मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-2 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-2 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे म्हणतात ना, अगदी तसेच झाले. मी एका दगडावर बसून ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ हे गाणे गुणगुणत होतो तितक्यात माझ्या मानेवर एक भूत येऊन बसलं.

पाटणकरने आमचे मनोरंजन विक्रम आणि वेताळ यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथेचा आधार घेऊन करायला सुरुवात केली.

“भुताने मला विचारले, कोणते गाणे म्हणत होतास? माझी अगोदरच भीतीने गाळण उडाली होती आणि त्यातच त्याने मला हा प्रश्न विचारला मी थरथर कापायला लागलो. त्याची माझ्या मानेवरील पकड आणखीनच घट्ट व्हायला लागली.

गाणं ना? ते, हे, आपलं, मी त, त, प, प करू लागलोआणि गडबडीने उत्तर दिले ‘अजि म्या भूत पाहिले’ झालं! त्यानं मला शब्दातच पकडलं!

तुझं भूत, इथंभूत सांग, नाहीतर तुझ्या शरीराची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायात लोळण घेतील. भुताने मला दम दिला.”

“भूत तुलाच तुझा भूतकाळ विचारत होतं?”पेंडसेने पाटण्याला विचारले. “होय! पण मी घाबरून गाणेही विसरलो आणि भूतकाळही!”

“मग काय झालं?” आम्ही सरसावून बसलो.

पाटण्याची कल्पनाशक्ती, सांगण्याची लकब, प्रसंग हुबेहूब मांडण्याची धाटणी इतकी अप्रतिम आहे की त्याच्या वक्तव्यातील निम्मे खरे-निम्मे खोटे असे गृहीत धरले असले तरी पठ्ठ्य प्रसंग असा उभा करतो की ‘एैसा भी होता है?’ असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

एव्हाना पाटण्याने त्याच्या स्वप्ननगरीत आम्हाला बरोबर खेचलं होतं अन् तो बोलू लागला.“माझ्या मानेवरची त्याची पकड आणखीनच घट्ट करीत ते माझ्याशी बोलू लागले,

भूतकाळ बदलता येत नाही पण तो आठवता येतो. म्हणून तर भूतकाळ या शब्दात भूत म्हणजे मी आहे. ते म्हणालं.”

पाटण्या अशी संकटाची वेळ कशी मारून नेतो ही उत्सुकता आम्हाला लागून राहिली होती. तल्लीन होऊन आम्हीऐकू लागलो…..

त्याच्या बोलण्याच्या दिशेने कान टवकारले. पाटणकरने आपल्या स्वप्ननगरी चे दार उघडले.

क्रमशः….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-1 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-1 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

‘करोना’ नावाच्या एका अस्मानी संकटाने सगळ्यांची बोलती बंद केली हे जरी खरं असलं तरी,आम्ही मात्र सर्व त्याच्याविषयीच बोलू लागलो.

आताशा करोनाच्या नावाने बोटं मोडीत दिवस सुरु होतो अन् त्याला शिव्या शाप देत संपतो. आम्हा चांडाळ चौकडीच्या गप्पांच्या कट्ट्यावर देखील या करोनानेच धुमाकूळ घातला आहे.

त्यात आमचा ‘पाटण्या’ म्हणजे पाटणकर रोजची करोना अपडेट देणार! मग काय विचारता…तो येताच करोना जणू आम्हा सर्वांच्या काया प्रवेश करतो आणि आपले अस्तित्व दाखवू लागतो.

पाटणकर म्हणजे एक अजब रसायन आहे. भविष्याची चिंता नसलेला, भूतकाळात डोकावणारा, आणि वर्तमानाला प्रेझेंट समजून चालणारा असा हा, थापा मारतो की बाता हे आम्हाला अजून उमगलेले नाही.

त्याच्या थापा म्हणाव्यात तर तो आम्हा कुणाचेही थापा मारून नुकसान करीत नाही किंवा त्याच्या बोलण्याने आम्हा कुणाचीही फसवणूक होत नाही. आणि बाता म्हणाव्यात तर त्याच्या बोलण्याला एक सत्याची झालर असते.

थापा असोत वा बाता, स्वतःची टिमकी वाजवायला तो कधीही विसरत नाही.

असाच तो आजही कट्ट्यावर आला ते ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ हे गाणे गुणगुणत.

“आज अचानक करोनाला बगल देऊन एकदम विठुरायाचा काया प्रवेश? ‘गो करोना’ म्हटलेलं ऐकलं की काय करोना ने?” मी पाटणकरला टोकलं.

“अरे,आज एकादशी. सकाळी-सकाळी कानावर पडलेलं गाणं मनात रुंजी घालतय तेच गुणगुणत  आलोय झालं!” पाटणकरने  गाणे गाण्याचं प्रयोजन सांगितलं.

“आता पूर्ण गाणं म्हण” आम्ही आग्रह धरला. आणि आशा ताईंच्या आवाजातील हे गाणे पठ्ठ्याने पूर्ण म्हटलं की हो!

आज ना तो नेहमीसारखा न्यूज रीडरच्या भूमिकेत होता, ना करंट विषयावर बोलायच्या मूडमध्ये! स्वतःचे बूड स्थिरस्थावर करून तो म्हणाला, “अरे यार, मी काल एक स्वप्न बघितले.आणि त्या स्वप्नात एक भूत!”

