मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी बहिणी …. – भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

“एनी प्रॉब्लेम? आज एवढी चिडचिड का करतेयस?”  विकासचं हेच मला आवडतं.  मी त्याच्यावर चिडले,  करवादले तर तो इतरांच्या नव-यांसारखं माझ्यावरच न डाफरता शांतपणे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो.

“जाऊ दे. तुला  कळलं, तर तूही वैतागशील.”

“एक तर ‘जाऊ दे’ म्हणून शांत हो,  नाहीतर बोलून मन मोकळं कर.”

“अरे,  ताईचा फोन आला होता. तिचं काहीतरी काम आहे मुंबईत म्हणून आपल्याकडे राहायला येणार आहे.”

“नोsवेs. त्यांना सांग, हॉटेलमध्ये उतरा म्हणून. आमचं घर लहान आहे म्हणावं.”

“मी सांगितलं तिला तसं  पण रडत होती रे ती.”

“वा! पैसेवाली,  बंगलेवाली माणसं रडतात?”

“विकास, प्लीsज.”

“ठीक आहे. येऊ दे त्यांना. मी दादाकडे राहायला जातो .मला तो स्वत:चा मोठेपणा,  दुस-याला सतत खिजवणं वगैरे अजिबात आवडत नाही .त्यात पुन्हा सकाळच्या वेळी त्या बाथरूम अडवून बसणार.”

” आधीच मला एवढं टेन्शन आलंय आणि असं काय काय बडबडून तू ते आणखी वाढवतोयस.”

आता मी रडायला सुरुवात करणार,  म्हटल्यावर विकासने चटकन माघार घेतली, “ओके.ओके. डोन्ट वरी. आय अ‍ॅम विथ यू. आपण दोघं मिळून संकटाचा सामना करू या आणि लवकरात लवकर त्या संकटाला पळवून लावूया. बाकी तुझी ताई पळताना………..”

मग आम्ही दोघंही हसायला लागलो.

अर्थात तेव्हा हसू आलं,  तरी पूर्वीची आठवण डंख मारतच होती.

लग्नाला वर्ष व्हायच्या आतच आम्ही स्वत:चं घर -तेही वन बी-एच-के – घेतलं,  तेव्हा आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. आम्ही दोघांनी किती हौसेने सजवलं ते! आमचा स्वर्गच होता तो. मी कौतुकाने आई, बाबा आणि ताईला राहायला बोलावलं.

घरात शिरताक्षणीच ताई वैतागली,  “एवढं अगदी ‘घर घेतलं, घर घेतलं’  करत होतीस, ते हेsघर? आमच्या बंगल्यातली माझी खोलीच तुझ्या अख्ख्या घराएवढी आहे .आणि तुझ्या या बेडरूमएवढं माझं बाथरूम आहे.”

“अग, लग्नापूर्वी तू राहायचीस ते घर केवढं होतं, ते विसरलीस?” बाबा चिडले.

“ते आता जुनं झालं. आता मला ऐसपैस राहायची सवय झालीय. मला नाही बाई जमायचं एवढ्याशा खुराड्यात राहायला.”

माझे डोळे भरले. विकासचाही चेहरा पडला.

“आता तीन-चार तास प्रवास करून आलेय. लगेच परत जायचं त्राण नाहीय माझ्यात. माझा ड्रायव्हरही दमला असेल. पण उद्या सकाळी उठल्या उठल्या मी निघणार.”

सकाळी उठल्याबरोबर ती जी बाथरूममध्ये जाऊन बसली, ती बाहेर येण्याचं नावच घेईना. तासाभराने ती बाहेर आली. मग आरशासमोर पाऊण-एक तास तरी तिचं प्रसाधन चाललं होतं.

ती निघाली, तेव्हा मी तोंडदेखलंही “पुन्हा ये ग” म्हटलं नाही. विकास नाराजच होता. बाबाही चिडलेले होते. आईने मात्र “जाऊ दे. आपल्या संसारात सुखी आहे ना! मग झालं तर,”  म्हणून स्वत:चीच समजूत घातली.

“ड्रायव्हरला कुठे उतरवायला सांगू मी?  चांगल्या पॉश ठिकाणी सांग हं. तिथून तू मला तुझ्या घरी ने. त्याला कळायला नको, तू कसल्या जागी राहतेस ते.”

तिला पेडर रोडला उतरायला लावून आपण तिथे अजिबात न फिरकण्याचा  मला मोह झाला. पण मग कोणाला फोन करायचं तरी  ताईला सुचलं असतं की नाही,  कुणास ठाऊक.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – प्रत्येकवेळी ….. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – प्रत्येकवेळी ….. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नुकतंच उजाडलं होतं. सूर्याची कोवळी सोनेरी किरणं सगळीकडे पसरली होती. रस्त्यावर रहदारी वाढायला लागली होती. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या जागेत काही झोपड्या उभारलेल्या होत्या. आणि तिथे, आज दिवसभर काय काय करायचं यावर विचार चालला होता.प्रत्येक जण काही ना काही सांगत होता. त्यातली एक बाई तिच्या मनातली योजना सांगतांना म्हणाली की —-

“बिन्नी, अगं काल सकाळी केलेल्या खेळात तू तर कमालच केलीस अगदी. दोर तुटला तेव्हा तू त्याचं टोक कसं घट्ट पकडलंस, आणि त्याला लोंबकळत शेवटपर्यंत कशी पोहोचलीस हे कुणाला कळलंही नाही. पाहणाऱ्यांना वाटलं की तो तुझ्या खेळाचाच एक भाग आहे. किती टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी ….. बाप रे….. त्या खेळात सगळ्यात जास्त पैसे मिळाले.”

