मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्त्रीणाम् भाग्यम्… भाग-१ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ स्त्रीणाम् भाग्यम्… भाग-१ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

गुरुवार असल्यामुळे शेवटचं लेक्चर नव्हतं, त्यामुळे लवकरच निघता आलं. उद्या सकाळची फ्लाईट. पहाटेच निघावं लागणार. तसं पॅकिंग ऑलमोस्ट झालंय म्हणा. तेव्हा घरी जाऊन मस्तपैकी ताणून द्यायला हरकत नाही.

बसच्या रांगेत उभी राहिले. ऍज युज्वल, बसचा पत्ता नव्हता. समोर लक्ष गेलं तर एक बाई रस्ता क्रॉस करत होती. डावी-उजवीकडे न बघता माझ्याचकडे बघत येत होती. मग माझीच जबाबदारी असल्यासारखं मी कुठून वाहन येत नाही ना, ते बघितलं. रेड सिग्नल असावा. दोन्ही बाजूंना रस्ता रिकामाच होता.

‘‘आरतीच ना तू?”

मी चमकून तिच्याकडे पाहिलं. मला अगदी नावानिशी ओळखत होती.

ती कोण ते मात्र मला आठवेना. फिकुटलेला गोरा रंग, फरकटलेलं मोठं कुंकू, विस्कटलेले केस, कशीतरीच गुंडाळलेली हलक्यातली साडी…

‘‘तू आरती नाहीयेस?” मला अगदी हक्कानं अगंतुगं करत होती.

‘‘मी आरतीच आहे. पण तुम्ही…”

‘‘ओळखलं नाहीस ना?” ती दुखावली गेल्याचं तिच्या सुरातून पटकन जाणवत होतं.

‘‘तसं बघितल्यासारखं वाटतंय कुठे तरी. ”

‘‘म्हणजे नक्की आठवत नाहीय की ओळख द्यायची नाही? आठवत नसेल तर ठीक आहे. मी सांगेन माझं नाव. पण ओळख द्यायची नसेल, तर तसं सांग म्हणजे मी सरळ निघून जाईन. ”

खरं तर तिच्या बोलण्याचा मला राग आला, पण ते दुखावलेपण… मी टक लावून तिच्याकडे पाहू लागले. एकीकडे मेमरीच्या एकेका कप्यांत डोकावून बघत होते. कुठे बरं भेटलो असू आम्ही? पोस्टग्रॅज्युएशन तर नक्कीच नाही. कॉलेज, शेजारी, आईच्या शेजारी, जुन्या घराच्या शेजारी, शाळा, प्रायमरी शाळा…

‘‘ओह, तज्ज्ञा तू?”

तिला खरोखरच खूप आनंद झाला.

‘‘सॉरी तज्ज्ञा, मी पटकन ओळखलंच नाही तुला. कशी आहेस तू?” तिचे डोळे भरुन आले.

तेवढ्यात बस आली. मग आम्ही सरळ बसची रांग सोडून बाहेर पडलो.

‘‘तुला वेळ आहे ना… चल, आपण कुठे तरी बसून गप्पा मारू या. ” असं मी विचारल्यावर ती लगेचच तयार झाली.

माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. शाळेत असतानाची, छान कडक इस्त्रीचा युनिफॉर्म घातलेली, मऊशार केसांचा बॉबकट केलेली, गोरीपान, तेजस्वी, डौलदार तज्ज्ञा.

चौथीच्या सेकंड टर्ममध्ये ती नव्यानेच शाळेत आली. ती वर्गात शिरली मात्र, आम्ही सगळ्याच जणी तिच्याकडे टकामका बघत राहिलो.

मराठीचा तास चालू होता. बाईंनी तिचं नाव विचारलं.

‘‘तज्ज्ञा काळे. ”

‘‘आरती, तू हायेस्ट आली होतीस ना मराठीत?”

मी कॉलर ताठ करून उभी राहिले.

बाईंनी मला जवळ बोलावलं. माझ्या हातात खडू दिला आणि फळ्यावर तिचं नाव लिहायला सांगितलं. मी अतिशय सुरेख अक्षरात तिचं नाव लिहिलं – ‘तज्ञा काळे. ’

‘‘काय गं, बरोबर लिहिलंय का हिने तुझं नाव?”

‘‘चूक”, असं म्हणून, स्वत: अगदी मोठी विद्वान असल्यासारखा चेहरा करुन, तिने डस्टरने मी लिहिलेलं अख्खं नाव पुसलं आणि पुन्हा नव्याने लिहिलं – ‘तज्ज्ञा काळे. ’

मला रागच आला तिचा. एक तर असलं कसलं नाव! दुसरं म्हणजे ‘अर्धा ज’ लिहायला राहिला, तर त्यासाठी अख्खं नाव कशाला पुसायला पाहिजे? मी विचारलं तिला तसं.

‘‘मग ते अव्यवस्थित दिसलं असतं. मला सगळ्या गोष्टी व्यवस्थितच लागतात. ”

आखडू कुठची… गेली उडत.

मग बाईंनी तिला तिच्या नावाविषयी विचारलं. तर समजा, शब्दांनी तोंड तुडुंब भरलंय आणि त्यांना बाहेर पडायला थोडीशी वाट मिळालीय, म्हटल्यावर कसं होईल, तसं तिने भराभर बोलायला सुरुवात केली.

‘‘माझे दोन्ही काका डॉक्टर आहेत. एक चाइल्ड स्पेशालिस्ट आणि दुसरे इ. एन. टी. स्पेशालिस्ट आहेत. मीही डॉक्टर व्हावं असं माझ्या वडिलांचं स्वप्न आहे. मी डॉक्टर होऊन पुढे स्पेशालिस्ट व्हावं, असं त्यांना वाटतं. कसली स्पेशालिस्ट ते त्यांनी अजून ठरवलेलं नाही. पण मी स्पेशालिस्ट होणार हे नक्की. स्पेशालिस्ट म्हणजे तज्ज्ञ आणि मी मुलगी म्हणून तज्ज्ञा. ’’

बाईंनी तिला नेमकं माझ्याशेजारीच बसवलं.

थोडं चालावं लागलं, तरी निवांतपणे बसता येईल, म्हणून आम्ही जरा आतल्या रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये गेलो. बनवायला जास्त वेळ लागणा-या पदार्थांची ऑर्डर दिली.

‘‘तुझं मेडिकल झालं का गं पुरं?” मी विचारलं.

ती दोन मिनिटं काहीच बोलली नाही. तिचे डोळे भरून आले. तिने ओठ घट्ट मिटून घेतले. बहुधा आवंढाही गिळला असावा.

‘‘इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, लेट अस नॉट डिस्कस एनिथिंग. आपण शांत बसू या. खाऊया. कॉफी पिऊया आणि निघूया. ”

‘‘असं नको ना गं म्हणू, आरती. मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे. म्हणून तर…”

मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ‘‘बोल, मी ऐकतेय. तुला जे सांगावसं वाटतंय ते सांग. तुला जे सांगायचे नसेल ते…”

‘‘मला सगळं सांगायचं आहे. ”

तिने पदराखाली ब्लाऊजच्या डाव्या बाजूला वरच्या भागात हात घातला आणि रुमाल बाहेर काढला. चेहरा खसाखसा पुसून रुमाल परत आत ठेवला.

‘‘खरं सांगू? मी डॉक्टर व्हावं, असा जो अट्टाहास होता ना पपांचा, त्यामुळेच वाट लागली माझ्या आयुष्याची. ”

ती थोडा वेळ काहीच बोलली नाही. बहुधा शब्दांची जुळवाजुळव करत असावी किंवा कुठून सुरुवात करावी वगैरे… मीही स्वस्थ बसून राहिले.

‘‘तुला आठवतं आरती, अगदी अर्ध्या नाही तर एका मार्कासाठीसुध्दा बाईंशी भांडायचे ते. मी लहानच होते तेव्हा. शिवाय एखादा का होईना, मार्क वाढतोय, म्हटल्यावर मला त्यात काही गैर वाटायचं नाही. अर्थात तुला त्रास होत असेल त्याचा. ”

‘‘हो. मला हातात आलेल्या पहिल्या नंबरवर पाणी सोडावं लागायचं. त्यामुळे तू दुस-या शाळेत गेलीस तेव्हा मला हायसं वाटलं. रागावू नकोस हं, असं बोलले म्हणून. ”

ती हसली.

‘‘त्यांनी माझी शाळा का बदलली माहीत आहे?”

‘‘तुम्ही दुसरीकडे रहायला गेलात म्हणून ना!”

‘‘नाही. एस. एस. सी. ला मेरिटमध्ये यावं म्हणून त्यांनी मला त्या चांगल्या शाळेत घातलं आणि ती शाळा जवळ पडावी म्हणून तिथे घर घेऊन आम्ही शिफ्ट झालो. ”

‘‘बापरे, असं पण असतं?”

‘‘पपांचं होतं. मी एस. एस. सी. ला असताना तर आमचं अख्खं घरच एस. एस. सी. ला असल्यासारखं वाटत होतं. एक तर शाळा, शाळेचा क्लास, शिवाय बाहेरचा क्लास या सगळ्यांचे होमवर्क्स, शाळेच्या टेस्ट सीरिज, बाहेरच्या टेस्ट सीरिज, शिवाय प्रायव्हेट ट्यूशन्स लावायचंही त्यांच्या मनात होतं. पण वेळच नव्हता, त्यामुळे त्यांचा नाइलाज झाला. ”

मेरिट लिस्टमध्ये तिचं नाव वाचल्याचं मला आठवत नव्हतं. तिला विचारू की नको…

‘‘घरातही जेवताना, आंघोळ करताना ते पुस्तकं घेऊन मला वाचून दाखवत असायचे. शेवटी तर मला अभ्यासाचा उबग आला. प्रिलिम चालू असतांना मला कावीळ झाली. एवढा विकनेस आला होता की, शेवटचे दोन पेपर मी धड लिहूही शकले नाही. अर्थात माझा आधीचा रेकॉर्ड बघून टिचर्सनी कन्सिडर केलं, पण पपांचं मात्र धाबं दणाणलं. ”

‘‘येस. आय कॅन इमॅजिन. ”

‘‘मी लवकरात लवकर बरी व्हावी, म्हणून त्यांनी डॉक्टरांना स्ट्रॉंग औषधं द्यायला लावली. माझा अशक्तपणा अजूनच वाढला. तरीही बाकीचा दिनक्रम तसाच चालू होता. त्यांचं आपलं, ‘बस, आता एकच महिना राहिला’, ‘ओन्ली थ्री विक्स. तेवढी कळ सोस. ’, ‘आठच दिवस. मग भरपूर सुट्टी. तू म्हणशील तिथे जाऊ या आपण. ’ चालूच. माझ्या डोक्यावर बसून माझ्याकडून अभ्यास करून घ्यायचे ते. त्यासाठी रजा घेऊन घरी राहिले होते ते. ”

‘‘आणि आई?”

‘‘ममीला तर ते सतत ओरडत रहायचे, ‘तिला कावीळ झाली, त्याला तू जबाबदार आहेस. आता तरी जागी हो. डाएटिशीयनकडून लिहून आणला आहे, अगदी तस्साच डाएट तिला दे. तसूभरही फरक होता कामा नये. ’ आणि मला जरी एखादा पदार्थ आणखी खावासा वाटला, तरी मिळायचा नाही आणि दुसरं काहीतरी नको असलं, तरी ते गिळावं लागायचं. ममी बिचारी माझी समजूत घालायची, ‘थोडेच दिवस चालणार आहे हे. एकदा परीक्षा होऊन जाऊ दे. मग सुट्टीत तुला जे जे आणि जेवढं म्हणून खावंसं वाटेल, ते सगळं करीन मी. ‘ ”

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘पुनर्मृत्यू…’ – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

‘पुनर्मृत्यू…‘ – भाग – १ श्री संभाजी बबन गायके 

एक सैनिक पुनः एकदा मरताना !

