मात्र त्यांच्यातच घोटाळत होतं. जितका वेळ त्यांच्या सहवासात राहता येईल, तेवढं बरं, असही तिला वाटत होतं. मनाच्या या द्विधा अवस्थेने ती भांबावून गेली होती. आज सकाळपासून क्रेशमधील प्रत्येक व्यक्ती तिच्याशी काही ना काही बोलावं म्हणून धडपडत होती. वेळ थोडा होता. बोलणं संपत नव्हतं. सर्वांनाच गहिवरून आलं होतं.

‘आज सिस्टर नॅन्सी हवी होती.’ सिस्टर मारियाच्या मनात आलं. जस्मीनला शिकवायचं, उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवायचं हे सिस्टर नॅन्सीचं स्वप्न… अनेकांना अनेक वेळा तिने बोलून दाखवलेलं… तिला खूप आनंद झाला असता. धन्यता वाटली असती. तिला आणि फादर फिलिपला. ‘गॉडस् ग्रेस’ ते म्हणाले असते.

क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली जस्मीन ही पहिलीच मुलगी. तीन साडे तीन वर्षांची असेल तेव्हा ती. आज क्रेशचा परिवार खूपच वाढलाय. तीनशे, साडे तीनशे मुली आहेत. वेगवेगळ्या वयाच्या. वेगवेगळ्या इयत्तेतल्या. कुणी पोरक्या, कुणी टाकून दिलेल्या. कुणी आई-वडलांना परिस्थितीमुळे सांभाळणं अशक्य असलल्या, आणि म्हणून त्यांनी इथे आणून सोडलेल्या. कुणी गुन्हेगार, रिमांड होममधून पाठवलेल्या, कुणी घरातून पळून आलेल्या, इथे-तिथे भरकटत असलेल्या. क्रेशने सर्वांवर मायेचं छ्प्पर घातलय. त्यांना जीवन दिलय. संरक्षण दिलय. त्यांच्या शिक्षणाची सोय केलीय. जिच्या तिच्या कुवतीप्रमाणे. शहरातील अत्यंत मागास वस्ती असलेल्या ठिकाणी रेड टेंपल चर्च आहे. चर्चला जर्मन मिशनची मदत आहे. फादर फिलिप जर्मनीहून या चर्चचे मुखी बिशप म्हणून आले. दीन-दुबळ्यांची सेवा करणे हे प्रभू येशूचेच कार्य होय, या श्रद्धेने इथे काम करत राहिले. आस-पासच्या लोकांना मदत करत राहिले. दारीद्र्याने, लोकभ्रमाने अकाली खुडून नष्ट पावणार्‍या कळ्यांना जीवन द्यावं, कृतीने प्रभू येशूचा संदेश लोकांपर्यंत पोचवावा, या हेतूने चर्चची सिस्टर इन्स्टिट्यूशन म्हणून त्यांनी करुणा निकेतन क्रेश सुरू केले. मग सिस्टर नॅन्सी, सिस्टर मारीया , सिस्टर ज्युथिका जर्मनीहून आल्या आणि इथल्याच होऊन गेल्या. आणखीही कुणी कुणी स्थानिक ख्रिश्चनांनी मदतीचा हात पुढे केला.  करुणा निकेतन क्रेश नावा-रूपाला आलं.

क्रमशः … भाग 2

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – भाग 5 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – भाग 5 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

ऑफिसमध्ये पोहोचली, तेव्हा अचला बरीच सावरली होती.

सहकाऱ्यांना ‘गुड मॉर्निंग’, ‘हाय’ करताकरता तिने इनवर्ड मेलमधली लेटर्स चाळून घेतली. दोन लेटर्सच्या मागेच रिप्लाय लिहून तिने टायपिंगला पाठवून दिले.पाच-सहा लेटर्सवर फाईलचे रेफरन्सेस घालून ती फायलिंग ट्रेमध्ये टाकली. एकाचं सविस्तर उत्तर लिहायचं होतं. ते ऍक्शन फाईलमध्ये ठेवून त्यासाठी  लागणाऱ्या रेफरन्स फाईल्सची लिस्ट तिने प्यूनकडे दिली.

कामाचा एक टप्पा संपवून, काँप्युटर ऑन करून ती ई-मेलकडे वळली.

