मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवनीचा लॅपटॉप – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  अवनीचा लॅपटॉप – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

“अवनी s चला,बूट घाल. बाहेर जायचे ना? गाडीच्या किल्ल्या  आण बरं”. बाबांनी आपल्या खास शैली मध्ये अवनीला हाक मारली. इतर वेळी गाडीच्या किल्ल्या म्हटल्याबरोबर दुडूदुडू धावत येणारी अवनी आज आली नाही. खिशामध्ये मोबाईल ठेवता ठेवता त्यांनी पुन्हा हाक मारली.” अवनी, आज गंमत आणायचीय ना? येताना आइस्क्रीम खाऊ याह!” आईस्क्रीम चं नाव ऐकलं की अवनी हमखास येणार याची खात्री होती. पण आज अवनी चांगलीच रुसु बाई झाली होती.

आपली पर्स,पिशव्या गोळा करता करता आई नही हाक मारली.” चल अवनी! आज तो नवीन लाल फ्रॉक घालायचं ना? पटकन ये. नाहीतर आम्ही जाऊ ह! घरी एकट बसावं लागेल. अंधार झाला की बागुलबुवा येईल गप्पा मारायला.”

“नाही, नाही, नाही, मी नाही येणार”. इतक्या ठसक्यातला नकार ऐकून सगळे एकमेकांकडे पाहायला लागले. काय बिनसलं एवढ्या पिटुकल्या 4 वर्षाच्या अवनीचं? कोणालाच कळेना.

खिडकीचे दार बंद करता करता अवनीच्या बाबांनी आपलं खास अस्त्र काढले.” अवनी चल बर पटकन. आज पाटी आणि रंगीत चित्राचे छान छान पुस्तकही घेऊया. मोठा फुगा आणूया”

सगळ्यांनी इतकी आमिषे दाखवली तरी अवनी आपली हुप्पच. शेवटी लाडक्या नातीला खुलवायला आजी गेली.” अवना, ए अवना, जायचे ना बाहेर? पाडव्याला नवीन शाळेत नाव घालायचे. कशी झोकात जाणाऱ आमची अवना शाळेला. नवीन दप्तर, नवीन पाटी, वा वा!”

गोबऱ्या गोबऱ्या गालांची, गोरी गोरी अवनी आज खूपच रुसली होती. फुगलेल्या दोन्ही गालांवर हाताची मूठ ठेवून आजीकडे रुसु बाई अवनी पाहत होती. “नाही म्हटलं ना, काही नको मला ती पाटी. मला लॅपटॉप – हवाय.”

आबा, आजी, आई, बाबा सगळ्यांनी गरकं न वळून तिकडे पाहिलं. हि च्या रुसव्याच कारण हे आहे तर.

कळायला लागल्यापासून लहानाचे मोठे होताना तिने आपल्या आई बाबांच्या हातात लॅपटॉप पाहिले होते. डोळे घालून दोघंही काम करताना ती रोज पहात होती. दुपारच्या वेळी तिचे आबा कॉम्प्युटरवर पत्त्यांचा डाव खेळत. तेही तिने निरखून पाहिलं होतं. त्यांच्या मांडीवर बसून कॉम्प्युटर चा माउस हाताळायला ती शिकली होती. त्यांच्याशी गोड गोड बोलून कार्टून ची सीडी लावायला तिनं शिकून घेतलं होतं. नुसतं क्लिक केलं, कि छोट्या पडद्यावर तिला तिच्या चुलत बहिणी राधा रमा यांचे फोटो बघता येत होते. ती स्वतः बाळ असल्यापासून चे फोटो रोज पहायचा नादच तिला लागला होता. ती छोटे छोटे बाळ होती तेव्हा आजी पायावर घेऊन तेलानं चोळत होती. भरपूर गरम गरम पाण्याने अंघोळ घालत होती. गुलाबी गुलाबी  पफनं पावडर लावत होती. छोटीशी काळी तीट लावत होती. त्यानंतर चे फोटो मात्र नव्हते. “आजी, अंघोळ झाल्यावर काय करायचे  ग मी? “दरवेळी अवनीचा  आजीला प्रश्न असायचा.” भु डूश्य करून माझी शहाणी अवना झोपून टाकायची. आहेच मुळी शहाणीअव ना”

खरंच छोटा बाळ असल्यापासून अवनी शहाण्यासारखे वागायची. वेळेवर झोपायची, सगळं कसं वेळच्या वेळी.म्हणूनच तर आई लगेच आपला ऑफिस जॉईन करू शकली. दुपारच्यावेळी आजी आणि आबांच्या सहवासात अवनी मोठी होत होती.

क्रमशः…

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवनीचा लॅपटॉप – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  अवनीचा लॅपटॉप – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

अवनीच्या जन्मानंतर घरातलं सगळं वातावरणच एकदम बदलून गेलहोतं. सगळ घर अवनीभोवती नाचत होतं. स्वयंपाक घरातली भांडी आता खुशाल टि.व्ही शेजारी दिसत होती. बिस्किटांचा पुडा आजोबांच्या माळेच्या डबीजवळ सापडायचा. आजी चहा करायला लागली की साखरेचा डबा जागेवर नाही हे लक्षात यायचं. तो अवनीच्या कपड्यांजवळ सापडायचा, पण, पण तरीही आजोबा रागवायचे नाहीत. एखादी वस्तू सापडेनाशी झाली की आई – आजी वैतागायच्या, चिडायच्या. ” ही अवनी कुठे काय नेऊन ठेवेल ते सांगता येतनाही. अवनी, घराच्या किल्या कुठे आहेत? अग इथली माझी साडी कुठे गेली? ” प्रश्नावर प्रश्न यायचे. अवनी आपलयाच नादात. नंतर कधी तरी किल्ली जागेवर ठेवली जायची. आजीची साडी अवनीच्या कपड्यात गुंडाळलेली असायची.