“खाली पडले असते ना तर मेलेच असते माय मी. बानी आणि भैयानी तो दोर खूप उंचावर बांधला होता. खाली पहातांना मला चक्कर येत होती खरंच.”

“अगं पोरी, दोर बांधण्यासाठी कात्रीसारखे जे बांबू बांधले होते ना, त्यातला एक बांबू ऐनवेळी मोडला. म्हणून तुझ्या बाने दोराचं दुसरं टोक झाडाला बांधलं होतं. पण आज परत असं होणार नाही. त्याने नवे बांबू विकत आणलेत. आणि ढोलही चांगले शेकून घेतले आहेत. आणि आज रविवार आहे ना? आज बाजारात चार-पाच ठिकाणी दोर बांधुयात. भैय्या आणि बा अगदी जोरात ढोल वाजवतील. तू हातात काठी पकडून नाचत नाचत अगदी आरामात दोरावरून पलीकडे जायचंस. आणि घाई अजिबात करायची नाही. लोक अगदी श्वास रोखून तुझ्याकडे बघत असतात. त्या दोरावरून चालत दुसऱ्या टोकावर पोचायला तू जेवढा वेळ लावशील ना, तितकी लोकांवर जास्त छाप पडते, आणि मग त्यांचे खिसे जास्त मोकळे होतात. आणि हो, लक्षात ठेव, दोर कितीही उंचावर असला तरी जमिनीकडे अजिबात बघायचं नाहीस. तसं जर पाहिलंस तर डोळ्यावर अंधारी यायला लागते आणि मग तोल बिघडतो ….” बोलता बोलता आईने आणखी दोन चॉकलेटं बिन्नीपुढे धरली.

पण बिन्नीला ती चॉकलेटं घेण्याची इच्छाच झाली नाही. एकदम मान उंचावून तिने सूर्याकडे पाहिलं. जणू काही त्याच्यातली ऊर्जा ती स्वतःत भरून घेत होती. आणि तिने अचानक विचारलं ….. “आई तुम्ही लोक दरवेळी मलाच का चढायला लावता त्या दोरावर? भैय्याला का नाही चढवत कधी?”

“अगं आपल्या या सबंध वस्तीतल्या एका तरी मुलाला असा दोरावरचा खेळ करतांना कधी पाहिलं आहेस का तू? जास्त शहाणपणा सुचायला लागला आहे तुला. चल पटकन आंघोळ करून घे. गरम गरम पाणी काढून देते तुला….” असं म्हणत बिन्नीची आई उठून बाहेर गेली आणि उघड्यावर पेटवलेल्या चुलीतला विस्तव फुंकर मारून तिने आणखी फुलवला.

बिन्नीचे डोळे भरून आले होते… ते दुःखाने की संतापाने हे तिलाही सांगता आलं नसतं. डोक्यात एकच विचार घुमत होता—” म्हणजे एक वेळ मुलीचा जीव गेला तरी चालेल यांना…. पण मुलाचा?

मूळ हिंदी कथा : श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ महत्व (भावानुवाद) ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

 

☆ जीवनरंग ☆ महत्व ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

मोहल्ल्याचा कचरा खरकटं ज्या कचराकुंडीत टाकले जाते; त्याच्या आजूबाजूसही कचर्‍याचा ढीग साचलेला असतो. पॉलिथिनच्या पिशव्या, वर्तमानपत्राचे कागद, नारळ, तुटलेले कप, काचेचे तुकडे, फुटक्या बशा, फाटक्या चपला बूट, कपड्यांचा चिंध्या आणि काय न् काय!

आतासुद्धा त्या कचर्‍याच्या पसार्‍यात गाई, बकर्‍या, कुत्री तोंड खुपसत हिंडत आहेत. त्याबरोबरच माशांच्या झुंडीच्या झुंडी त्यावर भिनभिनताहेत. इतक्यात दोन दहा-बारा वर्षांची पोरं तिथं आली, त्यांच्या हातात प्लास्टिकची मोठी पोती होती; त्यांना कचरा वेचून विशिष्ट वस्तू पोत्यात टाकायच्या होत्या. गाई, बकर्‍या, कुत्रे आणि पोरं सगळेच आपल्या उपयोगी वस्तु त्या कचर्‍यात शोधत होते.

अचानक एका पोराच्या हातात एका पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठाचे पान आले, ज्यावर भारताचा नकाशा, तिरंगा झेंडा आणि काही नेत्यांची चित्र छापली होती.

त्याने दुसर्‍याला ते दाखवत विचारले, ‘‘पाहा तर, हे काय आहे?’’

‘‘काय माहीत, असेल काही तरी, पण आपल्या कामाचे नाही.’’ तेवढ्याच त्याची दृष्टी दुसरीकडे गेली, जिथे सिनेमाविषयक मासिकाची काही पाने पडली होती. झडप मारून त्याने ती उचलली आणि म्हणाला, ‘‘पाहा तर, हे काय आहे?’’

‘‘अरे ही तर आपली श्रीदेवी आहे, ही माधुरी दीक्षित आणि हा अमिताभ!’’ त्यांचे डोळे एकदम लकाक् लागले.

‘‘आपण ही चित्रं आपल्या खोलीच्या भिंतीवर लावू…’’ दोघं मग खाली बसली, आपल्या फाटक्या-मळक्या शर्टने त्या चित्रांवर लागलेली घाण पुसली आणि घडी करून नीटपणे खिशात ठेवली.

मग शांतपणे त्यांनी कचरा निवडण्याचा आपला उद्योग परत सुरू केला.