नेट कनेक्ट होईपर्यंतच्या थोड्याशा फुरसतीत तिला आठवण झाली. सेफमधल्या पाचशेच्या दोन नोटा कमी झाल्या होत्या. सुजयने काढून तर घेतल्या नसतील ना?  की आपलाच वेंधळेपणा झाला असेल?  संध्याकाळी विचारलं पाहिजे त्याला. आणि त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. त्यापेक्षा पूर्वीसारखं कॅशमध्येच पॉकेटमनी देऊ या त्याला. तरच त्याला पैशाची किंमत कळेल आणि आपलाही कंट्रोल राहील. रोजचा हिशेब लिहायची सवय लागली तर आयुष्यभर उपयोगी पडेल आणि कुठचे खर्च अनाठायी आहेत, ते त्याचं त्यालाच कळेल.

नेट कनेक्ट झालं. तिने ई-मेल ब्राउझ करायला सुरुवात  केली.

पहिल्या दोन-तीन कामाच्या संदर्भात होत्या. नंतरची सुजयची होती. सुजयची ई-मेल? त्याने आपल्याला मेल कशाला केली? एकतर  डायरेक्ट बोलू शकतो, नाहीतर फोनवर….

तिने वाचायला सुरुवात केली.

‘ममा, माझी मेल बघून आश्चर्य वाटलं असेल तुला. पण मी मुद्दामच फोन नाही केला.

मला माहीत आहे, उद्या सकाळी दहाच्या सुमाराला किंवा त्यानंतर तू मेल चेक करशील. तोपर्यंत मला सवड मिळेल.’

सवड?  कसली सवड?  कशासाठी?

‘पप्पा  ग्रेट आहेत. मला पैसे देतात  म्हणून नाही. पण खरंच ग्रेट आहेत. लव्ह पण तेच म्हणते. लव्ह म्हणजे…… जाऊदे ना. मी तिला लव्हच म्हणतो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. खूप म्हणजे खूपच. पण लव्ह म्हणते, लग्न झाल्यावर सगळं बदलतं. तिच्या मम्मी-डॅडींचं लव्हमॅरेज होतं. घरचा विरोध पत्करून लग्न केलं होतं त्यांनी. पण लव्ह पाच-सहा वर्षांची असताना त्यांचा डिव्होर्स झाला. खूप सहन केलंय लव्हने. तुम्ही दोघेसुद्धा किती भांडत असता एकमेकांशी !

म्हणून तर लव्ह म्हणाली….. म्हणजे मी तर नकोच म्हणत होतो ;पण लव्हनेच समजावलं मला – एक मृत्यूच आपलं प्रेम जसंच्या तसं ठेवू शकेल. पप्पांचा ‘मौत से ही… ‘पाच वेळा बघितला आम्ही.

आम्हीसुद्धा आमचं प्रेम अमर करणार आहोत – आज रात्रीच.

ही मेल तू वाचशील, तेव्हा आम्ही हा इहलोक सोडून प्रेमलोकात पोहोचलेले असू.

–सुजय’

अचला दगडच झाली, ते वाचून.

अभिजितने निर्माण केलेल्या स्फुल्लिंगाने त्याचं स्वतःचंच जग भस्मसात केलं होतं.

समाप्त

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – वचनपूर्ती ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – वचनपूर्ती ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ७. वचनपूर्ती

धारानगरीत एक ब्राह्मण रहात होता. फुले-फळे आणण्यासाठी तो वनात जात असे. हा त्याचा नित्याचाच उपक्रम होता. पण एक दिवस मात्र विपरीत घडले. त्याला वनात साक्षात व्याघ्रराजाचे दर्शन झाले! वाघाच्या रूपाने साक्षात मृत्यूच समोर उभा आहे असे ब्राह्मणाला वाटले. भयभीत होऊन तो पळायला लागला. वाघानेही पाठलाग करून त्याला शेवटी पकडलेच!

तेव्हा मनात काही विचार करून ब्राह्मणाने वाघाला विनंती केली की, “आपण माझ्यावर दया करून मला ठार न मारता तीन दिवसांसाठी सोडले, तर मी घरी जाऊन, माझी महत्त्वाची कामे आटपून, माझ्या नातलगांना भेटून परत येईन”. त्यावर वाघ म्हणाला, “जर तू परत आला नाहीस तर मी काय करावे?” “मी नक्की परत येईन” असे जेव्हा ब्राह्मणाने वचन दिले, तेव्हा वाघाने ब्राह्मणाला सांगितले की, “हे ब्राह्मणा! तू घरी जाऊन तीन दिवसांनी परत ये. मी तुझी इथेच वाट बघतो.”