आम्ही तिघांनीही एकदम एकमेकांकडे पाहिलं. पाटणकरचे स्वप्न म्हणजे एक शुद्ध आणि स्वच्छ थाप असणार असे आम्हा तिघांना एकाच क्षणी वाटलं असा वे. पण दुसऱ्याच क्षणी रोजच्या, करोना भूताच्या चावून चोथा झालेल्या विषयापेक्षा पाटणकरच्या स्वप्न नगरीत जायचे आम्ही तिघांनी ठरवले.

“अरे पाटणकर रात्रभर पाहिलेले स्वप्न एक तासात सांगून पूर्ण होणार का? माझा खोचक प्रश्न त्याला विशेष आवडला नाही. “नाही म्हणजे तीन तासाचा पिक्चर पण त्याची स्टोरी सांगायला तुला सहा,साडे सहा तास लागतात म्हणून म्हटलं, ”मी माझी सफाई दिली.

“अरे ऐका रे” त्याने दटावले. स्वतःच्या स्वप्न सफरीवर आम्हाला न्यायला तो उतावळा झाला होता.

करोनामय वातावरण रंजक होईल म्हणून आम्ही ही त्याच्या बोलण्याच्या दिशेने कान टवकारले. पाटणकरने आपल्या स्वप्ननगरी चे दार उघडले.

क्रमशः….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सईचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले . पळत लांब निघालेल्या त्या स्त्रीला तिने मनापासून आश्वासन दिलं, आणि त्या क्षणी त्या तान्हुलीची जणू खरीखुरी आई झाली ती.–

हॉर्न वाजला तशी सई भानावर आली. हळूच डोळे पुसत ती सलोनीला अलगद हातात धरून गाडीत बसली. अगदी शांत गाढ झोपलेली त्यांची छकुली—दोघेही एकटक तिच्याकडे पहात राहिले होते काही वेळ, आणि मग निघाले—सलोनीच्या घरी—त्यांचा हा निर्णय सासर -माहेरच्या सगळ्यांनीच मनापासून स्वीकारला होता. त्यामुळे घरी सलोनीचं जोरदार स्वागत झालं.

आणि मग एखादी कळी अलवार उमलावी, तशी सलोनी हळुवार उमलत गेली–आणि हे दोघं तृप्त होत राहिले. घरात कशाचीच वानवा नव्हती. ती अगदी लाडाकोडात वाढत होती. तिला हवं ते शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य होतं. आणि आता शिक्षण उत्तमरित्त्या पूर्ण झालं होतं–बघताबघता ती लग्नाला आली होती .

तिला अठरा वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हाच मानसोपचार-तज्ञांच्या सल्ल्याने आणि मदतीने, सई आणि सचिन तिचे खरे आईवडील नसल्याचं तिला योग्यप्रकारे सांगितलं होतं. अशावेळी अशी बहुतेक मुलं, आपण ज्यांना आईवडील म्हणत आलोय, ते आपले खरे जन्मदाते नाहीत, आणि खरे आईवडील कोण हे कुणालाच माहिती नाही, हे पचायला अतिशय अवघड असं कटुसत्य कळल्यावर प्रचंड बिथरतात, विचित्र, बेताल वागायला लागतात हे  डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं–आणि दोघांनाही त्याचंच प्रचंड टेन्शन आलं होतं. सलोनी आपल्याला दुरावणार तर नाही ना, या भीतीने मने धास्तावली होती. पण तिला कधीतरी हे कळणं गरजेचं होतं. आजपर्यंत इतर कुणी भोचकपणाने  तिला हे सांगितलं नव्हतं ही त्यातल्यात्यात जमेची बाजू होती. सलोनीला सत्य कळताच तीही अपेक्षेप्रमाणेच वागायला लागली होती. ७-८ दिवस त्या दोघांशीही अजिबात बोलली नव्हती. पण डॉक्टरांचं कॉन्सेलिंग प्रभावी ठरलं आणि एक दिवस उठल्याउठल्याच रडत येऊन ती सईच्या गळ्यात पडली. हमसून-हमसून रडली. मग हळूहळू शांत झाली. तिच्या मनावरचं मळभ दूर झाल्याचं जाणवत होतं. — ”आई, मला पटलंय — मला जन्माला कुणीही घातलं असलं तरी माझे खरे आई-बाबा तुम्हीच आहात  आणि तुम्हीच रहाल . तुमचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे मला माहितीये . आणि माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. तुम्ही सोडून दुसरे कोणी माझे आई-बाबा असूच शकत नाहीत.” —आणि सगळ्यांच्याच मनाचा बांध फुटला. त्या क्षणी तिघांमध्येही एक समृद्ध घट्ट नातं नव्याने जन्माला आलं. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तिला आश्रमातून आणतांना झालेला आनंद मोठा, की हा या क्षणाचा आनंद मोठा ,हा प्रश्नच निरर्थक ठरला असता. —-आणि आता बघताबघता सलोनी लग्न करण्याइतकी मोठी झाली होती. तिचा तिनेच जोडीदार निवडला होता—अतिशय डोळसपणे. उत्तम स्थळ होतं . मुलगा अमेरिकेत जॉब करत होता. –आणि लग्न आता अवघ्या चार दिवसांवर आलं होतं .लग्नानंतर अर्थातच ती अमेरिकेला जाणार होती—यापुढे सलोनी दुसऱ्या कुणाचीतरी होणार या विचाराने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं –आणि आज इतक्या वर्षांनी अचानक तिला ती बाई आठवली— झाडामागे लपून का होईना, स्वतःच्या मुलीला शेवटचं बघण्यासाठी आसुसलेली– इतक्या दुरून तिला आशिर्वाद देणारी–मनावर कायमचा दगड ठेवून तिथून लांब पळत गेलेली—– सईला प्रकर्षाने जाणवलं —–त्या बाईला समाजाने लाथाडलं होतं , आणि आपण अतिशय सन्मानाने जगत आहोत, हा जमीन-अस्मानाचा फरक दोघींमध्ये असला, तरी दोघींमधली आई अगदी एकसारखीच तर आहे—–दोघींच्या भावनाही त्याच–कासाविशी तीच– आणि मुलीच्या विरहाने मनाला होणाऱ्या वेदनाही त्याच——पण कदाचित तिच्या या सगळ्या भावना जरा जास्तच तीव्र होत्या-असतील, कारण ती तर आयुष्यात पुन्हा कधीही तिच्या मुलीला दुरूनही पाहूसुद्धा शकणार नाहीये. पण माझं तसं नाही——सईला प्रकर्षाने जाणवून गेलं ….