मूळ हिंदी कथा – सौभाग्य चिन्ह – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 5 ☆ श्री आनंदहरी

 ☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 5 ☆ श्री आनंदहरी ☆ 

तो अचानक घरी आलेला पाहून त्याच्या आईला काळजीही वाटली होती आणि खूप आनंदही झाला होता. ‘ती का आली नाही?’ असे आई आपल्याला विचारेल असे त्याला वाटत होतं पण आईने काहीच विचारले नाही की बाबांनी नेहंमीसारखी तिची क्षेम-खुशाली विचारली नाही.. याचे त्याला राहून राहून आश्चर्यही वाटत होते आणि ‘सुंठीवाचून खोकला जातोय’ याचा आनंद ही होत होता.

घरी आल्यावर ज्या एका प्रश्नाने तो अस्वस्थ होता तो उद्भवलाच नव्हता. दुसऱ्या दिवशी कितीतरी वर्षांनी तो गावात फेरफटका मारून गावातच असणाऱ्या काही मित्रांना भेटून गप्पा मारून आला होता. तो आला होता त्या दिवशीच्या अस्वस्थतेचा मागमूसही त्याच्या मनात उरला नव्हता. ‘आपण उगाचंच फार विचार करत होतो, घरी यायचं टाळत होतो.’ असा विचार त्याच्या मनात येत होता.

बाबानी मळ्यात जाताना त्याला ‘येतोस?’ का विचारले आणि तो झटकन तयारही झाला. त्यालाही मळ्यात जाऊन यावे असे वाटत होतंच. तो शाळेत असताना मळ्यात गहू, हरभरा असायचा एखादा तुकडा खपली गहू ही केलेला असायचा.. भाजीचे चारदोन वाफे ही असायचे.. मळ्यात पाऊल ठेवताच त्याला हे आठवलं. आता जास्तीत जास्त ऊसच होता. गहू, हरभरा, खपली केली होतीच पण पोटापूरती. रानातल्या छपरात एक बाजलं टाकलेलं होतं. बाबा म्हणाले, “ऊसातली वैरण काडंस्तवर बस वाईच सपरात निवांत…”

“मी पण येतो ..”

“नगं, तुला सवं न्हाय ऱ्हायल्याली.. आलोच मी ..”

बाबा वैरण काढायला गेले.. तो मळ्यात फिरत राहिला.  तो नोकरीला लागल्यावर दुसऱ्याच वर्षी मळ्यात दुसरी विहीर काढली होती. पाईपलाईन केली होती.. तेंव्हापासून बाबांची मोट सुटली होती.. नुसतं बटन दाबलं की साऱ्या मळ्यात पाणी दौडत होतं.. तो फिरून येऊन बांधावरच्या आंब्याखाली जाऊन गार सावलीत बसला. कितीतरी दिवसांनी तो मळ्यात असा  निवांत आला होता.. कसलीही घाई नव्हती, गडबड नव्हती.

बाबांनी वैरणीचं ओझं छपराजवळ टाकलं आणि तो आंब्याखाली असणार हे ठाऊकच असल्यासारखे खांद्यावरच्या टॉवेलने घाम पुसत त्याच्याजवळ आले.

“आलास व्हय रं फेरी मारून ?”

“होय. बरेच दिवस जमलंच नाही यायला.. पण मळ्यात आले की जीव रमतो चांगला..” काहीतरी बोलायचं म्हणून पण मनातलं तो बोलून गेला.

“व्हय रं, अजून तुझी नाळ हाय मातीशी .. त् तुला ब्येस वाटणारच रं…  आरं, येक डाव नाळ जुळली का मग न्हाय गमत त्येच्याबिगर .. मन ऱ्हातच न्हाय मग माणूस असूदेल न्हाय तर गावची माती. आन नाळ जुळायबी टाइम लागतो. पोरा, माणसाचं कसं असतंय बघ, सुकाळाची धा सालं ध्येनात ऱ्हात न्हाईत पर दुष्काळाचं एक साल तो इसरता इसरत न्हाई बग.. आरं, सुक्यात वलं बी जळून जात असतं..तसेच हाय आयुष्याचे.. आरं आपलीच पाच बोटं सारखी नस्त्यात ततं दोन माणसं सारखी कशी असतीली रं?.. अरं, शेजार शेजारी दोडका न दुधी टोकला तर दोन्हीबी संगच वाढतील, एकमेकांत गुततीली बी पर म्हणून दोडका दुधीगत आन दुधी दोडक्यागत कसा आसंल रं? आरं, तू कायबी बोलला न्हाईस तरी आय-बा ला काईचं उमगत न्हाई असे न्हाई…  सूनबाई येत न्हाई ह्येचं वाईट  वाटतं.. पर म्हणून ती फकस्त वाईटच हाय आसं नसतंय रं… परत्येक माणसात चांगलं वाईट असायचंच आन ती आस्तय ती बी फकस्त दुसऱ्याच्या नजरंत …  परपंचा कुणाचाबी असुदेल त्यो असाच अस्तुय आन फुडबी तसाच ऱ्हाणार हाय.. .. कवा आपुन दोन पावलं माग तर कवा पुढं जायाचं आस्तं.. माणूस एकमेकांच्या दिशेनं चालाय लागलं तर जवळ ईल आन ईरुद्ध दिशेला चालाय लागला तर…? आरं , नाती जुळणं, तुटणं असुदेल न्हायतर माणसाचं असणं, नसणं असुदेल.. येवडंच नव्हं तर जगातलं समदंच  एका घटकंचा खेळ असतोय रं.. आरे, परपंचातलं भांडान बी तसंच… तेवढी येक घटका टाळाय पायजे येवडं ध्येयात ठेव पोरा…”

तो बाबांचं ऐकत होता.त्यांना न बोलता, न सांगताही सारेच कळले होते… ते जे म्हणाले ते सारेच खरे होते.. आयुष्यातील सारेच क्षणिक असते ,.. त्याच्या -तिच्यातील राग, लोभ, मतभेद भांडण तंटा सारेच क्षणिक होतं, एका घटकेचाच खेळ होता …. तो क्षण, ती घटका विसरली तर…? तो क्षण तिथेच सोडून दिला तर?