शोकाकुल अवस्थेत ब्राह्मण घरी परतला. घरी जाऊन तीन दिवसांनी सगळी कामे आटपून, वाघाला वचन दिल्याप्रमाणे तो वाघाच्या समोर येऊन उभा राहिला. ब्राह्मणाला पाहताच, वाघाला त्याच्या सत्यप्रियतेचे खूप कौतुक वाटले. अहो आश्चर्यम्! वाघाने ब्राह्मणाची स्तुती करून त्याला ठार न मारता घरी जाण्यास सांगितले. ब्राह्मणाला वचनपूर्तीचे फळ मिळाले.

तात्पर्य –  खरोखरच सत्यवादी जगात पूज्य ठरतात

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

पण कुठे काय  बिनसलं कोणास ठाऊक !तिकिटं  खपेनातच. एका आठवड्यातच चित्रपट थिएटरवरून काढावा लागणार, अशी चिन्हे दिसायला लागली.

अभिजित तर नवीनभाईंपेक्षाही जास्त अपसेट झाला. इंडस्ट्रीतल्या त्याच्या करियरचं काही खरं नव्हतं.

दिवसभर तो डोकं धरून बसला होता. अचला जेवायला बोलवायला आली, तर”भूक नाही म्हटलं ना?”म्हणून वस्सकन ओरडला तिच्या अंगावर.

तेवढ्यात बाहेर सुजयने टीव्ही ऑन करून चॅनल सर्फिंग सुरु केलं. एकमेकांत मिसळलेले ते कर्कश आवाज कानावर आले मात्र, अभिजित चवताळलाच.

“बंद कर बघू आधी तो टीव्ही. आधीच डोक्यात घण घातल्यासारखं……. ”

सांगितलेलं ऐकेल तो सुजय कसला !त्याने फक्त व्हॉल्युम थोडा कमी केला.

“आय  डोन्ट नो व्हॉट यू से….. ”

हे सूर कानावर आले आणि कुठचंतरी दार किलकिलं झालं.

अभिजितने लगेचच नवीनभाईंची अपॉइंटमेंट घेतली.

पाच मिनिटांच्या आत  तयार होऊन तो बाहेर पडलेला बघून अचलाला धक्काच बसला.

अभिजितची कल्पना ऐकून नवीनभाई उडालेच, “तुमची आयडिया म्हणजे सोना हाय सोना. अरे, आपल्या पिक्चरवर पोरांच्या उड्या पडणार. कॉलेजं ओस पडणार आणि थिएटरवर ब्लॅक चालणार. मी तुमच्या या आयडियावर वर्क करेल. तुम्हाला तुमचं पर्सेंटेज मिळेल. ”

दुसऱ्याच दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात बातमी झळकली –‘  ‘मौत से…. ‘ या चित्रपटाने प्रेरित होऊन एका प्रेमी युगुलाची आत्महत्या. ‘

बातमी एवढी तपशीलवार लिहिली होती, की ती फक्त आपल्या कल्पनेतूनच जन्माला आली आहे, यावर खुद्द अभिजितचाही विश्वास बसला

नाही. अर्थात खाली तळटीप होती -‘मृतांच्या निकटवर्तीयांच्या विनंतीवरून व त्यांच्या भावनांचा आदर करून मृतांची नावं तसंच त्या गावाचंही नाव बदललं आहे.’

त्या बातमीने खरंच जादूची कांडी फिरवली. चित्रपटाचा धंदा एवढा प्रचंड झाला की……

अभिजितला घसघशीत रकमेचा चेक मिळाला.

नवीनभाईंनी ग्रँड पार्टी दिली.

पार्टीहून घरी परतताना अचलाने धीर करून अभिजितला विचारलं,”अभि, एक विचारू?”

“काय? ”

“ती बातमी खरी होती का रे?”

अभिजित मोठ्याने हसला.

“तुझ्याच सुपीक डोक्यातून निघालेली?”

एरवी अभिजित चिडला असता ; पण आज तो जाम खुशीत होता.

