मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजीचे डोळे ☆ डाॅ. मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

☆ जीवनरंग ☆ आजीचे डोळे ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆ 

“धनू, तुला माहितीये, आज आपला चाफा कसा बहरला आहे तो? हिरव्या पानांमधून डोकावणारा तो पिवळा गुलाम कसा घमघमाट पसरवतो आहे बघ! आणि गुलाबी रंगाची ही बोगनवेल आपल्या घरावर हात-पाय ताणून मस्त पहुडली आहे.  ज्याच्यावर तू उभी आहेस ना ती मऊ हिरवळ बघ, कशी आपल्या पोपटी हातांनी तुला गुदगुल्या करतीये. आपल्या घराला कसला रंग दिला आहे माहितीये? आकाशासारखा निळा- आकाशी!” दादूचा हात पकडून धनू घरभर फिरत होती आणि दादू तिला उत्साहाने सगळे दाखवत होता.

आठ दिवसांपूर्वीच जन्मांध असणाऱ्या धनूला नवीन डोळे बसवले होते. देवाघरी जाताना तिच्याच आजीने तिच्यासाठी दान केलेले! इतके दिवस फक्त काळा अंधारच समोर असणारी धनू आजीच्या डोळ्यांनी सप्तरंगांची उधळण बघताना हरखून गेली होती.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जमाना ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

श्री भगवान वैद्य प्रखर

☆ जीवनरंग : लघुकथा – जमाना ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆

शेजारच्या घरून कशाचा तरी आवाज आला. सर्वांनी ऐकला. एक -दुसर्‍याकडे साशंक नजरेनी पाहीलं. परंतु पुढच्याच क्षणी सगळे आपापल्या कामांत गुंतले. फक्त एक दादू सोडून. दादू बेचैन होऊन गेले. शेवटी आपल्या जागेवरून उठले आणि बाहेर गेट कडे जायला निघाले तर मुलगा अनुलोम विचारू  लागला, ‘‘बाबा, कुठे निघालात?’’

दादूंनी आवाजाच्या देशेने आपले बोट दाखविले.

‘‘तिकड़े काही नाही आहे …. तुम्ही बसा आपल्या जागी.’’

थोड्या वेळानी पुन: शेजारुन आवाज! वाटलं जसं कोणी आलमारी तोडत आहे ! दादू पुन्हा हबकले. इकडे-तिकडे बघायला लागले. सर्व आपाल्या कामात मशगूल. आवाजं येत राहीला.  कधी भांडे पडण्याचा,  तर कधी तोड़-फोड़ होत असल्याचा. दादू बेचैन होत राहीले.

दुसर्‍या दिवशी सकाळी शेजारी परत आले तर त्यांना घराचे कुलुप तुटलेले दिसले. आंत प्रवेश केल्यावर घरांत चोरी झाल्याचे ध्यानांत आले. पोलीस आलेत. शेजार म्हणून अनुलोम कडे ही विचारपुस व्हायला लागली.

‘‘तुम्ही लोकं काही सांगू शकता काय?’’

‘‘नाही सर, आम्हाला ही आजच कळले. वाटतय कोणीतरी  चोर असावा…’’

‘‘तुम्ही काही आवाज वगैरे ऐकला किवा संशय येईल असे कोणी…?’’

‘‘जी, आम्ही कांहीच सांगू शकत नाही. आम्ही सर्व उशिरापर्यंत टी. वी. बघत होतो. कोणीच काही आवाज वगैरे ऐकला नाही…’’

अनुलोम उत्तरं देत होता. हॉल मधे एकीकडे बसलेले दादू वारंवार खुर्चीवरून उठू पाहत होते.

पोलीस परतले. अनुलोम हातात एक गोळी आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन दादू जवळ आला. गोळी दादू च्या हाथावर ठेवत म्हणाला, ‘‘फक्त गोळ्या खात राहिल्यानी बी. पी. कमी होणार नाही आहे. तुम्ही आपली ही सवय सोडा. आता जमाना पूर्वीसारखा राहीला नाही.’’

© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

संपर्क : मो. 9422856767, 8971063051  * E-mail[email protected] *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चौकट ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे

सौ. प्रियदर्शिनी तगारे

☆ जीवनरंग ☆ चौकट ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे ☆ 

उषा शाळेतून बाहेर पडली तेव्हां दोन वाजायला आले होते. ऊन रणरणत होतं. तशी शाळा घरापासून जवळच होती. पण आज तिला थकल्यासारखं वाटत होतं

तीन वर्षांपूर्वी ती नोकरीला लागली. शाळा म्हणजे बालवाडीच होती. पगारही बेताचाच होता पण तिथं तिचा वेळ चांगला जात होता. आता दोन्ही मुली मोठ्या झाल्या होत्या मोठीचं तर लग्नही झालं होतं. धाकटी नोकरीला लागली होती. त्यातून अरूण घरी नेहमी उशीरा येत असे.उषाला घर खायला उठू लागलं. तिच्या मनानं उचल खाल्ली. अधूनमधून भाजीला जाताना तिनं ती शाळा पाहिली होती. एक दिवस धाडस करुन ती आत गेली.आणि नोकरीसाठी अर्ज देऊन आली. आश्र्चर्य म्हणजे महिन्याभरात नोकरी मिळूनही गेली. शाळेत  बायकांबरोबर ती रमली. एकमैकींच्या सुखदु:खात त्या वाटेकरी झाल्या.

विचारांच्या नादात उषा घरी पोहोचली. फ्लॅटचं कुलूप काढून आत जाताच बरं वाटलं. हातपाय धुवून तिनं ताट वाढून घेतलं. पण जेवावसं वाटेना.सारखा सुमाचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. रोज दोघी शेजारी बसत.गेले काही दिवस सुमा अस्वस्थ होती. आज द़ोघीच असताना उषा तिला म्हणाली ” सुमा,काही होतंय का गं?”

” छे! गं , कुठं काय?”

उषा तिच्या पाठीवर हात ठेवत बोलली, “तू नेहमी सारखी वाटत नाहीस. चेहरा बघ किती उतरलाय तुझा .”

त्यासरशी सुमा हुंदके देत रडायला लागली. तिनं जे सांगितलं ते ऐकून उषाला धक्काच बसला. सुमाच्या नवऱ्यानं दुसऱ्या एका बाईशी लग्न केलं होतं. आणि सुमाला सरळ घराबाहेर काढलं होतं. तात्पुरती ती एका नातेवाईकांकडे रहात होती. पण पुढे काय हा प्रश्र्न आहे वासून उभा होता. कोर्टात जाण्याएवढं आर्थिक आणि मानसिक बळही नव्हतं.

आता जेवताना उषाला ते सारं आठवत होतं. अरुणनं आपल्यालाही असंच घराबाहेर जा म्हणलं तर असा विचार मनात येऊन ती हादरली. गेली काही वर्षं अरुण अलिप्तपणे वागतोय असं तिला सतत वाटत होतं. एकदा धाडस करून तिनं त्याच्या आॅफिसात महिन्यापूर्वी चौकशी केली. आॅफिसमधल्याच एका अविवाहितेसोबत …….सारा प्रकार कळताच उषाच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. अरुणला याबाबत जाब विचारण्यासाठी ती संधीची वाट बघत होतो.पण आज सुमाची हकिगत ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. अरुणला जाब विचारला आणि तो घराबाहेर जा म्हणला तर कुठं जाणार आपण!बाहेरचं सगळं वखवखलेलं जग अंगावर येईल.या घरात केव्हढी सुरक्षितता आहे.संसाराच्या या सुरक्षित चौकटीसाठी किती बायका असे अन्याय निमूटपणे सोसत असतील. आणि तीही आता सोसत राहणार आहे.उषानं असह्हायपणे डोकं टेबलावर टेकून अश्रुंना वाट करुन दिली.

© सौ.प्रियदर्शिनी तगारे

© सौ.प्रियदर्शिनी तगारे≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆  जुगार!!! ☆ श्री सतीश  स.  कुलकर्णी

☆ जीवनरंग ☆  जुगार!!! ☆ श्री सतीश  स.  कुलकर्णी ☆ 

‘अपूर्वाई’ किंवा ‘पूर्वरंग’ याची अपूर्वाई आता काही राहिली नाही. तशी ती मीनाताईंनाही राहिली नव्हती. जपान, चीन, थायलंड, युरोपातले दहा देश पतिराजांबरोबर त्यांनी पाहिले होते. त्यांच्या दिवाणखान्यातील, माफ करा आलिशान हॉलमधील वस्तूच त्यांच्या वारंवारच्या परदेशगमनाची साक्ष देत होत्या.