(तिचा स्वत:चा हक्काचा माणूस म्हणजे मी जगात नसताना? पाच महिन्यांचे सासर की सव्वीस वर्षे सांभाळलेले माहेर! ती माहेरी गेली यात नवल ते काय?) – इथून पुढे – 

शिवाय आमचे थोड्या थोडक्या वर्षांचे नव्हे तर आठ वर्षांचे प्रेमजीवन होते लग्नाआधी.या आठ वर्षात प्रत्यक्षात भेटी अत्यंत मोजक्या घडलेल्या असल्या तरी दीर्घ संवाद होत असे…या प्रेमात काळाचे भान नसते! आयुष्यभर एकमेकांचे होण्याच्या आणाभाका घेतल्या जातात! अशा स्थितीत एकमेकांत गुंतले जाणे किती साहजिक आहे,याची कल्पना ज्यांनी असे अनुभवले आहे,त्यांनाच येऊ शकेल. अवघ्या चाळीस दिवसांचा सहवास लाभलेल्या हुतात्मा कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या वागदत्त वधूने आज पंचवीस वर्षे उलटून गेली तरी विवाह केलेला नाही,हे तुम्हांला माहित असेलच. कित्येक वीरपत्नी वैवाहिक आयुष्याचं सुख विसरून जाऊन पतीच्या नावासाठी सैन्यात अधिकारी झाल्या आहेत…हे सर्व प्रेमापोटी होतं..आणि ही सर्वोच्च त्याग भावना आहे! सामाजिक व्यवहाराला हे पटो न पटो…आहे ते आहे !

स्मृती मी सियाचीनला ड्यूटी वर निघून गेलो त्यावेळी आमच्या घरापासून दूर असलेल्या एका शहरात राहणा-या माझ्या बहिणीकडे तात्पुरती रहायला गेली होती. तिच्याकडे माझ्या काही चीज वस्तू होत्या…माझे हे असे झालेले…म्हणून तिने माहेरी निघून जाताना त्या वस्तू सोबत नेल्या…माझी आठवण म्हणून. यात गैर ते काय? बरं, माझ्या घरून निघताना ती काही भांडून नव्हती निघालेली…आईला विचारून गेली होती! असो.

खरा दैवदुर्विलास तर इथून सुरू होतो…मी गेल्याला सुमारे वर्ष उलटून गेले होते आणि अर्थातच जनता मला विसरूनही गेली होती. राष्ट्रपतीभवनातील शौर्य पदके वितरणाचा विडीओ वायरल झाला! माझी आई आणि स्मृती यांचे चेहरे पाहून सारा समाज विव्हल झाला! विशेषत: स्मृतीविषयी सा-यांच्याच मनात कणव दाटून आली…आणि हे साहजिकच होते! तिचे दु:ख आभाळाएवढे! आणि माझी आईही हे मान्य करते..ती म्हणते “मी आई म्हणून अंशुमानचा अगदी शेवटपर्यंतचा जीवनप्रवास अनुभवला,यातील आनंद उपभोगला. पण स्मृतीला हे भाग्य खूप अल्पकाळ लाभले!

माझ्या जाण्यानंतर जवळपास वर्ष उलटून गेले होते. स्मृती माहेरी होती. तोवर तिनेही काही विचार करून ठेवला असेल. ती इतकी धीराची आहे की, माहेरी गेल्यानंतर केवळ दहाच दिवसांत ती एका शाळेत शिकवायला जायलाही लागली होती…मनाला बांधून ठेवण्यासाठी! आणि या काळात तिने लष्करी नियमांना अनुसरून काही आर्थिक व्यवहार विषयक कागदोपत्री बदल करूनही घेतले होते. शेवटी तिलाही तिचे आयुष्य पुढे रेटायचे आहेच की! माझ्या वडिलांना त्यांची पेन्शन मिळतेच आणि इतर अनुषंगिक लाभ सुद्धा. त्यामुळे तिच्या आर्थिक व्यवहारांचा आणि वडिलांच्या व्यवहारांचा तसा काही संबंध नव्हता.

मा.राष्ट्रपती महोदयांनी कीर्तीचक्र परंपरेनुसार पत्नी म्हणून स्मृतीच्याच हाती दिले. आई आणि स्मृती यांनी कीर्ती चक्राला हात लावलेला आहे, असा फोटोही काढला गेला. हे कीर्ती चक्र स्मृती माहेरी घेऊन गेली! स्मृती जर सासरीच राहणार असली असती तर कीर्ती चक्र अन्यत्र नेले जाण्याचा प्रश्नच नव्हता. आणि किमान ते प्राप्त झाल्याच्या वेळी तरी स्मृतीने कोणाताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे याबाबत झालेल्या कोणत्याही चर्चांना काही अर्थ नव्हता.

यात माझ्या आई-वडिलांची भूमिकाही विचार विचारात घेण्यासारखी आहे, हे ही खरे आहे. जन्मदात्या आई-वडिलांकडे दिवंगत मुलाला मिळालेले शौर्य पदक असावे की पत्नीकडे असावे, यावर कायदा काहीही निर्णय देऊ शकत नाही. याबाबत वडिलांनी ‘नेक्स्ट ऑफ किन’ चा नियम बदलावा,अशी मागणी सरकारकडे केली आहे. शिवाय मला देण्यात आलेल्या कीर्ती चक्राची आणखी एक प्रतिकृती करावी, आणि ती त्यांना देण्यात यावी. त्याबद्दल संरक्षण खाते विचार करेल तेंव्हा करेल. असो. इथपर्यंत ठीक होते! पण आमच्या कुटुंबाच्या बंद दाराआड गोष्टी चर्चेने ठरवता आल्या असत्या. यात मिडीया कुठून आला? लोकांच्या वक्तव्यातील निवडक वाक्ये अधोरेखित करायची आणि खूप काही झाले आहे,असा आभास निर्माण करायचा प्रयत्न केला जाणे काही नवे नाही. “बहुयें तो घर से भाग जाती हैं!” हे वाक्य त्या वृत्तवाहिनीने उचलून धरले…आणि एका क्षणात स्मृती अनेकांसाठी खलनायिका ठरली! ग्रुप इंश्युरंस स्कीम मधून आलेले एक कोटी रुपये सेनादलाने स्मृती आणि माझे आई-वडील यांच्यात नियमानुसार वाटून दिले! उत्तर प्रदेश सरकारने दिलेले पन्नास लाख रुपयेसुद्धा आई-वडिलांना पस्तीस आणि स्मृतीला पंधरा लाख असे विभागून दिले गेले! दरमहा जी पेन्शन मिळणार आहे, त्यातही नियमानुसार योग्य ती विभागणी होणार आहेच. याबद्दल स्पष्ट काहीही न सांगता काही तथाकथित फुकट-पहारेक-यांनी “स्मृती कीर्ती चक्र आणि सारे पैसे घेऊन माहेरी निघून गेली” अशी आवई उठवली. यातील कीर्ती चक्र घेऊन गेली हे खरेच होते आणि तिच्या हक्काचेही. काही रील्सवाल्यांनी भलत्याच एका महिलेचा विडीओ दाखवून ती स्मृती असल्याचे भासवले आणि पैसे कमावले…लोकांना असे काही तरी बघायचे असतेच! यावर खुद्द सैन्यादलाला पुढे येऊन स्मृतीच्या बाजूने खुलासा करावा लागला!

आणि कहर म्हणजे आजकाल कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या फेसबुक पेजवाल्यांनी,रीलवाल्यांनी मनाला येईल ते लिहिले,दाखवले आणि त्यावर लाखो मूर्खांनी मुक्ताफळे उधळली! नशीब मला त्या सर्व कमेंट्स वाचायला लागल्या नाहीत…! एका नतद्रष्ट माणसाने तर अशी अश्लील टिपण्णी केलीय स्मृतीविषयी की महिला आयोगाला पुढे येऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल करावी लागली!

माझे पालकांचे वर्तन योग्य की स्मृतीचे याचा निर्णय कोणताही कायदा देऊ शकणार नाही. हे सर्व सामोपचाराने घ्यायला पाहिजे..निदान माझा मान राखावा म्हणून तरी! मला स्मृती आणि माझी आई,माझे वडील हे सर्व प्रिय आहेत. माझ्या वडिलांनी त्यांच्या विचारसरणीनुसार गोष्टी मांडल्या,आईने तिच्या मनाने काही गोष्टी मांडल्या…पण निर्णय स्मृतीला घेऊ द्यात…एवढेच मला सांगायचे आहे. यापैकी कुणावरही चिखलफेक झालेली मला पहावणार नाही! कायदा,नियम यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय कुणीही वक्तव्ये करू नका. कीर्ती चक्र कुणाकडेही राहिले तरी ते माझ्या बलिदानासाठी मला दिले गेले आहे,हे विसरता कामा नये. माझ्या आई-वडिलांचा त्याग,दु:ख कशानेही कमी ठरत नाही, आणि स्मृतीच्या वेदनाही मोठ्या आहेत. सर्वशक्तीमान काळ सर्व ठीक करेल.

मिळालेली रक्कम लाटून सासू-सास-यांना वा-यावर सोडून गेलेल्या काही विधवा आहेतच आणि विधवा सुनेला विविध मार्गांनी जगणे नकोसे करणारे सासरकडचे लोकही कमी नाहीत! विधवेच्या पैशांकडे पाहून तिच्याशी विवाह करू पाहणारेही महाभाग आहेतच. स्त्रीचा नवरा गेला म्हणजे ती ‘उपलब्ध’ अशी धारणा बाळगणारे सुद्धा आपल्यातच आहेत. राजस्थानची चुडा प्रथा तर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय व्हावा! एकूणात “हाय अबला! यह तेरी कहानी…आंचल दूध और आंखो में पानी” हे चित्र काही बदलत नाही समाजातले! पण एक चांगली बाब म्हणजे या दोन्ही घटकांना न्याय देण्यासाठी समाजातील काही जाणती मंडळी,संस्था कार्यरत आहेत. सेनेतील अधिका-यांच्या पत्नी AWWA नावाच्या संस्थेच्या माध्यमातून सैनिकांच्या परिवारांच्या कल्याणाचे कार्य करत असतातच. निवृत्तीवेतन,शौर्य गाजवल्याबद्दल दिले जाणारी विशेष रक्कम, सैनिकांच्या विधवा पत्नी,त्यांची अपत्ये,विधवांचे पुनर्विवाह यांतील कायदेशीर गुंतागुंती मोठ्या आहेत. पण आपली न्यायप्रणाली सक्षम आहे…उशीर होऊ शकतो पण न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष कामगिरी करीत असताना प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नीला देय असणारा एक विशेष लाभ, तिने जर त्या सैनिकाच्या धाकट्या भावाशी विवाह केला तरच दिले जाण्याचा एक विचित्र नियम पूर्वी प्रचलित होता. २०१९ मध्ये यात आवश्यक बदल करण्यात आला आहे…बदल व्हायला वेळ लागतो आपल्या व्यवस्थेत! पण सैनिकांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी जनतेच्या मनात प्रचंड आदर,सहानुभूती आहे,हे मी जाणतो! यासाठी खरोखर तळमळीने काम करणा-या व्यक्ती,संस्थाही आहेत. एकच विनंती आहे…अनाधिकाराने कुणीही जीभा उचलून टाळ्याला लावू नका ! या गोष्टी माझ्यासारख्या एकदा मृत्यू पावलेल्या सैनिकाला सतत पुनर्मृत्यू देत राहतात !…मला भारतमातेच्या सेवेसाठी पुनर्जन्म मिळावा…असले सततचे मरण नको ! जय हिंद ! खुश रहना देश के प्यारो…अब हम तो सफर करते है !

भारतमातेचा दिवंगत पुत्र, 

अंशुमन — 

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘पुनर्मृत्यू…’ – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

‘पुनर्मृत्यू…‘ – भाग – १ श्री संभाजी बबन गायके 

एक सैनिक पुनः एकदा मरताना !