अवनी. अवनी अवनी. घरातले सगळे अवनीमध्ये गुंतलेले असायचे. आजी – आजोबा अवनीला सोडून गावाला जायला राजी नसायचे. बाबांना ऑफीसमधून आल्या आल्या अवनी समोर लागायची. आईचाही दुपारी ऑफीस मधून फोन यायचा. ‘ झोपली का अवनी? त्रास नाही ना दिला तिनं? ‘

आजी आजोबांना टॉनिकच मिळाले होते. खरं तर वयोमाना प्रमाणे आजीला कामं करणें जमत नव्हते. तिच्या ताकतीच्या बाहेर होतं ते.. पण आता अवनीला कडेवर घेऊन सरज पायऱ्या उतरत होती ती.

दुपारी आजी झोपली की अवनीचा ताबा आजोबांकडे. त्यांच्या मांडीवर बसून तिसऱ्या वर्षीच अवनी कॉम्प्युटर वापरायला शिकली. आजोबां बरोबर हक्कानं चहा पण आवडीन प्यायची. कॉम्प्यूटर, लॅपटॉप या गोष्टी सहज पहायला मिळाल्यामुळे “पाटी ” चे आकर्षण काही तिला कसे कळणार ! मला लॅपटॉप हवा पाटी नको म्हणून मोठा फुगा करून बसली होती अवनी. अखेर आजी एकटी थांबली अवनीबरोबर घरी.

येताना आजोबा अवनीसाठी दोन पाट्या घेऊन आले. पण आल्यावर लगेच नाही दाखवली. अवनी खेळाच्या नादात सगळे विसरून गेली होती.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-4) ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-4) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

घरात बेला-सुदेश सोफ्यावर बसून होते. त्यांना जेवायचीच काय पण एकमेकांबरोबर बोलायचीही इच्छा होत नव्हती. अंथरुणावर पडले खरे, पण झोपच लागत नव्हती. तळमळत कुशीवर कुशी बदलणं चालू होतं. बेला उठूनच बसली. सुदेश ला विचारू लागली, “समिधा वाचेल ना रे. डॉक्टरांनी तर चोवीस तास धोक्याचे आहेत म्हणून सांगितलंय. “आठवल्यासारखं पुढं बोलू लागली,” तशी चांगली आहे रे ती… आता घर म्हणजे थोडं भांड्याला भांडं लागणार चकी…पण त्यामुळे एवढं मोठं पाऊल उचलायचं? बिचाऱ्या मीनूचा विचार पण डोक्यात आला नसेल?”  तिची बेचैनी बोलताना वाढतच चालली होती.

सुदेशनं तिला धीर देत थोपटलं.या सगळ्या गदारोळात कादंबरीचा शेवट होण्याऐवजी नवीन कादंबरीची सुरुवातच झालीय या विचारानं तो स्वतःशीच हसला. बेलाच्या हे गावीच नव्हतं. सुदेशला हसताना पाहून तिला आश्चर्य वाटलं,

“काय झालं?” तिनं विचारलं. काही नाही.. त्याने नकारार्थी मान हलवली.

“झोप आता. दमली आहेस खूप” तो म्हणाला.

**

बहुतेक पहाट झाली होती. किरण चा फोन आला.

“समिधाला शुद्ध आलीय. मी आणि प्रकाश हॉस्पिटलात चाललोय. तू येतेस ?”

“मी? हॉस्पिटलात? अजिबात नाहीss!” बेला एकदम ठामपणे म्हणाली. असा काय पराक्रम गाजवला ग तिनं की तिच्या दर्शनाला जायचं आपण?…. स्वतः आरामात ट्रीटमेंट घेत पडली असेल. डॉक्टर, चार चार नर्सेस तिच्या दिमतीला असतील…. आम्ही मात्र इथे रात्रभर तळमळत बसलोय. रागानं तिनं मोबाईल सोफ्यावर फेकून दिला. आपण एवढे का तिरसटतोय?… तिचं तिलाच कळेना. काल सकाळी मुरगळलेल्या पाय आता जोरात दुखू लागलाय म्हणून?… की बोजड झालेल्या समिधाला पूर्ण शक्तीनिशी ओढत नेल्यामुळे हात दुखताहेत म्हणून?… दिवसभराच्या विचित्र घटनाक्रमामुळं मन थकलंय म्हणून?… की रात्रभराच्या जागरणामुळं तारवटल्यागत झालंय म्हणून?… खरं कारण तिला जाणवलं नाही.तरी देहाला त्याची कल्पना होती.

तिच्या डोळ्यात एकदम अश्रू दाटून आले. सुदेशन तिला जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत तो तिला धीर देत राहिला. थोड्यावेळाने अश्रू थांबले.

मन थोडं शांत झालं. सहज सोफ्यावरचा मोबाईल उचलून घेण्यासाठी तिनं हात पुढे केला. पण फोन बरोबर अर्धवट लिहून ठेवलेला एक कागद तिच्या हातात आला. ‘बरोबर! समिधानं वाजवलेली बेल ऐकून दरवाजा उघडायला आपण गेलो. तेव्हा हा कागद सोफ्यावर ठेवला होता.’ तिला आठवलं. कादंबरीचा संदर्भ आठवला.

थोडं नाराजीनं ती म्हणाली, “सुदेश मी पैज हरलेच की रे.”

“कसली पैज?” लक्षात आलेलं असूनही तो हसून म्हणाला.

“ती रे s…  कादंबरी पूर्ण  करायची.”

“वेडाबाई, जीवनातला एवढा थरार…. एक भयंकर नाट्य तू अनुभवलंस…  प्रसंगाला धैर्याने सामोरी गेलीस… कागदावरच्या साहित्यापेक्षा ते खूप मोठं काम होतं. हो ना बेला, अन् साहित्य काय, कला काय हे सगळं शेवटी मानवी जीवनासाठी, जीवन सुंदर बनवण्यासाठीच असतं ना?” सुदेश म्हणत होता.

तिचे डोळे चमकले. ती समाधानानं हसली मानेनच’ हो, म्हणाली.