ह्या वेळी मीनाताई अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांची कन्या आणि जावईबापू तिथं होते. अमेरिकेत होते म्हणजे ‘आयटी’ मध्ये होते, हे वेगळं सांगायलाच नको. मीनाताईंचे ‘हे’ मात्र ह्या वेळी त्यांच्या सोबत नव्हते. त्यांच्या कंपनीचं काही तरी मोठं काँट्र्क्ट व्हायचं होतं, म्हणून ते तिथंच राहिले होते. मीनाताईंनी ठरवलं, ह्यांची जबाबदारी नाही म्हटल्यावर आपण अमेरिका मनसोक्त पाहायची आणि भारतात परतल्यावर पुण्या-मुंबईच्या दैनिक-साप्ताहिकांमध्ये दाबून लेख हाणायचे! त्यामुळेच त्या अगदी टिपणं वगैरे घेत होत्या.

मुलगी आणि जावयानं ठरवलं की, मीनाताईंना लास वेगासची सफर घडवून आणायची. वीकएंड तिथंच एंजॉय करायचा. अगदी अट्टल जुगाऱ्यासारखं खेळायचं. भरपूर जिंकायचं, नाही तर खिसा खाली करून परतायचं. त्यांनी मीनाताईंना बेत सांगितला. सगळी उत्सुकता दाबून ठेवत मीनाताईंनी वरवर विरोध केला. मग थोडा आग्रह झाला नि त्यांचा लटका विरोध गळून पडला.

ठरल्याप्रमाणं तिघं तिथं गेले. जावयानं सासूला आग्रह केला. म्हणाला, ‘‘बघा तुमचंही नशीब अजमावून एखाद्या डावात.’’ मान जोरजोरात हलवत मीनाताई म्हणाल्या, ‘‘मी इथपर्यंत आले तेच खूप झालं हं. जुगार नका खेळायला लावू. मी आयुष्यात एकच जुगार खेळले. हिच्या पप्पांच्या रूपानं मोठा जॅकपॉट लागला मला. त्यावर खूश आहे मी.’’

जावयानं बराच आग्रह केला. मग लेकीनं भारतीय पुराणातली उदाहरणं देत कधीमधी जुगार खेळणं कसं अनैतिक नाही, हे आईला पटवून दिलं. ‘अगदीच तुमचा आग्रह मोडायचा नाही म्हणून हं,’ असं म्हणत मीनाताई तयार झाल्या.

मीनाताईंचं नशीब फाटकंच होतं त्या दिवशी. पाच-सात डाव झाले, एकदाही त्यांच्या हाती काही लागलं नाही. जावयाचे डॉलर आपण उधळतोय या समजुतीनं त्या कानकोंड्या झाल्या. अजून पाच-सात डाव झाले. उं हू. नशीब बेटं काही त्यांची साथ देत नव्हतं. हिरमुसल्या झाल्या बिचाऱ्या. परतायची वेळ झाली. अखेर जावयानं तोडगा काढला. म्हणाला, ‘‘शेवटचा डाव खेळा पाहू. जिंकणारच तुम्ही.’’

मीनाताई काही तयार होईनात. शेवटी जावई परत पुढं आला. हमखास जिंकण्यासाठी त्यानं त्यांच्या कानात युक्ती सांगितली. म्हणाला, ‘‘मम्मी, तुमच्या वयाच्या आकड्यावर पैसे लावा. मोठ्ठा डाव जिंकताय तुम्ही.’’ आणि तो बाहेर गेला.

पाच मिनिटांनी जावई बापू परत येऊन बघतायेत तो काय, सासूबाई घामाघूम झालेल्या आणि त्याची बायको काळजीत. त्यानं लगबगीनं विचारलं, ‘‘का गं? काय झालं?’’

बायको म्हणाली, ‘‘काय झालं कुणास ठाऊक. तिनं ५० डॉलर  ५२   आकड्यावर लावले आणि चाकाचा काटा थांबला तो बरोबर ५८ ह्या आकड्यावर. ते पाहून तिला चक्कर आल्यासारखंच झालं!’’

 

©  श्री सतीश स. कुलकर्णी

(मुक्त पत्रकार, ब्लॉगर)

(इंटरनेटमुळे छान छान विनोद वाचायला मिळतात. विशेषतः इंग्रजीतले विनोद. त्यातल्याच काही छोट्या विनोदांना मराठी साज किंवा बाज देऊन थोडं विस्तारानं लिहिलं. एखाद्या धान्याचा दाणा फुलवून त्याची खमंग व कुरकुरीत लाही बनवावी, तसं. ह्या लघुकथा अशाच; वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर दोन-चार स्मितरेषा उमटल्या, तर हेतू साध्य झाला एवढंच! – श्री सतीश स. कुलकर्णी)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संगत ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे

सौ. प्रियदर्शिनी तगारे

अल्प परिचय

रसायनशास्त्र व शिक्षणशास्त्रातील पदवी.  कथा , कविता व ललित लेखन.