“कशावरून?”

“नवीनभाई ज्या प्रेमाने तुझ्याशी बोलत होते ना, त्यावरून अंदाज केला मी.”

पुन्हा अभिजित हसला.

अचलाला आपल्या नवऱ्याच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटलं.

दुसऱ्या दिवशी अचलाने वर्तमानपत्र उघडलं. तिसऱ्या पानावर वरच्या उजव्या कोपऱ्यात बातमी होती – तशीच.यावेळी फोटोही होता. एकमेकांचे हात घट्ट धरलेल्या दोन निरागस मुलांच्या प्रेताचा. खाली नावं बदलल्याची टीपही नव्हती.अचलाच्या अंगावर काटा आला.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

“दहा -पंधरा मिनिटात आटपेल माझं. मग बरोबरच जाऊया.” अचला अभिजितला म्हणाली.

“नको. मी निघतो. वेळेवर पोचलं पाहिजे.”

अभिजित निघाला. त्याच्या वक्तशीरपणाचं नवीनभाईंना कौतुक होतं. आणि नवीनभाईंना खूष करायची एकही संधी अभिजित सोडत नव्हता.

व्यावसायिक चित्रपटसृष्टीत नवीनभाईंमुळेच ब्रेक मिळाला होता त्याला. स्क्रिप्टरायटरच्या टिममधला एक होता तो. सर्वांचे तुकडे जोडून एक प्रेमकथा  तयार झाली होती. पण ती नेहमीसारखीच वाटत होती. काहीतरी वेगळेपणा हवा होता.

“ट्रॅजिक एन्ड करूया,”एकाने सुचवलं, “हिरो हिरोईन मरतात.”

“कशी?”

“कोणीतरी त्यांना मारतं. किंवा आत्महत्या, नाहीतर  ऍक्सीडेन्टमध्ये… ”

“ऍक्सीडेन्ट हा शेवट नवीनच आहे.”

“पण त्याला तसा अर्थ वाटत नाही. उगीचच मारल्यासारखं वाटतं त्यांना.”

“मग घरचा विरोध असल्यामुळे आत्महत्या… ”

“हीपण आयडिया घिसीपिटी आहे. ”

इतका वेळ गप्प  राहून विचार करत बसलेल्या अभिजितला एकदम सुचलं -“मला एक आयडिया सुचतेय.”

“बोला.”

“ते आत्महत्या करतात ;पण घरच्या विरोधामुळे नव्हे.

आपण असं करूया. हिरो, हिरोईन थोडे लहान दाखवूया. म्हणजे इनोसन्ट, भावुक वगैरे. त्यांचं एकमेकांवर खूप खूप प्रेम असतं. घरच्यांचा सुरुवातीला विरोध असतो;पण नंतर ते लग्नाला संमती देतात.”

बोलताबोलता अभिजित  थांबला. त्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता न्याहाळली. नवीनभाई गोंधळात पडल्यासारखे वाटत होते; पण अभिजितच्या बोलण्याकडे  त्यांचं पूर्ण लक्ष होतं.

“तर लग्नाचं नक्की होतं. पण हिरो -हिरोईनलाच वाटतं, की लग्न झालं, संसाराची रुक्ष जगरहाटी सुरु झाली, की त्यांचं एकमेकांवरचं  हे गाढ प्रेम कमी होईल. ओहटी लागेल त्याला. कोणी सांगावं, पुढेमागे त्यांच्या आयुष्यात तिसरी किंवा तिसरा ‘वो’ डोकावण्याचीही शक्यता आहे. एकंदरीत आत्ताचं हे प्रेम जन्मभर एवढंच उत्कट राहील, याची गॅरंटी नाही. एकदा का व्यवहाराचा सूर्य तळपायला लागला, की प्रेमाचं धुकं विरायला कितीसा वेळ लागणार?”

“तुम्ही बोलताय त्यात पॉईंट आहे.”

“ह्याs!मला तर ही आयडिया आऊटडेटेड वाटते. हल्ली प्रेमाला एवढं सिरीयसली  घेतं कोण? तू नहीं और सही, और नहीं….. ”

“तसं असतं, तर एवढ्या प्रेमकथा चालल्याच नसत्या. अजूनही आपला नव्वद टक्के सिनेमा  प्रेमाभोवतीच फिरतोय.”