समाप्त 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

\सई आणि सचिन, दोघांचीही गेले ४-५ महिने नुसती धावपळ चालली होती. मुहूर्त काढून झाल्यावर, त्या दिवशी त्यांना हवं ते कार्यालय उपलब्ध आहे म्हटल्यावर, तातडीने त्यांनी ते बुक करून टाकलं….. आणि त्यांची खरी लगबग सुरु झाली. देणं-घेणं, मानपान हा प्रश्न व्याह्यांनीच निकालात काढल्याने मोठं टेन्शन कमी झालं होतं. पण इतर कितीतरी खरेदी, दागदागिने, घरात लागणारं सामान, पूजेची तयारी, घर-सजावट, आणि आमंत्रणांची यादी — मग आमंत्रण-पत्रिकेचे सिलेक्शन —–कामांचा नुसता डोंगर उभा होता. पण दोघांचं बऱ्याच बाबतीत एकमत झालं होतं. आणि ठरवल्यानुसार एकेक काम हातावेगळं होत राहिलं. बघता-बघता आमंत्रणं करून झाली. फराळाची ऑर्डरच दिलेली होती. जवळच्या माणसांना द्यायच्या भेटवस्तूंचं पॅकिंग करून तयार  होतं. स्वयंपाक-वरकाम यासाठी आणखी दोन बायका आठ दिवसांपासून यायलाही लागल्या होत्या. घराची सजावट करणं सुरु झालं होतं. कार्यालयात न्यायाच्या बॅगा भरून तयार होत्या—-म्हणजे झालीच होती की सगळी तयारी—- बघता-बघता देवदेवकाचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला होता. लेकीचा विरह होणार या विचाराने अस्वस्थ होण्यासाठीही इतके दिवस वेळ मिळाला नव्हता सईला—पण आज- आत्ता मात्र फक्त तेवढी एकच जाणीव मनाला सलत होती–आणि तिला तान्ही सई आठवली.

—-सलोनी—-किती गोड आणि साजरं नाव सुचलं होतं त्यांना तिच्यासाठी. ती तान्हुली होतीही तशीच गोड-गोंडस-हसरी, गव्हाळ वर्ण, गालावर पडणारी खळी, आणि अतिशय आकर्षक असे पाणीदार बोलके डोळे–पहाताक्षणीच दोघांनाही खूप आवडली होती ती. आता आणखी बाळे बघायचीच नाहीत हे ठरलं. आश्रमाच्या व्यवस्थापकांना त्यांनी निर्णय सांगून टाकला. कायदेशीर बाबींची पूर्तता झाली, आणि कोजागिरीला ते तिला आणायला गेले. मनात संमिश्र भावनांची खूपच दाटी झाली होती— भीती-दडपण-उत्सुकता-हुरहुर- आणि त्यातच तिच्या खऱ्या आईबद्दल मनापासून वाटणारी कणव— पोटाची पोर कुठल्या अनोळखी लोकांच्या हातात कायमची पडणार आहे, हे त्या माऊलीला कळणारही नव्हतं– आश्रमाची अटच होती तशी.