मासिके व दिवाळी अंकासाठी नियमित कथालेखन. तीन कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या प्रकाशित. कथासंग्रहांना विविध लेखनपुरस्कार.

 ☆ जीवनरंग ☆ संगत ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे ☆ 

काकीनं रव्यासमोर काळा कळकट चहा ठेवला.

“त्याला बटर दे की” असं काकानं म्हणताच काकीनं रागानं बघितलं. आणि रव्यासमोर बटर आदळला. खरं तर रव्याच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता.पण काकीपुढं बोलणं शक्य नव्हतं.

गडबडीनं चहा पोटात ढकलून तो बाहेर पडला.नऊ वाजायला आले होते. पाच मिनिटं उशीर झाला तरी गॅरेजचा मालक तोंडाचा पट्टा सोडत असे. जीव खाऊन सायकल मारत तो गॅरेजवर गेला.

कोपऱ्यातला झाडणीचा बुरखुंडा उचलून त्यानं अंगण झाडलं. नळावरनं पाणी आणून  शिंपडलं. तेवढ्यात मालक आला. गॅरेजचं कुलूप काढताच आतून डिझेल आणि आॅईलचा घाणेरडा वास नाकात घुसला. रव्याचं डोकं वासानं भणभणलं. दुपारपर्यंत जीव तोडून काम करून तो जेवायला घरी गेला. काकी झोपली होती. चुलीपुढं त्याच्यासाठी  ताट वाढून ठेवलं होतं. ताटात दोन गारढोण भाकरी ,आमटीचं खळगूट आणि चिमटभर भात होता. आईच्या आठवणीनं रव्याच्या घशाशी आवंढा आला. आई दररोज त्याच्यासाठी मसालेदार भाजी , घट्ट डाळ असं चवीचं पोटभर जेवण करायची.

रव्याला ते दिवस आठवले. तो डोक्यानं हुशार होता. वडलांच्या माघारी चार घरी राबून आईनं त्याला वाढवलं होतं.बारावीपर्यंत तो चांगल्या मार्कांनी पास होत असे.आईला समाधान वाटे. आपला मुलगा खूप मोठा झाल्याची स्वप्नं तिला पडू लागली होती.

तो कॉलेजात गेला. त्याची दोस्ती पप्या आणि सागऱ्याशी झाली. मग दररोज कॉलेजच्या कट्ट्यावर बसून त्यांच्या टवाळक्या सुरू झाल्या.तास बुडवणं सुरू झालं. कधीतरी रव्याला आतून टोचणी लागे.तो वर्गात जायला निघाला की दोस्त म्हणायचे ,” अरे ,बस लेका.आलाय मोटा शिकणारा ”

असं होता होता रव्याचं आभ्यासातलं मन उडून गेलं. सलग दोन वर्षं तो नापास झाला.आणि कॉलेज सोडून घरात बसला.

आईनं मग त्याला तिच्या ओळखीनं एका घरी कामाला लावलं.अंगण झाडायचं ,गाड्या पुसायच्या. एवढं काम झालं की तो दोस्तांच्या कंपनीत रमायचा.त्या अड्ड्यावर मुलींच्या  गप्पा निघायच्या.एकदा रव्या बोलला ,” मी काम करतो त्यांची पोरगी बेष्ट आहे. कपडे तर एकदम हिरॉईन सारके घालती रे”

यावर पप्या ओरडला ” अरे ,पटव ना मग तिला. आईशप्पत तुला सांगतो ;या पोरींना आपल्यासारकीच पोरं आवडतात बघ ”

हळूहळू रव्याला तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं.त्याचं मन चळलं.ती गाडी काढायला आली की तो मुद्दाम तिथं घुटमळायचा. रोज दोस्तांची शिकवणी चालूच होती.

त्यादिवशी ती लाल टी-शर्ट आणि तोकड्या स्कर्टमध्ये भन्नाट दिसत होती. रव्याच्या डोक्यात भडका उडाला. काही कळायच्या आत त्यानं तिला घट्ट मिठी मारली. क्षणार्धात ती ओरडली. घरातून तिचे आईवडील थावत आले.