मुख्य म्हणजे नवीनभाईंना अभिजितची आयडिया ‘एकदम ओरिजिनल’ वाटली. त्यांनी ती उचलून धरल्यावर विरोधाच्या जिभा गप्प झाल्या.

‘मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम’ चित्रपटाचं नाव ठरलं. लगेचच कामही सुरु झालं.

हिरो, हिरोईन दोघंही लहानच होती. दोघांचाही डेब्यू होता. पण त्यांनी कामं मात्र ताकदीने केली.

चित्रपट भराभर पूर्ण झाला. प्रोमो, साउंड ट्रॅक, पार्ट्या, प्रीमियरची तयारी…..

जाहिरातीचा केंद्रबिंदू ‘शेवट एकदम ओरिजिनल’ हाच होता.

चित्रपट सुपरहिट ठरणार, असा रंग दिसत होता.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज..न..रे..श..न..गॅ..प..  ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ विविधा ☆ ज..न..रे..श..न..गॅ..प.. ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆

थोड्या दिवसांपूर्वी माझ्या बहिणीशी गप्पा मारत होते, तेव्हा सहज विषय चालला होता, त्या ओघात ती म्हणाली “नवरा बायकोच्या वयात एक वर्षापेक्षा जास्त
अंतर नसावं. पाच-सहा वर्षे तर नाहीच. कारण मग विचार करण्याचा पद्धतीत जनरेशन गॅप राहतो “.

हल्ली हल्ली “जनरेशन गॅप “हा शब्दप्रयोग खूप कानांवर येतोय. म्हणजे ” दोन पिढ्यांमधलं अंतर. ” हा त्यांचा शब्दश: अर्थ होतो, पण व्यक्ती व्यक्तीप्रमाणे त्याचा अर्थ वेगळा असतो. म्हणजे देवाच्या बाबतीत आहे तसं, मानलं तर.  तो आहे ..च आणि तो वेगवेगळ्या रूपात आहे. तसेच.. काहीसे. काही वेगवेगळ्या वयोगटातील किंवा वेगवेगळा अनुभव घेतलेल्या काही लोकांचे म्हणणे ऐकून हे लक्षात येते.

वीस वर्षाची तरुणी : ” हो.. मला तर माझ्याहून पांच वर्ष लहान बहिणीच्यात आणि माझ्यात जनरेशन गॅप जाणवतो, ती माझ्या पेक्षा स्मार्टली ही टेक्नोलॉजी हाताळू शकते

85 वर्षांचे आजोबा : ” अंतर तर आहेच, आमची पिढी एकदम धीरगंभीर, ही पिढी म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि धूडगूस. सगळे आपले वरवरचे. कुठे ही खोलपणा नाही, की गांभीर्य नाहीच..”.

चाळीशीच्या बाई: ” हो..खरंच ही पिढी हुशार आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अजून माहित नाहीत. ह्यांना त्या कधीच शिकवायला लागल्या नाहीत…”
तर हे असे मतमतांतर ऐकायला मिळते.. हे तर ठीक.. पण प्रत्येकाच्या त्याबद्दलच्या भावना वेगवेगळ्या. कोणाला त्याचे कौतुक, तर कोणाला कुतूहल, कोणाला हेवा आणि काही जणांना तर भारी रागच आहे.

आता हेच पहा ना एक गृहस्थांचे म्हणणे असे की “पुढच्या पिढीचे कौतुक करावे तेवढे थोडेच, ही मुले एकदम ध्येयनिष्ठ आहेत॰  एकदा मनांत आणलं तर ते करणारच “. तर एका आजोबांना त्यांचे खूप कुतूहल. म्हणाले की ” मी तर माझ्या नातवाशी सतत संवाद करत असतो, नवीन यंत्रणा त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मला ह्या पिढीचा कधी कधी हेवाच वाटतो. ” एक जण जरा त्रासिक आवाजात म्हणाले “काही नाही हो… कुठलेही प्रयोजन नाही पुढच्या आयुष्याचे. मजूरा सारखं राबायचं आणि पैश्याची उधळपट्टी करायची.”

स्वतःचा अनुभव, वय, परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाचे पिढीतील अंतराविषयीचे म्हणणे असते.