गेल्यागेल्या तिने त्या मुलीला उचलून नकळत छातीशी धरलं, आणि त्याक्षणी मनातले सगळे विचार जणू कायमचे हद्दपार झाले. ती तान्हुलीही लगेच तिला बिलगली. सईचा ऊर दाटून आला. तिने पटापटा तिचे मुके घेतले. तिच्यासाठी नेलेलं नवीन झबलं-टोपलं स्वतःच्या हाताने तिला घालतांना मन आनंदाने फुलून गेलं होतं तिचं. येतांना दोघे आलेले ते, आता कायमसाठी ‘तिघे’ झाले होते. एक वेगळीच उभारी घेऊन ते बाहेर पडले. मेनगेटपाशी पोचताच सई सलोनीला घेऊन तिथेच थांबली, आणि सचिन गाडी आणायला गेला. काहीही काळात नसलेल्या त्या छोटीशी सई सारखी बोलत होती—’ ती बघ पमपम — आवडली? आणि ते बघ- त्याला झाड म्हणतात– केवढं मोठ्ठ आहे ना? आणि हिरवं हिरवं गार–’ –अचानक तिची नजर त्या झाडामागून डोकावणाऱ्या दोन डोळ्यांनी वेधून घेतली– आसुसलेपणाने ते डोळे त्या मुलीकडे बघत होते. त्यातून टपटप अश्रू ओघळत असल्याचं सईला लांबूनही जाणवलं. तिने झाडाच्या दिशेने पाऊल उचलताच एक बाई हळूच बाहेर डोकावली—बरीच ठिगळं लावूनही कसंबसं अंग झाकणारी साडी, विस्कटलेले केस, कसलीच रया नसलेलं अशक्त शरीर—’पुढे येऊ नका’ असं तिने हातानेच सईला खुणावलं –तिथूनच कानशिलावर बोटं मोडत पोरीची दृष्ट काढली–हात उंचावून ‘छान-छान’ अशा खुणा करत पोरीला आशिर्वाद दिला, आणि झटदिशी मागे वळून, पळतच ती दिसेनाशी झाली. सईच्या मनात प्रचंड कालवाकालव झाली—-’ती आई असेल का हिची? किती काय काय भाव झरझर सरकत गेले होते तिच्या चेहेऱ्यावर–पोटच्या गोळ्याला असं वाऱ्यावर सोडून देतांना नक्कीच मेल्याहून मेल्यासारखं वाटलं असणार तिला. तिचे डोळे मात्र बरंच काही व्यक्त करून गेले होते तिचे—- लेकीला लांबून का होईना,एकदा तरी बघायला मिळालं याचा आनंद– पुन्हा कधीही ती दिसणार नाही याचं अपार दुःख– आणि एक अनामिक समाधान. एकदा आपल्या बाळाला त्या आश्रमाच्या दारात ठेऊन आलं की आयुष्यात पुन्हा कधीही तिच्यासमोर यायचं नाही, हा कडक नियम माहीत असूनही,आपल्या मुलीला कुणीतरी दत्तक घेतंय याचा सुगावा लागताच आज दुरून का होईना तिला शेवटचं पहाता यावं म्हणून तिने हे फारच मोठं धाडस केलं होतं—–

क्रमशः ….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी बहिणी …. – भाग 5 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 5 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

विकासला ऑफिसमधल्या एका बाईचा कामासाठी फोन आला.

“सांभाळ ग बाई. तुझ्या नव-याला बायकांचे फोन येत असतात. त्यातून तू दिसायला ही अशी!”

यावर हसावं की रडावं, हेच मला कळेना.

“आता माझंच बघ ना. मी एवढी देखणी असूनही साहेब  बाहेरगावी जाताना कोणालातरी घेऊन  जातात. तिच्याविषयी जास्त चौकशी केली,  तर वस्सकन माझ्या अंगावर येतात.”

“नेहमी एकाच बाईला घेऊन जातात?”

“नाही. नेहमी वेगवेगळ्या बायका असतात. खूप बायका आहेत त्यांच्या ऑफिसात. कधी कधी पुरुषसुद्धा जातात बरोबर. आता अमेरिकेला गेलेत,  ते बरोबर एक बाई आणि दोन पुरुष आहेत, असं ऐकलं.”

“अगं,  कामाच्या संदर्भात जात असतील ना त्या बायका. त्यांचे वाईट संबंध असतील कशावरून?”

“…….”

“तसं मलाही जावं लागतं बरेचदा बाहेरगावी.”

“पुरुषाबरोबर?  आणि विकासला चालतं ते?”

“न चालायला काय झालं? ऑफिसमधल्या लोकांशी आमचे संबंध मैत्रीचेच असतात आणि बाई काय,  पुरुष काय,  कोणीतरी बरोबर आहे म्हटल्यावर विकास निर्धास्त असतो.”

“म्हणजे ह्यांचंपण असंच असेल का ग?”

“हो ग. तेही कामापुरताच संबंध ठेवत असतील त्यांच्याशी. उलट तूच काहीतरी बडबडून त्यांच्या मनात काहीबाही भरवून देऊ नकोस.”

मग ताई गंभीरपणे विचारात बुडून गेली.

तवा गरम आहे, तोवर पोळी भाजून घ्यायला हवी होती.

“एक सांगू तुला, ताई?  मी लहान आहे तुझ्यापेक्षा. पण जग जास्त बघितलंय मी. म्हणून तुला सांगावंसं वाटतं  आणि तसंही,माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही तुला या गोष्टी सांगणारं.”

ताई अजूनही गंभीर होती.  तिने मानेनेच ‘बोल’ म्हटलं.

“सौंदर्य, देखणेपणा या गोष्टी त्या त्या वयाच्या असतात. जन्मभर पुरत नाहीत त्या.  अर्थात तुला दिली तशी त्यांनी साथ दिली,  तर उत्तमच. पण  फक्त त्यावर अवलंबून राहू नकोस.  त्या शरीराच्या आत दडलेलं मन जास्त महत्त्वाचं असतं.  मला माझ्या लहानपणीची ताई आठवते. माझ्यावर माया करणारी, माझी काळजी घेणारी, मला सांभाळून घेणारी. तुझं लग्न झालं आणि माझी ती ताई हरवूनच गेली. तिला शोध. ती भावोजींना आणि सलील-समीपला जास्त आवडेल.”

“हो?”

“नक्कीच. आणि मग तुला आलेला हा एकटेपणा   जाणवणारी  ही असुरक्षितता संपून जाईल.