“जिंदगीऔर मौत” यात काल एक भयंकर युद्ध चालू होतं. तू जिंदगीला साथ दिलीस. एका व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर ओढून काढण्यासाठी जीवाच्या शर्थीने प्रयत्न केलेस. अगं एकच काय पण असल्या दहा कादंबऱ्या जरी ओवाळून टाकल्या तरी त्या कमीच पडतील. तुझ्यातल्या माणुसकीनं सगळ्या पैजा तू जिंकल्या आहेस”….. सुदेशचा प्रत्येक शब्द तिच्या मनाला स्पर्शून जात होता. शांत झालेल्या तिच्या मनाला हे बोलणं कधीच संपू नये असं वाटत राहिलं.

समाप्त

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – विनाशकारी लोभ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – विनाशकारी लोभ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १६ . विनाशकारी लोभ

अवंती नगरात सुबुद्धी व दुर्बुद्धी नावाचे दोन व्यापारी होते. त्या दोघांनी दुसऱ्या देशात जाऊन भरपूर धन प्राप्त केले. तिकडून आल्यानंतर स्वनगराजवळच असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली कोणालाही  कळू न देता  खणून ते धन ठेवले व स्वगृही परतले. एक दिवस दुर्बुद्धीने एकट्यानेच ते झाडाखाली पुरलेले धन खणून काढले व स्वतःच्या घरी नेऊन ठेवले.

दुसऱ्यावेळी जेव्हा दोघे एकत्र त्या ठिकाणी गेले व त्या वृक्षाखाली खणले, तेव्हा त्यांना ते गुप्तधन मिळाले नाही. तेव्हा दुर्बुद्धीने सुबुद्धीचे मनगट पकडून म्हटले, “तूच इथे लपून येऊन एकट्याने सर्व धन हरण केलेस आणि काही माहिती नाही असे नाटक करून इथे धन खणण्यास आलास. आता माझ्या वाटणीचे धन मला परत दे.” “खरेच मी काहीही जाणत नाही” असे सुबुद्धीने वारंवार शपथेवर सांगून सुद्धा तिकडे दुर्लक्ष करीत दुर्बुद्धीने त्याला न्यायाधीशाकडे नेले आणि त्यांस सांगितले की, “आम्ही दोघांनी एकत्रितपणे खणून ठेवलेले  गुप्तधन ह्या सुबुद्धीने  एकट्याने पळविले.  तेव्हा माझा वाटा ह्याने परत द्यावा”.

न्यायाधीशांनी दुर्बुद्धीला विचारले की, “ तुम्ही  दोघांनी मिळून ठेवलेले  गुप्तधन  सुबुद्धीने एकट्याने घेतले असे तू सांगतोस. याची काही साक्ष तू देऊ शकतोस का?”  दुर्बुद्धी उत्तरला, “ ज्या वृक्षाच्या मुळाशी  धन ठेवले तोच याची साक्ष देईल.”  न्यायाधीश म्हणाले, “ ठीक आहे.  उद्या वृक्षाजवळ  येऊन  विचारूया”.

नंतर दुर्बुद्धीने  रात्रीच आपल्या वडिलांना एकांतात नेऊन  झाडाच्या ढोलीत लपवले व त्यांना बजावले की, “न्यायाधीशाने झाडाजवळ येऊन जर विचारले तर  सुबुद्धीने  सर्व धनाचे अपहरण केले असे सांगा”.

ठरल्याप्रमाणे न्यायाधीश सकाळी आपल्या  सहकाऱ्यांबरोबर झाडाजवळ आले व ” इथे खणून लपवून ठेवलेले  धन कोणी चोरले?” असे त्यांनी विचारले. “ सर्व धन सुबुद्धीने पळविले” असा ढोलीतून आवाज आला. तो आवाज  ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. न्यायाधीशांनी क्षणभर विचार करून त्या ढोलीत थोडे गवत ठेवून ते पेटवून दिले. ढोलीतअसणाऱ्या  दुर्बुद्धीच्या वडिलांना अग्नी व धुरामुळे श्वास घेणे अवघड झाले व त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे न्यायाधीशांना दुर्बुद्धीचे कपट लक्षात येऊन, यानेच सर्व धन हरण केले याची खात्री पटली व त्यांनी सगळे धन सुबुद्धीलाच दिले. धननाश व पित्याचा मृत्यू  यामुळे खूप दुःखी झालेला दुर्बुद्धी स्वतःला दोष देत घरी परतला.

तात्पर्य – जो दुसऱ्याचा घात करण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्याचा ईश्वरच घात करतो.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-3) ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-3) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“थांबा, पोलिसात फोन केलाय. ते येतीलच एवढ्यात.” रिसेप्शनिस्ट म्हणाली. “मॅडम” घड्याळाकडे पाहत बेला म्हणाली. “माझी बेबी शाळेतनं  यायचीय. मला जरा लवकर..!” “नाही, सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण व्हायला पाहिजेत” रिसेप्शनिस्टचे उत्तर होते. ‘आलिया भोगासी’… वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. बेलानं शाळेत आणि वडिलांना फोन करून चारूची व्यवस्था केली. किरणनं पण प्रकाश ला फोनवर घडलेलं अघटित  सांगितलं. बेलानं सुदेशला मेसेज टाकला. थोड्या वेळाने पोलीस येऊन धडकले. ”बेला, काय बोलायचं, सांगायचं ते काम तूच कर बाई. मला तर धडकीच भरलीय. उगीच त-त प-प व्हायचं” किरण बेलाचा हात घट्ट धरून म्हणाली.

‘तुम्ही इथं कशा काय आलात ?” पोलिसांच्या प्रश्नावर घाबरून बेला उत्तरली

“रिक्षानं.”

पोलीस दादा हसले. म्हणाले, ”घाबरू नका. तसं नव्हे का आलात?”

“ही पेशंट आमच्या शेजारणीची सून, तिनं पॉयझन घेतलं.  आत्ता घरात म्हाताऱ्या अधू सासु शिवाय कोणी नाही… त्यामुळे शेजारधर्म म्हणून.. बेलानं जरा चाचरत उत्तर दिलं.