त्यांनी रव्याला पोलिसच्या हवाली केलं. आईनं हातापाया पडून सोडवलं. पण त्यांनी अट घातली की पुन्हा या गावात हा दिसता कामा नाही. रव्याची रवानगी इथं काकाकडं झाली. काकीचा सासुरवास सुरू झाला. आणि गॅरेजचा कळकट वास कायमचा त्याच्या आयुष्याला चिकटला.

© सौ.प्रियदर्शिनी तगारे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सौभाग्य ☆ सौ अंजली गोखले 

 ☆ जीवनरंग ☆ सौभाग्य ☆ सौ अंजली गोखले  ☆ 

 माया आणि मृणाल शाळेपासून च्या पट्ट मैत्रिणी. आज मायाने मृणालला मुद्दाम जेवायला घरी बोलावले होते. मृणालच्या आयुष्यातले वादळ जरा कुठे निवायला लागले होते. आपली गाडी पार्क करून मृणाल आली. मायाने हसून स्वागत केले. पूर्वीसारखी हसरी, उत्साही मृणाल मलूल वाटली स्वाभाविक च होते.

जेवताना बालपणीच्या, शाळा – कॉलेजच्या सगळ्या आठवणीची उजळणी झाली. हसत चिडवत रम्य काळात रमतगमत अंगतपंगत छान रमली. जेवण झाल्यावर पुनः गप्पा रंगल्या. मायाने मृणालला हळूच विचारले,” मृणाल, आता पुढे काय करायचे ठरवते आहेस?” मृणालने चमकून पहात विचारले,.” अग काय ठरवू? सगळे छान आहे ना? नितीनला जग सोडून जावे लागले तरीतो कायम माझ्या हृदयात आहे. अग आमचा फ्लॅट. गाडी सगळे त्याचेच आहे. मीवापरते, उपभोगते. मी दुसरा कोणताही विचार करूच शकत नाही. तुला काय म्हणायचय ते कळलं मला. पण तो आहेच ग अजूनही माझ्यासाठी. हे सगळे सौभाग्य त्याच्याच मुळे तर आहे. एक सांगते पुढे काय करायचे ते मात्र मी पक्कं ठरवलय.मी एक लहान मुलगा आणि मुलगी दत्तक घ्यायचं ठरवलय.म्हणजे माझ्या सासुबाई माझ्याकडे रहायला येतील तो किती पोळलेला जीव आहे. दोपींच्याही जीवनात हिरवळ फुलेल. मुलांच्या रुपात फुलांचा सुगंध आणि आनंद ब हरे ल”

माया पटकन उठून तिच्या जवळ गेली. तिचा हात हातात घेऊन म्हणाली,” खरच ग, तुझ्याकडे पाहूनच नितीनचे अस्तित्व जाणवते. या मुलांमुळे खरच तुझ्या आयुष्यात बाग फुलेल. मस्त निर्णय आहे तुझा. चल, हा आनंद व्दिगुणित करुया. मी तुझी ओटी भरणार आहे. तुझे हे नवीन सौभाग्य तुला खूप आनंद आणि समाधान देईल”. दोघीजणी आनंदाने उठल्या.

 

©️ सौ अंजली गोखले 

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुन्हा नव्याने ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ पुन्हा नव्याने ☆ सौ. दीपा नारायण पुजारी  ☆ 

धो धो पाऊस झाला. तुफान ढग फुटी.माणसांवर

रागावून कोसळला.  सगळीकडं पाणीच पाणी! उंच आकाशनिंबावरचं त्यांचं घरटं होतं की नव्हतं झालं. घरट्यातील अंडी खाली पडून फुटून गेली. दोघंही फांदीवर बसून एकमेकांची समजूत घालत असावेत. जड मनानं मी बाल्कनीच दार बंद केलं.सकाळी जाग आली ती ओळखीच्या किलबिलाटानं. बाल्कनीत येऊन पाहिलं.

चिमणा-चिमणी  गवत, काड्या गोळा करून घरटं बांधताना दिसले. पुन्हा नव्या उमेदीचं चिमणगाणं गुणगुणत!!सर्वस्व वाहून गेलं तरी दु:ख विसरून!!!नव्यानं संसार सजवण्यासाठी!!!!

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीर..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग : लघुकथा –  तीर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

गर्दी एका घरासमोर एका बाणाच्या रुपात उभी होती. घराचा मालक चांगले मार्क मिळवून पास झाला. गर्दीतून तीर सुटले,

‘ जरूर कुठून तरी प्रश्नपत्रिका मिळाली असणार.’