आपण लहान असताना भावोजींएवढे श्रीमंत नव्हतो. पण आपल्याला  आईबाबांनी कसलीच ददात भासू दिली नाही. अगदी लाडात वाढवलं आपल्याला. तशा तेव्हा आपल्या मागण्या, आपले हट्टही फारसे नसायचे म्हणा…….शिवाय आता तुला वाटते आहे, तशी असुरक्षितता कधीच जाणवली नाही आपल्याला. ”

ताई काहीच बोलली नाही.

“बघ. विचार कर यावर  आणि दुसरं म्हणजे, तसं होणार नाही. पण समजा,तुझ्यावर घर सोडायची पाळी आली,  तर स्वत:ला निराधार समजू नकोस. तुझं हे माहेर तुझ्यासाठी कायम उघडं असेल. मी -आणि हो,विकाससुद्धा-  तुला कधीच अंतर देणार नाही….. तू झोप आता. मी मागचं आवरून येते.”

रात्री झोपायला आले,  तेव्हा ताईचा चेहरा शांत,समाधानी वाटत होता. माझी चाहूल लागताच तिने डोळे उघडले.

“तुला गंमत सांगू?  त्या दिवशी आपण त्या कुठच्या मॉलमध्ये गेलो होतो. त्याच्याशेजारी त्या उंच बिल्डिंग होत्या बघ. फ्लॉरेंझा हाइट्स का काय त्या.  तो पत्ता सांगू या ड्रायव्हरला. त्याला वाटेल, तू तिथेच  राहतेस म्हणून  मला तिकडे नेऊन सोड तू. -असं मी तुला सांगणार होते. पण आता नाही सांगणार तसं. आता हाच पत्ता अभिमानाने सांगणार. तुझा खराखुरा पत्ता.  शून्यातून निर्माण केलेल्या विश्वाचा.”

‘माझी ताई  हळूहळू डोकं वर काढतेय म्हणायची.’

“दुसरं म्हणजे, मी आणखी थोडे दिवस राहते इकडे. तू त्या इंग्रजीच्या शिकवणीचं बघ. ”

“अरे वा! ताssई! तू मनावर घेतलंस ना, तर लगेच शिकशील तू. आपण घरात इंग्लिशमध्येच बोलूया. तुला प्रॅक्टिस होईल चांगली आणि कॉन्फिडन्स येईल. म्हणजे युएस रिटर्न्ड साहेबांच्या स्वागताला फाडफाड इंग्लिश बोलणारी मड्डम.”

ताई  हसायला लागली.खदखदून. आणि मला माझं कौतुक करणारी, माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी माझी ताई सापडली.

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांताक्लॉज (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

Santa Claus Emoji Stickers by Artisticco, LLC

☆ जीवनरंग ☆ सांताक्लॉज (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सांताक्लॉजला बघताच गरीब वस्तीतल्या त्या सगळ्या मुलांमध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या. काही क्षणात तिथल्या सगळ्या मुलांच्या हातात सुंदर सुंदर भेटी होत्या. बिल्लूने मात्र या भेटी घेण्यास नकार दिला. सांताक्लॉजने अतिशय प्रेमाने विचारले, `बेटा तुला या भेटी का नकोत? काय कारण? तुला हवय तरी काय?’

बिल्लू अतिशय भोळेपणाने म्हणाला, `मला भेटवस्तू नकोत. त्यापेक्षा तुम्ही मला सांताक्लॉजच करा ना!’

सांताक्लॉज बनलेल्या पीटरने विचारले, `बेटा, इतक्या चांगल्या भेटी सोडून तुला सांताक्लॉज का व्हावसं वाटतय?’

बिल्लू प्रथम गप्प बसला, पण पीटरने पुन्हा पुन्हा विचारले, तेव्हा तो म्हणाला, `अंकल मी गरीब आहे. मला खूप थंडी वाजते. मी डोक्यापासून पायापर्यंत लोकरीचे कपडे कधी घातलेच नाहीत. फक्त त्यासाठीच…’

मूळ कथा – ‘सांता क्लॉज’ –  मूळ लेखिका – सुश्री  मीरा जैन

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी बहिणी …. – भाग 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

“ताई, तुला आठवतं? आपण लहानपणी आई-बाबांबरोबर मुंबई बघायला आलो होतो…….”

“मला लहानपणचं काही सांगू नकोस. मी विसरलेय सगळं.”

“असं थोडंच विसरता येतं मागचं?”  मीही हट्टालाच पिटले होते.

“मी प्रयत्नपूर्वक विसरलेय ते. मला पुन्हा आठवायला लावू नकोस.”

“असं काय वाईट होतं ग तेव्हा?”

“ते एवढंसं घर. बाबांचा तुटपुंजा पगार……”

“पण आपण तर समाधानी, सुखी होतो ना?”

“कारण आपल्याला मोठं घर,  भरपूर पैसा म्हणजे काय असतं,  तेच माहीत नव्हतं ना तेव्हा. तुला ठाऊक आहे?  माझ्या सासरच्या बायका मला कमी लेखायची एकही संधी सोडायच्या नाहीत. माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण,  माहेरची बेताची परिस्थिती…. खूप अपमान करायच्या त्या. मग साहेब  माझी समजूत घालायचे-तुझ्या रूपावर जळतात त्या. म्हणून तर मी माझ्या दिसण्याची एवढी काळजी घ्यायला लागले. तेवढी एकच तर गोष्ट होती माझ्याकडे. दुसरं म्हणजे…. ”

बोलू की नको ,असा विचार करून मग तिने सुरुवात केली.