(सियाचीनमध्ये शौर्य गाजवल्याबद्दल सैन्यदलातील वैद्यकीय अधिकारी कॅप्टन अंशुमान सिंग यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. हे कीर्ती चक्र त्यांची पत्नी श्रीमती स्मृती यांनी अंशुमानसाहेबांच्या आईना सोबत घेऊन जात  स्वीकारले. त्यानंतर अंशुमान साहेबांच्या पालकांनी सोशल मिडीयामध्ये काही वक्तव्ये केली. त्यावरून श्रीमती स्मृती सिंग यांच्याविरोधात खूप वाईट बोलले,लिहिले गेले. याबद्दल खुद्द अंशुमान साहेबांना काय वाटले असते याची कल्पना करून हा लेख त्यांच्याच भूमिकेत जाऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सकारात्मक विचार आणि कृती व्हावी,ही अपेक्षा.)

नमस्कार, 

मी अंशुमान…कॅप्टन डॉक्टर अंशुमान सिंग..स्मृती अंशुमान सिंग या नावा मधला अंशुमान! काही ठिकाणी अंशुमन असाही उच्चार करतात. या नावाचा अर्थ ‘दीर्घायु असतो’ असा तो! नावाचा आणि प्रत्यक्ष जीवनाचा आणि किंबहुना मरणाचा संबंध असणे केवळ योगायोग! हा योग मला काही साधला नाही!

हे जग सोडून गेल्यावर याच जगात पुन्हा येता येतं…त्याला पुनर्जन्म म्हणतात,असे ऐकलं होतं जिवंत असताना. पण एकदा मरुनही पुन्हा मरता येतं का हो…पुनरपि जननं असे न होता? एकवेळ मेल्यावर पुन्हा त्याच देहात परतणे शक्य असेल पण एकदा पूर्णत: मृत्यू पावल्यानंतर,देहाची दोन मुठी राख झाल्यानंतर पुन्हा एकदा मरणं?..अकल्पनीय..अशक्य!…पण मी हे मरण गेल्या काही दिवसांपासून रोज मरतो आहे!

सेनेचा गणवेश परिधान केल्या क्षणापासून मरण आणि सैनिक यांचा दोस्ताना आरंभ होत असतो. मी काही रायफल हाती घेऊन लढणारा सैनिक नव्हतो. माझं काम होतं जखमी झालेल्या,आजारी झालेल्या सैनिकांवर जीवरक्षण उपचार करणं. हे काम मी एखाद्या सुरक्षित जागी शहरात करत असलो असतो तर मरणाचा विषयच आला नसता मनात. पण सेनेला माझ्या कौशल्याची गरज पडली ती आभाळाला टेकू पाहणा-या बर्फाळ शिखरांवर. येथे राहणा-या प्रत्येकावर काळाची नजर असतेच..असते! प्राणवायू आणि तिथल्या हवेचं फारसं सख्य नाही. तापमान मोजणा-या यंत्राच्या नावातच केवळ ‘ताप’ अर्थात उष्णता दिसते. या यंत्रावरील पारा नावाच्या पदार्थाने ब्रम्हकमल पाहिल्यासारखा सूर्य सठी-समाशीच पाहिलेला असतो. पण आपल्या सैनिकांना तिथे जागता पहारा द्यावाच लागतो…पलीकडे लबाड शेजारी आहेत…कधीही आपल्या सीमा ओलांडून येऊ शकतात! २९,पंजाब बटालियनमध्ये सियाचीन मध्ये माझी आर्मी मेडिकल कोअर मधून डॉक्टर म्हणून नेमणूक झाली होती. आणि मी कॅप्टन होतो.

आता तर सर्व जगाला माहित झाली आहे…माझे आणि स्मृती यांची प्रेमकहाणी. स्मृतीला माझी नोकरी,त्यातील धोके चांगलेच माहीत होते…तसे ते प्रत्येक सैनिक पत्नीला,सैनिक मातेला माहीत असतातच. सैनिकाशी विवाह म्हणजे वैधव्याची कु-हाड सतत डोक्यावर टांगती असल्याची सवय करून घेणे,मुलाला सैन्यात धाडणे म्हणजे पुत्रविरहाचं दु:ख सोसण्याची तयारी ठेवणं! घरी आला तर माणूस आपला. माझे वडीलही सेनेत अधिकारी होते…माझ्या आईनेही हा ताण सोसला आहे. घरातील आम्हां सर्वांना सारे काही माहीत होते…काहीही होऊ शकते! मात्र सर्वांच्या मनात एकच होते…जवानांचे प्राण वाचवणा-या डॉक्टरांना कसे काय काही होऊ शकेल? आणि सियाचीन सारख्या धोकादायक सीमेवर एका सैनिकाला किती दिवस ठेवायचं हे ठरलेलं असतं. तिथला माझाही कार्यकाळ तसा संपत आला होता. त्याच जोरावर स्मृती आणि मी काही स्वप्नं बघण्याचे धाडस केले होते…..आठ वर्षांच्या मैत्रीनंतर लग्नगाठ तर बांधली होतीच…घर,मुलं…आई-वडिलांसह एकत्र कुटुंबात रमणं…अगदी आवाक्यात होती ही दिवसा पाहिलेली स्वप्नं! पण त्या रात्री या स्वप्नातून जीवघेणी जाग आली आणि मी डोळे मिटले!

मी जिवंत असताना कुणा-कुणाचा होतो? आणि आता नेमका कोणाचा उरलो आहे? सेनेत जाण्यापूर्वी आई-बाबांचा लाडका अंशू होतो,धाकट्या भावाचा,बहिणीचा भैय्या होतो. सेनेत गेल्याबरोबर मी तसा पूर्णपणे देशाचा झालो होतो. लग्न झालं नव्हतं तोवर आई-बाबा नेक्स्ट ऑफ कीन होते. (kin म्हणजे रक्ताचा आणि सर्वात जवळचा नातलग) सेनेच्या नियमानुसार सेनादलातील कर्मचा-याचा त्याच्या रीतसर विवाहानंतर अधिकृत Next Of Kin म्हणून पत्नीचे नाव लागते. पत्नी हयात नसेल तर अपत्य. आणि असा नियम करण्यामागे काहीतरी निश्चित विचार झालेला असेलच.

हे सर्व सांगायचे म्हणजे माझे वडील तर सेवानिवृत्त सैन्य-अधिकारीच होते. त्यांना तर हे नियम माहीत होतेच. आणि लग्नानंतर नव्हे तर लग्नाआधी स्मृतीला मी हे सर्व समजावून सांगितले होते. पण तिला बिचारीला तिच्यावर ह्या सर्व बाबी हाताळायची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नसेल!

मी मृत्यूच्या जबड्यात जात असताना मला आई-वडील,भाऊ-बहिण तर दिसलेच…पण जास्त ठळक दिसली ती स्मृती. आई-वडिलांची जिंदगी जागून झालेली होती निम्मी-अधिक. भाऊ स्वत:च्या पायांवर उभा होताच. बहिणीही सुखात होत्या. पण स्मृतीपुढे सर्व आयुष्य आ वासून उभं होतं!

पण माझी खात्री होती सेना माझ्या रक्ताच्या कुणालाच वा-यावर सोडणार नाही. तसेच माझ्याबाबतीतही झाले…लष्करी इतमामात देहावर आपला तिरंगा ध्वज पांघरून चितेपर्यंतचा प्रवास…वीराला साजेसा अंत्यसंस्कार,कुटुंबियांसाठी नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कीर्ती चक्र…शांतताकाळातील दुसरा सर्वोच्च सैन्य-सन्मान! सैनिक रणात जिंकला तर भूमीचा भोग आणि मरण पावला तर स्वर्ग लाभतो,असं म्हणतात!

मी स्वर्गाकडे प्रयाण करणार होतो तोच घरात काही विचार सुरु झाले होते बहुदा. त्या स्वर्गात जाण्याआधी घराचा नरक झालेला नको होता मला. माझा तेरावा विधी पार पडण्याआधी स्मृतीच्या आणि माझ्या घरच्यांनी स्मृतीचे पुढचे आयुष्य कसे असावे, याबद्दल योजना मांडायला सुरुवात केली. खरं तर एवढी घाई करायला नको होती! ओल्या जखमा…त्यावर खपली धरण्याची वाट पहायाला हवी होती..असं वाटून गेलं. भांबावून गेलेली होती स्मृती!

आपल्याकडे अजूनही स्त्री कुणाच्या ना कुणाच्यातरी मालकीची असते..इज्जत,अब्रू,अभिमान असते. स्मृती तिच्या वडिलांची लेक असण्यापेक्षा माझ्या वडिलांची सून जास्त होती आता. माझे वडील म्हणाले…तिच्यापुढे मोठे आयुष्य आहे…आपण ती म्हणेल त्याच्याशी तिचं लग्न लावून देऊ…दोन्ही घरे मिळून तिची पाठवणी करू वाजत-गाजत! आणि ती म्हणत असेल तर तिचं लग्न अंशुमानच्या धाकट्या भावाशी लावून देऊ…तिने लग्नच नाही करायचं आणि सासरीच रहायचं ठरवलं तर माझ्या धाकट्या मुलाला (त्याच्या लग्नानंतर अर्थात) जे अपत्य होईल ते जर मुलगा असेल तर त्याचं नाव अंशुमान ठेवू…त्या मुलाला स्मृतीला दत्तक देऊ आणि त्या मुलाचा बाप म्हणून अंशुमानचे नाव लावू! त्या मुलाच्या नावे सारी जायदाद करून ठेवू! ऐकायला विचित्र वाटलं ना? पण आपल्या देशात असा विचार केला जाणं काही नवं नाही! राजस्थान आणि पंजाब सारख्या राज्यांत विधवा वहिनीशी दिराने लग्न करणं सामान्य बाब आहे. असे शेकडो विवाह आजवर झालेले आहेत. यात त्या विधवेचे कल्याण किती आणि ती त्याच घरात राहिल्याने तिला मिळणा-या आर्थिक लाभांचा हिशेब किती हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात असे व्यवहार सर्वसामान्य सैनिकांच्या विधवांच्या बाबतीत होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कुणा अधिका-याच्या विधवेच्या बाबतीत असे सहसा होत नाही. कारण इथे आर्थिक बाजू तुलनेने बरी असते. शिवाय शिक्षणामुळे विचारांत पुढारलेपण असू शकते.

सेनेतली असली म्हणून काय झालं…शेवटी ती माणसेच असतात. समाजात असणा-या चालीरीती,परंपरा,स्वार्थ,मान-सन्मानाच्या कल्पना आणि सोयीस्करवाद यांनी ती बरबटलेली असतातच. अन्यथा वहिनी म्हणजे दुसरी आईच समजले जाते! हल्ली समाजमाध्यमांत दाखवल्या जाणा-या दीर आणि वहिनी यांच्यातील अनैतिक संबंधांच्या ख-या-खोट्या गोष्टी बाजूला ठेवूयात! राजस्थानात पूर्वी एक प्रथा होती….युद्धाला निघालेल्या पुत्राला आई स्तनपान करवीत असे…या दुधाची लाज राख…मरून ये पण हरून येऊ नकोस! अशी शपथ घालत असे. आई नसेल तर तिच्याजागी वहिनी स्तनपान करवीत असे…भाभी म्हणजे भावाची बायको…भाऊ वडिलांच्या ठिकाणी…अर्थात त्याची बायको दिराची आईच नव्हे का? असो.

अर्थात,मला आणि स्मृतीलाही या परंपरा माहित होत्या. पण हे धर्मसंकट आपल्यावर येऊन आदळेल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती आम्ही कधी! अशावेळी स्मृतीने काय करावे? तिला त्यावेळी सर्वांत जवळचे कोण वाटले असेल….तिचा स्वत:चा हक्काचा माणूस म्हणजे मी जगात नसताना? पाच महिन्यांचे सासर की सव्वीस वर्षे सांभाळलेले माहेर! ती माहेरी गेली यात नवल ते काय?

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘स्मृती’ होऊन जगताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

स्मृती’ होऊन जगताना ! श्री संभाजी बबन गायके 

(ही एक सत्यकथा — सुश्री स्मृति अंशुमन सिंग यांच्या मुलाखतीवर आधारित) 

मी आणि तो…अंशुमन..आम्ही दोघे एकाच इंजिनिअरिंग कॉलेजात होतो. म्हणजे मी चार वर्षे होते आणि तो अगदी काहीच दिवस! त्याला M.B.B.S. साठी प्रवेश मिळाला आणि तो पुण्याला निघून गेला. त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्या काहीच दिवसांत एक मात्र झालं होतं…आमची दृष्टभेट..आणि प्रथमदर्शनी…जीव वेडावला जाणं!