मग चौकशीला सुरुवात झाली,

“पेशंटचे नाव?” पोलीस. “समीधा शहा” बेला.

“तुमची नावं?” पोलिस.

“बेला प्रधान, किरण कदम.”दोघी.

“त्यांच्या घरात काही भांडणं?” पोलीस.

“नाही सर,तसं कधी नाही वाटलं.” बेला.

“तसं म्हणजे कसं?” पुढचा प्रश्न.

“म्हणजे विष पिण्यासारखं, किरकोळ भांडणं तर प्रत्येक घरात होतच असतात” बेला जरा सावधानपूर्वक उत्तर देऊ लागली.

“बरं हुंड्यावरून छळ ?” पोलीस।.

“नाही हो सर, सासरची माणसं फार चांगली आहेत. सासू-सासरे ,नवरा, धाकटा दिर सगळेच” बेला.

“मग सून वाईट आहे ?” पोलीस. ”नाही- नाही,ती पण चांगली आहे.”

“काय भानगड आहे राव!” एक पोलिस दुसऱ्याला म्हणाला, ”सासरची माणसं चांगली…सून चांगली… शेजारीपाजारी चांगले… सगळेच कसे छान.. छान.. तरीही सून विष पिते!” पोलिसांचा उपरोधिक स्वर जाणवत होता.

तिथनं सुटका करून घ्यायच्या हेतूनं दोघी म्हणाल्या, “ सर आम्हाला जेवढी माहिती होती तेवढी सांगितली. आता आम्ही जाऊ?”

“नाही त्यांच्या घरातलं कुणीतरी येईपर्यंत थांबावे लागेल” उत्तर ऐकून दोघेही नाईलाजाने बसून राहिल्या.

दहा एक मिनिटात त्यांना सुदेश दिसला. त्याच्याबरोबर विकास भाई आणि समिधाचा नवरा धीरज पण होते… आणि अपार्टमेंटमध्ये काही लोक पण आले होते.

त्यामुळे दोघींची तेथून सुटका झाली. घरी पोहोचेपर्यंत दोघींनी सुदेशला झालेल्या घटनेची इत्यंभूत माहिती दिली होती.

तारा बेन कॉरिडॉरमधे वाट पाहत उभ्या होत्या. चिमुकली मीनू रडवेली झाली होती. त्यांचा अस्वस्थ चेहरा बघून त्यांनी विचारायच्या आतच बेलानं सांगून टाकलं,

“सकाळपर्यंत शुद्धीवर येईल समिधा. दोन दिवस ऑब्झर्वेशन साठी ठेवतील. काळजी करायचं काही कारण नाही. वेळेवर उपचार सुरू झाले त्यामुळे धोका टळला आहे.”       .        पण तारा बेन पॅनिक झाल्या. स्वतःला थोबाडीत मारुन घेत भिंतीवर डोकं आपटून लागल्या. “डाळ फार पातळ करते… भाजीत मसाला कमी असतो म्हणून जरा सांगायला गेले तर हा प्रकार!” त्या हुंदके देत पुढे सांगू लागल्या.

बेला पुढं झाली. त्यांच्या पाठीवरून हात फिरवून धीर देत राहिली.

“येतील थोड्या वेळाने विकासभाई. धीर धरा.। सगळं चांगलंच होणार आहे.” असं म्हणत त्यांना ती त्यांच्या घरी पोहोचवून आली.

क्रमशः …

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-2) ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-2) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“ए बाई, नौटंकी नकोय. खरं काय ते सांग.”बेला रागातच म्हणाली. समिधानंसांगितलेलं ऐकून ती हादरलीच. समिधानं एक कप डासांना मारायचं हिट घेतलं होतं.त्याचाच तो वास होता.

“पंधरा मिनिटं झाली. पण मला काहीच होत नाहीये.” समिधा भेसूर आवाजात म्हणाली.

“म्हणजे काय व्हायला हवं होतं ? मरायचं होतं तर इथं कशाला धावत आलीस ?घरात पडून राहायचंस ना! जीव देणं येवढ सोपं असतं होय ?”बेला वैतागून म्हणाली खरी, पण आता तिला वाचवायला पाहिजे हाच विचार बेलाच्या डोक्यात आला.

‘आता काय करावं? कुणाची मदत घ्यावी? उपचार तर लवकर सुरू व्हायला हवेत.’ विचार करत करत तिने किरण ला फोन लावला.तिची कादंबरी पूर्ण करायची निकड या गदारोळात निपचित पडून राहिली.

“बेलाअगं आपल्याला संध्याकाळी शॉपिंग ला जावं लागेल. आता आमच्याकडे एक गेस्ट यायचे आहेत.” किरण सांगत होती.

“ए बाई कसंही करून आत्ताच ये.एक शुक्लकाष्ट मागं लागलंय, एकदम एक मोठी इमर्जन्सी आली असं समज.  डेबिट कार्ड आहे माझ्याकडं .पण तू दहा-बारा हजार…जितके असतील तेवढे घेऊन ये. “बेला बोलून मोकळी झाली. अन् थोडी सावरली.

किरण ताबडतोब आली. अन् समिधा चा पराक्रम पाहून घाबरूनच गेली .तिनं तारा बेनला बोलावून आणलं    .

“ताराबेन असं काय घडलं घरात की या मूर्ख बाईनं विष प्यावं?” बेला जाब विचारावा तसं म्हणाली.” समिधानं… विष? त्यांच्या कानावर पडलेल्या शब्दांनी त्या दचकल्या, घाबरल्या, थरथर कापू लागल्या.

“हे भगवान, मी काय करू आता?” बसकण मारत त्या म्हणाल्या. “मी अशी दोन्ही गुडघ्यांनी अधू.. वर्षभराची नात माझ्याजवळ.” ..पुढे म्हणाल्या, “बेला आता तुझ्या हातात आहे सगळं काही.. काहीही कर, किती पैसे लागू देत, पण समिधाला वाचव.”