“साहेबांच्या सुलभाकाकी आहेत ना-. आहेत म्हणजे होत्या. गेल्या बिचा-या पाच-सहा वर्षांपूर्वी. तर काय सांगत होते, त्या काकांनी एक बाई ठेवली होती. ते तिला घेऊन दुसरीकडे घर करणार होते;  पण त्यांच्या आईंनी सांगितलं-इथेच राहू दे तिला. मग काय , ती घरातच राहायला लागली.

सासूबाई सांगायच्या ना,  त्या सुलभाकाकी रोज रात्री नटूनथटून बसायच्या नव-यासाठी. पण काका, त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता त्या बाईच्या खोलीत जायचे. मग सुलभाकाकी सगळं विसकटून टाकायच्या .बिचा-या!

मला नेहमी भीती वाटायची, म्हणजे अजूनही वाटते, माझ्यावर तशी पाळी आली तर?”

“पण हे घरातल्या इतर बायकांच्या बाबतीतही घडू शकलं असतं की.”

“त्यांच्या बाबतीत घडलं असतं,  तर त्यांच्या माहेरचे आले असते जाब विचारायला आणि तशीच वेळ पडली असती, तर त्यांना माहेरी घेऊन गेले असते. एकेकीची माहेरं बघशील तर अशी श्रीमंत आहेत ,माहीत आहे?  सुलभाकाकीचं माहेर मात्र माझ्यासारखं. फाटकं.

म्हणून तर सासूबाई मला सांगत राहायच्या-‘डोळ्यांत तेल घालून जप नव-याला.”

मला आतापर्यंत ताईचा राग येत होता  पण आता मात्र दया येऊ लागली तिची.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – संस्कार प्रभाव☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – संस्कार प्रभाव ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा १२. संस्कार प्रभाव

विंध्यपर्वतावर  एका वटवृक्षावर  पोपटाचे जोडपे वास करत होते.  त्यांना राम व लक्ष्मण अशी दोन पिल्ले होती.  एकदा एका व्याधाने  जाळे पसरवून  त्या दोघांना पकडले. गोदावरी तीरावर राहणाऱ्या एका साधूला  राम विकला व एका कसायाला लक्ष्मण. त्या दोघांनीही छोट्या पोपटांचे प्रेमाने लालन पालन केले. आता त्या पिल्लांचे मातापिता वृद्ध झाले होते. राम व लक्ष्मणाच्या आठवणीने  ते व्यथित  होत होते.  त्यांना त्या दोघांच्या भेटीची ओढ लागली होती. आता दोघांना शोधूनच काढायचा त्यांनी निर्धार केला. त्यानुसार ते जोडपे  पर्वतांवर,  झाडांवर,  गावांमध्ये,  उद्यानात,  देवळांत,  राजवाड्यात इत्यादी सर्व  ठिकाणी  पिल्लांना शोधत कालांतराने गोदावरीच्या तीरावर आले. तेथे साधूच्या कुटीत व कसायाच्या घरात मधुर कूजन करणाऱ्या,  पिंजऱ्यात असलेल्या आपल्या पिल्लांना बघून ते खूप आनंदित झाले .

प्रथम त्या जोडप्याने  साधू जवळ येऊन त्याला प्रणाम केला व पिंजऱ्यातील पोपट आमचा पुत्र आहे असे सांगितले. तेव्हा  साधूने  त्या वृद्ध पोपटांना काही दिवस आदराने स्वतःच्या कुटीत ठेऊन घेतले. साधूने कसायाघरचा पोपटही काही मूल्य देऊन विकत घेतला व दोन्ही पिल्ले वृद्ध पोपटांना दिली. ते जोडपे काही दिवस पिल्लांसह आनंदात राहिले व नंतर मृत्यू पावले. माता-पित्याच्या मृत्युनंतर राम-लक्ष्मणाला एकत्र राहणे अशक्य झाले. ते दोघेही वेगवेगळ्या आम्रवृक्षांच्या फांदीवर घरटे बांधून राहू लागले.

एक दिवस कोणी एक ब्राह्मण नदीवर स्नानासाठी जात असताना थकून लक्ष्मण रहात असलेल्या झाडाखाली विश्रांतीसाठी  बसला. त्याला पाहून लक्ष्मण इतर पक्ष्यांना बोलावून “हा कोणी मनुष्य आला आहे. त्याचे चोचीने डोळे टोचून गळा फोडून खाऊ या” असे जोरजोराने ओरडू लागला. त्याचा तो आक्रोश ऐकून त्रस्त झालेल्या ब्राह्मणाने तेथून पळ काढला, व तो थेट राम रहात असलेल्या झाडाखाली आला.

ब्राह्मणाला पाहताच राम इतर पक्ष्यांना म्हणाला, “हा कोणी थकलेला मनुष्य आला आहे. आपण वृक्षाच्या पानांना जमिनीवर टाकूया, जेणेकरून हा सुखाने त्यावर बसू शकेल. फळेसुद्धा खाली टाकू व या अतिथीचे स्वागत करू.” ते रामशुकाचे बोलणे ऐकून ब्राह्मण आनंदित झाला. त्याने त्या पोपटाला विचारले, “मला प्रथम भेटलेला शुक ‘याला मारा, मारा’ असे ओरडत होता आणि तू तर माझे आतिथ्य करा असे सांगतो आहेस. हे कसे?” तेव्हा रामशुक म्हणाला, “आम्ही दोघे बंधू आहोत. मी साधूच्या घरी वाढलो. तिथे मी साधूला सगळ्यांचे आतिथ्य करताना पहिले. म्हणून माझी बुद्धी तशी संस्कारित झाली. तो कसायाच्या घरी वाढला. तिथे त्याने बोकड, मेंढे वगैरे मारताना पहिले, म्हणून त्याची बुद्धी तशी संस्कारित झाली.”