इथून मग एका दूरस्थ प्रेमकथेचा प्रारंभ झाला…एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल अशा! मी दूर इकडे पंजाबात आणि तो पुण्यात. त्याचे ध्येय पक्कं ठरलं होतं..वडिलांसारखी सैन्यात सेवा. हातात रायफल ऐवजी स्टेथोस्कोप एवढाच काय तो फरक असणार. या सर्व घडामोडींत थोडीथोडकी नव्हे चांगली सात-आठ कशी निघून गेली समजलंच नाही. माझा वाढदिवस होता त्यादिवशी. अंशुमन इतक्या दूरवरून काही येऊ शकणार नव्हता. आणि हे समजून घेणं भागच होतं..त्यात माझ्या घरी त्याच्याबद्दल मी तोपर्यंत काहीही कळू दिलं नव्हतं…म्हटलं त्याचं सगळं स्थिरस्थावर होऊ देत आणि माझंही. पण वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता त्याने फोन केला….खिडकी उघडून खाली बघ म्हणाला….भला मोठा पुषगुच्छ घेऊन स्वारी उभी होती! घरचे जागे झाले असते तर मोठा गहजब झाला असता! त्याला तिथून मोठ्या मिनतवारीने घालवला एकदाचा. तर साहेब सकाळी घराच्या दारात उभे! माझ्या बाबांना म्हणतात कसे…काही नाही..इथून चाललो होतो..स्मृती माझी इंजिनिअरिंग कॉलेजमेट आहे..म्हटलं जाता जाता भेटून जावं! काय आहे..पुण्यातून आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज मधून AFMC मधून सहसा सवड होत नाही या बाजूला यायला! 

त्याचा पदवी प्रदान समारंभ झाला…passing out parade! एका सामान्य पण हुशार तरुणाचे एका जबाबदार,रुबाबदार आर्मी मेडिकल ऑफिसर मध्ये रूपांतर झाले होते!

घरी सांगितलं…अक्षता पडल्या! अग्निसाक्षी ठेवून फेऱ्या घेऊन उणेपुरे दोनच महिने झाले असतील नसतील…सैन्याला अंशुमनची सियाचीन येथील एकोणीस हजार फूट उंचीवर असलेल्या सैन्यतळावर गरज भासली. निरोप द्यावाच लागला. पण तिथून बोलता मात्र येत होतं तसं नियमित. अठरा जुलै २०२३ च्या रात्री आम्ही असेच दीर्घ बोललो…आम्ही नवं घर बांधणार होतो… बाळ तर पाहिजेच होतं आम्हांला..आमच्या आयुष्याला एक नवं परिमाण मिळवून देणारं! पहाटे अंशुमन साहेबांनी फोन बंद केला गुड नाईट म्हणून..खरं तर त्यावेळी गुड मॉर्निंग झालेली होती!

सकाळी सकाळी घरातला फोन खणखणला…सियाचीन बेस वरून call होता. तिथल्या दारूगोळा असलेल्या ठिकाणी अपघाताने मोठी आग लागली होती. फायबर ग्लास पासून बनवलेल्या निवा-यात झोपलेल्या सहा सैनिकांची डॉक्टर अंशुमन सिंग साहेबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केली! पण…साहेब जखमी झालेत! औषध भांडार असलेल्या कक्षाला आगीने वेढले होते. तिथल्या परिस्थितीमध्ये ती खरी जीवनावश्यक औषधे होती..कारण एकोणीस हजार फूट उंची…काहीही पोहोचवायचे म्हणजे मोठे आव्हानच असते. म्हणून साहेब त्या कक्षात घुसले…औषधे,वैद्यकीय उपकरणे बाहेर काढण्यासाठी. पण फायबर ग्लास आधीच ज्वालाग्राही त्यात आग लागून काही वेळ झालेला होता. ज्वाळांनी अंशुमन सिंग साहेबांना आपल्या कवेत घ्यायला उशीर लावला नाही! 

सासरे तिथे वारंवार संपर्क साधून होते…शेवटी नको ती खबर मिळाली… कॅप्टन डॉक्टर अंशुमन सिंग यांनी असामान्य धैर्य दाखवताना वीरगती प्राप्त केली!

वर्ष होईल माझं स्वप्न अग्नीत जळून राख झालं त्या घटनेला… पण धग अजूनही जाणवतेय आणि ती काही कमी होईल,असं वाटत नाही कधीच! 

अंशुमन साहेबांना मरणोत्तर दिले जाणार असलेले शौर्य पदक काल राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते स्वीकारायला गेले होते…सासूबाई होत्या सोबत. त्यांचे आणि माझे दुःख सारखेच! माझं कुंकू आणि त्यांचा कुलदीपक एकाच वेळी जगाच्या क्षितिजाच्या पल्याड जाऊन दिसेनासे झाले! आता फक्त  ‘ स्मृती ‘ शिल्लक आहे!

साहेबांच्या शौर्याचे वर्णन केले जात होते..त्यामुळे तो न पाहिलेला पण मनाने कित्येकवेळा अनुभवलेला प्रसंग मी पुन्हा जगले! राष्ट्रपती महोदयांनी खांद्यावर हलकेच थोपटले…त्या स्पर्शात पती आणि पुत्र विरहाचे दुःख अनुभवलेला दिलासा होता! आज त्यांनी माझ्यासारख्या दुसऱ्याही वीरमाता,विरपत्नी, पित्यांना दिलासा दिला!वेदनांना अंत नसतो! देशाच्या रक्षणार्थ प्राण दिलेल्या लोकांच्या वेदना तर अमर असतात…त्यांच्या पराक्रमासारख्या!

देश अंशुमन साहेबांना खरं तर विसरूनही गेला होता…माझा चेहरा देशवासीयांना त्यांच्या स्मृती जागवणारा ठरला बहुदा !

काही नाही…एकच मागणे आहे…हा देश सुरक्षित आहे कारण अंशुमन सिंग साहेबांसारखे वीर इथे जन्मतात! माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मागे भारतीय सेना भक्कम उभी आहेच…तुमच्याही शुभेच्छा असू द्यात ! जय हिंद !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विठाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ विठाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(चार दिवसांनी विठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली. आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलावून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती.) – इथून पुढे

” काय हे विठाई, लहान व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवणं शोभून दिसतं का?

“वैनीवाय, तुमी माका परत हाडलात, नायतर मी वर गेललंय यमाच्या राज्यात ‘

“अस बोलू नकोस विठाई, एकमेकांसाठी करावंच लागतं ‘ तू माझ्यासाठी एक कर, उद्या राधेला येताना घेऊन ये तिला मी शाळेत घालणार ‘

” होय वहिनी बाय तेवढा तर जरा करा, आमच्या सारख्या अडाणी रवाने नको तेका ‘.

मी राधेचं नाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. राधेला दोन फ्रॉक, पेटीकोट, पुस्तके, वही घेतली, राधा शिकू लागली.

आमच्या तिघांच्या सुखी आनंदी संसाराला दृष्ट लागायची वेळ होती. खूप दिवसापासून माझे पती पोटात दुखण्याची तक्रार सांगत होते. त्या काळात छोट्या गावात मोठे डॉक्टर नव्हते. आधुनिक सोयी नव्हत्या. डॉक्टर पोटदुखीच्या गोळ्या देत होते, त्या गोळ्या हे घेत होते. एक दिवस सकाळी हे उठले तो त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. मी घाबरले, मुलगा माझा लहान. मी त्याला डॉक्टर नाडकर्णी कडे पाठविले, डॉक्टर आले, त्यांनी यांची परिस्थिती बघून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचे ठरवले. सिव्हिल सर्जनी अंदाज घेऊन तातडीने ऑपरेशन करायचे ठरवले. त्यांच्या अंदाजाने आठ ते 10 रक्ताच्या बाटल्यांची गरज होती. छोट्या शहरांमध्ये रक्ताच्या बाटल्या मिळणे  अशक्य होते. फक्त ओळखीच्या माणसांकडून रक्तदान करून बाटल्या जमवणे एवढेच शक्य होत, माझ्या नवऱ्याचा रक्तगट क्वचित मिळणारा होता. मग त्या रक्तगटाची रक्त मिळवायला धडपड सुरू झाली. त्यांच्या बँकेतले सर्व कर्मचारी इकडे तिकडे धावत होते. कशीबशी दोन-तीन बाटल्यांची सोय झाली. अजूनही रक्ताची गरज होती. माझा रक्तगट पॉझिटिव्ह, तर यांचा निगेटिव्ह.

दोन दिवस चाललेली माझी धावपळ विठाई पाहत होती. एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलेली असताना ती दारात बसूनच राहिली. मी घरी आल्यावर ती मला विचारायला लागली  ” दादाक काय झाला?’

“त्यांना रक्ताची गरज आहे, योग्य रक्त मिळालं की मग ऑपरेशन करायचं आहे ‘

पन रक्त गावातला खय?

” असं मिळत नाही कुणाच्यातरी अंगातून रक्त काढावे लागत ‘

” मग माझ्या अंगातून रक्त काढा ना, नायतर तेचो काय उपयोग आसा माका, माजो दादा बरो होऊक हवंयो ‘

” पण रक्तगट जमावा लागतो ना,’

” मग जमून टाका, पन बघा हा मजा रक्त तुमका चालत तर, मी खालच्या जातीचा ‘

“नाही ग विठाई, जातीचा वगैरे काही प्रश्न नाही. पण रक्तगट जमायला पाहिजे ना ‘

माझ्या मनात आले बघावा प्रयत्न करून. मी तिला सिव्हिल मध्ये घेऊन गेले. तिचा रक्तगट तपासला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या नवऱ्याचाच रक्तगट तो होता. मी विठाईला म्हणाले ” तुझं रक्त तुझ्या दादांना चालेल, तुझं रक्त थोडं घेतलं तर चालेल का?

ह्या काय इचारतास वैनीवाय, माजो जीव व्हयो तरी मी देन दादासाठी ‘

मी आवेगाने तिचा हात पकडला, “नको ग विठाई, तुझा जीव नको फक्त थोडा रक्त हवं ‘.

डॉक्टरनी तिच्या शरीरातून तीन चार बाटल्या काढल्या आणि त्या माझ्या नवऱ्याला चढवल्या. आपल्या शरीरातून रक्त काढत असताना विठाई मोठ्या कौतुकाने बघत होती. आणि त्या बाटल्या आपल्या दादासाठी म्हणून तिला मोठा आनंद झाला.

राधे शाळेत जात होती, आपल्या आजीकडे पण लक्ष देत होती. विठाईचेरस्ता झाडणे सुरु होते.

माझ्या नवऱ्याची मग कोल्हापूरला बदली झाली. मी तिला आम्ही आता कोल्हापुरात जाणार असे सांगितले.

“जावा वैनीवाय, नातवाचो मोठो अभ्यास असतलो, भायर गेल्या शिवाय दादा मोठो होऊचो नाय ‘ डोळे पुसत विठाई बोलत होती.

आम्ही जाणार त्या दिवशी विठाई पहाटेपासून हजर होती, आमच्या ट्रक चा रस्ता परत परत झाडत होती कोणी विचारले तर म्हणत होती “माजी वैनीवाय, दादा आणि नातू या रस्त्याने जातले, तेंच्या साठी झाडून ठेवताय’. शेवटी आम्ही निघालोच, रस्त्याच्या पलीकडे विठाई पदराने डोळे पुसत उभी होती, राधे उभी  होती. मी तिच्याकडे गेले आणि तिला मिठीच मारली, ” विठाई, तुला विसरण शक्य नाही, मी परत येईन तेव्हा तुला आमच्याकडे घेऊन जाईल ‘ आमचा ट्रक सुटला, लांब लांब हात हलवणारी विठाई लहान लहान होत गेली.