त्या व्यक्तिला चांगला जॉब मिळाला.

‘ नक्कीच कुणाचा तरी वशिला लावला असणार.’

व्यक्तीचा विवाह झाला. एक सर्वगुण संपन्न पत्नी मिळाली.

गर्दीतून तीर आला,  ‘त्याचा नशीब चांगलं म्हणून अशी चांगली बायको मिळाली.’

त्या व्यक्तिची मुलेदेखील चांगली शिकली आणि त्यांनाही चांगल्या नोकर्‍या मिळाल्या. त्यांची लग्ने झाली अणि त्या व्यक्तिला आता नातवंडेही झाली.

गर्दीतून सातत्याने त्याच्या दिशेने तीर येतच होते.

गर्दीच्या बाणांचा आघात झेलता झेलता अखेर ती व्यक्ती जीवनाच्या बंधनातून मुक्त झाली.

गर्दीने त्या व्यक्तीचं मृत शरीर पाहिलं. आता गर्दी आपल्या बाणांना धार लावून दुसर्‍या घरापुढे उभी होती.

 

मूळकथा – आघात  मूळ लेखिका – रंजना फतेपूरकर

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ उत्तर ☆ डॉ वसुधा गाडगीळ

डॉ वसुधा गाडगिल

☆ जीवन रंग ☆ उत्तर ☆ डॉ वसुधा गाडगीळ ☆

मॉरीसेट कांगारू वाइल्ड लाइफमधून बाहेर पडून लोक  क्रूसनच्या वाटेकडे पाहत होते. आमच्या शेजारी दोन स्त्रियाँ उभ्या होत्या.  दोघीही परदेशी होत्या.  माझ्या कपाळावर कुंकू बघून एक स्त्री म्हणाली – “इंडिया !”

मी “हो”  म्हणाले.

“ब्यूटीफूल कंट्री”.

“तुम्ही भेट दिली होती का!”

“नाही, पण माझी मुलगी तिथे होती …. फॅमिली बॉन्डिंग अँड ह्यूमन रिलेशनशिप इज व्हरी स्ट्रॉंग इन इंडिया!”

“हो!” मी स्मितहास्य देत म्हणाले.

“ऑस्ट्रेलिया सुंदर देश आहे “.

“हो … सुंदर आणि विकसित देश.”

त्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल बरेच काही सांगितले. मी उत्सुकतेने चौकशी केली

“येथील सामाजिक आणि कौटुंबिक रचना आहे ?”

अचानक तिचा उत्साह थांबला.  तिच्या वार्धक्यातल्या  चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे आकार एकाएकी बिघडले.  श्वास सोडत ती मोठ्या आवाजात बोलली.

“कृपया येथील रचनांबद्दल विचारू नका! खूप बीटर एक्सपिरियंस…”

मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले तसेच हा सांस्कृतिक वारसा जोपासण्याच्या विचारांनी मनात उत्तम आकार  घेतला होता.

 

© डॉ. वसुधा गाडगीळ 

संपर्क –  डॉ. वसुधा गाडगिल  , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.

मोबाईल  – 9406852480

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लोककथा – मुकणा मोर ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ जीवनरंग ☆ लोककथा – मुकणा मोर ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

 

खूप वर्षांपूर्वी गोंडवनात अगदी चिमण्यासारखे मोर असत त्यावेळची गोष्ट आहे ही.  त्या राज्यात मोराला खूपच महत्व होते.  राजाच्या किरीटावर चक्राकार मोरपिसे असत. राणीच्या किरीटावर पाच आणि अंबाड्यावरच्या सुवर्ण फूलावरही 2 मोरपिसे असत.  राजवाड्यातील जवळ जवळ सर्व दागिने मोरपिसांच्या घडणीचे बनवले जात. राजमुद्रेवरही मोराचे चिन्ह होते.  राजवाड्यात सगळीकडे मोराच्या विविध छटांची चित्रे चितारलेली असत.

त्या वाड्यात शंभर सव्वाशे लफ्फेदार पिसा-यांचे मोर  आणि त्यांच्या लांडोरी इकडून तिकडे सतत बागडत असत. राजवाड्यापासून दोन कोस दूरच्या जंगलातल्या टेकडीवर एक पठार होते.