तात्पर्य – दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींची पूर्वी जशी दुर्बुद्धी असते, त्याचप्रमाणे ते वर्तन करतात. वृद्धावस्थेत सुद्धा त्यांची दुर्बुद्धी नष्ट होत नाही आणि सुबुद्धी जागृत होत नाही.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी बहिणी …. – भाग 3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 

☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

मध्येमध्ये मला ऑफिसमधून फोन येत होते.

“किती फाडफाड इंग्रजी बोलतेस ग तू! कुठे शिकलीस?”

मी बघतच राहिले तिच्याकडे.

“साहेबांना खूप लाज वाटायची माझी,मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही म्हणून. शिकवणीही लावली होती. पण ती दीडदमडीची पोर माझ्या चुकाच काढत राहायची, म्हणून काढून टाकलं मी तिला.”

“अग पण ताई,तुझ्या चुका तुला कळल्या नाहीत, तर तू त्या सुधारणार कशा?”

“तेही  खरंच म्हणा .”

“तू ‘इंग्लिश विंग्लिश’ बघितला होतास ना? त्यात ती कसं नेटाने शिकते इंग्लिश!”

“पण मला नाय बाय येत बुंदीचे लाडू करायला.”

मी लग्नापूर्वीच्या ताईला आठवायचा प्रयत्न केला. ती एवढी बावळट नक्कीच नव्हती. घमेंडखोरही नव्हती. उलट माझ्या हुशारीचं तिला कौतुकच वाटायचं.

“तुला शिकायचंय इंग्लिश?”

“पण आता वेळ कुठे आहे?”

“मी चौकशी करते. तू इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त इंग्लिशवरच लक्ष केंद्रित कर. जमेल तेवढे दिवस इथे शिक. पुढचं घरी गेल्यावर.”

“या वयात नाही ग जमायचं मला. शिवाय मी हुशार थोडीच आहे तुझ्यासारखी?”

“आठवून बघ जरा. शाळेत असताना माझ्यासारखा पहिला नसला तरी सात-आठच्या आत नंबर यायचा तुझा. तू नक्की शिकू शकशील.”

“ते तुझं इंग्लिश-बिंग्लिश नंतर.आधी डॉक्टर.”

"बरं। मी घेते अपॉइंटमेंट.”

“आणि रजा घे हं तू. नाहीतर मला बसवशील  डॉक्टरकडे आणि जाशील निघून ऑफिसला.” हे असं ठणकावून की जसं काही हीच मला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे.

मग तिला डॉक्टरकडे घेऊन जाणं, त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या टेस्टस, सोनोग्राफी वगैरे, ते सगळे रिपोर्टस डॉक्टरना दाखवणं…….सगळ्या गोष्टी साग्रसंगीत झाल्या.

“अजिबात घाबरायचं कारण नाही. तुम्ही ठणठणीत आहात. सगळे रिपोर्टस नॉर्मल आहेत.”

मी सुटकेचा नि:श्वास  सोडला.

पण तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा ताईची कटकट सुरू झाली, “कुठची डॉक्टरीण शोधून काढलीस ही? तसंही बाई डॉक्टर म्हटल्यावर मला शंका आलीच  होती. पण आता तर खात्रीच पटलीय. तिला काहीही येत नाही. मला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन चल. पैशाकडे बघू नकोस.”

मग मी दुस-या -तेही पुरुष डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. पुन्हा नव्याने टेस्टस, सोनोग्राफी सगळे सोपस्कार झाल्यावर त्यांनीही ताईला काहीही झालेलं नसल्याचा निर्वाळा दिला.

“ह्याच्यापेक्षा चांगला डॉक्टर…..”

“ताई, हे दोन्ही मुंबईतले बेस्ट डॉक्टर्स होते. तरीही तुला पटत नसेल, तर मी भावोजींना कळवते. ते तुलाही युएसला बोलावून घेतील. तुला काहीही झालेलं नसलं तरी तुझ्या दोन्ही बाजू काढून टाकतील आणि नंतर प्लॅस्टिक सर्जरी करतील. मग तर खूश?”

“नको ग. साहेबांना नको कळवूस. कदाचित तू म्हणतेस तसं डॉक्टरांचंच बरोबर असेल.”

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी बहिणी …. – भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

खरंच. ताईला घराबाहेरचं जगच ठाऊक नव्हतं. कसं असणार म्हणा?  कोणाच्या तरी लग्नाला गेलेली लावण्यवती ताई सासूच्या नजरेत भरली. खरं तर ती सतरा वर्षांचीच होती पण उफाड्याची होती. आईसारखीच देखणी होती. त्यांचा बंगला,  एकंदर श्रीमंती,  उमदा नवरा हे सगळं बघून आई आणि ताई,  दोघींचंही देहभान हरपलं आणि ताईचं लग्न झालं.