तो उठला त्याने फोन लावला, “उद्या सकाळच्या बसला बस… मी वाट पाहतोय… बसशील ना?”

त्याच्या बाबांना फोनवरचे तिकडचे उत्तर ऐकू आले नव्हते तरी ते उत्तर त्याच्या खुललेल्या चेहऱ्यावरून कळले होते.. ते खुशीत हसले.

◆ कथा संपन्न ◆

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 4 ☆ श्री आनंदहरी

 ☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 4 ☆ श्री आनंदहरी ☆ 

आई – बाबांनी तिच्याबद्दल विचारलं तर काय सांगणार ? असा प्रश्न पडल्यामुळे गेले दोन दिवस त्याने मनातून गावी जावेसे वाटत असूनही स्वतःला रोखलं होते. दोन दिवस तसे खूपच चांगले गेले असे त्याला वाटत होतं.. पण मनात गावी जाऊन यायची इच्छा प्रबळ होऊ लागली होती. तो ती इच्छा जितकी मनात दाबत होता तितकीच ती उसळी मारून वर येत होती.

आपल्या मनातील, वागण्यातील बदल आपल्यापेक्षा आपल्या समोरच्या, जवळच्या व्यक्तीच्या चटकन लक्षात येत असतो..  दुपारी एकत्र चहा पीत असताना ऑफीसमधला त्याचा जवळचा मित्र म्हणाला,

“काय रे अस्वस्थ दिसतोयस ? काही अडचण आहे काय ?”

क्षणभर तो त्या मित्राकडे पहातच राहिला. पुढच्याच क्षणी म्हणाला,

” काही नाही रे… कधी  वाटतंय गावी जाऊन आई- बाबांना भेटून यावे… कधी वाटतंय नको जायला..”

मित्राने जायला नको वाटण्याचे कारण विचारलं नाही पण म्हणाला, “धी कोणता विचार मनात आला होता?”

“गावी जावे असा..”

“मग टाक रजा आणि जा … मी तर तसेच करतो. मला तर असे वाटतं पहिला विचार काळजातून येतो.. आणि दुसरा नकारात्मक विचार मेंदूतून येतो.. हृदय आणि बुद्धी यांच्यातील हे युद्ध नेहमीच चालू असते रे आपल्या मनात..”

मित्रांचे बोलणे ऐकता ऐकताच त्याचे गावी जायचे निश्चित झाले होते.

दुसऱ्यादिवशी बस मध्ये बसताच त्याला त्याच्या आणि तिच्या पहिल्या प्रवासाची आठवण झाली..  क्षणभर मनात आठवणींची मालिकाच सुरू झाली.. आणि शेवटी तिच्या बेंगलोरच्या बदलीच्या वाक्क्यापाशी येऊन थांबली..  व्यथित मनाने त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं.. बस वेगात धावत होती जवळ पाहिलं तर गती जाणवत होती पण दूरवर  पाहिलं तर गती न जाणवता दृश्याची स्थिरता जाणवत होती… पावसाळ्याचे दिवस नसतानाही आभाळ दाटून आले होते.. अवेळी पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. ‘ असा अवेळी पाऊस सुखावह की दुःखावह ? ‘ अचानक त्याच्या मनात आले..

मनात आलेल्या या प्रश्नाने तो उगाचच दचकला.. त्याने प्रश्न झटकण्याचा प्रयत्न केला पण तो प्रश्न मनातून जाईन.. कोणत्याही प्रश्नाचे, समस्येचे असेच असते, जोवर आपण उत्तर शोधत नाही, उत्तर सापडत नाही तोवर ती सतावत राहते..  मोठी वाटत राहते.. तो क्षण सरला, उत्तर सापडले, उकल झाली की मात्र किरकोळ वाटत राहते. त्याचे मन विचार करत राहीलं..

‘असा पाऊस पीक काढणीच्यावेळी आला तर दुःखदायक वाटतो पण तोच दुष्काळी मुलखात पडला तर सुखावह ठरतो’ त्याच्या मनात उत्तर आले आणि त्याला बरे वाटले… म्हणजे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट हे भावतालच्या परिस्थितीनुसार ठरते तर. त्याच्या मनात आले.

तो तासाभरात गावी पोहोचणार होता…’आपल्या मनात कधी कोणता विचार येईल काही सांगता येत नाही.. ‘ त्याच्या मनात येऊन तो स्वतःशीच हसला.  पुढच्याच क्षणी’ घरी गेल्यावर आई तिच्याबद्दल विचारेल तेंव्हा काय उत्तर द्यावे?’ असे त्याच्या मनात आलं आणि तो विचार करतच मागे डोके टेकून बसला.. त्याने डोळे मिटले.. काही क्षणातच शिणल्यामुळे की रात्री पुरेशी  झोप न झाल्यामुळे की खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळुकीमुळे कुणास ठाऊक पण त्याची झोप लागली.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – मत्सरी असल्लोष्टो ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – मत्सरी असल्लोष्टो ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ११. मत्सरी असल्लोष्टो

सुभद्र्पूर नावाच्या नगरात तीनशे घरे होती. त्या घरांमध्ये राहणारे सगळे जण  भाग्यशाली होते. मोठे मोठे  महाल बांधून  तेथे अतिथींचा आदर-सत्कार करीत ते सुखाने जीवन व्यतीत करीत होते. त्याच गावात असल्लोष्टो नावाचा ब्राह्मण राहत होता.  त्या अति दरिद्री ब्राम्हणाला अनेक पुत्र, सुना, नातवंडे होती.  तो दररोज त्या तीनशे घरी जाऊन भिक्षा घेऊन तिसऱ्या प्रहरी घरी येत असे.