ती होती मोरनाची! प्रत्येक वर्षी ‘शरद,चैत्र आणि वैशाख पौर्णिमेच्या रात्री  पिसारा झूलवत त्या जंगलातले सगळे मोर आणि मोरणी तिथे जात आणि रात्रभर स्वर्गीय नर्तन होई. दुसर्‍या दिवशी तिथे मोरपिसांचा नुसता सडा पडे.

वास्तविक मोर सोडून दुसर्‍या प्राण्यांना त्या पौर्णिमेच्या दिवशी मोरनाचीवर जायची मुभा नव्हती.  माणसे सोडून इतर सर्व प्राणी हा नियम कसोशीने पाळत.

राजा आणि त्याची माणसे मात्र पौर्णिमेच्या संध्याकाळी टेकडीवरच्या उंच झाडांवर चढून बसत आणि त्या सोहळ्याची मजा लुटत.

त्या मोरांचा एक राजा होता.  त्याला या प्रकाराचा खूपच राग येई.  पण करणार काय! त्याने एकदा राजाला एकटे गाठून सांगितले,  “चोरून मोरनाची पहाणा-यांच्या घरात मुकणा मोर जन्माला येतो”

” मुकणा मोर म्हणजे”? राजाने विचारले

“वयात आल्यावरही ज्याला पिसारा फुटू शकत नाही असा मोर”,  मोराने सांगितले. राजाला नीटसे कळले नाही पण राणीला कळले. तिला खूप भीती वाटली.  तिचे होणारे मूल तसे जन्माला आले तर… राजाने सारेच हसण्यावारी नेले.

राणी मनात झुरू लागली. ‘ मला मुलगी होऊ दे’,   म्हणून मनोमन प्रार्थना करायला लागली.  खरे तर राज्याला चांगला  वारस मिळावा म्हणून तिने किती व्रतवैकल्ये केली होती. ती लवकरच फळाला येणार होती.

त्या दिवशीही शरद पौर्णिमा होती.  राजा आणि त्याचे मित्रमंडळ शिकारीसाठी जंगलात गेले होते. राणीला खूप अस्वस्थ वाटत होते. ती आणि तिच्या सख्या पुनव पूजेसाठी त्यांच्या देवीच्या मंदिरात जाणार होत्या. पूजा झाल्यावर जेवण आणि त्यानंतर नाचाचे फेरे.

राणी पूजा करुन परत येणार होती. खरे तर तिचे दिवस भरत आले होते पण पूजा झाली नाही तर.. तो अपशकून मानला जाई. त्यामुळे ती जड पावले  टाकत कशीबशी मंदिरात पोचली. तिने देवीची पूजा केली. ‘जन्मणारे मूल चांगले निपजू दे.’  त्याचा वंश वाढू दे!,  म्हणून डोळ्यात पाणी आणून तिने देवीकडे प्रार्थना केली.

देवळातच तिच्या पोटातून कळा येऊ लागल्या.  सख्यांनी लगबग करून सगळी व्यवस्था केली आणि राणीने एका देखण्या राजपुत्राला जन्म  दिला.

राज्यभर गूळाच्या बट्टया वाटण्यात आल्या. राजाने चहुबाजूंना सैनिक पाठवून जंगलात अस्वलाने तयार त्याच्या बाळंतीण अस्वलीसाठी तयार केलेले लाडू शोधून आणायला पाठवले.

हे लाडू फारच पौष्टिक असतात असे म्हणतात.   मोहाची फूले,  बाभळीचा डिंक, चारोळ्या आणि मध घालून ओबडधोबड बांधलेले लाडू जर कोण्या आईने खाल्ले  तर आई आणि बाळ दोन्ही टणटणीत व्हायलाच पाहिजे… रोज राणीपुढे त्या लाडवांचा ढीग पडायला लागला.

बाळ खरंच सुदृढ झालं आणि बापासारखं शूरही व्हायला लागलं.  राणीला मात्र काही खटकत होतं… कारण तिचं बाळंतपण करणा-या एका म्हातारीने तिला मुद्दाम वाड्यात येऊन. ‘राजपुत्र मुकणा मोर असणार आहे’, असे नुकतेच सांगितले होते. राजपुत्र खरे तर फक्त आठ वर्षांचा होता आणि राणीची कूस त्यानंतर काही भरली नव्हती.

राणीने देवीची रोज पूजा घालायचे ठरवले.  रोज पहाटे जंगलात फिरून सुंदर आणि सुवासिक फूले आणून संध्याकाळी देवीची सालंकृत पूजा बांधे आणि दिवसभर काही न खाता संध्याकाळी थोडा कुटकीचा भात खाऊन उपास सोडी.