खरं तर बाबांना हे पसंत नव्हतं. ताईने निदान पदवी तरी घ्यावी,  असं त्यांना वाटत होतं.

“पदवी काय चाटायचीय? एवढा देखणा,श्रीमंत नवरा मिळाल्यावर माझी बाय सुखात डुंबेल” आईच्या या बोलण्याने दुखावलेला बाबांचा चेहरा माझ्या अजून लक्षात आहे. त्या दोघांमधल्या नात्याचा हा पदर तोपर्यंत कधी जाणवलाच नव्हता मला.

मग बाबांनी आपलं लक्ष माझ्यावर केंद्रित केलं.

तशी मी बाबांच्याच वळणावर गेले होते.  सुंदर नसले तरी दिसायला ब-यापैकी. पण बुद्धिमान. चेह-यावर आत्मविश्वासाचं तेज.

चांगलं शिकून सवरून उच्चपदावर  नोकरी करत होते. तिथेच विकास भेटला. बाबांना आवडला तो पण आईचा विरोध होता. दोन खोल्यांच्या घरात- तेही जॉइंट फॅमिलीत – राहणारा म्हणून. मी हट्टाने विकासशीच लग्न केलं.

पुढे आई कॅन्सरने आजारी होती,  तेव्हा बाबांना मदत करण्यात माझ्याएवढाच वाटा विकासनेही उचलला. कष्टांतही आणि आर्थिकही. जाण्यापूर्वी आई म्हणालीसुद्धा ,”शेवटी दिसणं, पैसा या गोष्टींपेक्षा माणसाचा स्वभाव महत्वाचा.”

ताई तेव्हा  स्वत:च्याच व्यापात गर्क होती. आई असताना एकदा आणि गेल्यावर एकदा अशी दोनदाच, ती फक्त भेटून गेली. भावोजींना थांबायला वेळ नव्हता म्हणून तीही लगेचच परत गेली. आता ही एकटीच येतेय म्हणजे भावोजींशी भांडून बिंडून  येतेय की काय?

मी ड्रायव्हरला आमच्या घराचा पत्ता, लॅन्डमार्क वगैरे सांगितलं.

“युवराज कुठे आहेत?”

‘युवराज?’  मला पूर्वीची आठवण झाली.

स्वप्नीलच्या वेळी माझे दिवस भरत आले, तेव्हा ताईचा फोन आला होता  ,”आई गेली म्हटल्यावर तुझं बाळंतपण मलाच करावं लागणार. ये तू इकडे. आमच्याकडे नोकर-चाकर आहेत. शिवाय रूम्सही भरपूर आहेत. तुझं पोर रात्रभर रडत राहिलं तरी कोणाची झोपमोड होणार नाही.”

ज्याची आम्ही  एवढी स्वप्नं बघत होतो  आणि विकास ज्याचा उल्लेख नेहमीच ‘प्रिन्स’ असा करायचा, त्या आमच्या  छकुल्याला ताईने पोर -तेही रडवं म्हणावं,  याचा मला इतका राग आला की मी आमच्याच घरी राहिले. मदतीला एक बाई ठेवून बाबा आणि विकासने माझं बाळंतपण निभावलं. बाबा तर म्हणायचेसुद्धा, “तू माझी एकुलती एक लेक आहेस, असंच  समजतो मी.”

पण एकंदरीत ताई बरीच बदललेली वाटत होती. मोठेपणा,  खवचटपणा खूपच कमी झाला होता. घराकडेही तिने फारसं बघितलं नाही.

जेवण  झाल्यावर विचारलं तिला, तर ती एकदम रडायलाच लागली. “मला वाटतं, मलाही आईसारखाच ब्रेस्ट कॅन्सर झालाय.”

“तू चेक-अप करून घेतलंस का तिकडे?”

“नाही अग. मला भीती वाटली, साहेबांना कळलं तर….”

“कळलं तर म्हणजे?  भावोजींना सांगितलं नाहीस तू अजून?”

“नाही. समजा,  मला एक बाजू काढून टाकायला सांगितली… तर? त्यांच्या मनातून साफच उतरेन मी. मला सोडलं त्यांनी, तर कुठे जाऊ ग मी?”

“असं का करतील भाऊजी?”

“तुला नाही कळणार माझं दु:ख. तुला असा आजार झाला आणि विकासने तुला सोडलं, तरी तू नोकरी करते आहेस. स्वत:च्या पायावर उभी आहेस.”

“एक मिनिट. समजा,  मला असा आजार झाला आणि माझ्या एक नाही,  अगदी दोन्ही बाजू जरी काढाव्या लागल्या,  तरी विकास मला अंतर देणार नाही. अग, नवरा-बायकोचं नातं फक्त शारीरिक थोडंच असतं?”

“आमच्यातलं नातं फक्त शारीरिकच आहे.”

“कशावरून?  बरं ते जाऊ दे. मुलांना तर तू नंतरही तेवढीच आवडशील ना?”

“खरं सांगू? माझा आणि मुलांचा संबंधच येत नाही फारसा. लहानपणापासून ते नोकरांकडेच वाढले. आता मोठे झाल्यावर तर काय, स्वत:च्याच विश्वात असतात. मघाशी स्वप्नील शाळेतून आल्या आल्या तुला बिलगला ना,  तसे ते कधी माझ्याजवळ आल्याचं मला आठवतच नाही.” इतक्या तटस्थपणे बोलली ती! जरासुद्धा विषाद नव्हता त्यात.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print