बेला, किरण विचारात पडल्या. यावेळी अपार्टमेंटमध्ये कोणी पुरुष माणूस नाहीये .इतर कोणी मदतीला येण्याची शक्यता पण नाही. येथून मेन रोड पर्यंत इतका अरुंद बोळ आहे की इथे ॲम्बुलन्स पण येऊ शकणार नाही.प्रत्येक क्षण मोलाचा होता. दोघींनी तिला कोपऱ्यावरच्या गोसावी डॉक्टरांकडं घेऊन जायचं ठरवलं.

“सुदेश मीटिंग मध्ये बिझी आहे तर तुझ्या प्रकाशचं ऑफिस आहे दीड तासाच्या अंतरावर. तेव्हा  देवाचं नाव घेऊन लागू या ‘मिशन जिंदगी के साथ’ या कामाला.” जिना उतरता उतरता बेला म्हणाली. दोघींनी समिधाला दोन्ही हातांनी पकडलं होतं. दहा-पंधरा पावलं पण चालून झाली नव्हती. तेवढ्यात….

“बेला आन्टी मला काही दिसेनासं झालंय.” समिधा घाबरुन म्हणाली. उभीच्या उभी थरथर कापू लागली. ऐकून किरणची सटकलीच.

“भोगा आता आपल्या कर्माची फळं !” किरण तिच्यावर खेकसली. बेलानं तिला खूणेनं शांत राहायला सांगितलं. पण पुढं थोडं अंतर चालून गेल्यावर समिधा एकदम थबकली .

“ऑंटी.. मला..एकही.. पाऊल.. पुढे.. टाकता.. येत नाहीय. माझे.. पाय.. जड.. झालेत .”रडत समिधा म्हणाली. तीला नीट बोलताही येत नव्हतं. त्यांना काही सुचेना. दोघी तिला ओढत ढकलत कशा बश्या दवाखान्यापर्यंत घेऊन आल्या. दवाखाना बंद होता पण डॉक्टर वरच्या मजल्यावर राहत होते.बेला तडक वरती डॉक्टरांच्या घरात गेली.

“डॉक्टर साहेब… जरा प्लीज ऐकता?… बेलानं अडखळत सगळा वृत्तांत सांगितला. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. जेवणाच्या ताटावरून उठून ते तिच्याबरोबर खाली आले.

तिथं एक मोठा ‘सीनच’ क्रिएट झाला होता .समिधा फूटपाथवर गडाबडा लोळत होती.जिवाच्या आकांताने ओरडत होती…..अन् ही..मोठी गर्दी गराडा घालून उभी होती. ते बघून बेलाच्या उरात धडकीच भरली.डॉक्टरांनी नाडी बघितली. स्टेथेस्कोपनं चेकिंग केलं. मग जरा काळजी च्या आवाजात म्हणाले,

“विष अंगात भिनायला लागलंय. ताबडतोब हॉस्पिटल गाठावे लागेल तुम्हाला. जस्ट हरीअप्! त्यांनी जवळच असलेल्या कामत हॉस्पिटलच्या स्पेशालिस्ट ला फोन करून सगळी कल्पना दिली.

आता पुढचं काम!… लोकांच्या घोळक्यातून बाहेर पडून त्या रिक्षा थांबवायचा प्रयत्न करू लागल्या. कार वाल्यांना लिफ्ट मागू लागल्या. पण सगळेच बघे निघाले .मदत करायची सोडून काहीजण मोबाईलवर व्हिडीओ घेण्यात गुंतलेले दिसले. नशीब बलवत्तर असंच म्हणायला पाहिजे… एक रिक्षावाला मदतीला पुढे आला. त्यामुळे त्या वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकल्या. स्पेशालिस्ट डॉक्टरांनी विचारलेली सगळी माहिती त्यांनी दिली. आणि इमर्जन्सी

मध्ये ट्रीटमेंट सुरू झाली. बाहेर रिसेप्शनवर फॉर्म लिहून देऊन, पैसे भरून, त्या परत जायला वळल्या.

क्रमशः …

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-1) ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-1) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

पहाटेच्या साखरझोपेतनं बेलाला जाग आली तीच मुळी तिला सुचलेल्या कादंबरीच्या क्लायमॅक्सनं.व्वाव तिचं मन आनंदानं ‘बल्ले बल्ले ‘करुन नाचायला लागलं.तिची कुरुक्षेत्र ही कादंबरी एका मासिकातून क्रमशः प्रकाशित होत होती. वाचकांचा उदंड प्रतिसादही मिळत होता. मनासारखा क्लायमॅक्स न सुचल्याने गाडी शेवटच्या भागावर येऊन अडली होती. इतक्या चांगल्या कलाकृतीचा शेवट पण दर्जेदार हवा असं तिला वाटत होतं. पण प्रतिभा राणी रुसून बसली होती. तिचं मन बेचैन झालं होतं. कारण संपादकांनी दिलेली कादंबरीच्या शेवटच्या भागाची डेडलाईन संपत आली होती. कित्येक दिवसापासूनची तिची चिडचिड सुदेशच्या सुद्धा लक्षात आली होती.

पण आजची सकाळ वेगळाच उत्साह घेऊन आली होती. लगबगीने ती उठली. स्वयंपाक घरात गेली. भरभर सकाळची कामं आवरून लिहायला बसायचंय…..  ‘कुरुक्षेत्र चा शेवटचा भाग संपादकांना पाठविला की मनावरचं मोठं ओझं उतरणार.’ विचार करत… लिहायच्या  शब्दांशी खेळत आपल्याच तंद्रीत वावरणाऱ्या तिचा पाय फरशी वरून सटकला…. टेबलाच्या पायात अडकला… ती पडलीआणि पाय मुरगाळून बसली.

“अगं जरा हळू” म्हणत चहाचा कप बाजूला ठेवत सुदेश उठला. त्यांनं तिला आधार देऊन खुर्चीवर बसवलं. फ्रीजमधून कोल्ड तयार पॅक  काढून तिच्या मुरगळलेल्या पावलावर लपेटून ठेवला.