असेच एकदा भगवान शंकर व देवी पार्वती आकाशमार्गाने संचार करत असताना त्या नगराच्या जवळ आले. तेथे विमान थांबल्यावर पार्वतीने पाहिले, की तिथे तीनशे  घरांमध्ये राहणारे सगळे भाग्यशाली आहेत  व फक्त एका घरात एक ब्राह्मण दारिद्र्यात जीवन व्यक्तीत करतोय.  तेव्हा देवी पार्वती “ या ब्राह्मणावर कृपा करा”  असे भगवानांना  म्हणाली.  ते ऐकून हसत परमेश्वर म्हणाले, “हा माणूस दुष्ट प्रवृत्तीचा आहे. ह्याच्यावर कृपा केली तर हा कधीच संतुष्ट होणार नाही. उलट येथील लोकांना त्यामुळे केवळ उपद्रवच होईल.” “तरी पण याच्यावर कृपा करावी” असे पार्वतीने म्हटल्यावर भगवान “ठीक आहे” असे म्हणाले.

जेव्हा देवीसह भगवान भूमीवर अवतरले, तेव्हा असल्लोष्टो नुकताच तीनशे घरी भिक्षा मागून मिळालेले अन्न घेऊन दमून भागून घरी येत होता. त्याला बोलावून भगवान म्हणाले, “ अरे बाबा, एवढे कष्ट का घेतोस? मी तुला एक रत्न देतो. त्याची तू पूजा केल्यावर तू जे मागशील ते तुला मिळेल. पण त्यापेक्षा दुप्पट तुझ्या गावातील तीनशे घरांना मिळेल.” एवढे बोलून व त्याला रत्न देऊन भगवान अंतर्धान पावले.

ब्राम्हणाने घरी येऊन स्नान वगैरे करून रत्नाची पूजा केली आणि धान्याची शंभर मडकी, सुवर्णमुद्रांची दहा मडकी, शंभर गायी व एक सोन्याचा महाल मिळावा अशी प्रार्थना केली. एका रात्रीतच त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या व त्याच्या शेजाऱ्यांनाही त्याच्या दुप्पट मिळाले.

ते पाहून आपले भाग्य इतरांपेक्षा कमीच आहे हे जाणून असल्लोष्टो आनंदी तर झाला नाहीच, पण त्याला अतिशय दुःख झाले. शेजारी पूर्वीपेक्षाही धनवान झाले हे पाहून तो मत्सराने जळायला लागला. तेव्हा त्याने पुन्हा रत्नाची पूजा करून “काल प्राप्त झालेले सर्व नष्ट होवो” अशी प्रार्थना केली. तेव्हा त्याला प्राप्त झालेले सगळे भाग्य नष्ट झाले. इतरांचेही सगळे भाग्य तर नष्ट झालेच, पण ते सगळेजण मृत झाले. ते पाहून असल्लोष्टोची ईर्ष्या शमली.

असेच परत एकदा भगवान व देवी पार्वती जेव्हा त्या नगरात आले तेव्हा असल्लोष्टोचे उपद् व्याप जाणून त्याच्याकडून ते रत्न त्यांनी परत घेतले, व तेथील सर्व लोकांना जिवंत करून पूर्वीप्रमाणेच भाग्यवंत केले व अंतर्धान पावले. असल्लोष्टो पूर्वीप्रमाणेच भिक्षाटन करू लागला.

तात्पर्य – दुसऱ्याचे फळफळणारे भाग्य सहन न होणाऱ्या व्यक्तीचे कधीच भले होत नाही.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 3 ☆ श्री आनंदहरी

 ☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 3 ☆ श्री आनंदहरी ☆ 

खानावळीतून जेवून परतत असताना रस्त्यावरून चालता चालता त्याला त्याची – तिची पहिली भेट आठवली होती. ती त्याला भेटली होती ते प्रवासात.. तो चार दिवस रजा काढून गावी निघाला होता.. बस मध्ये ती नेमकी त्याच्या सीटवर होती.. पण तो अगदी खिडकीकडे सरकून खिडकीतून बाहेर पहात आपल्याच विचारात गुंग झाला होता. बाबांनी अचानक त्याला रजा काढून गावी यायला सांगितलं होतं. कारण सांगितलं नसलं तरी त्याला ते ठाऊक होतं. अलिकडे घरात त्याच्या लग्नाचाच विषय चालू होता.

बस कंडकटर ” तिकीट ss तिकीट ” करीत त्याच्या सीटजवळ आला आणि तो विचारातून भानावर येऊन तिकिटासाठी पैसे काढत असतानाच तिने पैसे देवून तिकीट मागितले. तिचे गाव ऐकून त्याला तसे काही आश्चर्य वाटण्याचे कारण नसूनही आश्चर्यच वाटलं.. तिचे उतरायचे ठिकाण त्याच्या गावाच्या जवळच दोन गावे पुढं होतं.. तिकीट घेऊन त्याने खिशात ठेवत असताना त्याने पुन्हा एकदा तिला पाहिलं.. तो पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला पण काहीही कारण नसताना मनात तिचा विचार आला. कोण असेल ? इकडे सहज आली असेल की नोकरी करत असेल की पाहुण्यांकडे आली असेल ?  त्याची नजर पुन्हा तिच्याकडे वळली..तेव्हा ती नेमकी त्याच्याकडेच पहात असल्यासारखं  त्याला वाटलं. आपल्याकडेच पहात आहे की खिडकीतून बाहेर पहात आहे हे काही त्याला ठरवता येईना.. पण ती छानच आहे कुणालाही आवडण्यासारखी हे मात्र त्याच्या मनाने तिला पाहता क्षणीच ठरवून टाकलं होतं.