हळुहळू राजाच्याही लक्षात यायला लागले . आता दोघे मिळून ती पूजा करत. काही वर्षे गेली.  राजपुत्र 13 वर्षांचा झाला. त्याच्यासारखा तिरंदाज दुसरा कुणी नव्हता. त्याची भाला फेक तर भल्याभल्यांना अचंबित करे.

मुलगा आईबापांच्या आज्ञेतही होता. पण राजा राणी मात्र झूरत होती.

एका दिवशी पूजेनंतर राजा राणी विमनस्कपणे बसले होते कारण राजपुत्र आता लवकरच 15 वर्षांचा होणार होता.  मोठा समारोह करायचा होता प्रथेप्रमाणे त्यानंतर राजपुत्र वर्षभर जंगलात राहून परत आला की त्याला युवराज अभिषेक व्हायचा होता आणि त्यानंतर वीस वर्षांच्या आत त्याचे लग्न करुन देणे भाग होते. एकमेकांशी काहीही न बोलता दोघेही हाच विचार करत होते. अचानक देवीच्या गाभा-यातून एक म्हातारी आजी बाहेर आली.  तिने राणीला सांगितले,  “सलग पाच  दिवस, मुकण्या मोराचे मांस मोराला खायला घाल.” सगळं मार्गाला लागेल.

जंगलात मुकण्या मोराला शोधणे सोपे नव्हते. कारण  त्या मोरांना मोरनाचीत प्रवेश नसतो त्यामुळे ते  पौर्णिमेचा तो मयूर क्रीडेचा सोहळा,  एखाद्या उंच झाडावर बसून टिपे गाळत पाहतात.

राजाने किंवा कुणीच असला मोर कधी पाहिला नव्हता.

पुन्हा मयूर राजा मदतीला आला.  तो म्हणाला..”मुकण्याला पिसारा नसला आणि त्याला पिल्ले द्यायची क्षमता नसली तरी तो अतिशय चिडलेला असतो  आणि तो मोरांमध्ये सर्वात बलवान असतो.  तो दहा नागांशी एकटा लढेल आणि जिंकेल.  ”  आपल्या जवळपास कुठे मुकणा मोर नाही पण सात टेकड्या ओलांडून पलिकडच्या जंगलात तो रहातो.”

राजा म्हणाला,  ” तुला कसे माहीत?

मोर म्हणाला, ” मागच्या जन्मी मी माणूस असताना मी टेकडीवरच्या झाडांवर चढून मोरनाचीवरचा पौर्णिमेचा सोहळा पहात असताना,  झाडावरून पडून मृत्यू पावलो होतो.

“खरेतर मीच मुकणा व्हायचो पण कसलासा डिंक आणि मखमलीचे किडे खाऊन मला पिसारा आला पण माझ्या पहिल्याच अंड्यातून मुकणा मोर निपजला पण त्यानं निसर्गाच्या विरूध्द जायचं नाकारलं आणि तो दूर जंगलात निघून गेला.”  मोर हुंदके देऊन रडू लागला.  राजा राणीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. ही कहाणी ऐकत मागे उभा असलेला राजपुत्र म्हणाला, ” मीही मुकणाच आहे ना,  मग त्या मोराच्या संगतीने मी त्याच्या जंगलात राहीन” मला राज्याचा लोभ नाही.  असे म्हणून तो कुणाचेही काही न ऐकता उजाडायच्या आत जंगलात निघून गेला.

राजानेही  पुन्हा कधी मोरनाची पाहिली नाही.

यथावकाश राणीला दुसरा मुलगा झाला आणि तो राजा बनला.

इकडे राजपुत्र मुकण्या मोराला भेटला आणि त्यांनी मुकण्यांची मोरनाची सुरू केली.  वास्तविक मोरनाचीचा एक उद्देश मोराचे प्रजनन असा असतो पण मुकण्यांच्या मोरनाचीत केवळ क्रीडा आणि निखळ आनंद असतो.

अजूनही नवेगावच्या जंगलातल्या एका टेकडीवर ‘मुकण्यांची मोरनाची’ आहे.  दरवर्षी वैशाख पौर्णिमेला पंचक्रोशीतले मुकणे मोर आणि मुकणे पुरुष तिथे जमा होतात आणि पुढचे चार दिवस मोठी धूम असते.

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print