आम्ही कोल्हापुरात आलो, रवीचं कॉलेज सुरू झालं, यांना बँकेत प्रमोशन मिळालं, आता जास्त जबाबदारी आल्या. मी विठाईला परत येईल म्हटलं तरी मला ते शक्य झालं नाही. पण आता राधे पत्र लिहीत होती. मी पण तिला कार्ड लिहून विठाईची चवकशी करत होते.

राधे एसएससी झाली आणि तिने डीएड ला ऍडमिशन घेतल्याचे कळले, परत विठाई एकटी झाली, दिवस भराभर जात होते, आमचा रवी ग्रॅज्युएट होऊन इन्शुरन्स कंपनीत नोकरीला लागला. त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी त्याने लग्न ठरवलं.

आमची लग्नाची घाई सुरू झाली, या लग्नाला मात्र  विठाईला आणायचेच असे मी मनोमन ठरबिले. पत्रिका छापून झाल्या, मी यांना म्हटले एकदा जाऊन विठाई ला घेऊन या.

हे गाडी घेऊन मुद्दाम विठाई ला आणायला गेले, एक रात्र आपल्या मित्राकडे राहून दुसऱ्या दिवशी परत आले. मी विठाईची वाट बघत होते . पण हे एकटेच आले. मी विठाईची चौकशी केली तेंव्हा हें म्हणाले “ती फार आजारी आहें, अंथरुणाला खिळून आहें, राधी अधून मधून येते, पण तिचे शेवटचे दिवस राहिलेत. तशाही अवस्थेत तिने मला ओळखले आणि हें माझ्या हातावर ठेवले ” माझ्या नातवा साठी ‘अस म्हणून रडू लागली, मी त्या वस्तूकडे पाहिले, ते चांदीचे निरंजन होते, हें तिला कोणी दिले, हें मला कळेना. 

मी ठरवले, लग्न झाले की जाऊन यायचे, शेवटचं डोळे भरून विठाई ला पाहयचे.

लग्न झाले, पाठोपाठ सत्यनारायण झाला, मग रवी आणि कविता पांचगणीला गेले, ते शनिवारी येणार होते, मी यांना सांगितलं होत, रवी आला म्हणजे आपण त्याला आणि कविताला घेऊन विठाई ला नमस्कार करून येऊया.

शनिवारी राधेचे कार्ड आले, विठाई गेली, नातवंच्या लग्नाची तारीख विचारत होती, लग्न झाले असणार ते तिला कळले आणि दुसऱ्या दिवशी ती गेली.

आमच्या संस्थान च्या राजाने लग्नाच्या पंचवीस वर्षे झाली म्हणून सर्व आंबेडकर नगर मध्ये चांदीचा रुपया वाटलं होता, विठाईने मला पाठवून त्याचे निरंजन करुंन ठेवले, नातवंच्या ( रवी ) च्या लग्नासाठी. तेंच निरंजन दादा आले तेंव्हा तिने रवी साठी पाठविले ‘

माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलंय होत्या, शेवटी माझी विठाई मला भेटली नाहीच, मी माझ्या संसारात एवढी मग्न झाले की माझ्या नवऱ्यला रक्त देणाऱ्या विठाईला विसरले.

खूप दिवसांनी मी सावरले. आता रोज संध्याकाळी ते चांदीचे निरंजन मी देवाकडे लावते, तेव्हा विठाई मला भेटल्याचे समाधान मिळते 

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विठाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ विठाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

कोकणातला धुवाधार पाऊस, मी जेवण करण्याच्या गडबडीत होते, मुलगा रवी सकाळी सातलाच शाळेत गेलेला, हे बँकेसाठी साडेनऊला निघत, जाताना यांना डबा द्यायला लागे. माझे दोन्ही स्टो पेटत होते. एका स्टो वर भाजी शिजत होती, दुसऱ्यावर तवा ठेवून मी चपाती लाटून भाजत होते. एवढ्यात यांचा बाहेरून आवाज आला  ” अगं ये ये, आत ये ‘. मी बाहेरचा कानोसा घेतला. यांनी दरवाजा उघडला होता आणि कुणाला तरी आत बोलवत होते. मग माझ्याकडे वळून म्हणाले  ” हिच्यासाठी चहा टाक थोडा ‘. माझी जेवणाची घाई, त्यात यांचे म्हणणे चहा टाक  ” आत्ता मी चहा टाकणार नाही माझी जेवणाची घाई चालली आहे ‘.

” अग ती पावसात पूर्ण भिजली आहे कुडकुडते बिचारी ‘.

” कोण असं म्हणत मी बाहेर आले. पाहते तर एक झाडू घेतलेली म्हातारी बाई बाहेर कुडकुडत होती. त्या कुडकुडणाऱ्या बाईला पाहून मला पण तिची दया आली.

” भिजलीस ग बाई तू, ये आत ये, चहा टाकते तुझ्यासाठी ‘ म्हणून मी स्वयंपाक घरात आले आणि चहाचे आधन ठेवले. चहा तयार केला आणि बरोबर एक कप बशी घेऊन मी बाहेर आले. चहा कपात ओतला आणि तिला द्यायला गेले.

” वहिनीनू, दुसरो फुटको कप देवा, तुमच्या कपातून माका देव नको, मी खालच्या जातीचा गे माय,’

मी म्हंटल ” अगं असं आम्ही काही मानत नाही, वरची जात खालची जात असं काही नसतं. घे तू चहा ‘

” नको वैनीबाय, तुमच्या शेरात चलता आसात, आमच्या गावांनी असला चालचा नाय, तू आपलो फुटको कप हाड बघू ‘

” आता तुझ्यासाठी फुटका कप कुठून आणू? 

हे म्हणेपर्यंत ती कुठून तरी एक करवंटी घेऊन आली.

“ह्याच्यात घाला चाय ‘ती म्हणाली. मी तिच्या कपात चहा ओतला आणि बरोबर दोन बटर खायला दिले.

” एवढ्या पावसात इकडे काय करतेस ग, भिजली आहे संपूर्ण ‘

मी म्हणाले.

“रस्ते, पानांदी झाडायचं काम माझा, गेली वीस वरसा करतय, तेंच माका थोडे पैसे गावातत ‘.

” बरं बरं, आत्ता माझी घाई आहे, उद्या ये अशीच चहा घ्यायला ‘. असं म्हणून मी घरात गेले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्ता झाडायचा आवाज आला, मी अंदाजाने ओळखले आता ती कालची बाई परत येणार, मी स्टो वर चहा ठेवला, आमच्याकडे फुटक्या कानाचा कप नव्हता, आणि ती आमच्या कपातून चहा घेणार नव्हती, म्हणून मी एक चांगल्या कपाचा कान फोडला आणि तसा कप तयार ठेवला.

दारावर टकटक झाली तसे मी दार उघडले. काल ओळख झालेलीच होती. मुलगा रवी सकाळी शाळेत गेला होता. नवरा बँकेत गेला होता, आता मी गप्पा मारायला मोकळी होते.

मी फुटक्या कानाच्या कपातून गरम गरम चहा ओतला आणि अर्धी भाकरी सोबत दिला. तिने पटपट चहा प्यायला  आणि भाकरी पदराला बांधून घेतली.

” भाकरी बांधून घेतलीस कुणासाठी ग?

“माजी नात आसा पाच वर्षाचा, तेका ‘.” घरी कोण कोण असतं ग तुझ्या?

“माझो झील आणि नात ‘

“आणि सून ‘

सून मेली गेल्या साली, झिलाचो काय उपेग नाय, ढोल वाजवता देवळात पन आखों दिवस दारू, दारू पिऊन माका आणि नातीक मारता ‘.

” अरेरे, काय नाव नातीचं? मी विचारलं.

” राधे, असा पाच सहा वर्षाचा .

” आणि तुझं नाव काय ग मी विचारायलाच विसरले ‘

“माका इठा म्हणटत ‘

हा म्हणजे विठा असणार ‘ मी म्हणाले

” तुझ्या नातीला घेऊन ये एकदा, विठाई ‘.

“काय झ्याक हाक मारल्यात माका, विठाई. अशी हाक कोणीच मारुक नाय ‘

आणि विठाई रोज येऊ लागली, रस्ता झाडता झाडता आमच्या पानंदीत आली की माझा नवरा मला सांगायचा “तुझी विठाई येतेय, चहा तयार ठेव ‘.

एकदा मी घरात शेंगदाणे भाजत होते, तेव्हाच विठाई चहासाठी आली होती. मी तिला चहा आणि बटर घेऊन गेले.  तर म्हणाली” वैनी बाय, वास बरो येता, काय भाजतंस? माका थोडे दी गे खाऊक ‘

मी तिला भाजलेले शेंगदाणे दिले, तिने ते पदराच्या शेवटला बांधून घेतले.

“वैनीवाय, आता रस्तो झाडताना एक एक दानो तोंडात टाकीन ‘.विठाई मला म्हणायची वैनी बाय, माझ्या नवऱ्यला दादा आणि माझ्या मुलाला नातू किंवा नातवा.

काजूचा मोसम सुरू झाला की विठाई माझ्या मुलासाठी ओले काजूगर आणायची, ते काजूगरसोलताना   तिचे हात कुजून जायचे. मी तिला म्हणायचे ” विठाई, काजू सोलून तुझे हात कुजून गेले, तू असे सोडू नकोस त्याऐवजी मी सुरीने ते कापते,’

विठाई म्हणायची ” वैनी बाय, काजूची फका सूर्यन कापूची नसतत, ती हातानं चिरुची असतांत ‘

रोज घरी येणारी विठाई दोन दिवस आली नाही, रस्ता झाडायला तिच्या ऐवजी एक दुसरीच बाई दिसली, तिच्याकडे मी विठाईची चौकशी केली. ती म्हणाली विठाईला ताप येतोय, घरी झोपून आहें.’

हे बँकेत निघताच मी भर उन्हात आंबेडकर नगरच्या दिशेने चालू लागले. अंदाजे दोन किलोमीटर चालल्या नंतर आंबेडकर नगर लागले. मी विठाईची चौकशी केली आणि तिच्या झोपडीत पोहोचले. तिच्या बाजूला तिची नात बसून होती. मी राधेला विचारलं  ” केव्हापासून येतोय ग ताप?

” चार दिवस झाले बाई, थंडी वाजून ताप येतोय, दोन दिवस अंगावर काढले, कालपासून अगदी जमीना तेव्हा झोपली आहे ‘

मी विठाईच्या अंगाला हात लावून पाहिले, शरीर तापले होते. मी राधेला बरोबर घेतले आणि तिथून जवळच असणारे आमचे ओळखीचे डॉक्टर नाडकर्णी यांच्या दवाखान्यात गेले. डॉक्टर ना विनंती केली की तुम्ही आंबेडकर नगर मध्ये येऊन विठाईला तपासावे. डॉक्टर माझ्या नवऱ्याचे मित्रच. मी दवाखान्यात गेले म्हटल्यावर ते त्वरित माझ्याबरोबर आले. त्यानी विठाईला तपासले आणि मलेरियाचा संशय व्यक्त केला. आपल्या जवळील थोडी औषधे दिली दुकानातून आणायला लिहून दिली. मी राधेला घेऊन तळ्यापलीकडे असलेल्या औषध दुकानात चालत चालत गेले. तेथे ती औषधे विकत घेतली आणि परत आंबेडकर नगर मध्ये आले. राधेला औषधे कशी द्यायची हे व्यवस्थित समजावले. डॉक्टर नाडकर्णी रोज येऊन एक इंजेक्शन देणार होते.

चार दिवसांनी विठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली. आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलावून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‼ सर सुखाची ‼ ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ ‼ सर सुखाची ‼ ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

झोपलेल्या छोटूचा पापा घेत ती वळत त्याला म्हणाली, “फार समजायला लागलं आहे ह्याला, आता मला म्हणतो, इतरांसारखे मला आजी आजोबा का नाहीत दोन्ही कडचे? तिच्या वाक्याने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. “अहो मी काय म्हणते?” तो लाडीकपणे डोळे पुसत तिला म्हणाला, काय म्हणता राणी सरकार? लग्न झालं तसं तो प्रेमाने तिला राणी सरकारच म्हणायचा. 