थोड्या वेळातच त्यांच्यात औपचारिक बोलणंही झालं. ती ही गावी निघाली होती. त्याच्यासारखीच ती ही नोकरीच करत होती आणि ती आपल्यासारखीच ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमासाठी निघाली आहे हे त्याला तिने न सांगताच उमगलं होतं.

स्टॉप आल्यावर तो खाली उतरला आणि तिचा निरोप घेऊन घरी आला होता. गावातले चार दिवस मजेत गेले होते. तो परतताना बसमध्ये चढताच त्याची नजर बसमध्ये फिरली. नेमकी ती त्याच गाडीत होती.. न ठरवूनही ठरवल्यासारखी. त्याला पाहून ती ओळखीचे हसली. तिच्या पलीकडच्या सीटवर जागा होती. तो तिथं जाऊन बसला होता आणि लवकरच तिच्या शेजारची जागा रिकामी होताच तिच्या सीटवरही. वेगवेगळ्या विषयावरच्या मनमोकळ्या गप्पात वेळ कसा गेला हे त्याला समजलेच नाही.

भेटी होत राहिल्या, गप्पा होत राहिल्या. तशी ती चांगलीच होती कुणालाही आवडण्यासारखी..  त्यालाही आवडली होती.. हे आवडणं दुरून डोंगर आवडण्यासारखंच असते हे त्याला ठाऊक नव्हतं. डोंगराचा खडतरपणा, खडकाळपणा हा दुरून कधीच जाणवत नाही.

त्याने फ्लॅट घेतला तेंव्हा कधी नव्हे ते आई -बाबा दोन दिवसासाठी आले होते.. ती ही आली होतीच. आईबाबांनाही ती आवडली होती. आपल्याच भागातली, खेड्यातली हा त्यांच्या दृष्टीने प्लस पॉईंट होता.

तो फ्लॅटवर परतला होता तरी त्याच्या मनातील आठवणींची दृष्यमालिका सुरूच होती.

लग्नानंतर काही काळातच त्याला जाणवले होते की तिची स्वप्ने वेगळी होती.. आवड वेगळी होती.. अपेक्षा वेगळ्या होत्या..अगदी दुसऱ्या टोकाच्या… त्या दोन टोकांवर पूल बांधणे केवळ अशक्य होते ही जाणीव त्यालाही झाली.. तिलाही झाली.. विसंवाद, विवाद आता नकोसे वाटू लागले होते… एके दिवशी ती म्हणाली,

“उद्या मी आईकडे जातेय.. पंधरावीस दिवसांनी परत येईन.. माझी बदली बेंगलोर ला होऊ शकते..मला तिकडे जायचंय…आल्यावर काही दिवसातच जाईन मी . ”

तो काहीच बोलला नव्हता.. बोलू शकला नव्हता.

 क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 2 ☆ श्री आनंदहरी

 ☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 2 ☆ श्री आनंदहरी ☆ 

त्याने कुकर लावायचा म्हणून किचन कट्ट्याच्या ट्रॉलीमधून काढलेला कुकर तसाच कट्ट्यावर ठेवला आणि सोफ्यावर जाऊन बसला. मन एखाद्या माहेरवाशिणीसारखं गावासाठी ओढाळ झालं होतं. आई- वडील, गावातील घर, अंगण, त्याचा मळा, घराच्या परसात असणारा गोठा, त्यातील बैलजोडी, गाई-गुरं, तो शाळेत असतानाचे त्याचे सोबती या साऱ्यांच्या आठवणीत मन रमून गेलं होतं..

नोकरीसाठी इथं शहरात रहात असला तरी त्याच्या मनाच्या मोठया कप्प्यात अजूनही गाव नांदतं होतं. त्याला खूपदा वाटायचं की सारे सोडून तिथं जाऊन राहावं. त्याला गाव खूप आवडायचं पण ती तशी खेड्यातली असूनही तिला मात्र शहराचा लळा लागला होता.. गावाकडे जाऊया म्हणलं की तिची तयारी नसायची. सुरवातीला काही वेळेला तो एकटाच एक दोन दिवसासाठी गावी जायचा. तिथं गेला की आई- बाबा, शेजारी-पाजारी तिचीच चौकशी करायचे.. ती का आली नाही म्हणून विचारायचे. तो तिच्या न येण्याची काहीतरी थातूर – मातूर कारणं सांगायचा पण तशी कारणं सांगणेही त्याच्या जीवावर यायचं.

ते सारेच तिला घेऊन यायला सांगायचे. त्यांचेही बरोबरच होतं.. लग्नानंतर पहिल्या वर्षीच ती एक दोनदा तिथं आली होती.. त्यानंतर घरी जाऊया म्हणलं की तिने नकारघंटा वाजवायला सुरवात केली होती. तो कधीतरी एकटाच उभ्या उभ्या जाऊन यायचा. मनात खूप असले तरी तिच्यामुळे तो जाणे टाळायचा .या साऱ्याचा त्याला खूप त्रास व्हायचा. कधी कधी मन उद्विग्न व्हायचं. मनाची चिडचिड व्हायची. पण नंतर नंतर त्याच्या मनाने सारे स्वीकारायला सुरवातही केली होती. तो गावाकडे जाण्याचा विषयही तिच्यासमोर काढायचा नाही की तिला तसे सुचवायचाही नाही तरीही मनाच्या तळात कुठंतरी नैराश्य भरून राहीलं होतंच.