“आता सूज नाही येणार व्यवस्थित थंड शेक घे” तो म्हणाला.

आणि तो लगोलग चारुला तयार करून स्कूल बस मध्ये बसवून आला.उरलं सुरलेलं स्वयंपाकाचं काम आवरून त्यांनं बेलालाही नाश्ता दिला. आणि किचन कट्टा छान आवरून तो आपल्या ऑफिसला जायच्या तयारीला लागला.

हे सगळं लांबून निरिक्षण करणार्‍या बेलाला एकदम गहिंवरून आलं. त्याचं आपल्यावरचं प्रेम… त्याचं ‘केअरिंग नेचर’ नेहमीच बेलाला सुखावत असे आणि त्याचं मिष्किल बोलणं… तिची थट्टा करणं.. तिला चिडवणं हेही तिला आवडत असे.

“कादंबरीचा शेवटचा भाग काही दिलेल्या मुदतीत पूर्ण होत नाही.” त्याचं चिडवणं सुरू झालं. “सांग संपादक महोदयांना मुदत अजून वाढवून हवीय म्हणून.” तुम्ही महान लेखक मंडळी मूडी असता… नाहीय  आत्ता मूड..!”

“नाही, असं होणारच नाही. आज संध्याकाळपर्यंत संपादकांच्या मेल आयडी वर शेवटचा भाग पोहोचलेला असेल.” ती पण ठासून म्हणाली.

“नामुमकीन लागली पैज” त्याचं चिडवणं चालूच होतं. “आज डान्स क्लास,शॉपिंग काही जमणार नाही.. तरी पण पाय दुखतोय ना म्हणून आराम. उद्या आणखी काहीतरी तरी, न लिहिण्याचा वेगळा बहाणा.”

“छोड यार, बेला के लिये आज सब मुमकीन है…. त्यामुळे तुझं चॅलेंज मी स्वीकारतेय… कितीची पैजसांग?” तीपण रंगात आली. कारण पैज मीच जिंकणार आहे.

“ऑल द बेस्ट” म्हणत हसत -हसत तो ऑफिसला निघून गेला.

‘चला बेलाजी आता हे तीन-चार तास तुमचेच’. लिहायला बसताना तिनं मनाला बजावलं… आणि छानपणे  लेखनात रंगून गेली… अचानक डोअर बेलच्या आवाजाने ती भानावर आली. लेखन सोडून उठायची तिची अजिबात इच्छा नव्हती. इतका छान मूड लागलाय,अर्ध्या पाऊण तासाचं तर काम उरलंय. विचार करत वैतागानं लंगडत जाऊन तिनं दार उघडलं.

एकदम वाऱ्याच्या वेगानं ताराबेनची सून आत आली आणि आपल्याबरोबर रॉकेल सारखा उग्र वासही घेऊन आली. बघताक्षणीच ती बेलाच्या गळ्यातच पडली. भेदरून रडायला लागली.

“हेय् समिधा व्हॉट् हॅपन्ड” बेल स्वतःच गोंधळून म्हणाली. समिधा तशीच घुटमळत राहीली. आणि मग विचित्र आवाजात रडत कसंबसं बोलू लागली.” ऑंटी मला जगायचं नाहीय. माझ्या मीनुला आता तुम्ही सांभाळा.’बां’वर माझा विश्वास नाहीय.”

तो उग्र वास आणि तिचं बोलणं… बेला वेगळीच शंका आली. ‘अंगावर रॉकेल ओतून घेऊन ती इथं स्वतःला पेटवून घ्यायला तर ती आली नाहीये ना?’

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दृष्टिकोन ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ दृष्टिकोन ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सुनेत्रा आपल्या स्वत:च्याच फोटो कडे उदास पणे बघत होती. अगदी अलिकडचा ३-४ महिन्यापूर्वीचा भावाच्या नातवाचा वाढदिवस  व आईचे सहस्रचंद्रदर्शन या निमित्ताने काढलेले  फोटो ! प्रत्येक फोटोत तिचा चेहरा हसरा होता.पण तिला तो निस्तेज वाटत होता. डावा डोळा थोडा बारीकच दिसतो अलिकडे. पाच सहा वर्षांपूर्वी डोळे आले होते तिचे. infection फारच  severe.बरे व्हायला महिन्या पेक्षा जास्त दिवस गेले. डोळे बरे  झाले. पण डाव्या डोळ्याची पापणी अर्धवट झुकलेलीच असे. Eye ptosis— असे निदान झाले. सुदैवानं कोणताही मोठा दोष  नव्हता.परंतु डोळा बारीकच राहिला.

सगळ्यांनी लहानपणापासून केलेले काैतुक आठवत ती फोटो बघत राहिली.मोठे टपोरे असूनही तिचे डोळे शांत होते. आश्वासक नजरेने ती सर्वांना आपलेसे करत असे.एव्हढंच कशाला लग्न ठरले तेंव्हादेखील तिचे डोळे बघुनच पसंती आली होती की ! आज मात्र बारीक झालेला डोळा चेहर्‍याला sick look देत होता.

हातातला फोटो बाजूला ठेऊन  ती उठली. बसून चालणार नव्हते.आज लेकाची पावभाजीची ऑर्डर होती.तो कॉलेज मधून येईपर्यंत सगळं तयार हवं.! पण ब्रेड व बटर दिसत नाहीय घरात. म्हणजे मार्केट मध्ये जायला हवे. जवळच्याच कॉलनीतल्या सुपर शॉपीत तर जायचे.तिने फक्त ओढणी व पर्स घेतली.पण जाताजाता वर पिनअप केलेले केस सोडून पॉनिटेलचा शेपटा मोकळा केला.मन पुन्हा भूतकाळात गेले.आपले केस कधी क्लचर मध्ये बांधता येतील असे तिला वाटत नसे. पूर्वी  जाडजूड लांब सडक शेपटा पाठीवर कंबरेच्या खालपर्यंत रुळत असे.तो इतकासा कसा व केंव्हा झाला ? ती पुन्हा उदास झाली.