मला असे वाटते की दोन पिढ्यांमधे काळाचे अंतर हे असणारच आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. आधीच्या पिढीने अंतर ठेवून न रहाता त्याचा स्वीकार करून पुढच्या पिढीशी एकरूप व्हावे. बाकी आधीच्या पिढीनेच पुढच्या पिढीवर संस्कार केलेले असतात आणि शिकवणही दिलेली असते. म्हणजेच त्यांचात असणारे गुण व दोषही काही प्रमाणात…या गोष्टी पिढीजात असणार नाही का?

© सौ. स्मिता माहुलीकर

अहमदाबाद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

चहाचा गरमगरम घोट घशातून उतरला , तेव्हा कुठे अभिजितला वर्तमानपत्र उघडायचं धैर्य आलं.

’22फेब्रुवारी 2001′.त्याने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वर्तमानपत्रावरची तारीख वाचली. अर्थात  मनातल्या मनात. नेहमी तो मोठ्याने वाचायचा. सुरुवातीला अचला चिडवायची त्याला, नंतर चिडायची, मग निर्विकार असायची. आताआताशा तर…..

तिसऱ्या पानावरच्या वरच्या उजव्या कोपऱ्याकडे नजर गेली मात्र…..

त्याने कितीही कसोशीचा प्रयत्न केला, तरी त्याच्या चेहऱ्यावरचा बदल अचलापासून लपू  शकला नाही.

“बारावं? ”

“अं?…. हो…”अभिजितचा निसटता होकार.

भुवयांच्या मधला भाग दोन बोटांच्या चिमटीत धरून बसून राहिला तो. डोळे  मिटले असले, तरी अचलाची धगधगती नजर आपल्यावरच रोखल्याचं जाणवत होतं त्याला.

जराशाने तो सावरला. चहाचा आणखी एक घोट घेतल्यावर,  अंगात थोडं बळ आल्यासारखं वाटलं त्याला.

“पण…. पण माझा काय दोष आहे यात? त्या मुलांना स्वतःची अक्कल नव्हती? ”

अचलाला कळेना, हा आपल्याला पटवायचा प्रयत्न करतोय, की स्वतःचीच समजूत घालतोय.

“ते काहीही असो, अभिजित. बारा दुणे चोवीस जणांचे प्राण गेलेयत. यापुढेही असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किती जणांच्या मृत्यूचं  पाप घेणार आहेस तू  तुझ्या डोक्यावर? ”

“बघतो दुसरा काही मार्ग निघतो का.”

“दुसरं सोल्युशन सुचेपर्यंत आणखी बळी पडलेले असतील. त्यापेक्षा  मी सांगितल्यासारखं कर. आजच्या आज कन्फेशन देऊन टाक.”

“हं. ”

“सॅन्डविच घे.”

“नको. इच्छा  नाही……. सुजय उठला नाही अजून? ”

“त्याच्या रूममध्ये नाहीय तो. रात्री आलाच नाहीसं वाटतं. बोर्डवर लिहून गेला होता -‘मित्राकडे जातोय. उशीर झाला तर तिथेच झोपेन. डायरेक्ट उद्या संध्याकाळीच येईन.’ ”

अभिजितची नजर मेसेज बोर्डकडे वळली. सुजयचा पैशाचा मेसेज तसाच होता.

“हे काय? तू त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले नाहीस अजून? ”

“नाही.”

“का? वेळ नाही मिळाला? आज कसंही करून वेळ काढ. त्याचं  क्रेडिट कार्डपण काढून घेतलंस तू.”

“आधीचे पैसे एवढ्यातच कसे संपले, ते कळल्याशिवाय मी त्याला आणखी पैसे देणार नाही. पैसे मागितले की लगेच मिळतात ना. त्यामुळे किंमतच वाटत नाही त्याला पैशाची. आपण लहान असताना….. ”

“अग, जाऊदे ग अचला. त्याच्या नशिबाने त्याला मिळतंय, तर घेऊ दे ना उपभोग त्याला. आपल्या वेळची परिस्थिती  वेगळी होती. तसा आपल्यालाही थोडासा का होईना, पॉकेटमनी मिळत होताच की. आणि आपण उडवतही होतो तो. दोनतीन दिवस कँटीनला चाट मारून छोटीशी गिफ्टही द्यायचो तुला. आठवतं?”