कितीतरी वेळ तो तसाच सोफ्यावर पडून याच विचारात गर्क झाला होता.त्याला भुकेची जाणीव झाली तसा तो उठला, बेसिनजवळ गेला. तोंडावर पाणी मारलं. तोंड पुसत असताना  त्याचे लक्ष किचन कट्ट्याकडे गेलं. त्याने कट्ट्यावर कुकर तसाच ठेवला होता. ‘ राहू दे कुकर लावायचं.. बाहेरूनच जेवून येऊया..’ असा विचार मनात आला तसा तोंड पुसत पुसतच तो कट्ट्याजवळ गेला.त्याने ट्रॉली बाहेर ओढून कुकर जागेवर ठेवला. नॅपकिन जाग्यावर ठेवून त्याने शर्ट चढवला आणि बाहेर पडला.

बाहेर पडताच त्याची पावलं त्याच्या नेहमीच्या खानावळीकडे वळली. नोकरीला लागल्यापासून काही वर्षे तो तिथंच जेवत होता. तिथलं घरगुती साधे जेवण त्याला आवडायचं. घरगुती खानावळ असल्याने व्यावसायिकता नव्हती. घरगुती या शब्दप्रमाणेच स्वयंपाक करण्यात आणि वाढण्यात घरच्यासारखा आपलेपणा आहे असे त्याला नेहमीच वाटायचं, जाणवायचं.

“या.. बऱ्याच दिवसांनी आलात ? ‘ पुन्हा ब्रम्हचारी ‘ वाटतं ?”

हसत हसत आपलेपणाने खानावळवाल्या काकांनी स्वागत केलं. आपले जुने मेंबर लग्नानंतर बायको माहेरी गेली की जेवायला इथंच येतात हा अनुभव त्यांना होताच. तो ही मोकळेपणाने हसला. काकांची, मावशींची चौकशी केली.

तो दीड-दोन वर्षांनी आला असला तरी किरकोळ बदल सोडता सारे तसेच होतं. आपलेपणात जराही बदल झालेला नव्हता.

त्याला ते सारे वातावरण , तिथलं जेवण खूप आवडायचं. तो अनेकदा तिला म्हणाला होता, ‘ अगं , खाऊन तर बघ तिथलं जेवण..चेंज म्हणून  कधीतरी जाऊ या जेवायला तिथं.. नाहीतर डबा आणतो तिथून.’… पण तिचा ठाम नकार असायचा. तिला हाय-फाय हॉटेलात जेवायला जायचं असायचं.. तेच तिला आवडायचं.

जेवून तृप्त मनाने बाहेर पडता पडता मावशी आतून बाहेर आल्या. त्यांनी त्याची, कधीही न पाहिलेल्या तिची चौकशी केली आणि म्हणाल्या,

“एकदा घेऊन या की मिसेसना.. ”

ती कधीच यायला तयार होणार नाही हे ठाऊक असूनही तो बाहेर पडता पडता हसत हसत आश्वासक स्वरात म्हणाला,

“हो. नक्की येतो. ”

येतो म्हणालो असलो तरी आपण तिला कधीही घेऊन येऊ शकणार नाही आणि ती ही येणार नाही..हे त्याला पक्के ठाऊक होते.. खानावळीतील वेळ तसा चांगला गेलेला होता .. पण परतताना मनात तिचाच विचार होता.

 क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 1 ☆ श्री आनंदहरी

 ☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 1 ☆ श्री आनंदहरी ☆ 

तो घरी परतला तेव्हा मनावरचं मणामणाचं ओझे उतरल्यासारखा तो रिलॅक्स झाला होता. तो सोफ्यावर आरामात पहुडला.. टीव्हीचा रिमोट समोर टीपॉयवर पडला होता पण त्याला टीव्ही चालू करावा असे काही वाटलं नाही उलट घरातली शांतता हवीशी वाटू लागली होती.  त्याने खिशातून सिगारेटचे पाकीट आणि लायटर काढून टीपॉयवर ठेवला पण त्याला सिगारेट ओढविशीही वाटली नाही.

‘अलिकडे आपले सिगारेट ओढायचं प्रमाणही खूपच वाढलंय…’ सिगारेटचे पाकीट ठेवता ठेवता उगाचंच त्याच्या मनात आलं आणि मनात आलेल्या त्या विचाराने तो स्वतःशीच हसला. मनातलं विचाराचं वादळ शांत झाल्याचे त्याचे त्यालाच जाणवत होतं. त्याला घरातील एकांत सुखावह वाटत होता. हे एकटेपण हवंसं वाटत होतं. खूप दिवसानंतर ऑफिसमधून लगेच घरी परतावे असे वाटू लागले होते. घराची ओढ वाटू लागली होती.. त्याला जेंव्हा मनाची ही ओढ जाणवली तेंव्हा क्षणभर त्याचे त्यालाच आश्चर्य वाटलं होतं.

‘खरंतर आपल्याला कोणत्या वेळी नेमकं काय वाटेल , काय हवेसे वाटेल हे आपल्यालाही उमजत नाही हेच खरे..’ सोफ्यावर पाय ताणून तो आरामात पहुडला असताना त्याच्याही नकळत मनात आले.. आणि मनात आलेल्या विचाराने तो काहीसा अस्वस्थ झाला…’ म्हणजे आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही काय ?’ आणि आपण आपल्या स्वतःलाच ओळखू शकत नसू तर मग दुसऱ्याला पुरेपूर  ओळखण्याचा दावा तरी कसे करतो आपण..?  स्वतःच्याच मनात आलेल्या विचाराने निर्माण झालेली अस्वस्थता कणाकणाने  वाढतच गेली ..