“माझ्या हृदयावर राज्य करणारी तू आणि माझं आयुष्य विविध भावनांचे पैलू हळुवार हाताळून योग्य रंग भरणारी राणीच आहेस तू म्हणुन हि हाक. त्याच्या त्या वाक्याने हसत ती त्याचा हातात हात घेत म्हणाली, आज कायरा कडे हळदी कुंकू होतं तर गेले होते कायराच्या सासुबाई आणि त्यांच्या मावस चुलत बहिणी पण आलेल्या होत्या, कुणी सवाष्ण तर कोणी विधवा देखिल. पण सगळ्या अगदी प्रेमळ होत्या. 

कायराने सगळ्यांना ओळख करून दिली आणि तिच्या सासूबाईंनी तर भरभरून कौतुक केलं माझं. पण सहजच निघालं त्यांच्या तोंडुन, माहेर नाही बिचारीला आपल्या सारखीच पोरकी आहे. मला त्यांनी पोरकी म्हणण्यापेक्षा आपल्या सारखी ह्या शब्दाच दुःख झालं, कारण मी तर अगदी बालपणीच पोरकी झाले, त्यामुळे माझ्या ह्या पोरके पणाची तयारी फार लवकर झाली रे. त्यामुळे माहेरचे जे क्षण वाट्यालाच आले नाही ते गमावल्याचं दुःख असलं तर ते मिस होतात. ह्याचं फार काही वाटत नाही पण त्या सगळ्या बहिणी मात्र नंतर किती वेळ माहेरच्या वेगवेगळ्या आठवणी सांगत होत्या. आज म्हातारपण आलं तरी माहेर हरवल्याच दुःख होतच कुठे तरी. प्रत्येकीचा आठवणींचा साठा अप्रतिम आहे.” त्याने बरीच वर्षे अनाथ आश्रमात राहिलेल्या आपल्या बायकोचा हात थोपटला म्हणाला, मग काय म्हणायचं आहे तुला? ती म्हणाली, नाहीतरी तू मला म्हणतोस रिकामी राहू नको. पैश्या साठी नाही किमान स्वतःच्या आनंदासाठी काहितरी कर, मग मला मार्ग सापडला. बस तुझी साथ पाहिजे.

“अग काय कल्पना आहे ते तर सांग.” ती उठुन केस विंचरत आरश्या समोर बसली. मला वाटतंय आपल्या खालच्या हॉल मध्ये आपण हरवलेलं माहेर हा पाच दिवसांचा इव्हेंट सुरू करावा. बऱ्याचश्या बायकांचे माहेर हरवले आहेत रे. कुणाचे वयोमानाने हरवले तर कुणाचे प्रॉपर्टीमुळे दुरावलेले. कुणाचे खुप दूरआहेत की जाणं शक्य नाही. कुणाचे वादातून, मनामनातून हरवलेले. मला वाटतं त्यांना जूनं आठवणीतलं माहेर जगता यावं ह्या कालच्या ग्रुपचा हा प्रयोग जमला तर अशी हरवलेल्या माहेरची निवासी शिबीर घ्यायची. त्यांच्या माहेर कडचे ते पदार्थ, तसं वातवरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू.

तो आता तिच्या मागे येऊन उभा राहिला. आरश्यात तिला बघत म्हणाला, ग्रेट आयडिया आहे, करून बघू. मलाही मदत सांग. पैश्याची तर करणारच. पण कष्टाची असेल तर ती हि, कारण आई गेली तेव्हा कळतं वय होतं माझं. आई नेहमी माहेरी जाताना खुप आनंदी असायची. बघू यात बायकांचे माहेरपण उपभोगलेले चेहरे हाच आपला नफा असेल. ती उठून त्याच्याकडे वळाली. त्याचा हात पोटावर घेत म्हणाली, “हो, आणि येणार हे बाळ. जर मुलगी असेल तर तिचं माहेरपण करण्याचा आपल्या छोटुवर संस्कार असेल. छोटू निवांत झोपला होता.” हळुहळु कल्पना सगळ्यांपर्यंत पोहचून माहेरी येण्याचा तो दिवस उगवला. सकाळपासुन नाव नोंदवलेल्या माहेरवाशिनींना फोन सुरू झाले. चला येताय ना माहेरच्या अंगणात. चिवचिव करणाऱ्या चिमण्यांची अंगण वाट बघतंय. तसा लगबगीने पलीकडुन उत्साही आवाज, “हो हो निघेतोच आहे.”

जुनी पितळी भांडी, शेणाचे सारवण, देवघर त्यात. हसरी रुख्मिणी. तुळशी वृन्दावन. झोपाळा, बाजा अश्या अनेक जुन्या वस्तूंनी वास्तू सजली होती. माहेरवाशिणी लवकर घरी याव्या म्हणुन फुलपात्र दारात पालथे घातले होते. ती डोळ्यात प्रेमाचा ओलावा आणि हातात भाकर तुकडा घेऊन उभी राहिली. एक एक करत माहेरवाशिणी माहेरात यायला लागल्या. सगळं वातावरण बघून भारावल्या. चहापाणी झालं. गप्पांचे फड रंगले. जेवणाची आयती ताटं हातात आली. लोळणं झालं. तिन्ही सांजेला दिवा लागला. परत गप्पा खिचडी लोणच्याचा बेत झाला. त्याच हॉलमध्ये कोणी कोणाची आई, बहिण, मैत्रीण झालं. हरवलेलं खुप काही सापडल्या सारखं वाटलं. अंगणातल्या ओसरीवर रात्रभर चालणाऱ्या गप्पा रंगल्या. पहाटेची भूपाळी. छोट्याश्या रुख्मिणीला आरती झाली. माहेरवशींनीना तेल मसाज, नाहू माखू घालणं झालं. सेवेत ठेवलेल्या काम करणाऱ्या बायका पण ह्या नव्या संकल्पनेला उभारी देत  होत्या.

कालपेक्षा आज माहेरवाशिणी आनंदी, उत्साही दिसत होत्या. दुपारी जेवणानंतर शिबिरात आठवणी नावाचं चर्चासत्र भरलं. माहेरच्या आठवणींनी सगळ्यांचे कंठ दाटून येत होते. वेगवेगळ्या वयोगटाच्या ह्या बायका माहेर ह्या विषयावर अगदी भरभरून बोलत, रडत, हसत होत्या. शेवटी उठलेल्या ८० वर्षाच्या आजीने तर सगळ्यांनाच रडवलं. आजी म्हणाली, “आज नाती माहेरपणाला येतात तेव्हाही माझा जीव त्या घरात येई पर्यंत टांगणीला लागतो. माझ्यासाठी माझी आजी अशीच वाट बघायची.

आता मी माझ्या नातीची वाट बघते. बायकांनो माहेर आयुष्यातलं असं ठिकाण जे थंडगार सावली देतं. ती काही काळच असली तरी त्या सावलीची आठवण आयुष्यभर मनात गार झुळूक निर्माण करणारी असते. बऱ्याच वेळा परिस्थतीने ती सावली हरवते. मग आपण एकटे पडतो, रुक्ष व्हायला लागतो. पण आपल्यातला ओलावा जपण्याचं ती सावली, आयुष्यात परत देण्याचं काम ह्या शिबिराने केलंय. मला वाटतं ह्या शिबिराला नावच द्यावं ‘सर सुखाची’. हि माहेरपणाची हरवलेली सर ह्या शिबिरामुळे परत मायेने अंगावर पडली आणि त्या शिडकाव्याने हि हरवलेली माहेरवाशीण ओल्या मातीच्या सुगंधा सारखी मोहरून गेलीये. तिला असंच आनंदाने बहरू दिल्या बद्दल संयोजकांचे आभार. आजीने थरथरते हात जोडले आणि पदराने डोळे टिपले, तेव्हा सगळा हॉल रडत होता. तिने पटकन वाकून आजीला नमस्कार केला. “हे शिबीर असंच आनंद वाटण्यासाठी भरभरून चालत राहो हा आशीर्वाद द्या आजी.” आजी म्हणाली, “तुलाही माहेर नाही असं कळलं. आता जरा माझ्याकडे ये दोन दिवस माहेरपणाला.” आजी सोबत बऱ्याच जणींनी तिला माहेरपणाला बोलवलं. एक माहेर घडवताना तिने स्वतःच्या लेकरांसाठी अनेक आजोळ उभे केले. 

शिबिराच्या शेवटच्या दिवशी हॉलच्या भिंती रुक्मिणीचा चेहरा, गाभाऱ्यातली समई, सगळंच उदास झालं. अंगण ओकंबोकं वाटायला लागलं. सगळ्या माहेरवाशिणी आपल्या माहेरचा खाऊ, छोटयाशा डबीत लोणचं, थोडे पापड, खरोड्या, मेतकूट आणि ब्लाउजपीस ओटी, लाडूविडा घेऊन जड अंतःकरणाने निघाल्या. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची सर प्रत्येक जण पुसत होतं. आजी मात्र परत म्हणाल्या, “हि सर सुखाची, स्वप्नातल्या माहेरपणाची.” ती म्हणाली सगळ्यांना, “वर्षातून एकदा यायचं आहे माहेरी. अंगावर घ्यायच्या आहेत माहेरपणाच्या सरी.” सगळ्यांनी टाळ्यांनी आनंद व्यक्त केला आणि हळूहळू अंगण सुनं झालं. त्याने येऊन तिची पाठ थोपटली. एक माहेर जोडताना अनेक माहेर जोडले. माणसं जोडायला जमलं, आणखी काय पाहीजे आपल्याला संसारात. चला आपल्या सासर वजा माहेरच्या अंगणात.. हसत दोघांनी रिकाम्या हॉलचे दार ओढून घेतले. तेव्हा गाभाऱ्यातल्या रुख्मिणीने डोळे पुसले आणि पुटपुटली, “गेल्या बिचाऱ्या माहेरवाशिणी. येत राहू दे नेहमी अश्याच.” लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, बहिणाबाईंनी लिहिलंय ते अगदी खरं. 

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोलकरीण… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ मोलकरीण… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे  

(हे सगळे भयानक होते. संताप आणणारे होते. परंतू कोणाला काही करता येत नव्हते.) – इथून पुढे 

हळूहळू निर्मलालाही या गोष्टीची सवय होऊ लागली. तिला पैसाही चांगला मिळायला लागला. घरखर्चही आपोआप चालायला लागला. मग तिच्या राहणीमानही लागलीच बदलायला लागले…

कामावर येताना ती नेहमीसारखी साडी नेसून साधेपणाने यायची परंतू संध्याकाळी बाहेर ड्रेस वर फिरायची. एक-दोन वेळा तिला मी रस्त्यांना ड्रेसवर पाहिले व तिच्यातला बदल माझ्या लक्षात आला. काही गोष्टीही कानावर आल्या. मग मी ताबडतोब आईला तिला कामावरून काढण्याबद्दल सांगितले. आई सुद्धा तातडीने तिला कामावरून काढण्याचा निर्णय घेणार होती परंतू त्यापूर्वीच तिने सगळी कामे अचानक बंद केली आणि नको त्या घाणेरड्या कामात स्वतःला झोकून दिले…! ज्यातून ती कधीच बाहेर पडणार नव्हती ! तिचे काय होणार हे कदाचित तिलाही माहीत नसाव. किंवा सर्वकाही कळत असूनही तिने ते पत्करले असावे. 

निर्मलाच्या बाबतीत जे काही घडले ते भयानक होते मन त्याचा कधी स्वीकार करीत नव्हतं. नुसतं आठवलं तरी काळजाला घरे पडत होती! 