मान झटकून तिने हातात कुलुप घेतले व चप्पल पायात अडकवले. ऊजव्या पायाच्या अंगठयाचे बोट गेल्या वर्षी मोडले होते.प्लॅस्टर वगैरे उपचार झाले पण ते वाकडेच राहिले. त्यामुळे तिला पायात चप्पलही काळजीपूर्वक सरकवावे लागे.

काय हे ?किती गबाळ्या,कुरुप,विचित्र दिसतोय आपण.आपल्या कॉलेजला जाणार्‍या लेकाला मित्रांच्या बरोबर आपली ओळख करून देताना लाज वाटत असेल. आणी ‘अहो’? त्यांना तरी अलिकडे आपण आवडत असू का ? तसे थोडे टाळतातच ते आपल्याला आताशा ! सुनेत्रा अगदी रडवेली झाली.

मरगळ घालण्यासाठी तिने घरात आल्यावर आशा भोसले ची गाणी ‘कारवा’ वर लावली. छानशी कॉफी करुन घेतली. आता तिचे हात सराईतपणे पावभाजी करण्यात गुंतले. सुगरणी चे हात व मन आनंदाने किचन मध्ये रमले. सर्व आवरेपर्यंत संध्याकाळचे सहा  वाजले. दरवाजाची बेल वाजली. तिचा लेक दारात हसतमुखपणे ऊभा होता.सोबत दोन मित्र.तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने मित्रांची  ओळख करून दिली.” जाम भूक लागलीय मम्मीडे! आज मेक च्या लॅब मध्ये मेटल ब्लॉक करायचा होता. काय दमलोय यार.” असे म्हणत तो आत आला.”वाव!! काय मस्त वास सुटलाय. वासाने भूक आणखीनच खवळली  बघ “.पावभाजीवर तुटुन पडत सगळ्यांनी तिला दाद दिली. “आई तुझ्या हातात जादू आहे बघ.”

त्याचे मित्र गेल्या वर  ती हॉल मधला व ओट्यावरचा पसारा आवरत होती. तो ही मित्रांच्या व कॉलेज च्या गप्पा मारत तिला मदत करु लागला. तसे त्याच्या कॉलेज मध्ये न जाताही तिला सगळे ठाऊक होते. तोच सांगे सर्व. आला घरी की टकळी सुरुच.

आवराआवर होईपर्यंत ‘अहोंचे’आगमन झालेच. प्रथम चहा,गप्पा,TV, बातम्या,जेवण ———–जेवताना बापलेक पावभाजी ची स्तुती करत होते तोंडभरून.”अग आज ऑफिसधला तो जोश्या—- ” असे ऑफिस गप्पांचे तोंडीलावण होतेच.” तू दोन दिवस भिशी ग्रुप बरोबर जाणार आहेस ना ग महाबळेश्वरला ?दोन दिवस हॉटेल मधले बेचव खावे लागणार. क्या करे? बाबा आत्ताच पोटभर खाऊन घ्या “. अशा थट्टामस्करीत जेवणं झाली.

किचन मधील झाकापाकी करून ती बेडरुम मध्ये आली. नवरोबा केंव्हाच झोपी गेले होते. ते्व्हढ्यात तिला मोगऱ्याचा दरवळ आला. अहोंनी ऑफिस मधून येताना  मोगऱ्याचा गजरा आठवणीने आणला होता. तो ओंजळीत धरून तिने हुंगला. आणी मनावर दिवसभर आलेली मरगळ कुठच्या कुठे पळाली. विरळ झालेले लहान केस,वाकडे बोट किंवा अशक्त झालेला डोळा यांनी तिच्या प्रियजनांत काहीच फरक पडत नाही. ती सगळ्यांना अजूनही तितकीच आवडते.

बोट वाकडे झाले तरी त्यात चप्पल अडकवता येते. तिला कोणाच्याही मदतीशिवाय चालता येते.! डोळा बारीक झालाय पण दृष्टी चांगली आहे.!! विरळ केसातही गजरा चंद्रकोरी सारखा सजतोच ना!!!

छोट्या छोट्या कृतींमधून घरातल्यांच्या भावना तिच्या पर्यंत पोचल्या होत्या. शब्दांपलीकडले खूपसे तिला उमगले. दोघांचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिला सुखावून गेला. चेहरा आत्मविश्वासाने तेजाळला. ऊशीजवळ मोगऱ्याचा गजरा ठेऊन ती हलकेच निद्रादेवीच्या आधीन झाली.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

१२/५/२०२०

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

माधुरीताईचे लग्न झाल्यावर हे दोघे बाप लेकच घरांत. अण्णा सकाळी उठून पाणी भरुन, आंघोळ, पूजा, अर्चा आटपून मन्यादादा उठायच्या आंत एखाद्या गृहिणी ला लाजवेल असा स्वयंपाक करुन दोघांचे डबे भरायचे. मग ह्या महाशयांना उठवून त्यांची तयारी. करुन ऑफिस वेळेवर गाठायचे. वक्तशीर, एकदम  कडक शिस्तीचे.घर पण व्यवस्थित टापटीप. जिकडची वस्तू तिकडेच पाहिजे. अंधारात सुध्दा ती वस्तू सांपडली पाहिजे.संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर  मन्यासाठीं ताजी भाकरी करून द्यायचे.आईवेगळा पोर म्हणून लाड करायचे. आणि मन्या  फक्त अभ्यास कर. अवांतर वाचन कर.मित्रांना जमवून टाईमपास कर.कामाच्या बाबतीत इकडची काडी तिकडे करीत नसे.मन्या बोलघेवडा,बोलबच्चन.मित्रांबरोबर ह्याची मस्करी कर, त्याची टवाळी कर. कोणाच्या weak point वर हसून मित्रांचा आणि आपला time pass कर. तसा कोणाच्याही मदतीला साहेब तयार. पण त्याचाही हिशेब ठेवायला आणि वेळ प्रसंगी वसूल करायला विसरत नसे. एकदम calculative.