कोर्टींगच्या आठवणींनी दोघांचाही मूड थोडासा निवळला.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – वडिलोपार्जित धन (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग : लघुकथा – वडिलोपार्जित धन (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मरणशय्येवर वडील निजलेले होते. समोर  त्यांचा लाडका पुत्र. वडिलांना काही तरी सांगायचं होतं. मुलगा त्यांची मनोव्यथा जाणून घ्यायला आतूर झाला होता. वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘बाळा,  ह्या घराशिवाय माझ्या पाशी काही नाही. जे होतं ते तुला वाढवण्यात आणि तुझ्या शिक्षणात मी खर्च केलं. मला अभिमान वाटतोय की माझा मुलगा परदेशातल्या एका

कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतो आहे. माझं जे काही आहे ते ह्या कपाटात ठेवलं आहे.

मुलाला आश्चर्य वाटलं. लोक मूल्यवान गोष्टी बँकेच्या लाँकरमध्ये किंवा तिजोरी मध्ये ठेवतात. मुलाच्या शंकेखोर चेहऱ्याकडे बघून त्या लेखक वडिलांनी सत्य सांगितलं.’बाळा,ह्या कपाटात माझी प्रकाशित पुस्तकं,अप्रकाशित लेखन, वाचकांची खुशी पत्र आणि काही स्मृती चिन्हं आहेत. बास. एव्हढीच माझी पुंजी आहे. ती तुझ्याकडे सुपूर्द करतो.’

मुलाला ठाऊक होतं, वडिलांनी जन्मभर साहित्य साधना केली होती. म्हणूनच तो अभिमानाने म्हणाला, ‘बाबा, ह्या घरात मी साहित्यसंग्रहालय काढीन, तुमचं अप्रकाशित लेखन मी प्रकाशकांकडे  पाठवीन, सगळ्या प्रशस्तीपत्रांचा एक अल्बम बनवीन, तुमचे पुरस्कार आणि स्मृती चिन्हं म्हणजे तर आपल्या घराण्याची अनामत ठेव होईल. कारण हे माझं वंश पारंपरिक धन आहे.’

खूप वेदना होत असतानाही  वडिलांच्या डोळ्यांत आनंदाची चमक आली.

 

मूळ हिंदी लघुकथा-‘विरासत’ – लेखक – श्री सेवा सदन प्रसाद, खारघर, नवी मुंबई 

मो. 9619025094.

मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – क्रोधाचा परिणाम ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ६. क्रोधाचा परिणाम

कोण्या एका गावात ‘नरेश’ नावाचा एक माणूस रहात होता. त्याने एक माकड व एक बोकड यांचे प्रयत्नपूर्वक पालन केले होते.एकदा त्याला महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावी जायचे होते. माकडाला व बोकडाला कुठे ठेवावे हा त्याला मोठा प्रश्नच पडला. शेवटी नरेशने त्या दोघांना आपल्या बरोबर न्यायचे ठरवले.

नरेशने शिदोरी म्हणून बरोबर दहीभात घेतला. तिघेजण मार्गक्रमण करू लागले. चालता चालता थकल्याने नरेशने एका वृक्षाखाली विश्रांती घेण्याचे ठरवले. माकडाला व बोकडाला त्याच वृक्षाखाली बांधून व त्यांच्याजवळच शिदोरी ठेवून तो पाणी आणायला निघाला.

नरेश गेल्यावर माकडाने सगळा दहीभात खाऊन टाकला. हाताला लागलेले दही बोकडाच्या तोंडाला फासले व आपण त्या गावचेच नाही असे भासवीत दुसरीकडे जाऊन बसले. इकडे नरेश जेव्हा पाणी घेऊन परतला, तेव्हा तो भुकेने व्याकूळ झाला होता. त्याने खाण्यासाठी शिदोरी उघडली आणि पाहतो तर काय! शिदोरीत अन्नाचा कणही उरलेला नव्हता. फक्त बोकडाच्या तोंडाला चिकटलेले दही त्याला दिसले.

‘मी माझ्यासाठी आणलेले सर्व अन्न ह्याने खाल्ले’ ह्या विचाराने नरेशच्या रागाचा पारा चढला, व रागाच्या भरात त्याने निष्पाप बोकडाला मारले.

तात्पर्य – खरोखरच क्रोध माणसाला अविवेकी बनवतो. न्याय-अन्यायाचे भान त्याला रहात नाही.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print