‘जाऊदे. उगाच काहीतरी विचार करत बसतो आपण..’ असे पुटपुटत त्याने मनातली अस्वस्थता झटकण्याचा प्रयत्न केला.. त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून त्याने टीव्ही चालू केला .. तो टीव्ही पाहू लागला. त्याला थोडे बरेही वाटू लागलं..  त्याला त्याचे डोळे टीव्ही पाहू लागले होते पण तो पहात होता त्यातलं काहीच मनापर्यंत पोहोचतच नव्हतं. काही वेळातच त्याला हे जाणवलं तेंव्हा तो दचकलाच.

‘अरे, काय झालंय काय आज मला …?’

दुसऱ्या कुणाला तरी विचारावं तसा तो पुटपुटला आणि दुसऱ्याच क्षणी झटकन सोफ्यावरून उठला. काहीसा विचार करून तो थेट बाथरूममध्ये घुसला..

काही वेळाने गरम पाण्याने मनसोक्त अंघोळ करून तो बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याला ताजेतवाने वाटत होते.

‘काय करावे? मस्तपैकी खिचडीचा कुकर लावावा काय ?’

मनात येताच तो किचन कट्ट्याजवळ गेला. त्याने डावीकडची ट्रॉली बाहेर ओढून कुकर बाहेर काढला.

त्याला आईची आठवण झाली. आई म्हणायची, ‘काहीही शिकलं तर ते कधीच वाया जात नाही..’

कॉलेजच्या शिक्षणासाठी परगावी राहावे लागणार हे निश्चितच होतं, त्यामुळे त्याच्या आईने आधीपासूनच त्याला हळू हळू स्वयंपाक करायला शिकवले होते. तो कॉलेजसाठी खोली घेऊन राहिला होता तेंव्हा त्याला स्वयंपाकाचे शिक्षण उपयोगी पडलं होतंच पण नंतर नोकरी लागल्यावरसुद्धा त्याला बाहेरच्या जेवणाचा कंटाळा यायचा म्हणून तो सुट्टीदिवशी, तसेच एरवीही कधी वेळ मिळाला की  खोलीवरच स्वयंपाक करायचा. त्याला आई-वडिलांची तीव्र आठवण झाली. ‘ कितीतरी दिवसात, नव्हे महिन्यात आपण गावी गेलेलो नाही..’ हे त्याला जाणवलं. ‘चार दिवस रजा काढून जाऊन यावं काय ?’

‘नको ! आत्ता गेलो की आई तिची चौकशी करणार .. मग सांगणे ही अवघड आणि न सांगणेही अशक्य… तेव्हा नकोच.’

त्याच्या मनात गावाकडे जाण्याचा विचार आला तसे त्याच्या मनात गावाकडच्या आठवणींचा झुला झुलू लागला होता.

 क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – गोमाता (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग : लघुकथा – गोमाता (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

त्या म्हाताऱ्या गाईचे  गल्लीमध्ये जे हाल होत होते, ते सगळ्यांना दिसत होते.पण विरोधी बोलून संकट कोण ओढवून घेणार?

——–ही गाय म्हणजे तीच ,की जिला काही वर्षांपूर्वी ‘पटेल’नी खरेदी करून आणली होती. ते गाईचं  खूप खूप कौतुक करत होते अगदी न दमता.10लीटर दूध द्यायची, दूध, दही, तूप सर्वानी भरपूर  खाऊनसुध्दा, रतीब घातले नि एका वर्षांतच तिची किंमत पटेलानी वसूल केली.

हळूहळू सगळ्या गल्लीचीच ती लाडकी गोमाता झाली. सगळे तिला लाली किंवा कपिला या नांवाने बोलावू लागले. गल्लीतल्या प्रत्येक चौकात  पहिली चपाती लालीच्या नांवानें भाजली जाऊ लागली.पटेल लालीला सकाळ संध्याकाळ गल्लीत फिरवून आणायचे. लाली सगळ्यांची अतिशय लाडकी झाली होती.

पटेलांच्या गोठ्यात गाईला वासरंही खूप झाली. त्यातूनही पटेलाना बराच पैसा मिळाला. परंतु कुठपर्यंत? कालचक्र फिरत असतं.लाली म्हातारी झाली. ती दूध देईनाशी झाली. मग तिला पेंडच काय , हिरवा सुखा चाराही  मिळेनासा झाला. अशा तर्हेच्या म्हाताऱ्या जनावरांना भाकड म्हणतात. म्हैस भाकड होते तेव्हा तिला कसायाला विकून शेवटची कमाईही वसूल करून घेतात.पण लाली तर गाय होती. गो माता.

काही संस्कार, बरीचशी लोकलज्जा, त्यामुळे घरातून हाकलून देऊ शकत नव्हते.खुंटाला बांधूनही नाही ठेवल पटेलांनी. तिला कळलं ,तेव्हा ती गोठ्यात बसून रहायची, किंवा गल्लीत फिरत असायची. बिचारी गो माता, लाडकी गो माता. भुकेने आणि तहानेने व्याकुळ गो माता.नुसता हाडांचा सापळा राहिला तिचा. चालताना तिचे पाय लटपटत.थंडी़, ऊन्ह, पाऊसाचा मारा सहन करीत, चारापाण्याचा शोध घेत निराश होऊन ती दिवसातून एकदा तरी मालकांच्या घरी जाऊन येते. पण आता तिथे तिची गरज कोणालाच नाही. पटेल तर ती आली की हाड, हाड करून  हाकलून देतात. त्यांचं हाडहाड ऐकून गो माता तोंड फिरवते.—

 

मूळ हिंदी लघुकथा-‘गौ माता’ – लेखक – सुश्री नीता श्रीवास्तव, महू, म.प्र.

मो.9893409914

मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print