झालं. मन्यादादाचं लग्न झालं आम्हाला आग्रहाचे आमंत्रण होते. पुण्याला आम्ही  गेलो होतो. बायको पण छान त्याला साजेशीच होती. अण्णा खूष. आता त्यांची घरातल्या इतक्या वर्षाच्या रामरगाडयातून सुटका होणार होती. म्हणून तर त्यानी नोकरीवाली मुलगी सून न करता गृहकर्तव्यदक्ष  केली. अण्णा  फणसासारखे बाहेरुन शिस्तीचे कडक पण आतून प्रेमळ. सुनेला अगदी मुलीप्रमाणे त्यानी वागवले. पण आईची खास शिकवणी असलेली सुन त्यांच्या  वरचढ निघाली. वाटेल त्यावेळी माहेरची मंडळी येऊन रहायची. अण्णाच्या शिस्तीची आणि टापटीप पणाची वाट लावायची. आणि स्वतःच्या घरांत अण्णाच परके. त्याना वेळेवर चहापाणी नाही कि जेवण नाही. तेव्हा हा मन्या पण नंदीबैल तिचा. हळूहळू अण्णाचे वय व्हायला लागले त्यानी आयुष्यभर काटकसर करुन भरपूर सच्ची कमाई करुन ठेवलेली त्याच्यावर तिचा हक्क. माधुरीताईला काय देतील? यावर लक्ष.पण अण्णाचे करताना कर्तव्याला मागे. बाहेरगावी सगळे फिरुन यायचे आठ, आठ दिवस आणि अण्णा बिच्चारे एकटे घरी. आता त्याना स्वयंपाक करायचा पण कंटाळा यायचा.झेपत नव्हते. मग चहापाव, वडापाव, फळे खाऊन ते आठ दिवस काढायचे एकटे बिच्चारे. तेव्हा कधी मन्यादादाला आपल्या सारख्या आईवेगळ्या मुलाला आयुष्यभर आईबाप दोघांची भूमिका एकट्यानी बजावून मोठे केले याचा विसर पडला. अण्णांनी कधी तरुणपणात स्वतः चा विचार केला नाही. कधी मित्र नाही का सिनेमा, नाटक नाही. मी आणि माझी मुलं. आणि एकाच घरात राहून म्हातारपणी असं एकटेपणं.

पण आता मन्यादादा, आयुष्यभर हुशा-या करणारा लोकांना बोधामृत, पाजणारा, प्रवचन देणारा, मी शहाणा बायकोच्या नंतर मुलांना शिकवलं. त्यांची लग्न केली. जग जिंकले. पण आज तो एकटा पडला अगदी त्या वेळी भरल्या घरांत एकटे पडलेले अण्णा आठवले.

बिच्चारे.

! जैसी करणी वैसी भरणी!

समाप्त 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी नाडकर्णी-नाईक

 

 ☆ जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

मन्यादादा सांगू लागला “आपण पंधरा, सोळा वर्षानी भेटलो.त्यात माझ्या आयुष्यात बरेच चांगले, वाईट प्रसंग घडून गेले.दुसरासा माणूस खचला असता पण मी मुळातच हॅपी गो लक्की,हालमें खुशाल रहायची  वृत्ती म्हणून ठणठणीत आहे. मीरा, माझी बायको दोन वर्षे अंथरूणावर होती.ती गेली.तिच्या पाठोपाठ अण्णा वयोमानानुसार अल्पशा आजाराने गेले.मग काय मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर. मला तर चहा पण करता येत नव्हता.कधी घरी स्वयंपाकीण ठेवून,कधी बाहेरुन डबा आणून दिवस काढले.हळूहळू मुलगी,मंजिरी काॅलेज करून थोडा स्वयंपाक विचारुन   विचारुन, पुस्तकात वाचून करु लागली.तेव्हा तुझ्या आईची इतकी आठवण यायची.कधी त्यानी जाणवू दिलं नाही आपण शेजारी असल्याचं.तुझ्या  दादाच्या सारखंच माझं करायच्या सणवारं

गोडधोडं,माझा वाढदिवस.इतकंच काय पण माझ्या आजारपणात पथ्यपाणी पण. अण्णांना ऑफिस मध्ये  अचानक काम निघाले आणि रात्री घरी यायला उशीर झाला तर मला तुमच्या बरोबर जेवू घालायच्याच आणि अण्णासाठीं घरी डबा द्यायच्या.  अशी  देवमाणसं आता मिळणं कठीणच.

आता लग्न करुन मंजिरी गेली नव-याबरोबर यु.के.ला आणि मनोज, माझा मुलगा गेला u.s.ला तिकडेच सेटल झाला.तसे फोन असतात.हा दोघांचे. बोलवतात मला तिकडे.पण योग नाही माझा तिकडे जाण्याचा.वर बोट दाखवून म्हणाला शेवटी त्याची इच्छा. तीन वेळा ह्वीसा रिजेक्ट झाला. ‘एकला चलो रे’. बायकोचंआणि ताईचं पटत नसल्यामुळे ताईशीही संबंध नाही. “ओघ घालवला आणि ओक्साबोक्सी रडला म्हटलं, “तुझ्या वयाला योग्य अशी जोडीदारीण बघ म्हणजे एकटेपणा जाणवणार नाही. मुलं तिकडे तू एकटा इकडे दुखलंखुपलं, अडीअडचणीला हक्काचं माणूस पाहिजेना.का मी शोधू तुझ्यासाठीं?”

तर म्हणाला,”चालेल बघ.चला निघतो भेटू परत “.म्हणून त्यानी आणि माझ्या लेकानी फोन नंबरची देवाणघेवाण करुन निरोप घेतला.आम्ही घरी आलो.

नाटक विसरुनच गेले.आणि अण्णा  मन्यादादा, माधुरीताई आणि गिरगावातले बालपणीचे दिवस,त्या आठवणी जाग्या झाल्या.

क्रमशः…

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print