पण म्हणतात ना जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं तसेच झाले होते. निर्मलाच्या जाण्यामुळे सुरेखाची आमच्या घरी काम करण्याची इच्छा पूर्ण झाली होती.  सुरेखा सुद्धा एका गरीब साधारण तीशीतली होती. तिचा नवरा व संपूर्ण कुटुंब तिच्या सोबत होते. नवरा भाजीपाल्याची गाडी सांभाळायचा तर सुरेखा सकाळी चार घरची धुणं -भांडी करायची व संध्याकाळच्या वेळी भाजीची गाडी चालवून नवऱ्याला दारू प्यायला मोकळीक द्यायची…

आमची भाजीला जाण्यामुळेच तर तिच्याशी ओळख झाली होती.

आईच्या ती खूप मागे लागायची मला कामावर घ्या म्हणून एकासारखी विनवणी करायची परंतु आमच्या घरी निर्मला आधीच काम करत होती. निर्मला गेली की मला कामावर घ्या असेही तिने आईला अनेकदा सुचवले होते.

सुरेखा दिसायला निर्मला पेक्षाही सुंदर होती. रंगाने गोरी होती.  संसार चालवण्याची तिची धडपड व कसरत पाहून आम्हाला पण तिच्याविषयी आदर वाटायचा. तिला माणुसकी पण खूप होती. गिर्हाईकांना भाजी उदारपादार द्यायची. मिळेल तेवढ्यात समाधानी असायची.सचोटीने काम करायची.नवरा त्यातलं अर्ध पिण्यात घालवायचा पण तरी ती आनंदी असायची अन तिच्या दोन लेकरांनाही आनंदी ठेवायची.तिच्या अंगावर पातळ अगदी साधंसुधं असायचं परंतू चांगलं धुतलेलं नीटनेटकं असायचं. शिवाय तिचे विचारही चांगले असायचे. आमच्याशी थोड्या थोडक्या वेळात छान गप्पा मारायची.

बहुतेक वेळा आम्ही तिघे आई व आम्ही दोघे किंवा आई मी किंवा मी सौ.वंदना असे आम्ही दोघे भाजीपाला घ्यायला सुरेखाच्या गाडीवर संध्याकाळच्या वेळी हमखास असायचो. आमच्याशी ती खूप चांगलं बोलायची. तिच्या दृष्टीने आमची फॅमिली म्हणजे एक आदर्श कुटुंब होते.

ते दोघे पती-पत्नी आमची खूप स्तुती करायचे. आमच्या पाठीमागे इतरांच्या तोंडावर सुद्धा आमच्या बद्दल चांगले बोलायचे. मात्र अधनं मधनं  ती, “मला तुमच्या घरी काम करायचे आहे.” असं म्हणायला विसरायची नाही. “मला तुमचं काम मिळालं तर जन्मात सोडायची नाही.”असंही वारंवार म्हणायची.

आईचं आणि तिचं मायलेकी सारखं घट्ट नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चाललं होतं. आम्हीपण तिच्या बोलण्यामुळे तिच्या गरिबीमुळे सहानुभूतीमुळे कधी दोन गोष्टी महाग लागल्या तरी तिच्याकडून घ्यायचो. हे सगळं एकंदर असं असताना सुरेखाने आमचं काम दुसऱ्या दिवशी कसं सोडलं याचा विचार मी करू लागलो कारण की ती तसं करणं शक्य नव्हतं. तिला आमचे संबंध आणखी घट्ट करण्याची एक चांगली संधी मिळाली होती.

आपल्या मुलांनी सुद्धा शिकून माझ्यासारखं व्हावं अशी तिची व तिच्या नवऱ्याची इच्छा होती. तिचा नवरा मला सारखं शिक्षणाबाबत विचारायचा.

मुलांना पुढे काय करायचं ते तुम्हीच ठरवा असं म्हणायचा.मी सुद्धा त्याच्याशी त्याबाबतीत वेळ मिळेल तेव्हा अगदी मनमोकळेपणाने बोलायचो आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा करायचो. 

पुढचे आणखी दोन दिवस असेच वाट पाहण्यात गेल्यावर आईने मग सुरेखाशी संवाद साधला पण तिने जी कारणं दिली त्याने आईचे काही समाधान झाले नाही.

घरचा व्याप खूप वाढला आहे.भाजीच्या धंद्याला जास्ती वेळ देता येत नाही. धुणं-भांडीची काम आता कमी करायची आहेत.

काम करून आता कंबर दुखते. साबणाने हाताला एलर्जी होते. आधीच्या लोकांनी थोडी जादा पगार देऊन कामं वाढवलेत अशी तिची गुळगुळीत उत्तरे आम्हाला पटत नव्हती म्हणून आम्ही अस्वस्थ होतो.

एवढी सलगी राखणारी सुरेखा जेव्हा आमच्या घरचं काम मिळालं तेव्हा अक्षरशः नाचायची बाकी होती! फक्त लगेच माशी कुठे शिंकली तेच कळेना?

सरते शेवटी मी आमच्या शेजारी आमचे कुणी दुश्मन वगैरे आहे काय? ते पाहू लागलो. आमचे कॉर्टरमधले शेजारी  सगळेच चांगले मित्र आणि आमचे स्टाफ वालेच होते. बहुतेकांच्या बायका घरीच त्यामुळे त्यांना मोलकराणीची वगैरे मुळीच गरज नव्हती त्यामुळे सुरेखाला  जास्त पैसे देऊन फितवून काम करून घेण्याचा प्रश्नच नव्हता. 

मग हे सगळे घडलेच कसे?सुरेखाने आमचे काम एका दिवसात सोडलेच कसे?हा एकच आम्हाला एकसारखा सातावत होता. 

न राहून एके दिवशी मी दुसऱ्या एका भाजीवाल्या मावशी आशाबाई यांच्याशी बोलताना सुरेखाचा विषय मुद्दामच काढला. त्यावेळी त्या पटकन म्हणाल्या, “अहो सर, ती तुमच्या घरी काम तरी कशी?

मी म्हटले,” अहो तीच तर आमच्या मागे लागली होती,मला तुमच्या घरी कामाला ठेवा म्हणून…” 

 “अहो सर, पण तेव्हा  तिला तुमची जात माहित नव्हती ना !!!” ” म्हणजे? “

” अहो सर, तुमचं राहणीमान व आडनाव बघून तिला तुम्ही त्यांच्यातलेच आहात असं वाटलं पण जेव्हा  ती तुमच्या घरी आली आणि … 

” आणि काय मावशी? “

पहिल्याच दिवशी काम केल्यावर ती तुमच्या घरात घरभर फिरली तवा तुमच्या घरातले फोटो तिनं बघितले अन मग तिला तुमची जात कळली…!  हो आणि म्हणूनच तीनं तुमचं काम लगेचच सोडलं…  पण एक करा सायेब माझं नाव तिला सांगू नका नाहीतर ती मला जित्ती ठेवायची न्हाय. “आशाबाईंच्या या उत्तराने मी निरुत्तर झालो!  माणुसकीच्या आड लपलेला जातीयवाद आणि जात एवढी कृतघ्न असू शकते? याचा विचार करितच मी घरी पोहोचलो. त्यावेळी पैसे देऊन घेतलेला भाजीपाला असलेली थैली त्या गडबडीत आशाबाईकडेच विसरली होती…

– समाप्त –

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोलकरीण… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ मोलकरीण… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

दुपारचे दोन वाजून गेले होते.रोजच्यापेक्षा जेवणासाठी मला घरी जायला मला त्यादिवशी बराच उशीर झाला होता. मी त्यावेळी संस्थेच्या कॉर्टर्समध्ये राहायला होतो. आमची खोली दुसऱ्या मजल्यावर शेवटची होती.गाडी पार्किंगमध्ये लावून मी पटापट जी ने चढून वर गेलो. माझ्या पावलांचा आवाज ऐकून आई दरवाजात येऊन उभी होती. माझ्या येण्याची ती वाटच पाहत होती. दुपारी मी घरी येईपर्यंत ती सुद्धा जेवण करीत नसायची. तू लवकर जेवण करत जा असं मी अनेक वेळा सांगूनही ती ऐकत नव्हती आणि ऐकणारही नव्हती. कारण आईची मायाच असते तशी. लेकरांसाठी आपले तहानभूक हरवणारी ती एकमेव व्यक्ती असते.

मी दरवाजात उभ्या असलेल्या आइकडे पाहिले तर  त्यावेळी मला ती थोडी नर्व्हस दिसली. आज मला यायला उशीर झाल्यामुळे ती सुद्धा जेवणासाठी ताटकळी असल्यामुळे तसे झाले असेल असा अंदाज मी बांधला. “आई,जेवलीस का?” मी आत येताना तिला सहज विचारले.

” न्हाय ” तिने हलक्या आवाजात उत्तर दिले. 

“जेवून घ्यायचंस ना मग?” मी सोप्यावर बसत म्हटले.

” अरे जेवणारच व्हते पण धुणं वालीची वाट बघत होते. “

“म्हणजे? ती अजून आली नाही?”

” नाही बाबा अजून … “

“ती काल काही बोलली का?”

“न्हाय रे, काल तर ती एकदम खुशीत व्हती.”

“मग तिला पगार वगैरे कमी ठरवलंस काय?” 

” न्हाय रं बाबा… असं कसं! आरं बाबा नुसत्या धुणेभांड्याचेच ती सहाशे रुपये घेती. पण आपले फकस्त धुणं आणि फरशी मिळून सातशे रुपये ठरवले मी तिला.

ती सहाशेच रुपये द्या म्हणत होती पण मी म्हटलं जाऊद्या गरिबाला शंभर रुपये जास्तीचे.एकेकाळी मी बी अशीच लोकांकडं शेतात पडल ते काम करायची म्हणूनच मला पांडुरंग उभा राहिला, माझ्या पोरांचं चांगलं झालं अन अजूनबी लय चांगलं व्हाईल. ” जुने दिवस आठवून आई इमोशनल झाली होती. बोलताना तिच्या डोळ्यात हलकेच पाणी तरळले होते.मी पटकन विषय बदलत म्हटले, “मग तिला आपलं घर आवडलं नाही का?” 

“तसं बी काय न्हाय.मावशी तुमच्या घरी याची माझी विच्छा होती ती आज पुरी झाली असं ती आनंदानं म्हणत होती.

तसं म्हणायला आपल्या घरी माणसं पण कमी आहेत होय आपल्या सगळ्यांना ओळखते ती. आली असेल काहीतरी अडचण तिला आज थोडा वेळ वाट पाहू.

दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच दुपारी तीन वाजेपर्यंत मोलकर्णीची वाट पाहिली शेवटी आईने भिजवलेले ओले कपडे धुऊन टाकले पण ती काही आली नाही. 

मात्र ती का आली नाही याचे कोडे आईला व मला पडले होते.

विशेष म्हणजे ती न येण्यामागचे एकही सबळ कारण आम्हाला सापडत नव्हतं…

आमच्या घरी धुणं-भांडी करण्यासाठी खरे तर तीच आमच्या मागे गेल्या दोन महिन्यापासून लागली होती.

मावशी मला तुमच्या घरी कामाला न्या असं सारखं म्हणायची. पण आमच्या घरी निर्मला आधीपासूनच होती तीही कामाला व स्वभावाला खूप चांगली  होती गरजू व होतकरू होती.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईची आणि तिची छान गट्टी जमली होती आणखी दहा पाच वर्षे तरी निर्मला आपल्या घरचे काम सोडणार नाही असे मला त्यावेळी वाटत होते. 

निर्मला एक तरुण विधवा होती. तिला दोन लहान मुले होती. चार-पाच घरची धुणं -भांडी करून ती मुलांना सांभाळत होती. तिला जवळच असं कोणीच नव्हतं. पण गुणांनी ती खूप चांगली होती. तिचा चेहरा निरागस होता. डोळ्याची पापणी सदा खाली पडलेली असायची. वाट्याला आलेले भोग स्वीकारून ती परिस्थितीशी लढा देत होती. आयुष्याचा अजून खूप मोठा टप्पा बाकी होता पण तिने सुरुवात तर झकास केली होती.त्यामुळे ती आपल्या कामात यशस्वी होण्याची खात्री वाटत होती. लेकरांसाठी पडतील ते कष्ट घेण्याची तिची तयारी दिसत होती. शिवाय आई तिला दररोज धीर दयायची. 

” सरून जातील दिस आज ना उद्या.काळजी करू नगो. कष्ट करत रहा. ” असा सल्ला द्यायची अन मग निर्मलाला नवी उभारी मिळायची. ती धावून धावून घरातली कामं करायची. 

दुसऱ्या कोणाकडे हात न पसरता आपणच कष्ट करून स्वाभिमानाने जगावे असे तिने जणू ठरवले होते आणि त्याप्रमाणे ती वागत होती म्हणून आम्हालाही तिचा फार अभिमान वाटत होता. निर्मला आमच्याकडे कामाला आल्यापासून साधारणपणे चार महिने सगळे काही व्यवस्थित चालले होते. परंतू एके दिवशी भलतेच घडले! 

एक किराणा दुकानदार तिच्या झोपडीत घुसला तिला दमदाटी करून त्याने आपले साध्य साध्य केले… त्याप्रसंगी निर्मला खूपच घाबरली होती. परंतू तिला प्रतिकाराची फारशी संधी त्या नराधमाने दिली नव्हती. रात्रीच्यावेळी घरात एकटी गाठून त्याने त्याचा कुटील डाव साधला होता. हा घडलेला प्रसंग तीने आईला दुसऱ्या दिवशी सांगितला.  आईने तिला धीर दिला. खोली बदलून एखाद्या ओळखीच्या नातेवाईकाचा आधार घेण्याचा सल्ला आईने तिला दिला. त्या  दिशेने तिची नव्या झोपडीसाठी शोधाशोध सुरू झाली. परंतु कुठे काही जमले नाही.दोन लेकरांच्या एकट्या तरण्याताठ्या एकट्या बाईला खोली कोण देणार…! 

दरम्यान त्या दुकानदाराला चांगलीच चटक लागली होती.त्याच्या तोंडाला रक्त लागले होते. तहान लागली की भागवायला तो निर्मलाच्या झोपडीत राजरोसपणे घुसायचा.निर्मला खूपच भेदरली होती पण आपलीच अब्रू जाईल म्हणून बिचारी कुठेही न वाच्यता करता निमटपणे सगळे सहन करत होती. परंतु त्या नराधमाने तिचा चांगलाच गैरफायदा घेतला होता…

शेवटी त्यानेच तिला त्याच्या सोईचीच एक खोली परहस्ते मिळवून दिली व आपल्या बैठकीतल्या मित्रांना तिच्याकडे घेऊन येऊ लागला…! 

हे सगळे भयानक होते. संताप आणणारे होते. परंतू कोणाला काही करता येत नव्हते. 

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गजु ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ गजु ☆ श्री सुनील शिरवाडकर

आठ दहा वर्षाचा गजु.. आमच्या शेजारीच रहायचा. एकदा तो त्याच्या बाबांच्या मागेच लागला. मला पण तुमच्या बरोबर यायचं.. दुकानात.. मी त्रास नाही देणार.. नुसता बसुन राहीन.

गजुचे बाबा एका चहाच्या दुकानात काम करायचे. चहाच्या दुकानात म्हणजे चहा पावडर विकणाऱ्या दुकानात. तेथे ते सेल्समन होते. ते घरी आले तरी त्यांच्या शर्टला चहाचा वास यायचा. गजुला तो वास खुप आवडायचा.

तो वासच आवडायचा असं नाही, तर गजुला बाबांचा तो शर्ट पण आवडायचा. जाड पिवळ्या कापडाचा तो शर्ट.. खिशावर त्या दुकानाचा लोगो. एकदा तर गजुने घरात कुणी नसताना तो शर्ट घालुनही पाहीला होता.

खुपच मागे लागल्याने बाबांनी ठरवलं.. आज गजुला दुकानात घेऊन जायचं. तसं दुकान जवळच होतं. दुपारी त्याचे बाबा जेवायला घरीच यायचे. बाबांनी खुप सगळ्या सूचना केल्या. हे बघ.. दुपारी दोन पर्यंत  तुला दुकानात थांबावं लागेल.. माझ्या बाजुला शांतपणे बसायचं.. इकडे तिकडे हात लावायचा नाही.

गजुने मान डोलावली. बाबांसोबत तो दुकानात आला. दुकानाची साफसफाई झाली. बाबांनी काऊंटरवरून फडकं फिरवलं. उदबत्ती लावली. बाजुच्या खुर्चीत कॅशियर बसला. काऊंटरच्या आत एक स्टुल होता. गजु त्याच्यावर उभा राहिला.

तेवढ्यात एक गिऱ्हाईक आलं. त्यांना अर्धा किलो चहा हवा होता. काऊंटरच्या खाली तीन चार ड्रॉवर्स होते. त्यात वेगवेगळी चहा पत्ती होती. दार्जिलींग.. ममरी.. अशी नावे त्यावर लिहीलेली होती. बाबांनी या ड्रॉवर मधून थोडी.. त्या ड्रॉवर मधुन थोडी अशी चहा पत्ती घेतली.. स्टीलच्या डावाने हलवली. सगळं मिश्रण छान एकत्र झालं.

दुकानचं नाव असलेली एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली. त्यात एक स्टीलचा चकचकीत शिबलं ठेवलं. वरुन ती चहाची पावडर ओतली.. स्टेपलरनी दोन पिना मारल्या.. कस्टमरच्या हातात दिली. पैसै देऊन तो माणूस निघुन गेला.

गजु हे सगळं बघत होता. त्याला हे सगळं खुपचं आवडलं. दोन तीन तास तो दुकानात बसला.. अगदी शहाण्या मुलासारखा.. चहाच्या त्या मंद सुगंधानी त्याचं मन वेडावलं.

गजुचं चहाचं वेड अजुनच वाढलं. मी मोठा झाल्यावर चहावाला होणार असं तो आता सांगु लागला. त्याच्या वयाच्या मुलानी असं भविष्य रंगवणं चुकीचंच होतं. त्याचे आईबाबा पण त्याला ओरडायचे. चांगलं शिकुन मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची.. तर हा असं काय बडबडतोय म्हणून वेड्यात काढायचे.

अशीही काही वर्ष गेली. आम्हीही ती जागा सोडली. कधीमधी ऐकु यायचं.. गजु कॉलेज मध्ये जाऊ लागला. त्याच्या डोक्यात असलेलं ते चहावाल्याचं वेड आता कदाचित निघुन गेलं असावं.. मी ही त्याला.. त्याच्या फॅमिलीला विसरून गेलो.

आणि अचानक एक दिवस गजु दिसला. इतक्या वर्षांनंतर पण मी त्याला ओळखलं.

झालं काय.. एका रविवारी मी एका मित्राच्या दुकानात बसलो होतो. अधुनमधुन आम्ही मित्र जमायचो तेथे. मित्रानी फोनवरून चहा सांगितला. थोड्या वेळाने चहावाला आला.. हो तो चहावाला म्हणजे गजुच होता.

दोन्ही गुडघ्यावर फाटलेली विटकी जीन.. पिवळा धमक घट्ट टी शर्ट.. केस तेल लावून चापुन चोपुन बसवलेले.. आणि तोंडांत गुटखा. त्याच्या एका हातात काळा थर्मास होता. दुसर्या हातात पेपर ग्लास.

दुकानाच्या पायरीवर त्याने थर्मास ठेवला. एक कागदी कप घेतला.. तो थर्मासच्या कॉकखाली धरला. दुसर्या हाताने त्याने थर्मासचं झाकण दाबलं. चहाची बारीक धार कपमध्ये आली. कप भरला.. त्याने माझ्यापुढे धरला.

क्षणभर आमची नजरानजर झाली.. त्याने ओळखलं की नाही.. माहीत नाही.. पण मी एका नजरेत ओळखलं.. हा गजुच.. आपल्या शेजारचा गजु.. चहावाला गजु.

मग मी एकदा मुद्दाम गजुचा शोध घेतला. जवळच्याच एका चौकात त्याची चहाची गाडी आहे असं समजलं. मी तिथं गेलो तेव्हा गजु नव्हता. थर्मास घेऊन तिथेच कुठे आजूबाजूला गेला होता. गाडीपाशी त्याचे वडील होते. इतक्या वर्षांनंतर सुध्दा मी त्यांना ओळखलं. ती अगदी टिपीकल चहाची गाडी होती. गॅसवर दोन पितळी पातेली होती. एकात दुध होतं.. दुसऱ्या पातेल्यात चहा उकळत होता. गजुचे वडील एका डावानं तो हलवत होते.. गाडीवर चहा साखरेचे डबे होते.. स्टीलच्या पिंपात पाणी होतं.. प्लास्टिकचा जग होता.. ॲल्युमिनियमची किटली होती.. ओलं फडकं होतं.. ट्रे मध्ये काचेचे पाच सहा ग्लास होते..

तेवढ्यात घाईघाईने गजु आला. त्याचे वडील बाजूला झाले. एक छोटा पितळी खलबत्ता होता.. गजुने त्यात आल्याचे दोन तुकडे टाकले. बत्त्याने ठेचले.. दोन बोटाने तो आल्याचा चोथा पातेल्यात टाकला. किटलीचं झाकण उघडलं. चहा गाळण्यासाठी एक पातळ फडकं होतं. ते किटलीवर ठेवलं. पातेल्यातला चहा किटलीत गाळला.. झाकण लावलं.

चहाच्या त्या नुसत्या सुगंधानेच मला तरतरी आली. मी यायच्या आधीपासून कुणीतरी गिर्हाईक चहाचं पार्सल घ्यायला आलं होतं. गजुनं विचारलं.. किती चहा हवेत. मग मागच्या खिशातुन प्लास्टिकची छोटी पिशवी काढली. किटलीतुन त्यात अंदाजाने चहा ओतला.. पिशवीला गाठ मारली.. ते गिर्हाईक पैसे देऊन निघुन गेलं.

मी पण एक चहा सांगितला. त्यानं एका कागदी कपात तो मला दिला. मी मागच्या एका खुर्चीत जाऊन बसलो. त्याचे वडीलही तेथेच बसले होते. मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.. जुनी ओळख दिली.

ते जरा संकोचले.. पण मग मोकळे होऊन बोलायला लागले.

“गजु दहावी झाला.. कॉलेज मध्ये पण गेला.. पण त्याला अभ्यास झेपला नाही. दोन तीन वर्ष कशीबशी काढली.. मग शिक्षणाला रामराम ठोकला. वर्ष दोन वर्ष अशीच कुठे कुठे नोकरी केली. “

मग ही गाडी कधी सुरु केली? डोक्यात कसं आलं.. हा व्यवसाय करायचं?”

गजुचे वडील म्हणाले..

“मी रिटायर्ड झालो.. आमच्या मालकांनीच सुचवलं हे.. थोडेफार पैसे मिळाले होते.. मग सुरु केली चहाची गाडी.. तसं गजुलाही वेड होतंच चहाचं.. “

एकंदरीत मला ते समाधानी वाटले. गजुनं मेहनतीनं.. गोड बोलण्यानं‌. ‌आणि मुख्य म्हणजे चहाच्या उत्तम दर्जानं व्यवसाय चांगलाच वाढवला होता. त्याची व्यवसायाबद्दलची निष्ठा बघत होतो.. त्याची धावपळ बघत होतो. नकळत माझ्या डोळ्यासमोर जुनं दृश्य आलं.. त्याचे वडील वजन काट्यातील चहा डावाने एकत्र करत आहे.. प्लास्टिकच्या पिशवीत ओतत आहेत.. आज गजुही तेच करत होता.. पितळी पातेल्यात उकळणारा चहा डावाने हलवत होता.. किटलीतुन कॅरीबॅगमध्ये ओतत होता..

पण तरीही एक मोठ्ठा फरक होता.. त्याचे वडील नोकरी करत होते.. गजु आज मालक होता.. आपला स्वतःचा व्यवसाय असणं किती अभिमानाचीच गोष्ट असते ना.. आणि तेच सुख.. तेच समाधान दोघा बापलेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते..

मला ते पाहुन व. पुं. चे वाक्य आठवले..

‘पार्टनर’ मध्ये व. पु. म्हणतात..

मालकी हक्काची भावना हेच खरे सुख.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print